कोविड-१९ : साहाय्य-पुस्तिका/काळजी कशी घ्यावी?

विकिबुक्स कडून
Jump to navigation Jump to search

सर्वसाधारण सूचना[संपादन]

  1. दररोज आपले हात अल्कोहोल असलेल्या सॅनिटायझरने किंवा साबणाने धुवा.
  2. स्वत: आणि इतरांमध्ये कमीतकमी १ मीटर (३ फूट) अंतर ठेवा.
  3. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळा.
  4. डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा
  5. मुखपटाचा (मास्कचा) वापर करा. खोकला व शिंक आल्यास हातरुमालाचा किंवा टिश्यू पेपरचा वापर करा व नंतर त्याची योग्य विल्हेवाट लावा.

मुखपटाचा वापर[संपादन]

कोविड-१९चा प्रसार रोखण्यासाठी मुखपटाचा वापर करावा अशा सूचना विविध माध्यमांतून देण्यात येत आहेत. त्याबाबतचे काही मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे.

मुखपटाचे (मास्कचे) प्रकार[संपादन]
  • वैद्यकीय मुखपट

एखाद्या आरोग्य सेवा यंत्रणेतील संसर्ग-जोखमीची पातळी किंवा त्या यंत्रणेची कार्यपद्धती ह्यांना अनुलक्षून योग्य उत्पादनाचा वापर केला जावा म्हणून आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय मानकांनुसार प्रमाणित असलेले वैद्यकीय मुखपटच वापरले जावेत. वैद्यकीय मुखपट हे एका वापरापुरते असतात.

सामान्य लोकांमध्ये हे वैद्यकीय मुखपट वापरण्यात आले तर त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना किंवा ज्या व्यक्तींना ह्याप्रकारच्या मुखपटांची जास्त गरज आहे अशांना त्यांचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. ज्या यंत्रणांमध्ये मुखपटांचा तुटवडा आहे, तिथे वैद्यकीय मुखपट हे केवळ आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी किंवा जिवाला धोका असलेल्या व्यक्तींसाठी राखून ठेवावेत.

  • वैद्यकीयेतर मुखपट

वैद्यकीयेतर मुखपट म्हणजेच विणीचे मुखपट हे विविध प्रकारच्या कापडांनी तयार केलेले तसेच बिनविणीचे म्हणजेच पॉलिप्रॉपायलीनने (polypropylene) तयार केलेलेही असतात. अनेक प्रकारची कापडे जोडून हे मुखपट बनवले जाऊ शकतात आणि ते विविध आकारांत उपलब्ध असतात. कापडांतील पदर हे मर्यादित असावेत जेणेकरून त्यामुळे श्वसनाला बाधा येणार नाही.

वैद्यकीयेतर मुखपट हे समाजातील संसर्गावर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने संसर्गबाधित व्यक्तींनी वापरायचे आहेत. त्यामुळे संसर्ग प्रतिबंध होतो असे मानू नये. सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करताना शारीरिक अंतर पथ्याचे पालन करणे शक्य नसते. अशावेळी तात्पुरती खबरदारी म्हणून अशा प्रकारचे मुखपट वापरावेत. मात्र वापर करतेवेळी नेहमी स्वच्छता राखणेही गरजेचे आहे.

  • अवैद्यकीय मुखपटांच्या निर्मितीवेळी पुढील मुद्दे लक्षात घ्यावेत -

१. वापरण्यात येणाऱ्या सामग्रीचा प्रकार - त्यांच्या पदरांची गालनक्षमता, श्वसनक्षमता मुखपटांच्या निर्मितीत योग्य सामग्रीची निवड करणे ही एक महत्त्वाची पायरी आहे. वापरात आलेल्या कापडावर मुखपटाची गालनक्षमता तसेच श्वसनक्षमता अवलंबून असते. विणीच्या मुखपटांमध्ये वापरण्यात आलेले कापड, धागे इत्यादींची विण कितपत घट्ट आहे ह्यावरून त्यांची गालनक्षमता ठरवली जाते. तर बिगरविणीच्या मुखपटांमध्ये गालनक्षमता ही त्यांच्या निर्मिती प्रक्रियेवर अवलंबून असते.

मुखपटाची सामग्री श्वसनक्षम असावी. त्यातून श्वासोच्छ्वास करण्यास अडथळा येता कामा नये. मुखपटासाठी वापरात येणाऱ्या कापडात गालनक्षमता आणि श्वसनक्षमता दोन्हींचा समतोल राखणे महत्त्वाचे आहे.

मुखपटांच्या निर्मितीसाठी शक्यतो लवचिक सामग्री वापरू नये. असे केल्यास वापर करताना मुखपटाची सामग्री चेहऱ्यावर ताणली जाईल आणि त्यामुळे श्वसनाला बाधा येऊ शकते.

२. मुखपटातील पदरांची संख्या

नायलॉन किंवा पॉलिस्टरच्या कापडाचे दोन वा जास्तीत जास्त चार पदरी मुखपट वापरल्याने त्यांची गालनक्षमता वाढते. सुती रुमालाच्या मुखपटात किमान चार पदर तरी असावेत. सच्छिद्र कापडांचा वापर टाळावेत, त्यांची गालनक्षमता फारच कमी असते. मात्र, घट्ट विणीच्या मुखपटांमध्ये पदरांची संख्या वाढवल्यास त्यांच्या श्वसनक्षमतेत घट होऊ शकते. त्यामुळे त्यांच्या निर्मितीनंतर लगेचच त्यांची श्वसनक्षमता तपासण्यासाठी नाकावाटे व तोंडावाटे श्वसनाचे प्रयोग करून पडताळणी करून घ्यावी.

३. मुखपटासाठी वापरण्यात येणाऱ्या सामग्रीतील मिश्रणे

वैद्यकीयेतर मुखपटाच्या सामग्रीत पुढीलप्रमाणे तीन पदरांचे मिश्रण असावे - अ) सर्वात आतील पदर हा जलग्राही म्हणजेच सुती कापडाचा असावा ब) सर्वात बाहेरील पदर हा जलापकर्षि म्हणजेच पॉलिप्रॉपायलीन, पॉलिस्टर किंवा त्यांच्या मिश्रणाचा असावा, ज्यामुळे बाहेरील संसर्गाचा वापरकर्त्याच्या नाकातोंडाशी थेट संपर्क येणार नाही क) मधला पदर हा पॉलिप्रॉपायलीनसारख्या कृत्रिम धाग्यांच्या (संश्लेषित) कापडाचा किंवा सुती कापडाचा असावा ज्यामुळे गालनक्षमता वाढते.

४. मुखपटाचा आकार

मुखपट हे साधारणतः पसरट वा चोचीच्या आकाराचे असतात. वापरकर्त्याचे नाक, गाल व हनुवटी एवढा भाग व्यापण्याच्या उद्देशाने त्यांची निर्मिती केली जाते. जर मुखपटाच्या कडा चेहऱ्याच्या जवळ नसतील तर बोलताना आतील वा बाहेरील हवा त्या कडांमधून सहजपणे आत-बाहेर जाऊ-येऊ शकते. तेव्हा, मुखपटांच्या निर्मितीवेळी ही बाबदेखील लक्षात घेणे गरजेचे आहे.

५. कापडावरील आवरण

कापडावर मेण किंवा तत्सम काही मिश्रणांचे आवरण असावे, ज्यामुळे हवेतील कणांच्या प्रवेशावर प्रतिबंध येईल शिवाय कापडही द्रव-प्रतिरोधक होईल. पण अशा आवरणांमुळे नकळत कापडावरील छिद्रे बुजू शकतात व मुखपटाद्वारा श्वास घेण्यास बाधा येऊ शकते.

६. मुखपटाचे व्यवस्थापन

वैद्यकीयेतर मुखपट हे सतत धुऊन स्वच्छ केले पाहिजेत. इतर वस्तू त्यामुळे दुषित होऊ नयेत म्हणून त्यांची व्यवस्थित हाताळणी केली पाहिजे. कापडातील पदर विरलेले आढळल्यास ताबडतोब मुखपटाची विल्हेवाट लावावी. कापडाच्या प्रकारानुसार योग्य त्या तापमानाच्या पाण्यात त्यांचे निर्जंतुकीकरण केले पाहिजे.

गरम पाणी उपलब्ध नसल्यास साबणाने मुखपट धुवावेत व लगेचच साध्या पाण्यात एक मिनिटभर बुडवून मग स्वच्छ करावेत ज्यामुळे त्यात साबणाचा काही अंश उरणार नाही.

संदर्भ[संपादन]

संदर्भसूची[संपादन]

(इंग्लिश भाषेत) https://apps.who.int/iris/rest/bitstreams/1279750/retrieve. दि. ०६ जून २०२० रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)