गच्चीवरील बाग/झाडे लावणे

विकिबुक्स कडून
Jump to navigation Jump to search

मातीची निवड[संपादन]

नुसत्या काळ्या/लाल मातीमध्ये कुंडीत झाडे लावल्यामुळे पाण्याचा निचरा, पाणी धरुन ठेवणे, आणि मुळांच्या वाढीसाठी योग्य भुसभुशीतपणा असणे आवश्यक आहे. त्यानुसार आपल्याला तश्या प्रकारचे मिश्रण ज्यात भरपूर सेंद्रिय पदार्थ, तंतू, माती असेल अशा मिश्रणाचा उपयोग बहुतेक झाडांना होतो. आपण टाकलेले कोको पिट साधारण: एक ते दीड वर्षात सेंद्रिय घटकात बदलून जाते, त्यावेळी परत त्यात तंतू घालणे आवश्यक असेल. पण झाडाच्या प्रकारानुसार, किंबहुना ती झाडे कोणत्या भागात जास्त येतात त्यानुसार त्याच्या कुंडीतल्या मातीच्या मिश्रणात बदल करणे अपेक्षित आहे.

  • फ़ुलझाडे, फ़ळभाज्या, लहान झाडे - या झाडांना 33% माती(तुमच्या भागात उपलब्ध कोणतीही), 33% कोकोपिट/तांदळाचा भुसा/कडब्याचा चाळ, 33% सडवलेला पाला पाचोळा/गांडूळ खत. या झाडांना भरपूर सेंद्रीय घटक भरपूर पाणी आणि मुळे वाढण्यासाठी भुसभुशीत माती हवी असते. त्यामुळे सर्व घटकांचा एकत्रित परिणाम म्हणून सर्व घटक समान वापरल्यास झाडांची वाढ चांगली होते.
  • अळू, शाक भाजी/पाण्यातला पालक/चिखलात येणारी झाडे - या झाडांना जरी चिखल हवा असला तरीही कुंडीच्या तळाशी म्हणजेच मुळे धरुन ठेवणारा भाग मातीच्या गोळ्याचा असणे आवश्यक आहे, या साठी याची कुंडी बंदिस्त असलेली चांगली. यात माती जास्त म्हणजे 50% आणि कोको पिट 25%, सेंद्रिय घटक 25% असे मिश्रण केल्यास चिखलात, पाणथळ जागेत येणाऱ्या झाडांना त्यांचे नैसर्गिक वातावरण मिळते.
  • मोठी झाडे, फ़ळझाडे, मोठ्या वेली - म्हणजे मोठी झाडे जी आपण ड्रम अर्धे कापून, मोठ्या कुंड्यांमध्ये, किंवा तत्सम मोठ्या भांड्यामध्ये लावतो त्यांमध्ये खालच्या भागात जास्त प्रमाणात कोको पिट आणि वरच्या थरामध्ये सडवलेला पाला पाचोळा/गांडूळ खत असे भरल्यास कालांतराने वरील सेंद्रीय घटक खाली झिरपत जातात, शिवाय मातीचे प्रमाण कमी असल्याने मोठ्या कुंड्यांचे वजनही कमी रहाते. या झाडांना मुळांच्या जलद वाढीसाठी कोकोपिटमुळे मदतही होते. शिवाय अगदी शेवटपर्यंत म्हणजे दोन वर्षापेक्षा जास्त काळ माती भुसभुशीतच रहाते. त्यामुळे त्याचे पुर्नभरण करताना, मातीबदल करताना कमी त्रास होतो. झाडांना 25% माती(तुमच्या भागात उपलब्ध कोणतीही), 45% कोकोपिट/तांदळाचा भुसा/कडब्याचा चाळ, 30% सडवलेला पाला पाचोळा/गांडूळ खत.

कुंडीची निवड[संपादन]

  • साधारणत: झाड सुदृढ अवस्थेत त्या कुंडीत किती काळ राहू शकेल याचा अंदाज घेऊन तुम्ही त्या झाडासाठी कुंडीचा आकार आणि आकारमान ठरवावे.
  • आपण भरत असलेले मातीचे मिश्रण साधारण: दोन वर्षांपर्यंत बदलण्याच्या लायकीचे होते. त्यामुळे पुढील दोन वर्षात तुम्ही निवडलेले झाड साधारण किती मोठे होईल याचा अंदाज करावा.
  • तरी 14 इंची पेक्षा लहान कुंडी कोणत्याच झाडाला घेऊ नका असा माझा कायम अनुभव आहे. तरच तुम्हांला अपेक्षित वाढ, फ़ुले, विस्तार झाडाला टिकवता येतो. त्यापेक्षा लहान कुंडीमध्ये माती सतत कोरडी होण्याचे प्रमाणही जास्त असते.