चिक्की
चिक्की | |
---|---|
वेळ | मिनिटे |
चिक्की हा एक् महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ आहे. गुळाचा पाक व भाजलेले शेंगदाणे वापरुन केलेला हा पदार्थ आहे. चिक्कीत टाकण्यापूर्वी शेंगदाण्याची साले काढली जातात. कोणी साखरेचा पाक व शेंगदाणे वापरुनही चिक्की करतात. लोणावळ्याची चिक्की प्रसिद्ध आहे. येथे खोबरे,डाळ्या,अश्या विविध प्रकारच्या चिक्क्या मिळतात.[१]
शेंगदाणे चिक्की व्यतिरिक्त चिक्कीच्या विविध प्रकार आहेत. ज्यामध्ये भाजलेला हरभरा, तीळ, तांदूळ, खोबर आणि बदाम, काजू, पिस्ता आणि काजूंचा समावेश आहे. गूळ हा गोड पदार्थ असला तरी, विशिष्ट प्रकारच्या चिक्कीमध्ये साखर हा बेस म्हणून वापरली जाते. काहीजण चिक्कीमध्ये ग्लूकोज देखील घालतात. उत्तर भारतातील प्रदेशांमध्ये, विशेषतः बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये चिक्कीला लईया पट्टी असे म्हणतात. भारतातील सिंध आणि सिंधी प्रदेशांमध्ये त्याला लेई किंवा लाई असे म्हणतात आणि उत्तर भारतातील इतर राज्यांमध्ये त्याला गजाक किंवा मारोंडा असेही म्हणतात. बांगलादेशात त्याला गुर बदाम म्हणतात. दक्षिण भारतातील तेलंगणा आणि आंध्र प्रदेश मध्ये त्याला पल्ली पट्टी म्हणतात. ब्राझीलमध्येही असेच पदार्थ लोकप्रिय आहेत, जिथे त्याला पे-दे-मोलेक आणि पेराग्वे मध्ये या पदार्थाला काओ लॅड्रिलो म्हणतात.
चिक्की हा पदार्थ एकत्रित मिश्रणाने बनवला जातो. काजू, बदाम, पिस्ता आणि तीळ यापासून खास चिक्की तयार केल्या जातात. त्याला तमिळ मध्ये एलू असे म्हणतात. गूळ हा नेहमीचा गोड पदार्थ असला तरी काही विशिष्ट प्रकारच्या चिक्कीमध्ये साखरेचा बेस म्हणून गुळाचा वापर केला जातो. ग्रामीण आणि शहरी दक्षिण आशिया (भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका) या देशांमध्ये चिक्की ही एक अतिशय लोकप्रिय गोड वस्तू आहे. काही जण चिककीमध्ये ग्लुकोज देखील घालतात, चिक्की ची सुरुवात शेंगदाणा आणि गूळ हे पदार्थ वापरुन तयार करण्यापासून झाली. आणि आज बाजारात स्ट्रॉबेरी, क्रॅनबेरी सारखे विविध विदेशी चिक्की चे प्रकार उपलब्ध आहेत. दक्षिण भारतीय राज्यात, चिक्की बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुळाचे मिश्रण घातले जाते. लोणावळा येथील चिक्की खूप प्रसिद्ध आहे.
इतिहास
[संपादन]चिक्कीचा प्रसार लोणावळ्यातून झाला, मात्र तिचं मूळ वेगळ्या स्वरूपात पूर्वीपासून अस्तित्वात होतंच. घरी आलेल्या पाहुण्याला गूळपाणी द्यायची पद्धत होती. प्रवासामुळे आलेला थकवा दूर करण्याची कामगिरी तो गुळाचा खडा करायचा. या गुळासोबतच काही वेळा शेंगदाणेही दिले जायचे. हे सारे पदार्थ कच्च्या रूपात होते. पण याच गूळ, शेंगदाणा व तुपाचा वापर करून गुडदाणा किंवा गुडदाणी तयार केली जायची. हा गुडदाणा म्हणजेच आजची चिक्की. गुडदाणा हे ढोबळ रूप होतं तर चिक्की नेटकं. सहज म्हणून चघळल्या जाणाऱ्या गुडदाण्याला चिक्की नावाने मिळालेल्या प्रसिद्धीची कथा सुरस आहे.
१८८८ साली मुंबई-लोणावळा रेल्वेमार्गाचं काम जोरात सुरू होतं. याच ठिकाणी मगनलाल अगरवाल यांचं छोटंसं मिठाईचं दुकान होतं. त्या दुकानात गुडदाणा विकला जायचा. हा पदार्थ रेल्वेमार्गासाठी काम करणाऱ्या कामगारांचा आवडता होता. एकतर गूळ व दाणे यामुळे खूप सारी ऊर्जा मिळत असे आणि हा पदार्थ चवीलाही छान होता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो खिशाला परवडत असे. या पदार्थाची लोकप्रियता लक्षात घेऊन मगनलाल यांनी या गुडदाण्याला मगनलाल चिक्की या नावासह लोकांपुढे आणलं. ही चिक्की जगप्रसिद्ध झाली. आज पुणे-मुंबई वा तत्सम प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या वाटेवर लोणावळा हा अलिखित थांबा या चिक्कीमुळेही निर्माण झाला आहे. याचा अर्थ चिक्कीचं मूळ फक्त महाराष्ट्रापुरतं नाही. भारतभरात विविध नावांनी चिक्की खाल्ली जाते. उत्तरप्रदेश व बिहारमध्ये ती ‘लाइय्या पट्टी’ आहे, तर सिंधी लोकांची ‘लायी’. विशेष म्हणजे फक्त भारतातच नाही तर ब्राझीलमध्येही चिक्कीसारखाच पे-दे-मोलेक आणि पेराग्वे मध्ये या पदार्थाला काओ लॅड्रिलो म्हणतात.
चिक्कीची खासियत ही की, ती काळासोबत बदलत जाणारी आहे. शेंगदाण्यासोबत तिची सुरुवात असली तरी तीळ, राजगिरा, काजू, बदाम, डाळं, कुरमुरे, सुकामेवा, चॉकलेट या पदार्था पासून चिक्की तयार केली जाते. नव्या पिढीच्या आवडीची चिक्की आहे. उपवासच्या चिक्की ही बाजारात मिळतात. रेल्वेच्या ठेल्यापासून ते मोठ्या मोठ्या दुकानामध्ये चिक्की मिळते.[२]
प्रकार
[संपादन]- शेंगदाणा चिक्की
- गुळची चिक्की
- खोबऱ्याची चिक्की
- तिळाची चिक्की
- फुटाणा चिक्की
- ड्रायफ्रूट चिक्की
- भाजलेल्या हरभराची चिक्की
- काजू चिक्की
- बदाम चिक्की
- राजगिरा चिक्की
- चॉकलेट चिक्की
अशा प्रकारे विविध पदार्थ वापरुन चिक्की तयार केली जाते.
चिक्की तयार करणाऱ्या भारतातील कंपन्या
[संपादन]- अपोलो ऑर्गनिक
- किनाल ग्लोबल केअर प्रा. लि.
- नॅशनल चिक्की अँड स्नॅक्स
- दिनेश डिस्ट्रिब्युटर
- साई सागर गृह उद्योग
- पंकज एक्सपोर्ट
- मगनलाल चक्की प्रॉडक्ट
- जैन चिक्की
- सामंत फूडस