चिवडा

विकिबुक्स कडून
चिवडा
वेळ मिनिटे

चिवडा हा विशेषकरून दीपावलीमध्ये केला जाणारा एक मराठी खाद्यपदार्थ आहे. हा पदार्थ बऱ्याचदा खाऱ्या, तिखटसर तसेच गोड चवीचा बनवतात. चिवडा या पदार्थाशिवाय दीपावली हा सण अपूर्ण असल्यासारखा वाटतो.

पातळ पोह्यांचा चिवडा

साहित्य[संपादन]

  1. पातळ पोहे
  2. डाळ्या
  3. शेंगदाणे
  4. धने कूट
  5. जीरे कूट
  6. तिखट
  7. हळद
  8. मोहरी
  9. खसखस
  10. मीठ
  11. आमचूर
  12. साखर
  13. आले
  14. हिरव्या मिरच्या
  15. लसूण
  16. कांदे
  17. गोडलिंबाची पाने
  18. तेल (गोडेतेल)

पूर्वतयारी[संपादन]

प्रथम पोहे कडक उन्हात ४-५ तास वाळवून घ्यावेत व कढईमध्ये चांगले भाजून घ्यावेत, म्हणजे त्यांतील ओलसरपणा निघून जाईल व चिवडा चामट होणार नाही. आले, हिरव्या मिरच्या, लसूण, कांदे यांचे वेगवेगळे वाटण करून घ्यावे.(मिक्सरमध्ये पेस्ट करावी)

कृती[संपादन]

कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी टाकावी. मोहरी तडतडल्यानंतर आले, लसूण, गोडलिंबाची पाने, खसखस, डाळ्या, शेंगदाणे हे तेलात वेगवेगळे तळून घ्या व काढून घ्या. तेलात कांदा वाटण / कांद्यांचे काप टाका. मंद आचेवर त्यातील ओलसरपणा निघेपर्यंत चांगले गुलाबी होऊ द्या. आता त्यात हिरव्या मिरच्यांचे वाटण टाका. त्याचा रंग किंचित बदलल्यावर त्यात हळद, तिखट टाका. लगेच नंतर धने कूट, जिरे कूट टाका. आधी तळून ठेवलेले आले, लसूण, गोडलिंबाची पाने, खसखस, डाळ्या, शेंगदाणे हेदेखील त्यात टाका. आता पोहे व मीठ टाका. चवीसाठी थोडा आमचूर व साखर घालून झाऱ्याने नीट एकत्र करा.

सजावट[संपादन]

चिवड्याला विशेष अशी सजावट नाही. खायला देताना त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर व कांदा घालून देतात. त्यामुळे तो आकर्षक दिसतो.

इतर माहिती[संपादन]

महाराष्ट्रात चिवडयाचा न्याहारी म्हणूनही अनेकदा वापर होतो.


बाह्य दुवे[संपादन]