ताक
ताक[संपादन]
ताक हा दुग्धजन्य खाद्यपदार्थ आहे.
दूध तापवून निवल्यावर त्याला दह्याचे विरजण लावले, की ८-१० तासांत दही तयार होते. व्यवस्थित लागलेले, कवडीयुक्त गोड दही उत्तम समजले जाते. मात्र नुसते दही खाण्यापेक्षा दही घुसळून लोणी काढून घेतलेले ताक अतिशय पथ्यकर असते.
दह्यात पाणी टाकून पातळ केलेले पेय म्हणजे ताक नव्हे, तर दह्यात पाणी टाकून लोणी येईपर्यंत घुसळून, लोणी काढून घेऊन उरते ते ‘ताक’.
ताक हे आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिक पेय आहे. ताकात पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, लोह, फॉस्फोरस, इत्यादी खनिजे, रायनॉप्लेरीन व्हिटॅमिन, फोलेट ‘‘अ’’, ‘‘ब समूह’’ ‘‘ड’’ व ‘‘क’’ ही जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात.
ताक हे दही किंवा सायीपासून बनवता येते. दही घुसळून त्याचे ताक बनवले जाते. आयुर्वेदात ताकाला पृथ्वीवरचे अमृत म्हटले आहे. प्रत्यक्ष इंद्रालाही ताक दुर्लभ झाले होते, असे संदर्भ संस्कृत साहित्यात आढळतात.
ताक हे आंबट, तुरट, रसात्मक असून भूक वाढवणारे आहे. थोडक्यात नियमित ताक प्याल्याने मेद, चरबी, शरीराची जाडी कमी होते. ताकाचा महत्त्वाचा गुण म्हणजे अजीर्णामुळे पोटात साठलेला आमदोष कमी होतो.
ताक बनविण्यासाठी वापरलेल्या विरजणात लॅक्टोबॅसिलस, स्ट्रेप्टोकोकस जीवाणू असतात. त्यामुळे ताक शरीरासाठी जास्त फायदेमंद असये. ताकाचा रोजच्या आहारात समावेश केला असता प्रकृती चांगली राहते. ताक शरीरातील उष्णता कमी करून शरीराचे तापमान समतोल राखण्यास मदत करते. त्यामुळे उन्हाळ्यात याचा वापर करतात. नियमितपणे त्याचे सेवन केल्यास अॅसिडिटीचा त्रास कमी होतो. शरीरातील रक्तभिसरण क्रिया ताकामुळे व्यवस्थित होते. याशिवाय हृदयाचा धमन्या कठीण बनणे, हृदयाचा झटका, कर्करोग यासारख्या घातक जीवघेण्या आजारांपासून बचाव करण्यास मदत होते.
विशेष गुण[संपादन]
- हिंगुजीरयुतं घोलं सैन्धवेन च संयुतम् ।
- भवेत् अतीव वातघ्नं अर्शोऽतिसार हृत्परम् ।
- रुचिदं पुष्टिदं बल्यं बस्तिशूलविनाशनम् ।।
- ...भावप्रकाश
अर्थात - भाजलेले जिरे, सैंधव मीठ व हिंग मिसळलेले ताक अतिशय वातशामक असते. मुळव्याध, अतिसारासारख्या रोगात उत्तम असते, अतिशय रुचकर व पौष्टिक असते, ताकद वाढवते व मूत्राशयासंबंधित वेदना दूर करते.
- - अपचन म्हणजे जेवणाची वेळ होऊनही भूक न लागणे, पोटात जडपणा वाटणे यांसारखी लक्षणे असल्यास अर्धा चमचा आल्याचा रस, पाव चमचा पुदिन्याचा रस व चवीनुसार सैंधव मीठ लोणी काढून घेतलेल्या वाटीभर ताकात टाकून घोट घोट घेण्याने बरे वाटते.
- - शौचाला बांधून होण्यासाठी ताक उत्तम असते. म्हणून जुलाब होत असल्यास किंवा फार वेळा शौचाला जावे लागत असल्यास तुपाची फोडणी दिलेले ताक पिण्याचा उपयोग होतो. तुपात जिरे, कढीलिंबाची पाने, किसलेले आले यांची फोडणी करून, चवीप्रमाणे मीठ मिसळून चविष्ट ताक बनवता येते.
- - लघवी साफ होत नसल्यास पातळ ताक पिण्याने लगेच बरे वाटते.
- - मुळव्याधीचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी नेमाने ताक पिणे उत्तम होय. विशेषतः सुंठ, मिरे, पिंपळी ओवा आणि जवखार समप्रमाणात घेऊन केलेली एक चमचा पूड एक छोटा ग्लास ताकात टाकून असे दिवसातून दोन वेळा घेणे (एक महिना) योग्य ठरते. .
- -जुलाब होत असता ताज्या दह्याचे लोणी न काढता तयार केलेले गोड ताक पिणे हितकर असते, तर ताप आला असता लोणीविरहित ताक केव्हाही चांगले.
- -दुधापेक्षा दही, आणि दह्यापेक्षा ताक पचनास अधिक सुलभ असते .
- -ताक हे सर्व वयोगटातील सर्व व्यक्तींना पिण्यास उत्तम मानले जाते. परंतु काही ठिकाणी पाच वर्षाखालील लहान मुलांना दही हे चांगले मानले जाते.
- -दही खाण्यासाठी काही पथ्यापथ्य आहेत, विशेषतः सर्दी, खोकला, ताप, त्वचा विकार तसेच रक्त विकार आदित्यादी आजारात दही वर्ज्य आहे . या शिवाय सूर्यास्तानंतर कधीही दही खाणे विषसमान आहे.
- - या उलट भाजलेल्या जिऱ्याची पूड, हिंग, सैंधव आणि काळे मीठ घालून तयार केलेले ताक सदैव हितकर आहे . असे ताक बाराही महिने पिता येते.
- - ताक त्रिदोषांचे शमन करते.
अधिक माहितीसाठी आयुर्वेदिक वैद्याचा सल्ला घ्यावा.
पोषणमूल्य[संपादन]
लोणीविरहित १०० ग्रॅम ताकाचे साधारणतः पोषणमूल्य-
लोणीविरहित ताक | पोषणमूल्य |
---|---|
ऊर्जा | १६९ कि. ज्यूल्स (४० किलो कॅलरीज) |
कार्बोदके | ४.८ ग्रॅम |
स्निग्ध पदार्थ | ०.९ ग्रॅम |
प्रथिने | ३.३ ग्रॅम |
कॅल्शियम | (१२%) ११६ मिलिग्म. |