शोधयंत्राचा शोध - भाग २ - इतिहास
शोधयंत्रांचा इतिहास विश्वजालाशीच निगडीत असल्याने आपण थोडक्यात विश्वजालाचा इतिहास बघूया.
१९८९ साली स्वित्झर्लंडमधल्या एका अणुशक्तीसंशोधनाच्या प्रयोगशाळेत तिथली माहिती इतरांनाही महाजालावरून सहजपणे उपलब्ध व्हावी ह्या उद्देशातून तिथले एक संशोधक डॉ. टिम बर्नर्स-ली ह्यांनी विश्वजालाचा (वर्ल्ड-वाईड-वेब) शोध लावला. महाजाल (इंटरनेट) आधीच उपलब्ध होते, परंतु त्यावर माहिती वेगवेगळ्या पद्धतीत (प्रोटोकॉल्स) उपलब्ध होती. ह्या सगळ्या पद्धती एकत्रितरीत्या उपलब्ध करून द्याव्यात ह्या उद्देशातून विश्वजालाचा उगम झाला. ह्या शोधात महत्त्वाची ठरलेली संकल्पना म्हणजे आपण आज सहजरीत्या देतो तो दुवा.
ह्या दुव्यात तीन महत्त्वाचे भाग असतात. कुठल्या पद्धतीने त्या दुव्याला मिळवायचे (प्रोटोकॉल), कुठून मिळवायचे (महाजाळावरचे कुठले यंत्र), आणि काय मिळवायचे (त्या यंत्रावरील ठिकाण). उदाहरणार्थ, हा दुवा बघा. http://www.manogat.com/user/5238. यातील http म्हणजे ह्या दुव्याला कसे पोहोचायचे ती पद्धती. www.manogat.com हे महाजाळावरील ज्या यंत्रात हा दुवा साठवला आहे, ते यंत्र. आणि /user/5238 हे ढोबळरूपाने त्या यंत्रावरील ठिकाण म्हणायला हरकत नाही. १९९२ च्या सुमारास इतर ठिकाणीही ह्या शोधाचे बरेच उपयोग लक्षात येण्यास सुरुवात झाली. अमेरिकेतील इलिनॉय विद्यापीठात मार्क ऍंड्रीसन आणि एरिक बीना ह्या दोन विद्यार्थ्यांनी फावल्या वेळात एक न्याहाळक (ब्राउझर) तयार केला. विश्वजाळावरची माहिती संगणकावर कशी प्रस्तुत करावी याची त्यांनी सुविधा उपलब्ध करून दिली. त्याला नाव दिले "मोझैक". ही घटना विश्वजालाच्या इतिहासात इतकी महत्त्वाची आहे, की इलिनॉयच्या विद्यापीठात ह्या मोझैकच्या स्मृतिपर खालील फलक लावलाय.
त्याच सुमारास इलिनॉयमधल्याच रॉब मॅककूल हयांनी विश्वजालासाठी सेवादात्याची (सर्वरची) निर्मिती केली. आणि तोही फुकट वाटायला सुरुवात केली.
१९९२मध्ये मोझैक अमेरिकेतील बऱ्याच विद्यापीठांत लोकप्रिय झाले होते. सिलिकॉन व्हॅलीतल्या सिलिकॉन ग्राफिक्स ह्या संस्थेच्या संस्थापकांना, जिम क्लार्कना, ह्या न्याहाळकाचे अनेक व्यावसायिक फायदे दिसू लागले. त्यांनी ऍंड्रीसन आणि बीनाला इलिनॉयमधल्या अर्बाना-शँपेनमधून त्यांच्या कॅलिफोर्नियातल्या माऊंटन-व्ह्यू ह्या गावी नेले, आणि एक नवीन संस्था स्थापन केली. तिचे नाव नेटस्केप. नेटस्केपने त्यांचा न्याहाळक १९९४ मध्ये फुकट वाटायला सुरुवात केली. आणि आज आपल्याला अतिपरिचित असणाऱ्या विश्वजालाचा जन्म झाला. नव्हे ते अशक्त बाळ चांगले गुटगुटीत झाले.
आधी म्हटल्याप्रमाणे, विश्वजालाचा परिचय अमेरिकेतील (आणि युरोपातीलही) अनेक विद्यापीठांत विद्यार्थ्यांना आधीच झाला होता. सिलिकॉन व्हॅलीतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातील दोन विद्यार्थी जेरी यँग आणि डेव्हिड फायलो, यांनी त्यांना आवडलेल्या दुव्यांचे संकलन सगळ्यांना बघायला मिळावे म्हणून आपल्या वसतीगृहातल्या खोलीतल्या संगणकावर एक संकेतस्थळ उघडले. त्याचे नाव आपल्याला आता परिचित असेलच. ते स्थळ म्हणजे 'याहू!'. विश्वजाळातून आपल्याला अर्थप्राप्ती होऊ शकते, हा सूज्ञ विचार करून येथील आद्य गुंतवणूकदारांनी (व्हेंचर कॅपिटलिस्टस) यँग आणि फायलो ह्यांच्याशी संधान बांधले. आणि याहू! ही संस्था १९९५ मध्ये जन्माला आली.
विश्वजालावरील संकेतस्थळांची संख्या जोरात वाढत होती. कधीकधी तर दिवसाला दुप्पट व्हायची ही संख्या. अशा सगळ्या संकेतस्थळांची नोंद कशी करणार? ह्यावर फायलोने उपाय काढला. कुणीही नवीन संकेतस्थळ तयार केले, की ह्या संकेतस्थळाचा दुवा याहू! मध्ये त्या संकेतस्थळचालकाने टाकावा अशी सोय केली. अशा दुव्यांची संख्या दहा हजारापेक्षाही जास्त झाली. याहू!च्या मुखपृष्ठावर ती मावेना. म्हणून त्यांचे विषयानुसार वर्गीकरण करायला सुरुवात केली. आणि याहूची विश्वजाल-निर्देशिका (वेब-डिरेक्टरी) जन्माला आली. स्वत:च्या संकेतस्थळाची जाहिरात करण्यासाठी याहू!शिवाय इतर पर्याय नव्हता. त्यामुळे प्रत्येक संकेतस्थळचालक आपल्या संकेतस्थळाचा दुवा आणि त्याविषयी माहिती याहू!वरील विषयानुरूप ठिकाणात टाकायला लागला.
आज आपण याहू!चे मुखपृष्ठ पाहिले असेल. पण मला ११ वर्षांपूर्वीचे, मी इलिनॉय विद्यापीठांत शिकत असतानाचे याहू! चांगलेच लक्षात आहे.
आज नवीन कुठली संकेतस्थळे उपलब्ध आहेत हे कळावे, म्हणून मी याहू!ला रोज भेट देत असे. त्याच वेळी लक्षात आले, की नवीन संकेतस्थळांची घोषणा करताना त्या संकेतस्थळांचे चालक त्यांच्या स्थळांची नोंदणी, जे लोकप्रिय विभाग आहेत, त्यात करायला लागले होते. माहितीला इतके स्वातंत्र्य पहिल्यांदाच मिळालेले होते. त्यामुळे 'सेक्स' ह्या विषयासंबंधी संकेतस्थळे शोधण्यासाठी चिकार गर्दी व्हायची. याहू!च्या संस्थापकांनी त्यामुळे हा विभाग वेगळा निर्मिलेला होता. ह्या विषयावर सगळ्यांची नजर आहे हे पाहून अनेकांनी आपले संकेतस्थळ 'सेक्स' ह्या विषयावर आहे असे याहू!त नमूद करून प्रेक्षकांना आपल्या स्थळाकडे ओढण्याचा प्रयत्न केला!. संकेतस्थळांच्या गैरवापराचा इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेला हा पहिलाच प्रयत्न असावा.
हे सगळे इतक्या विस्तृतपणे लिहिण्याचे कारण की आजही शोधयंत्रांना गंडवण्याचे असे प्रयत्न वारंवार होत असतात. त्याचा इतिहास ११ वर्षे जुना आहे. जवळपास विश्वजालाच्या उगमाइतकाच जुना. असो. त्यावर उपाय म्हणून याहू!ने बऱ्याच लोकांची नेमणूक केली. कशासाठी? हे संकेतस्थळचालक आपल्या संकेतस्थळांची ज्या विषयासंबंधित आहेत ही जाहिरात करतात, ते खरेच आहे काय, हे पडताळून पाहण्यासाठी. त्याकाळी मला याहू!कडून विरोप आलेला आठवतोय. "तुम्हाला विश्वजालावर भटकायला आवडते का? तसे असल्यास आमची आस्थापना(कंपनी) तुमच्यासाठी उपयुक्त आहे. तुम्हाला त्यासाठी भरपूर पैसेदेखील मिळतील!" असे हे विरोप. मी ते विरोप क्षणाचाही विचार न करता का काढून टाकलेत, याबद्दल अजूनही अधूनमधून खेद करीत असतो. असो. "कोई गल नही!"
जसजसा याहू!मध्ये वर्गीकृत केलेला संकेतस्थळांच्या दुव्यांचा साठा वाढत गेला, तसतसे लोकांना त्यांच्या आवडीच्या विषयांवरील संकेतस्थळ शोधणे कठीण होऊ लागले. म्हणून याहू!ने एक अगदी मूलभूत स्वरूपाचे शोधयंत्र तयार केले. त्यात तुम्ही तुम्हाला हवा असणारा विषय शब्दरूपात टंकित केला, की याहू!च्या निर्देशिकेत, ते शब्द ज्या संकेतस्थळांच्या दुव्यांत किंवा संकेतस्थळचालकांनी दिलेल्या माहितीत असतील, ते दुवे उत्तरादाखल यायचे. त्यामुळे संकेतस्थळचालक माहितीत लोकप्रिय शब्द मुद्दाम लपवून ठेवायचे. बहुतांश संकेतस्थळे एच-टी-एम-एल ह्या भाषेत असतात. त्या भाषेत लिहिताना शब्द शोधयंत्रांना दिसतील पण वाचकांना दिसणार नाही अशी 'मेटा' माहितीची सोय असते. त्यात हे लोकप्रिय शब्द दडवून ठेवायचे हे लोक. आणि त्यावेळचे हे मठ्ठ शोधयंत्र ह्या 'मेटा' शब्दांवर पूर्ण विश्वास ठेवायचे. आणि लोकप्रिय शब्द शोधखिडकीत टंकित केला, की त्या संकेतस्थळाचा दुवा सर्वात वर असायचा.
आपण जे शोधण्याचा प्रयत्न करतोय, ते आपल्याला कधीच सापडत नाही. इतर अनावश्यक माहितीच जास्त दिसते, असे वाटून लोकांचा ह्या शोधयंत्रावरचा विश्वास पूर्णपणे उडाला.
ह्याच काळात विश्वजालावर माहिती शोधणे अधिक सोपे पडावे म्हणून अनेक तल्लख मेंदू विविध प्रकारे कार्यरत होते, त्याची माहिती पुढच्या भागात.
[गृहपाठ: गेल्यावेळचा गृहपाठ केलाय का ? नसेल तर तो आधी करा. केला असल्यास, जगात सर्वात जास्त शोध घेतला जाणारा शब्द कुठला असेल असे तुम्हाला वाटते ? कल्पना नसल्यास गूगल झीटगाईस्ट बघा. झीटगाईस्ट ह्या मूळ जर्मन शब्दाचे स्पेलिंग माहिती नसेल तर तुम्हाला जे स्पेलिंग वाटते ते शोधयंत्रात टंकित करा. त्या स्पेलिंगच्या जवळपासची स्पेलिंग ते शोधयंत्र सुचवते आहे का? नसल्यास, त्या शोधयंत्राला मनसोक्त शिव्या घाला. अर्थात जवळ कुणी नाहीत हे बघून. १९९५ मध्ये सेक्स हा शब्द एखाद्याने एस-ई-के-एस असा टंकित केल्यावर त्याला त्या काळच्या शोधयंत्रांतून एकही उत्तर न मिळाल्यामुळे किती उद्विग्नता आली असेल ह्यावर विचार करा ]
शोधयंत्राचा शोध - भाग ३ - इतिहास (पुढे चालू)
[संपादन]आपण गेल्यावेळी बघितले, की याहू!ने विश्वजाल-निर्देशिका सुरू केल्यावर हजारो संकेतस्थळांनी तिथे नोंदणी केली. संकेतस्थळचालकांनी तिचा गैरवापर सुरू केला. त्यावर उपाय म्हणून याहू!च्या संस्थापकांनी खूप लोक नियुक्त करून ती संकेतस्थळे योग्य विभागात टाकण्याची सोय केली.
परंतु, संकेतस्थळे जसजशी वाढू लागलीत, तसतशी कुण्या एका संस्थेतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोंदी ठेवता येणार नाहीत, हे स्पष्ट झाले. संगणकाधारीत तंत्रज्ञानाची ही जुनीच समस्या होती. ह्याला म्हणतात वाढक्षमता (स्केलेबिलिटी). तुमच्या सेवेची तत्परता तुमच्या सदस्य संख्येनुसार वाढतेय की नाही, हे ठरवण्याचे मुख्य साधन. आणि विश्वजालाचे दोन प्रकारचे सदस्य आहेत. माहिती देणारे, आणि माहिती घेणारे. विश्वजाल ही दाता-याचक संस्कृती आहे. कुणी देतो, तेव्हाच घेणारे उपलब्ध असतात. आणि कुणी घेतो, तेव्हा देणारे उपलब्ध असतात. याहू!च्या ह्या दोन्ही प्रकारच्या सदस्यांना निर्देशिका प्रकाराचे न्यूनत्व जाणवायला लागले.
जेव्हा समस्या निर्माण होतात, तेव्हाच समस्यांची उकल करणारेही त्या समस्येविषयी उत्सुक होतात. समस्या नसताना ती सोडवणाऱ्यांना मूलभूत संशोधक (बेसिक रीसर्चर्स) अशी संज्ञा मिळते. समस्या आल्यावर किंवा येणार असे वाटल्यास ती सोडवणाऱ्यांना उपयुक्त संशोधक (अप्प्लाईड रीसर्चर्स) अशी संज्ञा मिळते
विश्वजालाच्या व्याप्तीमुळे आपल्याला हवी असलेली माहिती कशी शोधावी, अशी समस्या निर्माण होण्याआधीच काही संशोधकांनी ह्यावर उपाय शोधून काढला होता. त्यातले मुख्य म्हणजे एम.आय.टी. (मसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) ह्या अग्रगण्य तंत्रज्ञान संस्थेतील एक संशोधक, मॅथ्यू ग्रे. १९९३ मध्येच, म्हणजे विश्वजाळ लोकप्रिय होण्याआधीच, त्यावरील माहिती शोधून काढणे नंतर कठीण होईल, ह्या विचारांतून त्यांनी शोधयंत्रासारखे काहीतरी आवश्यक असेल म्हणून एक विश्वजाळ संचारक (वर्ल्ड वाईड वेब क्रॉलर) निर्माण केला. ह्याचे काम काय, तर त्यावेळी ऊर्जितावस्थेत असलेल्या विश्वजाळावर आपसूक संचार करायचा, आणि तिथले दुवे शोधून काढायचे. अशा लाखो दुव्यांचा त्यांनी साठा करून ठेवला होता. तोही कुठल्याही खऱ्याखुऱ्या व्यक्तीला मधे न घुसडता, फक्त संगणकाकरवी.
ह्या वरवर सामान्य दिसणाऱ्या गोष्टीत मलातरी एक अत्यंत महत्त्वाचे तत्व वापरलेले दिसून येते. ते म्हणजे, कुठल्याही बाबतीत मानवाची गरज भासली, की त्या बाबीची वाढक्षमता (स्केलेबिलिटी) कमी होते. त्याचा थोडा खुलासा करतो. तुम्ही एखादी कंपनी स्थापित केली. समजा की ती कंपनी सर्वसाधारण माणसांकडून पैसे घेणार, आणि ज्यांना गरज आहे त्यांना कर्ज म्हणून देणार आहे. (ह्या संस्थेला आपण पतपेढी अथवा बँक म्हणतो.) त्याच्यात जितकी जास्त माणसांची मध्यस्थी, तितकी त्या कंपनीची वाढक्षमता कमी असेल. कारण माणसाला असतो एकच मेंदू. आणि दिवसाला दहा-बारा तास काम केल्यावर तो मेंदू थकून जातो. त्याच्याने पुढे काम होत नाही, किंवा जे काम होते त्याचा दर्जा कमी होतो. आणि एकदा नियम ठरवून दिलेले असले, की त्या नियमाच्या चौकटीत राहून सतत तेच करत राहणे मानवी मेंदूला पटत नसावे. कारण त्या चौकटीत राहून सतत काम केल्याने मेंदूची क्षमता, त्याला चालना न मिळाल्यामुळे, हळूहळू कमी होत असते. तेच काम संगणकाला करायला दिले, की मानवी मेंदू स्वत:साठी उपयुक्त अशी प्रतिभाशाली कामे करू शकतो.
हे तुम्हाला पटो किंवा न पटो. पण माणसाची मध्यस्थी न ठेवता संगणकाकरवी संकेतस्थळांचे वर्गीकरण करावे ही कल्पना १९९३ मध्ये ह्या तत्वज्ञानातूनच उदयास आली.
डिजिटल इक्विपमेंट कॉर्पोरेशन (इंग्रजी आद्याक्षरानुसार, तिचे संक्षिप्त रूप, डेक) ह्या अमेरिकेच्या उत्तर पूर्वेतील मसॅच्युसेट्स राज्यातील कंपनीने १९६०-७० च्या दशकात संगणक निर्मितीतील एका बलाढ्य संस्थेला, आयबीएम ला, त्यांच्याच आखाड्यात हरवले होते. आयबीएम अजस्त्र संगणकांचे (मेनफ्रेम्स) निर्माता. १९५० पासून त्यांची ह्या क्षेत्रात आघाडी होती. संगणक म्हटलं की आयबीएम अशी परिस्थिती होती. त्यामुळे आयबीएम मुजोर झाली होती. डेकने मात्र आयबीएमच्या मुजोरीला आव्हान दिले. आयबीएम पेक्षा कमी किमतीत आणि छोट्या आकाराचे संगणक (पीडीपी, व्हॅक्स ह्या नावाने) बाजारात विकायला सुरुवात केली. लघुसंगणक (मिनिकाँप्युटर) ह्या संज्ञेखाली विकल्या जाणाऱ्या ह्या संगणकांचा आकार आपल्याला आजच्या मानाने अजस्त्र वाटेल, कारण हे लघुसंगणक आपल्या मोठ्यात मोठ्या शितकपाटाच्या (रेफ्रिजरेटरच्या) दुप्पट आकाराचे होते. पण त्यावेळचे आयबीएमचे संगणक एक पूर्ण मोठी खोली व्यापायचे, त्यापेक्षा हे पीडीपी छोटेच होते.
ह्या लघुसंगणकांच्या यशामुळे डेक ही एक श्रीमंत आणि बलाढ्य संस्था बनली होती. १९७६-७७ मध्ये ऍपल नावाच्या एका संस्थेने ह्या लघुसंगणकांपेक्षाही छोटा असा स्वीय संगणक तयार करेपर्यंत, आणि १९८१ मध्ये आयबीएमने (होय तीच अजस्त्र संगणक निर्माती आयबीएम) त्यांचा स्वीय संगणक लोकप्रिय करेपर्यंत. त्यानंतर डेक देखील आयबीएम सारखेच स्वीय संगणक निर्माण करू लागली. पण तोपर्यंत जमलेल्या मायेतून ह्या संस्थेने अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर सिलिकॉन व्हॅलीत स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या जवळ पालो आल्टो गावात दोन संशोधन केंद्रे उघडली होती. त्यात संगणक विज्ञानातल्या उत्कृष्ट संशोधकांपैकी काहीजण काम करत होते. १९८४-८५ च्या सुमारास आयबीएम स्वीय संगणकांची नक्कल करून अमेरिकेतील दक्षिणेकडील टेक्सास राज्यातील दोन कंपन्यांनी स्वीय संगणक अत्यंत स्वस्तात बनवायला आणि विकायला सुरू केली. त्या संस्था म्हणजे कॉम्पॅक, आणि डेल. त्यामुळे डेकच्या धंद्यावर आणखीच जास्त ताण पडायला लागला. आयबीएम, कॉम्पॅक आणि डेल च्या स्वीय संगणकात सिलिकॉन व्हॅलीतील सँटा क्लॅरा येथील इंटेल ह्या कंपनीने बनवलेला मुख्य सूक्ष्मप्रक्रीयक (मायक्रोप्रोसेसर, संगणकाचा मेंदू) वापरला जायचा. म्हणून डेकने त्यांना आव्हान दिले ते त्यांचा स्वत:चा अल्फा नावाचा प्रक्रीयक बनवून. जगातल्या उच्चतम संगणक अभियंत्यांनी बनवलेले यंत्र ते. तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अतिशय सुंदर होते. (ह्या अल्फाच्या मुख्य आरेखकांपैकी - डिझायनर्सपैकी - एक माझे आडनावबंधू डॉ. दिलीप भांडारकरही होते. ते आता इंटेलमध्ये आहेत.)
हे सगळे शोधयंत्राबद्दलच्या लेखात कशाला सांगताय ? मला हा प्रश्न समस्त वाचकवर्गाकडून ऐकू येतोय. जरा धीर धरा. संगणकजगतात वरवर वेगळ्या वाटणाऱ्या गोष्टी अशा एकमेकांत गुंतलेल्या असतात.
तर डेकचा अल्फा हा प्रक्रियक तांत्रिकदृष्ट्या जरी उत्कृष्ट असला, तरी लोकप्रिय स्वीय संगणकात त्याचा काहीही उपयोग होत नव्हता. कारण मायक्रोसॉफ्ट विंडोजची घरच्या वापरासाठी स्वस्तात मिळणारी आवृत्ती त्यावर चालत नव्हती. मायक्रोसॉफ्टने सेवादात्यांसाठी जी विंडोज एनटी ही नियंत्रण प्रणाली होती, त्याची एक आवृत्ती अल्फा साठी काढली. पण त्यात असंख्य त्रुटी होत्या. त्यामुळे अल्फा वर आधारीत संगणकांचा खप अत्यंत कमी व्हायला लागला. तेवढ्यात डेकच्या चालकांना ह्या विश्वजाळाच्या ‘खुळाविषयी’ कळले. विश्वजाळाच्या यंत्रणेत अल्फाचा वापर झाला, तर अल्फाचा खप वाढेल, असे त्यांना वाटले. डेकमधल्या सर्व संशोधकांचा त्यावर विचार सुरू झाला. त्यासाठी त्यांच्या बैठकी सुरू झाल्या.
डेकच्या पालो आल्टो मधल्या संशोधन केंद्रातील पॉल फ्लॅहर्टी यांनी सहज बोलता बोलता म्हटले, की आपला अल्फा प्रक्रियक इंटेल पेक्षा स्मृतिमंजुषा (मेमरी) चांगली हाताळतो. त्यामुळे विश्वजाळावरच्या ज्या कार्यांना जास्त स्मृतीची गरज असते, त्यांत अल्फाचा खूपच उपयोग होईल. आपण अल्फावर याहूसारखे एक शोधयंत्र बनवायला हवे. कंपन्यांमधल्या बैठकी म्हटल्या की अर्धेअधिक सभासद झोपलेले (किंवा डुलक्या घेत) असतात. पण सुदैवाने लुई मोनिए आणि माईक बरोज ह्या बैठकीत जागे होते. त्यांनी पॉलचे म्हणणे मनावर घेतले, आणि डिसेंबर १५, १९९५ ला 'आल्टाव्हिस्टा'चा जन्म झाला.
आल्टाव्हिस्टा ह्या संस्थेचे शोधयंत्राच्या इतिहासात अग्रणी स्थान आहे. 'आल्टाव्हिस्टे रचिला पाया, गूगल झालासे कळस' असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. पुढच्या लेखांत आपण आल्टाव्हिस्टा आणि इंकटुमी ह्या कंपन्यांनी आधुनिक शोधयंत्रांचा पाया कसा रचला ते बघूया.
[गृहपाठ: आल्टाव्हिस्टा ह्या कंपनीचा विश्वजाळात कुठल्याही शोधयंत्रांवरून शोध घ्या. ही कंपनी डेक पासून वेगळी कधी झाली ? ती नंतर ओव्हर्चर ह्या संस्थेत विलीन झाली. ओव्हर्चर ह्या संस्थेचा शोध घ्या. ती कंपनी २००३ मध्ये याहू!त विलीन झाली. अशा जुन्या कंपन्यांची मुखपृष्ठे इंटरनेट आर्काईव्ह ह्या स्थळावर सापडू शकतील. नक्की बघा. डेक ही कंपनी कॉम्पॅक ने विकत घेतली. मग कॉम्पॅक ही कुणी विकत घेतली? शोधा, म्हणजे सापडेल. मी ह्या लेखात कुठलेही दुवे दिलेले नाहीत हे लक्षात घ्या. हे जाणूनबुजून केले आहे. मी दुवे देण्या ऐवजी, तुम्ही ते शोधयंत्र वापरून शोधावे ही यामागील भूमिका.]