रामदासांचे अभंग

विकिबुक्स कडून
Jump to navigation Jump to search

अभंग[संपादन]

अभंग १

समुदाय काय सांगों श्रीरामाचा l ‌अंतरी कामाचा लेश नाही लेश नाही तया बंधु भरतासी l‌ सर्वही राज्यासी त्यागियेले त्यागियेले अन्न केले उपोषण ‌‌l धन्य लक्ष्मण ब्रह्मचारी ब्रह्मचारी धन्य मारुती सेवक‌ lश्रीरामी सार्थक जन्म केला जन्म केला धन्य वाल्मीकी ऋषीने lधन्य ती वचने भविष्याची भविष्य पाहता धन्य बिभीषण राघवी शरण सर्व भावे सर्व भावे सर्व शरण वानर‌‌ धन्य ते अवतार विबुधांचे विबुधां मंडण राम सर्व गुण‌‌ ‍‌‌अनन्य शरण रामदास

भावार्थ-- या अभंगात संत रामदास श्रीरामांच्या निकटवर्तीय समुदाया विषयी बोलत आहेत.राम जेष्ठ पुत्र असूनही त्यांना राज्याधिकार नाकारला जातो हा मोठा अन्याय आहे असे भरताला वाटते.व तो राज्य पदाचा त्याग करतो. असा निष्काम भरत, राजवाड्यातील सर्व सुखांचा ,पत्नीचा त्याग करुन रामांबरोबर वनवासात जाणारा व १४वर्षे अन्नत्याग करून उपोषण करणारा लक्ष्मण,सेवेसाठी सदैव तत्पर असणारा व जन्म सार्थकी लावणारा मारुती, भविष्याचा वेध घेऊन रामचरित्र रचणारे प्रतिभाशाली कवी वाल्मिकी ,भविष्यावर श्रध्दा ठेवून राघवाला शरण जाणारा रावणबंधू बिभिषण,सर्वभावे रामाला शरण जाणारी वानरसेना,ह्या सर्व ईश्र्वराच्या विभुती असून मी त्यांना अनन्य भावे शरण जातो असे संत रामदास म्हणतात.

अभंग २ .

काळ जातो क्षणक्षणा ‌ मूळ येईल मरणा‌ कांहीं धावाधाव करी ,जंव तो आहे काळ दूरी ‌ मायाजाळी गूंतले मन, परि हे दुःखासी कारण सत्य वाटते सकळ, परि हे जाता नाही वेळ रामीरामदास म्हणे, आता सावधान होणें.

भावार्थ ---काळ प्रत्येक क्षणी पुढे जात आ मूळ केंव्हा येईल हे सांगता येत नाही.जोवर काळ दूर आहे तोवरच प्रयत्न केले पाहिजेत.संसाराचे मायाजाल हेच दुःखाचे कारण आहे.संसार सत्य वाटत असला तरी तो क्षणभंगूर आहे.रामदास संसाराच्या अनित्यते बद्दल साधकालासावधानतेचा इशारा देत आहेत .व संसाराच्या बंधनापासून मुक्त होण्यासाठी धावाधाव करण्यास सांगत आहेत.

अभंग ३

ऐसा हा मत्सर लागलासे पाठीं ।देवा तुझी भेटी केंवि घडे भिन्न उपासना भिन्न संप्रदाव ।एकमेकां सर्व निंदिताती पंडितां पंडितां विवाद लागला ।पुराणिकां जाला कलह थोर वैदिकां वैदिक भांडती निकुरें । योगी परस्परें भांडताती स्वजाति विजाति भांडण लागलें ।दास म्हणे केलें अभिमानें

भावार्थ ----या अभंगात समर्थ रामदास संप्रदायातील मत भिन्नतेबद्दल भाष्य करीत आहेत.येथे भिन्न भिन्न उपासना.भिन्न भिन्न संप्रदाय आहेत.मत्सरापोटी ते एकमेकांची निंदा करतात.पंडितां पंडितां मध्ये पराकोटीचे वादविवाद लागतात.पुराणिकांमध्ये घोर कलह (भांडण ) माजतात.वेद जाणणाय्रा वैदिकांमध्दे निकराचे मतभेद माजतात.योगी परस्परविरोधी बनून वाद घालतात. हे पाहून समर्थ रामदासांना अत्यंत खेद होतो कारण हे सर्व केवळ अभिमानाने घडून येते पण त्याचा परिणाम असा होतो की, भक्त देवाच्या भेटीस पारखा होतो. आपणास देवाची भेटी केंव्ह घडेल असे वाटून तो काकुळतीस येतो.

अभंग ४

देह हे असार क्रुमींचें कोठार ।परी येणे सार पाविजे तें देहसंगे घडे संसारयातना । परी हा भजना मूळ देही देहाचेनि संगे हिंपुटी होईजे ।विचारें पाविजे मोक्षपद देहसंगें भोग देहसंगे रोग ।देहसंगे योग साधनांचा देहसंगे गती रामदासीं जाली ।संगति जोडली राघवाची

भावार्थ --- या अभंगात समर्थ रामदास अध्यात्मिक द्रुष्टीकोनातून मानवी देहाचे महत्त्व पटवून देत आहेत. देह हा असार (विनाशी ) असून अनेक प्रकारच्या रोगजंतुंचे भांडार आहे.।परंतू या असार देहाचा उपयीग करूनच आपण अविनाशी म्हणजे आत्म तत्वापर्यंत पोहचू शकतो.या देहामुळे संसारात अनेक यातना.शारिरीक व मानसिक दु:खे भोगावी लागतात तरिही देवाचे भजन याच देहामुळे शक्य होते. देहाच्या नश्वरतेमुळे निराश होण्यपेक्षा सारासार विचार करून मोक्षपदाला आपण पोहचू शकतो अशी ग्वाही समर्थ रामदास देत आहेत. देहासंगामुळे अनेक रोग जडतात अनेक भोग भोगावे लागतात, पण या देहामुळेच साधनेचा योग घडतो.या देहामुळेच समर्थांना रामदास म्हणवून घेण्याचे भाग्य प्राप्त झाले.त्यांना राघवाच्या संगतीचा लाभ झाला.असे श्री समर्थ म्हणतात.

अभंग ५

अनित्याचा भ्रम गेला । शुध्द नित्यनेम केला नित्यानित्य हा विचार । केला स्वधर्म आचार देहबुध्दी अनर्गळ । बोधे फिटला विटाळ रामदासी ज्ञान झाले आणि स्वधर्मा रक्षिलें

भावार्थ--या अभंगात संत रामदास नित्य व अनित्य गोष्टींचा विचार करण्यास सांगत आहेत.अनित्य (क्षणभंगुर) गोष्टींचा निरास करुन मनतील भ्रम दूर करावा असे ते सांगतात.त्यामुळे आपण नित्यानित्य विचार करुन देहबुध्दीचा त्याग करु शकतो.स्वधर्माचे आचरण करण्यासाठी शुध्द नित्यनेमाने आत्मबोध होतो. या आत्मबोधामुळे सोवळे,ओवळे ,विटाळ या भ्रामक कल्पना गळून पडतात .संत रामदास म्हणतात की, आपणास असे ज्ञान झाल्या मुळेच आपण स्वधर्माचे रक्षण करु शकलो.

अभंग ६

घात करुनी आपला । काय रडशील पुढिलां बहुत मोलाचें आयुष्य ।विषयलोभें केला नाश नाही ओळखिलें सत्या ।तेणें केली ब्रह्महत्या रामीरामदास म्हणे । भुलों नको मूर्खपणे

भावार्थ---केवळ विषय,वासनांच्या लोभामुळे आपण आपले सर्व आयुष्य वाया घालवतो. विषयलोभामुळे आयुष्याचा नाश झाल्यावर पुढे कितीही दु:ख केले ,कितीहि रडलो तरी त्याचा काही उपयोग होत नसतो असे सांगून संत रामदास आपणच आपला घात करू नये असा उपदेश करीत आहेत.जो सत्य ओळखू शकत नाहीं तो एकप्रकारे ब्रह्महत्या च करत असतो .मूर्खपणाने सत्य असत्य ओळखण्यात चुक करु नये असा सावधगिरीचा सल्ला ते आपल्याला देत आहेत.

अभंग ७

धातुवरी आला मळ । तेणें लोपलें निर्मळ शेतीं न जाता आउत । तेणें आच्छादिले शेत मुखे न होतां उच्चार ।तेणे बुडें पाठांतर नाहीं दिवसाचा विचार ।दास म्हणे अंधकार

भावार्थ---कोणत्याही धातूचा काही दिवस वापर न केल्यास त्यावर गंज चढतो. गंजामुळे धातूची निर्मलता लोप पावते. शेतात बरेच दिवस आउत घातले नाही ,शेताची मशागत केली नाही तर तण वाढून सर्व शेत आच्छादून टाकते. पाठ केलेल्या पाठांतराची रोज उजळणी न केल्यास आपण ते विसरून जातो. दिवस उजाडला आहे असा विचार न करता झोपून राहिलो तर संत रामदास म्हणतात की,सगळीकडे अंधारच दिसेतो.

अभंग ८

ऐसा कैसा रे परमार्थ । जळो जळो जिणें व्यर्थ युक्ताहार करवेना । निद्रा आली धरवेना मन चंचळ आवरेना । नीच उत्तर साहवेना रामदास म्हणे भावे ।स्थूल क्रियेस नब जावे

भावार्थ---शरिराला पोषक असलेला योग्य आहार जो घेत नाही ,झोप आली असता जो आवरू शकत नाही ,आपल्या चंचल मनावर जो संयम ठेवू शकत नाही तसेच इतरांनी केलेली निंदानालस्ती, अपशब्द जो सहन करू शकत नाही .अशा अत्यंत स्थूल गोष्टींवर जो मात करु शकत नाही तो परमार्थ साध्य करु शकणार नाही अशा माणसाचे जिणें व्यर्थ आहे असे संत रामदास मनापासून सांगत आहेत.

अभंग ९

वैद्य भेटला सुखदाता । रोगपालट जाला आतां रस ओतीला कानांत । येउनि झोंबला नयनांत रस भरला सांदोसांदीं । देही पालट जाली बुध्दि दिव्य देही ओतिला रस । गुरु न्याहाळी रामदास

भावार्थ---या अभंगात वैद्य रुपात सद्गुरू भेटल्यावर दे हात आणि मनात कसे परिवर्तन घडून येते याचे अत्यंत सुरेख वर्णन समर्थ रामदास करीत आहेत.एखादा निष्णात वैद्य भेटताच रोगपालट होतो .हा सुखदाता वैद्य म्हणजे सद्गुरु जो देहबुध्दीतच आमुलाग्र बदल घडवून आणतो.भक्तीचा प्रेमरस कानात ओतल्यावर तो डोळ्यात येऊन उतरतो आणि जगाचे स्वरूपच बदलून जाते. देहबुध्दि लुप्त होऊन सर्वत्र आत्मस्वरुप भरून राहते.हा दिव्यरस देहाच्या कणाकणात झिरपून भवरोग समूळ नाहिसा करतो, मन सुखावते.आपल्या या सद्गुरुला संत रामदास डोळे भरुन पाहतात.

अभंग 10

प्रव्रुत्ति सासुर निव्रूत्ति माहेर ।तेथे निरंतर मन माझे माझे मनी सदा माहेर तुटेना ।सासुर सुटेना काय करुं काय करूं मज लागला लौकिक ।तेणें हा विवेक दुरी जाय दुरी जाय हित मज चि देखतां ।यत्न करूं जातां होत नाहीं होत नाहीं यत्न संतसंगेविण । रामदास खुण सांगतसे

भावार्थ-संत रामदास या अभ़ंगात म्हणतात की, निव्रुती हे माझे माहेर असून तेथे माझे मन ओढले जाते.मनातून माहेरची आठवण जात नाही .परंतु प्रव्रूत्ति हे सासर असून त्या पासून सुटका करून घेता येत नाही .लौकिकाला टाळता येत नाही. त्यामुळे मनात निव्रूत्तिचा विवेक टिकवून धरता येत नाही.प्रयत्न करुनही मन या निव्रूत्ति च्या मार्गाने पुढे जात नाही. माझ्या डोळ्यांदेखत माझे हित दूर जात आहे.मनाच्या या द्विधा अवस्थेत असताना सुध्दा संत रामदासांचे विचारी मन अवस्थेतून सुटण्यासाठी प्रयत्न करते आणि संतसंगति शिवाय कोणतेही प्रयत्न सफल होणार नाहीत अशी ग्वाही देते.संतसंगति हीच निव्रुती मार्गाची खूण आहे असे संत रामदास स्पष्टपणे सांगतात.

अभंग 11

ईंद्रासी उद्वेग सर्वकाळ मनीं । माझे राज्य कोणी घेईना कीं घेईना कीं कोणी बळिया दानव । घालिना कीं देव कारागृहीं कारागृह देवादिकांचे चुकेना । तेथे काय जनां चुकईल चुकईल भोग हें कईं घडावें । लागेल भोगावें केलें कर्म केले कर्म तुटे जरी भ्रांति फिटे ।दास म्हणे भेटे संतजन

भावार्थ-या अभंगात संत रामदास कर्मभोग आणि त्याचे परिणाम या विषयाची चर्चा करीत आहेत. त्या साठी ते इंद्राचे उदाहरण देतात. आपले राज्य कोणी तरी बळकावून बसेल असे वाटत असल्याने त्याच्या मनात नेहमीच उद्विग्नता असतं.एखादा बलवान दानव सर्व देवांना काराग्रुहात डांबून इंद्रपद मिळवून बसेल अशी भिती त्याला वाटते.संत रामदास म्हणतात की,देवादिकांना सुध्दा तुरंगवास चुकला नाही तर तो माणसाला कसा चुकणार?सुखदु:खाचे भोग माणसला कदापीही चुकवता येणार नाहीत. आपण जसे कर्म करू तसे भोग आपल्याला भोगावे लागणार असा कर्मसिध्दांत आहे. केलेल्या कर्माचे भोग भोगून संपवल्या नंतरच मनाची भ्रांती फिटते असे स्पष्ट मत येथे संत रामदासांनी व्यक्त केले आहे.ते पुढे असेही म्हणतात की,संतजन भेटल्यावरच ही प्रक्रिया घडून येते.

अभंग १२

तेचि जाणावे सज्जन ।जयां शुध्द ब्रह्मज्ञान कर्म करिंती आवडी । फळाशेची नाही गोडी शांति क्षमा आणि दया । सर्व सख्य माने जया हरिकथा निरुपण । सदा श्रवण मनन बोलासारिखें चालणें । हींचि संतांचीं लक्षणें एकनिष्ठ उपासना । अतितत्पर भजना स्वार्थ सांडूनियां देणें ।नित्य तेंचि संपादणें म्हणे रामीरामदास । जया नाहीं आशापाश

भावार्थ -अभंगात संत रामदास सज्जनांची लक्षणे सांगत आहेत.त्यांना शुध्द ब्रह्मज्ञान असते.कोणत्याही फळाची अपेक्षा न करता काम करण्याची आवड असते.शांती,क्षमा व दया या विषेश गुणांविषयी त्यांना अत्यंत आस्था असते , हरिकथेचे निरूपण ,सतत,श्रवण व मनन करणे ह्यांची आवड असते.संत नेहमीच जसे बोलतात तसेच वागतात.एकनिष्ठपणे उपासना करणे,देवाचे भजनात तत्परता असणे,अत्यंतिक नि:स्वार्थीपणा कोणताही आशपाश नसणे.सतत नित्य वस्तु म्हणजे परमेश्वराची उपासना करणे ही संत सज्जनांची लक्षणें आहेत हे संत रामदास सांगतात.

अभंग १३

जाणावा तो ज्ञानी पूर्ण समाधानी ।नि:संदेह मनी सर्वकाळ आवडीने करी कर्म-उपासना ।सर्वकाळ ध्यानारूढ मन पदार्थांची हानी होतां नये काही ।जयाची करणी बोलाऐसी दास म्हणे धन्य सर्वांसी जो मान्य । जयाचा अनन्य समुदाव

भावार्थ-संत रामदास या अभंगात म्हणतात की,जो मनाने पूर्ण समाधानी असून नि:संदेह असतो तो खरा ज्ञानी असतो.तो आवडीने कर्म उपासनेत रमतो ,तोए सर्वकाळ इश्वर चिंतनात मग्न असतो. ज्ञानी संतांकडुन केव्हाही कोणत्याही पदार्थाची हानी होत नाही.ते नहमीच जसे बोलतात तसेच वागतात.ज्यांचा जन-समुदाय खूप मोठा असतो.असे संत सज्ज्न खरोखर धन्य होत.

अभंग १४

जाणावा तो साधु जया पूर्ण बोधू ।भूतांचा विरोधू जेथ नाही कल्पनेचा देहो त्या नाही संदेहो ।सदा नि:संदेह देहातीत जया नाही क्रोध जया नाही खेद ।जया नाही बोध कांचनाचा रामदास म्हणे साधूची लक्षणें । अति सुलक्षणें अभ्यासावी

भावार्थ-ज्याला नित्य वस्तूचा पूर्ण बोध झाला आहे तो खरा साधु असे समजावे.अशा साधुच्या मनात कोणत्याही प्राणिमात्रांच्या विषयी आकस नसतो.असे साधु केवळ आत्मरूप असतात.ते नेहमी नि:संदेह असून देहातीत असतात.ते राग,लोभ,दु:ख यांच्या पलिकडे असतात.त्यांना धन,कांचनाचा अजिबात मोह नसतो. संत रामदास म्हणतात ही खऱ्या साधुची लक्षणे असून ती मनापासून अभ्यासावी.

अभंग १५

बोलण्यासारिखे चाले जो सज्जन ।तेथें माझे मन विगुंतलें नाही अभिमान शुध्द ब्रह्मज्ञान ।तेथे माझे मन विगुंतले व्रुत्ति उदासीन स्वधर्मरक्षण ।तेथे माझे मन विगुंतलें पूर्ण समाधान सगुण भजन ।तेथे माझे मन विगुंतलें दास म्हणे जन भावार्थ संपन्न।तेथे माझे मन विगुंतलें

भावार्थ- जो सज्जन बोलण्या प्रमाणे वागतो तशी क्रुती करतो,शुध्द ब्रह्मज्ञानी असूनही ज्या सज्जनांना अभिमानाची बाधा नसते, नेहमी उदासिन व्रुत्तिने राहून जे धर्म रक्षणासाठी सतत प्रयत्न करतात, पूर्ण समाधानी असून जे आनंदाने सगुणाची उपासना करतात,अशा संताच्या ठिकाणी आपले मन गूंतून राहिले आहे असे संत रामदास या अभंगात सांगतात.शेवटच्या ओळीत तर ते असे म्हणतात की,जे सामान्य जन भावार्थ संपन्न असून भक्तीपुर्ण अंतकरणाने देवाला आळवतात तेथेही आपले मन गुंतून पडते.

अभंग १६

धन्य ते भाविक वंदिती हरिदास ।तयां ह्रषीकेश वंदितसे धन्य तें निंदक निंदिती सज्जन ।येणें भावें घडे ध्यान त्यांचें धन्य दास दासी सज्जन सेवेसी ।ते सुरवरांसी वंद्य होती

भावार्थ-रामदास म्हणे तरीच धन्य होणें। जरी संग लाधणे सज्जनाचाभावार्थ संत रामदास म्हणतात की, ते भाविक धन्य होत की जे हरिदासांना वंदन करतात . पुढे ते असेही म्हणतात की,जे सज्जनांची निंदा करतात ते निंदक सुध्दा धन्य होत कारण निंदा करण्यासाठी का होईना पण त्यांना सज्जनांचे ध्यान घडते.जे दासदासी सज्जनांची सेवा करतात ते धन्य होत कारण सुरवरच नव्हे तर प्रत्यक्ष ह्रषीकेशी त्यांना वंदन करतात. संत रामदास स्पष्टपणे सांगतात की, सज्जनांची संगति सहवास मिळणे यांतच जिवनाची खरी धन्यता आहे.

अभंग १७

जाणावा तो नर देवचि साचार । वाचे निरंतर रामनाम सगुणी सद्भाव नाही ज्ञानगर्व ।तयालागी सर्व सारखेचि निंदकां वंदकां संकटी सांभाळी ।मन सर्वकाळी पालटेना पालटेना मन परस्त्रीकांचनी ।निववी वचनी पुढिलांसीं पुढिलांसी नाना सुखें देत आहे ।उपकारीं देह लावितसे लावितसे देह राम भजनासी ।रामीरामदासीं रामभक्त

भावार्थ-जो वाचेने सतत रामनामाचा जप करीत असतो तो पुरूष देवाचे रुप आहे असे समजावे असे स्षट करुन संत रामदास म्हणतात की,त्यांना सगुण भक्ती आवडते.त्यांच्या ठिकाणी अपपर भाव नसतो. ते सर्वांना सारखेच मानतात.ते पूर्ण ज्ञानी असतात पण त्यांना त्याचा गर्व नसतो.ते मनाने स्थिर असून आपली निंदा किंवा वंदना करणाऱ्या सर्वांना ते संकटात सांभाळतात. ते स्थिरबुध्दी असून स्त्री आणि कांचन यांचा मोह त्यांना पडत नाही.ते केवळ शब्दांनी समोरच्याचे मन शांत करतात,त्यांना नाना सुखें देतात आणि आपला देह परोपकारा करिता खर्च करतात.ते आपला देह रामभजनात झिजवतात.संत रामदास म्हणतात की, रामाचे दास असलेले ते खरे रामभक्त असतात.

अभंग १८

देव अभक्तां चोरला ।आम्हां भक्तां सांपडला भेटीं जाली सावकाश ।भक्ता न लागती सायास पुढे विवेक वेत्र-पाणी ।वारी द्रुश्याची दाटणी रामदासाचे अंतर । देवापाशी निरंतर

भावार्थ-जे देवापासून विभक्त आहेत अशा अभक्तानीं देव चोरून नेला आहे.परंतू तो आम्हा भक्तांना सापडला आहे कारण प्रेमळ भक्तांना देव शोधून काढण्यासाठी काहीच सायास करावे लागत नाहीत, ते अनायासे देवाची सावकाश भेट घेऊ शकतात.संत रामदास सांगतात की,रामदासांचे मन निरंतर, सदासर्वकाळ रामापाशी गुंतलेले असते.

अभंग १९

ऐसा कोण संत जो दावी अनंत ।संदेहाचा घात करुं जाणे आढळेना जया आपुले पारिखें ।ऐक्यरूप सुखें सुखावला धन्य तेचि जनीं जें गुणें बोधिले ।दास म्हणे जाले पुरुष ते

भावार्थ-संत रामदास म्हणतात , असा कोण संत आहे की , जो मनातील सर्व शंकांचे निरसन करुन प्रत्यक्ष अनंताचे दर्शन घडवू शकतो.तो असा संत असतो की, ज्याला आपल्या वेगळे असे कोणी दिसतच नाही . तो ऐक्यभावाने जगातील सर्वाशी पूर्णपणे एकरुप झालेला असतो त्यामुळें तो पूर्ण सुखात असतो.सगुण भक्तीने जे अशा प्रकारे सामान्य जनांशी बांधले गेले आहेत ते भाग्याचे पुरुष होत.

अभंग २०

जंव तुज आहे देहाचा संबंध । तंव नव्हे बोध राघवाचा राघवाचा बोध या देहावेगळा।देह कळवळा तेथें नाही नांदतसे सदा जवळी कळेना ।कदा आकळेना साधुविण कांहीं केल्या नव्हे साधुसंतांविण । रामदास खूण सांगतसे

भावार्थ-या अभंगात संत रामदास स्पष्टपणे सांगत आहेत की, जो पर्यंत देहसंग असतो तो पर्यंत राघवाचा बोध होत नाही कारण राघवाचा बोध देहातीत असतो.देहाविषयी मोह ,ममत्व असेल तो पर्यंत राघवाचा लाभ होणार नाही.तो सतत आपल्या निकट असूनही त्याचे स्वरुप आपल्याला सत्संगाशिवाय समजू शकत नाही. राघवाचे स्वरूप समजण्यासाठी संतांना शरण जाणे हाच केवळ एकमेव मार्ग आहे .ही खूण संत रामदास सांगत आहेत.

अभंग २१

पाहतां दिसेना तेंचि बरें पाहे ।तेथें रुप आहे राघवाचें निराकार राम देखतां विश्राम ।दुरी ठाके श्रम संसारींचा सर्वकाळ रामदर्शन होतसे ।निर्गुणीं विश्वासें मन माझें संतसंगें घडे नि:संगाचा संग।राघवाचा योग रामदासीं

भावार्थ

साध्या चर्मचक्षुंनी जे दिसत नाही ते पाहण्याचा प्रयत्न केल्यास तेथेच राघवाचै रुप आहे.अशा निराकार रामाला पाहताच मनाला विश्राम मिळतो.संसारातील सर्व श्रम दूर निघून जातात.सर्व ठिकाणी सर्वकाळी केवळ रामच भरून राहिला आहे याची ष्रचिती येते व अशा रितीने रामदासांना रामाचा योग जुळून येतो.

अभंग 22

देव जवळी अंतरीं ।भेटिं नाहीं जन्मवरी भाग्यें आलें संतजन ।जालें देवाचे दर्शन मूर्ति त्रैलोक्यीं संचली ।द़ष्टि विश्वाची चुकली रामदासीं योग जाला ।देहीं देव प्रगटला

भावार्थ

देव अगदी आपल्या जवळ असतो,आपल्या अंतरी असतो पण जन्मभर त्याची भेट घडत नाही. एकदा भाग्य फळाला आले आणि संतांची भेट घडली,त्यांच्या मुळे देवाचे दर्शन झाले. देव स्वर्ग ,प़ुथ्वी,पाताळ असा त्रैलोकी भरुन राहिला आहे पण जगाच्या नजर चुकीमुळे देवाचे दर्शन घडत नाही असे। सांगून संत रामदास म्हणतात की,रामाचा दास बनण्याचा योग आला आणि रामदासांच्या देहात देव प्रगट झाला.

अभंग २३

आम्ही अपराधी अपराधी ।आम्हां नाही द्ढ बुध्दि माझे अन्याय अगणित ।कोण करील गणित मज सर्वस्वे पाळिलें । प्रचितीने संभाळिलें माझी वाईट करणी ।रामदास लोटांगणीं

भावार्थ

या अभंगात संत रामदासांची अपराधीपणाची भावना व्यक्त झाली आहे.आपल्याला निश्चयी बुध्दी नाही,ज्यांचे मोजमाप करता येणार नाही असे अगणित अन्याय घडले आहेत.वाईट करणी असूनही राघवाने सर्वस्वाने पालन केले आहे,अनेक वेळा सांभाळले आहे.अशी प्रचिती आली आहे.असे प्रांजलपणे सांगून, संत रामदास राम चरणीं लोटांगण घालून ,आपल्या अपराधाबद्दल क्षमा मागत आहेत.

अभंग २४

पतितपावना जानकीजीवना ।वेगी माझ्या मना पालटावें भक्तीची आवडी नाहीं निरंतर । कोरडे अंतर भावेविण माझें मीतूपण गेलें नाहीं देवा । काय करु ठेवा संचिताचा रामदास म्हणे पतिताचे उणे ।पतितपावनें सांभाळावें

भावार्थ या अभंगात संत रामदास आपल्या मनात प्रभु रामचंद्राने वेगानं बदल घडवून आणावा अशी प्रार्थना करीत आहेत.आपले अंत:करण भक्तीभावाशिवाय अगदी कोरडे असून मनामध्ये निरंतर भक्तिची आवड निर्माण होत नाहीं.अहंकार, मीतूपणा यांनी मन ग्रासलेले आहे कारण पूर्व संचिताचा ठेवा भक्तिच्या आड येतो.संत रामदास म्हणतात की, पतितांच्या उणिवा लक्ष्यात घेवून पतितपावन श्री रामाने पतितांना पावन करावे, सांभाळावे.

अभंग २५

पतितपावना जानकीजीवना ।वेगीमाझ्या मना पालटावें वैराग्याचा लेश नाहीं माझें अंगी ।बोलतसें जगीं शब्दज्ञान देह हें कारणीं लावावें नावडे ।आळस आवडे सर्वकाळ रामदास म्हणे लाज तुझी तुज ।कोण पुसे मज अनाथासी

भावार्थ

संत रामदास श्री रामाला प्रार्थना करतात की,त्यांनी आपले मन पालटून टाकावे.जगामध्ये कितीही शब्दज्ञान सांगत असलो तरी वैराग्याचा लवलेशही आपल्या अंगी नाही. देह सत्कारणी लावावा असे वाटत नाही. सदासर्वकाळ आळसच आवडतो.आपल्यातील हे सर्व दोष मान्य करून संत रामदास म्हणतात ,भक्तांचे हे सर्व दोष स्वामिंच्या स्वामीपणाला कमीपणा आणणारे आहेत कारण आम्हा अनाथांना या साठी कोणी विचारणार नाही.

अभंग २६

पतितपावना जानकीजीवना ।वेगीं माझ्या मना पालटावें मन हे चंचळ न राहे निश्चळ ।निरुपणीं पळ स्थिरावेना सांडुनियां ध्यान विषयचिंतन ।करितसे मन आवरेना रामदास म्हणे कथा निरुपणे ।मनाची लक्षणे जैसीं तैसीं

भावार्थ

आपले मन हे अतिशय चंचल असून एक क्षणभरही शांत राहत नाही.धर्मग्रंथाच्या निरुपणात स्थिरावत नाही.ध्यान सोडून देऊन विषयांचे चिंतन करणाय्रा या मनाला कसे आवरावे हे समजत नाही.संत रामदास म्हणतात, कितीही कथा व निरूपणे ऐकली तरी मनाची लक्षणे बदलत नाही,जशीच्या तशीच राहतात.श्री रामाला शरण जावून ,या चंचल मनाला पुर्णपणे बदलवून टाकण्याची ते विनंति करतात.

अभंग २७

पतितपावना जानकीजीवना ।वेगी माझ्या मना पालटावें मुखें बोले ज्ञान पोटीं अभिमान ।पाहे परन्यून सर्वकाळ द्रुढ देहबुध्दी तेणें नाहीं शुध्दि ।जाहलों मी क्रोधी अनावर रामदास म्हणे ऐसा मी अज्ञान ।सर्व ब्रह्मज्ञान बोलोनियां

भावार्थ

मुखाने ज्ञानाच्या कितिही गोष्टी बोलत असलो तरी मन मात्र अहंकाराने भरलेले आहे. हे मन सतत इतरांचे न्यून शोधत असते.देहबुध्दी इतकी घट्ट आहे की,अंतःकरणाची शुध्दि होत नाही.क्रोध अनावर होतो. संत रामदास म्हणतात सर्व ब्रह्मज्ञान बोलुनही अहंकार व क्रोध यांना जिंकू शकत नाही. श्री रामाने त्वरित अज्ञानी मनाला पालटून टाकावे अशी कळकळीची विनंति करतात.

अभंग २८

पतितपावना जानकीजीवना ।वेगीं माझ्या मना पालटावें मिथ्या शब्दज्ञाने तुज अंतरलों।संदेहीं पडलों मीपणाचें सदा खळखळ निर्गुणाची घडे ।सगुण नावडे ज्ञानगर्वे रामदास म्हणे ऐसा मी पतित ।मीपणें अनंत पाहों जातां

भावार्थ

या अभंगात संत रामदास पतितपावन रघूनायकला आपले मन परिवर्तन घडवून आणावे अशी विनंति करीत आहेत.ते म्हणतात की, खोट्या शब्दज्ञानाच्या भोवर्यात सापडून मन साशंक बनले आहे.निर्गुण भक्तीची ओढ वाटु लागली आहे.ज्ञानाचा गर्व वाटु लागल्याने सगुण भक्ती आवडेनाशी झाली आहे.ज्ञानाच्या फसव्या अहंकाराने रामभक्तीला परखा झालो आहे,पतित बनलो आहे.

अभंग २९

बिभिषण भावें शरण आला परी ।तुज सिंधुतीरीं ऐकुनिया तात्काळचि तुवां आश्वासिलें त्यासी।तैसें हें आम्हासीं कैचे रामा धारिष्ट आमुचें पाहे सर्वोत्तमा ।कलियुगींचे रामा दास तुझे दर्शन सुग्रीवा आधीं सौख्य दिले। मग तेणे केले दास्य तुझे तुजलागीं प्राण वेंचिलें वानरीं । परि तूं धनुर्धारी पाठीराखा तुझे रुप द्रुष्टीं नसोनियां ठावें ।नामीं सर्वभावें विश्वासलों सकळांहूनि साना रामदास जालों ।परिवारेंसि आलो शरण तुज

भावार्थ

श्री राम लंकेच्या समुद्र किनाऱ्यावर येवून पोहचले आहेत ही बातमी रावण बंधू बिभिषण याला समजताच तो अत्यंत भक्तिभावाने त्यांना शरण गेला आणि प्रभू रामचंद्रांनी तात्काळ त्याला आश्वासन दिले परंतू हे भाग्य आपल्या वाट्याला कसे येणार असे विचारुन संत रामदास म्हणातात की,ते कलियुगातील रामदास आहेत.श्री रामाने वानरपती सुग्रीवाला आधी दर्शन सौख्य दिले आणि नंतर त्याने प्रभुरामाचे दास्य पत्करले.वानरसेनेने रामांसाठी स्वता:चे प्राण खर्ची घातले पण त्यांना हे माहिती होते की प्रभू रामा सारखा धनुर्धारी त्यांच्या पाठिशी आहे.संत रामदास म्हणतात श्री रामांचे रूप नजरेला पडले नसतांना सुध्दां केवळ त्यांच्या नामावर विश्वास ठेऊन आपण सर्वभावे श्री रामांना शरण गेलो .बिभीषण, सुग्रीव व वानरसेना यांच्या पेक्षा लीन होऊन रामदास झालो आणि सर्व परिवारासह रामांना शरण गेलो.

अभंग ३०

रामा तुझ्या स्वामीपणे ।मानी ब्रह्मांड ठेंगणें तुजविण कोण जाणे ।अंतर आमुचें तुजविण मज माया। नाहीं नाहीं रामराया आम्हां अनाथां कासयां ।उपेक्षिसी तुज समुदाय दासांचा ।परि आम्हां स्वामी कैंचा तुजसाठीं जिवलगाचा ।संग सोडिला सगुण रघुनाथ मुद्दल ।माझें हेंचि भांडवल

भावार्थ

या अभंगात संत रामदास रामाची आळवणी करीत आहेत.रामाशिवाय दुसरे कुणी अंतरंगातील भावना जाणू शकत नाही.स्वामी रघुनाथा शिवाय मनापासून कुणावर माया कराविशी वाटत नाही. रामा सारखा स्वामी लाभल्यामुळे ब्रह्मांड मिळाल्या सारखे वाटते. असे असतांना श्री रामांनी आपल्या या एकनिष्ठ भक्तांची उपेक्षा करु नये अशी विनंति ते प्रभू रामचंद्रांना करतात.रामासाठी आपण अत्यंत जिवलग व्यक्तिंचा त्याग केला आहं.रामाची सगुण भक्ती हेच आपले एकमेव भांडवल आहे .रामांच्या सभोवताली दासांचा मोठा समुदाय आहे पण आम्हा भक्तांना श्री राम हे एकटेच स्वामी आहेत.रामांनी क्रुपा करुन या दासाला भव सागराच्या पार करावे अशी ईच्छा ते रामचरणी करीत आहेत.

अभंग ३१

माझा देह तुज देखतां पडावा ।आवडी हें जीवा फार होती फार होती परी पुरली पाहतां ।चारी देह आतां हारपले सिध्द जालें माझें मनीचें कल्पिले ।दास म्हणे आलें प्रत्ययासी

भावार्थ

संत रामदास म्हणतात की, रामासमक्ष आपला देह पडावा अशी मनापासून आपली अपेक्षा होती आणि ती पुरवली गेली हे पाहतांना त्यांचे स्थूल ,सूक्ष्म ,कारण व महाकारण असे चारी देह हारपले . रामदास म्हणतात आपल्या असे अनुभवास आले आहे की, आपण मनापासून जे कल्पिले होते ते सिध्दीस आले आहे.

अभंग ३२

काळ जातो क्षणक्षणा । मूळ येईल मरणा काहीं धांवाधांव करी ।जंव तो आहे काळ दुरी मायाजाळीं गुंतलें मन । परि हें दु:खासि कारण सत्य वाटतें सकळ । परि हें जातां नाहीं वेळ रामींरामदास म्हणें ।आतां सावधान होणें

भावार्थ-काळ क्षणाक्षणाला पुढे जात आहे,मरणाचे मूळ केंव्हा येईल हे सांगता येत नाही. संसाराच्या माया जाळ्यात मन गुंतले आहे पण संसार हेंच दु:खाचे कारण आहे.नाशवंत संसार सत्य वाटतो परंतू त्याचा विनाश होण्यास वेळ लागणार नाही,जो पर्यंत मरण काळ दूर आहे तो वरच सावधान होऊन मुक्ती साठी प्रयत्न केले पाहिजेत असा उपदेश संत रामदास करीत आहेत.

अभंग ३३

नदी मर्यादा सांडती ।उष्णकाळीं वोसावती तैसा तारूण्याचा भर ।सवें होतसे उतार भाग्य चढे लागवेगैं ।सवेंचि प्राणी भीक मागे रामदास म्हणे काळ ।दोनी दिवस पर्वकाळ भावार्थ- पावसाळ्यात नद्या पुराच्या पाण्यामुळे फोफावतात व किनारा सोडून वाहू लागतात,तर उन्हाळ्यात कोरड्या पडतात.संत रामदास म्हणतात तारुण्याचा भर नदीच्या पाण्यासारखा असतो,त्याला लवकरच उतार पडतो.माणसाचे भाग्य तसेच आहे.एकाएकी भाग्य उजळते आणि अचानक मावळते,माणसावर भीक मागण्याची वेळ येते.संत रामदास म्हणतात सतत बदलणाय्रा संसारात लाभ-हानी दोन्हीही पर्वकाळच समजावेत.

अभंग ३४

पुरें पट्टणें वसती । एक वेळ ओस होती तैसे वैभव हें सकळ । येतां जातां नाहीं वेळ बहुत स्रुष्टीची रचना । होय जाय क्षणक्षणा दास म्हणे सांगों किती ।आले गेले चक्रवर्ती भावार्थ-अनेक शहरे ,राजधान्या वसवल्या जातात पण एक वेळ अशी येते कीं,त्या ओस पडतात.तसेच सगळे वैभव येते आणि लयाला जाते त्याला वेळ लागत नाही.सर्व स्रुष्टीची रचना क्षणाक्षणाला होते आणि बदलते.संत रामदास म्हणतात कितीतरी चक्रवर्ती राजे आले आणि काळाच्या पडद्याआड नाहिसे झाले.

अभंग ३५

सांजे ओसरतां सांत ।वांया करावा आकांत तैसीं सखीं जिवलगें ।जाती एकमेकांमागें चारी दिवस यात्रा भरे ।सवेंचि मागुति ओसरे पूर्ण होतां महोत्साव । फुटे अवघा समुदाव बहू वह्राडी मिळाले ।जैसे आले तैसै गेले एक येती एक जाती । नाना कौतुक पाहती रामीरामदास म्हणे । संसारासी येणे जाणे

भावार्थ-संध्याकाळ होताच सूर्य अस्ताला जातो त्यासाठी शोक करणे व्यर्थ आहे तसेच आपले सगे,सोयरे ,,जिवलग एका पाठोपाठ आपल्याला सोडून निघून जातात.चार दिवस यात्रा भरते आणि हळूहळू ओसरते.एखादा मोठा उत्सव पूर्ण होतो आणि उत्सवाला आलेले सर्व लोक पांगतात.लग्न समारंभा साठी पुष्कळ वह्राडी जमतात ,आले तसे निघून जातात.काही येणाय्रा जाणाय्रांचे कौतुक पाहत असतात.संत रामदास म्हणतात या प्रमाणे संसारी येणे जाणे अटळ आहे.

अभंग ३६

एकीकडे आहे जन । एकीकडे ते सज्जन पुढें विवेकें वर्तावे । मागे मूळ सांभाळावें उदंड झाला समुदाय ।तरि आदि सांडू नये रामीरामदास म्हणे । जनीं मान्य हें बोलणें

भावार्थ-संत रामदास म्हणतात ,सामान्य जन व सज्जन असे दोन प्रकारचे लोक पहावयास मिळतात. समाजात माणसाने विवेकाने वागावे,आपली मूळ परंपरा सोडू नये .आपल्याला जनमान्यता मिळून मोठा समुदाय सभोवती जमा झाला तरीही आपण ज्या गुरु परंपरेतून आलो आहे तिचा आदर राखून त्या प्रमाणेच वागावे,त्याला बाधा आणू नये असे मत संत रामदास या अभंगात व्यक्त करतात.

अभंग ३७

प्रपंच सांडुनिया बुध्दी । जडली परमार्थ उपाधि मना होईं सावचित्त । त्याग करणें उचित संप्रदाय समुदाव ।तेणें जडे अहंभाव रामदास म्हणे नेमें । भिक्षा मागणें उत्तम

भावार्थ-प्रपंच सोडण्याची बुध्दी झाली, परमार्थाची उपाधि जडली परंतू समुदाय गोळा झाला आणि संप्रदाय निर्माण झाला की अहंभाव जडतो.संत रामदास सांगतात की, अहंकार निर्मूलन होण्यासाठी भिक्षा मागणे हा मार्ग आहे.यासाठी सावध राहून अहंकाराचा त्याग करणे उचित आहे.

अभंग ३८

नको ओळखीच जन । आंगी जडे अभिमान आतां तेथें जावें मना । जेथे कोणी ओळखेना लोक म्हणती कोण आहे ।पुसों जाता सागों नये रामदास म्हणे पाहीं ।तेथे कांहीं चिंता नाही


भावार्थ-ओळखीच्या लोकांमध्यै सतत राहिल्याने मनाला अभिमानाचा रोग जडतो. अशा वेळी अशा ठिकाणि निघून जावें की जेथें ओळखिचे लोक फारसे भेटणार नाहीत. जेंव्हा लोक आपण कोण असे विचारतील तेंव्हा ओळख सांगू नये. संत रामदास म्हणतात कीं, असे वागल्यास तेथे काहीं चिंता राहत नाही.

अभंग 3९

आम्ही मोक्ष लक्ष्मीवंत । भवदरिद्र कैंचें तेथ श्रीपतीचे परिजन ।आम्ही स्वानंदसंपन्न समाधान तें सभाग्य । असमाधान तें अभाग्य रामीरामदासीं देव । सख्यासहित स्वानुभव

भावार्थ- या अभंगात संत रामदास आपण भाग्यवंत आहोत कारण मोक्षलक्ष्मी आपल्याला प्रसन्न आहे ,त्यामुळे संसारातील दारिद्रय आमच्याकडे नाही. आपण स्वानंद संपन्न् आहोत असे मोठ्या अभिमानाने सांगतात.समाधान हे सौभाग्य आणि असमाधान हेंच दारिद्र्य होय असे त्यांचे मत आहे.श्री राम हे रामदासांचे दैवत असून श्रीराम सौख्याचा त्यांना स्वानुभव आहे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

अभंग-४०

स्नान संध्या टिळेमाळा ।पोटीं क्रोधाचा उमाळा एसें कैंसें रे सोंवळे। शिवतां होतसे ओंवळें नित्य दंडितां हा देहो । परि फिटेना संदेहो बाह्य केली झळफळ । देहबुध्दीचा विटाळ नित्यनेम खटाटोप । मनीं विषयाचा जप रामदासीं द़ुढभाव । तेणेंविण सर्व वाव

भावार्थ - मनामध्ये खरा भक्तीभाव नसतांना केवळ बाहय उपचारांचे अवडंबर माजवणाय्रा दांभिक भक्तांवर टीका केली आहे. संत रामदास म्हणतात ,नेहमी नियमितपणे स्नान संध्या करणारे, कपाळावर टिळे व गळ्यात माळा घालणाय्रांच्या मनात जर राग धुमसत असेल तर किंवा उपास तापास देहदंडना करुनही मनातील संशय फिटला नसेल ,बाहेरुन खूप खटाटोप करनही देहबुध्दी कायम असेल ,केवळ बाह्यतः उपासनेचा देखावा करीत मनात विषयाचा विचार करीत असेल ,सोवळ्या ओवळ्याच्या संकुचित कल्पनांवर विश्वास असेल ,तर हे सर्व बाह्य उपचार निर्मळ भक्ती भावाशिवाय व्यर्थ होत असे स्पष्ट मत संत रामदास या अभंगात मांडत आहेत .

अभंग ४१

ब्रह्मादिक देव ब्रह्मज्ञानाआड । करिती पवाड विघ्नरुपें यालागीं सगुणभावें उपासना । करिजे निर्गुणा पावावया रामीरामदास विश्वासी सगुण । सगुणीं निर्गुण कळों आलें

भावार्थ-ब्रह्मा,विष्णू, महेश हे देव ब्रह्मज्ञानाआड विघ्न रूपाने अडथळे आणतात.संत रामदास म्हणतात, यासाठी निर्गुणाची उपासना करण्यापूर्वी आधी सगुणाची उपासना करावी. श्री रामाच्या सगुण रूपावर उदंड विश्वास असल्याने आपणास सगुण निर्गुण दोन्हीही कळून आले असे ते आवर्जून सांगतात.

अभंग-४२

बाळक जाणेना मातेसी । तिचे मन तयापखशीं तैसा देव हा दयाळ । करी भक्तांचा सांभाळ धेनु वत्साचेनि लागें। धांवें त्यांचे मागें मागें पक्षी वेंधतसे गगन । पिलांपाशी त्याचें मन मत्स्यआठवितां पाळी । कूर्म द्रुष्टीनें सांभाळी रामीरामदास म्हणे । मायाजाळाचीं लक्षणें

भावार्थ--लहान मूल आईला ओळखत नाही पण ती मात्र सतत त्याचाच विचार करीत असते देव हा माते सारखाच दयाळू असून तो भक्तांचा सांभाळ करतो. गाय वासरासाठी मागे धावते पक्षी आकाशात उडतो पण त्याचे मन सतत घरट्यातील पिलापाशी असते मासे सतत स्मरण करून आपल्या पिलांचे पालन पोषण करतात तर कासव आपल्याi दृष्टीने पिलांचा सांभाळ करत असते संत रामदास म्हणतात की ही सगळी मायेची लक्षणे आहेत.

अभंग--४३

गजेंद्र सावजे धरिला पानेडीं। रामे तेथे उडी टाकली प्रल्हाद गांजिला तया कोण सोडी ।रामे तेथे उडी टाकीयेली तेहेतीस कोटी देव पडिले बांदोडी ।रामे तेथे उडी टाकियेली दासा पायी पडली देहबुध्दीबेडी। रामे तेथे उडी टाकियेली रामदास म्हणे कां करिसी वणवण। रामें भक्त कोण उपेक्षिले

भावार्थ-श्री राम आपल्या भक्तांची कधीच उपेक्षा करीत नाही ,हे पटवून देण्यासाठी संत रामदास अनेक उदाहरणे देत आहेत. गजेंद्राचा पाय मगरीने पकडल्या मुळे तो मोठया संकटात सापडला. श्री रामाने तेथे धाव घेऊन त्याची सुटका केली .भक्त प्रल्हादाला छळत असलेल्या त्याच्या पित्यापासून सुटका करण्यासाठी विष्णु नरसिंह बनून आले. तेहतीस कोटी देवांची सुटका करण्यासाठी श्री रामांनी रावणाचा वध केला .रामदास म्हणतात, दासांच्या पायात जेव्हा देहबुध्दीची बेडी पडते ती सोडवण्यासाठी श्री राम तत्परतेने धाव घेतात, ते भक्तांची कधीच उपेक्षा करीत नाहीत तेंव्हा भक्तांनी चिंताग्रस्त होऊन वणवण करू नये .

अभंग ४४

ध्यान करु जातां मन हरपलें। सगुणी जाहलें गुणातीत जेथें पाहें तेथें राघवाचें ठाण। करीं चाप बाण शोभतसे रामरुपीं दृष्टि जाऊनी बैसली। सुखें सुखावली न्याहाळितां रामदास म्हणे लांचावलें मन। जेथें तेथें ध्यान दिसतसे

भावार्थ --या अभंगात संत रामदास रामाचे ध्यान करीत असताना आलेल्या अनुभवाचे वर्णन करीत आहेत ते म्हणतात, ध्यान करीत असताना मनच हरपून गेले मनाचे मनपणच नाहिसे झाले ,सत्व, रज, तम या गुणांच्या अतीत झाले .सर्वत्र चापबाणधारी रामरुपच भरुन राहिले आहे अशी जाणिव झाली.हे रामरुप बघताना मन सुखावले. या सुखासाठी मन लालचावले.जेथे तेथे हेच रामरुप, त्या शिवाय दुसरे काही दिसेनासे झाले.

अभंग--४६

सोयरे जिवलग मुरडती जेथूनी। राम तये स्थानीं जिवलग जीवातील जीव स्वजन राघव। माझा अंतर्भाव सर्व जाणे अनन्यशरण जावें तया एका। रामदास रंकाचिया स्वामी

भावार्थ --आपले सगेसोयरे ज्या प्रसंगी आपली उपेक्षा करुन आपल्याला सोडून निघून जातात त्यावेळी केवळ राम हाच आपला जिवलग सखा असतो. आपल्या मनातील सर्व भावभावना जाणणारा,आपल्या जीवनाचा आधार, आपला स्वामी केवळ राम च आहे. संत रामदास म्हणतात की, राम रंकाचा स्वामी असून त्यांना अनन्य शरण जावे.

अभंग-४६

शिरीं आहे रामराज।औषधाचे कोण काज जो जो प्रयत्न रामाविण। तो तो दु:खासी कारण शंकराचे हळाहळ ।जेणें केलें सुशीतळ आम्हा तोचि तो रक्षिता। रामदासीं नाहीं चिंता

भावार्थ- या अभंगात संत रामदास रामावरील अढळ विश्वास व्यत्त करतात. ते म्हणतात,रामराजा सारखा स्वामी असतांना अन्य उपायांची ,औषधाची गरज नाही,कारण रामाच्या क्रुपे शिवाय केलेले सर्व प्रयत्न दु:खाचे कारण आहे. भगवान शंकराचे हळाहळ राम क्रुपेने शीतल बनले.आमचा रक्षणकर्ता रामा सारखा स्वामी असतांना रामदासांना कसलीच चिंता नाही.

अभंग-४७

ठकाराचें ठाण करीं चापबाण। माझें ब्रह्मज्ञान ऐसें आहे. रामरुपीं देहो जाला नि:संदेहो ।माझें मनीं राहो सर्वकाळ मुखीं रामनाम चित्ती घनश्याम। होतसे विश्राम आठवितां रामदास म्हणे रामरुपावरीं ।भावें मुक्ति चारी ओवाळीन

भावार्थ- हातामध्ये धनुष्य बाण घेतलेले श्री रामाचे रुप पाहातांच मन नि:संदेह बनते . हे रामरुप मनांत, रामाचे नाम मुखात, तोच घनश्याम अंतःकरणात आठवावा कीं ज्या मुळे मनाला पूर्ण विश्वाम, पूर्ण शांती मिळते.संत रामदास म्हणतात, रामरुपा वरुन आपण चारी मुक्ती ओवाळून टाकतो.

अभंग--४८

कल्पनेचा प्रांत तो माझा एकांत। तेथें मी निवांत बैसेईन बैसेईन सुखरुप क्षणैक। पाहिन विवेक राघवाचा स्वरुप राघवाचे अत्यंत कोमळ। जेथें नाही मळ, माईकांचा माईकांचा मळ जाय तत्क्षणीं ।रामदरुशणीं रामदास

भावार्थ -- संत रामदास म्हणतात, अगदी एकांतात, निवांतपणे कल्पनेच्या मनोराज्यात क्षणभर का होईना सुखेनैव बसून राघवाच्या विवेक विचारावर मन एकाग्र करावेसे वाटते. रामाचे स्वरुप अत्यंत कोमल, निर्मल आहे. तेथे खोट्या मायेचा मळ नाही. रामाचे दर्शन होताच मायेचा मळ निघून जातो आणि चित्त शुध्द होते.

अभंग--४९

भगवंताचे भक्तीसाठी। थोर करावी आटाटी स्वेदबिंदु आले जाण ।तेंचि भागीरथीचे स्नान सकळ लोकांचे भाषण। देवासाठीं संभाषण जें जें हरपलें सांडले ।देवाविण कोठें गेलें जठराग्नीस अवदान। लोक म्हणती भोजन एकवीस सहस्त्र जप। होतो न करितां साक्षेप दास म्हणे मोठें चोज। देव सहजीं सहज

भावार्थ -देवाच्या भक्तीसाठी खूपच प्रयत्न करावे लागतात .भक्ती भावामध्ये शरीरावर आलेले स्वेदबिंदू हे जणू गंगेचे स्नान होय .आपल्या जवळच्या लोकांशी झालेले बोलणे हेच देवाशी केलेले संभाषण .आपल्याकडून जे हरवते ,जे सांडते ते देवाकडेच जाते कारण देव सगळीकडे आहे सर्व माणसांमध्ये भरून राहिला आहे. पोटात भडकलेल्या भुकेच्या अग्निला घातलेले अन्नाचे इंधन म्हणजेच भोजन . आपण दिवसात जे २१००० श्वास घेतो तोच देवासाठी केलेला अजपा जप होय . संत रामदास म्हणतात हेच एक मोठे कौतुक आहे की, देव इतका सहजा-सहजी प्राप्त होतो.

अभंग--५०

वेधें भेदावें अंतर ।भक्ति घडे तदनंतर मनासारखें चालावें ।हेत जाणोनि बोलावें जनी आवडीचे जन ।त्यांचे होताती सज्जन दास म्हणे निवडावें ।लोक जाणोनियां घ्यावे

भावार्थ-संत रामदास म्हणतात ,देव भक्ता मधील अंतर कमी होते तेंव्हाच भक्ति निर्माण होते.आपल्या मना प्रमाणे वागावें आणि आपल्या व इतरांच्या मनातिल हेतू जाणून बोलावे . सामान्य लोकांमध्ये जे लोकप्रिय होतात ते सज्जन मानले जातात. म्हणून लोकांची मने जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे.

अभंग -५१

रामभक्तीविण अणु नाही सार। साराचेंहि सार रामनाम कल्पनाविस्तार होतसे संहारु ।आम्हा कल्पतरु चाड नाहीं कामनेलागुनी विटलासे मनु ।तेथें कामधेनु कोण काज चिंता नाहीं मनीं राम गातां गुणीं।तेथें चिंतामणी कोण पुसे रामदास म्हणे रामभक्तीविणें।जाणावें हें उणें सर्वकांही

भावार्थ

रामनाम हे सर्व अविनाशी वस्तुंचे सार आहे.रामनामाशिवाय सर्व असार आहे.असे सांगून संत रामदास म्हणतात कल्पतरु(इच्छिले फळ देणारे झाड )हा कल्पना विस्तार आहे,तेंव्हा त्याची ईच्छा नाही.रामनाशिवाय मनांत कोणतिही कामना नाही त्या मुळे कामधेनुची अभिलाषा नाही.श्री रामाचे गुण गातांना मनाला कसलिही चिंता नाही तर चिंतामणिची पण अपेक्षा नाही.संत रामदास खात्रीपूर्वक सांगतात की,कल्पतरु,कामधेनु,चिंतामणी हे सर्व रामभक्तीच्या तुलनेने अगदी गौण आहेत.

अभंग--५३

ऐसे आत्मज्ञान उध्दरी जगासी। पाहेना तयासी काय करुं सर्व काळ गेला दारिद्रय भोगितां।वैराग्य पाहतां तेथें नाहीं दारिद्रयाचें दु:ख केलें देशधडी। रामराज्य गुढी उभविली उभविली गुढी भक्तिपंथें जावें। शीघ्रचि पावावें समाधान समाधान रामीं रामदासां जालें।सार्थकानें केलें सार्थकचि

भावार्थ--

या अभंगात संत रामदास जीवनाची सार्थकता कशात आहे हे स्पष्ट करून सांगत आहेत .आजवरचे सर्व आयुष्य दारिद्र्य भोगताना गेले पण तरीही जीवनात वैराग्य आले नाही हे दुःख बाजूस सारून रामराज्याची गुढी उभारून भक्तिमार्गाने जाण्याचे ठरवले. राम भक्तीमुळे संत रामदासांना पूर्ण समाधान प्राप्त झाले .जीवनाचे सार्थक करणाऱ्या श्री रामांनी आपल्या जीवनाचे सार्थक केले असे संत रामदास अगदी निसंशयपणे सांगतात हे आत्मज्ञान जगाला उद्धरून उजळून टाकत.पण त्या कडे कोणी लक्ष्य देत नाही अशी खंत संत रामदास व्यत्त करतात.

अभंग--५३

कौल जाला रघुनाथाचा ।मेळा मिळाला संतांचा अहंभाव वरपेकरी ।बळे घातला बाहेरी क्षेत्रीं मंत्री विवेक जाला। क्रोध देशोधडी केला काम देहींच कोंडिला।लोभ दंभ नागविला फितवेकर होता भेद ।त्याचा केला शिरच्छेद तिरस्कार दावेदार ।त्यास बोधे केला मार मन चोरटे धरिलें ।नित्यनेमे जंजरिले आळस साक्षेपें घेतला।पायीं धरुनि आपटिला द्वेष बांधोनि पाडिला।खेद खाणोनि ताडिला गर्व ताठा विटंबिला।वाद विवेके झोडिला करुनि अभावाचा नाश ।राहे रामीं रामदास

भावार्थ--

रघुनाथाचा कौल मिळतांच संतांचा मेळा जमला संतांनी अहंभावाला, मीपणाला जबरदस्तीने बाहेर घालविला. देहरूपी क्षेत्राचा विवेक हा मंत्री झाला. क्रोधाला हद्दपार केला. कामवासनेला देहाच्या तुरुंगात कोंडला लोभ आणि दांभिकता यांचे पूर्ण उच्चाटन केले.फितुरी करणाऱ्या भेदाचा शिरच्छेद केला .तिरस्कार हा दावेदार सारखा होता त्याच्यावर उपदेशाचा मारा केला. त्या चोरट्या चंचल मनाला धरुन ठेवले.नित्यनेमाने आळसाला पायाला धरून आपटला व त्याचा समाचार घेतला.मत्सराला बांधून कैद केले. .खेदाचे मूळ खणून काढले .गर्वाची विटंबना केली. विवेकाचने वाद झोडून काढला .अशाप्रकारे सर्व अभावांचा नाश करून रामदास रामचरण स्थिर झाले.

अभंग--५४

असोनि ईंद्रियें सकळ।काय करावीं निष्फळ नाहीं कथा निरुपण।तेंचि बधिर श्रवण नाहीं देवाचें वर्णन ।तें गे तेंचि मुकेपण नाहीं पाहिलें देवासी ।अंध म्हणावें तयासी नाहीं उपकारा लाविले।तें गे तेचि हात लुले केले नाही तीर्थाटण।व्यर्थ गेले करचरण काया नाहीं झिजविली।प्रेतरुपचि उरली दास म्हणे भक्तिविण ।अवघे देह कुलक्षण

भावार्थ--

या अभंगात संत रामदास नवविधा भक्तीचा महिमा वर्णन करून सांगत आहेत .कथा निरूपण न करणारे ,कान असूनही बहिरे .,देवाचे गुणवर्णन न करणारे,जीभ असूनही मुके ,देवाचे रूप न पहाणारे ,डोळे असूनही आंधळे ..,परोपकार न करणारे हात असूनही लुळे. पाय असूनही तीर्थयात्रा न करणारे पांगळे आहेत असे सांगून संत रामदास शेवटी म्हणतात ,अशा रीतीने देवाच्या भक्तीत काया झिजवली नाही तर ती केवळ प्रेतच होय .सर्व इंद्रिये असूनही ती जर देवाची भक्ती करण्यात वापरली नाही तर तो देह कुलक्षणी ,निष्फळ समजावा.

अभंग--५५

वाणी शुध्द करीं नामें। चित्त शुध्द करीं प्रेमें नित्य शुध्द होय नामीं ।वसतांही कामीं धामीं कान शुध्द करी कीर्तन। प्राण शुध्द करी सुमन कर शुध्द राम पूजितां। पाद शुध्द देउळीं जातां त्वचा शुध्द करी रज। मस्तक नमितां पादांबुज रामापायीं राहतां बुध्दि रामदासा सकळ शुध्दि

भावार्थ--

नवविधा भक्तिचा महिमा सांगणाऱ्या या अभंगात संत रामदास आपल्या सर्व इंद्रियांची शुद्धी कशामुळे होते याविषयी सांगत आहेत .देवाच्या नावाचा जप केल्याने वाणी शुद्ध होते .देवा वरचे प्रेम मन शुद्ध करत .देवाचे किर्तन ऐकल्याने कान शुद्ध होतात .तर भावपूर्ण मन प्राण शुद्ध करते .रामाचे पूजन हात शुद्ध करतात .देवळात देवदर्शनास गेल्याने पाय शुद्ध होतात .त्वचा धुळीचे कण शुद्ध करतात. आणि देवाला नमन करताना मस्तक शुद्ध होते .श्रीरामाच्या चरणकमलांना चरण स्पर्श केला असता बुद्धी शुद्ध होते. अशा रीतीने संपूर्ण देहाची शुद्धी होते .असे संत रामदास म्हणतात.

अभंग--५६

काम क्रोध मद मत्सर। जरी हे जाले अनावर यास करावें साधन । सदा श्रवण मनन बोलाऐसें चालवेना।जीव भ्रांति हालवेना दृढ लौकिक सांडेना।ज्ञानविवेक मांडेना पोटीं विकल्प सुटेना ।नष्ट संदेह तुटेना दास म्हणे निर्बुजले ।मन संसारीं बुडालें

भावार्थ--

या अभंगात संत रामदास राम कथेचे श्रवण व मननाचे काय फायदे होतात हे सांगत आहेत .जेव्हा वासना राग द्वेष हे मनाचे शत्रू अनावर होतात, जेव्हा आपल्याला बोलण्या प्रमाणे वागता येत नाही , लौकिकाचा हव्यास सुटत नाही, विवेक सुचत नाही, मनामध्ये निर्माण झालेल्या विपरीत कल्पनां पासून सुटका होत नाही, बुद्धी नष्ट करणारा संशय नाहीसा होत नाही, गोंधळलेले मन संसार सागरात बुडून जाते .संत रामदास म्हणतात या परिस्थितीतून सुटण्याचे एकच साधन आहे .राम कथा श्रवण करणे आणि श्री रामाच्या विवेक व कृती यावर मनन करणे हे होय.

अभंग--५७

रामनामकथा श्रवणीं पडतां ।होय सार्थकता श्रवणाची मुखें नाम घेतां रुप आठवलें।प्रेम दुणावलें पहावया राम माझे मनीं शोभे सिंहासनीं। एकाएकीं ध्यानीं सांपडला रामदास म्हणे विश्रांति मागेन। जीवींचें सांगेन राघवासी

भावार्थ--

राम कथा कानावर पडताच श्रवण केल्याचे सार्थक होते. रामनामाचा जप सुरू होताच रामाचे रूप आठवते आणि ते पहाण्यासाठी मन आतुर होते .सिंहासनावर विराजमान झालेला राम मनात आहे तोच एकाएकी ध्यानात सापडतो. संत रामदास म्हणतात या राघवाला मनातील गोष्टी सांगाव्यात त्याच्याकडे मनासाठी पूर्ण विश्रांती मागावी असे वाटते.

अभंग--५८

निरुपणाऐसें नाहीं समाधान ।आणिक साधन आढळेना भक्ति ज्ञान घडे वैराग्य आतुडे। भावार्थ सांपडे निरुपणें शांति क्षमा दया नैराश्यता मनीं। अवस्था उन्मनी निरुपणें भ्रांतीचा संदेह तुटे एकसरा। दास म्हणे करा निरुपण

भावार्थ--

संत रामदास या अभंगात म्हणतात की, राम कथा निरूपणा सारखे समाधान कशातच नाही .यासारखे दुसरे साधन नाही .राम कथा निरुपणातून भक्ती व ज्ञान या दोन्ही गोष्टींचा लाभ होतो आणि वैराग्य आवडू लागते .कथा निरुपणातून भावार्थ समजतो .दया क्षमा शांती या सद्गुणांचा लाभ होतो .मनाचे नैराश्य नाहीसे होऊन निरूपणा मुळे मनाचे उन्मन होते .संदेह मुळापासून नाहीसा होतो. संत रामदास परत परत निरूपण करण्यास सांगत आहेत.

अभंग--५९

एकदां जेवितां नव्हे समाधान ।प्रतिदिनीं अन्न खाणें लागें तैसें निरुपण केलेंचि करावें ।परी न धरावें उदासीन प्रत्यहीं हा देहो पाहावा लागतो। शुध्द करावा तो रात्रंदिस प्रत्यहीं देहानें भोगलें भोगावें। त्यागिलें त्यागावें दास म्हणे

भावार्थ--

एकदाच जेवण घेतल्याने कायमचे समाधान मिळत नाही. रोजच अन्न खावे लागते .त्याप्रमाणे एकदा केलेले निरूपण परत परत करावे त्या बाबतीत उदासीन राहू नये. आपल्याला आपला देह परत परत स्वच्छ करावा लागतो. भोगलेले परत परत भोगावे लागते .ज्यांचा त्याग केला त्याचा परत परत त्याग करावा लागतो .रात्रंदिवस असे केल्याने देह व मन शुद्ध होते असे संत रामदास सांगतात.

अभंग--६०

कथानिरुपणें समाधि लागली। वासना त्यागिली अंतरीची नाहींआपपर कीर्तनीं तत्पर । मनीं सारासार विचारणा अर्थारुढ मन श्रवण मनन ।होय समाधान निजध्यास रामीरामदासीं कथेची आवडी ।लागलीसे गोडी नीच नवी

भावार्थ-- ज्याच्या मनामध्ये आपला व परका असा दुजाभाव नाही, मनात नेहमीच सार व असार काय याचा विचार करत असतो, नेहमी श्रवण व मनन करतांना अर्थाचा मागोवा घेत असतो, देवाच्या कीर्तनात अतिशय तत्पर असतो, कीर्तन रंगी रंगून जाणे हा ज्याचा निजध्यास आहे व त्यात त्याला समाधान मिळते. संत रामदास म्हणतात अशा भक्तांना रामकथेची अविट गोडी निर्माण होते व ही गोडी नेहमी वाढतच जाते.

अभंग--६१

राघवाची कथा पतितपावन। गाती भक्तजन आवडीनें राघवाच्या गुणा न दिसे तुळणा। कैलासींचा राणा लांचावला देवांचें मंडण भक्तांचे भूषण। धर्मसंरक्षण राम एक रामदास म्हणे धन्य त्यांचे जिणें कथानिरुपणे जन्म गेला

भावार्थ-- राघवाची कथा पतितांना पावन करणारी असल्याने भक्त ती आवडीने गातात .श्रीराम सर्व देवांमध्ये श्रेष्ठ असून भक्तांचे भुषण आहेत .धर्म रक्षणाचे काम करणारे श्रीराम केवळ एकमेव अद्वितीय आहेत .रामाचे गुण अतुलनीय आहेत .रामदास म्हणतात अशा गुणसंपन्न रामाच्या कथांचे निरूपण करणारे भक्त धन्य होत. त्यांचे जीवन सफल झाले आह.

अभंग--६२

त्याचे पाय हो नमावें।त्याचें किर्तन ऐकावें दुजियासी सांगे कथा। आपण वर्ते त्याचि पंथा कीर्तनाचें न करी मोल। जैसे अमृताचे बोल सन्मानिता नाहीं सुख। अपमानितां नाहीं दु:ख ऐसा तोचि हरिदास ।लटकें न वदे रामदास

भावार्थ--

हरिदास आपल्या कीर्तनातून हरिकथा भक्तांना ऐकवतात एवढच नव्हे तर कथेतील आदर्शांचे स्वतः पालन करतात. अशा हरिदासांना सन्मानाचे सुख नसते व अपमानाचे दुःख नसते .त्यांचे कीर्तन म्हणजे केवळ अमृताचे बोल असतात. अनमोल असतात .संत रामदास म्हणतात, अशा हरिदासांचे किर्तन ऐकावे व आदराने त्यांना नमन करावे. .हे भक्तच केवळ हरिदास म्हणवून घेण्यास योग्य असतात. हे लटके नसून निसंशय खरे आहे

अभंग--६३

मुक्तपणे करी नामाचा अव्हेरू ।तरी तो गव्हारु मुक्त नव्हे उच्चारितो शिव तेथें किती जीव ।बापुडे मानव देहधारी रामनाम वाचें रुप अभ्यंतरीं ।धन्य तो संसारीं दास म्हणे

भावार्थ--

मुक्तपणे नामाचा अव्हेर करणारा अडाणि कधीही मुक्त होऊ शकणार नाही .शंकराच्या नामाचा जप करणारे कितीतरी मानव देहधारी बापुडवाणे जीवन जगतात .संत रामदास म्हणतात ,अंतकरणात रामाचे रूप व मुखात सतत रामाचे नाव असणारे भक्त संसारी असूनही धन्य होत.

अभंग--६४

आत्मज्ञानी आहे भला। आणि संशय उठिला त्यास नामचि कारण। नामें शोकनिवारण नाना दोष केले जनीं। अनुताप आला मनी रामी रामदास म्हणे। जया स्वहित करणें

भावार्थ--

आत्मज्ञानी असूनही जर त्याच्या मनात संशय निर्माण झाला तर संशयाचे निराकरण करण्यासाठी नामाचे साधन केले पाहिजे .कारण नामामुळेच सर्व संशयाचे ,दुःखाचे निवारण होते.संसारात असतांना आपल्यात अनेक दोष निर्माण होतात पण त्याबद्दल पश्चाताप झाल्यास त्या दोषांचे निराकरण होऊन अंती कल्याण होते असे संत रामदास स्पष्टपणे सांगतात.

अभंग--६५

रात्रंदिन मन राघवीं असावें ।चिंतन नसावें कांचनाचें कांचनाचे ध्यान परस्त्रीचिंतन ।जन्मासी कारण हेंचि दोन्ही दोन्ही नको धरुं नको निंदा करुं।तेणें हा संसारू तरशील तरशील भवसागरीं न बुडतां। सत्य त्या अनंताचेनि नामें नामरुपातीत जाणावा अनंत। दास म्हणे संतसंग धरा

भावार्थ--

या अभंगात संत रामदास सांगतात की, रात्रंदिवस आपले मन राघवाच्या चिंतनात असावे, पैशाचे चिंतन नसावे. धन व परस्त्री चिंतन यामुळेच परत परत जन्मास यावे लागते. त्याच प्रमाणे कुणाची निंदा करू नये. त्यामुळे भवसागरात न बुडता हा संसार तरून जाता येईल. ईश्वर हा अनंत नामा रूपाने नटला आहे .त्या सत्यरूपी अनंताला संत संगती धरल्यास जाणतां येत.

अभंग--६६

लोभा नवसांचा तो देव बध्दांचा।आणि मुमुक्षांचा गुरू देव गुरु देव जाण तया मुमुक्षांचा।देव साधकांचा निरंजन निरंजन देव साधकांचे मनीं ।सिध्द समाधानी देवरुप देवरुप झाला संदेह तुटला।तोचि एक भला भूमंडळीं भूमंडळीं रामदास्य धन्य आहे। अन्यनता पाहें शोधूनियां

भावार्थ-- ज्यांच्या मनात लोभ असल्याने ते संसारात बद्ध असतात ,असे लोक हव्यासापोटी देवाला नवस करतात. त्यांचा देव नवसाचा असतो . मोहापासून सुटलेले लोक मोक्षाची इच्छा करणारे असतात. ते आपल्या गुरुला देव मानतात .इच्छा धरून मोक्षाची जे साधना करतात ते साधक होत ,ते निरंजनाला मनात ठेवून त्याची उपासना करतात .तर सिद्ध साधनेमुळे पूर्ण समाधानी बनतात, त्यांच्या मनात कोणताही संदेह नसतो .असे सिद्ध पुरुष भुमंडळावर धन्य होत. असे रामदास शोधूनही इतरत्र सापडणार नाहीत, असे संत रामदास सुचवतात.

अभंग--६७

राम कैसा आहे हें आधीं पाहावें। मग सुखेनावें दास्य करुं दास्य करुं जन देव ओळखोन । जालें ब्रह्मज्ञान दास्य कैचें दास्य कैचें घडी देवासी नेणतां ।वाउगें शिणतां श्रम उरे समाधान देव पाहतां घडेल । येर बिघडेल दास म्हणे

भावार्थ --

रामाचे रूप ,गुण, चरित्र कथा हे आधी जाणून मगच सुखाने रामाचे दास बनावे .देवाला ओळखून दास्यत्व पत्करले असता हळूहळू ब्रह्मज्ञान होते .मग दास्यत्वाची भावनाच उरत नाही देवाला न ओळखता दास्य घडू शकत नाही ते केवळ निरर्थक श्रम होतात .देवाला जाणल्यानेच मनाचे समाधान होईल ,नाहीतर सारे बिघडेल असे सांगून संत रामदास भक्तांना सावधपणाचा इशारा देत आहेत.

अभंग-६८

जो जो भजनासी लागला । तो तो रामदास जाला दासपण रामीं वाव ।रामपणा कैंचा ठाव रामीं राम तोहि दास ।भेद नाहीं त्या आम्हांस रामदास्य करुनि पाहे। सर्व स्रुष्टी चालताहे प्राणिमात्र रामदास । रामदासीं हा विश्वास

भावार्थ-- संत रामदास म्हणतात जो भजनात रममाण झाला तो रामाचा दास झाला. दास्यत्व स्वीकारल्या शिवाय राम चरणी ठाव मिळत नाही.रामातील राम तोच दास होय.राम व रामाचा दास यांच्यात भेद नाही सर्व प्राणीमात्र रामा मुळेच अस्तित्वात आह. राम त्यांच्यातील प्राण आहे असा संत रामदासांचा विश्वास आहे.

अभंग--६९

दिनानाथाचे सेवक ।आम्ही स्वामींहुनि अधिक शरणागत राघवाचे ।परि शरण दारिद्रयाचे जें जें देवासी दु:सह । तें तें आम्हां सुखावह रामीरामदास म्हणे । रामकृपेचेनि गुणें

भावार्थ--

रामदास राघवाचे शरणागत असूनही त्यांना दारिद्र्याच्या झळा सहन कराव्या लागतात. देव सुद्धा जे सहन करू शकत नाही ते रामदास राम कृपेमुळे सहज सहन करू शकतात.सीतापती राम हें दासांची विद्या वैभव व सुवर्ण संपत्ती आहे .श्रीराम हा रामदासांचा एकमेव सोबती आहे. श्रीराम दासांची माता, पिता बंधू आहे. केवळ रामच स्वजन, सोयरा आहे. ध्यानी मनी वसलेला राम ज्ञानाचे भांडार आहे. राम हा रामदासाचे पूर्ण समाधान आहे असे संत रामदास या अभंगात म्हणतात.

अभंग--७०

राघवाचे दास सर्वस्वे उदास । तोडी आशापाश देवराणा देवराणा भाग्यें जालिया कैपक्षी । नाना परी रक्षी सेवकांसी सेवकासी कांहीं न लगे साधन । करीतो पावन ब्रीदासाठीं ब्रीदासाठीं भक्त तारिले अपार । आतां वारंवार किती सांगों किती सांगों देव पतितपावन । करावें भजन दास म्हणे

भावार्थ--

सेवकांच्या भाग्याने त्याच्यावर देवाची कृपा झाली तर देवरा णा त्याचे सर्व प्रकारे रक्षण करतो. सर्व आशा समूळ नाहीशा करून आशा पाशातून मुक्तता करतो. त्यामुळे राघवाचे दास पूर्णपणे उदासीन होतात. त्यासाठी सेवकांना काही साधना करावी लागत नाही. आपले ब्रीद पाळण्यासाठी राघव सेवकांना पावन करतात. आपल्या ब्रीदासाठी राघवाने अनेकांना पतितपावन केले आहे हे संत रामदासांनी अनेकदां सांगितले आहे. त्यासाठी फक्त देवाचे भजन करावे असे संत रामदास सांगत आहे.

अभंग--७१

कायावाचामनें यथार्थ रामीं मिळणें।तरीच श्लाघ्यवाणें रामदास्य कामक्रोध खंडणें मदमत्सर दंडणें।तरीच श्लाघ्यवाणें रामदास्य जैसे मुखें बोलणें तैसी क्रिया चालणें। तरीच श्लाघ्यवाणें रामदास्य रामदास म्हणे निर्गुण लाधणें। तरीच श्लाघ्यवाणें रामदास्य

भावार्थ--

काया वाचा मनाने पूर्णपणे एकरूप होऊन दास्य करणे हेच खरे रामदास्य ,काम क्रोधाचे खंडन करून ,मद मत्सराला दंड देऊन केलेले दास्य, परस्त्री बद्दलची वासना नष्ट होणे, परद्रव्य अग्नीसारखे दाहक वाटणे ,बोलण्या प्रमाणे कृती करणे हीच खरी राम सेवा . संत रामदास म्हणतात सत्व रज तम या गुणांच्या अतीत होऊन निर्गुण सुख लाभणे हेच खरे रामदास्य. असे रामदास्य स्तुती करण्यायोग्य असते.

अभंग--७२

आमुचे वंशीं आत्माराम । एका पिंडींचे निष्काम रामदास्य आलें हातां। अवघा वंश धन्य आतां बापें केली उपार्जना । आम्ही लाधलों त्या धना बंधु अभिलाषा टेकला । वांटा घेउनि भिन्न जाला रामीरामदासीं स्थिति । पाहिली वडिलांची रीति

भावार्थ--

संत रामदास या अभंगात म्हणतात ,आपण रामाचे वंशज आहोत त्यामुळे हा पिंडच निष्काम आहे.रामाचे सेवक असल्याने सर्व वंश धन्य झाला.वडिलांच्या पुण्याइने राम सेवारुपी धन प्राप्त झाले. अभिलाषा नावाच्या बंधू आपला वाटा घेऊन वेगळा झाला. रामदासांना मात्र वडिलांच्या पुण्याईचा लाभ मिळाला.

अभंग --७३

मनुष्याची आशा तेचि निराशा । एका जगदीशावांचुनिया वांचुनियां राम सर्वहि विराम । नव्हे पूर्ण काम रामेविण संकटींचा सखा निजांचा सांगाती । राम आदि अंतीं रामदासीं

भावार्थ--

जगदीशाची कृपा नसेल तर आशेचे निराशेत रूपांतर व्हायला वेळ लागत नाही. रामाशिवाय कोणतेही काम पूर्ण होत नाही. श्रीराम हा संकटात धावून येणारा सखा, जिवाचा सांगाती आहे. संत रामदास म्हणतात,रामदासांना आजीवन सांभाळणारा केवळ रामच आहे.रमदासांचा राम जीवनाच्या आदि व अंती आहे.

अभंग--७४

आम्हा ये प्रपंचीं कोणी नाहीं सखा।एका रघुनायकावांचोनिया विद्या वैभव धन मज क्रुपणाचें।जीवन जीवांचे आत्मारामु आकाश अवचितें जरि कोसळेल।मज तेथें राखील आत्मारामु आपिंगिलें मज श्रीरामसमर्थे । ब्रह्मांड पालथें घालूं शके वक्रदृष्टि पाहतां भरिल त्याचा घोंट।काळाचेंहि पोट फाडू शके रामदास म्हणे मी शरणागत त्याचा।आधार सकळांचा मुक्त केला।

भावार्थ--

रामदासांना या संसारात रघुनायका शिवाय कोणी सखा नाही. एकाएकी आकाश कोसळले तरी आत्माराम रामदासांचे रक्षण करील, कोणी वाकड्या नजरेने बघितले तर श्रीराम त्यांच्या नरडीचा घोट घेण्याइतका किंवा प्रत्यक्ष काळाचे पोट फोडू शकेल इतका समर्थ आहे असा विश्वास संत रामदास या अभंगात व्यक्त करतात. ते म्हणतात श्रीरामाने अंगीकार केल्यास आपण ब्रम्हांड देखील पालथे घालू शकतो कारण श्रीराम सर्वांचा एकमेव आधार आहे.

अभंग--७५

जठरीं लागो क्षुधा। होत नाना आपदा भक्तिप्रेम सदा ।न सोडीं सत्य शब्द न फुटे जरी।चिंतीन अंतरीं भक्तिप्रम परी । न सोडी सत्य आतांचि हा देहो । राहो अथवा जावो रामीं प्रेमभावो । न सोडी सत्य म्हणे रामदास । वरी पडो आकाश राघवाची कास । न सोडी सत्य

भावार्थ-- या अभंगात संत रामदास आपण रामा वरची प्रेमभक्ति कधीच सोडणार नाही हे सत्य सांगत आहेत. पोटात भुकेने कितीही यातना झाल्या ,शब्द उच्चारण करण्याची शक्ती नाहीशी झाली तरी अंतकरणात रामाचेच चिंतन करीन.देह राहील अथवा जाईल याचा विचार न करता रामा विषयीचा प्रेमभाव कधीच सोडणार नाही. संत रामदास म्हणतात कीआकाश कोसळून पडले तरी राघवाची साथ कधीच सोडणार नाही.

अभंग--७६

रुप रामाचेंपाहतां। मग कैंची रे भिन्नता दृश्य अदृश्यावेगळा । राम जीवींचा जिव्हाळा वेगळीक पाहतां कांहीं। पाहतां मुळींच रे नाहीं रामदासीं राम होणें । तेथें कैचें रे देखणें

भावार्थ-- संत रामदास म्हणतात रामाचे rरुप सदा सर्वकाळ डोळ्यात भरलेले असूनही दर्शनास गेले तर आकलन होत नाही. सदा सर्वकाळ मन राम चिंतनात दंग असल्याने ताटातूट होण्याचा संभवच नाही. घेऊ म्हटले असता घेता येत नाही व टाकू म्हटले तर सोडता येत नाही. त्यामुळे रामदासांना रामरूप धनाची लूट करणे शक्य होते.

अभंग--७७

माझा स्वामी आहे संकल्पापरता। शब्दीं कैसी आतां स्तुति करु स्तुति करुं जातां अंतरला दूरी । मीतूंपणा उरी उरों नेदी उरों नेदी उरी स्वमी सेवकपण । एकाकीं आपणाऐसें केलें केले संघटण कापुरे अग्नीसी। तैसी भिन्नत्वासी उरी नाहीं उरी नाही कदा रामीरामदासा। स्वये होय ऐसा तोचि धन्य

भावार्थ--

संत रामदास या अभंगात देव भक्तांमधील अद्वैत भावनेची उकल करून सांगत आहेत की त्यांचा स्वामी श्रीराम मनाच्या संकल्प विकल्पाच्या पलीकडे आहे.राम कथा ऐकून श्रीरामाच्या गुणांची स्तुती करावीशी वाटते पण शब्दांशिवाय स्तुती करता येत नाही त्यात द्वैत निर्माण होते.दर्शन होताच मन राम रूपात विरून जाते तेथे मी तूं पणा, स्वामी सेवक पणा उरतच नाही.द्वैत संपून जाते जसे कापूर व अग्नि क्षणात समरस होतात. कापराचे भिन्नत्व पूर्णपणे विलयास जाते तसेच रामदास स्वतः रामरूप बनून जातात ते धन्य होत असे संत रामदास म्हणतात.

अभंग--७८

कांहीं दिसे अकस्मात। तेथें आलें वाटे भूत वायां पडावें संदेहीं। मुळीं तेथें कांहीं नाहीं पुढे देखतां अंधार। तेथें आला वाटें भार झाडझुडूप देखिलें ।तेथें वाटे कोणी आलें रामदास सांगे खूण। भितों आपणा आपण

भावार्थ--

या अभंगात माणसाला भ्रम कशामुळे होतो व त्याचे निरसन कसे करावे याविषयी संत रामदास सांगत आहेत. काही वेळा अकस्मात एखादी अस्पष्ट आकृती दिसते ते भूतच आहे असा भ्रम होतो .वाटेवर अंधारातून जात असताना समोरून कोणीतरी येत आहे असे वाटते. जंगलातील झाडे सजीव प्राण्यासारखी भीतीदायक वाटतात संत रामदास म्हणतात जेथे काहीही नसताना काहीतरी असल्यासारखे वाटणे हे सारे कल्पनेचे खेळ आहेत. आपण आपल्याच सावलीला घाबरावे त्यातलाच हा प्रकार आहे.

अभंग--७९

वाजे पाऊल आपुलें। म्हणे मागें कोण आलें कोण धांवतसें आड। पाहों जातां जालें झाड भावितसे अभ्यंतरीं। कोण चाले बरोबरी शब्दपडसाद ऊठिला। म्हणे कोण रे बोलिला रामीरामदास म्हणे। ऐसीं शंकेचीं लक्षणे

भावार्थ --

या अभंगात संत रामदास मनात येणाऱ्या शंका-कुशंकांची लक्षणे सांगत आहेत चालताना आपल्याच पावलांचा आवाज ऐकून आपल्या मागे कुणीतरी येत आहे अशी शंका येते. चालताना कुणीतरी आपल्या बरोबर चालत असल्याचा भास होतो. विचारांती ते झाड आहे हे समजतें शब्दांचा प्रतिध्वनी ऐकू येतो व कुणीतरी बोलतो असे वाटते की सर्व शंकेची लक्षणे आहेत.

अभंग--८०

शक्ति आहे तों करावें विश्व कीर्तनें भरावें पुण्यवंत तो साक्षेपी।आळशी लोकीं महापापी आपुलाचि घात करी । सदा कठोर वैखरी माणुस राजी राखों नेणें ।त्यास न मानीती शहाणे गुणें माणूस भोंवतें। अवगुणानें थितें जातें दास म्हणे भला भला। जेथें तेथें पवाडला

भावार्थ--

प्रत्येकाने आपल्या शक्तीप्रमाणे काम करावे उद्योगी पुरुष पुण्यवान तर अशी आळशी महापापी होय.ज्याचे बोलणे कठोर असते तो आपणच आपला घात करत असतो .ज्याला माणसाचे मन जिंकता येत नाही तो शहाणा समंजस असत नाही. गुणांनी माणूस आवडते अवगुणांनी त्याला कमीपणा येतो. संत रामदास म्हणतात त्याचे सर्वत्र पोवाडे गायले जातात स्तुती केली जाते तो माणूस भला समजावा.

अभंग--८१

मनोगत जाणे सूत्र ।।जेथ तेथें जगमित्र न सांगतां काम करी। ज्ञानें उदंड विवरी स्तुती कोणाची न करी। प्राणिमात्र लोभ करी कदा विश्वास मोडीना । कोणी माणूस तोडीना जनीं बहुतचि साहतो। कीर्तिरुपेचि राहतो दास म्हणे नव्हे दु:खी।आपण सुखी लोक सुखी

भावार्थ--

इतरांचे मनोगत जाणण्याचे कौशल्य ज्याच्याकडे आहे तो जगत मित्र बनतो. तो नेहमी उद्योगात व ज्ञान उपासनेत दंग असतो.तो कुणाचीच स्तुती करीत नाही पण सर्व प्राणी मात्रांवर प्रेम करतो.तो स्वतःवरील विश्वासाला कधी तडा जाऊ देत नाही.माणसांना कधीही तोडून टाकीत नाही. लोकांचे अनेक अपराध सहन करतो पण मनात दुःखाचा लवलेशही नसतो. तो स्वतः सुखी असतो व लोकांना सुखी करतो असे संत किर्तीरुपाने उरतात असे संत रामदास म्हणतात.

अभंग--८२

संतांची आकृति आणवेल युक्ती। कामक्रोधा शांति नये नये भागवतींचा भाव आणवेल आव। करणीचा स्वभाव नये नये रामदास म्हणे रामकृपेवांचोनी। बोलाऐसी करणी नये नये

भावार्थ--

सामान्य माणूस युक्ती प्रयुक्तिने संतांची नक्कल करू शकेल पण त्यामुळे काम व क्रोध जिंकण्याचे कौशल्य मिळवता येणार नाही .एखादी स्त्री देवीचे सोंग घेऊ शकेल पण भगवती सारखी करणी करणे शक्य नाही.संत रामदास म्हणतात,रामकृपेशिवाय माणुस देवत्वाला पोचू शकत नाही.

अभंग--८३

कर्ता एक देव तेणें केलें सर्व। तयापाशीं गर्व कामा नये देह हें देवाचें वित्त कुबेराचें । तेथें या जीवाचें काय आहे निमित्ताचा धणी केला असे प्राणी । पहातां निर्वाणीं जीव कैचा दास म्हणे मना सावध असावें ।दुश्चित्त नसावें सर्वकाळ

भावार्थ-- सर्व सजीव सृष्टी ही देवाची निर्मिती असून सर्व धन कुबेराचे आहे.येथे जिव केवळ निमित्तमात्र आहे असा संत रामदासांच्या विश्वास आहे.देवापाशी अहंकारानें वागू नये.चित्त निर्मल ठेवण्यासाठी मनाने सतत सावध असावे असा उपदेश संत रामदास करीत आहेत.

अभंग--८४

दृढ धरी मना जानकीजीवना। तेणें समाधाना पावशील पावशील निज स्वरुप आपुलें। जरी तें घडलें रामदास्य रामदास्य घडे बहुतां सुक्रुतें । कांहीं पुण्य होतें पूर्वजांचें

भावार्थ--

जानकी जीवन श्रीरामाची मनामध्ये अढळ भक्ती निर्माण होईल तेव्हाच आपले जे निजरूप आत्माराम ते आपल्याला प्राप्त होईल.त्यातूनच अतीव समाधान मिळेल रामाचे दास्यत्व पूर्वसुकृतामुळे व पूर्वजांच्या पुण्याईने मिळते असे संत रामदास निष्ठापूर्वक सांगतात.

अभंग --८६

शरण जावें रामराया ।पुढती न पाविजे हे काया जीव जीवांचा आहार । विश्व होतसे काहार एक शोकें आक्रंदती ।तेणें दुजे सुखी होती दास म्हणे सर्व दु:ख । रामाविण कैसे सुख

भावार्थ--

हे विश्व म्हणजे एक मोठा शिकारखाना आहे.येथे दुर्बळ जीव सबळ प्राण्यांचा आहार आहे.काही दुःखाने आक्रंदत असतात तेव्हां काही सुखाने जगतात. जन्म मरणाचा खेळ अव्याहत सुरू आहे.संत रामदास म्हणतात जन्म-मरणाच्या चक्रातून सुटण्यासाठी रामरायाला शरण जावे. रामाशिवाय यातून सुटण्याचा दुसरा मार्ग नाही.

अभंग--८६

वासनेची बेडी देहबुध्दि वांकडी। वाजे हुडहुडी ममतेची वैराग्याचा वन्ही विझोनिया गेला। संचित खायाला पुण्य नाही भक्ति पांघरूण तें माझें सांडलें ।मज ओसंडिलें संतजनीं रामदास म्हणे ऐसियाचें जिणें। सदा दैन्यवाणें रामेविण

भावार्थ--

आत्म बुद्धीचा सरळ मार्ग सोडून देहबुद्धीच्या वाकड्या मार्गाने जात असताना वैराग्याचा अग्नी विझून गेला आहे माया ममतेच्या थंडगार स्पर्शाने हुडहुडी भरलीआहे.पायात वासनेची बेडी पडली आहे. भक्तीचे उबदार वस्त्र हरवून गेले आहे.पूर्वसंचिताचा पुण्यरुपी ठेवा गाठीशी राहिला नाही. संतजनांच्या संगतीला पारखा झालो आहे.।संत रामदास म्हणतात अशा लोकांचे जीवन रामाशिवाय दैन्यवाणे आहे.

अभंग --८७

परिचयें जेथें अत्यंत संबंध ।तेथें उठे खेद विक्ल्पाचा म्हणोनियां मना निस्प्रुह असावें सर्वथा नसावें एके ठायीं सर्वकाळ गेला उद्वेगी पडतां ।कोणे वेळे आतां समाधान अभ्यंतर पोळे राम विसंभतां। दास म्हणे आतां समाधान

भावार्थ--

अतिपरिचयाने घनिष्ठ संबंधजुळतो तेथे मनामध्ये विकल्प निर्माण होतात ,उद्वेग वाटतो ,समाधान नाहीसे होते यासाठी माणसाने एका ठिकाणी फार काळ राहू नये व निरपेक्षपणे राहावे असे संत रामदास सुचवतात. श्रीरामाच्या विसर पडल्यामुळे पश्चात्तापाने अंतरंग पोळून निघतेंआणि मग चित्त शुध्द होऊन समाधान मिळतें.

अभंग--८९

देव पाषाण भाविला। तोचि अंतरीं दाविला जैसा भाव असे जेथें । तैसा देव वसे तेथे दृश्य बांधोनिया गळां । देव जाहला निराळा दास म्हणे भावातीत। होतां प्रगटे अनंत

भावार्थ--

दगडाचा देव करून त्याची भक्तिभावाने पूजा केली तोच देव अंतकरणात प्रकटला कारण जसा भाव तसा देव असे म्हणतात. संसाराचा दृश्य पसाऱ्यात माणसाला गुंतवून देव अदृश्य झाला.संत रामदास म्हणतात भाव- भावनांच्या पलीकडे गेल्यास अनंत प्रकट होते.

अभंग--८९

एक लाभ सीतापती। दुजी संताची संगती लाभ नाहीं यावेगळा। थोर भक्तीचा सोहळा हरिकथा निरुपण । सदा श्रवण मनन दानधर्म आहे सार। दास म्हणे परोपकार

भावार्थ--

सीतापती श्रीरामांचा लाभ व संतांची संगती याशिवाय दुसरा अपूर्व लाभ नाही.हा भक्तीचा सोहळा आहे.संत रामदास म्हणतात ,हरिकथेचे सतत श्रवण मनन व निरुपण तसेच दानधर्म व परोपकार हे भक्तीचे सार आहे.

अभंग--९० जो कां भगवंताचा दास ।त्याने असावें उदास सदा श्रवण मनन। आणि इंद्रियदमन नानापरी बोधुनि जीवा। आपुला परमार्थ करावा आशा कोणाची न करावी। बुध्दि भगवंतीं लावावी रामदासीं पूर्णकाम। बुध्दि दिली हे श्रीरामे

भावार्थ-- या अभंगात संत रामदास भगवंताचा दास कसा असावा याचे विवेचन करीत आहेत.आशा-अपेक्षा ,हवेसे नकोसे ,याबाबतीत उदासीन असावा. सतत हरि कथा श्रवण मनन करून इंद्रियांचे दमन करावे. कोणाकडूनही कसलीही आशा ,अभिलाषा नसावी.आपल्या साऱ्या वृत्ती भगवंताकडे लावाव्यात.दिलेल्या बुध्दीचा उपयोग करून पूर्णकाम ,समाधानी बनावे.

अभंग--९१

पतित हे जन करावे पावन। तेथे अनुमान करूं नये करुं नये गुणदोष उठाठेवी। विवेकें लावावी बुध्दि जना बुध्दि लावी जना त्या नाव सज्ञान । पतितपावन दास म्हणे

भावार्थ--

जे लोक पतित आहेत त्यांना पावन करून घ्यावे ,त्यात अनुमान करू नये त्यांच्या गुणदोषांची चर्चा करू नये. विवेकाने पतीतांची बुद्धी बदलण्याचा प्रयत्न करावा. याचा अर्थ अज्ञानी लोकांना सज्ञानी बनवावे,असे संत रामदास म्हणतात.

अभंग--९२

पोट भरावया मांडिले उपास। जाला कासाविस लाभेंविण ब्रम्ह साधावया कर्ममार्गे गेला। तंव कर्मे केला कासाविस सुटका व्हावया बंधनचि केलें। तेणें तें सुटलें केंवि घडे एक व्यथा एक औषध घेतलें। दास म्हणे जालें तयापरी

भावार्थ--

या अभंगात रामदास आपल्या व्यथा व त्यावरील उपाय याबद्दल बोलत आहेत. आपल्याला भूक लागली तर जेवण करण्याचे सोडून उपास केला तर काहीच लाभ होणार नाही. जीव मात्र कासावीस होईल कारण तप स्वाध्याय आणि ईश्वरभक्ती ही आत्मशुद्धीची साधने सांगितली आहेत. उपवासाची गणना तपात होते व ते शरीर शुद्धी चे साधन आहे.भूक लागली असता हा उपाय करणे व्यर्थ आहे. ब्रम्हज्ञान मिळवण्यासाठी कर्मयोगाने काहीच लाभ होणार नाही.व्याधी पासून सुटका मिळावी म्हणून जर संसाराचा त्याग केला तर त्यापासून सुटका होईल हें घडणार नाही.व्याधी समजून घेऊनच औषध केले पाहिजे. संसारिक दुःखावर रामभक्ती हाच एक उपाय आहे.

अभंग--९३

अर्थेविण पाठ कासया करावें। व्यर्थ का मरावें घोकुनीयां घोकुनिया काय वेगीं अर्थ पाहे। अर्थरुप राहे होउनियां होउनिया अर्थ सार्थक करावें। रामदास भावें सांगतसे

भावार्थ--

अर्थ समजल्याशिवाय केवळ शब्दांचे पाठांतर करून उपयोग नाही घोकून पाठ करण्याचे व्यर्थ श्रम करू नयेत. त्यातील अर्थाशी एकरूप होऊन त्याप्रमाणे आचरण केल्यास जीवनाचे सार्थक होईल असे संत रामदास या अभंगात सांगतात.

अभंग--९५

ज्ञानाचें लक्षण क्रियासंरक्षण। वरी विशेषेण रामनाम अंतरीचा त्याग विवेके करावा। बाहेर धरावा अनुताप ब्रह्मादिका लाभ ज्ञानाचा दुर्लभ। तो होय सुलभ साधुसंगें साधुसंगें साधु होइजे आपण। सांगतसे खुण रामदास

भावार्थ--

आपणास अवगत झालेले ज्ञान प्रत्यक्ष कृतीत उतरवणे हे ज्ञानाचे लक्षण आहे. अंतःकरणातील लोभ,, मोह ,क्रोध या भावनांचा विवेकाने त्याग करावा. ब्रम्हदेवा सारख्या देवांना सुध्दा ज्ञानाचा लाभ होणे कठीण आहे .ज्ञानाचा लाभ साधुसंतांच्या संगतीत सुलभपणे होऊ शकतो. साधूंच्या संगतीत राहून साधूसारखे विरक्त होणे हीच ज्ञानाची खूण आहे असे संत रामदास म्हणतात.

अभंग--९५

माजी बांधावा भोपळा । तैसी बांधो नये शिळा घेऊ येते तेचि घ्यावें। येर अवघेचि सांडावें विषवल्ली अमरवल्ली। अवघी देवेचि निर्मिली दास म्हणें हरिजन । धन्य जाण ते सज्जन

भावार्थ--

पाण्यामध्ये पोहण्यासाठी भोपळा बांधावा दगड बांधू नये. विष वेली व अमवेली या दोन्ही देवानेच निर्माण केल्या आहेत पण आपल्याला योग्य असेल तेच स्वीकाराव. बाकी सर्व सोडून द्यावे. असे सांगून संत रामदास म्हणतात हरिभक्त हे संतजन असून त्यांच्या संगतीचा लाभ घ्यावा.

अभंग--९६

भाग्यवंत नर यत्नासी तत्पर। अखंड विचार चाळणांचा चाळणेचा यत्न यत्नाची चाळणा।अखंड शाहाणा तोचि एक प्रव्रुत्ति निव्रुत्ति चाळणा पहिजे। दास म्हणे कीजे विचारणा

भावार्थ--

जे सतत प्रयत्नशील असतात ते पुरुष भाग्यवंत असतात.तें सतत सद्विवेक बुद्धीचा उपयोग करून योग्य व अयोग्य गोष्टींची निवड करीत असतात.केलेल्या प्रयत्नांचे यश अपयश याबद्दल अत्यंत सुज्ञपणे सावध असतात.संत रामदास म्हणतात प्रवृत्ती वझ निवृत्ती यांची निवड करू शकणारा या जगात शाहाणा ठरतो.त्याचा विचार करावा.

अभंग--९७

नमू रामक्रुष्णा आदिनारायणा। तुम्ही त्या निर्गुणा दाखवावें दाखवावे निजस्वरुप आपुँलें। दिसेनासे जालें काय करू पांडुरंगा देवा अगा महादेवा। तुम्ही मज द्यावा ठाव ब्रह्मीं ब्रह्मी ब्रह्मरुप ते मज करावें । रामदास भावें प्रार्थितसे

भावार्थ--

संत रामदास राम-कृष्णांना वंदन करून त्या देवतांना प्रार्थना करतात की त्यांनी त्यांचे निर्गुण निजस्वरूप प्रकट करून दाखवावे कारण सगुणाच्या भक्तीमुळे निर्गुणाचे स्वरूप दिसेनासे झाले आहे.पांडुरंगाला अत्यंत भाविकपणे प्रार्थना करतात की त्यांनी आपल्याला ब्रह्मरूप बनवून ब्रम्ह रुपात विलीन करावें.

अभंग--९८

सूर्यनारायणा देवा नमस्कार। तुवां निराकार दाखवावें दाखवुनी द्यावें मज निववावें ।चंद्रा तुज भावें प्राथितसें प्राथितसें मही आणि अंतरिक्षा। तुम्ही त्या अलक्षा दाखवावें दाख़वावें मज आपोनारायणें। ब्रह्मप्राप्ति जेणें तें करावें करावे सनाथ अग्निप्रभंजने। नक्षत्रे वरुणें दास म्हणे

भावार्थ--

या अभंगात रामदास सूर्यनारायणाला नमस्कार करून त्यांनी आपल्याला निराकार रूप साकार करून दाखवावे अशी विनंती करतात.चंद्राने शितल रूप दाखवून आपणास शांत करावे अशी भावपूर्ण प्रार्थना करतात। पृथ्वी आकाश आप तेज वायू अग्नी या पंचमहाभूतांनी आपल्या अलक्ष रूपाचे प्रकटीकरण करून ब्रह्म प्राप्तीचा मार्ग दाखवावा अशी विनंती करीत आहेत.

अभंग--९९

तुम्ही सर्व देव मिळोनी पावावें। मज वेगीं न्यावें परब्रहमीं परब्रह्मीं न्यावें संतमहानुभावें। मज या वैभवें चाड नाहीं चाड नाही एका निर्गुणावांचोनी। माझे ध्यानीं मनीं निरंजन निरंजन माझा मज भेटवावा। तेणें होय जीवा समाधान समाधान माझें करा गा सर्वहो। तुम्हांसी देव हो विसरेना विसरेना देह चालतो तोंवरी। बाह्य अभ्यंतरी दास म्हणे

भावार्थ--

सर्व देवांनी तसेच संत महानुभावांनी कृपा करून आपल्याला परब्रह्मस्वरूपी न्यावे अशी प्रार्थना संत रामदासांनी या अभंगात केली आहे.आपल्याला एका निर्गुण निराकार परब्रम्हा शिवाय कोणत्याही वैभवाची अपेक्षा नाही. आपल्या ध्यानीमनी केवळ निरंजन परमेश्वर वसत असून तेच निरंजन स्वरुप डोळ्यांनी पाहावे हेच आपल्या मनाचे समाधान आहे.सर्व देवांनी हे समाधान मिळवून दिल्यास देहात चलनवलन असे पर्यंत हा उपकार आपण विसरणार नाही व बाह्य व अंतर्यामी सतत चिंतन करीत राहिल असे संत रामदास प्रतिज्ञापूर्वक सांगत आहेत.

अभंग--१००

मन हे विवेके विशाळ करावें। मग आठवावे परब्रह्म परब्रह्म मनीं तरीच निवळे। जरी बोधें गळे अहंकार अहंकार गळे संतांचे संगतीं। मग आदि अंतीं समाधान समाधान घडे स्वरुपीं राहतां विवेक पाहतां नि:संगाचा नि:संगाचा संग सदृढ धरावा।संसार तरावा दास म्हणे

भावार्थ--

या अभंगात संत रामदास संसार सागर कसा तरून जावा याविषयी मार्गदर्शन करीत आहेत. विवेकाने मन विशाल करावे आणि मग परब्रह्माचे स्वरूप आठवावे. जेव्हा पूर्ण बोध होऊन अहंकार गळून जाईल तेव्हाच परब्रम्हाचे दर्शन मनामध्ये प्रतिबिंबित होईल .अहंकार गळण्यासाठी संतांची संगती धरावी त्यामुळे जीवनाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत समाधान टिकून राहते.स्वतःच्या आत्मस्वरूपात मन स्थिर झाल्यानंतरच समाधानाची प्राप्ती होते.देहबुद्धी व त्यामुळे घडणाऱ्या विषयाचा संग यापासून दूर राहणाऱ्या संतांची संगत दृढपणे धरावी. तरच त्यांचे विवेक व वैराग्य कळून येते,त्यामुळे संसारसागर सहज तरुन जाता येतो असे संत रामदास सांगत आहेत.

अभंग--101

कल्पनेच्या देवा कल्पनेची पूजा। तेथें कोणी दुजा आढळेना आढळेना देव आढळेना भक्त। कल्पनेरहित काय आहे आहे तैसे आहे कल्पना न साहे। दास म्हणे पाहे अनुभवें

भावार्थ--

भक्त आपल्या मनात आवडणाऱ्या देवाची कल्पनेने मूर्ती साकार करतो आणि कल्पनेनेच कल्पनेतल्या देवाची षोडशोपचारे पूजा करतो.प्रत्यक्षात देव व भक्त दोन्हीही आढळत नाही कल्पनेशिवाय काहीच घडत नाही.संत रामदास म्हणतात याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन पहावा.

अभंग --102

विदेशासी जातां देशचि लागला। पुढें सांपडला मायबाप सर्व देशीं आहे विचारें पाहतां। जाता न राहता सारिखाची व्यापुनियां दासा सन्निधचि असे। विचारें विलसे रामदासीं

भावार्थ--

देशत्याग करुन विदेशात जाण्याचे ठरवले तर पुढेही आपलाच देश लागला.आणखी मार्गक्रमणा केले तरी आपलेच मायबाप आढळले. विचार केला तर सर्व देश सारखेच आहेत हे लक्षात आल.सगळीकडे एकच तत्व व्यापून आहे हा विचार या अभंगात संत रामदास साधकांचे.

अभंग --103

मनाहूनि विलक्षण । तेंचि समाधिलक्षण नलगे पुरुनी घ्यावें। नलगे जीवेंचि मरावे अवघा वायु आटोपावा। नलगे ब्रम्हांडासी न्यावा डोळे झाकूनि बैसला। परि तो मनें आटोपिला नाना साधनीं सायास। मनें केला कासाविस रामदास म्हणे वर्म। हेंचि मनाचें सुगम

भावार्थ--

संत रामदास या अभंगात म्हणतात की समाधी लक्षण मनासारखेच विलक्षण आहे.समाधी साधताना साधकाला पुरुन घ्यावे लागत नाही की जिवंतपणी मरावे लागत नाही. वायूचा निरोध करून ब्रह्मांडात न्यावा लागत नाही त्याचप्रमाणे नाना प्रकारच्या साधना व त्यासाठी नाना प्रयत्न करताना मनाच्या चंचलपणा पुढे काही उपाय सापडत नाही. जीव कासाविस होतो. चंचलता हे मनाचे वर्म समजून घेतले पाहिजे तरच साधकाची साधना सफल होऊ शकते

अभंग--104

दृढ होतां अनुसंधान। मन जाहलें उन्मन होता बोधाचा प्रबोध । जाला शब्दांचा नि:शब्द ज्ञान विज्ञान जाहलें ।वृत्ति निवृत्ति पाहिलें ध्यानधारणेची बुध्दि । जाली सहज समाधि रामीरामदासीं वाच्य ।पुढें जालें अनिर्वाच्य

भावार्थ--

या अभंगात संत रामदास साधकाचे अनुसंधान म्हणजे मनाची एकाग्रता साधली असता कोणते अनुभव येतात याचे मार्गदर्शन करतात ते म्हणतात साधनेत दृढ एकाग्रता साधली तर मनाचे उन्मन होते म्हणजे मन विचारांच्या उच्च पातळीवर जाते.मनाला झालेला बोध केवळ शाब्दिक न राहता त्याचा प्रबोध होतो म्हणजे प्रत्यक्ष अनुभवाच्या पातळीवर येतो. तेथे शब्दाचे काही प्रयोजन रहात नाही मन निशब्द बनते. ज्ञानाचे विज्ञान म्हणजे ते शाब्दिक न राहता प्रत्यक्ष व्यवहारात उतरवता येते. साधकाच्या सहजप्रवृत्ती निवृत्तीत बदलतात. मन समाधी अवस्थेपर्यंत पोचते जेथे स्वतःचा व जगाचा विसर पडतो अपूर्व शांतता अनुभवास येते.संत रामदास म्हणतात मन रामरुपाशी एकरुप झाले की,तो अनुभव शब्दात सांगता येत नाही,मन शब्दातित होते. संत रामदास म्हणतात ram रूपाशी एकरूप झाले की तो अनुभव शब्दात सांगा सांगता येत नाही मन शब्दातीत होते मनाचे मनाशी संत रामदासांच्या मनात विलसू लागला

अभंग --105

ज्ञानेविण जे जे कळा । ते ते जाणावी अवकळा ऐसें भगवंत बोलिला । चित्त द्यावें त्याच्या बोला एक ज्ञानचि सार्थक । सर्व कर्म निरर्थक दास म्हणे ज्ञानेविण । प्राणी जन्मला पाषाण

भावार्थ--

ज्ञानाशिवाय माणसाचे सर्व प्रयत्न ,सर्व कला केवळ अवकळा आहेत असे प्रत्यक्ष भगवंताने सांगितले आह, त्याचा विचार करावा असे संत रामदास म्हणतात. ज्ञान हेच जीवनाचे सार्थक असून त्याशिवाय सर्व कर्म निरर्थक ठरते.संत रामदास म्हणतात, ज्ञाना शिवाय मनुष्य हा केवळ दगड होय.

अभंग--106

कोणें प्रारब्ध निर्मिलें। कोणें संसारीं घातलें ब्रह्मादिकांचा निर्मिता । कोण आहे त्या परता अनंत ब्रह्मांडांच्या माळा । विचित्र भगवंताची कळा रामदासांचा विवेक । सर्वा घटीं देव एक

भावार्थ--

अनंत ब्रम्हांडाच्या मालिका ज्याने निर्माण केल्या, ब्रह्मादिक देवांचा jजो निर्माता आहे ,ज्याच्या पेक्षा श्रेष्ठ असा कुणीही नाही ,ज्याने या संसारात प्राणी सृष्टी उत्पन्न केली व त्यांचे प्रारब्ध निर्माण केले .या सर्व लीला एका भगवंताच्या आहेत. संत रामदास सांगतात अनंत प्राण्यांच्या देहात एकच परमात्मा विलसत आहे हे समजून घेणे हाच खरा विवेक आहे.

अभंग--107

पतित म्हणजे वेगळा पडिला । पावन तो जाला एकरुप एकरुप देव अरुप ठायींचा । तेथे दुजा कैंचा कोण आहे कोण आहे दुजा स्वरुपीं पाहतां ।विचारें राहतां सुख आहे सुख आहें मूळ आपुलें शोधितां ।मनासी बोधितां रामदास

भावार्थ--

जो स्वरुपापासून वेगळा झाला तो पतित व जो स्वरुपाशी एकरुप झाला तो पावन असे संत रामदास म्हणतात.स्वरुपाशी पूर्पपणे एकरुप झाल्यास तेथे मी तू पणाचा भेद राहत नाही मुळांत आपण अमृताचे पुत्र आहोत. एकाच आत्मतत्वातून जन्माला आलो आहोत आणि ते आत्मत्त्व अमर आहे.असा विचार करण्यात फार सुख आहे.संत रामदास म्हणतात,हाच बोध मनाने स्विकारला पाहिजे.

अभंग--108

कर्ता तूं नव्हेसी करवितानव्हेसी।जाण निशचयेसी आलया रे चंद्रसूर्यकळा धरा मेघमाळा। जीववीति कळा देवापासीं देवें केलें अन्न केलें तें जीवन। तेणें पंचप्राण स्थिर जाले दास म्हणे मना तुज देवें केलें। मग त्वां देखिलें सर्वकाहीं

भावार्थ--

म्हणूस स्वतः करता किंवा करविता नाही ही गोष्ट निश्चयपूर्वक जाणून घ्यावी असे संत रामदास म्हणतात. चंद्र-सूर्य ,मेघ मालिका पृथ्वी हे सर्व ईश्वरानें निर्माण केले आहे. जीवनास आवश्यक असलेले, पंचप्राण स्थिर करणारे अन्न व पाणी हे सर्व देवाने निर्माण केले आह. एवढेच नव्हे तर असा विचार करणारे मन ही देवाचीच देणगी आहे. त्यामुळेच आपण सर्व काही समजून घेऊ शकतो असे रामदास म्हणतात.

अभंग--109

करुनी अकर्ते होऊनियां गेले ।तेणे पंथें चाले तोचि धन्य तोचि धन्य जनीं पूर्ण समाधानी।जनीं आणि वनीं सारिखाचि कळतसे परी अंतर शोधावें ।मनासि बोधावें दास म्हणें

भावार्थ-- स्वतः सर्व काही करूनही स्वतःकडे कर्ते पणा घेणारे अनेक अकर्ते होऊन गेले आहेत ते लोक समुदायात असोत अथवा वनात एकांतात असोत पूर्ण समाधानात राहातात .संत रामदास म्हणतात अशा लोकांचे अंतरंग ,त्यांचे विचार समजून घेऊन त्या पासून योग्य तो बोध घ्यावा.

अभंग--110

गगना लावू जातां पंक। लिंपे आपुला हस्तक ऊर्ध्व थुंकता अंबरीं । फिरोनि पडे तोंडावरीं ह्रदयस्थासी देतां शिवी। ते परतोनी झोंबे जिवीं प्रतिबिंबासी जें जे करी। तेंआधींच तोंडावरी रामीरामदासी बुद्धि । जैसी होय तैसी सिद्धि

भावार्थ--

आपण आकाशाला चिखल लावायला लागलो तर आपलेच हात चिखलाने माखून निघतात. वर तोंड करून आकाशावर थुंकलो तर ते परत आपल्याच तोंडावर पडते.आपल्या ह्रदयांत वास करणाय्राला अभद्र शब्द वापरले तर ते परतून आपल्याच मनाला दुःख देतात .रामदास म्हणतात जशी आपली बुद्धी तशी सिद्धी आपणास प्राप्त होत.

अभंग--111

राघवाचे घरीं सदा निरुपण । श्रवण मनन निजध्यास विचारणा सारासार थोर आहे। अनुभवे पाहें साधका रे साधका रे साध्य तूंचि तूं आहेसी। रामीरामदासीं समाधान

भावार्थ--

राघवाच्या घरी धार्मिक ग्रंथांचे सतत श्रवण मनन व निरुपण अखंड चालू असते.हाच केवळ एकच ध्यास असतो. सारासार विचारांचे मंथन सुरू असते असे सांगून संत रामदास म्हणतात याचा अनुभव स्वतः साधकाने घ्यावा. साधकाच्या जीवनाचे सार्थक हेच साध्य मानले जाते.त्यातच खरे समाधान मिळते असे संत रामदास सांगतात.

अभंग--112

स्वस्कंधी बैसणें आपुलिये छाये। अघटित काय घडो शके दुजेविण सुखें स्वरुप बोलणे ।अद्वैतासी उणे येऊं पाहे सुख आणि दु:ख वृत्तीच्या संबंधें। निवृत्तीच्या बोधें द्वंद्व कैचे सुखातीत देव पहावा अनंत। दास म्हणे संत वृत्तिशून्य वृत्तिशून्य संत असोनिया वृत्ति। हेखूण जाणती अनुभवी

भावार्थ

आपल्याच सावलीच्या खांद्यावर बसता येणे ही गोष्ट अशक्य असते.असे कधी घडले नाही.दुसरा कोणी नसताना स्वरूपाविषयी सुखाने संवाद होऊ शकत नाही. तेथ द्वैत निर्माण होते व त्यामुळे अद्वैताला कमीपणा येतो.सुखव दुःख हे दोन्ही आपल्या वृक्तिशी संबंधित आहेत. जेथे सुखदुःखाची जाणीवच नाही तेथे द्वंद्व संपूर्ण जाते.सुखाच्या अतीत असलेला अनंत परमेश्वराचे दर्शन घ्यावे.तो निराकार निरंजन आहे. संत रामदास म्हणतात संत वृत्तिशुन्य असतात. त्यांच्ये मन शांत सरोवरा सारखे असते.त्यांच्या मनात वृत्ति उठत नाहीत तरीही त्यांना देवदर्शनाची, रामरूपाची अत्यंत गोडी वाटते.अनुभवाशिवाय हे जाणता येणार नाही असे संत रामदास म्हणतात.

अभंग --113

बोलवेना तें बोलावे।चालवेना तेथें जावें नवल स्वरुपाचा योग ।जीवपणाचा वियोग हातां नये तेचि घ्यावें । मनेंवीण आटोपावें रामदासीं दृढ बुध्दि ।होतां सहज समाधि

भावार्थ--

जे बोलता येणार नाही ते बोलावे करता येण्याजोगे नाही ते करण्याचा प्रयत्न करावा.जेथ पर्यंत चालत जाता येत नाही तेथे जावे.अशा ठिकाणी नवलाईच्या गोष्टींचा योग येतो. तेथे जीवपणा संपूर्ण जातो.जीवा शिवाचे मिलन होते.जे आपल्या हातात येत नाही ते घेण्याचा प्रयत्न करावा.संत रामदास म्हणतात सहज समाधीच्या अवस्थेत बुद्धी दृढ होत.

अभंग--114

माझे मी तूं पण विवेकाने नेलें।देवाजीने केलें समाधान आपुल्या सुखाचा मज दिला वाटा।वैकुंठीचा वाटा कोण धांवे देवासी नेणतां गेले बहु काळ ।सार्थकाची वेळ एकाएकी एकाएकीं एक देव सांषडला। थोर लाभ झाला काय सांगों

भावार्थ--

मी तूंपणाचे द्वैत विवेकामुळे नाहिसे झाले. आपल्या सुखाचा वाटा देऊन देवाने सुखी केले.देवाला जाणून घेण्याच्या प्रयत्नात खूप दिवस निघून गेले पण जीवनाचे सार्थक होण्याची वेळ अकस्मात आली .आणि वैकुंठीच्या वाटा सापडल्या.तेथे एकाएकी देव सापडला मोठा लाभ झाला याचे वर्णन करून सांगता येणार नाही.

अभंग--115

योगियांचा देव मज सांपडला।थोर लाभ जाला एकाएकीं एकाएकीं एक त्रैलोक्यनायक ।देखिला सन्मूख चहुंकडे चहुंकडे देव नित्यनिरंतर । व्यापुनी अंतर समागमें समागम मज रामाचा जोडला । वियोग हा केला देशधडी देशधडी केला विवेके वियोग । रामदासीं योग सर्वकाळ

भावार्थ --

संत रामदास म्हणतात यगेश्वर एकाएकी डोळ्यासमोर प्रगट झाला आणि आश्चर्य असे की योगेश्वराचे रूप चारी बाजूंनी नित्य निरंतर दिसू लागले.रामरुपाने देव भक्तामधील सर्व अंतर व्यापून टाकले आणि समागमाचे सुख मिळाले. रामाचा समागम झाल्यामुळे वियोगाचं दुःख संपले. विवेकाने वियोगाचे दु:ख लयाला जावून श्रीरामाचा कायमचा सर्वकाळ योग प्राप्त झाला.

अभंग --116

राघवाचा धर्म गाजो। कीर्ति अद्भुत माजो ठाईं ठाईं देवालयें । भक्तमंडळी साजो शक्ति आहे तोचि फावे । दोनी लोक साधावे इहलोक परलोक ।शत्रु सर्व रोधावे संसारिचें दु:ख मोठें । हें मी कोणाला सांगों जन्म गेला तुजविण । आणिक काय मी मागों मागता समर्थाचा । तेणें कोणा सांगावें रामेविण कोण दाता । कोणामागे लागावें रामदास म्हणे देवा । आतां पुरे संसार असंख्य देणे तुझें । काय देतील नर

भावार्थ--

या अभंगाचा प्रारंभी संत रामदासांनी राघवाचा धर्म गाजत राहो राघवाची कीर्ती दुमदुमत राहो ठिकठिकाणी राममंदिरांची स्थापना केली जावो अनेक भक्तांमुळे ती मंदिरे शोभायमान होवोत अशी मंगल प्राथना करीत आहेत. आपण बलोपासना करावी ,सर्व शत्रूंना शक्तीच्या प्रभावाने रोखावे ,व अशाप्रकारे इहलोक व परलोक साधावे असा उपदेश रामदास करतात.अगणित दुखे भोगावी लागली रामा शिवाय जन्म गेला हे आपण कुणाला सांगू शकत नाही. आणि समर्थचा दास असल्याने कुणाला काही मागू शकत नाही असे रामदास म्हणतात.

अभंग --117

वदन सुहास्य रसाळ हा राघव । सर्वांगी तनु सुनीळ हा राघव मृगनाभी रेखिला टिळा हा राघव।मस्तकीं सुमनमाळा हा राघव साजिरी वैजयंती हा राघव ।पायीं तोडर गर्जती हा राघव सुंदर लावण्यखाणी हा राघव । उभा कोदंडपाणी हा राघव सकल जीवांचें जीवन हा राघव।रामदासासि प्रसन्नहा राघव

भावार्थ--

या अभंगात संत रामदास रामाचे रसाळ वर्णन करीत आहेत रामाच्या वदनावर सुहास्यअसून तो लावण्याची खाणी आहें. राघवाच्या कपाळावर टिळा लावला आहे .मस्तकावर सुवासिक फुलांच्या माळा आहेत.गळ्यामध्ये वैजयंती माळ आहे.पाया मध्ये तोड गाजताहेत.हातामध्ये कोदंड धारण केला आहे. राघव जीवांचे जीवन आहे आणि विशेष म्हणजे राघव रामदासांवर प्रसन्न आहे.

अभंग--118

कुळ हनुमंताचें । मोठे किराण त्यांचें भुभुकारें ँळळजयाचें । किलकिलाटें आतां वाटतें जावें। त्याचें सांगाती व्हावें डोळे भरुनी पहावें । सर्वांग त्यांचें ऐकोनी हासाल परी । नये तयांची सरी विचार जयांसी करी । स्वामी माझा असंख्य मिळाला मेळा । रामा भोंवता पाळा पालथें या भूगोळा । घालू शकती ऐसी करणी त्यांची । व्यर्थ जिणीं आमुचीं पाला खाउनी रामाची । शुश्रुषा केली ऐसे ते रामदास । सर्वस्वे उदास रामीं जयांचा विश्वास । बाणोनि गेला

भावार्थ--

संत रामदास म्हणतात हनुमंताचे कुळ प्रसिद्ध आहे त्यांच्या भुभुकाराने,किलबिलाटाने सर्व परिसर व्यापून राहिला आह.असे वाटते की आत्ताच्या आत्ता जाऊन त्यांचे सांगाती व्हावे.त्यांना डोळे भरून पाहावे.हे ऐकून कुणाला हसायला येईल परंतु त्यांची बरोबरी कोणीही करू शकणार नाही कारण प्रत्यक्ष श्रीराम त्यांच्याशी विचारविनिमय करत असत. श्रीरामा सभोवती ती वानरसेना वेढा घालीत अस. आपल्या शक्तीने या भूगोलोकाला पालथा घालू शकतील एवढी त्यांची शक्ती होती. केवळ झाडाचा पाला खाऊन त्यांनी राघवाची सेवा केली ही त्यांची करणी आपल्याला आपले जीवन व्यर्थ ,लाजिरवाणें आहे असे वाटायला लावते. ते रामाचे दास असून वृत्तीने अत्यंत उदासीन आहेत. शिवाय त्यांना कसलीच अपेक्षा नाही. रामावर त्यांचा दृढ विश्वास आहे.त्यांच्या भक्तीची सर कुणालाच येणार नाही. असा आपला स्वामी हनुमंत आहे असे रामदास म्हणतात.

अभंग--119

देव वैकुंठीचा । कैपक्षी देवाचा भार फेडिला भूमीचा । आत्मा सर्वांचा पाळक प्रजाचा । योगी योगियांचा राजा सूर्यवंशींचा । तो अयोध्येचा राम सामर्थ्याचा । कैवारी देवांचा मेघ वोळला सुखाचा । न्यायनीतीचा उध्दार अहिल्येचा । एकपत्नीव्रताचा सत्य बोलणे वाचा । जप शिवाचा नाथ अनाथांचा । स्वामी हनुमंताचा सोडविता अंतीचा । रामदासाचा

भावार्थ--

श्रीराम हा वैकुंठीचा देव असून देवांचा कैवारी आहे तो सर्वांचा आत्मा असून धरणीचा भार हलका करण्यासाठी सूर्यवंशात अवतार धारण केला आहे.प्रजेचा पालनकर्ता असून योग्यामधील सर्वश्रेष्ठ योगी आहे .श्री राम अयोध्येचा राजा असून अत्यंत सामर्थ्यवान आहे .आपल्या प्रजेला न्याय नीती व सुख देणारा मेघ च आहे.अहिल्येचा उद्धारकर्ता ,एकपत्नी ,सत्यवादी आहे .रामनामाचा जप स्वतः शिवशंकर करतात.प्रभू रामचंद्र अनाथांचे नाथ असून हनुमंताचे स्वामी आहेत. संत रामदास म्हणतात श्रीराम हा अंतकाळी सुटका करणारा मोक्षदाता आहे.

अभंग--120 कैवारी हनुमान,आमुचा ।। पाठी असतां तो जगजेठी । वरकड काय गुमान नित्य निरंतर रक्षी नानापरी । धरुनियां अभिमान द्रोणागिरि करि घेउनि आला । लक्ष्मणप्राणनिधान दासानुदासा हा भरंवसा । वहातसे त्याची आण

भावार्थ-- संत रामदास या अभंगात हनुमानाचा महिमा सांगत आहेत. ते म्हणतात हनुमान निरंतर रक्षण करणारा आपला कैवारी आहे .लक्ष्मणाच्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी तो द्रोणागिरी सारखा पर्वत तळहातावर घेऊन आला. संत रामदास म्हणतात हनुमंता सारखा जगाचे रक्षण करणारा जगजेठी पाठीशी असताना आणखी कशाचीच अपेक्षा करण्याचे कारण नाही.त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा.

अभंग--121

घात करा घात करा । घात करा ममतेचा ममतागुणें खवळें दुणें ।राग सुणें आवरेना ममता मनीं लागतां झणीं । संतजनीं दुरावली दास म्हणे बुध्दि हरी । ममता करी देशधडी

संदर्भ-- या अभंगात संत रामदास ममतेचा घात करा असे सांगत आहेत .ममता म्हणजे माझे पणा किंवा ममत्व त्यामुळे माझे व दुसऱ्याचे असा दुजाभाव वाढीस लागतो .त्यामुळे क्रोध आवरणे कठीण होते.मनात ममत्व निर्माण झाले की संतांचा उपदेश आवडेनासा होतो परिणामी संतजन दुरावतात. संत रामदास म्हणतात बुद्धी हरण करणारी ममता मनातून काढून टाकावी तिला देशोधडीला लावावें.

अभंग--122

सखियेहो आहेति उदंड वेडे । ऐसे ते सज्जन थोडे तयाची संगति जोडे । परम भाग्यें सकळांचे अंतर जाणे । मीपणें हुंबरों नेणें ऐसियावरून । प्राणसांडण करुं साहती बोलणें उणें । न पुसतां सांगणें समचि देखणें उणें । अधिक नाहीं अभिमान नावडे । धांवती दीनांकडे तयांचे जे उकरडे । महाल त्यांचे आपपर नाही ज्यासी ।पुसतां सांगती त्यासी ऐकतांचि भाविकांसी । पालट होये रामीरामदास। वास । पाहतो रात्रंदिस ऐसियाचा सौरस । देईं राघवा

भावार्थ--

या अभंगात रामदास संतांचा महिमा सांगत आहे .ज्यांना रामभक्तीचे उदंड वेड लागले आहे असे सज्जन अगदीच थोडे असतात. मोठ्या भाग्याने त्यांच्या संगतीचा लाभ होतो. ते सर्वांच्या अंतकरणातील विचार जाणतात. अहंकाराने कधीच गुरगुरत नाहीत .अशा संत-सज्जनां वरुन आपले प्राण ओवाळून टाकावेत असे संत रामदास म्हणतात .अज्ञानी लोकांचे कठोर भाषण सहन करतात. त्यांच्या गुणदोषांची चर्चा करीत नाहीत. कुणीही विचारल्याशिवाय समजुतीच्या गोष्टी सांगतात .ते सर्वांना समभावाने वागवतात। जे दीनदुबळे आहेत त्यांच्याकडे धाव घेतात .अभिमान ,गर्विष्ठपणा त्यांना अजिबात आवडत नाही .सज्जन कधी आपला व परका असा दुजाभाव करीत नाहीत .भाविक लोक संतांचा उपदेश ऐकताच त्यांच्या विचारात बदल घडून येतो .संत रामदास म्हणतात आपण रात्रंदिवस या संतांची वाट पाहतो व त्यांची संगती घडवून आणावी अशी राघवाला प्रार्थना करतो.

अभंग--123

शहाणें शोधितां नसे । दुष्काळ पडिला असे तया धुंडितसे मन माझें रे आहेति थोर थोर। परि नाहीं चतुर ।

तेथें निरंतर मन माझें रे

भेदिक शाहाणे जनी । सगुण समाधानी धन्य धन्य ते जनीं कुळखाणी रे रामीरामदासीं मन । जाहलें उदासीन ऐसे ते सज्जन पहावया रे

भावार्थ--

संत रामदास म्हणतात जगात अनेक थोर माणसे आहेत पण अत्यंत चतुर,विवेकी,समाधानी व सद्‍गुणी सज्जन मात्र नित्य,निरंतर शोधूनही सापडत नाहीत.असें सज्जन ज्या कुळात जन्म घेतात ते कुळ धन्य होय.अशा संत सज्जनांचा शोध घेताना आपले मन उदासीन झाले आहे.

अभंग--124

साधुसंतां मागणें हेंची आतां । प्रीति लागो गोविंदगुण गातां वृत्ति शून्य जालीया संसारा । संतांपदीं घेतला आम्हीं थारा आशा तृष्णा राहिल्या नाहीं कांहीं । देहप्रारब्ध भोगितां भय नाहीं गाऊं ध्याऊं आठवूं कृष्ण हरी । दास म्हणे सप्रेम निरंतरीं

भावार्थ --

या अभंगात रामदास साधुसंतांकडे एक मागणे मागत आहेत .त्यांनी आपल्या मनामध्ये गोविंदाचे गुण गाण्यासाठी प्रेम निर्माण करावे .सांसारिक सुखदुःखा मुळे वृत्ती शून्य झाल्याने मनातील आसक्ती ,आशा ,तृष्णा यांचा लोप झाला आहे .आता देहबुद्धीमुळे भोगायला लागणारे प्रारब्धाचे भोग राहिले नाही .उदासीन वृत्ती निर्माण झाल्याने संतपदी आश्रय घेऊन गोविंदाचे गुण आठवून त्याचे कीर्तन करावे व त्याविषयी अंतरात निरंतर प्रेम असावे एवढी एकच इच्छा उरली आहे, ती साधुसंतांनी पूर्ण करावी अशी याचना संत रामदास करतात.

अभंग--125

पावनभिक्षा दे रे राम ।दीनदयाळा दे रे राम अभेदभक्ति दे रे राम ।आत्मनिवेदन दे रे राम तद्रूपता मज दे रे राम । अर्थारोहण दे रे राम सज्जनसंगति दे रे राम । अलिप्तपण मज दे रे राम ब्रह्मानुभव दे रे राम । अनन्य सेवा दे रे राम मजविण तूं मज दे रे राम । दास म्हणे मज दे रे राम

भावार्थ--

या अभंगात रामदास श्रीरामा जवळ पावन भिक्षा मागताहेत कोणताही संदेह नसलेली भक्ती ,नवविधा भक्तीमध्ये अगदी शेवटची आत्मनिवेदन भक्ती ,कोणत्याही विषयाशी एकरूप होऊन त्यातील अर्थ ग्रहण करण्याची शक्ती, सज्जनांची संगती ,केवळ साक्षीभावाने अलिप्तपणे येणारा ब्रह्मानुभव, स्वामींची अनन्य भावाने सेवा करण्याची वृत्ती श्री रामाने आपणांस द्यावी अशी प्रार्थना करून शेवटी संत रामदास म्हणतात ,माझ्या मीपणाचे, अहंकाराचे विसर्जन करून श्रीरामाने आपल्याला भेट द्यावी.

अभंग--126

कोमळ वाचा देरे राम । विमळ करणी दे रे राम हितकारक दे रे राम । जनसुखकारक दे रे राम अंतरपारखी दे रे राम । बहु जनमैत्री दे रे राम विद्या-वैभव दे रे राम । उदासिनता दे रे राम मागो नेणें दे रे राम । मज न कळे तें दे रे राम तुझी आवडी दे रे राम । दास म्ह्णे मज दे रे राम

भावार्थ--

या अभंगात संत रामदास जे लोकांसाठी हितकारक, सुखकर ,सुखदायक आहे अशा गोष्टींची रघुनायका कडे मागणी करीत आहेत.आपली वाणी कोमल व कृती निर्मळ असावी असे ते म्हणतात.आपल्याला इतरांचे अंतरंग जाणून घेण्याची कला द्यावी त्यामुळे लोकांची अतूट मैत्री मिळवता येईल असे संत रामदास म्हणतात.वैभवा बरोबरच ते अंतकरणाची उदासीनता मागताहेत.अभंगाचे शेवटी रामदास म्हणतात की आपल्याला काय मागावे हे कळत नाही पण तेच रामाने आपल्याला द्यावें आणि रामाचे प्रेम सतत हृदयात रहावें अशी मागणीही ते करतात.

अभंग--127

संगित गायन दे रे राम । आलाप गोडी दे रे राम धात माता दे रे राम । अनेक धाटी दे रे राम रसाळ मुद्रा दे रे राम । जाड कथा दे रे राम प्रबंध सरळी दे रे राम । शब्द मनोहर दे रे राम सावधपण मज दे रे राम । बहुत पाठांतर दे रे राम दास म्हणे रे गुणधामा । उत्तम गुण मज दे रे राम

भावार्थ--

या अभंगात रामदास गुंणधाम रामाकडे उत्तमगुणांची मागणी करीत आहेत. मधुर संगीत ,गायन करताना मुद्रेवर दिसणारे रसाळ भाव ,मनोहर शब्दांनी सजवलेली आकर्षक कथा याबरोबरच व्यवहारातील नित्य सावधपणा व विपुल पाठांतर हे सर्व गुण आपल्याला द्यावेत असे संत रामदास म्हणतात.

अभंग--128

अपराध माझा क्षमा करीं रे श्रीरामा दुर्लभ देह दिधले असतां नाहीं तुझिया प्रेमा व्यर्थ आयुष्य वेंचुनि विषयीं जन्मुनि मेलों रिकामा नयनासारिखें दिव्य निधान पावुनियां श्री रामा विश्वप्रकाशक तुझे रुपडें न पाहें मेघश्यामा श्रवणें सावध असतां तव गुणकीर्तनि त्रास आरामा षड्रसभोजनि जिव्हे लंपट नेघे तुझिया नामा घ्राण सुगंध हरुषें नेघे निर्माल्य विश्रामा करभूषणें तोषुनि नार्चिति तव स्वरुपा गुणधामा मस्तक श्रेष्ठ हें असतां तनुतें न वंदीं पदपद्मा दास म्हणे तूं करुणार्णव हे सीतालंकृतवामा

भावार्थ--

संत रामदासांच्या हा अभंग धावा या स्वरूपाचा आहे. माणसाला दुर्लभ मनुष्य देह मिळूनही विषय वासनेमुळे श्रीरामाच्या प्रेमाला आपण पारखे झालो आहोत.मनुष्य जन्माला येऊन आयुष्य व्यर्थ घालविले असा पश्चात्ताप संत रामदास व्यक्त करतात.नयना सारखी दिव्य देणगी मिळूनही विश्वाला प्रकाशित करणाऱ्या मेघश्याम राम दर्शनाचे सुख आपणास लाभले नाही याबद्दल ते खंत व्यक्त करतात.सावध कर्णेंद्रिय मिळूनही रामगुण कीर्तनाचा लाभ झाला नाही.सहा प्रकारच्या रसांनी युक्त असलेल्या भोजनासाठी लंपट असलेली जीभ रामनामाचा जप करण्यास मात्र विसरली. सुवासिक फुलांचा ,फळांचा सुगंध घेण्यास चटावलेली श्रवणेंद्रिय श्रीरामाच्या पदकमली वाहिलेल्या निर्माल्याचा सुगंध चाखू शकली नाही.सुवर्ण भुषणांनी सुखावलेल्या हातांनी कधी रामाची पूजा केली नाही.सर्वश्रेष्ठ अशा मस्तकाने कधी रामाचा पदकमलांना वंदन केले नाही.अशा असंख्य अपराधांना दयाघन श्रीरामानें क्षमा करावी असे संत रामदास विनवणी करून अत्यंत कृपाळूपणे ही आस पुरवावी असे सांगतात.

अभंग--129

शरण तुज रघुवीरा । हो रामा ,गुणगंभीरा धन्य धन्य दातारा । कृपाळू खरा जन्मदु:ख सांगता नये । सांगू मी काय दूरी करुनि अपाय । केले उपाय बाळपणापासुनि वेडें । तुज सांकडें सांगू मी कवणापुढें । जालें एवढें जीवींचें मनींचें पुरविलें । गोमटें केलें सर्व साहोनियां नेलें । नाहीं पाहिलें देवा तूं त्रैलोक्यनाथ । मी रे अनाथ मज करुनि सनाथ । केले समर्थ दास म्हणे तुझ्या अन्नाचा । वाढलों साचा मज हा संसार कैचा । सर्व देवाचा

भावार्थ-- अत्यंत कृपाळू उदार गुणगंभीर अशा श्री रामाला शरण जाऊन संत रामदास म्हणतात की ,जन्माला येण्याचे दुःख वर्णन करून सांगण्यासारखे नाही परंतु श्रीरामाने त्यातील उणिवा काढून उपाय केले आहेत.बाळपणापासून वेड्या मनाने श्रीरामाला अनेक वेळा सांकडे घातले ते इतके झाले आहे की कुणाला सांगता येत नाही.आपल्या जीवनाच्या सर्व मागण्या श्रीरामांनी पूर्ण करून जीवन साजरे बनवले.श्रीराम त्रैलोक्याचे स्वामी असून आपल्यासारख्या अनाथांला नाथ बनून सनाथ केले, समर्थ बनवले. संत रामदास शेवटी म्हणतात श्रीरामाने अन्न देऊन या देहाचे पोषण केले. येथे आपले काही नसून सर्व संसार देवाचा आहे.

अभंग --130

हे दयाळुवा हे दयाळुवा । हे दयाळुवा स्वामि राघवा प्रथम का मला लाविली सवे । मग उपेक्षणें योग्य हें नव्हे सकळ जाणतां अंतर स्थिति । तरी तुम्हांप्रति काय विनंति दास तुमचा वाट पाहतो बोलतां नये कंठ दाटतो

भावार्थ--

या अभंगात रामदास आपले स्वामी राघव अत्यंत दयाळू असून आपल्या अंतःकरणाची स्थिती ते जाणतात.त्यामुळे त्यांना विनंती करून सांगण्याची जरूर नाही पण प्रथम श्रीरामाने दयाळूपणे कोड पुरवून तशी सवय लावली आहे,तेव्हा त्यांनी अशी उपेक्षा करणे योग्य नाही. आतुरतेने वाट बघणाऱ्या या दासाला त्यांनी भेट द्यावी.कंठ दाटून आल्याने अधिक बोलता येत नाही असे संत रामदास म्हणतात.

अभंग--131

दीनबंधु रे दीनबंधु रे । दीनबंधु रे राम दयासिंधु रे भिल्लटीफळें भक्तवत्सलें । सर्व सेवलीं दासप्रमळें चरणीं उध्दरी दिव्य सुंदरी । शापबंधनें मुक्त जो करी वेदगर्भ जो शिव चिंतितो । वानरां रिसां गूज सांगतो राघवीं बिजें रावणानुजे । करुनि पावला निजराज्य जें पंकजाननें दैत्यभंजने । दास पाळिलें विश्वमोहनें

भावार्थ--

कमळासारखे मुख असलेला ,राक्षसांचा विनाश करणाय्रा श्रीरामांना दीनबंधू ,दयासिंधु असे संबोधून संत रामदास श्रीरामाची महती सांगत आहेत .शबरीची उष्टी फळे ,दासा वर प्रेम करणाऱ्या भक्तवत्सल श्रीरामाने सेवन केली. आपल्या चरणस्पर्शाने अत्यंत सुंदर अशा अहिल्येचा गौतम ऋषींच्या शापातून मुक्तता करून उद्धार केला.रामचरणांचे नित्य चिंतन करतात अशा वानरसेनेशी श्रीराम हितगुज करतात.रावणबंधू बिभिषणावर कृपा करून श्री रामाने त्याला आपण जिंकलेले लंकेचे राज्य देऊन उपकृत केले. असे विश्वाला मोहिनी घालणारे श्रीराम, दासांचे पालन करतात असे रामदास म्हणतात.

अभंग--132

धांव रे रामराया। किती अंत पाहसी प्राणांत मांडला कीं, । नये करुणा कैसी पाहीन धणीवरी । चरण झाडीन केशीं नयन शिणले बा । आतां केधवां येसी मीपण अहंकारें । अंगी भरला ताठा विषयकर्दमांत । लाज नाही लोळता चिळस उपजेना । ऐसे जालें बा आतां मारुतिस्कंधभागीं । शीघ्र बैसोनी यावें राघवें वैद्यराजे । कृपाऔषध द्यावें दयेच्या पद्महस्ता । माझे शिरीं ठेवावें या भवीं रामदास । थोर पावतो व्यथा कौतुक पाहतोसी । काय जानकीकांता दयाळा दीनबंधो । भक्तवत्सला आतां

भावार्थ--

या अभंगात रामदास श्रीरामाला दयाळा, दीनबंधो भक्तवत्सला असे संबोधून धाव रे रामराया अशी विनवणी करीत आहेत .मीपणाच्या अहंकाराने मनामध्ये गर्व निर्माण झाला ,देहबुद्धीने विषयाच्या चिखलात लोळत असताना त्याची किळस वाटेनाशी झाली आहे.या संसारात अनेक व्यथा भोगाव्या लागत आहे.प्राणांतांच्या वेदना सहन कराव्या लागताहेत.वाट बघून नयन थकून गेले आहेत. आपली हाक ऐकून करुणाघन राघवानें मारुतीच्या खांद्यावर बसून व त्वरेनें दर्शन द्यावे अशी विनंती करून संत रामदास म्हणतात की त्यांचे दर्शन घेण्यासाठी आपण धरणी वर लोळण घेऊन आपल्या केसांनी राम चरणधूळ झाडू.वैद्यराजे राघवाने दयेचा कमलकर मस्तकावर ठेवून कृपा औषध द्यावे व दासाला भव रोगातून मुक्त करावे.

अभंग--133

कंठत नाहीं सुटत नाहीं । पराधीनता भारी शोक सरेना धीर धरेना । अहंममता दु:खकारी दास म्हणे तो लोभें शिणतो । राघव हा अपहारी

भावार्थ--

संत रामदास म्हणतात की, दुःखकारी अहंमन्यता व अनावर लोभ याने आपण पराधीन बनलो आहोत .ही पराधीनता सहन करवत नाही ,सरत नाही व धीर धरवत नाही.केवळ दुःखाचे अपहरण करणारा राघवच यांतून सुटका करू शकतो.

अभंग--134

कल्याण करीं देवराया । जनहित विवरीं तळमळ तळमळ होत चि आहे । हे जन हातीं धरीं अपराधी जन चुकतचि गेले । तुझा तूंचि सांवरीं कठीण त्यावरि कठीण जालें ।आतां न दिसे उरी कोठें जावें काय करावें । आरंभली बोहरी दास म्हणे आम्हीं केलें पावलों । दयेसि नाहीं सरी

भावार्थ--

या अभंगात रामदास रामरायाला जनहिताचा विचार करून त्यांचे कल्याण करण्यासाठी आळवीत आहेत.सतत चुकत जाणार्‍या अपराधी लोकांना मदत करण्याची विनंती करीत आहेत. संत रामदास म्हणतात परिस्थिती अधिकाधिक कठीण बनत आहे. कोठे जावे काय करावे हे कळेनासे झाले आहे. जीवाची तळमळ होत आहे.म्हणून मदतीसाठी याचना करीत आहेत.राघवाने अज्ञानी लोकांना सावराव योग्य मार्ग दाखवावा कारण रामाच्या दयेची सर कशालाच येणार नाही.

अभंग--135

रामा हो जय रामा हो । पतितपावन पूर्णकामा हो नाथा हो दिनानाथा हो ।तुमचे चरणीं राहो माथा हो बंधु हो दीन बंधु हो । रामदास म्हणे दयासिंधु हो

भावार्थ--

श्रीराम हे सर्व कामना पूर्ण करणारे पतितपावन आहेत. ते दिनानाथ असून त्यांच्या पायावर आपण माथा ठेवत आहोत. ते दीनबंधू, दया सिंधू आहेत. त्यांचा जयजयकार असो. अशी रामस्तुती संत रामदासांनी या अभंगात केली आहे.

अभंग--136

जिवींची जीवनकळा सहसा न धरी माइक माळा वो नादबिंदु कळा त्याहीवरती जिची लीळा वो तारी दीन जनांला शम विषम दु:खानळा वो हरी निर्भ्रममंडळा दावी निजात्मसुखसोहळा वो योग्यांची माउली ऐक्यपणेंविण वेगळी वो सर्वरुपी संचली पाहतां देहबुध्दि वेगळी वो नवचे हे वर्णिली परादि वाचा पारुषली वो अभिन्नभावें भली दासें नयनेविण देखिली वो

भावार्थ-- परमात्म्याशी एकरूप होण्याची कला शिकलेला भक्त गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालून भक्तीचे खोटे प्रदर्शन करीत नाही. नाद बिंदु कला लोकांच्या दुःखाचा अग्नी शांतवून दीनांचे रक्षण करते व भक्तांचा भ्रम घालूवून आत्मरुपाचा सुख सोहळा दाखवते. त्याता एकपणा साधता न आल्यास योग्यांची माऊली वेगळी रहाते.योग्यांची माऊली सगळीकडे भरून राहिली आहे असा बोध होताच देहबुध्दी वेगळी होते या अनुभवाचे वर्णन केवळ परावाणीतच करणे शक्य आहे. आत्म भावाने एकरूप झालेल्या रामदासांना रामरूप नयना शिवाय केवळ अंतर्दृष्टीने बघता आले असे रामदास म्हणतात.

अभंग--137

रे मानवा उगीच आमुची जिणी । आम्हा ध्यानीं भेटीची शिराणी नरापरिस वानर भले । जिहीं डोळां राम देखियेले ज्यासी रघुराज। हितगुज बोले । कोण्या भाग्यें भगवंत भेटले रामीं मिनले ते असो नीच याती । त्यांच्या चरणाची वंदीन माती नित्य नव्हाळी गाउनि करुं किती । तेणे रघुनाथीं उपजेल प्रीती रामीरामदास म्हणे ऐका करु । यारे आम्ही तैसाचि भाव धरुं भक्तिप्रेमाचा दाऊं निर्धारु । तेणें आम्हां भेटेल रघुवीरु भावार्थ-- संत रामदास या अभंगात म्हणतात की नरापेक्षा वानर चांगले ज्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी रामाचे दर्शन घेतले ज्या वासरांवर श्रीरामाने विश्वास ठेवून त्यांच्याशी हितगुज केल, युद्धाच्या योजना आखल्या.कोणत्या भाग्याने त्यांना भगवंताच्या भेटीचा लाभ झाला असा प्रश्न विचारून संत रामदास म्हणतात परमात्म्याशी भक्तिभावाने एकरूप झालेले वानर निच योनीतले असले तरी आपण त्यांच्या चरणांची धूळ मस्तकी लावून वंदन करू. त्यांची स्तुती पर गीते गात राहू की ज्यामुळे रघुनाथाचे भक्तिप्रेम उपजेल. रामदास शेवटी म्हणतात आपणही त्या वानरासारखा भक्तिभाव धरून भक्तिप्रेमाचा निर्धार करूं की ज्यामुळे आपल्याला श्रीरामाच्या भेटीचा प्रसाद मिळेल.

अभंग--138

पूर्ण ब्रह्म होय गे । वर्णूं मी आतां काय गे नंद ज्याचा बाप त्याची । यशोदा ती माय रे क्षीरसागरवासी गे । लक्ष्मी त्याची दासी गे अर्जुनाचे घोडे धुतां । लाज नाही त्यासी ग अनाथाचा नाथ गे । त्याला कैसी जात गे चोख्यामेळ्यासंगें जेवी । दहीदूध भात गे नंदाचा जो नंद गे । सर्व सुखाचा कंद गे रामदास प्रेमें गाय । नित्य त्याचा छंद गे

भावार्थ--

जो केवळ पूर्णब्रह्म म्हणून ओळखला जातो त्याचे वर्णन शब्दांनी करणे शक्य नाही.नंदराजा त्याचे पिता आणि यशोदा माता आहे तो क्षीरसागरात रहात असून प्रत्यक्ष लक्ष्मीच्या स्वामी असूनही अर्जुनाचा सारथी बनून त्याच्या घोड्यांचा खरारा करतो त्यात त्याला कोणताही कमीपणा वाटत नाही.जातीपातीचा कोणताही भेद भाव न करता तो केवळ अनाथांचा नाथ आहे.तो चोखामेळ्या सारख्या आपल्या आवडत्या भक्ताबरोबर दही दूध भाताचे जेवण करतो. नंदाचा नंदन असून त्याच्या सर्व सुखाचा कंद आहे.संत रामदास म्हणतात आपणास त्याचा नित्य छंद असून त्याचे नाव आपण प्रेमाने गात असतो.

अभंग--139

वय थोडें ठाकेना तीर्थाटन । बुध्दि थोडी घडेना पारायण एका भावें भजावा नारायण । पुढें सहजचि सार्थकाचा क्षण दास म्हणे भजनपंथ सोपा । हळूहळू पावसी पद बापा कष्ट करुनी कायसा देसि धांपा । रामकृपेनें अनुभव सोपा

भावार्थ--

या अभंगात संत रामदास सांगतात की ,भक्तिभावाने नारायणाचे भजन करावे त्यामुळे जीवनाचे सार्थक करणारा क्षण सहज येतो.भजन पंथ हा आचरणास अगदी सोपा आहे.या मार्गाने गेल्यास यथावकाश मुक्ती सहज प्राप्त होते. असे म्हणतात बालवयात तीर्थयात्रा करणे शक्य नाही बुद्धी अल्प असल्याने धार्मिक ग्रंथांची पारायणे होऊ शकत नाहीत.या गोष्टींसाठी कष्ट करून मन व बुद्धी थकवण्यापेक्षा भजन मार्गाने गेल्यास राम कृपेचा सहजच अनुभव येतो.

अभंग--140

रामाची करणी । अशी ही पहा दशगुणें आवरणोदकीं । तारियली धरणी सुरवर पन्नग निर्मुनियां जग । नांदवी लोक तिन्ही रात्रीं सुधाकर तारा उगवती । दिवसां तो तरणी सत्तामात्रें वर्षति जलधर । पीक पिके धरणी रामदास म्हणे आपण निर्गुण । नांदे ह्रदयभुवनीं

भावार्थ--

या अभंगात संत रामदास श्रीरामाचे महात्म्य वर्णन करीत आहेत. समुद्राने वेढलेली धरणी श्रीरामाने तारली आहे. देव, मानव , पन्नग यांची निर्मिती करून स्वर्ग पृथ्वी पाताळ या तिन्ही लोकांचे पालन करीत आहेत. रात्री चंद्र तारे व दिवसा सूर्य आपल्या तेजाने प्रकट करीत आहेत. श्रीरामाच्या सत्तेने मेघ वर्षाव करतात व धरतीवर पिके पिकतात. संत रामदास म्हणतात असा हा निर्गुण परमात्मा सर्वांच्या ह्रदयांत नांदत आहे.

अभंग--141

कृपा पाहिजे । राघव कृपा पाहिजे मन उदासिन इंद्रियदमन । तरिच लाहिजे निंदक जनीं समाधानी । तरिच राहिजे दास निरंतर नीच उत्तर । तरिच साहिजे

भावार्थ--

या अभंगात संत रामदास राघवाची कृपा पाहिजे असे म्हणतात.मनातील विषय वासनांचा निरास होऊन मन उदासीन होण्यासाठी, इंद्रियांवर संयम ठेवून त्यांचे दमन करण्याची शक्ती येण्यासाठी,निंदा करणाऱ्या लोकांमध्ये राहून सुद्धा समाधानी वृत्तीने जगण्यासाठी, लोकांनी केलेली निंदा हेटाळणी सहन करण्याची सहनशीलता येण्यासाठी ,रामाची कृपा पाहिजे असे संत रामदास सांगतात.

अभंग--142

नामचि कारण रे । महाभय नामें निवारण रे नामें होय चित्त शुध्दि । नामें होय दृढ बुध्दि नामें महा दोष जाती । पुढें संताची संगति रामदास सांगे खूण । नाम सिध्दांचें साधन

भावार्थ--

संत रामदासांनी या अभंगात नामाचा महिमा सांगितला आहे. मृत्युचें महाभय निवारण करण्यासाठी,चित्त शुद्ध होऊन बुद्धी दृढ होण्यासाठी, संतांची संगती मिळवून महा दोषांचे निवारण होण्यासाठी नाम हेच एकमेव साधन आहे संत रामदास सांगतात की,रामनाम हे सिद्धांचे साधन आहे. अखंड रामनामाचा जप ही सिध्दांची खूण आहे.

अभंग--143

श्रीगुरुंचे चरणकंज हृदयीं स्मरावें निगमनिखिल साधारण । सुलभाहुनि सुलभ बहू इतर योग याग विषमपथीं कां शिरावें नरतनु दृढ नावेसी । बुडवुनी अति मूढपणें दुष्ट नष्ट सुकर-कुकर तनू कां फिरावें रामदास विनवि तुज । अझुनि तरी समज उमज विषयवीष सेवुनियां फुकट कां मरावें

भावार्थ--

या अभंगात संत रामदास गुरु भक्तीचा महिमा सांगताहेत. वेद ,वेदांत ,योग ,याग या कठीण मार्गांचा अवलंब करण्यापेक्षा अत्यंत सहज सोपा असा गुरु वचनावर दृढ विश्वास ठेवून,गुरु चरणांचा आश्रय घ्यावा. संसारसागर तरून जाण्यासाठी नरदेहाची बळकट नौका लाभली असताना मूर्खपणाने तिला विषय वासनेत बुडवून नीच योनींत जाण्याचा धोका पत्करू नये.संत रामदास विनंती करीत आहे की आपण हे समजून घेऊन त्याप्रमाणे वागले पाहिजे.

अभंग --144

त्रिविध तापहारक हे गुरुपाय ।भवसिंधूसि तारक हे गुरुपाय स्वात्मसुखाचें बीज हे गुरुपाय । ज्ञानाचें निजगुज हे गुरुपाय भक्तिपंथासि लाविती हे गुरुपाय ।नयनिं श्रीराम दाविती हे गुरुपाय सहज शांतीचें आगर हे गुरुपाय ।सकल जीवासी पावन हे गुरुपाय

भावार्थ

आध्यात्मिक ,आधिभौतिक, आधिदैविक या त्रिविध तापां पासून सुटका करणारे ,संसार सागरातून तारून नेणारे हे गुरुचरण आहेत.गुरु चरण हे आत्मसुखाचे बीज असून ज्ञानाचे भांडार आहे.साधकांना भक्ती पंथाला लावणारे, डोळ्यांना श्रीरामाचा साक्षात्कार घडवणारें गुरुचरण शांतीचे आगर व कृपेचे सागर आहेत.सकल जीवांना पावन करणारे गुरुचरण रामदासांचे जीवन आहे ,असे संत रामदास म्हणतात.

अभंग--145

आतां तरी जाय जाय जाय । धरिं सद्गुरुचे पाय संकल्प विकल्प सोडूनि राहें । दृढ धरुनियां पाय पाय पाय नामस्मरण ज्या मुखीं नाहीं । त्याणें वांचुनी काय काय काय मानवतनु ही नये मागुती । बरें विचारुनि पाहें पाहें पाहें आत्मानात्म विचार न करितां व्यर्थ प्रसवली माय माय माय सहस्र अन्याय जरी त्वा केले । कृपा करिल गुरुमाय माय माय रामदास म्हणे नामस्मरणें । भिक्षा मागुनि खाय खाय खाय

भावार्थ--

ज्यांच्या मुखात राघवाच्या नामाचा जप नाही त्याचे जीवन व्यर्थ होय.मानव जन्म हा परत परत मिळणार नाही तो दुर्लभ आहे. या जन्मात आत्मा व अनात्मा अविनाशी व विनाशी यांचा विचार केला नाही तर हा जन्म मातेला कष्ट देणारा, व्यर्थ ठरतो. साधकाचे हजार अपराधांना गुरुमाऊली क्षमा करते व त्याच्यावर कृपा करते. नामस्मरण करून भिक्षा मागून खाल्याने सुद्धा जीवनाचे सार्थक होईल असे संत रामदास सांगतात. आत्‍ताच बोध घेऊन मनातील सर्व भेदाभेद ,संशय ,संकल्प-विकल्प यांचा त्याग करून गुरुंना शरण जावे, त्यांचे पाय धरावे

अभंग--146

करीं सीताराम मैत्र । होईल देह तुझा पवित्र वरकड भिंतीवरील चित्र । का भुललासी कांरे बैसलास निश्चळ । करशिल अनर्थास मूळ सांडुनी विश्रांतीचे स्थळ कां भुललासी मुख्य असू द्यावी दया । नाहीतर सर्व हि जाईल वायां मिठी घाली रामराया । कां भुललासी करशिल डोळ्याचा अंधार । पाहें जनासी निर्वैर सांडीं धन संपत्तीचे वारें । कां भुललासी रामदासाचें जीवन । तू कां न करिसी साधन राम तोडिल भवबंधन ।कां भुललासी

भावार्थ--

या अभंगात रामदास सितारामशी सख्य म्हणजे मैत्री जोडण्यास सांगत आहेत .त्यामुळे साधकाचा देह पवित्र होईल असे ते म्हणतात.बाह्यजगातील कल्पनेच्या चित्रांना भुलून निश्चल बसणे हे अनर्थाचे मूळ आहे.रामचरण हे अंतिम विश्रांतीचे ठिकाण आहे.धन संपत्तीचा मोह सोडून देऊन कुणाशीही वैरभाव न ठेवता दया पूर्ण व्यवहार असावा, नाहीतर या सर्व गोष्टी वाया जातील. श्रीराम हे रामदासांचे जीवन आहे त्यासाठी साधना केल्यास श्रीराम हे संसाराचे बंधन तोडून टाकतील.

अभंग--147

सुखदायक गायक नेमक साधक तो असावा हरिभक्त विरक्त संयुक्त विवेकी तो भजावा

भावार्थ--

सुरेल सुखदायक गायन करणारा गायक , अखंडपणे साधना करणारा साधक, विवेक आणि वैराग्य असलेला हरिभक्त यांचे भजनी लागावे असे संत रामदास या अभंगात सांगतात.

अभंग--148

प्रपंच दु:खाचा द्रुम । वाढला चुंबित व्योम तेथें पाहती संभ्रम । सुखाची फळें सदा फळ आभासे । पाड लागला दिसे परि तो निष्फळ भासे ।पाहतां देठी तयावरी दोनी पक्षी ।एक उदास उपेक्षी येर तो सर्वत्र भक्षी । परि न धाये सेवितां तयाची छाया । तापली परम काया तरी ही बैसती निवाया । आत्मरुप प्राणी रामी रामदासी लक्ष । तोचि जाला कल्पवृक्ष सेवी सज्जन दक्ष । स्वलाभे पूर्ण

भावार्थ--

प्रपंच हा दुःखाचा झपाट्याने वाढणारा गगनचुंबी वृक्ष आहे. त्याला सुखाची फळे लागतील हा केवळ भ्रम आह. त्यावर फळे आल्याचा भास निर्माण होतो ती पाडाला लागली आहेत असेही वाटते.परंतु मुळात बघितले तर तो निष्फळ आह. या झाडावर दोन पक्षी वस्ती करून आहेत. एक अत्यंत उदासीन असून पूर्णपणे निरपेक्ष आहे. दुसरा पक्षी कडू-गोड सर्वच फळे सेवन करतो व त्याचे कशानेच समाधान होत नाही. या वृक्षाच्या सावलीचा आश्रय घेणारे दुःखाने होरपळून निघतात. तरीही आत्मरूप प्राणी त्याचा निवारा शोधतात.संत रामदास म्हणतात या वृक्ष संत जणांसाठी तो कल्पवृक्ष होतो व त्यांना त्याचा पूर्ण लाभ मिळतो.

अभंग--149

ज्ञान पवाड पवाड गगनाहुनी वाड । मुक्ति जाड रे जाड रे अत्यंतचि जाड भक्ति गोड रे गोड रे मुक्तिहुनी गोड। पुरे कोड रे कोड रे नाही अवघड दास म्हणे रे म्हणे रे दास्यत्व करावें। भक्तियोगे रे योगे रे जन उध्दरावे दया देवाची देवाची सर्वत्रीं पुरावें वृत्ति संमंधें संमंधें कांहींच नुरावें

भावार्थ--

अज्ञान हे आकाशासारखे असीम ,अनंत आहे.मुक्ती अतिशय बळकट आहे पण भक्ति ही मुक्तीपेक्षा गोड आहे. अत्यंत सहज साध्य व सर्व अपेक्षा पूर्ण करणारी आहे संत रामदास म्हणतात ,श्री रामाचे दास्यत्व करावे आणि भक्ती भावाने लोकांचा उद्धार करावा.देवाची दया सर्वांना मिळावी कुणीही उपेक्षित राहू नये.

अभंग--150

नाना पिकाची भोय । वाहिल्याविण जाय शोधल्याविण उपाय । व्यर्थचि होय नाना औषधें घेतो । पथ्य न करितो तैसा वचनें करितो । परि वर्तेना तो रामदास म्हणे । भीकचि मागणें आणि वैभव सांगणें । तैसें बोलणें

भावार्थ-- पीक येण्यासाठी बी पेरले पण त्याची योग्य निगराणी केली नाही तर सर्व काही व्यर्थ जाते. रोग निवारण्यासाठी अनेक औषधे घेतली परंतु पथ्य सांभाळले नाही त्याप्रमाणेच स्वतःच्या वैभवाच्या गोष्टी बोलणारा भीक मागून जगू लागला. संत रामदास म्हणतात प्रत्यक्ष करणे शिवाय बोलणे व्यर्थ आहे. उपाय शोधल्याशिवाय सर्व प्रयत्न वाया जातात.

अभंग--151

जना जन पाळिताहे वृध्दा बाळपण बाळा वृध्दपण । अंतर शोधुनि पाहें श्रेष्ठ कनिष्ठा कनिष्ठ श्रेष्ठां । उसिणें फिटत जाय जग जगाचें जीवन साचें । कर्ता तो करिताहे एका पाळितो पाळुनि घेतो । दोंहिकडे फिरताहे अंतरवासी देव विलासी । दास समजत राहे

भावार्थ--

या अभंगात संत रामदास जगरहाटी बद्दल बोलत आहेत. जीवनात वार्धक्यामुळे शक्तीचा ह्रास होतो व त्यांना बालकासारखे काहीसे परावलंबित्व येते.बालपणातून तारुण्यात कडे जाताना शक्तीची वृद्धी होते व पुढे परत वृद्धपण.अशाप्रकारे श्रेष्ठाला कनिष्ठ पणा व कनिष्ठाला श्रेष्ठपणा प्राप्त होतो.

अभंग--152

काय पाहों मी आतां । रुप न दिसे पाहतां खूण न ये सांगतां रे रामा दृश्य पाहतां डोळा । वाटतो सोहळा त्याहूनि तू निराळा रे रामा ज्ञान हातासी आलें । त्याचें विज्ञान जाले तेंहि नाहीं राहिलें रे रामा दासें घेतली आळी । पावावें ये काळीं सगुणरुपें सांभाळीं रे रामा

भावार्थ--

या दृश्य जगाच्या सोहळा पहाताना वाटते की,राम याहून वेगळा आहे.असे ज्ञान झाल्यानंतर विचारांती ज्ञानाचे विज्ञान झाले पण तेही पंचभौतिक विश्वांत विलीन झाले. संत रामदास म्हणतात आता श्री रामांनी कृपा करावी व आपणांस सगुण रूपात दर्शन द्यावे.

अभंग--153

चालत नाहीं बोलत नाहीं । हालत नाहीं तो निरंजन दिसत नाहीं भासत नाहीं । नासत नाहीं तो निरंजन करीत नाहीं धरीत नाहीं । हरीत नाहीं तो निरंजन नामचि नाहीं रुपचि नाहीं । चंचळ नाहीं तो निरंजन निर्मळ जो तो निश्चळ जो तो । दासचि होतो तो निरंजन

भावार्थ--

या अभंगात संत रामदास निरंजनाच्या स्वरुपाचे वर्णन करीत आहेत.न चालणारा, न बोलणारा ,न हलणारा, डोळ्यांना न दिसणारे असे निरंजनाचे स्वरूप आहे.ज्याला नाम नाही जो निराकार आहे निर्मळ असून तो निश्चळ आहे. जो सर्व काही करीत असूनही अकर्ता आहे. सर्वसत्ताधीश असूनही केवळ साक्षीरूपाने आहे असे सर्वस्वी निरपेक्ष उदासीन वृत्तीने रामरुपाशीं एकरूप झालेले रामाचे दास हे निरंजनाचे स्वरूप आहे.

अभंग--154

देखिला रे देव देखिला रे । ज्ञानें भक्तिचा रस चाखिला रे विश्वामध्यें विस्तारला । भावें भक्तांसी पावला भक्तिलागीं लांचावला । भक्ता पद देतसे जगामध्यें आहे ईश । म्हणोनि बोलिजे जगदीश जयाचेनि सुंदर वेश । नाना रुपें शोभती जनीं श्रोता वक्ता होतो । तोचि देखतो चाखतो वृत्ती सकळांच्या राखतो। मनीं मन घालुनी ज्ञानी ज्ञाने विवरला । एक त्रैलोक्यीं पुरला धन्य धन्य तो एकला । नाना देह चाळवी सर्व करितो दिसेना । एके ठायी हि वसेना जवळीच निरसेना । दास म्हणे तो गे तो

भावार्थ--

संत रामदास म्हणतात आज ज्ञानाने भक्तीचा रस चाखला कारण देव भक्तांच्या भक्तीभावाला पावला व विश्वातील सर्व ठिकाणी स्वरूपानें विलसू लागला. भक्तिप्रेमामुळे वेडा होऊन त्याने स्वपद भक्तांना अर्पण केले.जगात राहणारा ईश म्हणजे जगदीश. या देवानें अनेक रूपे, अनेक वेष धारण केले.जनांमध्ये बसून ऐकणारा श्रोता तोच असतो आणि बोलणारा वक्ता ही त्याचेच रूप.तो अनेक गोष्टी बघतो आणि अनेकविध पदार्थांचा रस चाखतो. सर्वांच्या अंतरंगात प्रवेश करून त्यांच्या वृत्तींशी एकरूप होतो . स्वतःच ज्ञानेश्वर बनून ज्ञानाचे विवरण करतो.एकटा असूनही सर्व देहांना आत्मरूपाने चालवतो.सर्व काही

करीत असूनही एका स्थळी  दिसत नाही रामदास म्हणतात तोच तो आज देवरुपाने आपल्याला दिसला.

अभंग--155

सर्वा अंतरीं आत्माराम । विश्रामधाम मध्यें आडवा आला भ्रम । देहसंभ्रम यम नियम दम । नित्य प्राणायाम आगमनिगम । संतसमागम ठायी पडेना वर्म । उभे राहिलें कर्म सदा नित्य नेम । वाची सहस्रनाम दास म्हणे राम । आहे पूर्ण काम

भावार्थ--

सर्वांच्या अंतर्यामी असणारा आत्माराम हा सर्व जीवांचे विश्रांतीचे स्थान आहे असे असूनही देहबुद्धी मुळे मनामध्ये संशय विकल्प निर्माण होऊन या विश्वासाला तडा जातो. माणूस यम,नियम प्राणायाम या साधनेच्या मागे लागतो. वेद,पुराणे ,संतवचने यातून वर्म शोधण्याचा प्रयत्न करतो. काही वेळा कर्मकांडांचा आश्रय घेतो.अनेक प्रकारच्या उपासना ,उपास-तापास ,व्रते करतो विष्णुसहस्त्रनाम तर कोणी शिवलीलामृताची पारायणे करतो.संत रामदास म्हणतात श्रीराम हे सर्व कामना पूर्ण करणारे आहेत.

अभंग --156

संसारीं संतोष वाटला । देव भेटला, मोठा आनंदु जाला सुखसागर उचंबळे । जळ तुंबळे, दु:खसिंधु निमाला सेवकासी ज्ञान दीधलें । काम साधलें देवदर्शन जालें आत्मशास्त्रगुरुप्रत्ययें । शुध्द निश्चयें ऐसें प्रत्यया आलें देवचि सकळ चालवी । देह हालवी, अखंडिताची भेटी उत्तम सांचला संयोग । नाहीं वियोग, अवघ्या जन्माशेवटीं दास म्हणे दास्य फळलें । सर्व कळले,ज्ञानें सार्थक जालें सार्थकचि जन्म जाला । मानवी भला ,परलोकासी नेला

भावार्थ--

या अभंगात रामदास म्हणतात भक्ताला देव दर्शनाचा लाभ झाला.त्याला ज्ञानाचा लाभ झाला. कामना पूर्ण झाली. गुरू वचनाचा प्रत्यक्ष अनुभव आला. आत्माराम अंतर्यामी राहून हा देह चालवतो असा दृढ निश्चय झाला. जीवा शिवाची अखंड भेट झाली.त्याचा वियोग कधीच संभवत नाही.संत रामदास म्हणतात देव भेटल्यामुळे मनाला संतोष वाटला. दुःख पूर्णपणे विलयास गेले.आनंद सुख सागर उचंबळून आला.आत्तापर्यंतच्या सेवेचे उत्तम फळ मिळाले. आत्मज्ञाना मुळे जन्माचे सार्थक झाल. इहलकी व परलोकी कल्याण झाले.

अभंग--157

होते वैकंठीचे कोनीं । शिरले अयोध्याभुवनी लागे कौसल्येचे स्तनीं । तेंचि भूत गे माय जातां कौशिकराउळीं । अवलोकिली भयंकाळीं ताटिका ते छळूनि मेली । तेंचि भूत गे माय मार्गी जातां वनांतरीं । पाय पडला दगडावरी पाषाणाची जाली नारी । तेंचि भूत गे माय जनकाचे रंगणीं गेलें । शिवाचें धनु भंगिलें वैदेही अंगीं संचरलें । तेंचि भूत गे माय जेणें सहस्त्रार्जुन वधिला । तोहि तात्काळचि भ्याला धनु देऊनि देह रक्षिला । तेंचि भूत गे माय पितयाचे भाकेसी । कैकयीचें वचनासी चौदा संवत्सर तापसी । अखंडवनवासी सांगातीं भुजंग पोसी । तेंचि भूत गे माय सुग्रीवाचें पालन । वालीचें निर्दालन तारी पाण्यावरी पाषाण । तेंचि भूत गे माय रक्षी भक्त बिभीषण । मारी रावण कुंभकर्ण तोडी अमरांचें बंधन । तेंचिभूत गे माय वामांगीं स्त्रियेसी धरिलें। धावूनि शरयूतीरा आलें तेथें भरतासी भेटलें । तेंचि भूत गे माय सर्व भूतांचें हृदय । नांव त्याचें रामराय रामदास नित्य गाय । तेंचि भूत गे माय

भावार्थ--

वैकुंठवासी विष्णूंनी त्रेतायुगात श्री रामाचा अवतार घेतला. कौसल्या राणीच्या पोटी राम जन्म झाला. विश्वामित्र ऋषींच्या आज्ञेवरून ताटकेचा त्याने वध केला.वनामध्ये मार्गक्रमण करताना गौतम ऋषींची पत्नी अहिल्या, तिचा उद्धार केला.जनक राजाच्या नगरीत शिवधनुष्याचा भंग करून जानकीला स्वयंवरात वरले. पराक्रमी परशुरामाने सहस्त्रार्जुनाचा वध केला पण श्रीरामाला घाबरून धनुष्य देऊन आपल्या प्राणांचे रक्षण केले. आपला पिता ,राजा दशरथाला कैकयीच्या वचनातून मुक्त करण्यासाठी वनवास पत्करला.14 वर्षे शेषावतार लक्ष्मणाबरोबर वनवास भोगला.सुग्रीवाला न्याय देण्यासाठी वालीचा वध केला. सागरावर पाषाण टाकून सेतू बांधून लंकेत प्रवेश करून,रावण, कुंभकर्णाला मारून देवांना बंधनातून मुक्त केले बिभिषणाचे रक्षण करून लंकेचे राज्य त्याला परत दिले.अयोध्येस परत येऊन भरताला भेटले.रामायणातील या सर्व घटनांचा उल्लेख करून संत रामदास म्हणतात सर्व प्राण्यांचे हृदय त्याचे नाव रामराव. म्हणजेच रामदासांचा स्वामी आत्माराम.

अभंग--158

आम्ही काय कुणाचें खातो तो राम आम्हांला देतो बांधिले घुमट किल्ल्याचे तट ।तयाला फुटती पिंपळवट नाहीं विहीर आणि मोट । बुडाला पाणी कोण पाजीतो खडक फोडितां सजिव रोडकी । पाहिली सर्वांनीं बेडकी सिंधु नसतां तियेचें मुखीं । पाणी कोण पाजीतो नसतां पाण्याचे बुडबुडे । सदासर्वदा गगन कोरडें दास म्हणे जीवन चहुकडे । घालुनी सडे पीक उगवीती

भावार्थ--

देवळाचे घुमट, किल्ल्याचे तट येथे पिंपळाचे रोपटे उगवतात.तेथे पाण्याची विहीर मोट नसताना त्यांना पाणी मिळते.खडक फोडताना आत मध्ये जिवंत बेडकी दिसते. तिच्या मुखात पाणी कोण घालतो.आकाशात पाण्याचे बुडबुडे कधी दिसत नाही ते कोरडे असूनही चहूंकडे पाण्याचे सडे घालून पिक उगवतं.संत रामदास म्हणतात ही सगळी रामाची किमया आहे. श्रीराम सर्वांना अन्नपाणी पुरवतो.

अभंग--159

आम्हा तुम्हा मुळीं जाली नाही तुटी तुटीविण भेटी इच्छितसां सर्वकाळ तुम्ही आम्ही एके स्थळीं वाया म़गजळीं बुडों नये जवळीच आहे नका धरुं दुरी बाह्य अभ्यंतरीं असोनियां लावू नये भेद मायिकसंबंधीं रामदासीं बोधीं भेटी जाली

भावार्थ--

संत रामदास म्हणतात देव भक्तांची कधी ताटातूट होत नाही तेव्हां भेट होण्याचा प्रश्नच नाही. सर्वकाळ देव आणि भक्त एकाच ठिकाणी असताना भेटीसाठी तळमळणे म्हणजे मृगजळाच्या पाण्यात बुडण्याची कल्पना करण्यासारखे आहे. भक्ताच्या मनात आणि जनात देवच भरून राहिलेला आहे देवाने आपल्याला दूर करू नये अशी विनंती संत रामदास आपल्या स्वामीला करतात.

अभंग--160

माझी काया गेली खरें । मी तों आहे सर्वांतरें ऐका स्वहित उत्तरें । सांग़इन राहा देहाच्या विसरें । वर्तो नका वाईट बरें तेणें भक्तिमुक्तिची द्वारें । चोजवती बुध्दि करावी स्वाधीन । मग हें मजूर आहे मन हेंचि करावें साधन । दास म्हणे

भावार्थ--

आपण देहाने जरी हे जग सोडून गेलो तरी सर्वांच्या अंतरात राहून हिताचे बोल सांगत राहीन असा दिलासा संत रामदास आपल्या शिष्यांना देत आहेत. देहबुद्धी सोडून देऊन आत्म बुद्धीने वागावे त्यामुळे भक्ती मुक्तीची दारे उघडतात.बुद्धी जेव्हा स्वाधीन होते तेव्हा मन बुद्धीची चाकरी करू लागते. हे साधन करावे असे संत रामदास म्हणतात.

अभंग--161

सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझें कारणीं देह माझा पडावा उपेक्षू नको गूणवंता अनंता रघूनायका मागणें हें चि आतां

भावार्थ--

हा शेवटचा अभंग म्हणजे संत रामदासांनी केलेली रघुनायका ची प्रार्थना आहे. चारच छोट्या ओळींची ही प्रार्थना मन आकर्षित करते. सदा सर्वदा आपणांस रामाचा योग घडावा ,रामाचा कार्यासाठी हा देह कारणी लागावा, गुणवंत अनंत राधवानें आपली उपेक्षा करू नये हे एकच मागणे ते रघुनायका कडे मागतात.

अभंग ---162

दृढ होतां अनुसंधान । मन जाहलें उन्मन पाहों जातां माया नासे ।द्वैत गेलें अनायासें होतां बोधाचा प्रबोध । जाला शब्दाचा नि:शब्द ज्ञान विज्ञान जाहलें ।वृत्ति निवृत्ति पाहिलें ध्यानधारणेची बुध्दि । जाली सहजसमाधि रामरामदासी वाच्य । पुढें जालें अनिर्वाच्य

भावार्थ ---

रामचरणाशी मन एकाग्र होतांच मनाचे उन्मन होते म्हणजेमन अधिक उन्नत होते .मी तू पणा विलयास जातो.संसाररुपी माया विरून जाते. मनाला झालेल्या ज्ञानाचे अनुभवात रुपांतर होते पण त्या अनुभवाचे वर्णन करण्यास शब्दच सापडत नाही.ज्ञानाचे विज्ञान होऊन वृत्तिची निवृत्ति होते.ध्यानधारणेची पुढील पायरी म्हणजे सहज समाधी अवस्था प्राप्त होते.संत रामदास म्हणतात कीं, जे बोलून व्यक्त करायचे ते पुढे अनिर्वाच्य होते.रामरुपाशी एकरूप होण्याचा हा अनुभव शब्दांनी व्यक्त करता येत नाही.

अभंग--163

ज्ञानेविण जे जे कळा । ते तें जाणावी अवकळा ऐसें भगवंत बोलिला ।चित्त द्यावें त्याच्या बोला एक ज्ञानची सार्थक । सर्व कर्म निरर्थक दास म्हणे ज्ञानेविण ।प्राणी जन्मला पाषाण

भावार्थ---

या अभंगात संत रामदास ज्ञानाची महती सांगत आहेत.ज्ञानाशिवाय जे जे प्रयत्न ते सर्व विफल होत,असे प्रत्यक्षभगवंतांनी सांगितले आहे आणि हे बोल चित्तात धारण केलेपाहिजे.ज्ञानामुळे सर्व कर्माचे सार्थक होते, त्या शिवाय सर्वनिरर्थक होय.संत रामदास म्हणतात ज्ञानविहीन प्राणी म्हणजे केवळ पाषाण होय.

अभंग ---164

पतित म्हणिजे वेगळा पडिला । पावन तो जाला एकरुप एकरूप देव अरूप ठायींचा । तेथें दुजा कैंचा कोण आहे कोण आहे दुजा स्वरूपीं पाहतां । विचारें राहतां सुख आहे सुख आहे मूळ आपुलें शोधितां। मनासी बोधितां रामदास

भावार्थ---

रामापासून जो अलग झाला तो पतित व परमात्याशी जो एकरूप झाला तो पावन झाला.म्हणुनच परमात्म्याला पतितपावन म्हणतात.देव आणि भक्त जेव्हां एकरूप होताततेव्हां तेथे दुजेपणाचा लोप होतो.देव हे भक्ताचे मूळ स्वरूपआहे या विचारांत सतत रममाण होऊन राहणे यातच खरे सख आहे.आपण कोठून आलो व आपल्या जीवनाचे प्रयोजनकाय याचा बोध करुन घेण्यातच आपल्या जीवनाचे सार्थक आहे असे संत रामदास स्वप्रचिती घेऊन सांगत आहेत.

अभंग---165

ज्याचेनि जितोसी त्यासी चुकलासी । व्यर्थ कां जालासी भूमिभार भूमिभार जिणें तुझें गुरूविणे। वचनें प्रमाणें जाण बापा जाण बापा गुरूविण गति नाहीं । पडसी प्रवाहीं मायाजाळीं मायाजाळी व्यर्थ गुंतलासी मूढा । जन्मभरी ओढा ताडातोडी कांही ताडातोडी काही राम जोडी। आयुष्याची घडी ऐसी वेंचीं ऐंसी वेंचीं बापा आपुली वयसा । दास म्हणे ऐसा काळ घाली

भावार्थ----

संत रामदास या अभंगात सद्गुरूचा महिमा वर्णन करीतआहेत.ज्याच्यामुळे हा जीवन प्रवाह सुरळीत चालला आहे त्याचेच स्मरण करायला विसरणे म्हणजे जीवन व्यर्थ घालवणे होय.भूमिभार होऊन जगणे आहे.गुरूकृपेशिवायजीवन निरर्थक आहे हे वचन प्रमाणभूत आहे.सद्गुरूशिवायजीवनाला गती नाही कारण संसाराच्या मायारूपी बंधनापासून सुटण्याचा गुरूकृपा हाच एक मार्ग आहे.याचाविचार न करता आपण अविचाराने या मायाजाळांत गुंतून पडतो आणि सगळा जन्म ओढाताणित व्यर्थ घालवतो.कांहीकाळ संसारातिल कर्तव्य व कांही वेळ रामभजनी लावावाव मानव जन्माचे सार्थक करावें असे संत रामदास सांगतात.

अभंग ---166

विषयीं विरक्तपण इंद्रियेनिग्रहण गुरूकृपे वांचुनि नव्हे नव्हे चंचळपणें मन न करी विषयध्यान । गुरूकृपे वांचुनि नव्हे नव्हे बुध्दि बोधक जाण ब्रह्मानुभव पूर्ण । गरुकृपे वांचुनि नव्हे नव्हे भक्तिज्ञानपूर्ण सप्रेम संपूर्ण । गुरूकृपे वांचुनि नव्हे नव्हे रामीरामदास म्हणे निर्गुणसुख लाधणे। गुरूकृपे वाचुनि नव्हे नव्हे

भावार्थ ----

इंद्रियांवर निग्रहाने संयम मिळवून त्यांना विषयांपासून विरक्त करणे,मनाचा चंचलपणावर मात करून त्याला विषयाचे ध्यान करण्यापासून परावृत्त करणे,बुध्दी परमात्मस्वरुपाचा बोध करवणारी असून तिच्या सहाय्याने परब्रह्माचा अनुभव घेणे,सप्रेम भक्ति,ज्ञान,वैराग्य या सर्वांचा पारमार्थिक लाभ होण्यासाठी सद्गुरूंच्या कृपाप्रसादाचीनितांत गरज असते.संत रामदास म्हणतात सत्व,रज,तम या त्रिगुणांच्या पलिकडे जाऊन निर्गुणसुख लाभणे केवळ गुरूकृपेनेच शक्य होईल.

अभंग---167

सगुण हा देव धरावा निश्चित । तरी नाशवंत विश्व बोले विश्व बोले एका भजावें निर्गुण । परी लक्षवेना काय कीजे काय किजे आतां निर्गुण दिसेना । सगुण असेना सर्वकाळ सर्वकाळ गेला संदेहीं पडतां । कोणे वेळे आतां मोक्ष लाभे मोक्ष लाभे एका सद्गुरूवचनें । आत्मनिवेदनें रामदासीं

भावार्थ---

या अभंगात संत रामदास साधकाच्या मनातिल संदेह वत्यावरील उपाय सांगत आहेत. सगुणाची उपासना करावी असा निश्चय साधक मनोमन करतो परंतू परमेश्वराचे सगुणरूप नाशवंत असून त्याची उपासना करण्यापेक्षा निर्गुणाचीउपासना करावी,त्याचे भजन करावे असे मत लोक बोलून दाखवतात त्या मुळे साधक द्विधा मनस्थितीत सापडतो.निर्गुणाचे भजन करावे तर ते रूप डोळ्यांना प्रत्यक्ष दिसत नाही आणि सगुणरूपही सदासर्वकाळ दिसत नाही तरकाय करावे या संभ्रमात सर्वकाळ निघून जातो आणि आतां केव्हां मोक्ष मिळेल अशी विवंचना मनाला ग्रासून टाकते.संतरामदास म्हणतात एका सद्गुरूवचनावर पूर्ण विश्वास ठेवून,संपूर्ण शरणागती पत्करून आत्मनिवेदन भक्तीने परमेश्वरचरणी लीन होऊन मोक्ष मिळवावा.

अभंग ---168

गरुविण प्राणी त्या होय जाचणी । सत्य माझी वाणी मिथ्या नव्हे मिथ्या नव्हे सत्य सांगतो तुम्हाला अंती यमघाला चुकेना की चुकेना की यमयातना या जना । वेगीं निरंजना ठाईं पाडा ठाई पाडा वेगीं निरंजन । लावा तनमन सद्गुरूसी सद्गुरूची नाहीं जयाला ओळखी तया झोंकाझोंकी यातनेची यातनेची चिंता चुके एकसरी । वेगीं गुरू करी दास म्हणे

भावार्थ---

संत रामदास या अभंगात प्रतिज्ञेवर सांगतात की, गुरूशिवाय कोणत्याही माणसाला यमयातना चुकवता येणार नाहीत.निरंजन परमेश्वराची प्राप्ती सद्गरूशिवाय शक्य नाही . यासाठी तनमनधनाने सद्गुरूची उपासना केली पाहिजे.सद्गुरूकृपेने यमयातनेची चिंता तात्काळ निरसून जाईल यासाठी संत रामदास लवकरात लवकर गुरूचरणांचा आश्रय घेण्यास सांगत आहेत।

अभंग---169

आमुचा तो देव एक गुरूराव । द्वैताचा तो ठाव नाहीं जेथें गुरूने व्यापिले स्थिर आणि चर । पहा निर्विकार कोंदलासे रामीरामदास उभा तये ठाई। माझी रामाबाई निर्विकार

भावार्थ----

या अभंगात संत रामदास आपले सद्गुरू श्री रामाचा महिमासांगत आहेत.आपले सद्गुरू श्रीराम हे एकमेव अद्वितियअसून तेथे द्वैताला जागाच नाही.त्यांनी सर्व चराचर व्यापले असून त्यांत ते निर्विकारपणे सामावले आहेत.संत रामदासम्हणतात आपण श्रीरामांच्या निराकार स्वरूपाशी एकरूपझाले आहोत.

अभंग---170

श्रीगुरूकृपाज्योती ।नयनीं प्रकाशली अवचिती तेथे कापूस नाही वाती । तैलविण राहिली ज्योती नाहीं सम ई दिवे लावणे । अग्निविण दीप जाणे रामीरामदास म्हणे । अनुभवाची हे खूण

भावार्थ--- संत रामदास म्हणतात, श्रीकृपेची ज्योती माझ्या लोचनांत अचानक प्रकाशित झाली.कापूस,वाती आणि तेलाशिवायतेवणारी ही असामान्य ज्योती आहे.दिवा व अग्नीशिवाय प्रकाश देणारी ही कृपेची ज्योत म्हणजे दैवी अनुभवाची खूण आहे.

अभंग---171

त्रिभुवनासी क्षयरोग । एक सद्गुरू आरोग्य जे जे तया शरण गले ।ते ते आरोग्य होऊनि ठेले शरण रामी रामदास ।क्षयातीत केलें त्यास

भावार्थ--- संत रामदास म्हणतात स्वर्ग,पृथ्वी,नरक या तिनही भुवनांना क्षयरोगाची बाधा आहे.हे सर्व विश्व नाशवंत आहे.केवळ आपले सद्गुरू हे परमेश्वरी तत्व अविनाशी आहे.जे जे या अविनाशी तत्वाला शरण गेले त्या परमेश्वरी तत्वाशी एकरूप झालें तेच केवळ शाश्वत झाले.राम चरणाशी शरण जाऊन रामदास क्षयातीत झाले.

अभंग---172

ब्रम्हांडचि तीर्थ जालें ।जयाचेनी एका बोलें ।। सद्गुरूची पायवणी ।सकळ तीर्था मुकुटमणी ।। रामीरामदास म्हणे । महिमा धाता तोही नेणें ।।

भावार्थ--- संत रामदास म्हणतात,ज्याच्या केवळ एका वचनाने सर्व ब्रम्हांडाचे तीर्थक्षेत्र बनले त्या आपल्या सद्गुरूचा चरणस्पर्श सकळ तीर्थाचा मुकुटमणी आहे.जो साधक त्यांचा महिमा जाणून घेईल त्यालाच हे समजून येईल.

अभंग---173 एक हेंअनेक, अनेक जें एक । अनुभवीं देख स्वानुभव ।। कोठुनिया जालें कैसे आकारलें । वेदी वर्णियेलें ज्ञानकांडी ।। तें गुज सद्गुरूकृपे कळों आलें । दास म्हणे जालें ब्रह्मरूप ।।

भावार्थ---

हे अनेकरुपी विश्व एकाच चैतन्य तत्वातून साकारले आहे.विश्वाचे हे अनेकत्व एकाच परमात्म्याचे प्रतिबिंब आहे.ही आत्मप्रचितिची ,स्वानुभवाची गोष्ट आहे.हे आत्मतत्व कोठून व कसे आकारास आले याचे वर्णन वेदांच्या ज्ञानकांडात केलेले आहे संत रामदास म्हणतात, हे रहस्य सद्गुरूकृपेमुळे समजून येते.

अभंग---174 एक तो गुरू दुसरा एक सद्गुरू सद्गुरूकृपेवाचुनि न कळे ज्ञानविचारू पारखी नेणती ज्ञानी ओळखती । गुरू केला परि ते नाहीं आत्मप्रचिति म्हणोनि वेगळा सद्गुरू निराळा । लक्षांमध्यें कोणी एक साधु विरळा सद्य प्रचीति नसतां विपत्ति । रामदास म्हणे कैसी होईल रे गति

भावार्थ--- संत रामदास म्हणतात,गुरू अनेक प्रकारचे असतात पण सद्गुरू एखादाच असतो.सद्गुरूवाचुन ज्ञानविचार समजत नाही.ज्या प्रमाणे खरा रत्नपारखीच रत्नाची खरी पारख करू शकतो त्या प्रमाणे गुरू केला म्हणजे आत्मप्रचिति येत नाही.लक्ष साधुंमध्ये एखादाच सद्गुरू असतो जो आत्मप्रचिति देऊ शकतो.आत्मप्रचिति नसलेला साधक संकटांत सापडतो.त्याला सद्गती म्हणजे मोक्षलाभ होऊ शकत नाही.

अभंग---175 सद्गुरू लवकर नेती पार ।। थोर भयंकर दुस्तर जो अति। हा भवसिंधु पार ।। षड्वैय्रादिक क्रुर महामीन । त्रासक हे अनिवार ।। घाबरला मनिं तीव्र मुमुक्षु । प्रार्थित वारंवार ।। अनन्यशरण दास दयाघन । दीनजनां आधार ।।

भावार्थ---

हा संसार सागर पार करून जाण्यास अत्यंत कठिण आहे.या भव सागरांत मद,मोह,लोभ,मत्सर या सारखे अत्यंत दुष्ट असे भयानक मासे आहेत,ते अनिवार त्रास देणारे आहेत.त्या षड्ररिपुंना मोक्षाची ईच्छा करणारा साधक अतिशय घाबरून सद्गुरूंची वारंवार प्रार्थना करु लागतो.अशा वेळीं सद्गुरू साधकाला मदत करून भवसिंधुपार नेतात.अनन्यशरण अशा दासाला दीनजनांचा आधार असलेले करुणामय सद्गुरूच वाट दाखवतात.

अभंग---176

तुजविण गुरूराज कोण प्रतीपाळी । मायबाप कामा न ये कोणी अंतकाळीं जळाविण तळमळित जसा मीन शुष्क डोहीं । तुजविण मज वाटे तसें धांव लवलाही चकोरचंद्रन्याय जसा गाय माय बाळा । पाडसासी हरिणी जसी तेंवि तूं कृपाळा रामदास धरूनी आस पाहे वास दिवसरात । खास करिल काळ ग्रास, ध्यास हा मानसी

भावार्थ--- या अभंगात संत रामदास सद्गुरूचा धावा करीत आहेत.ते म्हणतात,अंतकाळीं जन्मदाते मायबाप कामास येत नाहीत.त्या वेळी सद्गुरू सारखा कोणी सांभाळ करणारा नाही.कोरड्या डोहांत पडलेला मासा जसा पाण्याविणा तळमळतो तशी आपली अवस्था झाली आहे.चकोर पक्षी जशी चंद्रोदयाची,गाय वासराची,आई लेकराची,हरिणी पाडसाची आतुरतेने वाट पहाते त्या प्रमाणे संत रामदास आपल्या कृपाळु सद्गुरूची आळवणी करीत आहेत.काळाचा ग्रास होण्यापूर्वी श्री रामाने आपणास दर्शन द्यावे असा धावा ते करीत आहेत.

अभंग---177

गुरूवरें दातारें । अभिनव कैसें केलें .एकचि वचन न बोलत बोलुनि । मानस विलया नेलें भूतसंगकृत नश्वर ओझें । निजबोधें उतरिलें दास म्हणे मज मीपणाविरहित । निजपदीं नांदविलें

भावार्थ---

संत रामदास म्हणतात,आपल्या सद्गुरूंनी अभिनव करणी केली.एकही शब्द न बोलतां त्यांनी केवळ दर्शनाने या चंचल मनाचे हरण करुन ते विलयास नेल,पंचमहाभूतांचा हा नाशवंत पसारा निजबोधाने क्षणांत नाहिसा झाला.मीपणाच्या अहंकाराचे ओझे उतरवून चरण कमलांशी शाश्वत स्थान प्रदान केलें.

अभंग---178

अपराधी आहे मोठा। मारणें कृपेचा सोटा गुरुराज सुखाचे कंद । नेणुनि केला हा निजछंद । तेणें पावलों मी बंध । जालों निंद्य सर्वस्वीं तारीं तारीं सद्गुरुराया । वारीं माझे तापत्रया । तुझे पाय काशी गया । आहे मजला सर्वस्वीं आतां अंत पाहसी काय । तूंचि माझा बापमाय । रामदास तुझे पाय । वारंवार वंदितो

भावार्थ---

सद्गुरू हे आनंदाचे कंद असून त्यांचा आपल्याला छंद लागला आहे,त्यांच्या चरणाशी बांधला गेल्यामुळे आपण पुर्णपणे निंद्य बनलो आहे.सद्गुरूंचे पाय काशी गयेसारखे तीर्थस्थाने असल्याने आपली आधिभौतिक,आधिदैविक,आध्यात्मिक या तिनही तापांपासून सुटका करावी अशी विनवणी करून संत रामदास परत परत सद्गुरू चरणांना वंदन करतात.

अभंग---179

त्रिविध तापहारक हे गुरूपाय। भवसिंधूसी तारक हे गुरुपाय स्वात्मसुखाचें बीज हे गुरुपाय। ज्ञानाचें निजगुज हे गुरुपाय भक्तिपंथासि लाविती हे गुरुपाय। नयनीं श्रीराम दाविती हे गुरुपाय सहज शांतीचे आगर हे गुरुपाय। पूर्णकृपेचे सागर हे गुरुपाय । सकळ जीवांसी पावन हे गरुपाय

भावार्थ---

तिनही तापांचे हरण करणारे,संसारसागर तारून नेणारे,आत्मसुख देणारे,ज्ञानाचे रहस्य उलगडून दाखवणारे,भक्तिपंथास लावून श्रीरामाचे दर्शन घडवणारे सद्गुरूचे हे चरणकमल शांतीचे आगर असून पूर्णकृपेचे सागर आहेत.हे गुरुपद सर्व जीवांना पावन करणारे आहेत असे संतरामदास या अभंगात सांगतात.

अभंग---180

शरण जावें संतजनां। सत्य मानावें निर्गुणा नाना मतीं काय चाड । करणें सत्याचा निवाड ज्ञाने भक्तीस जाणावें । भक्त तयास म्हणावें रामीरामदास सांगे । सर्वकाळ संतसंग

भावार्थ---

या अभंगात संत रामदास संत-सज्जनांची महती सांगत आहेत.सगुण व निर्गुणाची उपासना या विषयीं अनेक मत-मतांतरे आहेत, यातून सत्य काय आहे हे समजून घ्यावे निर्गुण हेंच अंतिम सत्य मानावे. या ज्ञानातूनच भक्तीचा उगम होऊन साधक प्रेमळ भक्त बनतो.यासाठी संत-सज्जनांना शरण जावे,सदा सर्वकाळ संतांच्या संगतीत राहावें.

अभंग---181

संसार करावा सुखें यथासांग । परी संतसंग मनीं धरा मनीं धरा संतसंगतिविचार । येणें पैलपार पाविजेतो पाविजेतो याची प्रचीत पहावी । निरूपणी व्हावी अतिप्रीती अतिप्रीती तुम्ही निरूपणी धरा। संसारी उध्दरा असोनिया असोनियां नाहीं माया सर्वकांहीं । विवंचूनि पाहीं दास म्हणे।

भावार्थ---

संत रामदास म्हणतात,साधकाने प्रपंच सुखाने यथासांग करावा पण मनाने मात्र संतसंगतीची आस धरावी.या संसार सागरातून तरून जाण्याचा संतसंग हा एकच मार्ग आहे,याच अनुभव घ्यावा.परमेश्वराच्या रम्य कथांच्या निरूपणांचा अतिप्रीतीने अस्वाद घ्यावा आणि संसारांत राहून स्वता:चा उध्दार करून घ्यावा.माया असूनही सर्वकाही नाही ही क्षणभंगूरता विचाराने समजून घ्यावी.

अभंग---182

ज्या जैसी संगति त्या तैसीच गति । समागमें रीति सर्वकांहीं सर्वकांहीं घडे संगती गुणें । साधूचीं लक्षणें साधुसंगे साधुसंगें साधु होइजे आपण। रामदास खूण सांगतसे

भावार्थ---

ज्याची संगत जशी असेल त्या प्रमाणेच तो वागत असतो,त्या प्रमाणेच त्याची कर्म गती ठरते.सर्वकांही जे चांगले,वाईट घडते ते संगतीच्या गुणांमुळेच घडत असते.साधूंच्या संगतीने साधक साधू बनतो असे संत रामदास स्वप्रचितीने सांगतात.

अभंग---183

दुर्जनाचा संग होय मना भंग । सज्जनाचा योग सुखकारी सुखकारी संग संतसज्जनाचा । संताप मनाचा दुरी ठाके दुरी ठाके दु:ख सर्व होय सुख । पाहों जातां शोक आढळेना आढळेना लोभ तेथें कैंचा क्षोभ । अलभ्याचा लाभ संतसंगें संतसंगें सुख रामीरामदासी । देहसंबंधासी उरी नाही

भावार्थ---

दुर्जनांचा संग मनोभंग करणारा असतो तर सज्जनांचा सहवास सुखकारी आहे कारण त्या मुळे मनाचा संताप नाहिसा होतो,दु:ख दूर होते,शोक नाहीसा होतो.संत सहवासात मन लोभातीत होते आणि निर्लोभी मन क्षोभापासून मुक्त होते.संताप ,दु:ख, लोभ व क्षोभ नाहिसे करून निरामय शांती सुखाचा अलभ्य लाभ संतसंगामुळे घडून येतो.त्या मुळे देहबुध्दी विलयास जावून आत्मसुखाचा लाभ होतो असे श्रीरामी मन गुंतलेले संत रामदास आत्मप्रचीतीने सांगत आहेत.

अभंग---184

प्रवृत्ति सासुर निवृति माहेर । तेथे निरंतर मन माझें माझे मनीं सदा माहेर तुटेना । सासुर सुटेना काय करूं काय करूं मज लागला लौकिक । तेणें हा विवेक दुरी जाय दुरी जाय हित मजचि देखतां । प्रेत्न करूं जातां होत नाहीं होत नाहीं प्रेत्न संतसंगेंविण । रामदास खूण सांगतसें

भावार्थ---

संत रामदास म्हणतात,साधकाच्या जिवनांत सासर हे प्रवृत्तिसारखे असून माहेर हे निवृत्ति प्रमाणे आहे.नववधूला माहेरची ओढ अनिवार असते कारण तेथें संसारातिल दु:ख काळजी ,चिंता या पासून मुक्तता असते तर सासर हें प्रवृत्तिसारखे आहे,सासरच्या जबाबदार्यां पासून सुटका नाही.संसारांत राहून सतत लौकिकाचा विचार करावा लागतो त्यामुळे निवृत्तिचा विवेक दूर जातो,जसे स्त्री ला माहेर पारखे होते ,प्रयत्न करुनही विवेकाचा मार्ग सापडत नाही हा विवेकाचा मार्ग केवळ संताच्या संगतिनेच सापडू शकेल असे संत रामदास अनुभवाने सांगतात,

अभंग---186

जाणावा तो साधु जया पूर्ण बोधु । भूतांचा विरोधु जेथ नाहीं कल्पनेचा देहो त्या नाहीं संदेहो । सदा नि:संदेह देहातीत। जया नाहीं क्रोध जया नाहीं खेद । जया नाही बोध कांचनाचा रामदास म्हणे साधूचीं लक्षणें अति सुलक्षणें अभ्यासावीं

भावार्थ---

पूर्ण बोध असलेला साधू कसा ओळखावा याची लक्षणे संत रामदास या अभंगात सांगत आहेत, सर्व प्राणिमात्रांबद्दल प्रेमभाव असणें, कोणताही वैरभाव नसणे हे साधूचे प्रथम लक्षण आहे.तो पूर्णपणें नि:संदेह , संशयातित असतो तसेच त्याची देहबुध्दी संपूर्ण नाहीशी झालेली असते,खेद आणि राग या पासून मुक्त असून कांचनाचा (पैशाचा) अजिबात मोह नसतो. या सुलक्षणावरुन खरा साधू आओळखावा.


अभंग---187

आमुचे सज्जन संत साधुजन । होय समाधान तयांचेनि तयांचेनि संगे पाविजे विश्रांति । साधु आदिअंतीं सारखेचि सारखेचि सदा संत समाधानी । म्हणोनियां मनीं आवडती आवडती सदा संत जिवलग । सुखरूप सदा संग सज्जनांचा सज्जनांचा संग पापातें संहारी । म्हणोनियां धरी रामदास

भावार्थ---

या अभंगात संत रामदास म्हणतात, आपले संत हे सज्जन असे साधुजन आहेत, त्यांच्या सहवासाने मनाचे समाधान होते, मनाला शांतता लाभते.संत सदासर्वकाळ सारखेच समाधानी असतात त्यां मुळे ते जिवलग मित्रा प्रमाणे आवडतात,त्यांचा सहवास सुखदायी असतो.संताचा सहवास पापनाशक असतो म्हणून आपल्याला तो आवडतो असे संत रामदास म्हणतात.

अभंग---188

देव आम्हांसी जोडला संतसंगें सापडला कडाकपाटीं शिखरीं ।धुंडिताती नानापरी नाना शास्त्रें धांडोळती । जयाकारणें कष्टती रामदास म्हणे भावें । वेगीं संता शरण जावें

भावार्थ---

साधक परमेश्वर प्राप्तीसाठी पर्वतांची शिखरे, कडेकपारी धुंडाळतात,नाना शास्त्रांचा अभ्यास करतात त्या साठी खूप कष्ट करतात. संत रामदास सांगतात,आपल्याला संतसंगती मुळेच परमेश्वर प्राप्ती झाली.पूर्ण भक्तिभावाने संतांना शरण जाणे हाच परमेश्वर प्राप्तीचा एकमेव मार्ग आहे ,

अभंग---189

ब्रह्मादिकांसी दुर्लभ । देव भक्तांसी सुलभ थोरपणे आढळेना ।जाणपणासी कळेना नाहीं योगाची आटणी । नाहीं तप तीर्थाटणी दास म्हणे साधूविण ।नानासाधनांचा शीण

भावार्थ---

ब्रह्मा, विष्णु,महेश या देवांना मिळण्यास कठिण असलेला परमात्मा साध्याभोळ्या प्रेमळ भक्तांना मात्र सुलभ असतो कारण मोठेपणाचा अहंकार व ज्ञानाचा गर्व नसतो.भक्तांना योग,याग ,यज्ञ ,तप तीर्थयात्रा यांपैकी कोणतेही साधन आवश्यक वाटत नाही. संत रामदास म्हणतात,संत सज्जनांच्या कृपेशिवाय हा सर्व साधनांचा आटापिटा व्यर्थ आहे.

अभंग---190

संतांचेनि संगे देव पाठीं लागे । सांडूं जातां मागें सांडवेना सांडवेना देव सदा समगामी । बाह्य अंतर्यामीं सारिखाचि सारिखाचि कडाकपाटीं खिंडारीं । गृहीं वनांतरीं सारिखाचि सारिखाचि तीर्थ सारिखाचि क्षेत्री । दिवा आणि रात्रीं सारिखाचि सारिखाचि अंत नाहीं तो अनंत । रामदासीं किंत मावळला

भावार्थ---

संतांच्या संगतित असतांना देव सतत भक्तांचा पाठिराखा असतो,त्याला पाठिमागे सोडून जाऊ म्हटले तरी सोडवत नाही. देव सतत बाहेर व अंतरंगात सामावलेला असतो.पर्वताच्या शिखरावर, कडे व कपारिमध्ये ,वनांत व घरांत तो नेहमीच सोबतिला असतो.दिवस रात्री, तीर्थक्षेत्रीं हा परमेश्वर संतांच्या संगतीत असलेल्या भक्तांची साथ सोडत नाहीं.

अभंग---191

संत सज्जनांचा मेळा ।त्यासि लोटांगण घाला तेथें जाऊनि उभे राहा ।रामदास नयनीं पहा गुण श्रीरामाचे गाती । कथा रामाची ऐकती तेथे रामही असतो ।कथा भक्तांची ऐकतो जेथें राम तेथें दास ।सदृढ धरावा विश्वास

भावार्थ---

जेथे संत सज्जनांचा समुदाय असेल तेथें जाऊन उभे राहावें श्रीरामाचे गुण गाणाय्रा,रामकथा आवडीने ऐकणाय्रा त्या रामदासांना डोळ्यांनी प्रत्यक्ष बघावें आणि त्यांना लोटांगण घालावें कारण तेथें स्वता: श्रीराम भक्तांच्या कथा ऐकण्यासाठीं आलेला असतो. जेथें राम तेथें दास असणारचया विषयीं दृढ विश्वास असावा.

अभंग---192

तुम्ही चिंता हो मानसीं । राम शरयूतीर निवासी रूप सांवळें सुंदर । ज्याला ध्यातसे शंकर जडित जडित कुंडलें श्रवणीं । राम लावण्याची खाणी सूर्यवंशाचें मंडण । राम दासाचें जीवन

भावार्थ---

शरयू नदीच्या तीरावर वसलेल्या अयोध्या नगरींत निवास करणाय्रा, सावळ्या सुंदर रामरूपाचे मनामध्यें ध्यान करावें कानामध्ये रत्नजडित कुंडले असलेला श्रीराम लावण्याची खाण असून सूर्यवंशाचे भुषण आहे.संत रामदास म्हणतात,श्रीराम रामदासांचे जीवन आहेत.

अभंग---193

शोभे ठकाराचें ठाण । एकवचनी एकबाण बाप विसांवा भक्तांचा । स्वामी शोभे हनुमंताचा मूर्ति शोभे सिंहासनीं ।तो हा राजीव नयनी सूर्यवंशाचें मंडण ।राम दासाचें भूषण

भावार्थ--- संत रामदास म्हणातात,आपल्या स्वामींचे स्थान अत्यंत शोभायमान आहे.तेथें कमला सारखे लोचन असलेल्या श्रीरामांची सुंदर मूर्ती शोभून दिसत आहे जो हनुमंताचा स्वामी आहे.सूर्यवंशाचे भूषण असलेला हा श्रीराम एकवचनी एकबाणी असून भक्तांचा विसावा व रामदासांचे भूषण आहे.

अभंग---194

तो हा राम आठवावा । ह़दयांत सांठवावा रामचरणीची गंगा । महापातके जातीं भंगा रामचरणीची ख्याति । चिरंजीव हा मारुती चरण वंदी ज्याचे शिरी । बिभीषण राज्य करी शबरीची बोरें खाय । मोक्ष दिला सांगूं काय रामदास म्हणे भावें ।कथा कीर्तन करावें

भावार्थ---

श्री रामाचे सतत स्मरण करावे ,रामाचे रूप व गुण अंतरात साठवावे .रामचरणाचे तीर्थ गंगोदका प्रमाणे पवित्र असून महापातकांचा नाश करणारें आहे.रामचरणांचा दास मारुती चिरंजीव झाला अशी त्याची किर्ति आहे.रामचरणांना वंदन करणारा बिभीषण लंकेचा राजा बनला.शबरीची बोरे चाखून श्री रामाने तिला मोक्षाची अधिकारी बनवलें अशा कृपाळू रामाच्या कथांचे कीर्तन करावें असे या अभंगात संत रामदास सांगतात.

अभंग---195

ऐसा नव्हे माझा राम । सकळ जीवांचा विश्राम नव्हे गणेश गणपाळु । लाडु मोदकांचा काळू नव्हे चंडी मुंडी शक्ति । मद्यमांसाते मागती नव्हे भैरव खंडेराव । रोटी भरितांसाठीं देव नव्हे जोखाई जोखाई । पीडिताती ठाईं ठाईं नव्हे भूत नव्हे खेत ।निंब नारळ मागत रामदासी पूर्णकाम । सर्वांभूती सर्वोत्तम

भावार्थ---

या अभंगात संत रामदास आपले सद्गुरू कसे नाहीत हें सांगत आहेत.श्रीराम हे गणांधिपती गणेशा सारखे लाडु, मोदक खाणारे नाहीत किंवा चंडी,मुंडी या शक्तिदेवतां प्रमाणें मद्यमांसाचा नैवेद्य मागणारे नाही.श्रीराम भैरव खंडेराया सारखे भरित रोटी घेऊन प्रसन्न होणारे नाहीत ,जोखाई सारखे रागावून पीडा देणारे नाहीत तसेच भूताखेतांची बाधा टळावी म्हणुन लिंबू,नारळ मागत नाहीत.सद्गुरू श्रीराम सर्व प्राणिमांत्रांच्या सगळ्या कामना पुर्ण करणारे-असून सर्व जीवांना विश्राम देणारे सर्वोत्तम देवाधिदेव आहेत.

अभंग---196

सोडवि जो देव तोचि देवराव। येर जाण नांव नाथिलेंचि नाथिलेंचि नांव लोकांमध्यें पाहे । ठेविजेत आहे प्रतापाचें प्रतापाचें नांव एका राघवासी । रामीरामदासी देवराव

भावार्थ---

संत रामदास म्हणतात,जो जीवन मरणाच्या चक्रातून सोडवतो तो सर्वश्रेष्ठ देव होय,बाकी सगळे नाथिलें म्हणजे लटके किंवा खोटे आहे.पुण्यप्रतापी असा श्रीराम सर्व लोकांमध्ये प्रसिध्द असून प्रतापी हे नांव केवळ राघवालाच शोभून दिसतें.तो श्रीराम रामदासाचा स्वामी आहे.

अभंग---197

अणुपासुनि जगदाकार ।ठाणठकार रघुवीर रामाकार जाहली वृत्ती । द्रृश्याद्रृश्य नये हातीं रामीं हरपलें जग । दास म्हणे कैंचे मग

भावार्थ---

अणुपासून जगातील सर्व ठिकाणी रघुवीर व्यापून राहिला आहे,एकदां वृत्ती राम स्वरुपांत विलीन झाली कीं,दिसणारें आणि न दिसणारें सर्व विश्व हरपून जाते,केवळ रामरूपच अंतर-बाह्य व्यापून उरतें.

अभंग---198

राज्य जालें रघुनाथाचें । भाग्य उदेलें भक्तांचें कल्पतरु चिंतामणी । कामधेनूची दुभणी परिस झालें पाषाण । अंगिकार करी कोण नाना रत्नांचे डोंगर । अमृताचें सरोवर पृथ्वी अवघी सुवर्णमय । कोणीकडे न्यावें काय ब्रह्मादिकांचा कैवारी । रामदासाच्या अंतरीं

भावार्थ---

श्रीराम हे ईच्छीलें फळ देणारा कल्पतरु ,चिंतामणी किंवा कामधेनू असून रघुनाथाचे राज्य येतांच भक्तांचे भाग्य उदयास आले.रामराज्यांत सर्वच पाषाणांचे परिस बनले असतां ,त्यांचा लोभ कोणाला वाटणार?रामराज्यांत सर्वच डोंगर रत्नांचे बनले आणि सरोवरे अमृताची बनली,अवघी पृथ्वी सुवर्णमय झाली.अशा समृध्द रामराज्यांत कुणालाही काहिही कोठेही नेण्याची अभिलाषाच राहिली नाही .असा हा ब्रह्मदेवापासून सामान्य जनांच्या कामना पूर्ण करणारा श्री राम आपल्या अंतरंगांत वास करतो असे संत रामदास या अभंगात म्हणतात.

अभंग---199

स्वामी माझा ब्रह्मचारी । मातेसमान अवघ्या नारी उपजतांबाळपणीं । गिळूं पाहे वासरमणि आंगीं शेंदुराची उटी ।स्वयंभ सोन्याची कांसोटी कानीं कुंडलें झळकती । मुक्तमाळा विराजती स्वामीकृपेची साउली ।रामदासाची माउली।।

भावार्थ---

हा संत रामदासांचा आपले स्वामी श्री मारुती यांच्यावर लिहिलेला अभंग आहे. या अभंगांत ते म्हणतात आपले स्वामी ब्रह्मचारी असून सर्व स्रिया त्यांना मातेसमान आहेत. जन्म होतांच जेव्हां श्री मारुतीने आकाशातील लालभडक सूर्यबिंब पाहिलें आणि हे फळच आहे असे समजून ते खाण्यासाठी सूर्याकडे झेप घेतली.संत रामदास म्हणतात,श्री मारुतीरायांनी अंगावर शेंदुराची उटी लावली असून सोन्याची स्वयंभू लंगोटी परिधान केली आहे.त्यांच्या कानांत कुंडलें झळकत असून गळ्यामध्यें मोत्याच्या माळा शोभून दिसत आहेत.संत रामदास म्हणतात,श्रीमारुती आपली माउली असून त्यांच्या कृपेची साउली आपल्यावर आहे.

अभंग---200

पडतां संकट जीवां जडभारी । स्मरावा अंतरी बलभीम बलभीम माझा सखा सहोदर । निवारी दुर्धर तापत्रय तापत्रय बाधा बाधूं न शके काहीं । मारुतीचे पायीं चित्त ठेवा ठेवा संचिताचा मज उघडला । कैवारी जोडला हनुमंत हनुमंत माझें अंगीचें कवच । मग भय कैचें दास म्हणे


भावार्थ---

संत रामदासांची मारुतीराया वरील उत्कट भक्ती या अभंगांत दिसून येते.ते म्हणतात जीवावर बेतलेले कोणतेही मोठे संकट आले असतां बलभीमाचे स्मरण करावे .बलभीम आपला सखा ,सहोदर म्हणजे बंधू असून तापदायक अशा कठिण संकटांचे निवारण करतो.बलभीम आधिदैविक, आध्यात्मिक, आधिभौतिक अशा तापत्रयापासून मुक्तता करतो.मारुतीच्या चरणाशीं चित्त जडले असतां तिनही तापांची बाधा होत नाही.ढभहनुमंता सारखा कैवारी जोडल्यामुळे आपणास संचिताचा ठेवा सांपडला असून हनुमंताच्या कृपेचे कवच लाभल्यामुळें कसलेही भय उरले नाही असे संत रामदास खात्रीपूर्वक सांगतात.

अभंग---201

नांव मारुतीचे घ्यावें । पुढे पाऊल टाकावें अवघा मुहूर्त शकून । हृदयीं मारुतीचे ध्यान जिकडे जिकडे जाती भक्त। पाठीं जाय हनुमंत राम उपासना करी। मारुती नांदे त्यांचे घरीं दास म्हणे ऐसें करा । मारुती हृदयीं धरा

भावार्थ---

मनामध्ये मारुतीचे सतत ध्यान लागलेलें असेल तर शुभभशुभ शकून पाहाण्याची गरजच नाही. मारुतीचे नामस्मरण करून कोणत्याही कार्याची सुरवात करण्यासाठी पाऊल पुढे टाकावें कारण हनुमंताचे भक्त जेथेजेथे जातात तेथेतेथे हनुमंत पाठिराखा असतो.रामाची उपासना करणार्या भक्तांच्या घरी मारुतीरायाचा सतत वास असतो.संत रामदास भक्तांना अत्यंत कळकळीने उपदेश करीत आहेत की,त्यांनी सतत मारुतीचे ध्यान करावें.

अभंग---202

येई येई हनुमंता । माझे अंजनीच्या सुता ।। तुझी पाहतो मी वाट । प्राणसखया मजला भेट ।। तुजवांचोनि मज आतां । कोण संकटीं रक्षिता ।। नको लावूं तूं उशीर । दास बहू चिंतातुर ।।

भावार्थ---

संत रामदास अत्यंत चिंतातुर मनाने हनुमंताची वाट बघत आहेत.आपण संकटांत सापडलो असून दसरा कोणिही रक्षण करणारा नाही,अशा वेळीं उशीर न करतां अंजनीसुताने धाऊन यावे आणि आपला प्राणसखा असलेल्या हनुमंतांनी आपणास तातडीने भेटावें अशी कळकळीची विनंती संत रामदास करीत आहेत.

अभंग---203

कष्टी झाला जीव केली आठवण । पावलें किराण मारुतीचें संसारसागरीं आकांत वाटला । भुभु:कार केला मारुतीनें मज नाही कोणी मारुती वांचोनी । चिंतिता निर्वाणीं उडी घाली माझे जिणें माझ्या मारुतीं लागलें। तेणें माझें केले समाधान उल्हासले मन देखोनि स्वरूप । दास म्हणे रूप राघवाचें

भावार्थ---

संत रामदास या अभंगात म्हणतात,जीव कष्टी झाल्यानें मारुतीची आठवण झाली आणि आनंदाची गोष्ट अशी की, आठवण होतांच मारुतीनें उड्डाण केले. संसारसागरांत माजलेला आकांत पाहून मारुतीने मुखानें प्रचंड आवाज केला.आपणास मारुती शिवाय कोणी तारणारा नाही, निर्वाणिच्या (संकटाच्या अंतिम क्षणीं )मारुतिचे स्मरण करतांच तो धावत येऊन रक्षण करतो.आपले सारे जीवन मारुतिला अर्पण केले की,मन निश्चिंत होऊन मनाचे समाधान होते.राघवाच्या दासाचे स्वरूप पाहून मन उल्हसित( आनंदित )होते.

अभंग---204

मेरूचीया माथां देऊनिया पाव ।

जात असे राव कैलासींचा

कैलासींचा राव अक्रावा क्षोभला । देशधडी केला लंकानाथ लंकेच्या चोहटा मांडियेला खेळ । आगीचे कल्लोळ घरोघरीं जाळियेलीं घरें सुंदर मंदिरें । पावला कैवारें जानकीच्या जानकीचा शोक दुरी दुरावला । यशवंत जाला निजदास

भावार्थ---

मेरू पर्वताच्या शिखरावर निवास करणारा शिवशंकर(कैलासींचा राणा ) अत्यंत क्रोधायमान झाला.हा अकरावा रूद्र मारूतिच्या रुपानें प्रकट झाला आणि त्याने लंकानाथ रावणाला देशोधडीला लावलें.त्याने लंकेमध्यें उघडपणे खेळ मांडला,घरोघरी अग्नीच्या ज्वाळांनी कहर केला.घरें सुंदर मंदिरें जळून खाक झाली.जानकीचा कैवारी बनून त्याने जानकीचा शोक दूर केला.रामाचा दास हनुमान यशवंत झाला.

अभंग---205

पावावया रघुनाथ । जया मनीं वाटे आर्त । तेणें घ्यावा हनुमंत । करील भेटी हनुमंत मी नमी । मज भेटविलें रामी । विघ्नांचिया कोटी श्रेणी । अंतरोनी राम उपासकांवरी ।अतिप्रेम पडिभरी । होऊनिया कैवारी । निवारी दु:ख रामीरामदासीं श्रेष्ठ । सिध्दसिध्दासी वरिष्ठ । भवाचा भरियेला घोंट । स्मरणमात्रें

भावार्थ---

संत रामदास म्हणतात,ज्यांच्या मनामध्ये रामभेटीची उत्कट आर्तता असेल त्यांनी रघुनाथाची कृपा होण्यसाठी हनुमंताची उपासना करावी.आपण हनुमंताची विनवणी केली आणि हनुमंतांनी रामाची भेट घडवली,त्या मध्ये आलेली सर्व विघ्ने निवारून हनुमंतांनी रामभेट घडवून आणली.राम उपासकांवरील अतिप्रेमामुळे त्यांचा कैवारी बनून हनुमंत त्यांची दु:खे निवारण करतो.रामदासांमधील सर्वश्रेष्ठ आणि सिध्दांमध्ये वरिष्ठ सिध्द अशा हनुमंताचे केवळ स्मरण केल्यानें संसार तापापासून सुटका होते.

अभंग---206

मुख्य प्राणासी पुजिलें । रामदर्शन घडलें तुम्ही पहा हो मारुती । रामभक्तांचा सारथी देव अंजनीनंदन । रामदासी केलें ध्यान

भावार्थ---

मारुती हा रामाचा मुख्य प्राण असून त्याची पूजा करतांच रामदर्शन घडलें .संत रामदास म्हणतात, भाविकांनी मारुतीचे दर्शन घ्यावे कारण तो रामभक्तांचा सारथी आहे.त्या अंजनीनंदन मारुतीचे आपण सतत ध्यान करतो .

अभंग---207

कपिकुळाचें भूषण । चित्त रामाचें तोषण धन्य साधू हा हनुमंत । ज्ञान वैराग्य सुमंत रामरंगीं रंगे चित्त । अखंडित सावचित्त दास म्हणे मी लेकरूं । विस्तारवी बोधांकूरू

भावार्थ---

वानरकुळाचे भूषण असलेल्या हनुमन्ताचे चित्त सतत श्रीरामाला प्रसन्न करण्यांत मग्न असते.ज्ञान, वैराग्य आणि सुबुध्दी असलेला हा हनुमंत एक साधुपुरुष आहे.तो सतत सावधान राहून आपले चित्त जराही विचलित होऊं न देता रामभजनांत रंगून जातो.संत रामदास म्हणतात, आपण हनुमंताचे लेकरु असून त्यांच्या उपदेशाचा विस्तार (प्रसार ) करतो.

अभंग---208

पंढरिऐसें तिन्हीं ताळीं ।क्षेत्र नाहीं भूमंडळीं दुरूनि देखतां कळस । होय अहंकाराचा नाश होतां संताचिया भेटी । जन्ममरणा पडे तुटी चंद्रभागेमाजीं न्हातां । मुक्ति लाभे सायुज्यता दृष्टीं नपडे ब्रह्मादिकां । प्राप्त जालें तें भाविका रामदासा जाली भेटी । विठ्ठलपायीं दिधली मिठी

भावार्थ---

पंढरीसारखे तीर्थक्षेत्र आकाश, पृथ्वी,पाताळ या तिन्ही लोकांत ,सर्व भूमंडळावर शोधूनही सापडणार नाही.विठ्ठल मंदिराचा कळस दूरून बघितला तरी भाविकाच्या अहंकाराचा संपूर्ण नाश होतो.येथील संतांच्या भेटी होतांच जन्ममरणाची बंधने तुटून पडतात.चंद्रभागेमध्यें स्नान करतांच भाविकांना सायुज्य मुक्तीचा(पांडुरंगाच्या निकट सानिध्याचा )लाभ होतो.ब्रह्मादिदेवांच्या दृष्टीसुध्दा पडणे कठिण अशा वैकुंठपदाची प्राप्ती होते.संत रामदास म्हणतात,आपली पंढरीच्या पांडुरंगाची भेट झाली आणि त्याच्या पायाला मिठीच घातली.

अभंग---209

पंढरी नव्हे एकदेशी । विठ्ठल सर्वत्र निवासी ।। आम्हीं देखिला विठोबा । आनंदे विटेवरीं उभा ।। तेथे दृश्यांची दाटी मोठी । पाहतां रुक्मिणी दिसे दृष्टी ।। रामदासीं दर्शन जालें ।आत्मविठ्ठला देखिलें ।।

भावार्थ---

संत रामदास म्हणतात,पंढरी एकदेशी नाही कारण विठ्ठ्लाचा सर्वत्र निवास आहे.पाडुरंगाला स्थळ काळाची बंधन नाही.आनंदाने विटेवर उभा असलेल्या विठोबाचे दर्शन आपल्याला झाले.विठोबाच्या दर्शनासाठी लोकांची मोठी गर्दी झाली आहे,रुक्मिणीदेवीचे दर्शन घडते.पंढरीमध्यें आत्मविठ्ठलाचे दर्शन आपल्याला घडलें.

अभंग---210

 राम कृपाकर विठ्ठ्ल साकार । दोघे निराकार एकरूप ।।
 आमुचिये घरीं वस्ति निरंतरीं । हृदयीं एकाकारी राहियेले ।
 रामदास म्हणे धरा भक्तिभाव । कृपाळु राघव पांडुरंग ।।

भावार्थ---

श्रीराम भक्तांवर कृपा करणारा असून विठ्ठ्ल भक्तांच्या हाकेला धावून जाऊन प्रत्यक्ष मदत करणारा आहे.दोघांचेही स्वरूप एकरूप म्हणजे निराकार आहे.ते हृदयांत एकाकार होऊन राहिले आहेत.त्यांची हृदयातिल वस्ती नरंतर आहे,असे सांगून संत रामदास म्हणतात भाविकांनी मनांत भक्तिभाव धरला तर राघव व पांडुरंग दोघेही कृपेचे सागर आहेत.

अभंग---211

जें कां चैतन्य मुसावलें विटेवरी वासांवलें ।। तो हा विठ्ठल उभा राहे । समचरणीं शोभताहे ।। रामीरामदासीं पाहिलें । विठ्ठल आत्मया देखिलें ।।

भावार्थ---

विठ्ठलाचे विटेवरील रूप पाहून वाटते कीं, प्रत्यक्ष चैतन्य मुशीमध्ये ओतून हे रुपडे साकार झाले आहे.विटेवर समचरणीं उभा असलेला पांडुरंग शोभून दिसत आहे असे सांगून संत रामदास म्हणतात, विठ्ठलाच्या स्वरूपांत प्रत्यक्ष आत्मरूपच पाहिलें.

अभंग---212

माझें मानस विटेवरी । विठ्ठलचरणीं निरंतरीं ।। पंढरपुरीं मनोरथ ज्याचा । धन्य धन्य तो देवाचा ।। जो जो पंढरीस गेला । तेणे कळिकाळ जिंकिला ।। रामदास म्हणे पंढरी । साधनेविण तारी ।।

भावार्थ---

विटेवरील विठ्ठलाच्या चरणांशीं आपले मन सदा सर्वकाळ गुंतून राहिलें आहे.पंढरपुरीच्या विठ्ठलाच्या भेटीची ज्याला आस लागली आहे तो दैवी भक्त असून धन्य होय,जो भक्त पंढरीची वारी करतो त्याला कळिकाळाचे भय नाही,त्याची जन्म-मरणाची वारी चुकते. संत रामदास म्हणतात, कोणत्याही साधनेशिवाय पंढरीची वारी भाविकांना तारून नेते.

अभंग---213

लांचांवोनि भक्तिलोभा । असे वाळवंटीं उभा । पदकी इंद्रनीळशोभा । दिशा प्रभा उजळती ।। भक्तें पुंडलिकें गोविला । जाऊं नेदी उभा केला । विटें नीट असे ठाकला । भीमातीर वाळुवंटीं ।। केवढें भाग्य पुंडलिकाचें । उभें दैवत त्रिलोकींचें । की जें तारूं भवसागरींचें । भीमातीरीं विनटलें ।। एकें पुंडलिकें करुनी जोडी । आम्हा दिधली कल्पकोडी । तुटली संसारसांकडी । रामदास म्हणतसे ।।

भावार्थ---

भक्तांच्या भक्तिप्रमासाठीं वेडा झालेला पांडुरंग चंद्रभागेच्या वाळवंटांत उभा आहे.पांडुरंगाच्या गळ्यामधील वैजयंती माळेच्या पदकाच्या निळसर प्रभेच्या तेजानें सर्व दिशा उजळून निघाल्या आहेत.भक्त पुंडलिकाच्या भक्तीप्रेमाने पांडुरंग बंधनांत पडला आहे. विटेवर समचरणांत उभाआहे,हे भक्तिप्रेम डावलून जाऊ शकत नाही.भक्त पुंडलिकाचे भाग्य एव्हढें मोठे आहे की,त्रिलोकेचे दैवत त्याच्यासाठी तिष्ठत उभे आहे.संत रामदास म्हणतात, संसारसागर तारून नेणारे पांडुरंग रुपी तारू भीमेतिरी शोभून दिसत आहे.पुंडलिकाच्या भाग्यामुळे आपल्याला पांडुरंगाच्या कृपा प्रसादाचा चिरंतन लाभ झाला आहे आणि संसार बंधनाची साखळी तुटून पडली आहे.

अभंग---214'

कांहीं बोल रे विठ्ठला । मौन वेष कां धरिला ।। काय मागतों गांठोडी । बोलसीना धरली गुडी ।। आशा वैभवाची नाही । भिऊं नको वद कांहीं ।। नलगे मज धन दारा ।वेगे लोचन उघडा ।। दास म्हणे वर पाहे । कृपा करूनी भेटावें ।।

भावार्थ---

संत रामदास या अभंगात विठ्ठलाला आळवित आहेत. विठुराया आपल्याशी बोलत नाही, मौनरुप धारण केले असून मुखांत गुळणी धरली आहे. आपण विठुरायाकडे मौल्यवान धनाचे गाठोड , वैभव, पत्नी यापैकीं कांहीच मागत नाही. तेव्हां न घाबरता त्यांनी आपले डोळे उघडून कृपादृष्टीने पहावें , एकदां तरी भेटावे अशी कळकळीची विनंती संत रामदास विठ्ठलाला करीत आहेत.

अभंग---215'

सोनियाचा दिवस जाला । पांडुरंग रंगी आला ।। मनी आतां सावध होई । प्रेमरंगी रंगुनि राहीं ।। बोल कैसा सुपरित कांहीं । अनुसंधान विठ्ठलपायीं ।। दास म्हणे हेचि युक्ती । एक देवासी चिंतिती ।।

भावार्थ---

आज सोनियाचा दिवस आला आहे कारण आज पांडुरंग रिंगणांत आले असून भक्तां सोबत रंगात आले आहेत.आतां सावध चित्ताने या प्रेमरंगात रंगून जावे,विठ्ठलाच्या पायीं सारे लक्ष केंद्रीत करुन एकाग्रतेनें लीन होऊन रहावें संत रामदास सागतात , देवाचे चिंतन करण्याची ही एकच युक्ती आहे.

अभंग---216'

आम्ही देखिली पंढरी । सच्चिदानंद पैलतीरीं ।। भावभक्ति श्रवण मनन । निदिध्यास साक्षात्कारपण ।। चिच्छक्ति धर्मनदी । तरलों ब्ह्मास्मिबुध्दि ।। तेथिंचा अहंकार तेंचि पोंवळी । त्यजोनी प्रवेशलों राउळीं ।। रामदासी दर्शन जालें । आत्म्या विठ्ठलातें देखिलें ।।

भावार्थ---

या अभंगांत संत रामदास आपणास पंढरीच्या आत्मारुप विठ्ठलाचे दर्शन कसे घडले याचे वर्णन करीत आहेत.चिच्छत्ति धर्मनदी तरून जाण्यासाठी अहंम् ब्ह्मास्मि या वचनाचा उपयोग करावा लागला.त्यासाठी भावपुर्ण भक्तिची,श्रवण मननाची आणि निदिध्यास यांची कास धरावी लागली.या उपासनेनंतर साक्षात्काराचे वरदान मिळाले. या साक्षात्कारीपणामुळे निर्माण झालेला अहंकार म्हणजे या धर्मनदीतील मोल्यवान पोवळी ,त्यांचा त्याग करुन पैलतीरावरील मंदिरांत प्रवेश केला आणि सच्चिदानंद परमेश्वराचे दर्शन घडलें.प्रत्यक्ष आत्मरूप विठोबा डोळ्यांनी बघावयास मिळाला.

अभंग---217'

राम अयोध्येचा वासी । तोचि नांदे द्वारकेसी ।। कृष्ण नामातें धरिलें । बहु दैत्य संहारिँलें ।। सखया मारुतीलागुनी । रूप दावी चापपाणी ।। पुढे भूभार उतरिँला । पांडवासी सहाय जाला ।। आतां भक्तांचियासाठी । उभा चंद्रभागेतटी ।। राम तोचि विठ्ठल जाला । रामदासासी भेटला ।।

भावार्थ---


श्रीराम अयोध्येचा राजा,त्याने आपला परमभक्त मारुतिला आपले धनुष्यबाणधारी रुप दाखवलें.तोच द्वापारयुगांत कृष्ण हे नाम धारण करून द्वारकेंत नांदत होता. पृथ्वीवरील दुष्ट,पापी राक्षसांचा संहार करून भूभार हलका केला,पांडवांचे राज्य कपटाने हरण करणार्या कौरवांचा संहार करण्यासाठी त्यांचा साह्यकर्ता झाला.आणि आतां कलियुगांत भोळ्याभाविक भक्तांसाठी चंद्रभागेतटी कर कटीवर ठेवून उभा आहे .संत रामदास म्हणतात श्रीराम हाच विठ्ठल होऊन आपणास भेटला ,

अभंग---218'

सहज बरवा सहज बरवा । सहज बरवा विठोबा माझा ।। सहज सांवळा दिगंबर ।सहज कटीं कर ठेऊनि उभा ।। रामीरामदास म्हणे ।सहज अनुभव तोचि जाणे ।।

भावार्थ---

सावळ्यारंगाचा , दिशा हेंच वस्त्र ज्याने परिधान केले आहे असा आपला विठोबा दोन्ही कर कटीवर ठेवून विटेवर सहजपणे उभा आहे. श्रीरामाचे दास रामदासस्वामी म्हणतात,सहजपणे आपोआप येणाऱ्या अनुभूती फक्त तोच विठोबा जाणू शकतो.

अभंग---219'

शंकर--खंडोबा--भैरव नमो नमो सदाशिवा । गिरिजापति महादेवा ।। शिरी जटेचा हा भार । गळां वासुकीचा हार ।। अंगा लावूनिया राख । मुखी रामनाम जप। ।। भक्ता प्रसन्न नानापरी । अभंयकर ठेऊनि शिरी ।। दास म्हणे शिवशंकरा । दुबळ्यावरी कृपा करा ।।


भावार्थ---

मस्त्कावर जटांचा भार असलेला,गळ्यामध्यें वासुकी नावाच्या सापाचा हार घातलेला,अंगाला राख फासून सदासर्वकाळ रामनामाचा जप करणारा,भोळ्या भक्तांवर प्रसन्न होऊन त्यांच्या मस्तकावर आपला अभंयंकर कर ठेऊन आशिर्वाद देणारा अशा गिरिजापती सदा पवित्र ,महादेवाला नमन करून संत रामदास शिवशंकराला आपल्यासारख्या दुबळ्या भक्तावर कृपा करावी अशी विनंती करीत आहेत.

अभंग---220'

माझा कुळस्वामी कैलासीचा राजा । भक्ताचिया काजा पावतसे पावतसे दशभुजा उचलून । माझा पंचानन कैवारी ।। कैवारी देव व्याघ्राच्या स्वरूपें । भूमंडळ कोपें जाळूं शके जाळूं शके सृष्टि उघडितां दृष्टी । तेथें कोण गोष्टी इतरांची इतरांची शक्ति शंकराखालती । वांचविती क्षिती दास म्हणे

भावार्थ---

आपल्या कुळाचा स्वामी कैलासीचा राजा शिवशंकर याचा महिमा या अभंगांत संत रामदासांनी वर्णन केला आहे.पंचानन (पाच मुखे असलेला )शंकर आपल्या दहा भुजा उचलून भक्तांचे रक्षण करून त्यांचे मनोरथ पूर्ण करतो.तो भक्तांचा कैवारी असून वाघाच्या स्वरूपांत सर्व भूमंडळ केवळ एका द दृष्टीक्षेपात जाळू शकतो,सर्व सृष्टी डोळे उघडतांच जाळून राख करण्याचे सामर्थ्य त्याच्या ठिकाणी आहे.शिवशंकराच्या सामर्थ्याची तुलना इतर कोणत्याही देवदेवतांशी होऊ शकणार नाही.पृथ्वीचे पालन करणारे श्री विष्णुं सुध्दा महादेवाची बरोबरी करु शकणार नाही असा विश्वास संत रामदास व्यक्त करतात.

अभंग---221'

पृथ्वी अवघीं लिंगाकार । अवघा लिंगाचा विस्तार ।। आतां कोठें ठेवूं पाव । जेथे तेथे महादेव ।। अवघा रुद्रची व्यापिला ।ऐसे देवचि बोलिला ।। दासे जाणोनिया भला ।देह देवार्पण केला।।

भावार्थ---

संत रामदास म्हणतात, ही सर्व पृथ्वी लिंगाचा विस्तार असल्याने लिंगाकार आहे.सर्व स्थळे महादेवाने व्यापलेली आहेत, एकच रूद्र सगळीकडे व्यापून राहिला आहे ,पाय ठेवायला देखील जागा नाही.हे देवाचे वचन आहे असे जाणून आपण आपला देह त्या सर्वव्यापी परमेश्वराला अर्पण केला.

अभंग---222'

देव शिवाचा अवतार । जाउनि बसला गडावर ।। एक निळ्या घोड्यावर । एक ढवळ्या नंदीवर ।। एका विभूतीचे लेणें । एका भंडारभूषणें ।। रामदासी एक जाला । भेदभाव तो उडाला ।।

भावार्थ---

देव खंडोबा शिवाचा अवतार असून तो जेजुरीच्या गडावर वास्तव्य करुन आहे,खंडोबा एका निळ्या घोड्यावर स्वार झाले आहेत तर शिवशंकर धवल नंदीवर विराजमान झाले आहेत.एक महान विभूतीचे लेणे असून भंडारा हे भूषण मानतात.संत रामदास भेदभाव विसरून त्यांच्याशी एकरूप झाले आहेत.

अभंग---223

सोरटीचा देव माणदेशी आला । भक्तीसी पावला सावकाश ।। सावकाश जाती देवाचे यात्रेसी होति पुण्यराशी भक्तिभावें ।। भक्तिभावे देवा संतुष्ट करावें संसारी तरावें दास म्हणे ।।

भावार्थ---

सौराष्ट्रातील सोरटी सोमनाथ भाविकांच्या भक्तिप्रेमामुळे महाराष्ट्रातिल माणदेशी आला आणि सावकाश भक्तांना पावन केले.जे एकाग्रचित्तानें सावकाशपणे यात्रेला जातात ते मनातिल भक्तिभावामुळे पुण्यराशी बनतात.संत रामदास म्हणतात भक्तांनी आपल्या प्रेमभावाने देवाला संतुष्ट ,प्रसन्न करावे आणि हा संसार सागर तरून जावा, जन्म मरणाच्या वारीतून आपली सुटका करून घ्यावी .

अभंग---224

अनंत युगाची जननी । तुळजा रामवरदायिनी । तिचे स्वरूप उमजोनी । समजोनि राहे तो ज्ञाता ।। शक्तिविणें कोण आहे । हें तो विचारूनि पाहे । शक्तिविरहित न राहे । यशकीर्त्तिप्रताप ।। शिवशक्तिचा विचार । अर्धनारीनटेश्वर । दास म्हणे हा विस्तार । तत्वज्ञानी जाणती ।।

भावार्थ---

श्रीरामाला वर देणारी तुळजापूरची भवानी अनंत युगाची माता आहे. तुळजाभवानीचे खरे स्वरूप जो जाणून घेतो आणि सतत लक्ष्यांत ठेवतो तो खरा जाणकार (ज्ञाता ) समजावा, या जगांत कोणती गोष्ट शक्तिशिवाय राहू शकते असा विचार केल्यास यश, किर्ति ,पराक्रम या पैकी एकही गोष्ट शक्तिशिवाय राहू शकत नाही असे ल्क्ष्यांत येते. शिव आणि शक्ति म्हणजेच अर्धनारी नटेश्वर होय.हे विश्व शिवशक्तिचाच विस्तार आहे हे तत्वज्ञानी लोक जाणतात असे संत रामदास या अभंगात स्पष्ट करतात .

अभंग---225

सोहं हंसा म्हणिजे तो मी मी तो ऐसे । हे वाक्य विश्वासे विवरावें ।। विवरावें अहंब्रह्मास्मि वचन । ब्रह्म सनातन तूंचि एक ।। तूंचि एक ब्रह्म हेचि महावाक्य । परब्रह्मीं ऐक्य अर्थबोध ।। अर्थबोध रामीरामदासीं जाला । निर्गुण जोडला निवेदनें ।।

भावार्थ---

संत रामदास साधकाने निर्गृण भक्ती कशी साध्य करावी या विषयी सांगत आहेत .सोहं म्हणजे मी परमात्म्याचा अंश असून तो म्हणजेच मी व मी म्हणजेच तो या वाक्याचा खोलवर विचार करून चिंतन करावे .सनातन (अनंत काळापासून चालत आलेले) ब्रह्म तूच आहेस हे महावाक्य असून आत्मा परमात्मा एकरूप आहेत हाच अर्थबोध होतो ,संत रामदासांना हा अर्थबोध झाला आणि ते निर्गुणासी जोडले गेले.

अभंग---226

मायेभोवती भोंवावें तरी तिने कुरवाळावें ।। संत एकटा एकला । एकपणाहि मुकला ।। त्यासी माया असोनि नाहीं। ।आपपर नेणें काहीं ।। रामीरामदासी माय । व्याली नाहीं चाटिल काय ।।

भावार्थ---

संत रामदास साधकांना सांगतात, आपण मायेभोवती फेर धरला तरच ती आपल्याला कुरवाळून बंधनांत पाडते ,संत मायेच्या बंधनापासून अलग एकटे असतात म्हणून परमेश्वराशी एकरूप होतात व त्यांच्या एकांताचा सुध्दा अंत होतो ,त्यांच्या दृष्टीने माया असून नसल्या सारखीच असते .हे स्पष्ट करण्यासाठी संत रामदासांनी एक अगदी समर्पक उदाहरण दिले आहे ,रामदासी माय जर व्यालीच नाही तर वासराला चाटण्याचा मोहच नाही .संसारापासून मुक्त असलेले संत संसाराच्या मोह बंधनात अडकत नाहीत हेच ते स्पष्ट करतात .

अभंग---227

दृश्य सांडूनियां मागें । वृत्ति गेली लागवेगें ।। माया सांडूनी चंचळ । जाला स्वरूपीं निश्चळ ।। कांहीं भासचि नाडळे । वृत्ति निर्गुणीं निवळे ।। चराचरातें सांडिलें । बहुविधें ओलांडिलें ।। अवघें एकचि निर्गुण । पाहे वृत्तिच आपण ।। रामदास सांगे खूण । वृत्ति तुर्येचें लक्षण ।।

भावार्थ---

या अभंगात संत रामदास वृत्तिची निवृत्ति कशी होते या विषयी बोलत आहेत . संसाराचा दृश्य पसारा सोडून वृत्ति वेगानें नघून जाते तेव्हा साधक चंचळ माया सोडून ईश्वर स्वरुपाशी स्थीर होतो ,सारे भास विरून जातात आणि वृत्ति निर्गुणामध्ये मिसळून जाते .मायेचे सर्व पाश ओलांडून,चराचर सृष्टीच्या पलिकडील निर्गुणाशी एकरुप होते . साधक केवळ वृत्तिरुपाने उरतो, हिच तुर्यावस्था होय असे संत रामदास म्हणतात ,

अभंग---228

ज्याचे नाम घेसी तोचि तूं आहेसी । पाहे आपणासी शोधूनियां ।। शोधितां शोधितां मीपणचि नाहीं । मीपणाचें पाही मूळ बरें ।।

मूळ बरें पहा नसोनियां राहा ।

आहां तैसें आहां सर्वगत ।। सर्वगत आत्मा तोचि तूं परमात्मा । दास अहं आत्मा सांगतसे ।।

भावार्थ---

साधक स्वता:चा शोध घेत असतांना त्याला मी पणा कोठे सापडतच नाही,मी पणाचे मूळ न सापडल्याने मी पणाच नाही अशी त्याची धारणा होऊन आपण सर्व ठिकाणी व्यापलेले आत्मतत्व आहोत याचा साक्षात्कार होतो .सर्वत्र व्यापून असलेला आत्मा हाच परमात्मा असून तोच तूं आहेस असे संत रामदास सांगतात .मी देह नसून अविनाशी आत्मतत्व आहोत हे जाणून घेतले पाहिजे .

अभंग---229

दिसें तें नासेल सर्वत्र जाणती। या बोला व्युत्पत्ति काय काज ।। काज कारण हा विवेक पाहिजे । तरीच लाहिजे शाश्वतासी ।। शाश्वतासी येणें जाणें हें न घडे । आकार न मोडे दास म्हणे ।।

भावार्थ---

जे जे डोळ्यांना दिसते ते सर्व नाशवंत आहे हे सर्वजण जाणतात ,त्या साठी विशेष व्याकरण पटुत्वाची गरज नाही .प्रत्येक घटनेला कांहीतरी कारण असते तसेच घडणाय्रा प्रत्येक घटनेचा परिणाम अटळ असतो हे जाणून घेतले तरच शाश्वत आणि अशाश्वत गोष्टींचा उलगडा होतो.संत रामदास म्हणतात,आकाराला आलेली प्रत्येक वस्तु बदलत असते,नाश पावते आणि परत वेगळ्या स्वरूपांत निर्माण होते .शाश्वतासी बदल किंवा विनाश संभवत नाही.

अभंग---230

छायेमाजी छाया लोपे । तरि काय परूष हारपे ।। तैसा देह लोपतां । कदा न घडे मरण ।। खेळाअंतीं डाव हारपत । तरी कां नटासि आला मृत्य ।। रामदासी रामीं राम । जन्म मरण कैंचा भ्रम ।।

भावार्थ---

जन्म मरण हा केवळ मनाचा खेळ किंवा भ्रम आहे हे पटवून देण्यासाठी संत रामदास अत्यंत समर्पक उदाहरणे देतात .ज्या प्रमाणे सावली हा छाया प्रकाशाचा खेळ आहे,त्या प्रमाणे जन्म मृत्यू हा मनाचा खेळ आहे .रंगभुमीवर काम करणारा नट नाटकातील कथेप्रमाणे हरपला तरी तो नट मरण पावला असे होत नाही.देहाचा लोप झाला तरी मरण आले असे नाही कारण मी देह नसून आत्मस्वरुप आहे हे ज्याने जाणले तो अमर झाला .

अभंग---231

गेला स्वरूपाच्या ठायां । तिकडे ब्रह्म इकडे माया ।। दोहींमध्यें सांपडलें । मीच ब्रह्मसें कल्पिलें ।। ब्रह्म निर्मळ निश्चळ । माया चंचळ चपल ।। तिकडे वस्तु निराकार । इकडे मायेचा विस्तार ।। पुढे ब्रह्म मागें माया । मध्ये संदेहाची काया ।। रामीरामदास म्हणे । इतुकें मनाचें करणें ।।

भावार्थ---

साधक स्व-स्वरुपाचा शोध घेण्यास निघाला तेव्हां तो एकीकडे ब्रह्म आणि दुसरीकडे माया असा दोन्हीमध्यें सापडला आणि आपणच ब्रह्म आहोत अशी कल्पना केली.ब्रह्म निर्मळ ,निराकार आणि निश्चळ(चंचल नसणारे)तर माया चंचळ आणि चपळ ,पुढे ब्रह्म ,मागे माया त्यामध्ये साधक सापडून त्याच्या मनांत संदेह़ निर्माण होतो . संत रामदास म्हणतात, या सगळ्या मानसिक क्रिया आहेत.

अभंग---232

ब्रह्म हे जाणावें आकाशासारिखें । माया हे वोळखें वायू ऐसी वायू ऐसी माया चंचल चपळ । ब्रह्म ते निश्चळ निराकार निराकार ब्रह्म नाही आकारलें । रुप विस्तारलें मायादेवी मायादेवी जाली नांव आणि रूप । शुध्द सस्वरूप वेगळेचि। वेगळेचि परी आहे सर्वां ठायीं । रिता ठाव नाही तयांविणें तयाविणें ज्ञान तेचि अज्ञान । नाहीं समाधान ब्रह्मेविण ब्रह्मेविण भक्ति तेचि पै अभक्ति। रामदासी मुक्ति ब्रह्मज्ञानी

भावार्थ---

या अभंगांत संत रामदास माया आणि ब्रह्म यांचे स्वरूप स्पष्ट करून सांगत आहेत ,ब्रह्म हे आकाशासारखे निश्चळ, निराकार असून माया वायूसारखी अतिशय चपळ आणि चंचल आहे.ब्रह्म निराकार आहे म्हणजे त्याला कोणताही आकार नाही या उलट मायादेवी विविध नावांनी आणि रुपांनी खूप विस्तार पावली आहे .ब्रह्माचे स्वरुप अत्यंत शुध्द व सर्व वस्तुजातापेक्षा निराळे असूनही ते सर्व सजीव व निर्जीव सृष्टीला व्यापून राहिलें आहे,ब्रह्मतत्वाशिवाय अणूमात्रसुध्दां जागा रिकामी नाही.ब्रह्म म्हणजे परिपूर्ण ज्ञान असून त्या शिवाय ज्ञान म्हणजे अज्ञान होय .ब्रह्मतत्व जाणून घेतल्याशिवाय भक्ति ही केवळ अभक्ति आहे असे सांगून संत रामदास स्वप्रचितिने सांगतात की, आपणास ब्रह्मज्ञानानेच मुक्ति प्राप्त झाली .

अभंग---233

अनंताचा अंत पहावया गेलों । तेणें विसरलों आपणासी आपणा आपण पाहतां दिसेना । रूप गवसेना दोहींकडें दोहीकडे देव आपणची आहे। संग हा न साहे माझा मज माझा मज भार जाहला बहुत । देखतां अनंत कळों आला कळों आला भार पाहिला विचार। पुढें सारासार विचारणा विचारणा जाली रामीरामदासीं । सर्वही संगासी मुक्त केलें मुक्त केले मोक्षा मुक्तीची उपेक्षा । तुटली अपेक्षा कोणी एक

भावार्थ---

या अभगांत संत रामदास एका अनिर्वचनीय अनुभवाचे वर्णन करीत आहेत.अनंत ब्रह्मरुप परमात्म्याचे अंतिम स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असतांना आपण आपले स्वरुपच विसरुन गेलो आहोत ,त्या अनंतरुपांत स्वता:चे रुपच सापडेनासे झालें. आपले स्वरुप ब्रह्म स्वरुपाशी एकरुप झाले आहे असा अनुभव येऊन आपण नि:संग झालो ,आपल्या अस्तित्वाचा भार आपल्यालाच सोसवेनासा झाला आणि सारासार विचार करतांना आपण आणि हे अनंत स्वरुप वेगळे नाही याची जाणिव झाल्याने आपण नि:संग बनलो मुक्तीची उपेक्षा करुन मोक्ष या कल्पनेपासून मुक्त झालो,सर्व अपेक्षा अनंत स्वरुपांत विलीन झाल्या.

अभंग---234

ओळखतां ज्ञान ओळखी मोडली । भेटी हे जोडली आपणासी आपणासी भेटी जाली बहुदिसां । तुटला वळसा मीपणाचा मीपणाचा भाव भावें केला वाव। दास म्हणे देव प्रगटला

भावार्थ---

संत रामदास म्हणतात, जेव्हां चित्तात निखळ ज्ञानाचा झरा उगम पावला तेव्हां अज्ञान आपोआपच दूर झालें ,खूप दिवसांनी श्री रामाची भेट झाली आणि मीपणाच्या अहंकाराचा पडदा सहजपणें गळून पडला.श्रीरामा वरील अतूट भक्तिभावामुळे मी पणाचा भाव खोटा ठरला , श्री राम ज्ञानरूपाने प्रगट झाले.

अभंग---235

मीच ब्रह्म ऐसा अभिमान धरीं । जाणावा चतुरीं चोथादेहु चौथे देहीं सर्वसाक्षिणी अवस्था । ऐसी हे व्यवस्था चौदेहांची चौदेहांची गांठी शोधितां सुटली विवेके तुटली देहबुध्दि देहबुध्दी नाहीं स्वरूपीं पाहतां । चौथा देह आतां कोठें आहे कोठे आहे अहंब्रह्म ऐसा हेत । देहीं देहातीत रामदास

भावार्थ---

मी म्हणजेच ब्रह्म असे जाणून घेऊन जो त्या बद्दल अभिमान बाळगतो तोच चौथा देह आहे,हे चतुराईने समजून घ्यावे असे संत रामदास म्हणतात.मन, बुध्दी ,अहंकार व चित्त हा चौथा देह असून ही सर्वसाक्षिणी, (विश्वातील सर्व घटनांचे अवलोकन करून त्यांची संगती लावू शकणारी असामान्य क्षमता )या अवस्थेला संत तुर्या अवस्था मानतात.जागृती, स्वप्न, सुषुप्ती (गाढ झोप)व चौथी तुर्या अवस्था मानली जाते.या अवस्थेत साधक गाढ झोपेतही नसतो आणि पूर्ण जाग्रतावस्थेतही नसतो ,या अवस्थेत प्रज्ञा जाग्रुत असून साधकाची अलौकिक प्रतिभा ,विचार शक्ती जाग्रुत होते .या अवस्थेत चौदेहाची गाठी सुटून देहबुध्दी विवेकाने लोप पावतें.अहंकार म्हणजेच मी पणाचा भाव लुप्त होऊन अहंब्रह्म म्हणजेच मी च ब्रह्म आहे याचा साक्षात्कार होतो.संत रामदास स्वप्रचितीने सागंतात की या अवस्थेत साधक देहांत असूनही देहातीत अवस्थेंत पोचतो, परब्रह्म स्वरूपाशी एकरुप होतो.

अभंग---236

मायेचे स्वरूप ब्रह्मी उद्भवलें । तिच्या पोटी आलें महतत्व महतत्वीं सत्व सत्वीं रजोगुण । तिजा तमोगुण रजापोटीं पोटां पंचभूतें तयांचिया आली । दास म्हणे जाली सृष्टि ऐसी

भावार्थ---

या अभंगात संत रामदास सृष्टी कशी निर्माण झाली या विषयी सांगत आहेत . मायेचे स्वरूप ब्रह्मरूपात प्रकट झाले आणि तिच्या पोटी महतत्वाचा जन्म झाला.महतत्वातून सत्वगुण व सत्वगुणांतून रजोगुण निर्माण झाला,रजोगुणातून तमोगुणाचा उदय झाला.तमोगुणातून पंचमहाभूते प्रगट झाली आणि पंचमहाभूतातून सर्व सृष्टी निर्माण झाली .

अभंग---237

स्वप्न वाटे सार तैसा हा संसार । पाहतां विचार कळोंलागे ।। स्वप्न वेगींसरे संसार वोसरे । लालुचीच उरे दोहींकडे ।। दास म्हणे निद्राकाळी स्वप्न खरें। भ्रमिष्टासी बरें निद्रासूख ।।

भावार्थ---

स्वप्न हा मनातील कल्पनांचा खेळ ,केवळ आभास असतो तसा संसार आहे ,विचाराअंती हे कळून येते.स्वप्न जसे दिसते आणि वेगाने दिसेनासे होते ,तसाच संसार दिसतो आणि नासतो.मन मात्र लालचावल्या सारखे होते.संत रामदास म्हणतात निद्राकाळी स्वप्न खरें वाटते म्हणून भ्रम झालेल्या माणसाला निद्रासुख बरेंवाटतें.

अभंग---238

गळे बांधले पाषाणीं । आत्मलिंग नेणें कोणी ।। जीव शिवाचें स्वरूप । कोण जाणें कैसें रूप ।। लिंग चुकले स्वयंभ । धरिला पाषाणाचा लोभ ।। रामीरामदास म्हणे । भेद जाणतीं शहाणे

भावार्थ---

जीव हे शिवाचे स्वरूप असे सर्वजण म्हणतात परंतू हे रुप प्रत्यक्ष कसे आहे हे कोणीच जाणत नाही,स्वयंभू लिंग समजून पाषाणाची पूजा करतात ,त्याचाच लोभ धरतात. संत रामदास म्हणतात,स्वयंभू लिंग आणि पाषाण यांतील भेद फक्त शहाणे लोकच जाणतात .

अभंग---239

अंत नाही तो अनंत । त्यासि दोरी करी भ्रांत ।। ऐसें जनाचें करणें । कैसा संसार तरणें ।। देव व्यापक सर्वांसी । त्यास म्हणती एकदेशी ।। रामदासी देव पूर्ण । त्यासी म्हणती अपूर्ण ।।

भावार्थ---

दोरी बघून भ्रांती पडल्यामुळे दोरीलाच साप समजतो व भितीने गर्भगळित होतो ,अज्ञानामुळे सामान्य माणुस असे वर्तन करतो त्या मुळे त्याला संसार सागर तरून जाणे अवघड जाते असे सांगून संत रामदास म्हणतात की,देव सर्व सृष्टीत,अणुरेणूत व्यापून राहिलेला असूनही आपण त्याला स्थळ कांळाच्या बंधनांत अडकवतो .अनंत परमेश्वराची मूर्ती बनवून त्याची पूजा करतो.जो पूर्ण आहे त्याला अपूर्ण ,जो अविनाशी आहे त्याचे आवाहन व विसर्जन करतो.

अभंग---240

जन्मवरी शीण केला । अंत:काळीं व्यर्थ गेला ।। काया स्मशानीं घातली । कन्यापुत्र मुरडलीं ।।

घरवाडा तो राहिला । प्राणी जातसे एकला ।।

धनधान्य तें राहिलें । प्राणी चरफडीत गेले ।। इष्टमित्र आणि सांगाती । आपुलाल्या घरां जाती ।। दास म्हणे प्राणी मेले । कांहीं पुण्य नाहीं केलें ।।

भावार्थ---

संत रामदास म्हणतात, माणुस आयुष्यभर घरसंसार ,धनधान्य, सगेसोयरे,इष्टमित्र यांच्यासाठी कष्ट घेतो परंतू अंत:काळी सर्व व्यर्थ जाते .घरदार, धनधान्य सगळं सोडून प्राणी चरफडत एकटाच निघून जातो.देह स्मशानांत ठेवून सर्व सांगाती,मित्र, कन्यापुत्र तेथून निघून आप आपल्या घरी जातात .कोणतंही पुण्य त्याच्या कामी येत नाही.

अभंग---241

कल्पनेची भरोवरी । मन सर्वकाळ करी ।। स्वप्न सत्यचि वाटलें । दृढ जीवेसीं धरिलें ।। अवघा मायिक विचार । तोचि मानिला साचार ।। नानि मंदिरें सुंदरे । दिव्यांबरें मनोहरें ।। जीव सुखें सुखावला । थोर आनंद भासला ।। रामदास म्हणे मद । लिंगदेहाचा आनंद ।।

भावार्थ---

माणसाचे मन सतत कल्पनांच्या भरारी घेण्यांत रममाण होत असते ,स्वप्न हेच सत्य समजून तो त्याला घट्ट कवटाळून धरतो . हा सगळा मायेचा खेळ तो खरा आहे असे समजतो.अनेक भव्य,दिव्य ,सुंदर मंदिरें त्याच्या मनाला मोह घालतात ,जीवाला सुखावतात,खूप आनंद देतात.संत रामदास म्हणतात,हा केवळ देहाचा आनंद असून तो नश्वर आहे,स्वप्ना सारखा काल्पनिक आहे.

अभंग---242

नवस पुरवी तो देव पूजिला । लोभालागीं जालां कासाविस कासाविस जाला प्रपंच करितां । सर्वकाळ चिंता प्रपंचाची प्रपंचाची चिंता करितांचि मेला । तो काय देवाला उपकार उपकार जाला सर्व ज्यां लागोनि । ते गेलीं मरोनि पाहतसे पहातसे पुढें आपणहि मेला । देवासि चुकला जन्मवरी

भावार्थ---

सर्वसामान्यपणे माणुस सतत प्रपंचाची चिंता करीत असतो,प्रपंच्याच्या काळजीने त्याचा जीव कासाविस होतो.त्या मुळे तो देवाला पुजून नवस बोलतो.देव नवसाला पावावा या लोभामुळे काकुळतिला येतो आणि प्रपंचाची चिंता करता करता मरून जातो,शेवटी तो प्रपंचाला व परमार्थाला दोन्हीला पारखा होतो .संत रामदास म्हणतात, प्रपंचाचा लोभ सोडून सर्वभावे देवाची भक्ती करून ,सर्व भाव देवावर सोपवल्यास प्रपंच व परमार्थ दोन्ही साधतां येईल.

अभंग---243

कर्ता एक देव तेणें केलें सर्व । तयापासी गर्व कामा नये ।। देह हें देवाचें वित्त कुबेराचें । तेथें या जीवाचें काय आहे देता देवविता नेता नेवविता । कर्ता करविता जीवा नव्हे ।।

निमित्ताचा धणी केला असे प्राणी ।

पाहतां निर्वाणीं जीव कैचा ।। लक्षुमी देवाची सर्व सत्ता त्याची । त्याविण देवाची उरी नाहीं ।। दास म्हणे मना सावध असावें । दुश्चित नसावे सर्वकाळ ।।

भावार्थ---

देव सर्व घटनांचा कर्ता असून त्यानेच हा सर्व विश्व पसारा निर्माण केला आहे तेव्हां आपण गर्व करणे योग्य नाही.आपला देह देवाचा असून धनसंपत्ती कुबेराची आहे .देव सारे देणारा, नेणारा आणि करविणारा आहे.मनुष्य प्राणी केवळ निमित्तमात्र आहे .लक्षुमी व सर्व सत्ता देवाची असून देवाशिवाय जीवाचे कांहीं नाही या साठी संत रामदास सांगतात कीं,आपण केव्हांही मनाने खिन्न न होतां सावधचित्त असावें .

अभंग---244

नको करू अभिमान । होणार तें देवाधीन ।। बहू द्रव्यानें भुलले । काळें सर्वहि ग्रासिलें ।। जे जे म्हणती मी शक्त। ते ते जाहले अशक्त ।। रामदास सांगे वाट । कैसा होईल शेवट ।।

भावार्थ---

संत रामदास सांगतात, भविष्यातील सर्व घटना दैवाधीन आहेत .त्यांचा अभिमान धरु नये .खूप धन संपत्तीने धनिक भुलून जातात परंतू ती नश्वर असल्याने कालांतराने विनाश पावते .जे स्वता:ला शक्तीशाली समजतात ते शक्तीहीन होऊन लयास जातात ,

अभंग---245

अर्थेविण पाठ कासया करावें । व्यर्थ कां मरावें घोकुनियां ।। घोकुनियां काय वेगीं अर्थ पाहें । अर्थरूप राहे होउनियां ।। होउनियां अर्थ सार्थक करावें । रामदास भावें सांगतसे ।।

भावार्थ---

पसंत रामदास सांगतात ,अभंगातिल शब्दांचे अर्थ समजून न घेतां केवळ घोकून पाठांतर करण्याचे सारे श्रम फुकट जातात .कवनातील अर्थाशी एकरूप होऊन पाठ केले तर त्याचे सार्थक होते ,त्यात सांगितलेला भाव जीवनांत उतरतो आणि जीवाचे कल्याण होते .

अभंग---246

माजीं बांधावा भोपळा । तैसी बांधू नये शिळा ।। घेऊं येतें तेंचि घ्यावें । येर अवघेंचि सांडावें ।। विषयवल्ली अमरवल्ली । अवघीं देवेचि निर्मिली ।। अवघें सृष्टीचें लगट । करुं नये कीं सगट ।। अवघें सगट सारिखेंची । वाट मोडली साधनाची ।। आवघेचि देवे केलें । जें मानेल तेंचि घ्यावें ।। दास म्हणे हरिजन । धन्य जाणते सज्जन ।।

भावार्थ---

पाण्यामध्ये पोहतांना भोपळा बांधून पाण्यांत उतरल्यास बुडण्याची भिती नसते ,पण त्या ऐवजी शिळा बांधली तर पोहणारा शिळेसह पाण्यांत बुडून जाणार या साठी ज्या कामासाठी ज्या गोष्टीचा उपयोग करणे योग्य त्यांचाच उपयोग करावा ,अयोग्य गोष्टींचा त्याग करावा.विषवल्ली (जी सेवन केल्यानंतर तात्काळ मृत्यु येतो)व अमरवल्ली ( जिच्यामुळे अमरत्व प्राप्त होते) या दोन्हीही निसर्गनिर्मित आहेत परंतू त्यांचा उपयोग सरसकट करता येत नाही.जे आपल्याला मानवेल तेच स्विकारावे असे सांगून संत रामदास म्हणतात, संत सज्जन धन्य होत ते आपल्या हिताचे असेल ते च करायला सांगतात.

अभंग---247

त्रैलोक्याचें सार वेदा अगोचर । मंथुनी साचार काढियेले ।। तें हें संतजन सांगती सज्जन । अन्यथा वचन मानूं नये ।। जें या विश्वजनां उपयोगी आलें । बहुतांचें जालें समाधान ।। रामीरामदासीं राघवीं विश्वास । तेणें गर्भवास दुरी ठेला ।।

भावार्थ---

त्रिभुवन(स्वर्ग ,पृथ्वी ,पाताळ ) या तिन्ही भुवनांचे सार जे वेदामध्ये स्पष्ट केले आहे ते संत सामान्य लोकांना सांगतात, आपण ते खोटे आहे असे मानू नये कारण ते ज्ञान विश्वतील अनेक लोकांना उपयोगी आले आहे,त्या मुळे अनेकांचे समाधान झाले आहे.संत रामदास म्हणतात,आपला राघवावर दृढ विश्वास आहे कारण श्री रामाच्या कृपाप्रसादामुळेच आपली जन्म मरणाच्या चक्रातून सुटका झाली .

अभंग---248

वेधें बोधावें अंतर ।भक्ति घडे तदनंतर ।। मनासारिखें चालावें । हेत जाणोनि बोलावें ।। जनी आवडीचे जन । त्याचे होताती सज्जन ।। बरें परिक्षावें जनां । अवघें सगट पिटावेना ।। दास म्हणे निवडावे ।लोक जाणोनियां घ्यावे ।।

भावार्थ---

संत रामदास या अभंगात लोकनेत्याने कसे आचरण ठेवावे या विषयी मार्गदर्शन करीत आहेत .अनेक लोकांचे अंतरंग समजून घ्यावे,त्या नंतर लोक भक्तिमार्गाला लागतात.लोकांच्या मनातिल हेतू जाणून बोलावे,त्यांच्या मनाप्रमाणे वागावे.लोकांना प्रिय असलेले नेतेच लोक संत सज्जन म्हणून स्विकारतात.सरसकट सर्व माणसे सारखी नसतात तेव्हां लोकांना समजून घेऊन योग्य माणसांची निवड करावी.

अभंग---249

एक उपासना धरीं ।भक्ति भावें त्याची करीं ।। तेणें संशय तुटती । पूर्वगुण पालटती ।। सर्व नश्वर जाणोन वृत्ति करी उदासीन ।। सत्य वस्तूच साचार ।त्याचा करावा विचार ।। त्यागोनियां अनर्गळ । सदा असावें निर्मळ ।। ध्याने आवरावें मन । आणि इंद्रियदमन ।। अखंड वाचे रामनाम ।स्नान संध्या नित्यनेम ।। दास म्हणे सर्वभाव । जेथे भाव तेथें देव ।।

भावार्थ---

या अभंगात संत रामदास साधकांना मार्गदर्शन करीत आहेत .आपले एक उपास्य दैवत ठरवून भक्तिभावाने त्याची उपासना करावी .त्या मुळे मनातिल सर्व संशयाचे निरसन होते आणि आपले पूर्वगुण पालटतात .केवळ ईश्वर हीच सत्य वस्तू असून बाकी सर्व विनाशी आहे ,याचा विचार करून आपली वृत्ति उदासीन करावी (मोह, माया,राग,लोभ यांचा त्याग करावा .)समाजांत अमान्य असलेल्या (अनर्गळ ) गोष्टींचा त्याग करावा ,मनानें निर्मळ असावे .इंद्रिये ताब्यांत ठेवून ध्यानमार्गाने मनावर ताबा मिळवावा .स्नानसंध्या नित्यनेमाने करावी आणि वाचेने अखंड रामनामाचा जप करावा .जेथें भक्तिभाव तेथे देव असून बाकी सर्व फापट पसारा आहे असे समजून त्याचा त्याग करावा .

अभंग---250

दु:खे दु:ख वाढत आहे । सुखे सुख वाढत आहे ।। बय्रानें बरेचि होते । वाईटें वाईट येतें ।। हटानें हट वळावें । मिळतां मिळणी फावें ।। सुशब्दे माणुस जोडें । कुशब्दे अंतर मोडें ।। प्रीतीनें प्रीतीच लागे । विकल्पें अंतर भंगें ।। सेवके दास्य करावें । राघवें प्रसन्न व्हावें ।।

भावार्थ---

चांगल्या कर्माचे फळ चांगले मिळते व वाईट कर्माचे फळ वाईट असते हा कर्मफळाचा सनातन सिध्दांत सागून संत रामदास म्हणतात, दु:खानें दु:ख आणि सुख दिल्यानें सुख वाढते .दुष्ट लोकांकडून दुष्टांना वठणीवर आणावें आणि चांगल्या लोकांना सुशब्दांनी आपलेसे करावें .प्रेमळपणे प्रेमळांना जिंकावें .संशयामुळे मने दुखावली जातात म्हणुन मनामध्यें विकल्प नसावा .श्रीरामाचा दास बनून राघवाचे दास्य करावें आणि राघवाने प्रसन्न होऊन कृपा करावी .

अभंग---251

माता पिता जन स्वजन कांचन । प्रियापुत्रीं मन गोवू नको ।। गोवू नको मन राघवेंवांचोनी । लोकलाज जनीं लागलीसे ।। लागलीसे परी तुवां न धरावी । स्वहितें करावी रामभक्ति ।। रामभक्तिविण होसिल हिंपुटी । एकलें शेवटीं जाणें लागे ।। जाणें लागे अंती बाळा सुलक्षणा । ध्याई रामराणा दास म्हणे ।।

भावार्थ---

आई,वडील,नातेवाईक, सगेसोयरे,प्रिय पत्नी,मुलेबाळे यांच्यामध्यें मन अडकवू नकोस .समाजांत राहातांना लोकमताचा विचार करावा लागतो परंतू त्या गोष्टीचा फार विचार न करतां स्वता:च्या हिताचा विचार करून रामभक्ति करण्यांत आपला वेळ सार्थकी लावावा. आयुष्याच्या शेवटी सर्व सोडून एकट्याला मृत्युला सामोरे जावेंलागते.अंतकाळी एका राघवाचा आसरा लाभतो,तोच जीवन मरणाच्या चक्रातून सोडवणारा आहे. श्री रामाचे सतत स्मरण ठेवून निरंतर रामाचे ध्यान करणे या शिवाय दुसरे सुलक्षण नाही हे समजून घेऊन रामभजनी लागावें असे संत रामदास या अभंगात सांगत आहेत .

अभंग---252

देव पाषाण भाविला । तोचि अंतरीं दाविला ।। जैसा भाव असे जेथें । तैसा देव वसे तेथें ।। दृष्य बांधोनिया गळां । देव जाहला निराळा ।। दास म्हणे भावातीत । होतां प्रगटे अनंत ।।

भावार्थ---

पाषाणाची (दगडाची ) मुर्ती करून तोच देव आहे असा भाव अंतरात निर्माण केला तर तीच प्रतिमा मनांत ठसतें.जसा भाव तसाच देव दिसतो.विश्वाचा पसारा निर्माण करून परमेश्वर त्या पासून निराळा झाला .संत रामदास म्हणतात , इंद्रियांना दिसणार्या दृष्य विश्वापासून दूर (भावातीत ) झाल्याशिवाय अनंत परमेश्वराचे दर्शन घडणार नाही .

अभंग---253

जाला स्वरुपीं निश्चय ।तरि कां वाटतसे भय ।। ऐसे भ्रमाचे लक्षण । भुले आपणां आपण ।। क्षण एक निराभास । क्षणें म्हणे मी मनुष्य ।। रामीरामदास म्हणे । देहबिध्दीचेनि। गुणे ।।

भावार्थ---

आपण परमेश्वराचा अंश आहोत असा अद्वैत भाव मनामध्यें स्नानिर्माण होऊन अहंम ब्रह्मास्मी असा मनाचा निश्चय होतो,तरी भयाची भावना निर्माण होते कारण आपल्या मूळ स्वरुपाचा आपल्याला विसर पडतो.हेच भ्रमाचे लक्षण आहे .एका क्षणी सर्व संशयाचा निरास होऊन मन नराभास होते,आपल्या स्वरुपाशी एकरूप होते तर दुसऱ्या क्षणी आपण व सत्स्वरुप भिन्न असून ,आपण अविनाशी आत्मतत्व नसून मर्त्य मानव आहोत अशी धारणा होते हे देहबुध्दी मुळे घडते असे संत रामदास म्हणतात.

अभंग---254

स्नान संध्या टिळेमाळा । पोटी क्रोधाचा उमाळा ।। ऐसे कैसें रे सोवळें। । शिवतां होतसे ओवळें ।। नित्य दांडितां हा देहो परि फिटेना संदेहो ।। बाह्य केली झळफळ । देहबुध्दीचा विटाळ ।। नित्यनेम खटाटोप ।मनीं विषयाचा जप ।। रामदासी द्रुढ भाव । तेणेविण सर्व वाव ।।

भावार्थ---

कपाळावर गंधाचा टिळा, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा धारण करून रोज नियमाने स्नान संध्या करुनही मनामध्ये कामक्रोधाची भावना असेल तर हा व्यर्थ खटाटोप आहे .देहदंड करून उपासना केली तर मनाची झळफळ शांत होत नसेल तर हा केवळ बाह्य देखावा ठरतो .त्यामुळे सोवळे, ओवळे हे संदेह मिटत नसतील मनातील नाना कामना,वासना नाहिशा होत नसतील तर हा केवळ देहबुध्दीचा विटाळ समजावा.संत रामदास म्हणतात,राम चरणी दृढ विश्वास असल्याशिवाय या सर्व गोष्टी मातीमोलाच्या आहेत .

अभंग---255

सुडकें होतसे झाडाचें । पटकर होतसे हाडाचें ।। यांत सोवळें तें कोण । पाहा पाहा विचक्षण ।। पाहों जातां घरोघर । कथीकेची एक धार ।। चुडे दांतवले हाडें । पाहा सोंवळें निवाडें ।। न्यायनीति विवंचना । हिंगावाचुनी चालेना ।। दास म्हणे रे संतत ।कांहीं पाहों नये अंत ।।

भावार्थ---

झाडापासून कापसाचे वस्त्र (सुडकें ) मिळते तर हाडापासून रेशमी वस्त्र (पटकर) ,या वर सखोल विचार केला तर समजते कीं, सोवळे कोणते.घरोघर जाऊन पाहिले तर हे लक्ष्यांत येते कीं, सगळीकडे परिस्थिती सारखीच आहे (कढीची धार एकच आहे ) संत रामदास म्हणतात,सोवळे ओवळे ,न्यायनिती यांचा निवाडा हिंगावाचुन चालत नाही म्हणजे जिवनावश्यक गोष्टींशिवाय होत नाही तेव्हा न्याय,निती,सोवळें , ओवळे यांचा सतत विचार करु नये.

अभंग---256

एक लाभ सीतापती । दुजी संतांची संगती ।। लाभ नाही यावेगळा ।थोर भक्तीचा जिव्हाळा ।। हरिकथा निरूपण । सदा श्रवणमनन ।। दानधर्म आहे सार । दास म्हणे परोपकार ।।

भावार्थ---

जीवनांत सीतापतीचा (श्रीरामभक्तीचा ) लाभ होणे हा सर्वात मोठा लाभ आहे या शिवाय संतांची संगती लाभणे हा दुसरा महत्त्वाचा लाभ होय .भक्तिचा जिव्हाळा हा सर्वात थोर लाभ आहे असे सांगून संत रामदास म्हणतात कीं,हरिकथेचे सतत श्रवण , मनन आणि निरुपण तसेच दानधर्म आणि परोपकार हे जीवनाचे सार आहे ,

अभंग---257

पापपुण्य समता घडे । तरीच नरदेह जोडे ।।

याचें सार्थक करावें ।आपणासी उध्दरावें ।।

बहुत जन्मांचे शेवटीं । नरदेह पुण्यकोटि ।। रामदास म्हणे आतां । पुढती न लाभे मागुतां ।।

भावार्थ---

संत रामदास म्हणतात कीं, जेव्हां साधकाच्या जीवनांत पाप पुण्याचे माप सारखे होते,समानता घडते तेव्हांच नरदेहाची प्राप्ती होते. पुष्कळ जन्मांचे शेवटी हा योग घडून येतो आणि त्यानंतर परत पुण्कोटी नरदेहाचा लाभ मिळत नाही या साठी मिळालेल्या नरदेहाचे सार्थक करून घ्यावे व आपला उद्धार करून घ्यावा.

अभंग---258

तीर्था जाती देखोवेखी। तेथे कैसी होतें पाखी ।। पाप-गेलें पुण्य जालें । कैसे प्रत्ययासी आलें ।। दोषापासूनि सूटला । प्राणी मुक्त कैसा जाला ।। म्हणती जाऊ वैकुंठासी । कैसें येते प्रत्ययासी।। रामदास म्हणे हित । कैसें जाहलें। स्वहित ।।

भावार्थ---

साधकानें पवित्र तिर्थस्थाने बघण्यासाठी तेथे जाऊन त्याच्या देहमनाची शुध्दता कशी होते , पाप धुऊन जावून पुण्य कसे झाले याचा प्रत्यय (अनुभव )कसा आला,दोषापासून सुटून प्राणी मुक्त कसा झाला हे कसे समजून घ्यावे यानंतर वैकुंठाची प्राप्ती होणार हा विश्वास कसा निर्माण झाला .संत रामदास म्हणतात, केवळ देवावरील अढळ विश्वासामुळें हिताचे स्वहित झालें.

अभंग---259

मन-कर्णिकेमाझारी ।स्नानसंकल्प निवारी ।। स्नान केलें अंतरंगा । तेणें पावन जाली गंगा ।। गुरुपायी शरण प्रेमें । तोचि त्रिवेणीसंगम ।। रामकृपेचे वाहे जळ। रामदासी कैसा मळ ।।

भावार्थ---

साधक पवित्र तिर्थस्थानी जाऊन तेथील पावन नदीच्या जलांत (मनकर्णिका)स्नान करण्याचा संकल्प पुर्ण करतो या पुण्याने त्याचे अंतरंग अमल होते.या शुध्द अंतकरणाने साधक आपल्या गुरु चरणांशी प्रेमाने शरणागत होतो.संत रामदास म्हणतात,रामकृपेच्या पवित्र जलांत रामाचे दास अंतरंगाने मलीन राहूच शकणार नाही .कारण हा त्रिवेणी संगम आहे।

अभंग---260

आत्मारामेविण। रितें । स्थळ नाहीं अनुसरतें ।। पाहतां मन बुध्दि लोचन । रामेविण न दिसे आन ।। सवडी नाहीं तीर्थगमना । रामें रुधिलें त्रिभुवन ।। रामदासी। तीर्थभेटी । तीर्थ राम होउनि उठी ।।

भावार्थ---

संत रामदास म्हणतात , आत्माराम सर्व अणुरेणुमध्ये व्यापून राहिला आहे .असे एकही ठिकाण नाही कीं,तेथे आत्माराम नाही. मन, बुध्दी आणि लोचन यापैकीं कोणत्याही आंतर किंवा बाह्य ज्ञानेंद्रियांनी पाहिले तरी रामाशिवाय अन्य कांही दिसत नाही.रामाने हे त्रिभुवन व्यापून टाकले आहे त्या मुळे तीर्थाटना साठी स्थानच उरले नाही.जेथे जावे तेथे श्री रामच भरून राहिला आहे.

अभंग---261

परमेष्ठी परब्रह्म। । तोचि माझा आत्माराम। ।। कैसें केलें संध्यावंदन । सर्वां भूतीं हो नमन ।। नाहीं आचमनासी ठावो । तेथे नामचि जालें वावो ।। जेथें हरपले त्रिकाळ । ऐसी संध्येसि साधली वेळ ।। कळिकाळा तीन चूळ पाणी । रामदास दे सांडुनी ।।

भावार्थ---

सर्वात श्रेष्ठ असे जे परब्रह्म तोच आपला आत्माराम आहे असे सांगून संत रामदास म्हणतात,संध्यासमयी सुर्याला केलेले वंदन म्हणजे विश्वातील सर्व प्राणिमात्रास केलेले नमन होय.येथे संध्या करतांना आचमनास देखील ठिकाण नाही. ज्या वेळी भूत, भविष्य ,वर्तमान हे तिन्ही काळ एकमेकांत मिसळून जातात अशी संध्याकाळची वेळ साधून कळिकाळाला तीन वेळा पाणी देवून संत रामदास आपली संध्या करतात.

अभंग---262

पूर्वोच्चरिते ओंकार । प्रणवबीज श्री रघुवीर ।। ब्रह्मयज्ञ कैसा पाहें । अवघें ब्रह्मरुप आहे ।। देवर्षि पितृगण । तृप्ति श्रीरामस्मरण ।। सव्य अपस्व्य भ्रांति । ब्रह्म नि:संदेह स्थिति ।। आब्रह्मस्तंभ पर्यंत । राम सबाह्य सदोदित ।। दासीं ब्रह्मयज्ञ सफळी । संसारासी तिळांजुळी ।।

भावार्थ---

ॐ काराचे म्हणजे प्रणवाचे मूळबीज श्री रघुवीर असून त्याचा उच्चार मंत्राच्या प्रारंभी केला जातो .अखिल विश्व ब्रह्मरुप असून सतत ब्रह्मयज्ञ चालू असतो.देव, ऋषी ,पितृगण केवळ श्रीरामांच्या नामस्मरणाने प्रसन्न होतात.ब्रह्म हे कोणत्याही संदेहा पलिकडील स्थिति असून मंत्रोपचारा पूर्वी-करावयाचे सव्य, अपसव्य (डावे,उजवे ) हे केवळ उपचार आहेत असे सांगून संत रामदास म्हणतात,श्रीराम या विश्वाला आतून बाहेरुन व्यापून राहिला आहे .संसाराला तिलांजली देऊन संत रामदासांनी हा ब्रह्मयज्ञ सफळ संपूर्ण केला आहे .

अभंग---263

अनित्याचा भ्रम गेला । शुध्द नित्यनेम केला ।। नित्यानित्य हा विचार । केला स्वधर्म आचार ।। देहबुध्दि अनर्गळ । बोधें फिटला विटाळ ।। रामदासी ज्ञान जालें । आणि स्वधर्म रक्षिलें ।।

भावार्थ---

संत रामदास म्हणतात,रामनाम जपाचा शुध्द नित्यनेम केल्यानंतर मनातील अनित्य (सतत बदलणार्या )नाशवंत गोष्टींचा भ्रम दूर झाला .नित्य,अनित्याचा विचार जावून स्वधर्माचा आचार सुरु झाला ,मी आत्मा नसून देह आहे ही खोटी देहबुध्दी लोप पावून मनाची मलीनता दूर झाली .शुध्द ज्ञानाचा उगम झाला आणि स्वधर्माचे रक्षण झाले .

अभंग---264

एकादशी नव्हे व्रत । वैकुंठीचा महापंथ ।। परी रुव्मांगदाऐसा ।व्हावा निश्चय मानसा ।। एकादशीच्या। उपोषणे । विष्णुलोकीं ठाव घेणें ।। रामीरामदास म्हणे । काय प्रत्यक्षा प्रमाण ।।

भावार्थ---

एकादशी हे केवळ एक व्रत नसून वैकुंठाला जाण्याचा तो महान पंथ आहे .रखुमाईपतीला भेटण्याचा मनाचा निश्चय करून एकादशीचे उपोषण करावे आणि विष्णुलोकी निवास करावा. एकादशी उपोषणाचे पुण्य महान आहे. संत रामदास म्हणतात, प्रत्यक्ष दिसणार्या गोष्टींना प्रमाणाची जरुरी नसते .

अभंग---265

क्षीरापतीची वाटणी । तेथें जाली बहु दाटणी । पैस नाहीं राजांगणी। कोणालागी ।। रंगमाळा नीरांजने । तेथें वस्ती केली मनें । दिवस उगवतां सुमनें। कोमाईली ।। रथ देवाचा ओढिला । यात्रेकरा निरोप जाला । पुढें जायाचा गल्बला । ठायीं ठायीं ।। भक्तजन म्हणती देवा । आतां लोभ असों द्यावा । बहु सुकृताचा ठेवा । भक्ति तुझी ।। दास डोंगरी राहतो । यात्रा देवाची। पाहतो । देव भक्तासवें जातों । ध्यानरुपे ।।

भावार्थ---

या अभंगांत संत रामदास एकांत स्थळी डोंगरावर निवास करुन तेथून देवाची यात्रा पाहून यात्रेचे वर्णन करीत आहेत.यात्रेमध्ये भक्तांची एव्हढी गर्दी दाटली आहे की,कोणाला पाय ठेवायला देखील जागा नाही .पताका,दिव्यांची रोषणाईयांत माणसांची मने रंगून गेली आहेत .दिवसा उमलणार्या फुलांप्रमाणे मने मोहरून आली .देवाचा रथ ओढण्यासाठी निरोप येतांच पुढे जाण्याची एकच गडबड उडाली .भक्तजन देवाची आळवणी करतात की,खूप पुण्याचाठेवा म्हणजेच देवाची भक्ति ,आता भक्तांवर असाच लोभ ठेवावा .ही नितांत भक्ती पाहून देव भुलतो आणि ध्यानमार्गाने भक्तांच्या मनांत शिरून त्यांच्या बरोबर जातो .

अभंग---266

गेला प्रपंच हातींचा । लेश नाही परमार्थाचा ।। दोहींकडें अंतरला । थोरपणें भांबावला ।। गेली अवचितें निस्पृहता। नाहीं स्वार्थहि पुरता ।। क्रोधे गेला। संतसंग । लोभें जाहला वोरंग ।। पूर्ण जाली नाहीं आस । इकडे बुडाला अभ्यास ।। दास म्हणे क्रोधे केलें । अवघे लाजिरवाणें जालें ।।

भावार्थ---

ज्या साधकाला प्रपंच सावधपणे करतां येत नाही त्याला परमार्थही साधतां येणार नाही असे सांगून संत रामदास म्हणतात , असा साधक दोन्ही गोष्टींना पारखा होतो.त्याची निस्पृहता (कोणतिही गोष्ट मिळवण्याची ईच्छा) लयाला जाते.पण मनामध्ये स्वार्थ ही नसतो.अहंकाराने क्रोध निर्माण होतो आणि तो सत्संगाला मुकतो.लोभामुळे रंगाचा बेरंग होतो.त्या साधकाच्या आशा,आकांक्षा पूर्ण होऊ शकत नाही,निराशेमुळे साधनेमध्यें खंड पडतो.प्रपंच आणि परमार्थ दोन्ही बुडतो, त्याचे जीवन लाजिरवाणे होते.

अभंग---267

थोर अंतरी भडका । आला क्रोधाचा कडका ।। नित्य निरूपणी बैसे । अवगुण जैसे तैसे ।। लोभें भांबावले मन । रुक्यासाठी। वेंची प्राण ।। दंभ विषयीं वाढला । पोटीं कामें खवळला ।। मदमत्सराचा कांटा । अहंकारें धरीं ताठा ।। दास म्हणे जालें काय । श्रोती। राग मानू नये ।।

भावार्थ---

मनामध्यें क्रोध शिरला की, अंतकरणांत रागाचा अग्नी भडकतो ,मग कथा निरुपणाला बसला तरी त्या पासून काहीं बोध मिळत नाही आणि अवगुण सरत नाहीत ,त्यांत मनांत लोभ शिरला तर रुपयासाठी प्राण देखिल देण्यास तयार होतो.त्यातच दंभ वाढीस लागतो अनेक प्रकारच्या कामना निर्माण होतात.या कामनांमुळे अहंकार (गर्विष्ठपणा) वाढून अनेकांचा द्वेष ,मत्सर करु लागतो ,संत रामदास म्हणतात, काम, क्रोध,लोभ, मद, मत्सर, दंभ, हे सहा साधकाचे शत्रु आहेत असे समजावें ,या कथनाचा राग मानू नये ,

अभंग---268

हो कां मुमुक्षु अथवा मुक्त । आहे विषयांचा आसक्त ।। विवेकवैराग्यसंग्रह ।करणें लागे यावद्देह ।। रामीरामदास म्हणें । शांति ज्याच्या दृढपणें ।।


भावार्थ---

मोक्षाची ईच्छा करणारा साधक असो किंवा मुक्त साधक असो तो इंद्रियजन्य विषयांत आसक्त होण्याची शक्यता असते.यासाठी जो पर्यंत देहांत जीव आहे तो पर्यंत विवेक आणि वैराग्य या साठी प्रयत्न करणे जरुर आहे असे सांगून संत रामदास म्हणतात,विवेक आणि वैराग्य ज्यांच्या मनांत पूर्णपणे रुजला आहे तेथे मनःशांती द्रुढपणे विराजमान असते.

अभंग---269

वृध्द ते म्हणती संसार करावा । जनाहातीं घ्यावा म्हणुनी बरें ।। म्हणताती जन बरें ते कोणाला । बुडविती त्याला ऐशा बोधी ।। वैश्वदेव दान अतिथी तो घडें । टाकी एकीकडे केले दोष ।। मूर्ख तो म्हणाला काय जी वाल्मिक । टाकितां सकळिक मुक्त जाला ।। रामदास म्हणे कथिलें। जे वेदीं । तया मात्र बंदी इतर थोर ।।

भावार्थ---

काहीं वृध्द अनुभवी लोक म्हणतात की,संसाराचा त्याग करु नये कारण त्यांमुळे जनसंपर्क वाढतो,वैश्वदेव व दानधर्म घडून पुण्यसंचय घडतो तसेच अतिथींचा आदरसत्कार करण्याची संधी मिळते त्यामुळे सर्व दोषांचे निराकरण होते.या वर उत्तरा दाखल संत रामदास विचारतात, सर्वस्वाचा त्याग करून मुक्ती मिळवणारा वाल्मिकी ऋषींना मूर्ख कसे ठरवतां येईल? वेदांनी जे सांगितलें आहे ते प्रमाण मानून थोर लोक वेदांना वंदन करतात.

अभंग---270

सर्वस्व बुडती ऐसी जे मातोक्ती। न धरावी चित्तीं साधकांनी ।। भरत तो मूर्ख काय होतां सांग। मातेचा तो त्याग। केला जेणें ।। पित्याने त्यागिलें। दैत्येद्रें प्रल्हादें । कां त्यासी गोविंदें स्नेह केला ।। दैत्य बिभीषणें टाकीयेला बंधु । रामासी संबंधु। जोडियेला ।। रामदास म्हणे। शुक्र होतां गुरू । परंतु दातारु। धन्य। बळी ।।

भावार्थ---

संसाराचा त्याग करून परमार्थाला लागलेल्या साधकांचे सर्वस्व बुडते असे मानणाऱ्या लोकांना संत रामदास सांगतात की,साधकांनी असा विचार करणे योग्य नाही.श्री रामाच्या भक्तीसाठी भरताने आपल्या मातेचा त्याग केला. पित्याने त्याग केलेल्या भक्त प्रल्हादाने गोविंदासी स्नेह जोडला,रावणाचा बंधु बिभिषण याने रावणाचा त्याग करून रामाशी संबध जोडला,शुक्राच्यार्या सारखे गुरु असतांना बळीने वामनाला तीनपाद भूमी दान करून श्रेष्ठ दाता ठरला.हे सर्व भक्त धन्य होत.

अभंग---271

अनन्याचे पाळी लळे । पायीं ब्रीदावळी रुळे ।। महामृदगलाचें प्रमें । रणछोडी आला राम ।। तारी तुकयाचचे पुस्तक । देव ब्रह्मांनायक ।। कृष्णातीरीं हाका मारी । दासा भेटी द्या अंतरीं।।

भावार्थ---

संत रामदास या अभंगात म्हणतात कीं, हा ब्रंमांडनायक देव अनन्य भक्ती करणार्या भक्तांचे अनेक हट्ट पुरवतो. त्याने पायांत ब्रीदाचे तोडर बांधले आहे,तुकारामांचे इंद्रायणीत बुडवलेलें अभंग या देवाने जसेच्यातसे वर काढलें.प्रेमळ भक्तांच्या हाकेला धावून जाणार्या देवाला संत रामदास कृष्णातिरी उभे राहून भेट देण्यासाठी आळवित आहेत.