रामदासांची पदे

विकिबुक्स कडून
Jump to navigation Jump to search

पद[संपादन]

पदे---१

(राग -खमाज, ताल-धुमाळी )

मंगळाचरण आरंभिला ।।

सरळशुंडा,विघ्नवितंडा,चंड प्रचंडा सुबाहु दंडा । छेदुनि पिंडा, करूनि खंडा,वक्रतुंडा, याच पदीं घालुनि मुरकुंडा ।।

सगुणमंदिरीं,दिव्यसुंदरी,करी किन्नरी,करी तनरी । रागोध्दारी,विद्यासागरी परोपकारी,नमुं नमुं ते ब्रह्मकुमारी ।।

अनाथनाथा, मीपणवार्ता, त्रासककर्ता,अमीव गर्ता । पुरुनि तार्ता, माविकवार्ता, सुख दाविता, देवदास गुरु स्वमीसमर्था ।।

भावार्थ---

हे पद मंगला चरणाचे गणेशाचे पद आहे.सरळ सोंड व वक्रतुंड असा गणेश ,त्याच्या बलदंड बाहुमध्यें दंडा असून तो अहंकाराचा पिंड छेदून त्याचे खंडन कळतो.गणेश ही देवता सर्व प्रकारच्या विघ्नांचा नाश करणारी आहे,असे संत रामदास या मंगलाचरणाच्या पदांत म्हणतात.


पद---२

गणपती गणराज धुंडिराज महाराज । चिंतामणी मोरेश्वर याविण नाहीं काज ।।

अकार उकार मकार तुझी शुंडा अनिवार । ब्रह्माविष्णुमहेश हे तरी तुझेच अवतार ।।

त्रिगुणे तूं गुणातीत नामरूप विरहित । पुरुष नाम प्रकृतींत नाहीं अंत हा ।।

सच्चिनंद देवा आदि। अंत तुलाच ठावा । दास म्हणे वरदभावा। कृपादृष्टी हा ।।

भावार्थ ----

गणपती हा संघनायक असून त्याला धुंडिराज महाराज असे संबोधन आहे,हा मोरेश्वर चिंतामणी (इच्छिले फळ देणारा )आहे. या चिंतामणीच्या कृपेशिवाय कोणतेही काम सफल होत नाही. ब्रह्मा (अकार) विष्णु (उकार) महेश (मकार) हे गणेशाचेच अवतार आहेत.ॐ कार हे गणेशाचे स्वरुप असून त्याची सोंड अनिवार आहे. गणपती सत्व, रज, तम यां गुणांच्या अतीत (पलिकडे)आहे,तसेच तो नामरूप विरहित आहे. सत्,चित् आनंदमय आहे.पुरुष व प्रकृतींत अनादी,अनंतआहे.संतरामदास म्हणतात,आदि आणि अंत जाणणारा ,कृपाळु,वरदविनायक आहे.

पद---३

तांडव नृत्य करी, गजानन तांडवनृत्य करी ।।

धिमि कीटी धिमि कीटी मृदंग वाजे । ब्रह्मा ताल धरी ।।

तेहतीस कोटी सभा घनदाटी । मध्यें शिव गौरी ।।

रामीरामदास सदोदित । शोभे चंद्र शिरीं ।।


भावार्थ---

या पदांत संत रामदास गजाननाच्या तांडवनृत्याचे वर्णन करीत आहेत. तेहतीस कोटी देवांच्या घनदाट सभेंत मध्यभागी शिवशंकर आणि पार्वती विराजमान आहेत. शंकराच्या मस्तकावर सदोदित चंद्रमा शोभत आहे. धिम कीटी धिमि कीटी या मृदंगाच्या तालावर ब्रह्मदेवांनी ताल धरला आहे आणि गजानन तांडवनृत्य करीत आहे .


पद---४

(राग -कानडा, ताल --सवारी, त्रिताल )

प्रगटत नटवेषे गणाधीश । प्रगटत नटवेषें ।।

ठमकत ठमकत झमकत झमकत । हरुषत शिव तोषें ।।

धिधि किट धिधि किट थोंगित थोंरिकट । परिसीत सुखलेश।।


भावार्थ ---

घनदाट देवसभेंत गजानन नटवेषांत प्रगट होतो.ठुमकत ठुमकत चालीने प्रवेश करणारा गजानन स्वतेजाने चमकत येतो तेव्हां शिवशंकर अत्यंत संतोषाने हर्षभरीत होतात. गजाननाच्या पदांचा धिधि किट नाद सुखानें श्रवण करतात.

श्री शारदा---पद ५---

(राग --काफी, ताल ---दादरा। )

वंदा वंदा रे शारदा । शारदादेवी साधकासी वरदा ।।

परा पश्यंती मध्यमा प्रसन्न। होते उत्तमा आणि मध्यमा ।

त्रैलोकीं जाणतीकळा ।। तयेवीण कळाचि होती विकळा ।।

दास म्हणे प्रचिती । सकळ जनीं देतसे जगज्योती ।।

भावार्थ ----

शारदादेवी साधकांना वरदान देणारी देवता आहे.वाणी वैखरी,मध्यमा, परा, पश्यंती या चार रुपांत प्रकट होते. तिन्ही लोकांत ती जाणतीकळा म्हणुन प्रसिध्द आहे,तिच्याशिवाय कलेचे स्वरुप बदलून ती विकळा होते असे सांगून संत रामदास म्हणतात शारदादेवी सर्व लोकांना ज्ञानाचा प्रकाश देते,यावरुन तिची प्रचिती येते. ज्ञानरुप शारदेला वंदन करुन उपासना केल्यास आपली उत्तमा आणि मध्यमा वाणी प्रसन्न होते.

पद---6

(चाल --भजनी )

ब्रह्मकुमारी शारदा ते वरदा । ब्रह्मकुमारी ।।

साधकाचे अभ्यंतरी ते शारदा ।।

चतुर्विधा वागेश्वरी ते शारदा ।।

स्फूर्तिरूपे प्रकाशली ते शारदा ।।

वाचारूपे अनुवादली ते शारदा। ।।

रामदासीं कार्यसिध्दि ते शरदा। ।।

चित्तीं सहसमाधी ते शारदा ।।

भावार्थ ---

शारदादेवी ब्रह्मदेवाची कन्या ब्रह्मकुमारी असून साधकांना वर देणारी आहे. शारदेचे वास्तव्य साधकांच्या हृदयांत असते. ही देवता चार प्रकारच्या वाणीची देवता असल्यानें तिला वागेश्वरी म्हणतात.ती साधकांच्या मनांत स्फूर्तिरूपाने प्रकाशतें आणि वाचारुपाने प्रगट होते. संत रामदास म्हणतात,आपल्या कार्याची सिध्दीदेवता ही शारदा असून ती चित्तामध्ये सहज समाधी लावते.


पद--7

(चाल--साधुसंता मागणे )

कथाकथनी वंदिली सरस्वती । कथाकथनीं ।।

हंसवहनी वेदमाता। चतराननी दुहिता ।।

शब्दब्रह्माची निजलता । कल्पतरु वाग्देवता ।।

ब्ह्मविद्येची निजखाणी । रामदासाची जननी ।।

भावार्थ ---

शारदादेवी ही वेदांची जननी असून ब्रह्मदेवाची दुहिता (कन्या)आहे. या देवतेचे वाहन हंस असून शब्दब्रह्माची लता (वेली) आहे. ही वाग्देवता इच्छिलेलें मनोरथ पूर्ण करणारा कल्पतरु असून ब्रह्मविद्येचे उगमस्थान आहे. संत रामदास म्हणतात, शारदादेवी आपली माता असून अनेक कथांमधून तिला वंदन केले आहे.


पद--8

(राग--भूप, ताल--त्रिताल )

नमिन मी गायका । गायका वरदायका विणापुस्तकधारिणी । अनेकसुखकारिणी । अघे दुरितहारिणी । त्रिभुवनतारिणी ।।

चत्वार वाचा बोलवी । सकळजन चालवी । त्रिभुवन हालवी । निरंजन पालवी ।।

दास म्हणे। अंतरीं । अंतरी जगदांतरीं । निगमगुज वीवरी । आपुलें हित तें करी ।।

भावार्थ---

हातांमध्यें विणा व पुस्तक धारण करणारी,अनेक प्रकारच्या पापांचे व दुष्टाचारांचे परिमार्जन करून तिन्हीं भुवनांना तारणारी,वैखरी,मध्यमा,पश्यंती परा या चारही वाणींना प्रकट करणारी आणि सर्व लोकांना जागवणारी,त्रिभुवन हालविण्याची शक्ति असलेली ही शारदादेवी वंदनीय आहे. संत रामदास म्हणतात, ही देवता आपल्या अंतरी नांदते, तसेच सर्व जगताच्या अंतरांत वास्तव्य करुन राहते.वेदांचे रहस्य स्पष्ट करून त्यांचे विवरण करते आणि आपुले हित करते.


पद--9

(राग--काफी, ताल--धुमाळी )

एक तो गुरु दुसरा सद्गुरु सद्गुरुकृपेविचुनि न कळे ज्ञानविचारू ।।

पारखी नेणती ज्ञानी ओळखती । गुरु केलि परि ते नाहीं आत्मप्रचिति ।।

म्हणोनि वेगळा सद्गुरु निराळा । लक्षांमध्यें कोणी एक साधु विरळा ।।

सद्य प्रचिति नसतां विपत्ति । रामदास म्हणे कैसी होईल रे गति ।।

भावार्थ ---

संत रामदासांच्या मतें गुरु व सद्गुरु या मध्यें मूलत:भेद आहे.सद्गुरु शिवाय ज्ञानाचा खरा विचार कळणार नाही. गुरु केलातरी साधकाला आत्मप्रचीति होतनाही,आत्मज्ञान मिळत नाही.आपण देह नसून आत्मतत्व आहोत हे सद्गुरु शिवाय अनुभवास येत नाही म्हणुन सद्गुरु इतर गुरुंपेक्षा निराळा आहे.लक्ष लक्ष साधुंमधून एखादाच सद्गुरु असतो, त्यांची प्रचिती न आल्यास साधक विपत्ति मध्ये सांपडतो. सर्वार्थानें बुडतो.अशा सद्गुरुला खरा पारखी,ज्ञानी ओळखतो.सद्गुरु शिवाय सद्गती प्राप्त होणार नाही असे संत रामदास निक्षून सांगतात.

पद---10

(राग--कल्याण, ताल--त्रिताल )

सद्गुरु लवकर नेती पार ।।

थोर भयंकर दुस्तर जो अति । हा भवसिंधु पार ।।

षड्वैय्रादिक क्रूर महामीन । त्रासक हे अनिवार ।।

घाबरला मनिं तीव्र मुमुक्षु । प्रार्थित वारंवार ।।

अनन्यशरण दास दयाघन । दीनजना आधार ।।

भावार्थ---

संत रामदास या पदांत सांगतात, हा संसार रुपी सागर पार करून जाण्यास अत्यंत कठिण आहे कारण या संसारसागरांत लोभ,क्रोध,मद,मत्सर,मोह,दंभ असे सहा प्रकारचे अत्यंत क्रूर असे भयंकर मासे आहेत,जे अतिशय त्रासदायक आहेत.यामुळे मोक्षाची इच्छा करणारा साधक घाबरून जातो व सद्गुरुला शरण जावून वारंवार प्रार्थना करतो,अशा वेळी देयेचा प्रत्यक्ष मेघ असा सद्गुरु त्या अनन्यशरण अशा भक्तास आधार देवून संसारसागरातून पार करतो.

पद---11

(चाल--श्रीगुरूंचें चरणकंज )

तुजविण गुरुराज आज कोण प्रतीपाळी । मायबाप कामा न ये कोणीं अंतकाळीं ।।

जळाविण तळमळित जसा मीन शुष्क डोहीं । तुजविण मज वाटे तसे धांव लवलाही ।।

चकोरचंद्रन्याय जसा गाय माय बाळा । पाडसासी रिणी जसी तेविं तूं कृपाळा ।।

रामदास धरुनि आस। पाहे वास दिवसरात । खास करिल काळ ग्रास, ध्यास हा मनासी ।।

भावार्थ ---

संत रामदास या पदांत श्रीरामाचा धावा करीत आहेत.पाण्यावाचून कोरड्या असलेल्या शुष्क डोहांत पडलेला मासा जसा तळमळतो तसा अंतकाळी मायबाप सुध्दा मदतीस येत नसल्याने जीव कासाविस होतो. चकोर जशी चंद्राची, गाय वासराची किंवा आई बाळाची, किंवा हरिणी जशी पाडसाची आतुरतेनें वाट पहाते तसा जीव कृपाळु सद्गुरुची वाट पहातो.संत रामदास मनामधे आस धरून रात्रंदिवस श्रीरामाची वाट बघत आहेत.काळ आपला घास करणार हा एकच ध्यास लागला आहे. सद्गुरु श्री रामाशिवाय कोणिही प्रतीपाळ करणार नाही अशी त्यांची दृढ श्रध्दा आहे.

पद---12

(राग-- वसंतभैरव, ताल--त्रिताल )

गुरुदातारें दातारें । अभिनव कैसें केलें ।।

एकचि वचन न बोलत बोलुनि । मनास विलया नेलें ।।

भूतसंगकृत नश्वर ओझें । निजबोधे उतरिलें ।।

दास म्हणे मज मीपणाविरहित । निजपदीं नांदविलें


भावार्थ---

एकही शब्द न बोलता केवळ नजरेच्या दृष्टीक्षेपातून गुरुमाउलीने जो बोध केला त्यामुळे मन या कल्पनेचा पूर्णपणे निरास झाला. पंचमहाभूते आणि ईंद्रिये यांच्या संगामुळे निर्माण झालेले नश्वरतेचे ओझे सद्गुरांच्या सान्निध्याने उतरलें. संत रामदास म्हणतात अत्यंत उदारपणे सद्गुरुंनी आपणास त्यांच्या चरणांशी आश्रय दिला.आपला अहंकार पूर्णपणे विलयास नेण्याचे अभिनव कार्य केले.

पद --13

अपराधी आहे मोठा । मारणें कृपेचा सोटा ।।

गुरुराज सुखाचे कंद । नेणुनि केला हा निजानंद ।

तेणें पावलों मी बंध । जालो निंद्य सर्वस्वीं ।।

तारीं तारीं सद्गुरुराया । वारीं माझे तापत्रया ।

तुझे पाय काशी गया । आहे मजला सर्वस्वी ।।

आतां अंत पहासी काय । तूंचि माझा बापमाय ।

रामदास तुझे पाय । वारंवार वंदितो ।।

भावार्थ---

या पदांत संत रामदास स्वता:ला अपराधी मानून सद्गुरुंनी आपल्याला कृपेचा सोटा मारून शिक्षा करावी अशी विनंती करीत आहेत. गुरुराज सुखाचे कंद असूनही त्याची जाणिव ठेवली नाही,आपल्या मनाप्रमाणे वागल्यामुळें बंधनात पडलो आणि जगांत निंद्य ठरलो असे सागून गुरुमाऊलीने आपले आध्यात्मिक,आधिभौतिक,आधिदैविक तापापासून मुक्तता करून आपल्याला भवबंधनातून सोडवावें अशी विनंती करतात.अत्यंत काकुळतीला येऊन ते गुरुरायाचे चरणकमल हे आपणासाठी काशी,गया या तीर्थस्थानाप्रमाणे पवित्र आहेत असे मानून गुरुचरणांना वारंवार वंदन करतात.

पद ---14

(राग--देस, ताल--धुमाळी )

त्रिविध तापहारक हे गुरुपाव । भवसिंधूसी तारक हे। गुरुपाय ।।

स्वत्मसुखाचें बीज हे गुरुपाय । ज्ञानाचें निजगुज हे गुरुपाय ।।

भक्तिपंथासि लाविती हे गुरुपाय । नयनी श्रीराम दाविती हे गुरुपाय।।

सहज शांतीचें आगर हे गुरुपाय । पूर्णकृपेचे सागर हे गुरुपाय ।।

रामदासाचे जीवन हे गुरुपाय । सकळ जीवांसी पावन हे गुरुपाय ।।

भावार्थ---

या पदांत संत रामदास गुरु महात्म्य सांगत आहेत.गुरुपद तिन्ही प्रकारचे (आध्यात्मिक,आधिभौतिक,आधिदैविक) ताप हरण करणारे, आत्मसुखाचे बीज व आत्मज्ञानाचे रहस्य स्पष्ट करून सांगणारे आहेत.साधकाला भक्तिपंथाला लावून, नयनांना श्रीरामाचे प्रत्यक्ष घडवून देण्याचे सामर्थ्य असलेले शांतीचे आगर आहेत. पूर्णकृपेचे सागर आहेत. सर्व जीवांना पावन करणारे श्रीरामाचे चरणकमळ रामदासांचे जीवन आहेत.

पद---15

(राग भैरव, ताल-धुमाळी )

रंगा रे रंगी रंगा रे ।।

आपुले हित करणें जेहीं । आवडी धरावी संतसंगा रे ।।

श्रवण मनन ध्यास धरावा ।। कथा पावन पापभंगा रे ।।

दास म्हणे कथानिरूपण । संगचि करी नि:संगा रे ।।

भावार्थ---

साधकाला आपले हित करायचे असेल तर त्याने संतांची संगत धरावी. धर्मग्रंथाचे श्रवण,मनन करुन त्यांचा सतत ध्यास धरावा. पुराणातील कथा पापांचा नाश करून मनाला पावन करतात.मनाला नश्वर ईंद्रिय सुखापासून सोडवून नि:संग बनवण्याचे काम कथानिरूपणाने साध्य होतें.


पद--16

(राग--मारू, ताल--धुमाळी)

देव कळला। न जाय । संतसंगेवीण काय ।।

स्वप्नभराने वेगतिरानें । कैसेनि होय उपाय ।।

वैद्य पहातो औषध घेतो प्रचितीवीण अपाय ।।

कितिक आले कित्तेक गेले । देव ऋष रायेराय ।।

पाहेल। तो तो जाणेल तो तो । दास देवगुण। गाय ।।

भावार्थ----

या पदांत संत रामदास म्हणतात, संतसंगती शिवाय परमेश्वराचे स्वरूप लक्ष्यांत। येणार नाही. बाणाच्या वेगाने साधनांची घाई केल्याने किंवा केवळ स्वप्न बघून उपाय होणार नाही. रोग जडला तर आपण वैद्याचा शोध घेतो, अनुभव घेतल्याशिवाय औषध घेतो, त्यामुळे काहीतरी अपाय होतो.अशाप्रकारे कितितरी राजे,ऋषी व देवदेवता आले आणि लयास गेलें.जो हे सर्व पहातो तो जाणू शकतो. रामदास देवाचे गुण गातात.

पद---17

(राग-- केदार, ताल-- त्रिताल)

नेणे मी मज काय करूं । मज माझा पडिला विसरूं ।।

असतां योग वियोग पातला । जाऊन सज्ज्नसंग धरूं।।

दास म्हणे मज माझी भेटी । होतां भेद समस्त हरूं ।।

भावार्थ ----

आपणांस आपलाच विसर पडला असून आपण आपलेच स्वरूप ओळखेनासे झालो आहोत. सतत भेटीचा योग घडत असतांना वियोगाचे दु:ख होत आहे. अशावेळी सज्जनांची संगत धरल्यास सर्व भेद मिटून जाऊन जिवा शिवाची भेटी घडते असे संत रामदास सांगतात.

पद---18

संगति साधूची मज जाली । निश्चळ पदवी आली ।।

सर्वीं मी सर्वात्मा ऐसी अंतरि दृढमती जाली । जागृतीसहित अवस्था तुर्या स्वरूपी समूळ निमाली ।।

बहु जन्माची जप तप संपत्ति विमळ फळेसी आली । मी माझे हें सरली ममता समुळी भ्रांति विराली ।।

रामी अभिन्न दास अशी हे जाणिव समुळीं गेली । न चळे न कळे अढळकृपा हे श्रीगुरुरायें केली ।।

भावार्थ ----

या पदांत संत रामदास साधुच्या संगतीचे महत्त्व सांगतात. साधुच्या संगतीमुळे मनाची चंचलता जाऊन ते निश्चळ बनलें.या सर्व विश्वांत आपणच आत्मरुपाने भरून राहिलो आहे अशी दृढ भावना झाली. गाढझोप,स्वप्नावस्था जागृती या तिनही अवस्था तुर्येमध्ये मिळून गेल्या.अनेक जन्मामध्यें जप,तप करुन जो पुण्यसंचय झाला तो सर्व अत्यंत विमल स्वरुपांत फलदायी झाला.मीपणाचा अहंभाव आणि माझेपणा या मुळे आलेली ममता पूर्णपणे विलयास गेली.राम आणि दास भिन्न आहेत ही भावना समूळ नाश पावली.श्रीगुरुरायाच्या अढळ कृपाप्रसादानें अज्ञान सरून अचल निष्ठा निर्माण झाली.


पद---19

साधुसंतां सांगणे हेंचि आतां । प्रीति लागो गोविंदगुण गातां ।।

वृत्ति शून्य जालीया संसारा । संतांपदीं घेतला आम्ही थारा ।।

आशा, तृष्णा राहिल्या नाहीं कांही । देहप्रारब्ध भोगितां भय नाहीं ।।

गाऊं ध्याऊं आठवूं कृष्ण हरी । दास म्हणे सप्रेम निरंतरीं ।।

भावार्थ---

गोविंदाचे गुणगायन करतांना मनामधे अत्यंत प्रेमभावना असावी ही मागणी साधुसंता कडे करून संत रामदास म्हणतात,संसाराविषयीच्या हवे नकोपणाच्या सर्व वृत्ती शून्य झाल्या नंतर आपण संतपदांचा आश्रय घेतला.आतां कोणत्याही आशाअपेक्षा राहिल्या नाहीत,प्रारब्धाने आलेले कोणतेही भोग भोगतांनां वाटणारे भय संपले आहे.आतां कृष्ण हरीचे ध्यान लावून,त्याचे गुण संकिर्तन भक्तिभावानें निरंतर करीत राहू.

पद ---20

(चाल--वरचीच )

साधुसंगे मानसी राम दाटे। मायासिंधु तात्काळ सर्व आटे ।।

जेथें तेथें अच्युतानंत भेटे । ब्रह्मानंदे सर्वदा पूर लोटे ।।

राम ध्यातां होसील राम आतां । गंगा सिंधु होय सिंधूसि मिळतां ।।

भृंगीभैणें कीटकी होय भृंगी । रामदास रंगे रामरंगीं ।।

भावार्थ---

साधुंच्या संगतीत रामाचे सतत स्मरण राहते आणि मायेचा सागर तात्काळ आटून जातो.जेथे जावें तेथें अच्युतानंदाचे दर्शन घडते व ब्रह्मानंद उसळून येतो. गंगानदी सिंधुला मिळतांच ती सिंधू होते किंवा कोशातिल किटकाची अळी फुलपाखरू होते तसेच श्रीरामाचे सतत ध्यान लावल्यास साधक राम बनतो असे संत रामदास स्वानुभवानें सांगतात.


पद---21

(चाल-वरचीच )

नाहीं नाहीं नाहीं भय नाहीं रे । निर्भय सज्जनसंग पाहीं रे ।।

आहे आहे आहे गति आहे रे । सारासार विचारूनि पाहें रे ।।

जातें जातें जातें वय जातें रे । नेणतां अनहित बहु होतें रे ।।

धरा धरा धरा मनीं धरा रे । दास म्हणे ज्ञानें हित करा रे ।।

भावार्थ---

संत रामदास या अभंगात म्हणतात, सज्जनांच्या संगतीत माणुस निर्भय बनतो यासाठी सज्जनसंगती अत्यंत आवश्यक आहे. सारासार विचारांती आपणास समजून येते की, जीवन गतीमान आहे. आयुष्य सरत जाते वय निघून जाते आणि नेणतेपणा मुळें अनहित होते. यासाठी ज्ञानाची कास धरणे जरुर आहे, ज्ञानाने जीवनाचा मार्ग सुलभ होतो.

पद=22

(राग --काफी, ताल --दादरा )

साजिरें हो रामरूप साजिरें हो ।।

रूप प्रगटलें लावण्य लाजलें मानसीं बैसलें ।।

सर्वांगसुंदर ठाण मनोहर दासाचा आधार ।।

भावार्थ =

या पदांत संत रामदास रामरूपाचे वर्णन करीत आहेत. श्री रामरूप प्रगट झालें आणि त्या रूपाचे लावण्य पाहून प्रत्यक्ष लावण्यच लज्जीत झाले. लाजलेलें हे लावण्य मनामध्ये लपून बसले.हे सर्वांगसुंदर मनोहर रूपच संत रामदासांच्या जीवनाचा आधार आहे.

पद=23

वदन सुहास्य रसाळ हा राघव । सर्वांगीं तनु सुनीळ हा राघव ।।

मृगनाभी रेखिला टिळा हा राघव । मस्तकीं सुमनमाळा हा राघव ।।

साजिरी वैजयंती हा राघव । पायीं तोडर गर्जती हा राघव ।।

सुंदर लावण्यखाणी हा राघव । उभा कोदंडपाणी हा राघव ।।

सकल जीवांचें जीवन हा राघव । रामदासासी प्रसन्न हा राघव ।।

भावार्थ ----

संत रामदासांवर प्रसन्न असलेल्या राघवाच्या रुपाचे वर्णन या पदांत केलें आहे. वदनावर सुहास्य धारण केलेला हा रसाळ राघव सुंदर नीलवर्णाचा आकाशासारखा निळसर आहे.राघवानें कपाळावर कस्तुरी टिळा लावला आहे आणि मस्तकावर फुलांच्या माळा घातल्या आहेत. गळ्यांत वैजयंती माळ शोभून दिसत आहे तर पायांत भक्त रक्षणासाठी घातलेलें तोडर गर्जत आहेत. हातामध्यें कोदंड धारण केला आहे. असा हा प्रसन्न राघव सकळ सजीव सृष्टीच्या जीवनाचें जीवन आहे.

पद--24

(राग = रामकली, ताल=धुमाळी )

पैल कोण वो साजणी । उभा कोदंडपाणी । पहातां न पुरे धणी । या डोळ्यांची ।।

रम्य निमासुर । श्रीमुख साजिरें । कुंडलें मकराकार । तळपतातीं ।।

घननीळ सांवळा । कांसे सोनसळा । मृगनाभीटिळा । रेखियेला ।।

अहिल्या गौतमवधू । मुक्त श्रापसंमंधु । तयाचा लागला वेधू । रामदासीं ।।

भावार्थ ----

हातामध्यें कोदंड धारण करुन पैलतीरावर कोण उभा आहे असा कीं, ज्याच्याकडे कितिही वेळ बघूनही डोळ्यांचे समाधान होत नाही. कानामध्ये मकराकार कुंडलें तळपत आहेत. त्यामुळे श्रीमुखाला आगळीच शोभा आली आहे,जो अत्यंत कोमल असून सुंदर आहे. कमरेला पितांबर कसला असून,कपाळावर कस्तुरी टिळा लावला आहे आणि तो मेघासारखा सावळ्या रंगाचा आहे.गौतम ऋषींच्या शापामुळे शिळा होऊन पडलेल्या अहिल्येला शापमुक्त करणाऱ्या त्या राघवाचा मनाला वेध लागला आहे असे संत रामदास म्हणतात.

पद =25

(राग --मारु, ताल --त्रिताल )

जाऊं नको रे रामा । जाऊं नको रे ।।

तुजविण देश वाटे विदेश । कां करिसी उदास ।।

राज्य त्यजावें त्वां नव जावें । भाकेसि रक्षावें ।।

रामदास स्वामी उदास । सेवीला वनवास ।।

भावार्थ ---

श्रीराम वनवासाला जाण्यासाठी निघाले असतांना नगरजनांची व राजजनांची अवस्था अत्यंत केविलवाणी होते, उदासिनतेची छटा अयोध्या नगरीला झाकून टाकतें. राघवानें आपलें प्रतिज्ञापालन करण्यासाठी फारतर राज्यत्याग करावा पण वनवास गमन करु नये अशी सर्वांचीच ईच्छा आहे. संत रामदास अत्यंत उदास मनानें या प्रसंगाचे वर्णन करीत आहेत.

पद ==26

(राग-- देस, ताल ---धुमाळी )

कै भेटेल मागुतां । राघव आतां ।। स्वस्थ न वाटे चित्ता । बोले कौसल्या माता ।। राम वनासी जातां । रुदती सर्व कांता ।। रामदासी अवस्था । लागली समस्तां ।।

भावार्थ -----

राम वनवासाला गेल्यावर अत्यंत अस्वस्थ झालेली कौसल्या माता म्हणते,राघव आतां परत केव्हां भेटेल अशा प्रकारे राजभवनातील सर्वच स्त्रिया उदास मनाने रुदन (शोक) करीत होत्या. ही उदासिनता सर्वांच्या मनाला व्यापून राहिली होती.

पद= 27

(राग =खमाज, ताल=धुमाळी )

कृपाळू रघुवीरें खादिलीं भिलटीबोरें । उच्छिष्ट आदरें अंगिकारी रे ।।

वैभवीं नाहीं चाड ।देवातें भावचि गोड । पुरवितो कोड । अनन्याचें रे ।।

दुर्लभ ब्रह्मादिकांसी । सुलभ वानरांसी । काय तयापासीं । भावेविण रे ।।

रामीरामदास म्हणे । देव हा दयाळूपणें । उठवितो रणें । वानरांचीं रे ।।

भावार्थ -----

शबरीने दिलेली उष्टी बोरे रघुवीराने आदराने स्विकारून आनंदाने खाल्ली. देवाला भावभक्तीची आवड असून कोणत्याही वैभवाची ईच्छा नाही, अनन्यपणे शरण आलेल्या भक्तांच्या सर्व ईच्छा राघव पूर्ण करतो.एका अनन्य भावाशिवाय वानरसेने जवळ काहिही नव्हते, तरी ब्रह्मादिदेवांना दुर्लभ असलेला श्रीराम केवळ भक्तीभावामुळे सुलभ होतो. संत रामदास म्हणतात,राघव दयाळूपणे वानरसेनेचे नेतेपण स्विकारून त्यांना रणामध्यें विजयी करतो.

पद==28

(राग--कल्याण, ताल -- त्रिताल )

दयाळा रामा सोडवी आम्हां । हरहृदयविश्रामा ।।

बंधन पावलों बहू जाजावलों । देव म्हणती कावलों ।।

यातना हे नाना । कांहींच चालेना दु:ख जाहलें मना।।

शीणावरि शीण। होतसे कठिण । थोर मांडलें निर्वाण ।।

कर्कश उत्तरीं । नित्य मारामारी । धावें होउनि कैवारी ।।

दास चौताळला । त्रिकुट जाळिला थोर आधार वाटला ।।

भावार्थ ----

शिवशंकराच्या हृदयाला विश्राम देणाय्रा दयाळु रामचंद्राने आपणास सोडवावे अशी विनंती करून सर्व देव म्हणतात की, रावणाच्या बंधनांत पडून अत्यंत दु:खद यातना भोगत आहोत.या बंधनातून सुटण्याचा काहिही मार्ग सापडत नसल्याने हतबल झालो आहोत, प्राणसंकटांत सापडलो आहोत, परिस्थिती आधिकाधिक कठिण बनली आहे. सतत युध्दाच्या प्रसंगांना, कर्कश शब्दांना तोंड द्यावे लागत आहे अशावेळी कैवारी होऊन धाव घ्यावी ही विनंती ते श्रीरामाला करतात तेव्हां रामदास मारूती इरेस पेटला,त्याने लंका जाळून देवांना मोठा आधार दिला.

पद----29

(राग--मांड,जोगी, ताल =दीपचंदी )

सांग मला हनुमंता । राघव माझा सुखी आहे कीं, ।। कनकमृगामुळें मोहित जालें । हा बसला मज गोता ।। दीर सुलक्षण लक्ष्मुण गांजिला । अनुभवितें आतां ।। दास म्हणे परिपूर्ण रघुवीर । परि वाहे मनीं चिंता ।।

भावार्थ -----

श्रीरामांच्या आज्ञेवरुन हनुमंत सिता शोधासाठी निघून लंकेपर्यंत येऊन अशोक वनातील सितेची भेट घेतो.राम विरहानें व्याकुळ झालेली सिता रामदास मारुतिला रामाचे कुशल विचारते. कनकमृगाच्या मोहांत पडल्यामुळे आपली कशी फसवणूक झाली, अत्यंत प्रेमळ,विचारी,आज्ञाधारक अशा सुलक्षणी लक्ष्मण भाउजींना कटुशब्दांनी दुखविलें याचा पश्चाताप व्यक्त करतें.रामभक्त हनुमान श्रीरामांचे कुशल सांगून ते चिंतेने व्याकूळ झाले आहेत असे वर्तमान सांगतात.

पद---30

(राग--काफी, ताल-दादरा )

उदार रामचंद्र हा वदावा किती ।। येतां अनन्यशरण बिभिषणा शीघ्र करी । चिरंजीव लंकापती ।।

उत्तानचरण बाळ होत शरण तया देत । अढळ अक्षयी संपत्ती ।।

चिन्मयानंद भाग्य रामदासासि सहज । वोळला जानकीपति ।।

भावार्थ---

या पदांत संत रामदास श्रीरामाच्या औदार्याचे उदाहरण देवून वर्णन करीत आहेत.रावणबंधु बिभीषण रावणाचा अन्यायीपणाचा पक्ष सोडून श्रीरामांना शरण जातो तेव्हां श्रीराम तात्काल बिभिषणाला लंकेचा राजा बनवतो, एव्हढंच नव्हेतर त्याला चिरंजीवपद देतो.उत्तानपाद राजाचा बाळ ध्रुव घोर तप करून रामांना शरण जातो तेव्हां त्याच्यावर प्रसन्न होऊन कधीही क्षय न होणारी अक्षय संपत्ती व अढळ पद देतो. रामदासांवर प्रसन्न होऊन चिरकाल टिकणारा आनंद व सद्भाग्याचा ठेवा बहाल करतो.अशा उदार रामचंद्रांच्या औदार्याचे कसे वर्णन करावे असे संत रामदास म्हणतात.


पद==31।

(राग =मारू , ताल ==त्रिताल )

नये नये नये राघव आजि कां न ये ।।

जीव जीवाचा जप शिवाचा ।कृपाळु दीनाचा राघव ।।

प्राण सुरांचा। मुनिजनांचा । भरवसा तयाचा राघव ।।

विसर झाला। काय तयाला । दासांनी गोविला राघव ।।

भावार्थ ===

शिवशंकर ज्याच्या नामाचा सतत जप करतात, जो अत्यंत कृपाळू असून दीनांचा कैवारी आहे,देवादिकांचा केवळ प्राणच आहे आणि मुनिजनांच्या विश्वासाचे स्थान आहे असा राघव आज अजून का येत नाही असे संत रामदास विचारतात आणि उत्तरादाखल सांगतात कीं श्री रामाला विसर पडला असावा किंवा इतर भक्तांनी गुंतविला. असावा.

पद==32

( राग ==धनाश्री, ताल==धुमाळी )

नयेल काय आजि रामु । माझिया जीवाचा विश्रामु ।।

दिवस पुरलें धैर्य सरलें । वियोगे प्राण शमूं ।।

पुढती उभा राहे अष्ट दिशा पाहे । विकल होय परमू ।।

रामीरामदास वेधलें मानस । केव्हां भेटेल सर्वोत्तमू ।।

भावार्थ ---- या पदांत संत रामदासांच्या मनाची श्री राम विरहानें व्याकूळ झालेली अवस्था व्यक्त झाली आहे. श्रीराम हा आपल्या जीवाचा विश्राम असून त्याची वाट पाहून अनेक दिवस सरले आहेत,धैर्य संपून गेले असून वियोगाने प्राण जावू पहात आहे. आठही दिशांनी शोध घेऊनही रामाचे दर्शन होत नाही त्यामुळें मन विकल झाले आहे,रामाला भेटण्यासाठी आतुरले आहे.

पद---33

(राग --आसावरी, ताल --दीपचंदी )

धन्य रघुत्तम धन्य रघुत्तम धन्य रघुत्तमलीळा । त्रिभुवनकंटक राक्षस मारुनी फोडियल्या बंदीशाळा ।।

प्रजापालक हा रघुनायक ऐसा कदापि नाहीं। उद्वेग नाही चिंता नाहीं काळ दुष्काळही नाहीं ।।

व्याधि असेना रोग असेना दैन्य वसेना लोकां । वार्धक्य नाहीं मरण नाहीं कांहींच नाही शंका ।।

सुंदर लोक सभाग्य बळाचे बहु योग्य बहुत गुणांचे । विद्यवैभव धर्मस्थापना कीर्तिवंत भूषणाचे ।।

भावार्थ -----

या पदांत संत रामदास श्रीरामांच्या चरित्रलीळा वर्णन करीत आहेत.त्रिभुवनांचे शत्रु असलेलेल्या राक्षसांचे निर्दालन करून प्रभु रामचंद्रांनी रावणाच्या बंदीशाळेतील देवदेवतांना मुक्त केले.श्रीरामांसारखा प्रजाहितदक्ष राजा शोधुनही सापडणार नाही.रामराज्यातील प्रजेला कोणतेही दु:ख नाही, कसलिही चिंता नाही ,कधिही दुष्काळ पडत नाहीत. लोकांना कोणत्याही प्रकारचे मानसिक अगर शारिरीक रोग नाहीत.प्रजा अत्यंत सुखी व समाधानी असून म्हातारपणीचे दु:ख अथवा अकाली मृत्युचे भय नाही.रामराज्यातील प्रजाजन भाग्यवंत, गुणवंत,रूपवंत असून विद्या हेच त्यांचे वैभव,किर्ति हेच भूषण व धर्म हेच जीवनाचे सार आहे.

पद---34

(राग== धनाश्री , ताल ==दीपचंदी )

राघव पुण्य परायण रे

पुण्यपरायण धार्मिक राजा । आनंद केला बहुत ।।

धर्मपरायण धार्मिक राजा । सकळही नीति न्याय ।।

रामराज्य सुखरूप। भूमंडळ ।दु:खशोक दुरी जाय ।।

दास म्हणे हा पूर्णप्रतापी । महिमा। सांगो काय ।।

भावार्थ ----- राघव हा पुण्यपरायण ,धार्मिक राजा असून नितिमंन्त आहे. सर्वांना सारखा न्याय देणारा आहे.रामराज्यांत सर्वत्र सुखशांती नांदत असून दु:ख व शोकाचा लवलेशही नाही. संत रामदास म्हणतात, राघव पूर्णप्रतापी आहे त्याचा महिमा वर्णन करावयास शब्दच अपूरे आहेत.

पद---35

(राग ==बिलावल, ताल ==धुमाळी )

वैकुंठवासी रम्य विलासी देवांचा वरदानी । तेहतीस कोटी सुरवर। भक्तांचा अभिमानी ।।

तो राघव ध्याय सदाशिव अंतरिं नाव जयाचें । रमणीय सुंदर रूप मनोहर। अंतरध्यान तयाचें ।।

त्रिंबकभंजन मुनिजनरंजन गंजन दानवपापी । वाणी जर्जर घोर महावीर केले पूर्ण प्रतापी ।।

वरद हरिगण दास बिभीषण सेवक वज्रशरिरी । भूमि चराचर चंद्र दिवाकर तंवरी भय अपहारी ।।

भावार्थ ---- तेहतीस कोटी देवांची बंदीवासातून मुक्तता करणारा,अतिशय रम्य विलासी जीवन जगणार्या देवांना वरदान देणाय्रा ,भक्तांचा अभिमानी अशा राघवाचे शिवशंकर सतत ध्यान करतात व श्रीरामाच्या नामाचा जप करतात . मुनीजनांना अतिशय प्रिय असणारा,पापी राक्षसांचे दमन करणारा राघव अतिशय मनोहर आहे.तो जिंकण्यास कठिण असा महावीर असून अत्यंत पराक्रमी आहे, रामाचे वरदान लाभलेला बिभीषण रामाचा अनन्य दास असून जोपर्यंत चंद्र ,सूर्य असित्वांत आहेत तो पर्यंत त्याला मृत्युचे भय नाही , तो चिरंजीव आहे.वैकुंठवासी रामाचे अशाप्रकारे संत रामदासांनी या पदांत यथायोग्य वर्णन केले आहे.

पद ----36

परम दयाळू माझा राम ।।

दशमुखभगिनी ताटिका ते । वधुनि केलें विश्राम ।।

रावण मारुती अमर स्थापी । पाववुनी स्वधाम ।।

जानकि घेउनि अयोध्येसि आले ।दास म्हणे प्रियनाम।।

भावार्थ ----

दहा तोंडे असलेल्या दशाननाची बहिण ताटिका हिचा वध करून विश्वामित्र ऋषींचा यज्ञ पूर्णत्वास नेला. रावणाचा वध करून हनुमानाला चिंरजीवपद देऊन निज धामाला पाठवलें.जानकी देवींची कारावासातून सुटका करून अयोध्येस परत आले. संत रामदास म्हणतात श्रीराम अत्यंत दयाळू असून त्यांचे नाम सर्व भक्तांना अतिशय प्रियतम आहे.

पद===37

(राग==काफी, ताल--धुमाळी )

राजिवलोचन । भवभयमोचन पतितपावन राम ।।

श्रीरघुनंदन राक्षसकंदन । दशकंठछेदन राम ।।

संसारमंडण दानवदंडण ।रामदासमंडण राम ।।

भावार्थ ====

कमलासारखे नयन असलेला ,पतितांना पावन करून त्यांची संसार भयापासून सुटका करणारा अनेक राक्षसांचे निर्दालन करून दशानन रावणाचा कंठछेद करणारा श्रीरघुनंदन दानवांचा विनाश करून या जगताला मंडित करतो. रामभक्तांच्या मेळाव्यांत तो शोभून दिसतो.

पद===38

(राग = कल्याण , ताल = त्रिताल )

अरे तूं पावन देवा राघवा रे ।।

वांकी खळाळित तोडर गाजे । परम दीनवत्सल रामा ।।

अभिनव कीर्ति पुरंदर जाणे । सकळभुवनसुखदायक तूं एक ।।

दास म्हणे भवपाशनिवारण । नाम सकळजनपावन लीळा ।।

भावार्थ ===

संत रामदास म्हणतात, श्रीराम संसाराची अखिल बंधन तोडून भक्तांच्या संसार बंधनांचे निवारण करतो, सर्व लोकांना पावनकरतो. तो दीनदुबळ्या लोकांचे रक्षण करतो.श्रीरामाच्याहातातिल वाकी भक्तरक्षणासाठी सतत खळाळत असतेव पायातील तोडर भक्तरक्षण हे आपले  ब्रीद आहे असे गर्जून सांगत असतो.अशा पतितपावन रघुवीराची अभिनव किर्ति स्वर्गलोकीचा इंद्र जाणतो कीं,राघव सकळ जगाला सुख देणारा आहे.

पद==39

(राग==काफी , ताल==दीपचंदी )

तो राघव शरधनुधारी रे ।।

कौशिकमखदु:खार्णव खंडुनि । खरदुषाणांतें मारी ।।

सुमनशरधनु भंगुनियां । वरिली जनककुमारी ।।

श्रावणारिसुतें सागर बांधुनि । वैश्रवणानुज मारी ।।

दास म्हणे पदवारीं जडलों । भवनदीपार उतारी ।।

भावार्थ ===

खर आणि दुषण यांचा वध करून विश्वामित्र ऋषींचा यज्ञसंकल्प पूर्ण करून त्यांचे दु:ख हरण करणारा श्रीराम,मदनाचा शत्रु जो शिवशंकर त्याच्या धनुष्याचा भंग करून जनकराज्यकन्या सीता हिला स्वयंवरांत जिंकतो. दशरथपुत्र श्रीराम सागरावर सेतू बांधून रावणाचा वध करतो. संत रामदास म्हणतात,अशा पूर्णप्रतापी रामचरणांशी आपण अनन्यभावाने शरणागत असून त्याच्या कृपेनेच ही भवनदी पार करुन जाणे शक्य होईल.

पद==40

(राग --खमाज , ताल--धुमाळी )

पूर्णकामा ही सुखधामा । विवुधविमोचन रामा ।।

पावन भूवन जीवन माझें । कोण करी गुणसीमा ।।

वाल्मिक व्यास विरंची नेणें । काय वदो गुणसीमा ।।

भावार्थ ====

भक्तांच्या सर्व कामना पूर्ण करणारा श्रीराम सुखाचे भांडार आहे. विविध पापांचे क्षालन करून जीवन पावन करणार्या श्रीरामांच्या गुणांना सीमा नाही असे सांगून संत रामदास म्हणतात,वाल्मिकी ,व्यास व देवेंन्द्र हे देखील श्रीरामांच्या गुणांचे वर्णन करु शकत नाहीत.

पद==41

( राग ---श्रीराम, ताल---द्रुत एकताल )

दिनमणिमंडणा अमरभूषणा । सजलजलदघना रे राघवा ।।

राजीवलोचना विबुधविमोचना । विमळगुणा सगुणा रे राघवा ।।

दास म्हणे मनाअंतरजीवना । स्वजनजनासज्जना रे राघवा ।।

भावार्थ====

या पदांत संत रामदास विविध गुणविषेषण योजून राघवाचे वर्णन करीत आहेत.दिनमणी म्हणजे सूर्याप्रमाणे जगाला प्रकाशित करणारा,देवांचे भूषण असलेला,पाण्याने ओथंबलेल्या मेघा प्रमाणे सावळी रंगकांती असलेला ,उदार ,कमलाप्रमाणे डोळे असलेला, देवांची कारागृहातून मुक्तता करणारा, अनेक विमळ (दोषरहित) गुणांनी युक्त ,सगुण-स्वरुपी राघव स्वजनांचे तसेच सज्जनांचे रक्षण करणारा असून प्रत्येकाच्या अंत:करणांत वास करतो.

पद===42

(राग --मारू, ताल ---त्रिताल )

महिमा कळली न जाय । राघव ।।

कोण वानर कोण निशाचर । बांधिती सागर काय ।।

कोण सुरवर कोण गिरीवर । अघटित घटित उपाय ।।

गुणी गुणागर नागरलीळा । दास सदा गुण गाय ।।

भावार्थ ===

संत रामदास म्हणतात , राघवाचा महिमा इतका अपरंपार आहे कीं,त्यांनी वानर आणि निशाचर यांच्या कडून सागरावर सेतू बांधून घेतला. लक्ष्मणाला सावध करण्यासाठी द्रोणाचला सारखा प्रचंड पर्वत बाहुबलानें हिमालयातून लंकेपर्यंत वाहून आणण्याचे अघटित काम हनुमानाने तडीस नेलें.गुणांचे भांडार असलेल्या राघवाच्या या लिळांचे संत रामदासांना नेहमीच कौतुक वाटते. ते राघवाच्या नागर लीळांचे गुण गातात.

पद===43

(राग ---काफी, ताल---दादरा )

रंग रामीं मना रंग रामीं । रागरंग तोचि अभंग व्यर्थ कामीं ।।

रामपायीं गुंतुनि राहीं । कां पडसी अपायीं ।।

राम आमुचा जीव निजाचा । ठाव विश्रामाचा ।।

कीर्ति जयाची वर्णितांची । मुक्ति रे फुकाची ।।

कोळी कबीर दास अपार । तारिले साचार रे ।।

नाम जपावें अनन्य भावें । रामदास व्हावें ।।

भावार्थ ===

श्रीराम हा भक्तांचा आत्मरुपी जीव असून चिरंतन विश्रांतिचे ठिकाण आहे, वाचेने राम किर्ति वर्णितांच जीवाची जन्ममरणाच्या फेर्यातून सहजपणे सुटका होऊन मुक्ती मिळते असा विश्वास संत रामदास व्यक्त करतात. वाल्याकोळी , संत कबीर केवळ रामनामाच्या जपाने संसारसागर तरून गेले.अनन्यभावाने, संपूर्ण शरणागत होऊन रामनाम जपावें,रामनामाच्या रंगात रंगून जावे,रामचरणाशी गुंतून रहावे आणि रामदास ही अक्षय पदवी प्राप्त करावी असा उपदेश संत रामदास या पदांत करतात.

पद===44

(राग--सारंग, ताल--धुमाळी )

देखिला राघव नयनी । मृदुसुमनशयनी ।।

नासतसे तम भासत उत्तम । धन्य विरोत्तम राम रघोत्तम ।।

सर्व गुणागुण निर्मळ ते गुण । विमळविभूषण भक्तविभूषण ।।

भक्त गुणीजन मुक्त मुनीजन । देव बहुजन वंदिति सज्जन ।।

भावार्थ ===

श्रीराम सर्व पराक्रमी वीरांमध्ये श्रेष्ठ असून रघुवंशामध्यें सर्वोत्तम आहे.सर्वगुणांमधील निर्मळ गुणांनी शोभत असून भक्तांचे भूषण आहे. गुणी भक्त,मुक्त मुनीजन, संतजन तसेच सर्व देवदेवता श्रीरामाला वंदन करतात असा सर्वोत्तम राम कोमल सुमनांच्या शय्येवर शयन करीत असलेला आपण पाहिला असें संत रामदास या पदांत वर्णन करतात.

पद===45

राममय मानस झालें । चिंतनी चित्त निवालें ।।

हर अपरंपर त्याचेहि अंतर । ज्याचेनी नामें निवालें ।।

निरंजनी मन पहातां शोधून ।अद्वेती द्वैत बुडालें ।।

रामदासी ध्यान हेचि साधन । मीपण रामीं बुडालें ।।

भावार्थ ===

या पदांत संत रामदास ध्यानमार्ग हेच परमेश्वराशी एकरूप होण्याचे एकमेव साधन आहे असे सांगून स्वता:चा अनुभव अधोरेखित करतात.रामाचे ध्यान लागतांच मन राममय झालें,चित्त शांत झाले. निर्मळ , निरामय मनाचा शोध घेतांना जीव, शिवाचे अलगपण (द्वैत ) विरून गेले आणि अद्वैताचा अनुभव आला.

पद===46


मानस वेधले रामी । सच्चिदानंद घनश्यामी ।हो मानस।।

रामीं रंगलें कामीं विन्मुख जालें । विश्रामलें निजधामी ।।

मन हे आपण सोडुनी मीपण । लोधलें आरामी ।।

रामीरामदास सर्वस्वें उदास ।निष्कामता सर्वकामी ।।

भावार्थ ----

संत रामदास सच्चिदानंद घनश्याम रामचरणाशी गुंतून गेलें,रामरंगांत गुंतलेले मन कामवासनेपासून परावृत्त झालें. मनाचा मीपणा समूळ नाहीसा झाला आणि श्री रामपदासी मन विश्राम पावलें.संत रामदास सर्व कामनांपासून विरत्त होऊन निष्काम , उदासीन बनलें.

पद===47

राघवी मन तल्लीन जालें । आपेंआप निवालें ।।

नीलतमाल तनु रूप साजें। देखत सुख सुखासि मिळाले।।

राघवदास विलासत। भासे । सुखी दु:ख निमालें ।।

भावार्थ ----

संत रामदास म्हणतात, राघवाची निळसर, सावळी सुंदर देहकांती पाहून मन देहभान विसरून गेले ,आपोआप शांतीसुखाचा अनुभव येऊन मन निवांत झालें. सुख सुखाला मिळून दु:ख लोपून गेले.


पद===48

तेथें माझे तन मन धन ।।

परमसुंदर रूप मनोहर । करी धरूनि धनुर्बाण ।।

राम लक्ष्मण जनकतनया । वामभागीं शोभताहे ।।

पीत पितांबर कासिला कांसें । शोभतसे दिव्यठाणे ।।

भीम भयानक सन्मुख मारुती। कर जोडुनि वाट पाहे ।।

भावार्थ ----

मन हरण करणार्या ,अत्यंत सुंदर राघवाचे हतात धनुष्य बाण धरलेलें रुप पाहून आपण देह देहभान विसरून गेलो. राम लक्ष्मण आणि डाव्या बाजुला जनक राजाची कन्यका सीता शोभून दिसत आहेत. राघवाने पिवळा पीतांबर परिधान केला असून समोर भीमकाय भयानक मारुती आज्ञापालनासाठी हात जोडून उभा आहे श्रीरामाचे असे वर्णन संत रामदासांनी या पदांत केले आहे.

पद===49

महिमंता रे हनुमंता । संगितज्ञानमहंता रे ।।

बलभीमा रे गुणसीमा । सीमाचि होय नि:सीमा रे ।।

कळिकाळा रे विक्राळा । नेत्री भयानक ज्वाळा रे ।।

हरिधामा रे गुणधामा दास म्हणे प्रिय रामा रे ।।

भावार्थ ===

संगिताचे उत्तम ज्ञान असलेला हनुमंत उत्तम बुध्दीबल, शारिरीक बल धारण करणारा असून त्याच्या गुणांना सीमा नाही हनुमंताच्या नेत्रांमध्ये भयानक ज्वाळा असून प्रत्यक्ष काळाला सुध्दा भय वाटावें असे विक्राळ रूप धारण केले आहे.हनुमान हा विविध गुणांचे भांडार असून श्रीरामाला अत्यंत प्रिय आहे.

पद===50

(राग- सारंग, ताल-धुमाळी )

सामर्थ्याचा गाभा । तो हा भीम भयानक उभा । पाहतां सुंदर शोभा । लांचावले मन लोभा ।।

हुकारें भुभु:कारें । काळ म्हणे रे वा रे विघ्न तगेना। थारे । धन्य हनुमंता रे ।।

दास म्हणे वीर गाढा ।रगडित घनसर दाढा । अभिनव हाचि पवाडा । पाहतां न दिसे जोडा ।।

भावार्थ===

रामभक्त हनुमान हा सामर्थ्याचा गाभा असून प्रचंड देहयष्टी मुळे तो भयानक वाटतो तरीहि त्याचे सौंदर्य मनाला मोहून टाकते.हनुमानाचा भुभु:कार ऐकून प्रत्यक्ष काळ सुध्दा प्रशंसा करतो.संत रामदास हा खरा पराक्रमी वीर म्हणून हनुमानाची स्तुती करतात.हनुमंता पुढे सर्व विघ्ने पळून जातात,कुणिही हनुमानाशी तुलना करु शकत नाही.


पद==51

कैवारी हनुमान। आमुचा पाठी असतां तो जगजेठी । वरकड काय गुमान ।।1।। नित्य निरंतर रक्षी नानापरी । धरुनियि अभिमान ।।2।। द्रोणागिरी करिं घेउनि आला । लक्ष्मणप्राणनिधान ।।3।। दासानुदासा हा भरवसा । वहातसे त्याची आण ।।4 ।।

भावार्थ ===

संत रामदास या अभंगात लक्ष्मणाचे प्राण वाचवण्या साठी द्रोणागिरी घेऊन येणार्या हनुमानाची महती सांगत आहे.नाना परीने हनुमान भक्तांचे रक्षण करतो.हनुमानाच्या सर्व भक्तांना याची खात्री वाटते, तो पाठराखा असल्याने इतरांची पर्वा करण्याची कांहीच गरज नाही असे विश्वासाने संत रामदास सांगतात.

पद ===52

मारुति सख्या बलभीमा रे । मारुति ।।धृ ।। अंजनिचे वचनामृत सेवुनी । दाखविसी बलसीमा रे ।।1।। वज्रतनू अतिभीम पराक्रम । संगित गायन सीमा रे ।।2।। दास म्हणे तूं रक्षीं आम्हां । त्रिभुवनपालक सीमा रे ।।3।।

भावार्थ ==! वज्राप्रमाणे कणखर शरीर असलेला मारुति अतिशय पराक्रमी आहे . बलभीम संगीत व गायन कलेंत निपुण आहे. अंजनीमातेच्या आज्ञेनुसार तो आपले बल दाखवतो.संत रामदास त्रिभुवनपालक मारुतीला आपले रक्षणकरण्याची विनंती करतात.

पद ===53

(राग --काफी, ताल --दीपचंदी ) आनंदरुप वनारी रे । तो आनंद सुरवरनर मुनिजन मनमोहन। सकळ जना सुखकारी रे ।।1।। अचपळ चपळ तनु सडपातळ । दास म्हणे मदनारी रे ।।2।।

भावार्थ === संत रामदास हनुमान मारुतीला आनंदरुप वनारी असे संबोधुन तो सूरवर व मुनिजनांच्या मनाला मोहिनी घालून त्यांना आनंद देणारा आहे, सर्व जनांना सुख देणारा आहे. अतिशय सडपातळ तनु असलेला हनुमान अती अचपळ असून संत रामदास सांगतात कीं, तो मदनाचा शत्रु जो शिवशंकर त्यांचा अवतार आहे.

पद ===54

( चाल ---उध्दवा शांतवन )

किती प्रताप वर्णू याचा । श्रीसमर्थ मारुतीचा ।।धृ 0 ।। सूर्य तपेल बाराकळी । पृथ्वीची होईल होळी । अंतक जो कळिकाळाचा ।।1।। कल्पें अनंत होतीं जातीं । नोहे वृध्द तरुण मारुती अजरामर देह जयाचा । ।।2।। दास म्हणे धन्य बलभीमि । सहस्त्रमुखा न वर्णवे महिमा काय बोलूं मी एट जिभेचा। ।।3।।

भावार्थ ===!

श्रीसमर्थ मारुतीच्या प्रतापाने सूर्य बारा कलांनी तापेल आणि पृथ्वी जळुन खाक होऊन तिची होळी होईल.तो कळीकाळाचा अंत करणारा आहे .युगामागुन युगे आणि अनंत कल्पे होतील आणि जातील पण मारुती कधीच वृध्द होणार नाही कारण त्याचा देह अजरामर आहे. संत रामदास म्हणतात, हजार मुखे असलेला नागराज शेष सुध्दा ज्याचा महिमा वर्णु शकत नाही तो मारुती धन्य होय .अशा प्रतापशाली मारुतीचा महिमा आपल्या सारखा एक जीभेचा मानव कसा वर्णन करु शकेल ?

पद==55

तो हा प्रळयरुद्र हनुमान ।न वर्णवे महिमान ।।ध्रु ।। नीलशैल्यसम भीषण भीम वारणवज्रशरीरी । ठाण उड्डाण मांडूनी उभा लांगुळ भूमी थरारी ।।1।। कांचकच्छ पीतांबर कासे वाहुनी चपेटा । तीक्ष्ण नखें रोमावळी सित काळासी देत थपेटा ।।2।। कंडलें लोळ कपोळ झळाळित लोचन पीटतावी । विक्रांतानन दशन भयंकर अदट वीर दटावी ।।3।। ब्रह्मचारी शिखा सूत्रधारी मेखळा अतीशोभताहे। दास उदास रामासन्मुख हस्तक जोडुनी आहे .श

भावार्थ ===

या अभंगात संत रामदास हनुमानाच्या स्वरुपाचे वर्णन करीत आहेत. वज्रासारखे शरीर असलेला,नील पर्वता प्रमाणे कांती असलेला हनुमान भिती निर्माणकरतो.उड्डाण घेण्याच्या पावित्र्यांत उभा असलेल्या हनुमानाच्या शेपटीमुळे भूमी कंप पावत आहे। पितांबराचा कासोटा त्याने कमरेभोवती घट्ट बांधला आहे.हनुमानाची तीक्ष्ण नखे, कानातील कुंडले, भव्य कपाळ, तेजस्वी डोळे,शरिरावरचे रोमांच काळाला थपडा मारीत आहेत.हनुमानाचे उग्र ,विक्राळ तोंड वीरांच्या मनांत भय निर्माण करते. मस्तकावरील शेंडी, गळ्यातील माळ अतिशय शोभून दिसत आहे .असा हा रामाचा दास रामासमोर हात जोडून उभा आहे.

पद ==56

(राग --विहाग, ताल --धुमाळी )

तांडव नृत्य करी देवाधिदेव थैया थैया धमक जातसे । सरी न दिसे दुसरी ।।1।। नटनाट्यकळा सकळ जाणे । चाकाटल्या किन्नरी ।।2।। गीतनृत्यवाद्यधनस्वरादिक । दास म्हणे विवरीं। ।।3।।

भावार्थ ==!

या पदांत संत रामदास देवाधिदेवाच्या तांडवनृत्याचे वर्णन करीत आहेत .अतंत्य जलद गती असलेल्याया नृत्याची बरोबरी कुणीच करु शकत नाही .महादेव सर्वनटनाट्य कलांचे जाणकार असून गीत, नृत्य,वाद्य व स्वरयांचा सुरेख मेळ जमला आहे गंधर्व स्त्रिया सुध्दा चकित होतात.

पद ==57

( राग कल्याण, ताल ==त्रिताल )

हरिवीण काय रे उध्दवा। ।।ध्रु 0 ।। ज्ञान न माने ध्यान न माने । आणीक व्यर्थ उपाय ।।1।। नित्यनिरंजन ध्याती मुनिजन । मानस तेथ न जाय ।।2।। निर्गुण ते खुण अंतर जाणे । दास गुणगाण गाय। ।।3।।

भावार्थ ==

हरि भक्तिशिवाय ज्ञानमार्ग ,ध्यानमार्ग आणि बाकी सर्व उपाय व्यर्थ आहेत.मुनिजन त्या नित्य निरंजन स्वरुपाचे सतत ध्यान करतात परंतू मन त्या निराकार निर्गुण परमेश्वरा पर्यंत पोचत नाही.संत रामदास म्हणतात ,या श्री हरिपर्यंत पोचण्याची खुण अंत:करणाने जाणावी व सतत त्याच्या गुणांचे गुणगान करावे.

पद==58

समजत वेधिलें मना । धन्य धन्य मोहना ।।ध्रु0।। दिसत भासे रम्य विलासे । अगणित गुणगणना ।।1।। चमकत चित्त चकितचि जालें । लीन तल्लीन निवालें ।।2।। अंतरिचा हरि अंतरल्यावरी । मग काय भूषण ।।3।। त्याविण हा जीव जाइल माझा । दास म्हणे मरणे। ।।4।।

भावार्थ ===

या श्रीहरीने नकळत मनाचा वेध घेतला आहे ,तो मनमोहन धन्य आहे. या मोहनाचा मनोहर विलास सर्व सृष्टींत भासमान होतांना दिसून येतो.त्याच्या गुणांची गणना करणे केवळ अशक्य आहे.मोहनाचा हा गुणविलास पाहून चित्त आश्चर्यचकितहोते,त्याच्यास्वरुपांततल्लीनहोते.अंत:करणांत वसणारा हा हरी अंतरला तर त्याच्याशिवाय प्राण निघून जाईल,मरण ओढावेल.

पद==59

वेणु वाजे , सुरस वेणु वाजे। ।। ध्रु 0।। रुणझुण रुणझुण मंजुळ मंजुळ । अहो रंग माजे ।। 1।। ऐकोनी तो कीळ थक्कित कोकिळ । अहो कंठ लाजे ।।2।। धीर समीरे यमुनातीरे । अहो तुंब माजे ।।3।। दासपालक चित्तचालक । अहो गोपीराजे। ।।4।।

भावार्थ ===

या पदांत संत ज्ञानेश्वर गोपीराज श्री कृष्णाच्या सुरस वेणु (बासरी )वादना विषयी सांगत आहेत.बासरीचा रुणझुण असा मंजुळ,कानाला गोड वाटणारा आवाज वातावरणांत प्रसन्न रंग भरतो. तो आवाज ऐकुन कोकिळ लज्जित होते, हे बासरीचे स्वर ऐकण्यासाठी यमुना तीरावर गोप गोपिकांची दाट गर्दी जमली आहे.

पद ==60

सुरस मधुर वेणु । वाजवितो रुणझुणु । ।।ध्रु0।। विकळ होती हे प्राणु। भैटीकारणे। ।।1।। रुप मनी आठवे । आवडी घेतली जीवे । यदुवीरा पहावें । सर्व सांडोनी। ।।2।। अखंड लागलें ध्यान । स्वरुपीं गुंतलें मन । सकळ पाहतां जन । आठवे हरी। ।।3।। सकळ सांडोनी आस । तयालागी उदास । फिरे रामदास ।वेधु लागला हरीचा ।।4।।

भावार्थ ==!

संत रामदास म्हणतात, यदुवीर जेव्हां वेणु वाजवतो तेव्हां ते सुरस ,मधुर स्वर त्याच्या भेटीसाठी प्राण व्याकुळ करतात . यदुवीराचे रुप आठवून मनांत त्याची आवड निर्माण होते. सर्व सोडून त्याला पहावे असे वाटते.यदुवीराच्या स्वरुपांत मन गुंतून त्याचे अखंड ध्यान लागते,सर्व लोकांमध्ये तोच सामावला आहे असे वाटते.सगळ्या आशा,ईच्छा सोडून उदासीनबनलेलेरामदास हरिचा शोध घेत फिरतात.

पद ===61

राधे तुझा कृष्ण हरी । गोकुळांत फंद करी । जाऊनि गौळर्णीला धरी । दहीदूध चोरी करी। ।। ध्रु।। मथुरेची गौळण थाट । शिरीं गोरसाचा माठ । आडवितो आमुची वाप । करितो मस्करी । ।।1।। संगे घेउनी गोपाळ। हिंडतसे रानोमाळ । करितो आमुचे बहु हाल । सोसावे कुठवरी ।।2।। गुण याचे सांगू किती । सांगता मज वाटे भ्रांती । वाईट आहे याची रीति । ऐसा हा ब्रह्मचारी। ।।3।। गौळण होउनिया लीन । जाती हरीला शरण। क्षमा करिजे मनमोहन । दास चरण धरी। ।।4 ।।

भावार्थ ===

या पदांत गौळणी राधेकडे कृष्णाची कागाळी करीत आहेत. कृष्ण गौळणीच्या घरी जाऊन दह्या दुधाची चोरी करतो, डोक्यावर दुधाची घागर घेऊन मथुरेच्या बाजाराला जात असतांनाकान्हा वाट अडवून मस्करी करतो. गोपाळांना बरोबर घेऊनरानोमाळ भटकतो,खोड्या कढून सतावतो. ब्रह्मचारी असून कृष्णाची वागण्याची रीति अगदी वाईट आहे.अशाप्रकारे तक्रार करणार्या गौळणी शरणागती पत्करुन हरीला शरण जातात. संत रामदास यामनमोहनाची क्षमा मागून चरणाशी नतमस्तक होतात.

पद ==!62

(राग --केदार, ताल ---त्रिताल ) हरिवीण घडी गमेना । हरिविण शोक शमेना। ।।ध्रु0।। रुप मनोहर ज्याचे । लागलें ध्यान तयाचें। ।।1।। युगासम दिवस जातो । रामदास वाट पहातों। ।।2।।

या पदांत संत रामदास मनाला लागलेल्या हरिदर्शनाच्या ओढी विषयी बोलत आहेत. हरिच्या दर्शना शिवाय एक एक घडी युगासारखी वाटते. मनातिल शोक संपत नाही.त्याचे मनोहर रुप नजरेपासून हलत नाही,सतत याकृष्णाचे ध्यान लागते.

प--6द-3

(राग---शंकराभाष्य, ताल--द्रुतूएकताल )

दंडडमरुमंडित । पिनाकपाणी ।।ध्रु0 ।। कंठी आहे हळाहळ । माथां वाहे गंगाजळ ।।1।। शिरीं रुळे जटाभार । गळां फुंकती विखार ।।2।। पांच मुखें पंधरा डोळे । गळां साजुक सीसाळें ।।3।। हिमाचलाचा जामात । हातीं शोभे सरळ गात। ।।4 ।। रामीरामदास स्वामी । चिंतीतसे अंतर्यामी ।।5 ।।

भावार्थ ==

या पदांत संत रामदास शिवशंकराच्या स्वरुपाचे वर्णन करीत आहेत . हातामध्ये दंड, डमरु धारण केलेला असून समुद्र मंथनातून निघालेले हळाहळ (विष ) कंठामध्ये धारण केले आहे तर मस्तकावरील जटांमधून गंगाजल वाहत आहे. गळ्यामधे सर्पमाळ घातलेली असून ती कंठमाळे सारखी शोभून दिसत आहे .असा हा पिनाकपाणी हिमालयाचा जामात असून संत रामदास या शिवशंकराचे अंतर्यामी सतत ध्यान करतात.

पद == 64 देवहरे हरे महादेव हरे हो। ।।ध्रु0।। कंठी गरळ गंगजळ माथां । भालनयन शूलपाणी हरे हो ।।1।। दंडी व्याळ विभूतीलेपन । पंचानन शिवशंभु हरे हो। ।।2।। उमाकांत निवांत निरामय । दासहृदय जय देव हो हो। ।।3।।

भावार्थ ===

शिवशंकराच्या गळ्यामध्ये समुद्र मंथनातून निघालेले विष असून माथ्यावरील जटांमधून गंगेचे उदक वाहत आहे. कपाळावर तिसरा डोळा असून हातामध्ये त्रिशुळ धारण केले आहे,दंडावर सर्प माळा असून सर्वांगावर भस्म माखले आहे. पाच मुखे असलेला शीवशंभु निवांत आणि निरामय आहे. संत रामदासांचे हृदय या महादेवाने व्यापले आहे.ते शिवशंभुच्या नावाचा जयजयकार करतात.

पद ==65

सांब दयेचे देणे , मज हें धन सुत दारा बहुदुस्तरा, सत्यासत्य मी नेणें ।।मज0।। स्वात्मसुखाची प्रभा उजळली सर्व सुखाचें लेणें ।। दास म्हणे मज आसचि नाहीं शिवनामामृत घेणें ।। मज0।।

भावार्थ ===

संत रामदास म्हणतात पैसा , संतती आणि पत्नी यांच्या मोहातून बाहेर पडणे महा कठीण आहे. सत्य आणि असत्य मी जाणत नाही .सांब सदाशिवाचे कृपादान म्हणजे स्वसुखाची प्रभाच उजळली आहे किंवा हा सर्व सुखाचा मौल्यवान दागिनाच भेट मिळाला आहे. शिवनामामृत घेणे हाच आपला ध्यास असून त्या शिवाय कोणतिही ईच्छा नाही.

अभंग =66

रामनाम जपतो महादेव । त्याचा अवतारी हा खंडेराव हळदीची भंडारी उधळिती । तेणे सोन्यारुप्याची भांडारें भरती मणिमल्लमर्दन देव । एका भावे भजतां मार्तंडभैरव म्हाळसा बाणाई सुंदरी । मध्ये शोभे भूषणमंडित मल्लारी अखंड रणनवरा। यश पावा त्याचें भजन करा एकचि स्वर उठतो । समरंगणि लक्षानुलक्ष मोडितो रोकडे नवस पूरती । कोणीतरी आधीं पहावी प्रचीती अखंड प्रचिती जनी। दास म्हणे ओळखा मनींचे मनीं अ

भावार्थ ==

हा खंडेराव अखंड रामनाम जपणाय्रा महादेवाचा अवतार आहे. तो हळदीची भांडारें उधळतो त्यामुळे सोन्यारुपाचीं भांडारें भरतात.असे संत रामदास म्हणतात. मणिमल्ल दैत्याचा मर्दन करणारा हा देव असून भक्तिभावाने त्याचे भजन केल्यास सर्व कार्यांत यश प्राप्त होते. म्हाळसा व बाणाई यांच्या मधोमध अलंकार परिधान केलेला हा मल्लारी शोभून दिसतो. अखंडपणे रणांत झुंजणारा हा वीर असून समरांगणांत लक्षावधी शत्रु सैन्याला कंठस्नान घालतो. भक्तांच्या नवसाला पावणारा हा देव असून भक्तांनी याची प्रचिती जरूर पहावी आणि आपले मनोगत पूर्ण करावे असे संत रामदास या पदांत सांगतात.

पद ==६८

जय जय भैरवा रे।।ज.।। तुझे भजन लागे सदैवा रे। ॥ध्रु ।। काळभैरव बाळाभैरव ।।बा ।। टोळभैरव बटुभैरव ॥1॥ नाना प्रकारिचे विखार ।।प्र ।। ॥२॥ तयाचा करितसे भैरी संहार काळ काळाचाही काळ । महाकाळाचाही काळ । दास म्हणे तो हा क्षेत्रपाळ।।3॥

भावार्थ ==

काळभैरव ,बाळाभैरव, टोळाभैरव, बटुभैरव या विविध नावे प्रसिध्द असलेल्या भैरवाचा जयजयकार करून संत रामदास त्याचे भजन सदैव लागो असे म्हणतात. भैरवनाथ महाकाळाचाही काळ असून तो क्षेत्रपाळ फआहे.नाना प्रकारचे विखारांचा तो संहार करतो.

पद==६९

(राग-मालकंस, ताल - त्रिताल )

रामवरदायिनी जननी । रूप कळे कळे मननी गगनमंडळीं गुप्त खेचर । योगीमुनिजनध्यानी रम्य योगिनी नाटक । सकळभूती भुवनीं अंतरवासी दास विलासी । ऊर्ध्व भरे गगनी

भावार्थ ==

रामाला वर देणार्या अंबा मातेचे रुप केवळ मनालाच समजून येते.आकाश मंडळांत स्वैर संचार करणारे गुप्त खेचर यांना व योगीमुनिजनांना ध्यानावस्थेंत हे रूप बघतां येते. या योगिनीची नाटकलिला भुवनातिल सर्व प्राणिमात्रांच्या वर दिसून येते असे संत रामदास म्हणतात.

पद ==७०

सोडविल्या देवफौजा ।आला वैकुंठींचा राजा । संहारिले रजनीचर । देवभक्तांचिया काजा ।।ध्रु।। दास मी समर्थाचा । मजला कोणी जाणेना । मुळींची कुळदेव्या हे । तिणे रक्षिलें मना ।।१॥ अजिंक्य ते संहारिले । भूमीभार फेडिला । ऐसीया समर्थाला । जिणें वरु दिधला ॥२॥ ते सोय धरूनियां । गेलों तुळजेच्या ठायां । तिनें मज आश्वसिलें । भेटविलें रामराया ॥३॥

भावार्थ

देव ,भक्तांच्या रक्षणासाठी वैकुंठीचा राजा धावून आला.काराग्रुहांत अडकून पडलेल्या देवांना सोडविलें.अजिंक्य निशाचरांचा संहार केला. या राक्षसांच्या पापाच्या भाराने त्रासलेल्या भूमीचा भार हलका झाला. अशा समर्थ श्री रामांना कुळदेवीने वर दिला.हा प्रसंग ध्यानीं आणून तुळजा भवानिला शरण गेलो असतां तिने आश्वासन देवून रामरायाची दर्शन भेट घडवून आणली असे संत रामदास या पदांत म्हणतात.

पद ==७१

वोळली जगन्माता । काय उणें रे आतां । वैभवा जातजातां । भक्त हाणती लाता ॥ध्रु ॥ वोळलें भूमंडळ । परिपूर्ण पाहतां । राम आणि वरदायिनी । दोन्ही एकचि पाहतां ॥१॥ मनामाजीं कळों आलें । तेणें तुटली चिंता । रामरूप त्रिभुवनीं । चाले सर्वही सत्ता ॥२॥ रामदास म्हणे माझें । जिणें सार्थक जालें। देवो देवी ओळखितां । रूप प्रत्यया आलें

भावार्थ ==

प्रत्यक्ष जगन्माता प्रसन्न झाल्यावर भक्ताला कशाचीच कमतरता नसते. सर्वकांही परिपूर्ण असल्याने भूमंडळा वरील सर्वच प्रसन्न होतात. श्री राम व वरदायिनी माता भिन्न नसून एकच आहेत हे समजून आल्यावर सर्व चिंता संपली. तिनही भुवनीं एकच रामरूप अस्तित्वात असून त्याचीच सत्ता सर्वत्र चालते असे सांगून संत रामदास म्हणतात, देव व देवी यांचे निजरूप ओळखतां आल्याने सगळीकडे तेच रूप भरून राहिले आहे याचा प्रत्यय आला .

पद ==७२

माय वोळली माय वोळली । माय वोळली दया कल्लोळली ॥ध्रु।।

चळवळी जनी चळवळी मनीं । आनंदभूवनी वरद झाली ॥१॥

भडस पुरविते भाग्य भरविते । कीर्ति उरविते बोललेपणें ॥2॥

मूळ मूळिंचें डाळ मूळिंचें फळ मूळिंचें प्राप्त जाहलें ॥३॥

रामवरदा दासवरदा । रक्षिते सदा सत्य प्रत्यय ॥४॥

भावार्थ ===

जगदंबा माता प्रसन्न झाली ,तिच्या दयेचा पूर लोटला. सर्व लोकांच्या मनांत उत्साहाचे वारे वाहू लागले. आनंदवनभुवनी(महाराष्टांत)वरदायिनी ठरली .मनोकामना पुरवणारी, भाग्य उजळवणारी, कीर्तिपसरवणारी अशी तुळजाभवानी. शिवरायांच्या वंशाचे मूळ, त्या मूळाला फुटलैली फांदी व फांदीला लागलेलें स्वराज्याचे फळ ,ही भवानी रामाची वरदायिनी, रामदासांना वर देणारी असून सदा रक्षणासाठी तत्पर असते.

पद ===७३

अरे तूं दीनदयाळा पाव वेगीं ॥ध्रु 0॥

अहंममता मम घातकी । जाते घालूनी घाला ॥१॥

निर्जरमौळीविभूषणा । धीर बुडाला चाल वेगीं ॥२॥

दास म्हणे करुणालया । जीव व्याकुळ जाला ॥३॥

भावार्थ ===

या अभंगात संत रामदास दीनांवर दया करणाऱ्या श्री रामाची व्याकुळतेने आळवणी करीत आहेत. अहं ममता ही अत्यंत घातकी आसून ती अचानक घाव घालून जाते. अशा वेळी माणसाचा धीर खचून जातो,जीव व्याकुळ होतो.आता विलंब न करता यातून सुटका करावी.

पद==७४

अपराध माझा क्षमा करी रे श्रीरामा दुर्लभ देह दिधलें असतांनाहीं तुझिया प्रेमा । व्यर्थ आयुष्य वेंचुनि विषयीं जन्मुनि मेलों रिकामा ॥१॥

नयना सारिखें दिव्य निधान पावुनिया श्रीरामा । विश्वप्रकाशक तुझें रूपडें न पाहें मेघ:शामा ॥२॥

श्रवणे सावध असतां तव गुणकीर्तनिं त्रास आरामा । षड्रसभोजनी जिव्हे लंपट नेघे तुझिया नामा ॥३॥

घ्राण सुगंध हरुषें नेघे निर्माल्य विश्रामा । करभूषणें तोषुनि नार्चिति तव स्वरूपा गुणग्रामा ॥४॥

मस्तक श्रेष्ठ हें असतां तनुतें न वंदीं पदपद्मा । दास म्हणे तूं करुणार्णव हे सीतालंकृटतवामा ॥५॥

भावार्थ ==

मनुष्य म्हणून जन्माला येणे हा योग अनेक जन्मांनंतर येतो .हा दुर्लभ देह मिळूनही श्री रामाविषयी मनात प्रेम नाही. मनुष्य जन्माला येऊन इंद्रियजन्य विषयात व्यर्थ आयुष्य वाया घालवले. नयनांसारखी दिव्य ज्योतीची देणगी मिळूनही विश्वाला प्रकाशित करणारे मेघश्यामाचे रूप पाहू शकत नाही. कर्णेद्रिये सावध असतांना श्री रामाच्या गुणांची किर्ति ऐकतांना त्रास वाटतो. सहा प्रकारचे स्वाद असणार्या भोजनाला चटावलेली जीभ भगवतांच्या नामस्मरणात रममाण होत नाही. सुगंधामुळे आनंदित होणारी घ्राणेंद्रिय श्री रामांच्या पदकमलावरील निर्माल्याच्या सुवासाचा लाभ घेत नाही. सर्वश्रेष्ठ इंद्रिय मस्तक हे असूनही ते श्री राम चरणकमलांना वंदन करीत नाही. संत रामदास म्हणतात,डाव्या बाजूस सिता शोभून दिसत आहे अशा करुणासागर श्री रामांनी या सर्व अपराधाबद्दल आपल्याला क्षमा करावी.

पद ==७५

वेधु लागो रे छंदच लागो रे। भजन तुझे मन मागे रे ।।ध्रु।।

वय थोडे रे बहु झाडे रे। संसार सांकडें बहु कोडे रे।। 1।।

तुझ्या गुणें रे काय उणे रे। भजन घडावे पूर्वपुण्ये रे।। 2।।

भक्तिभावें रे उध्दरावें रे। संसाराचे दु:ख विसरावे रे।। 3।।

भावार्थ ==

या पदांत संत रामदास श्री रामाला विनंती करीत आहेत, मनाला रामभक्तीचा छंद लागावा,अंत:करणाला रामभेटीचा वेध लागावा, भजनाचा नाद लागावा .पूर्वपुण्य फळाला येऊन भजनात तल्लीन व्हावे, रामाच्या गुणसंकिर्तनांत कांही उणे राहू नये त्यांत संसाराच्या सर्व दु:खांचा विसर पडावा.श्री रामांनी आपला उद्धार करावा.

पद ==76

पतितपावन रामा शिवमानस आराम। सुखदायक निजधामा। पालक मुनिविश्रामा ।ध्रु0।।

करुणाकर सुरवरदा। पीयूषसमगुणहरदा । विलसत मणिमकरंदा। जयजयकार जगदानंदा ।।1।।

दुर्जनदुरितविदारा । दानवबलिसंहारा । शरयुपुलिनविहारा। जयजय जगदाधारा। ।।2।।

निगमागमसारांशा । कुलभूषण रघुवंशा । जगदोद्भव चालितांशा भव ईशा।। 3।।

कलितकलुषनिवारा। गुणगणिता अनिवारा । सहजसमाधी उदारा । दास मनोरमसारा ।।4।।

भावार्थ ===

संत रामदास या पदांत श्री रामाच्या गुणांचे वर्णन करतात, त्यासाठी त्यांनी अनेक समर्पक विशेषणे वापरली आहेत.पतितपावन (पतितांचा उध्दार करणारा) शिव शंकराच्या मनाला आराम देणारा (शिवमानसआरामा) करुणामय, सुखदायक, योगीजनांना विश्राम देवून त्यांचे पालन करणारा, देवांना वर देणारा (सुरवरदा) जगाला आनंद देणारा (जगदानंद ) दुष्टांच्या पापवासना नष्ट करणारा , दानवांच्या बलशाली राजाचा संहार करणारा,शरयु तीरावर वास करणारा, जगताचा आधार, वेदांचे रहस्य जाणणारा, रघुवंशाचे भुषण,संसारचक्राला गतीमान करणारा, नाभीकमलातून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाचा परमेश्वर, बोचणार्या पापाचे निवारण करणारा (कलितकलुषनिवारा) गुणांचा गौरव करणारा, योगीजनांना उदारपणे सहजसमाधी पर्यंत घेऊन जाणारा, अशा विविध गुणसंपन्न श्री रामाचे हे सर्वच गुण अमृता प्रमाणे मधुर व चिरंतन आहेत. असे संत रामदास म्हणतात.

पद ==77 (राग-शंकराभरण किंवा सारंग,ताल-दादरा )

जय जय रामा ।।ध्रु ।।

वारिजदळनयना। मुनिजनमनरंजना । तुजविण कंठवेना। रे रामा ।।1।।

सुखवरदायका। त्रैलोक्यनायका । भवबंधछेदका । रे रामा ।।2।।

दशरथनृपनंदना ।अरिकुळमुळखंडणा । रामदासमंडणा । रे रामा ।।3 ।।

भावार्थ ===

या पदांत श्री रामाचा जयजयकार करून संत रामदास म्हणतात, कमलफुलांच्या पाकळ्या प्रमाणे नेत्र असलेला श्रीराम मुनीजनांचे मनोरंजन करणारा, स्वर्ग, पृथ्वी, पाताळ या तिन्ही लोकांचा नायक असून सुख प्रदान करणारा आहे. दशरथनंदन राम संसाराची बंधने छेदणारा असून शत्रुच्या कुळाचा समूळ नाश करणारा आहे. स्वामी श्री राम रामदासांचे भुषण आहे.

पद ==78

अहो जय रामा हो जय रामा ।। ध्रुव।। पतितपावन नाम साजिरे। ब्रीद साच दावीं आम्हां हा ।।1।।

दीनानाथ अनाथबंधु। तुजविण कोण आम्हां हो ।।2 ।।

दास म्हणे नाम तारक तुझें। बहुप्रिय तुझ्या नामा हो ।।3।।

भावार्थ ===

पतितपावन हे नाम श्री रामाला शोभून दिसते असे संत रामदास म्हणतात. पतितपावन हे नाम रामानी सार्थ करून दाखवावे, श्रीराम दिनाचा नाथ व अनाथांचा बंधु असून त्यांच्या शिवाय भक्तांना तारणारा कोणी नाही रामभक्तांना हे नाम अतिशय प्रिय असून ते राम नामाचा जयजयकार करतात.

पद ===79

कैपक्षी रघुनाथ । माझा। दीनदयाळ क्रुपाळ क्रुपानिधि । मी एक दीन अनाथ।। 1।।

त्रिभुवनीं जो प्रगटप्रतापी। नामचि दीनानाथ।। 2 ।।

दास म्हणे करुणाघन पावन। देवाधिदेव समर्थ ।।3 ।।

भावार्थ===

रघुनाथ हा आपला पक्ष घेणारा असून तो दीनांवर दया करणारा क्रुपेचा सागर आहे. तिनही भुवनांचा स्वामी असून प्रतापी आहे. देवांचा अधिपती श्री राम समर्थ दीनानाथ आहेत.

पद ==80

हे दयाळुवा हे दयाळुवा । हे दयाळुवा स्वामी राघवा ।।ध्रुव।। प्रथम कां मला लावली सवे। मग उपेक्षणें योग्य हें नव्हे ।।1।।

सकळ जाणता अंतरस्थिति। तरि तुम्हांप्रति काय विनंती ।।2।।

दास तूमचा वाट पाहतो। बोलतां न ये कंठ दाटतो ।।3।।


भावार्थ ===

या पदांत संत रामदास श्री रामाकडे तक्रार करतात कीं, भक्तांच्या हाकेला धावून जाऊन मदत करण्याची सवय लावली आहे, आतां त्यांची उपेक्षा करणे योग्य नाही. अंत:करणातिल सर्व भावना श्रीराम जाणतात. भक्त रामांची काकुळतेने वाट पहातात .

पद ===81

दीनबंधु रे दीनबंधु रे दीनबंधु रे राम दयासिंधु रे।। ध्रु0।।

भिल्लटीफळें भक्तवत्सले । सर्व सेविलीं दासप्रेमळें।। 1।।

चरणी उध्दरी दिव्य सुंदरी। शापबंधनें मुक्त जो करी।। 2।।

वेदगर्भ जो शिव चिंतितो। वानरा रिसां गूज सांगतो।। 3।।

राघवीं बिजें रावणानुजें । करुनि पावला निजराज्य जें।। 4।।

पंकजाननें दैत्यभंजनें। दास पाळिलें विश्वमोहनें।। 5।।


भावार्थ ===

श्रीराम दयेचे सागर असून दिनाचे बंधु आहेत भक्त वत्सल रामांनी शबरी भिल्लिणीची उष्टी बोरे सुध्दां अत्यंत प्रेमाने सेवन केली. गौतम ऋषींच्या शापाने शिळा होऊन पडलेल्या दिव्यसुंदरी अहिल्येचा पदस्पशाने उद्धार केला. श्री राम वेद जाणणारे असून शिवशंकर श्री रामाचे सतत चिंतन करतात. आपले मनोगत वानरांना सांगून त्यांना आपलेसे करून घेतात, त्यांच्या मदतीने लंकापती रावणाचा वध करून रावणबंधु बिभिषणाला लंकेचे राज्य मिळवून देतात. कमलासारखे प्रसन्न वदन असलेले श्रीराम दैत्यांचा विनाश करुन विश्वाला मोहिनी घालतात.

पद ===82

एक वेळे भेटी दे रे ।।ध्रु0।।

प्रीति खोटी खंती मोठी। वाटते रे ।।1।।

विवेक येना विसर येना। काय करावे रे ।।2।।

तुझ्या वियोगें घटिका युग। जातसे रे ।।3।।

स्वरूप वेधू परम खेदु। वाटतो रे ।।4।।

भुवनपाळा दीनदयाळ। दास हे रे। ।।5।।

भावार्थ =

या पदांत संत रामदास दीनदयाळ रामचरणी व्याकुळतेने भेट देण्याची मागणी करीत आहेत. आपली रामावरची प्रिती खोटी तर नाही ना अशी शंका येऊन खंत वाटते . रामाच्या वियोगाने एक एक घटिका युगासारखी वाटते. राम स्वरुपाचा वेध लागला असून जीव कासावीस होऊन खेद वाटतो.

पद===83

शरण मी राघव हो ।।ध्रु0।।

अंतरध्याना गुणनिधाना। मज पहा हो।। 1।।

भजन कांहीं घडत नाही ।हें साहा हा ।।2।।

रामदास धरुनि कांस। एक भावो। ।।3।।

भावार्थ ===

मनासारखे भजन घडत नाही या जाणिवेने नाराज झालेले संत रामदास रामाला शरण जातात. अंत:करणांत ज्याचे सतत ध्यान करतो त्या रामाने आपल्यावर दया करावी एव्हढी एकच आस धरून भक्तीभावाने रामाला विनंती करतात.

पद===84

अरे तूं पावना रे ।।ध्रु0।।

चंचळ हे मन निश्चळवावें ।निरसी विपरित भावना रे।।

आशा ममता तृष्णा खाती। वारीं भवयातना रे ।।2।।

दास म्हणे शरणांगत तुझा । निश्चय माझा भावना रे।। 3।।

भावार्थ ===

या पदांत संत रामदास म्हणतात कीं, श्रीरामाने आपले चंचल (अचपळ) मन निश्चळ करावें. मनातील विपरित विचार निरसून टाकावेत.आशा, मीपणा आणि ममत्व तसेच प्रबळ इच्छा यांचा निरास करावा. शरण आलेल्याआपल्या दासाच्या भवयातना दूर कराव्यात.

पद ==85

धांव रे रामराया। किती अंत पाहसी। प्राणांत मांडला कीं। न ये करुणा कैसी ।।ध्रु0।।

पाहीन धणीवरी। चरण झाडी केशीं। नयन शिणले बा। आतां केधवां येसी ।।1।।

मीपण अहंकारें। अंगीभरला ताठा । विषयकर्दमांत। लाज नाही लोळतां। चिळस उपजली। ऐसे जालें बा आतां ।।2।।

मारुतिस्कंदभागीं। शीघ्र बैसोनी यावे । राघवेंद्र वैद्यराजे। कृपा औषध द्यावे । दयेचा पद्महस्ता। माझे शिरी ठेवावे। ।।3।।

या भवीं रामदास। थोर पावतो व्यथा । कौतुक पाहतोसी। काय जानकीकांता । दयाळू दीनबंधो। भक्तवत्सल आतां। ।।4।।

भावार्थ ==

संत रामदास अत्यंत आर्ततेने श्रीरामाला भेटीसाठी आळवित आहेत. अहंकाराने मनांत गर्विष्ठपणा शिरला आहे. इंद्रिय सुखाच्या चिखलात लोळत असूनही त्या बद्दल लाज वाटत नाही. श्रीरामाच्या भक्ती प्रेमामुळे आतां जागृती येत असून देहोपभोगाचा तिटकारा वाटत आहे. श्ररामाने आतां अधिक अंत न पाहतां मारुतीच्या खांद्यावर बसून त्वरित यावे,कारण वाट पाहून आतां डोळे शिणले आहेत.मनाची तृप्ती होईपर्यंत रामदर्शनाचे सुख घ्यावे,रामचरणाची धूळ आपल्या केसांनी झाडून काढावी अशी इच्छा सांगून संत रामदास विनंती करतात कीं, वैद्यराज रघुवीराने कृपा औषध द्यावे. दयेचा कमलहस्त मस्तकावर ठेवावा.जानकीनाथ दीनदयाळ दीनबंधु भक्तवत्सल रामाने आतां करुणा करावी.

पद===86

अहो जी रामराया ।। ध्रु0 ।।

बहुत शीण कठीण अपाया। निरस. दुर्घट माया।। 1।।

व्यर्थ प्रपंचें व्याकुळ काया। मार्ग नसेचि सुटाया ।।2।।

मावुनि गेलो जिवलग जाया। योग नव्हेचि भजाया।। 3।।

दुर्घट आला काळ कुटाया। सर्व सुख उतटाया ।।4।।

दास म्हणे मज बुध्दी कळाया। भक्तिमार्ग निवळाया।। 5।।

भावार्थ ===

हा प्रपंच्याचा व्यर्थ शीण असून देह व्याकुळ झाला आहे. यांतून सुटण्याचा कांही मार्ग सापडत नाही ,जिवाचे जिवलग ( पत्नी, संतती) ही प्रेमास पात्र नाहीत हे आतां समजले आहे.काळ कठीण आला आहे, सर्व सुख दु:खरुप बनले आहे. श्रीरामानी ही माया निरसून टाकावी, आत्मबुध्दी देवून भक्तीमार्गाला लावावें.

पद===87

रामा कल्याणधामा। क0

भवभयानक रंक पळाले। पूरित सकळ निष्कामा ।।1।।

दु:खनिरन सुखरूप सुखालय। सुखमुर्ति गुणग्रामा।। 2।।

दास विलास करी तव कृपा। अभिनव नामगरीमा।।3।।

भावार्थ ===

रामनाम हे कल्याणाचे निवासस्थान असून दु:खाचे निरसन करून सुखरूप करणारे सुखाचे भांडार आहे.रामनाम मूर्तिमंत सुख असून सर्व गुणांचे वस्तिस्थान आहे. भक्तांच्या संसारातील भयानक दारिद्र्य दूर करून मनोकामना पूर्ण करणारे आहे. रामनामाचा महिमा अभिनव आहे असे सांगत संत रामदास राम कृपेचा आनंद या पदांत व्यक्त करतात.

पद ===88

दयाळू राघवा हो ।।ध्रु0।।

तनु घननीळ सलिललोचन। मोचनदेव नमो। कुंडलमंडित दंडितदानव। मानवदेव नमो ।।1।।

विधिहर सुंदर वंदिती सुल्लभ। दुल्लहदेव नमो पालक दासविलासविभूषण। भूषणदेव नमो ।।2।।

भावार्थ ===

सावळी अंगकांती, कमलासारखे नयन असलेल्या दीनदयाळ राघवाला संत रामदास वंदन करीत आहेत. कानातील कुंडलांनी शोभून दिसणारा श्री राम दानवांचे निर्दालन करणारा मानवाचा देव आहे. ब्रह्मा आणि शिवशंकर ज्याला वंदन करतात त्या राघवाला नमस्कार असो. भक्तांचा आनंद हेच ज्याचे विभुषण आहे त्या भूषण देवाला नमस्कार असो .

पद===89

मांबुजाननं मांबुजाननं मांबुजाननं मांबु देहि मे ।।श्री।।

योगिरंजनं पापभंजनं। जनकजापतेविश्वमोहनं ।। 1।।

विबुधकारणं शोकहारणं। अरिकुलांतक भयनिवारणं।। 2।।

दासपालकं जय कृपालयं। चरणपंकजे देहि मे लयं।। 3।।

भावार्थ ===

संत रामदास श्रीरामास मांबुजाननं असे संबोधन वापरतात. मांबुजाननं म्हणजे अमृतातून निर्माण झालेला. या राघवाकडे ते अमृताची मागणी करीत आहेत.योगीजनांचे रंजन करणारा, सीतास्वयंवरांत शिवधनुष्याचा छेद करणारा (जनकजापती) जनकराजाच्या कन्येचा पती, सर्व विश्वाला मोहिनी घालणारा, देवांचे दु:ख निवारण करण्यासाठी, देवांना निर्भय बनवण्यासाठी शत्रुच्या संपूर्ण कुळांचा नाश करणारा, अशा या रामाच्या चरणकमलाशी नतमस्तक होत आहेत.

पद ===90

अहो जी मुनिमानसधामा। परम सुखदायक रे। तुजविण सीण वाटतो रे। जानकीनायका रे ।धृ।।

मायामोहपुरीं वाहवलो दुरीं। तूं धाव धाव देवराया । कामक्रोधमदमत्सरमगरें। विभांडिली सर्व काया।। 1।।

नको लावू वेळु तूं दीनदयाळू ।तुझी मन वास पाहे। येथून सोडवी ऐसा ।मज तुजविण कोण आहे ।।2।।

नको धरू दुरीं नाहीं देहा उरी। किती सत्व पाहसी रे। रामदास म्हणे झडकरी धांवणें ।राहें मज मानसी रे ।।3।।

भावार्थ ===

तपस्वी मुनींचे मन हे ज्याचे विश्रांतीस्थान आहे अशा परम सुखदायक जानकीनायकाला संत रामदास साद घालत आहेत. माया व मोह यांनी व्यापलेल्या संसार सागरात वाहून जाणार्या दासाला राघवाने धांव घेऊन वाचवावें. काम क्रोध, मद, मत्सर हे षड़रिपु भयानक मगरीच्या रूपांत या देहाची चिरफाड करीत आहेत. श्रीराम दीनदयाळ असून दासांचे एकमेव तारणहार आहेत. भक्ताची सत्वपरिक्षा न पाहतां आतुरतेने वाट पहात असलेल्या रामदासांना तात्काळ सोडवावे.

पद ===91

राम माझ्या जीवींचे जीवन। राम माझ्या मनींचे मोहन। एक वेळ भेटवा हो। तनमनधन सर्वही अर्पीन राघव दाखवा हो।।ध्रु0।।

घालूनि आसन लावूनि नयन चितासी चिंतवेना । मीपणे मी मज पाहतां निज परमगुज तर्कवेना।। 1।।

जवळीं आहे संग न साहें। कोणा न चोजवे तो। रामदास म्हणे आत्मनिवेदनें राघव पाविजेतो ।।2।।

भावार्थ ===

या पदांत संत रामदास म्हणतात, आत्मनिवेदन भक्तीने (संपूर्ण शरणागती) राघव प्रसन्न होतो. पद्मासन घालून मन अंत:करणांत स्थिर करुन श्री रामाचे चिंतन करण्याचा प्रयत्न करुनही देहबुध्दीमुळें परमेश्वरी साक्षात्काराचे रहस्य तर्कशक्तीने जाणता येत नाही. परमेश्वर आपल्या अगदी जवळ असूनही त्याचा संग लाभत नाही.मनाला मोहिनी घालणारा, जीवांचे जीवन असा श्रीराम एकवेळ भेटला तर तनमनधन रामचरणी अर्पीन .

पद===92

श्रीहरी नारायणा। तुज कां नये करुणा। वेळोवेळां जन्मवीसी। आतां सांगावें कोणा ।।ध्रु0।।

कैसा तरि तुझा अंश। तरि कां कराची उदास। करुणाघन कैसा। किती आतां पहावा वांस ।।।1।।

बहुतांमुखें ऐकलासी। भक्तवत्सल होसी । तरि कां उदासीन होसी । किती सत्व पाहसी ।।2।।

पावला दीनानाथ। भक्तांच्या केलें सनाथ । त्रैलोक्य वर्तवितो । धन्य होय समर्थ ।।3।।

भावार्थ ===

जन्म मृत्युच्या चक्रांत सापडलेल्या भक्तांची श्रीहरीनारायणाला करुणा येत नाही. नारायणाचे सर्व भक्त हे त्याचेच अंश असूनही तो आपल्या भक्तांना उदास कां करतो असा प्रश्न विचारून संत रामदास म्हणतात कीं, नारायणाला करुणाघन कसे म्हणावे. पुष्कळदा ऐकलं आहे कीं, श्रीहरि भक्तवत्सल आहे तरी भक्तांबद्दल ईतकी उदासिनता कां असावी, तो भक्तांचे ईतके सत्व कां पहातो या प्रश्नांनी बेचैन झालेले संत रामदास म्हणतात, त्रैलोक्य चालवणारे, समर्थ श्रीराम धन्य होत कारण ते दीनानाथ असून भक्तांना सनाथ बनवतात.

'पद===93

काय करूं मज कंठत नाही। भोगविलास न मानत कांहीं ।। ध्रु0।।

घर उदासीन राम उदासीन। मन उदासीन होतचि आहे ।।1।।

बहुत तमासे सृष्टीत भासे। देखत त्रासे अंतर माझें ।। 2।।

दास म्हणे रे कर्ता पाहें शोधित आहे मन तयाला ।।3।।

भावार्थ ===

संत रामदासांच्या मनाला जाळणारी उदासिनता प्रकर्षाने व्यक्त झाली आहे. भोगविलासात मन रमत नाही.एक एक दिवस घालवणे कठिण वाटते.घर रानासारखे उदास वाटते त्यामुळे मन आधिकच उदास बनते. सृष्टीत घडणाऱ्या घटना बघून मनाला त्रास होतो. संत रामदास म्हणतात, या घटना घडवणार्याला मन शोधात आहे.

पद ===94

आजीं भेटे गे रघुवीर। मी तुझे धाकुटें बालक। भवधूशरें भरले माझें पुसी वो श्रीमुख। ।।ध्रृ0।।

माझे जीवींचा जिव्हाळा सखा जिवलग सांगाती। आजीं भेटे रघुवीर माझ्या बाह्या स्फुरती।। 1।।

आजीं कंजती साळ्या माझे लवती लोचन। आजीं भेटेल रघुवीर सुखदु:ख सांगेन।। 2।।

रामीरामदासीं नित्य होताती शकुन। बाह्यांतरीं निज भेटि हितगुज सांगेन ।।3।।

भावार्थ ===

या पदांत संत रामदास स्वता:ला रघुवीराचे छोटे बालक आहे असे समजून लडिवाळपणे विनंती करीत आहेत.संसारातील अनिश्चितता, नश्वरता यांच्या धुळीने माखलेल्या आपल्या श्रीमुखाला रघुवीराने पुसून स्वच्छ करावे. रघुवीर आपल्या जीवाला जिव्हाळा देणारा जिवलग सखा, सांगाती आहे, त्यांच्या भेटीसाठी आतुरलेल्या मनाला शुभ शकुन होत असून रामदासांचे बाहू स्फुरत आहेत, डोळे लवत आहेत,कंठ दाटून येत आहे. रघुवीराची भेट होताच त्यांच्याशी हितगुज करून त्यांना मनातील सर्व सुखदु:ख सांगेन असे संत रामदास म्हणतात.


पद ===95

कमलदलनयना चाल हरी ।। ध्रु0।।

सकलपालका अतंरचालका। कठिणता न करीं ।।1।।

दीनदयाळा भक्तवत्सला।दूरि दुरी न धरीं ।।2।।

रामदास म्हणे आतां तुजविण। उदास वाटे तरी।। 3।।

भावार्थ ===

सर्वांच्या अंत:करणांत वास करून प्रेरणा देणार्या, सर्व जीवांचे पालन करणार्या रघुवीराने मन कठोर न करता,दुरावा न धरता दयाळू पणे, वात्सल्याने भक्तांना आपलेसे करावे. कमलनयन श्रीहरीने आता तत्परतेने भेटी द्यावी कारण त्याच्याशिवाय आतां उदास वाटत आहे.

पद===96

कल्याण करी देवराया। जनहित विवरीं ।।ध्रु0।।

तळमळ तळमळ होतचि आहे। हे जन हातीं धरीं।। 1।।

अपराधी जन चुकतचि गेले। तुझा तूंचि सांवरीं ।।2।।

कठीण त्यावरि कठीण जालें। आतां न दिसे उरी ।।3।।

भावार्थ ===

सतत चुका करणार्या अपराधी लोकांकडे पाहून संत रामदासांच्या मनाची तळमळ होत आहे. दिवसेंदिवस परिस्थिती कठिण होत असून ती सुधारण्याची कांही लक्षण दिसत नाही. देवरायाने जनहिताचा विचार करून त्यांना योग्य मार्गदर्शन करुन त्यांचे कल्याण करावे अशी विनंती संत रामदास या पदांत करीत आहेत.

पद ===97

नावरे निरंतर मन हें अनावर। आवरीं सत्वर देवराया रे ।।ध्रु 0।।

माझीच पारखी मज। म्हणोनि शरण तुज। शरणांगताची लाज राख रे रामा ।।1।।

तुझिया रंगणीं मन। धरितें अभिमान। तयारी निर्वाण करीं देवा रे ।।2।।

रामीरामदासी भाव। धरता प्रगटे देव । मनाचा स्वभाव पालटावा रे ।।3।।

भावार्थ ===

आपलेच स्वरुप आपल्याला समजू शकत नाही. आपणच आपल्याला परके झाले आहोत आणि आपल्यास्वरुपाची ओळख होण्यासाठी संत रामदास श्री रामाला शरण जात आहेत व श्री रामांनी शरणागताची लाज राखावी अशी विनंती करतात. रामचरणीं गुंतलेले मन अभिमान विसरु शकत नाही. संत रामदासांचा रामचरणीं उत्कट भक्तिभाव असल्याने देवाने प्रत्यक्ष दर्शन देवून मनातील अहंकार दूर करून स्वभाव पालटावा.

पद===98

पाळिलें पोसिलें मज। काय रे म्यां द्यावे तुज। चालविले हितगुज। कृपाळुपणें सहज। ।। ध्रु ।।

धन्य तूं गा रघोत्तमा। काय द्यावी रे उपमा। सुखाचिया सुखधामा। मज न कळे महिमा ।।1।।

आठवितां कंठ दाटे । हृदय उलटे फुटे। नयनीं पाझर सुटे। बोलता वचन खुंटे ।।2।।

सोडविले ब्रह्मादिक। तूं रे त्रैलोक्यनायक। दास म्हणे तुझा रंक ।सांभाळीं आपुले लोक ।।3।।

भावार्थ ===

श्री रामाने कृपा केल्याने आपले पालन पोषण झाले त्यांनी कृपाळुपणे सहज हितगुज केले त्यांचे कसे उतराई व्हावे हे समजत नाही असे सांगून संत रामदास म्हणतात श्री राम हे सर्व सुखाचे धाम असून ते अनुपमेय आहेत. त्यांचा महिमा कसा वर्णन करावा हे कळत नाही. श्रीरामांचे स्मरण होताच कंठ दाटून येतो, हृदयाला पाझर फुटून नयनावाटे पाझरु लागतो, बोलतांना वाणी कुंठित होते. श्री राम स्वर्ग, पृथ्वी, नरक या तिन्ही लोकांचे स्वामी असून त्यांनी ब्रह्मादिक देवांची कारागृहातून सुटका केली. आपण दीन असून श्री रामांनी आपला सांभाळ करावा अशी मागणी संत रामदास करीत आहेत.

पद===99

सुंदर पंकजनयना। पुण्यपावना । चुकली संसारयातना। जन्मपतना ।।ध्रु0।।

तुजविण शीण होतसे। वय जातसे। काळ सकळ खातसे । जन भीतसे ।।1।।

दास म्हणे तुझा आधार। पाववी पार। करी दीनाचा उद्धार। जगदोध्दार ।।2।।

भावार्थ ===

जन्म मरणाच्या फेर्यांत अडकून संसाराच्या यातना सोसून थकून गेलेले संत रामदास कमला सारखे सुंदर नयन असलेल्या, पुण्यपावन श्री रामाला प्रार्थना करीत आहेत.जीवनातिल एक एक दिवस काळाच्या मुखी पडत आहे. मृत्यूचे भय सतत भेडसावत आहे, या वेळी केवळ रामकृपेचाच आधारवाटतो. जीवनाची ही नौका श्रीरामाने पार करावी .दिनाचा उद्धार करून जगदोध्दार करावा .

पद ===100


तूं माझी माता।राघवा । तूं माझा पिता ।।ध्रु0।।

मारुतीचे स्कंधभागीं ।बैसुनियां येईवेगीं । धांव त्वरित आतां ।।1।।

दीनबंधु नाम तुझें। मजविषयीं कां लाजे। जानकीच्या कांता ।।2।।

पतित मी देवराया। शुध्द करावी हे काया। कर ठेउनि माथां ।।3।।

हस्त जोडुन वारंवार। दास करी नमस्कार। चरणी ठेउन माथा ।।4।।

भावार्थ ===

संत रामदास श्री रामाला आपली जन्मदात्री माता व पालन पोषण करणारे पिता आहेत असे मानतात. त्यांच्या चरणावर माथा ठेवून त्यांना वारंवार नमस्कार करतात. जानकीनाथ श्री राम हे दीनबंधु या नावाने ओळखले जातात तरिही ते आपल्या दासाबद्दल उदासीन आहेत. देवरायाने आपल्या मस्तकावर हात ठेवून या पतिताची काया शुध्द करावी. वारंवार हात जोडून, चरणांवर माथा ठेवून संत रामदास देवाची प्रार्थना करतात.

पद ===101

तूं ये रे रामा। कायवर्णुं महिमा ।।ध्रु0।।

सोडविले देव तेतीस कोटी। तेवीं सोडवीं आम्हां।। 1।।

राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न। पुढें उभा हनुमान ।।2।।

दास म्हणे भावबंध निवारीं । रामा गुणधामा ।।3।।

भावार्थ ===

श्री राम हे सर्व गुणांचे आश्रयस्थान असून ते लक्षुमण,भरत, शत्रुघन व हनुमान या समवेत उभे आहेत. श्रीरामांनी तेतीस कोटी देवांची रावणाच्या कारागृहातून सुटका केली तसे त्यांनी या भवबंधनातून आपणास सोडवावे अशी कळकळीची विनंती संत रामदास श्री रामाला करतात.

पद===102

आम्ही आपुल्या गुणणें। भोगितों दु:ख दुणें। तुज काय शब्दठेवणें। लाताडपणें ।।ध्रु0।।

सुख भोगितां सदा। नाठवे देव कदा। तेव्हां भुललों मदा ।भोगूं आपदा ।।1।।

जाणत जाणतचि। बुध्दी करुनी काची । धांवती संसाराची। सेवटीं ची ची ।।2।।

प्रस्ताव घडला। सर्व कळों आला। आतां सांगावें कोणाला। चुका पडिला ।।3।।

दास म्हणे रे देवा। चुकलों तुझी सेवा। माझा केतुला केवा । रे महादेवा ।।4।।

भावार्थ ===

आपण आपल्याच अवगुणांमुळे दु:ख भोगतो पण दोष मात्र देवाला किंवा दैवाला देतो .सुख भोगतांना मात्र देव आठवत नाही, तेव्हां मनांत अहंकार असतो. परिणामी आपदा भोगाव्या लागतात. लोकांकडून निंदा नालस्ती ऐकावी लागते. नंतर केल्या कर्माचा पश्चाताप होतो. घडून गेलेल्या सर्व चुकांची जाणिव होते पण ते कुणालाच सांगता येत नाही. संत रामदास म्हणतात देवाची सेवा करण्यात कुचराई केल्याने हे सर्व भोगावे लागते.

पद===103

कानकोंड्या सुखाकारणे मने लुलु केली। तेणें देहा सुख नव्हे हळहळ जाली ।।ध्रु0।।

कृपासिंधु रघुनायका अव्हेरूं नको रे । शरण रविकुळटिळका दास दीन मी रंक रे। ।।1।।

तुझी भेटी येतां रामा तुझा मार्ग चुकलों। विषयकांटे रुतले तेणे सीण पावलों ।।2।।

ऐसा दगदला देखोनि रामा करूणा आली। तंव वैराग्यहनुमंतें पुढें उडी घातली ।।3।।

हा हनुमंत ज्याचा कोंवसा धन्य त्याचें जिणें। तयालागीं ज्ञान बापुडें लाजिरवाणें ।।4।।

रामदास रामदास्यें रामभेटीस गेला। मीपण सांडुनी रामचि होउनि ठेला ।।5।।

भावार्थ

अतिशय क्षुल्लक सुखासाठी मन लांचावले. त्यामुळे सुख नव्हे तर विषाद मात्र वाढला. कृपासिंधु रघुनायकाने अव्हेर करु नये. राघवाचा आपण एक अत्यंत दीन असा दरिद्री दास असून त्याच्या भेटीसाठी आतुरलो आहे पण मार्ग चुकल्याने विषयसुखाच्या काटेरी मार्गावरील काट्याकुट्यांनी जखमी झालो,शिणून गेलो. हे पाहून रामाला दया आली. त्या वेळी विरागी हनुमंत मदतीस आला. व संत रामदासांना रामभेटीचा सुलभ मार्ग रामभक्त हनुमानाने दाखवला. संत रामदासांचा मीपणा हरपून ते राघवाशी एकरुप होऊन राममय झाले.

पद ===104

माझे जीवींचा सांगात। माझे मनांचा सांगात। भेटी घडो अकस्मात ।।ध्रु0।।

पावन तो रे आठवतो रे। गळत ढळत अश्रुपात।। 1।।

कोण तयाला भेटवि त्याला। निकटमनें प्राप्त।। 2।।

दास उदासिन करितों चिंतन। पावन ते गुण गात।। 3।।।

भावार्थ ===

संत रामदास उदासिन मनाने आपल्या जीवींचा, मनांचा जो सांगाती आहे त्या श्री रामाची अकस्मात भेट घडावी अशी इच्छा व्यक्त करीत आहेत. पीडितांना पावन करणारा श्री राम आठवतांच डोळ्यातून अश्रुपात सुरु होतो. जो कोणी त्या करुणाघन रामाला भेटवील त्याला मनापासून नमस्कार असो असे संत रामदास म्हणतात.

पद===105

आम्हां भक्तांच्या काजा । कैंपक्षी रघुराजा ।।ध्रु0।।

काय आहे मां तें द्यावें। कैसें उत्तीर्ण व्हावें ।।1।।

दास म्हणे धन्य लीळा। जाणें सकळ कळा।। 2।।

भावार्थ ===

रघुराजा भक्तांचा कैपक्षी असून तो त्यांच्या कामना पूर्ण करतो.रघुराजाच्या या उपकारासाठी कसे उतराई व्हावे, त्यांना काय अर्पण करावे असा प्रश्न करून संत रामदास म्हणतात, रघुराजाची लीळा अगाध आहे, तो सर्व कांही जाणतो.

पद===106

अहंतेने भुलविलों ज्ञानाचेनि द्वारें। धांव देवा नागविलों अभिमान चोरें । उमस नाहीं येते मीपणाचें काविरें। प्रकाश मोडला भ्रांत पडली अंधारें ।।1।।

बहु श्रवण घडले ज्ञाता होउनिया ठेलों। सिध्दपणाचा ताठा अंगी घेऊनि बैसलों। बोले तैसे चालवेना मीच लाजलों। शब्दज्ञानकाबाडी ओझें वाहातचि गेलों ।।2।।

शब्दज्ञान डफाचें गाणें आवडते भारी। देहबुध्दीचें कुतरें मी दुसऱ्याचें नावारी। ज्ञातेपणें फुंज भरला माझें अंतरी। रामदास म्हणे आतां नि:संग करी ।।3।।

भावार्थ ===

ज्ञानामुळे मीपणा (अहंता) निर्माण झाली,अभिमान रुपी चोराकडून पुरती फसवणुक झाली. मीपणाच्या धुंदीनें उसंत मिळेनासी झाली ,ज्ञानदीप प्रकाश निमाला आणि भ्रांतीचा अंधार पसरला. श्रवण भक्तीने ज्ञानलाभ झाला आणि ज्ञाता बनलो. सिध्द पुरुष म्हणुन ओळखला जाऊ लागलो, त्या मुळे गर्व निर्माण झाला, वाचा आणि वर्तन यांची फारकत झाली. स्वता:ला स्वता:ची लाज वाटू लागली. शब्दज्ञानाची पोपटपंची करु लागलो. शब्दज्ञानरुपी डफाचे गाणं आवडू लागलं, दुसऱ्याच्या देहबुध्दीचा उपहास करु लागलो. ज्ञातेपणाचा गर्व मनांत भरून राहिला. संत रामदास श्रीरामाला शरण जाऊन आपणास नि:संग करावे अशी प्रार्थना या पदातून करीत आहेत.

पद===107

गोडी लागली रामीं। न गुंतत कामी हो।। श्री।।

कनक मंदिरे सांडुनि सुंदरें विजन सेवियेलें। त्यजुनि सुंदरी वसविली दरी चरण भावियेले।। 1।।

शुक सनकादिक नारद तुंबर आर्षभादि मुनिराज। दास उदासिन होऊनि विचरति सांडुनि राजसमाज।। 2।।

भावार्थ ===

रामभक्तीत तल्लीन झालेले मन निष्काम बनले. सोन्यासारखा घर संसार सोडून विजनवास स्विकारला, सुंदर स्त्रीचा त्याग करून गिरीकंदरीं रामचरणीं लीन झालेले शुक सनकादिक ऋषी ,नारद,तुंबर, आर्षभ मुनिंनीं राम चरणाचा आश्रय घेतला.संत रामदास उदासिन होऊन समाज,राजाश्रय यांचा त्याग करून विजनवासात रामभक्तीत रममाण झाले.

पद===108

देह दंडिसी मुंड मुंडिसी। भंड दाविसी नग्न उघडा।।1।।

भस्मलेपन तृणआसन। माळभूषण सोंग रे मूढा।। 2।।

अन्नत्याग रे हट्टयोग रे। फट्ट काय रे हिंडसी वनीं।। 3।।

ऐक सांगतो रामदास तो। ज्ञानयोग तो साधितां भले।। 4।।

भावार्थ===

तपश्चर्या करून देहदंडन करणे, डोक्यावरील केस कापून मुंडन करणे, भगवी वस्त्रे परिधान करणे, सर्वांगाला चिताभस्म फासणे, तृणासन, रुद्राक्षाच्या माळा ही सर्व मुर्खांची लक्षणे आहेत. अन्नत्याग, विजनवास हा हठयोग आहे. संत रामदास म्हणतात, यांतून खरे वैराग्य निर्माण होणार नाही. ज्ञानातून वैराग्याचा उदय होतो. ज्ञानयोग साधणे अधिक श्रेयस्कर आहे.

पद===109

संसारी शिणसी थोर। कोणास उपकार। राहिला ईश्वर। तेणें गुणें रे ।।ध्रु0।।

संसारी शिणोनि काय। सज्जना शरण जाय। पावती उपाय। रामसोयरे ।।1।।

सांडून आपुले हित। धरिले गणगोत। गेले हे जीवित। हातोहातीं रे ।।2।।

म्हणे रामीरामदास। आता होईं उदास। धरी रामकास। सावकाश रे ।।3।।

भावार्थ ===

आपले हित सोडून नातेवाईक, सगेसोयरे यांच्या साठी काळ घालवल्यास सारे जीवन व्यर्थ जाते.संसारात अपार कष्ट केले तरी कोणावर उपकार केला असे होत नाही.परंतु त्यांमुळे ईश्वराला मात्र अंतरतो.यापेक्षा संत सज्जनांना शरण जाऊन निष्काम मनाने,उदासीन वृत्तीने,शांतपणे रामभक्तींत लीन व्हावे.

पद===110

मूर्खांची संगती कामा न ये रे। उपायांचा होतसे अपाय रे ।।ध्रु0।।

विकारी ते भिकारी बराडी रे। त्यांचे संगतीचा जनीं कोण गोडी रे ।।1।।

वैराग्याची वृत्ति ते उदास रे । तेथें न दिसती आशापाश रे ।।2।।

वासना ओढाळ आवरावी रे । विषयबुध्दी ते सावरावी रे ।।3 ।।

बोलणें चालणें उदासीन रे। अनुतापें सकळांसी मान्य रे ।।4।।

रामदास म्हणेसांगगों काय रे । मूढासी तो आवडें अन्याय रे ।।5।।

भावार्थ ===

मुर्खांची संगती धरल्यास उपाय न होतां अपायच होतो. सदाचार सोडून वागणारे विकारी लोक भिकारी समजावेत, त्यांच्या संगतीत समाधान मिळत नाही. विरागीवृत्ती असलेले लोक आशा निराशेच्या बंधनापासून मुक्त असतात. विषयसुखांना आवर घालून बोलणे व चालणे यांत उदासीनता असावी. अनुतापाने मन शुध्द होऊन सर्वत्र मान्यता मिळते. संत रामदास म्हणतात, असा उपदेश मूर्ख लोकांना अन्याय वाटतो.

पद===111

भावबळे तरले। रे मानव ।।ध्रु0।।

सारासार विचार विचारुनि । भव हा निस्तरले रे ।।1।।

रामनाम निरंतर वाचे। निजपदिं स्थिरले रे ।।2।।

दास म्हणे सुखसागरडोहीं । ऐक्यपणें विरले रे ।।3।।

भावार्थ ===

उत्कट भक्तिभाव असल्याने मानव सहजपणे संसार सागर तरून जातात. रामनामाचा सतत जप केल्याने भक्त आत्मपदीं स्थिर होतात. सार व असार यांचा निवाडा करून जन्म मृत्युच्या फेरा चुकवून आत्मस्वरुपाशी एकरुप होऊन आत्मानंदीं तल्लीन होतात. असे संत रामदास या पदात सांगतात.

पद===112

भावची दृढ जाला। हरी सन्निध त्याला ।। धृ0।।

वर्णावर्ण स्री शूद्रादिक। धरितां नामरतीला ।।1।।

प्रेमभरें हरिकीर्तनी नाचत। लाजविलें लाजेला ।।2।।

रामीं दासपणाचा आठव। सहजीं सहज विराला ।।3।।

भावार्थ ===

ज्याचा भक्तिभाव हरिचरणी दृढ झाला त्याला हरी नेहमीच सन्निध (जवळ) आहे. हरीच्या नामाचा सतत जप करणाऱ्रा साधक वर्णभेद, लिंगभेद, जातीभेद या पलिकडे असतो. भक्तिप्रेमाने हरिकिर्तनांत दंग होऊन नाचणारा भक्त आणि राम एकरुप होतात .

पद ===113

रघुनाथ अनाथ सनाथ करितो। मुक्त सदाशिव काशी। दोष विशेष नि:शेष नासती। नाम स्वर्गपदवासी ।।धृ0।।

नर वान्नर जळचर शरणांगत दीन अनाथ। खेचत भूचर जीव निशाचर तारिले भुवननाथें ।।1।।

रघुराज विराज विराजित ब्रीद दैत्यकाळमद राहे। वाजत गाजत साजत वांकी काय कोण महिमा ।।2।।

दास उदास सदा समबुद्धी विषमबुध्दि असेना। राम आराम विराम विराम तेणेविण वसेना। ।।3।।

भावार्थ ===

रघुनाथ अनाथांचा नाथ होऊन त्यांना सनाथ करतो. विशेष दोषांचे समूळ उच्चाटन करतो.रघुनाथाचे नामस्मरणाने स्वर्गपदाची प्राप्ती होते. श्रीराम तिन्ही भुवनाचे स्वामी असून नर, वानर, जळचर, शरण आलेले दीन अनाथ यांनाच नव्हे तर आकाशात तसेच जमिनीवर राहणारे, रात्री संचार करणारे निशाचर या सर्वांना भुवनेश्वर रघुनाथ तारून नेतात. रघुनाथ दैत्यांचा गर्व हरण करून आपले ब्रीद राखतात. त्यांच्या नामाचा डंका त्रिभुवनांत वाजत गाजत असतो. सदा समबुध्दी असलेले संत रामदास म्हणतात,श्री राम सर्वांना आराम देणारे असून त्यांच्या कृपेशिवाय विराम (विश्रांती) मिळत नाही.

पद===114

राम करी सांभाळ। दिनांचा ।। धृ0।।

सुरवर मुनिवर योगी विद्याधर। रीस हरी प्रति पाळ ।।1।।

सुरपति नरपति अवनिसुतापति।रामदासीदयाळ।। 2।।

भावार्थ ===

श्रीराम दीन,पतित यांचा सांभाळ करतात. योगी, विद्याधर यांचा प्रतिपाळ करतात.रामदासांवर दया करणारे श्रीराम मानवांचे,देवांचे देव असून अवनीसुता सीतेचे पती आहेत.

पद===114

करुणाकर अंतर जाणतसे ।।धृ0।।

न बोलतां जनीं भाविक भजनी। संकट वारितसे।। 1।।

भक्तवेळाइत सगुण अनंत। भाविकां रक्षितसे ।।2।।

दास जनीं वनिं चिंतित चिंतनीं। अंतरिं जो विलसे ।। 3।।

भावार्थ ===

करुणा करणारे ,दयासागर श्रीराम सर्वांच्या अंतकरणातिल भाव जाणतात. ते मूकपणे भाविक भक्तांच्या संकटांचे निवारण करतात. भक्तांसाठी निर्गुणातून सगुणांत अवतरलेले श्री राम अनंत रूपे घेऊन भक्तांचे रक्षण करतात. देव भक्तीप्रेमामुळे भक्तांचे ऋणी (अंकित) असतात असे संत रामदास म्हणतात.

पद ===115

माझी चिंता मज नाहीं रे। ।।धृ0।।

भक्तजनांचा भारचि वाहे। मज नलगे कांहीं। ।।1।।

पापविनाशन संकटनाशन। पावतसे लवलाहीं ।।2।।

दास म्हणे भवपाश तुटाया। संशय नलगे कांहीं ।।3।।

भावार्थ ====

भक्तजनांचा भार वाहून नेणारे श्रीराम स्वता:बद्दल अत्यंत उदासीन, निश्चिंत आहेत. सर्व पापांचा नाश करून भक्तांना संकटातून सोडवतात. भाविकांची संसार बंधनातून मुक्तता करतात यांत कांहीच संशय नाही असे संत रामदास म्हणतात.

पद===116

हरि कल्याणकारी। दु:ख शोक निवारी ।।धृ0।।

तो जगजीवन तो मनमोहन ।ओळखितां जन तारी।। 1।।

दास म्हणे तो अंतर माझें। भिन्नभेद अपहारी ।।2।।नृ

भावार्थ ===

सर्व सजीव सृष्टीला जीवन प्रदान करणारा, मनमोहन श्री हरि कल्याणकारी असून संसार दु:खांचा निरासकरणारा आहे. संत रामदास म्हणतात, श्री हरीआपला अंतरात्मा आहे हे ओळखल्यास आपपर भाव न ठेवता भेदाभेद नाहिसे करतो.

पद===117

भजा भक्तवत्सल। तो भगवान ।।ध 0।।

पावेल किंवा न पावेल ऐसा। सोडून द्या अनुमान।। 1।।

भजनरहित सकळ आडवाट। घेऊं नका आडरान ।।2।।

संचित तें भरले तन तारूं। मारिल काळ तुफान।। 3।।

एक देव तो दृढ धरावा। वरकड काय गुमान ।।4।।

दास म्हणे मज कोणीच नाहीं ।त्याचे पाय जमान।। 5।।

भावार्थ ===

भगवान भक्तवत्सल आहे तेव्हां तो आपल्याला पावेल कीं नाही अशी शंका घेऊ नये. भगवंताचे भजन करण्याचा मार्ग सोडून वेगळ्या आडवाटेने जाऊन आडरानांत (संकटात) शिरु नये. प्रत्येकाला त्याच्या संचिताप्रमाणे देहप्राप्ती होते व काळाच्या तुफानांत देहनाश होतो. एका देवावर दृढ निष्ठा ठेवून बाकी क्षुल्लक गोष्टींना महत्त्व देवू नये. संत रामदास म्हणतात, आपणास भगवंताशिवाय कोणी नाही, त्यांच्या चरणांवर जीवन वाहिले आहे, भगवंताचे पाय याची साक्ष देतील.

पद===118

हरि जगदांतरीं रे। हेत बरा विवरीं रे ।।धृ0।।

सकळ तारी सकळ मारी। सकळ कळा विवरी ।।1।।

चाळितसे रे पाळितसे रे। दास म्हणे विलसे रे।। 2।।

भावार्थ ===

श्रीहरी जगताचा अंतरात्मा आहे या बोधवचनाचे मनांत सतत विवरण करावें. सर्वांना तारणारा किंवा मारणारा, सर्व सजीवांना चलनवलन देवून पालन करणारा केवळ हरीच आहे. जगात घडणाऱ्या सर्व घटना भगवंताचा लीला विलास आहे. असे संत रामदास या पदांत म्हणतात.

पद=119

श्रोतीं असावें सावध। तेणें गुणें अर्थ होतसे विशद ।।धृ।।

श्रोते श्रवणमननें। मननशीळ होती सुचित मनें ।।1।।

वाच्यांश सांडिला मागें । लक्षांश पुढे भेदिला लागवेगें ।।2।।

तिन्ही पाहाव्या प्रचिती। प्रचितीविण कदापि न घडे गति ।।3।।

दास म्हणे रे भावे। श्रोते तुम्ही समाधान असावें ।।4।।

भावार्थ ====

श्रोत्यांनी श्रवण करतांना मनाने एकाग्र असावें. ऐकलेल्या गोष्टींवर विचार करून मनन केल्यानें शब्दार्थ कळून भावार्थ सुध्दा समजतो. श्रवण, मनना नंतर प्रत्यक्ष अनुभव घेणे आवश्यक असते. त्यां शिवाय परमार्थात प्रगती होत नाही. संत रामदास म्हणतात, भक्तिभावाने मनन केल्यास परमार्थात प्रगती होते.

पद===120

धरीं धीर राहें स्थिर अरे तूं मना। अरे। क्षणभरी तरी आठवी रघुनंदना ।।धृ0।।

चंचळ चपळ मन हें नाटोपे कोणा। सृष्टीकर्ता ब्रह्मा तोही नाडला जाणा ।।1।।

हाचि समय टळल्यां मग कैंचा श्रीराम। स्मरणीं सावध होई माझा फिटेल भ्रम ।।2।।

सांवळा सुंदर राम कोदंडधारी। परेहूनि परतां रामदासाअंतरीं ।।3।।


भावार्थ ===

या पदांत संत रामदास आपल्या मनाला उपदेश करीत आहेत. मनाने स्थिर राहून धीर धरून राघवाचे स्मरण करावें. मन अतिशय चंचल, चपळ असून मनाला आवर घालणे सृष्टी निर्माण करणार्या ब्रह्मदेवाला सुध्दा शक्य होत नाही. ही वेळ निघून गेल्यावर श्रीरामाचा लाभ होणार नाही. श्रीराम कृपेचा लाभ होण्यासाठी रामनामांत सावध असले पाहिजे.सावळा सुंदर राम परावाणीच्या पलिकडे असून तो रामदासांच्या अंतरंगात वास करतो.

पद===121

रे राघवा नाम तुझें बरवें ।।धृ0।।

ज्ञानें गर्व चढे। अहंभाव वाढे। स्थिती मोडे वैभवें ।।1।।

कर्म आटाआटी। प्रायश्चितांच्या कोटी। संशय घेतला जीवें ।।2।।

दास म्हणे आतां। नाना पंथी जातां। काय किती पहावें ।।3।।

भावार्थ ===

संत रामदास म्हणतात, ज्ञानामुळे मनाला गर्वाची बाधा होते मीपणा वाढतो.वैभव आले कीं, संसारिक स्थिती बदलते. कर्म करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.दुष्कर्माचे प्रायश्चित्त घ्यावे लागते. जीव उपासनेच्या नाना पंथांमुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडतो. या पेक्षा रामाच्या नामस्मरणाचा मार्ग अधिक चांगला व सोपा आहे.

पद===122

हरि नाम तुझे अमृतसंजीवनी ।।धृ0।।

सकळ मंगलनिधि सर्वहि कार्यसिध्दि। तरणोपाय जनीं ।।1।।

आगमनिगम संतसमागम। वेधले देवमुनी ।।2।।

दास म्हणे करुणाघन पावन । तारक त्रिभुवनीं ।।3।।

भावार्थ===

हरीचे नाम हे संजीवन देणार्या अमृता सारखे असून मांगल्याचा ठेवा आहे. सर्व कार्य सिद्धीस नेण्यास समर्थ आहे. हरिनामा शिवाय अन्य तरणोपाय नाही. वेद व शास्त्र संताची संगति यांनी देवमुनींचे चित्त वेधून घेतले. संत रामदास म्हणतात, करुणाघन हरीचे नाम पावन असून त्रिभुवनांत तारक आहे.

पद===124

नाम हरीचे गोड। सखया ।।धृ0।।

घेउनि रुची त्या नामरसाची ।भवबेडी हे तोड ।।1।।

बैसुनियां गृहीं वेळ नको गमूं ।भलती बडबड सोड।। 2।।

रामदास म्हणे आवरूनि मन हें। सद्गुरुचरणा जोड।। 3।।

भावार्थ ===

हरीचें नाम अत्यंत गोड असून त्या नामरसाची गोडी लागल्यास संसार बंधनाची बेडी तुटण्यास वेळ लागणार नाही.घरांत बसून भलती बडबड करण्यांत वेळ घालवण्यापेक्षा मनाला आवर घालून मन सद्गुरु चरणांसी स्थिर करावें असे संत रामदास आपल्या शिष्यांना उपदेश करतात.

पद===125

आठवला श्रीराम। हृदयीं ।।धृ0।।

आठव नाठव शोधुनि पाहतां। मन जालें विश्राम।। 1।।

फळलें भाग्य बहुजन्मांचें। नामीं जडलें प्रेम ।।2।।

रामाविण अनु न दिसें कांहीं। दासाचा हा नेम ।।3।।

भावार्थ ===

पुष्कळ दिवसांचे भाग्य फळाला आले आणि अंतरांत श्रीराम प्रकट झाला. नामावर प्रेम जडले, रामाशिवाय दुसरे कांही दिसेनासे झाले.श्रीरामाची आठवण कधी झाली आणि विसर केव्हां पडला हे शोधून पाहतांना मन रामचरणीं विश्राम पावले.

पद===126

श्रीगुरूंचे चरणपंकज हृदयीं स्मरावें ।।धृ0।।

निगमनिखिल साधारण। सुलभाहुनि सुलभ बहू। इतर योग याग विषमपथीं कां शिरावे ।।1।।

नरतनु दृढ नावेसी। बुडवुनि अति मूढपणें। दुष्ट नष्ट सुकर कुकर तनूं कां फिरावें ।।2।।

रामदास विनवि तुज। अझुनि तरी समज उमज। विषयवीष सेवुनियां फुकट कां मरावें। ।।3।।

भावार्थ ===

श्रीगुरूंच्या चरणांचे अंतःकरणात स्मरण करावें, साधारणपणे वेदांतात सांगितलेलें हे सर्वांत सुलभ साधन आहे. योग याग हे अवघड मार्ग आहेत, या मार्गिने जाऊ नये. सर्वश्रेष्ठ अशी नरदेह रुपी नौका लाभली असतांना मूर्खपणे तिला बुडवून ,परमेश्वर प्राप्तीची संधी वाया घालवू नये. संत रामदास साधकांना विनंती करतात कीं इंद्रियसुखाचे विषय विषासारखे आहे त्यांच्या मागे लागून आयुष्य फुकट घालवू नये हे समजून घ्यावे.

पद===127

गुरुचरणीं मना लीन होई रे ।।धृ0।।

त्याविण आणीक कोण करी अनन्य। मानधनांसी न ध्याई रे ।।1।।

हा भवसागर दुस्तर जाणुनी। नामामृत तूं घेई रे ।।2।।

दास उदास आस गुरूची। कांस धरूनी पदीं राही रे ।।3।।

भावार्थ ===

साधकांना उपदेश करतांना संत रामदास या पदांत म्हणतात,मनाने गुरुचरणांशी लीन व्हावे, लोकेषणा वित्तेषणा यांचा त्याग करावा. हा भवसागर पार करणे अवघड आहे हे जाणून रामनामाचे अमृत सेवन करावे. उदासीन वृत्तीने गुरुचरणांचा आसरा धरावा. त्या शिवाय दुसरा तरणोपाय नाही.

पद===128

समर्थ पाय सेवितां बहु सुखावलों ।।धृ0।।

तत्वमसिवाक्यशोध । करितां मीपणा रोध। सघन आत्मरूप पावलों ।।1।।

जन्ममरण हर्षशौक। टाकुनियां सुखदु:ख । बोधबळें बहु उकावलों ।।2।।

जनीं वनीं रामराव। समूळ दासपणा वाव। करूनियां ऐक्य पावलों ।।3।।

भावार्थ ===

समर्थ श्रीरामाचे चरणसेवेत अपार सुख मिळाले. आत्मरूपाचा साक्षात्कार झाला. तोच मी आहे ( सो हम) या बोध वाक्याचा शोध घेताना मीपणाचा लोप होवून परमेश्वरी तत्वाशी एकरूप झालो. सुख दु:ख, हर्ष शोक,जन्म मरण या कल्पनांपासून मुक्त झालो,अत्यंत उत्साहित झालो. जनीवनीं केवळ रामरुप दिसू लागले.श्रीराम आणि रामदास यातिल अलगता लोप पावून ऐक्य पावलो.

पद===129

नवमि करा नवमि करा। नवमि करा भक्ति नवमी करा ।।धृ0।।

अष्टमीपरी नवमी बरी। तये दुसरी न पवे सरी ।।1।।

राम प्रगटे भेद हा तुटे अभेद उमटे तेचि नवमी ।।2।।

शीघ्र नवमी येतसे उर्मी रामदास मी अर्पिली रामीं ।।3।।

भावार्थ ===

या पदांत संत रामदास रामनवमी साजरी करा असे सांगत आहेत. कृष्णाष्टमी पेक्षां नवमी अधिक चांगली असून तिची सर दुसऱ्या कोणत्याही पवित्र तिथीला येणार नाही.नवमीला श्री राम या भूतलावर अवतीर्ण झाले. प्रत्यक्ष परमेश्वर मानव रूपाने प्रगट झाल्यानें भक्त आणि भगवान हा भेदच नाहीसा झाला. अभेदपणे राम आणि रामदास एकरूप झाले.

पद===130

आनंदरूप राहों। मुदितवदन पाहों ।। धृ0।।

सम विषम दु:ख संसारिक । चेंही सकळिक साहों।। 1।।

दास हरिजन आत्मनिवेदन। अभेद भजन लाहों ।।2।।

भावार्थ ===

सर्व भक्तांनी आनंदाने प्रसन्नवदन श्रीरामाचे दर्शन घ्यावे. संसारातील बरे वाईट अनुभव संसारिक दु:ख सोसून रामदास व हरिजन यांनी भेदाभेद विसरून भगवंताला शरणागत होऊन भजन करावें. असे संत रामदास या पदांत सुचवतात.

पद ===131 जेणे ध्यावें तें ध्यानाचा जालें। मीपण तूंपण निवडोनो गेले ।।धृ0।।

भवभयें आकळलेंसे कळलें। अंतर तें निवळले वळलें ।।1।।

विघ्न अनावर अवचट टळलें । दास म्हणे हें सुकृत फळलें ।।2।।

भावार्थ ===

या पदांत संत रामदास एका पारमार्थिक अनुभवाचे वर्णन करतात. ध्यानाला बसलेला साधक, ध्यानाची क्रिया आणि ज्याचे ध्यान लावले तो परमेश्वर एकरूप ह्मेऊन साधक, साधना व साध्य ही त्रिपुटी लयास जाऊन भक्त व भगवान याच्या मधील मी तूं पणा नाहिसा होतो.भवभयाची बाधा लोप पावून अंतर शुध्द होते. अनावर असे भयंकर विघ्न टळतें. साधकाचे पूर्व पुण्य फळाला येते.

पद ===132

हरी अनंत लीळा ।अभिनव कोण कळा ।।धृ0।।

खेचर भूचर सकळ चराचर। हेत बरा निवळा।। 1।।

दास म्हणे तो अंतरवासी। सकळ कळा विकळा।। 2।।

भावार्थ ===

संत रामदास म्हणतात, हरि अनंत रुपानें सर्व चराचराला अंतर्बाह्य व्यापून राहिला आहे.आकाशांत पृथ्वीवर वास करणार्या सर्व सजीव सृष्टीत विविध रुपें घेऊन तो अभिनव लीळा करतो.

पद===133

सकळ कळलें कळलें। भाग्य सकळ फळलें।। धृ0।।

नेमक बोलणें नेमक चालणें। नेमक प्रत्यय आला।। 1।।

समजलें तें बोलतां न ये। बोलतां अनंत ये ना।। 2।।

दास म्हणे मौन्ये अंतर जाणा। नि:शब्द अंतरखुणा।। 3।।

भावार्थ ===

यथार्थ गोष्टीचा अनुभव आल्यानंतर तो नेमक्या शब्दांत व्यक्त करणे आणि त्यां प्रमाणे आचरण करणे ही गोष्ट समजून घेतली पाहिजे.त्यामुळे भाग्य उदयास येते. अंत:करणाला जे समजतें ते सर्वच बोलून दाखवतां येत नाही अशा वेळीं मौन बाळगणें चांगले. संत रामदास म्हणतात, नि:शब्द भावना मूकपणे अंतरखुणेने जाणून घेण्याची कला शिकणें म्हणजेच सकळ भाग्य फळाला येणे.

पद ===134

अरे कर सारविचार कसा ।।धृ0।।

क्षीर नीर एक हंस निवडिती।काय कळे वायसां।। 1।।

माया ब्रह्म एक संत जाणती। सारांश घेती तसा।। 2।।

दास म्हणे वंद्य निंद्य वेगळें। कर्मानुसार ठसा ।।3।।

भावार्थ===

संत रामदास या पदांत सारासार विचार करावा असे सांगतात.दूध आणि पाणी वेगळ करण्याचे कौशल्य (नीर क्षीर विवेक) फक्त राजहंस जाणतो. कावळ्या सारख्या सामान्य पक्षी तें करु शकत नाही. तसेच माया आणि ब्रह्म ही तत्वें फक्त संत जनच जाणतात. वंदनीय व निंदनीय हे जाणण्याची कला प्रत्येकाला कर्मानुसार अवगत करता येते.

पद ===135

सुटत नाहीं सुटत नाहीं सुटत नाहीं माया ।।धृ0।।

पाहों जातां सत्य असेना मानस घेतें धाया। दिसतसे परी सत्य न राहे पंचभूतिक काया ।।1।।

होइल तें मग जाइल शेवट खटपट व्यर्थचि वायां । रामदास म्हणे सत्य निरंजन विरहित मायिक माया।। 2।।

भावार्थ ===

ब्रह्म सत्य ( चिरकाल टिकणारे) असून माया असत्य (क्षणभंगुर) आहे. वरवर पाहतां ती खरी भासते मन मायाजालात गुंतून पडते. मानवी देह पंचभूतांचा बनलेला आहे, जे आज अस्तित्वात आहे ते अविनाशी नाही,त्याचा शेवट ठरलेला आहे. संत रामदास म्हणतात सत्य निरंजन असून ते चिरंतन आहे.

पद===136

अरे मन पावन देव धरीं। अनहित न करीं।। धृ0।।

नित्यानित्य विवेक करावा। बहुजन उध्दरीं।। 1।।

आत्मा कोण अनात्मा कैसा। पर पार उतरीं।। 2।।

दास म्हणे तुझा तूंचि सखा रे ।हित तुझें तूं करी।। 3।।

भावार्थ===

संत रामदास या पदांत मनाला उपदेश करतात. मनाने आपले अनहित न करता पतितपावन परमात्म्याची भक्ती करावी, नित्य काय व नश्वर याचा विचार करावा. बहुजनांना सनमार्गाला लावावे. आत्मा कोण आणि अनात्मा कसा असतो हे विवेकाने ओळखून स्वता:चे हित करावे कारण आपणच आपला मित्र किंवा शत्रु असतो.

पद===137

कोण मी मज कळतचि नाहीं। सारासार विचारुनि पाहीं ।।धृ0।।

नर म्हणों तरि नारि चि भासे। नारि म्हणों तरि समूळ विनासे ।।1।।

स्थूळ म्हणों तरि सूक्ष्मचि भासे। सूक्ष्म म्हणों तरि कांहीं न दिसे ।।2।।

दास म्हणों तरि रामचि आहे। राम म्हणों तरि नाम नसाहे ।।3।।

भावार्थ ===

साधकानें प्रथम आपल्या आत्मतत्वाची ओळख करून घ्यावी असे संत रामदास या पदांत सुचवतात सार (अविनाशी) व असार(नश्वर) याचा विवेक करावा.नर आणि नारी, स्थूळ आणि सूक्ष्म, भक्त आणि भगवान हे भेद आत्मतत्वाला लागू होत नाहीत.तेथें सर्व भेदाभेद लयास जातात.

पद===138

प्रगट निरंजन प्रगट निरंजन प्रगट निरंजन आहे। आगम निगम संतसमागम सद्गुरूवचनें पाहें।। धृ0।।

आत्मविचारें शास्त्रविचारें गुरुविचारें बोध। मीपण तूंपण शोधून पाहतां आपण आपणा शोध।। 1।।

जडासी चंचल चालविताहे चंचळ स्थिर न राहे।।2।।

प्रचित आहे शोधूनि पाहें निश्चळ होऊन राहें भजनीं भजन आत्मनिवेदन श्रवण मनन साधा। दास म्हणे निजगुज साधतां नसे भवबाधा।। 3।।

भावार्थ ===

निरंजन (अत्यंत निर्मळ) असे आत्मतत्त्व सर्व सृष्टीत सदोदित स्पष्टपणे दिसून येणारें(प्रगट) अवस्थेत आहे. सर्व वेद, शास्त्र, संतसाहित्य सद्गुरूंची वचने याची साक्ष देतात. आपण जेव्हां आपला शोध घेऊ लागतो तेंव्हा एकच आत्मतत्व सगळीकडे भरून राहिलें मी तूपणा हा भेद दिसत नाही. जड देहाला चंचल आत्मा चैतन्य देतो, याचा अविचल राहून शोध घेतल्यास त्याचा अनुभव घेतां येतो. श्रवण, मनन, भजन, आणि आत्मनिवेदन (संपूर्ण शरणागती) हे भक्तीमार्ग आहेत, त्यांचा अवलंब केल्यास आत्मतत्वाचें रहस्य समजून येतें व भवबंधने तुटून जातात.

पद===139

हरी अनुमानेना ।देह देव घडेना ।।धृ0।।

नाना निश्चये संशयकारी ।हित घडेल घडेना।। 1।।

बहुतेक हे जन बहुचक जालें। प्रत्यय येकचि येना।। 2।।

दास म्हणे हे गचगच जाली। काशास कांहीं मिळेना।। 3।।

भावार्थ===

हरीच्या स्वरुपाचे कांही अनुमान (अंदाज) काढता येईना त्यामुळें देहाला देवपण मिळेना. नाना प्रकारचे विचार, शंका, कुशंका यामुळें पारमार्थिक हित घडेना.अनेकांची विविध मते व वाचाळता या मुळें कोणताही प्रत्ययकारी अनुभव येईना. संत रामदास म्हणतात, अस्थिर वातावरणात सर्वत्र गचगच (निष्फळ चर्चा) झाल्याने कशाचा कशालाही मेळ राहिला नाही.

पद===140

बहुरंगा रे भवभंगा। पावन देव अभंगा। ।।धृ0।।

जनपाळा गोपाळा। सुंदर नाटक लीळा ।।1।।

धन्य लीळा रे घननीळा ।भूषणमंडित कीळा।। 2।।

सर्व जाणे रे खूण बाणे। आम्ही दास पुराणे। ।।3।।

भावार्थ ===

जनांचे पालन करणारा गोपाळ कृष्ण पतितपावन देव असून तो संसाराच्या सर्व बंधना पासून मुक्ति देणारा, बहुरंगी, सुंदर लिळा करणारा नाटककार आहे. या घननिळाच्या सर्वच लीळा भूषणावह आहेत.या लिळांच्या सर्व खुणा संत रामदासां सारखे अनुभवी भक्त जाणतात.


पद ===141

सकळ घटीं जगदीश एकला। स्मरणरूप स्मरणेचि देखिला ।।धृ0।।

शिव कळेना शक्ति कळेना। भक्ति कळेना विभक्ति कळेना ।।2।।

चालवितो तो दिसत नाहीं। तीक्ष्ण बुध्दी विचारुनी पाहीं ।।3।।

दास म्हणे तो चंचळ आहे। तेणें करुनी निरंजन पाहें ।।4।।

भावार्थ ===

सर्वांच्या अंत:करणरुपी घटामध्यें तो एकटाच जनदीश व्यापून राहिला आहे, तो स्मरणरुप असून केवळ स्मरणानेच त्याचा साक्षात्कार घडतो. शिव शक्तिचे स्वरुप जाणण्यासाठी करायची भक्ती व विभक्ति कशी करावी हें समजत नाही, सर्व प्राणिमात्रांचा चालक असून तो दिसत नाही.संत रामदास म्हणतात, तीक्ष्ण बुध्दीनें विचार केल्यास असे समजते कीं, ते शिवरुप अत्यंत चंचळ असल्याने निरंजन(निर्मळ)स्वरुपाचे आहे.

पद===142

चंचळीं निश्चळ परी तें चळत नाहीं। चंचळ ते येतें जातें अंतर शोधूनि पाहीं ।।धृ0।।

दूध आणि ताक एक करतां नये। उमजल्यावांचुनि लोकां समजे काय ।।1।।

चंचळी राहसी तरि तूं चंचळ होसी । निश्चळाच्या योगें समाधान पावसी ।।2।।

दास म्हणे आम्ही भक्त विभक्त नव्हों । शरीरसंबंधें विषम विवेकें साहों ।।3।।

भावार्थ ====

देह हा पंचभौतिक असून तो अशाश्वत आहे, आत्मतत्व निश्चळ असून अशाश्वत देहांत राहूनही ते चळत नाहीं. अविनाशी आत्मा आणि विनाशी देह यां मधील फरक समजून घेतला पाहिजे, दूध आणि ताक भिन्न धर्मी असून ते एकत्र करतां येत नाही. देहात राहून साधक जर आपण देहच आहोत असे मानू लागला तर तो भवबंधनात अडकून पडेल, निश्चळ बनला तर भवबंधनातून मुक्त होऊन समाधान पावेल.संत रामदास म्हणतात, ते भक्त असून भगवंता पासून कधीच विभक्त (वेगळे) नसतात.

पद===143

जिणें हें दो दिसांचें। पाहतां शाश्वत कैंचे ।।धृ0।।

शरीर संपति कांहीं न राहे ।सावध होउनि पाहें।। 1।।

कितेक होते कितेक जाते। येथें कोण रहातें ।।2।।

दास म्हणे सत्कीर्ति करावी। सृष्टि सुखेचि भरावी ।। 3।।

भावार्थ ====

माणसाचे आयुष्य दोन दिवसांचे नश्वर आहे, त्याला शाश्वत म्हणतां येत नाही.शरीर आणि संपत्ती काहीच कायम टिकणारे नाही.किती लोक जन्माला येतात आणि काळाच्या मुखांत नाहिसे होतात. या साठीं चांगली कामे करून ही सृष्टी सुखाने भरावीं असे संत रामदास सुचवतात.

पद===144

देवासि जाऊनि वेडे आठवी संसारकोडें। रडतें बापुडें दैन्यवाणें रे ।।धृ0।।

मागील आठवण करितां होतसे सीण। दु:ख ते कठिण समागमें रे। ।।1।।

त्यागूनि निरूपण हरिकथाश्रवण। लागलें भांडण एकमेकां रें। ।।2।।

रामीरामदास म्हणे कपाळ जयाचें उणें। देवासि जाऊन दु:ख दुणें रे ।।3।।

भावार्थ===

कांहीजण देवदर्शनाला मंदिरात जातात मनोभावे देवाची प्रार्थना करण्याऐवजी संसारातील समस्या आठवतात,दीनवाणे होऊन रडतात. मागील आठवणी मनाला यातना देतात. हरिकथाश्रवण करून निरूपण ऐकण्याचे सोडून एकमेकांशी भांडण करतात. संत रामदास म्हणतात, जे कमनशिबी असतात त्यांचे दु:ख देवाकडे जाऊन दुणावतें.

पद===145

भक्ति नको भक्ति नको विषयांची ।।धृ0।।

विषयें वाटतसें सुख। परि तें दु:खमूळ ।।1।।

विषय सेवितां गोड ।शेवटीं जड परिणामीं ।।2।।

रामदास म्हणे मनीं। विषयें जनीं अधोगती ।।3।।

भावार्थ ===

या पदांत संत रामदास सांगतात कीं, इंद्रिय विषयांची आसक्ती धरु नये, त्यामुळे आपली अधोगती होते. विषय भोगतांना सुख वाटतें परंतू ते दु:खाचे मूळ आहे. विषयांचे सेवन केल्याने गोड वाटते परंतू परिणामी ते सहन करण्यास कठिण असते.

पद ===146

घटिका गेली पळें गेली तास वाजे झणाणा। आयुष्याचा नाश होतो राम कां रें म्हणाना।। धृ0।।

एकप्रहर दोन प्रहर तीन प्रहर गेले। चौथा प्रहर संसारांत चावटीनें नेले ।।1।।

रात्र कांहीं झोप कांहीं स्रीसंगें गेली। ऐसी आठाप्रहरांची वासलात जाली ।।2।।

दास म्हणे तास बरा स्मरण सकळां देतो। क्षणोक्षणीं राम म्हणा म्हणुनि झणकारितो।। 3।।

भावार्थ ===

संत रामदास म्हणतात, घटिका मागून घटिका, तासा मागून तास व दिवसा मागून दिवस सरतात शेवटीं आयुष्य संपून जातें आणि रामस्मरण करायचे राहून जाते. दिवसाचे चार प्रहर संपून रात्र होते. रात्रीचा कांहीं काळ स्रीसंगात संपतो व बाकी झोपेंत निघून जातो, अशा प्रकारे आठ प्रहरांची वासलात लागते. दिवसाचा प्रत्येक तास ठोके देऊन सर्वांना रामानामाचे स्मरण करुन देतो.

पद===147

ज्या ज्या वेळीं जें जें होईल तें तें भोगावें। विवेकाला विसरुनि आपण कष्टी कां व्हावें।। धृ0।।

एकदां एक वेळ प्राण्यां बहु सुखाची गेली। एकदां एक वेळ जीवां बहु पीडा जाली ।।1।।

एकदां मागूं जातां मिळतीं षड्रस पक्वानें। एकदां मागूं जातां न मिळे भाजीचें पान। ।।2।।

संपत्ति विपत्ति दोन्ही पूर्वदत्ताचें फळ। ऐसें प्राणी जाणेना तो मूर्खचि केवळ ।।3।।

सुखद:ख सर्वहि आपुल्या प्रारब्धाधीन। उगेंचि रुसावें भलत्यावरिं तें मूर्खपण। ।।4।।

मातापिता वनिता यांनी उगेंचि पाहावें। बरें वाईट कर्म ज्याचें त्यानेंच भोगावें ।।5।।

देहें सुखदु:खमूळ ऐसें बरवें जाणोन । सुखदु:खविरहित रामदास आपण ।।6।।

भावार्थ ====

आयुष्यातील काहीं काळ सुखाचा तर कांहीं दु:खाचा जातो, एक वेळ देहाला पीडा आणि मनाला यातना होतात. एकदां षड्रस(सहा रस असलेलें सुग्रास) भोजन अनायासें प्राप्त होते तर कधीं भाजीचें एक पानदेखील मागूनहीं मिळत नाही. संपत्ति ,विपत्ति (दारिद्रय)हें पूर्वकर्माचे फळ असून सुखदु:ख पूर्व सुकृतानें प्राप्त होते. ज्या वेळीं जे होईल ते भोगावें लागतें अशा वेओळीं विवेक विसरून कष्टी होऊ नये. चांगले वाईट कर्म ज्याचे त्यालाच भोगावें लागते. इतरांवर रुसणे हा केवळ मूर्खपणा आहे, आई, वडील, पत्नी यां पैकीं कुणीही आपल्या दु:खाचे सोबती नसतात.आपला देह हेच सुखदु:खाचे मूळ आहे हे जाणून आपण विवेकानें विरक्त होऊ शकतो असे संत रामदास म्हणतात.

पद ===149

अरे नर सारविचार करीं। मन बरें विवरीं ।। धृ0।।

सारासारविचार न होतां। वाहासी भवपुरीं ।।1।।

सकळ चराचर कोठुनि जालें। कोठें निमालें तरी।। 2।।

दास म्हणे जरि समजसि अंतरीं मुळीची सोय धरीं।। 3।।

भावार्थ ===

माणसानें चांगल्या वाईटाचा सारासार विचार न केल्यास संसारसागरांत प्रवाहपतिता प्रमाणे वाहून जातो. सकळ चराचर ज्या आत्मतत्वातून उत्पन्न होतें व लयास जाते हे समजून घेतले तर आत्मबोध होईल असे संत रामदास म्हणतात.

पद===150

जाणत्याचा संग धरा। हित आपुले करा। न्यायनीति प्रचितीनें। निरूपणें विवरा ।।धृ0।।

आत्महित करीना जो। तरी तो आत्मघातकी। पुण्यमार्ग आचरेना। तरी तो पूर्णपातकी ।।1।।

आपली वर्तणुक। मन आपुलें जाणे। पेरिलें उगवतें। लोक जाणती शाहाणे ।।2।।

सुखदु:ख सर्व चिंता। आपुली आपण करावी । दास म्हणे करूनिया। वाट सुखाची धरावी ।।3।।

भावार्थ ===

संत रामदास या पदांत साधकांनी कसे वागावें या साठी कांही सूचना देत आहेत. स्वहित साधण्यासाठीं जाणत्या लोकांच्या संगतीत राहावें,न्यायनीतीनें वागावे, रामकथांचे निरूपण करावें, प्रत्यक्ष अनुभव घ्यावा व आत्महित साधावें नाहीतर तो आत्मघातकी ठरतो.पुण्यमार्गाचे आचरण न केल्यास पूर्णघातकी समजावा. आपले विचार व वर्तन समजून घ्यावे. आपल्या सुखदु:खाची आपणच चिंता करावी, सुखकारक मार्गाने वाटचाल करावी. आपण जे पेरतो तेच उगवतें हे समजून घ्यावे.

पद===151

सज्जन संत मुनीजन योगी। मानिसी तरि जाणीव सांडीं ।।1।।

षड्रिपुकुळभव भ्यासुर थापा। हाणसी तरि जाणीव सांडी ।।2।।

दास म्हणे गुण निर्गुण ते खूण। बाणसी तरि जाणीव सांडीं ।।3।।

भावार्थ ====

संत सज्जन, मुनीजन व योगी यांना मानतो पण त्यांची जाणीव होत नाही.काम,क्रोध,मद,मत्सर,मोह,दंभ या भयंकर शत्रूंनी व्यापलेल्या भवसागराची भिती वाटत असूनही त्याची जाणीव ठेवत नाही. संत रामदास म्हणतात, सगुण भक्तीने निर्गणाकडे कसे जावे याच्या खुणा माहिती असूनही त्याची जाणीव राहात नाही.

पद===152

चाल रे मना भेटों जाऊं। सज्जना । तेथें आहे आमुचा रामराणा ।।धृ0।।

ऊठ लवकरीं चाल जाऊं झडकरी । जाऊन रामपायीं सुख घेऊं धणीवरी ।।1।।

भाव दाविला तोहि असे गोंविला । सोडीं काम जावो राम पाही आपुला ।।2।।

मन चालिलें तेणें मूळ शोधिलें । संत रामदास त्याला सकळ भेटले ।।3।।

भावार्थ ===

संत रामदास या पदांत आपल्या मनाला संत सज्जनांच्या भेटींस जाऊं असे सुचवित आहे, कारण रामराणा नेहमी सज्जनांच्या सहवासांत रमतो. तेथें जाऊन पोटभर राम दर्शनाचे सुख घेतां येईल ,जो भक्तिभावाने रामचरणीं लीन होतो तो तेथेच अडकून पडतो. सर्व कामना सोडून निष्काम मनाने रामाला शरण गेले कीं, आत्मबोध होतो व सकळ साध्य होतें असे संत रामदास म्हणतात.

पद===153

जो जो जो जो रे श्रीराम। निजसुख गुणविश्रामा। बाळा ।।धृ0।।

ध्याती मुनि योगी तुजलागीं । कौसल्या ओसंगीं ।।1।।

वेदशास्त्रांची मती जाण । स्वरूपी जाली लीन। ।।2।।

चारी मुक्तींचा विचार ।चरणीं पहाती थोर। ।।3।।

भोळा शंकर निशिदिनीं ।तुजला जपतो ध्यानीं ।।4।।

दास गातसे पाळणा ।रामा लक्षूमणा ।।5।।

भावार्थ ====

राम लक्ष्मणा साठी संत रामदास पाळणा गात आहेत. श्रीराम हे निजसुखाचे आगर असून सर्व गुणांचे आश्रयस्थान आहेत. कौसल्या मातेच्या मांडीवर निद्रासुख घेणाऱ्या रामरुपाचें मुनिजन व योगीजन ध्यान करतात. वेदशास्त्राची मती (बुध्दी) रामस्वरुपी लीन झाली असून चारी मुक्ती राम चरणाशीं खिळून राहिल्या आहेत. शिवशंकर रात्रंदिवस ध्यान लावून रामनामाचा जप करतात.

पद ===154

न्हाणी न्हाणी रामाते अरुंधती। ऋषीपल्या पाहूनि संतोषती । रामलीला सर्वत्र मुनी गाती । स्नाना उदक यमुना सरस्वती। ।।1।।

ज्याच्या चरणी कावेरी कृष्णा वेणी। ज्याच्या स्नेहें कपिलादि ऋषीमुनी। त्या रामातें न्हाणिलें । प्रीती करुनी। ।।2।।

ज्याच्या नामें उपदेश विश्वजनां ज्याच्या स्मरणें काळादि करिती करुणा ज्याच्या प्राप्तीस्तव करिती अनुष्ठाना। त्या रामातें न्हाणुनी फुंकी कर्णा ।।3।।

रमती योगी स्वरूपीं आत्माराम । निशिदिनीं चरणीं असावा नित्यनेम । त्या रामाचा पालख विश्वधाम । दास म्हणे भक्तीचें देई प्रेम ।।4।।

भावार्थ ===

अरुंधती बालक रामाला न्हाउं घालीत आहे त्याचे कल्पनारम्य वर्णन संत रामदास या पदांत करतात. ऋषिमुनी या रामलीला पाहून अत्यंत आनंदित होतात व गीत गातात.स्नानासाठीं यमुना सरस्वती यांचे पवित्र जल तसेच कावेरी, कृष्णा, वेण्णा यांचे जल आणले आहे कपिलमुनीं सारखे तपस्वी ज्या रामचंद्रावर अत्यंत स्नेह करतात अशा रामाला अरुंधती अत्यंत प्रमाने न्हाणित आहे. ज्याच्या नामानें सर्व विश्वजनांना उपदेश केला जातो, ज्याच्या केवळ स्मरणाने प्रत्यक्ष काळ सुध्दा करुणा करतो, ज्याच्या कृपेसाठीं अनेक अनुष्ठाने केली जातात ,ज्या आत्माराम स्वरुपांत योगीजन रममाण होतात, अनेक भक्तजन ज्या रामचरणांचा रात्रंदिवस आश्रय घेतात, संपूर्ण विश्व ज्या श्रीरामाचा पाळणा आहे त्या बालक रामाला न्हाऊ घालून कान फुंकण्याचे भाग्य अरुंधतीला लाभलें आहे. हे भक्तीप्रेम आपल्याला लाभावें अशी प्रार्थना संत रामदास करीत आहेत.

पद ===155

भूपाळी श्रीरामाची

राम सर्वांगें सावळा । हेमअलंकारें पिवळा । नाना रत्नांचिया किळा । अलंकारीं फांकती ।।धृ0।।

पिंवळा मुगुट किरीटी ।पिंवळें केशर लल्लाटीं । पिवळ्या कुंडलांच्या दाटी ।पिंवळ्या। कंठी मालिका।। 1।।

पिंवळा कांसे पीतांबर । पिंवळ्या घंटांचा गजर । पिंवळ्या ब्रीदाचा तोडर । पिंवळ्या वाकी वाजती ।।2।।

पिंवळा मंडप विस्तीर्ण ।पिंवळें मध्यें सिंहासन । राम सीता लक्षुमण । दास गुण गातसे ।।3।।

भावार्थ===

श्रीराम सावळ्या अंगकांतीचा असून पिवळ्य रंगाचे सुवर्ण अलंकार परिधान केलें आहेत. त्यां अलंकारांत जडवलेल्या रत्नांचे तेज झळाळत आहे. मस्तकावर सोनेरी मुकुट व कपाळावर केशराचा पिवळा टिळा शोभून दिसत आहे. कानांत सुवर्णाची कुंडले व कंठात सुवर्णाची माळ घातली आहे ब्रीदाचा पिवळा तोडर,हतांत पिवळी वाकी रुणझुणत आहे. पिवळा पीतांबर परिधान करून पिवळ्या रंगाच्या भव्य मंडपात अग्रभागी ठेवलेल्या पिवळ्या सिंहासनावर विराजमान असलेल्या राम सीता लक्ष्मणाचे संत रामदास गुणगान करीत आहे.

पद ===156

उठिं उठिं बा रघुनाथा ।विनवी कौसल्या माता । प्रभात जालीसे समस्तां । दाखवीं आतां श्रीमुख ।।धृ0।।

कनकताटीं आरती या ।घेउनि क्षमा शांति दया। आली जनकाची तनया । ओवाळाया तुजलागीं ।।1।।

जीव शिव दोघेजण । भरत आणि तो शत्रुघ्न । भाऊ आला लक्ष्मण। मन उन्मन होउनियां ।।2।।

विवेक वसिष्ठ सद्गुरू ।संत महंत मुनीश्वरू । करिती हरिनामें गजरु ।हर्षे निर्भर होऊनियां ।।3।।

सुमंत सात्विक प्रधान ।घेउनि नगरवासी जन । आला वायूचा नंदन । श्रीचरण पहावया ।।4।।

माझ्या जिवींचा जिव्हाळा ।दीनबंधु दीनदयाळा। भक्तजनांच्या वत्सला । देई दयाळा दर्शन ।।5।।

तंव तो राजीवलोचन ।राम जगत्रयजीवन । स्वानंदरुप होऊन । दासां दर्शन दिधलें ।।6।।

भावार्थ ===

कौसल्या माता भूपाळी गाऊन श्रीरामाला उठवित आहे. प्रभात झाली असून सर्वांना श्रीमुखाचे दर्शन द्यावें असे सुचवित आहे. सुवर्ण तबकांत क्षमा, शांती, दया