Jump to content

एकनाथांचीं भजनें

विकिबुक्स कडून


एकनाथांचे चरित्र

नाथांचा जन्म इ.स.१५२८ मध्ये पुण्यपावन अशा घराण्यात झाला. ज्यांनी विजयनगरहून श्री विठ्ठलाची मूर्ती पंढरपुरात परत आणली त्या संत भानुदासाचे एकनाथ हे पणतू होत. भगवद्भक्ती त्यांच्या घराण्यात पूर्वीपासून चालत आलेली. पैठण हे तत्कालीन महाराष्ट्राचे काशीक्षेत्र आणि संस्कृत धर्मग्रंथाच्या अभ्यासाचे व्यासपीठ समजले जाई. या पैठणक्षेत्री एकनाथांचा जन्म झाला. नाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण तर आईचे नाव रुक्मिणी असे होते. पण आईवडिलांचा सहवास नाथांना फार काळ लाभला नाही. नाथांचे पालनपोषण त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनीच केले. एकनाथांनी लहानपणी गीता, उपनिषदे, शास्त्रे, पुराणे याबरोबरच लेखन, वाचन, गणित यांचाही अभ्यास केला. बालवयात भक्तिमार्गाचे संस्कार नाथांवर झाले. त्यांचे मन परमार्थाकडे वळले व गुरूभेटीची ओढ निर्माण झाली. आजोबा चक्रपाणी यांची अनुज्ञा घेऊन एकनाथ देवगिरी येथील विद्वान संत जनार्दनस्वामी यांच्याकडे गेले. अत्यंत तेजस्वी व विनम्र अशा नाथांची योग्यता स्वामींनी ओळखली व एकनाथांना गुरूदिक्षा दिली. गुरू-शिष्य तीर्थयात्रेला निघाले असतांना स्वामींनी नाथांना चतु:श्लोकी भागवतावर टीका लिहिण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे नाथांनी पंचवटी आणि त्र्यंबकेश्वर येथील मुक्कामात भागवतावर विद्वत्तापूर्ण व रसाळ भाषेत टीका पूर्ण केली. अष्टविनायक, बारा ज्योतिर्लिंग व उत्तर भारतातील तीर्थे करून नाथ पैठणला आले.

गुरूआज्ञेप्रमाणे नाथांनी सन १५५७ मध्ये पैठण येथे गिरिजाबाईंशी विवाह केला. पतिव्रता गिरिजाबाई नाथांच्या जीवनांत पूर्ण समरस झाल्या. श्रीखंड्या व उध्दव हे दोन सेवक नाथांना लाभले. गोदा, लीला आणि हरिपंडित ही तीन अपत्ये, मुक्तेश्वर कवी, गोदावरीचा मुलगा हे नाथांचे कुटुंब. एकनाथांचा मुलगा हरिपंडित हा संस्कृत भाषेचा अभिमानी, कर्मठ, सनातनी वृत्तीचा होता. नाथ उदार व सहिष्णू होते. भागवतावर नाथांनी मराठीत टीका केली म्हणून हरिपंडित रागावला व घर सोडून काशीला निघून गेला. नाथांच्या भागवतग्रंथाच्या मराठी टीकेचा काशीच्या पंडितांनी सन्मानाने गौरव केला, तेव्हा हरिपंडिताला आपली चूक समजली व पितापुत्रामधील वाद कायमचा मिटला.

प्राकृतात ग्रंथरचना करण्याची ज्ञानेश्वरापासून चालत आलेली परंपरा नाथांनीही पुढे चालविली. नाथांनी आपले विचार व्यक्त करण्यासाठी विविध पद्धतींची योजना केली. पंडित आणि विद्वानांसाठी चतु:श्लोकी भागवत व एकनाथी भागवताचे लेखन केले. मध्यमवर्गासाठी रुक्मिणीस्वयंवर व भावार्थरामायणाची योजना केली. जो तळाचा वर्ग होता त्यासाठी भारूडांची निर्मिती केली. लोकभाषेत लोकरंजन करताना लोकशिक्षण देणारे एकनाथ हे पहिले कवी होत. ग्रंथ, भारूडे, पदे, गौळणी आणि अभंग मिळून नाथांची काव्यसंपदा पाऊण लाख भरते. दत्तउपासक आणि वारकरी, प्रपंच आणि परमार्थ, काव्य आणि तत्वज्ञान, संस्कृत आणि प्राकृत, पंडितश्रेष्ठ आणि सामान्यजन असा समन्वय नाथांनी आपल्या जीवनात व धर्मग्रंथात घातला.

भागवतातील नवव्या अध्यायाच्या ३२ ते ३५ या चार श्लोकावर एकनाथांनी १०३६ ओव्यांचे भाष्य लिहिले. सृष्टीनिर्मितीपूर्वीं ब्रह्मदेवाने केलेल्या तपश्चर्येने श्रीआदिनारायण प्रसन्न झाले व त्यांनी जे ज्ञान सांगितले ते या चार श्लोकात आले आहे. हा आपला पहिलाच ग्रंथ असल्याने ‘वाकुडे तिकुडे आर्ष‘ आहेत असे नाथ संकोचाने व विनयाने सांगतात. ग्रंथाच्या शेवटी “जे बोलविले जनार्दने । तेचि ग्रंथकथने कथिलें म्यां ।“ या शब्दांत ग्रंथलेखनाचे सारे श्रेय नाथ आपले गुरू जनार्दनस्वामींना अर्पण करतात.

नाथांची भारूडरचना विविध स्वरुपाची असून त्यातून लोकजीवनातील उदाहरणे देऊन लोकभाषेतून अध्यात्म शिकवले आहे. मनोरंजनातून परमार्थाची भाषा शिकवली आहे. त्यामुळे नाथांचे वर्णन लोकसाहित्यकार असे केले जाते. नाथकालीन समाजजीवनाचे म्हणजे चालिरिती, सणवार, कुटुंबव्यवस्था, ग्रामजीवन, समाजव्यवस्था यांचे अत्यंत स्पष्ट दर्शन ही भारूडे घडवतात. अशी सुमारे ३०० भारूडे नाथांनी लिहिली आहेत. याशिवाय ‘हस्तामलक', ‘स्वात्मसुख’, ‘शुकाष्टक’, ‘आनंदलहरी’, ‘गीतासार’, ‘चिरंजीवपद’, ‘गीतामहिमा’ अशी स्फुटप्रकरणे नाथांनी लिहिली आहेत. त्यातील ओव्यांची एकूण संख्या सुमारे ४००० आहे.

विविध देवदेवतांवर एकनाथांनी अभंगरचना करून भक्तीच्या नाना छटांचे मनोरम दर्शन घडवले आहे. अभंगातून कृष्णजन्म, बालक्रिडा, कृष्णमहिमा, पंढरीमहिमा विठ्ठलमहिमा, राममहिमा, नाममहिमा, नामपाठ, किर्तनमहिमा, संतमहिमा, सद्गुरूमहिमा, अद्वैतज्ञान, आत्मभूमी अश्या विविध विषयांवर प्रासादिक, सुबोध अभंगरचना करून नाथांनी सामान्यजनांना तसेच भक्तजनांना परमार्थाच्या सहजसुलभ वाटा दाखवून मार्गदर्शन केले आहे. सुलभता, गेयता, प्रासादिकता हे नाथांच्या अभंगांचे प्रमुख गुणविशेष आहेत.

एकनाथांची भजने

कर्मयोग आणि चित्तशुध्दी

१ मनुष्यदेहाचे सार्थक

फूल झडे तंव फळ सोसे । तया पाठी तेही नासे ।
एक मागे एक पुढे । मरण विसरले बापुडे ।
मरण ऐकता परता पळे । पळे तोही मसणी जळे । एका जनार्दनी शरण । काळ वेळ तेथे न रिघे मन ।

भावार्थ:

झाडावर फूल उमलते. कालांतराने ते कोमेजून जाते. फूल झडून गेल्यावर झाडावर फळ लागते. यथावकाश फळ पिकून मधुर बनते आणि हळूहळू नासून जाते. हा निसर्गनियम असून विकास आणि विनाश एकापाठोपाठ येतात. तरीही मरणाची कल्पना माणसाला भेडसावते. तो मरणापासून दूर पळण्याचा प्रयत्न करतो आणि शेवटी काळामुखी पडतो. जीवनातील हे सत्य सांगून एका जनार्दनी म्हणतात, काळ वेळ आल्याशिवाय मरण येत नाही.


जे जे दिसे ते ते नासे । अवघे ओस जायाचे ।
पदार्थ-मात्र जात असे । काही नसे आन दुजे ।
एका जनार्दनी सर्व वाव । धरा भाव विठ्ठली ।

भावार्थ:

जे जे डोळ्यांना दिसते, ते ते सर्व नाशवंत आहे. उत्पत्तीनंतर विकास व शेवटी विनाश ठरलेला आहे. या तत्वाशिवाय दुसरे काहीही सत्य नाही. या अविनाशी विठ्ठलचरणी भक्तिभाव ठेवावा, असे एका जनार्दनी या भजनांत सांगतात.


अशाश्वतासाठी । का रे देवासवे तुटी ।
अंतकाळीचे बंधन । कोण निवारी पतन ।
तु म्हणसी हे माझे । खरा ऐसे वाहसी ओझे ।
याचा न धरी विश्वास । एका जनार्दनाचा दास ।

भावार्थ:

माणुस जन्माला येतो आणि देहबुध्दीने ममत्व निर्माण होते. आपला देह, इंद्रियसुखाची साधने, आप्तपरिवार आपली वाटू लागतात. सर्व माझे-माझे म्हणुन गाढवाप्रमाणे ओझे वाहतो. हेच अंतकाळीचे बंधन बनते. जनार्दनस्वामींचे दास एकनाथ सांगतात की या सर्व गोष्टी अशाश्वत आहेत, त्यावर विश्वास धरु नये. त्यामुळे अंतकाळीचे पतन-निवारण करणाऱ्या देवाला आपण पारखे होतो.


देह हा काळाचा जाणार शेवटी । याची धरुनी मिठी गोडी काय ।
प्रपंच काबाड एरंडाचे परी । रस-स्वाद तरी काही नाही ।
नाशवंतासाठी रडतोसी वाया । जनार्दनी शरण रिघे तु पाया ।
एका जनार्दनी भेटी होता संतांची । जन्म-मरणाची चिंता नाही ।

भावार्थ:

देह हा अशाश्वत असून शेवटी तो काळामुखी जाणार आहे, त्याची लालसा धरून उपयोग नाही. प्रपंच हा काबाडकष्ट देणारा असून एकनाथ प्रपंचाला रस-स्वाद नसलेल्या एरंडाच्या झाडाची उपमा देतात. प्रपंच नाशवंत असून त्याचे दु:ख करण्यापेक्षा संतांना शरण जाणे श्रेयस्कर आहे. कारण एकदा संतांची भेट झाली की जन्ममरणाची चिंता करण्याचे कारण नाही, असे संत एकनाथ म्हणतात.


मागे बहुतांसी सांगितले संती । वाया हे फजिती संसार तो ।
अंधाचे सांगाती मिळालेसे अंध । सुख आणि बोध काय तेथे ।
एका जनार्दनी जाऊ नको वाया । संसार माया लटकी ते ।

भावार्थ:

फार पूर्वीच संतांनी उपदेश केला की संसार ही केवळ लटकी माया असून तिच्या बंधनात अडकणे म्हणजे व्यर्थ जीवन घालवणे. जो सत्याचे दर्शन घेऊ शकत नाही, अशा अंधास दुसरा अंध भेटला तर कोण कुणाला योग्य मार्ग दाखवणार आणि त्यापासून कोणते सुख प्राप्त होणार ? म्हणून एकनाथमहाराज सांगतात की संसार-बंधनात अडकून मिळालेला मनुष्यजन्म वाया घालवू नका.


नरदेही येऊनी करी स्वार्थ । मुख्य साधी परमार्थ ।
नव्हता ब्रह्मज्ञान । श्वान - सूकरांसमान ।
पशुवत् जिणे । वाया जेवी लाजिरवाणे ।
एका जनार्दनी पामर । भोगिती अघोर यातना ।

भावार्थ:

नरदेह मिळूनही जर ब्रह्मज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला नाही, तर मनुष्यजन्म मिळूनही जीवन कुत्रा व डुकराप्रमाणे पशुवत, लाजिरवाणे होऊन वाया जाईल. एकनाथमहाराज म्हणतात, अशा पामरांना अनंत अघोर यातना भोगाव्या लागतात. नरदेही येऊन परमार्थ साधणे अत्यंत श्रेयस्कर आहे, कारण नरदेहाद्वारेच देवत्व साधता येते.


देह सांडावा ना मांडावा । येणे परमार्थचि साधावा ।
जेणे देही वाढे भावो । देही दिसतसे देवो ।
ऐसे देही भजन घडे । त्रिगुणात्मक स्वयें उडे ।
त्रिगुणात्मक देही वावो । एका जनार्दनी धरा भावो ।

भावार्थ:

परमेश्वरकृपेने मिळालेल्या नरदेहाचा त्यागही करु नये आणि त्याचा अहंकारही मानू नये. हा नरदेह परमार्थ साधण्याचे साधन आहे, असे समजून जीवन परमेश्वराच्या भक्तिभावात घालवावे. जसजसा भक्तिभाव वाढत जातो तसतसा देहात देव प्रकट होतो आणि असा देह भजनांत तल्लीन होतो, तेव्हा सत्व-रज-तमोगुण लयास जाऊ लागतात. असा भक्तिभाव धरावा की हा त्रिगुणात्मक देह नश्वर आहे असा भाव निर्माण व्हावा, असे एका जनार्दनी म्हणतात.


२ स्वधर्माचरणाचे अगत्य

परमार्थाचे वचना द्यावे अनुमोदन । तेणे नारायण संतोषत ।
विषयिक वचना देता अनुमोदन । तेणे नारायण क्रोध पावे ।
भक्ति-प्रेम-वचना द्यावे अनुमोदन । तेणे नारायण संतोषत ।
दुर्बुध्द वचना देता अनुमोदन । तेणे नारायण क्रोध पावे ।
एका जनार्दनाचे वचना द्यावे अनुमोदन । तेणे जनार्दन संतोषत ।

भावार्थ:

परमार्थवचनांचा आनंदाने स्विकार केल्याने नारायण प्रसन्न होतात. याउलट इंद्रियविषयांचे चिंतन केल्याने नारायणाचा कोप होतो. भक्ती आणि प्रेमाच्या वचनांनी नारायण प्रसन्न होतात, तर वाईट विचारांचा अंगिकार केल्याने नारायण क्रोधिष्ट होतात. एकनाथमहाराज म्हणतात, सद्गुरू जनार्दनस्वामींची वचने स्विकारल्यास स्वामी संतोष पावतात.


मेघ वर्षे निर्मळ जळ । परी जैसे बीज तैसे फळ ।
तैसे भक्त अभक्त दोन्ही । वेगळीक वेगळेपणी ।
एका जनार्दनी गुण । चंदन वेळू नोहे समान ।

भावार्थ:

मेघ सर्व काळी सर्व स्थळी, निर्मळ जळाचा वर्षाव करीत असतात, तरीही झाडांवर येणारी सर्व फळे एकाच प्रकारची नसतात. जसे बीज तसे फळ येते, हा निसर्गनियम आहे. चंदनाच्या बीजापासून चंदनाचे झाड आणि बांबूपासून बांबू उगवणार या निसर्ग नियमाचा दाखला देवून एका जनार्दनी स्पष्टीकरण करतात की, भक्त आणि अभक्त एकाच भगवंताचे अंश असले तरी त्यांचे स्वाभाविक गुणधर्म भिन्न असल्याने ते परस्परांपासून वेगळे असतात.


१०

अधर्मे अदृष्टाचे चिन्ह । विपरीत वचन ते ऐका ।
भांडारी ठेविला कापूर उडे । समुद्रामाजी तारू बुडे ।
ठक येवोनि एकांती । मुलाम्याचे नाणे देती ।
परचक्र विरोध धाडी । खणित लावुनी तळघरे फोडी ।
पाणी भरे पेवा आत । तेणे धान्य नासे समस्त ।
गोठण शेळ्या रोग पडे । निमती गाईम्हशींचे वाडे ।
भूमि-निक्षेप करू जाती । ते आपुल्याकडे धुळी ओढिती ।
ऐसी कर्माची अधर्म-स्थिती । एका जनार्दनी सोशी फजिती ।

भावार्थ:

जेव्हा लोकांमध्ये अधर्म, अनाचार यांचे प्राबल्य वाढते तेव्हा भविष्यात घडून येणाऱ्या गोष्टींची विपरित चिन्हे दिसू लागतात. धान्याच्या कोठारातील कापूर उडणे, समुद्रात जहाज बुडणे, ठकांकडून फसवणूक होणे, परचक्र येऊन तळघरे फोडली जाणे, धान्याच्या पेवात (कोठारात) पाणी भरुन सगळं धान्य नासून जाणे, गाई-म्हशी, शेळ्या यासारख्या पाळीव प्राण्यांवर रोग पडून मृत्यु येणे, भूकंप होऊन जमीन खचणे ही सर्व अधर्म वाढल्याची लक्षणे आढळून येतात. या अधर्म-स्थितीत लोकांना असुरक्षितता, अवहेलना सोसावी लागते असे एका जनार्दनी म्हणतात.


११

जया करणे आत्म-हित । स्वधर्म आचरावा सतत ।
कर्मे नित्य नैमित्तिक । ब्रह्मप्राप्ती लागी देख ।
तीचि नित्य आचरावी । चित्तशुध्दी तेणे व्हावी ।
एका जनार्दनी कर्म । ईशभक्तीचे हे वर्म ।

भावार्थ:

ज्या साधकांना स्वतःचे हित साधायचे असेल त्यांनी आपली नित्य व नैमित्तिक (रोज नियमितपणे करावी अशी नित्य व काही निमित्ताने करावी लागणारी नैमित्तिक) कर्मे यथाकाल, यथाविधी, यथासांग पूर्ण करून स्वधर्माचे आचरण करावे असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, कर्माच्या आचरणाने आपले चित्त शुध्द होऊन आत्मदर्शनाचा मार्ग मोकळा होतो. ईश्वरभक्तीचे हेच रहस्य आहे.


१२

ज्यासी करणे चित्तशुद्धी । कर्मे आचरावी आधी ।
तरीच होय मन:शुध्दी । सहज तुटती आधि-व्याधि ।
चित्ताची स्थिरता । होय उपासने तत्वतां ।
चित्त झालिया निश्चळ । सहज राहिल तळमळ ।
एका जनार्दनी मन । होय ब्रह्म-रूप जाण ।

भावार्थ:

कर्माने चित्त-शुद्धी होते हा पारमार्थिक सिध्दांत सांगून एका जनार्दनी म्हणतात, ज्यांना चित्त-शुध्दीची आस लागली आहे त्यांनी कर्माचे आचरण करावे. त्यामुळे मनाची मलिनता नाहिशी होऊन ते शुध्द होते. परिणामी मनाचे रोग (आधि) व देहाच्या व्याधी सहज तुटतात. देवाच्या नियमित उपासनेने चित्ताची स्थिरता लाभते. चित्त निश्चळ झाल्याने मनाची तळमळ नाहिसी होते आणि मन आत्मस्वरुपाशी एकरुप होते.


१३

नित्य-नैमित्तिक कर्मे आचरावी । तिही ते पावावी चित्तशुध्दि ।
चित्त स्थिर व्हाया करी उपासना । भजे नारायणा एका भावे ।
विवेक-वैराग्य-प्राप्ति तत्प्रसादे । चित्ता लागे वेध सद्गुरूचा ।
सद्गुरू-कृपेने पूर्ण बोध होय । नित्य त्याचे पाय हृदयी धरी ।
एका जनार्दनी ठेवूनिया मन । मनाचे उन्मन पावलासे ।

भावार्थ:

नित्य, नैमित्तिक कर्मे सद्भावनेने आचरावी, कारण त्यामुळे चित्तशुध्दी होते. चित्त स्थिर होण्यासाठी नारायणाची अनन्यभावे उपासना केल्याने नारायणकृपेने विवेक व वैराग्याची प्राप्ती होते. विवेक व वैराग्य आले की सद्गुरूभेटीची ओढ लागते. सद्गुरूने कृपा केल्याने पूर्ण आत्मबोध होतो. आत्मबोधाचा लाभ करुन देणाऱ्या सद्गुरूचरणांची नित्य सेवा करावी असे सांगून एकाजनार्दनी सांगतात, सद्गुरूचरणांशी मन एकाग्र केल्याने मन शुध्द होऊन उच्च पातळीवर स्थिर झाले, मनाचे उन्मन झाले.


१४

परब्रह्म-प्राप्ती लागी । कर्मे आचरावी वेगी ।
चित्त शुध्द तेणे होय । भेटी सद्गुरूचे पाय ।
कर्म नित्य नैमित्तिक। प्रायश्चित्त जाण एक ।
उपासन ते चौथे । आचरावे शुध्द चित्ते ।
तेणे होय चित्त स्थिर । ज्ञानालागी अधिकार ।
होय भेटी सद्गुरूची । ज्ञानप्राप्ति तैची साची ।
प्राप्त झाल्या ब्रह्मज्ञान । आपण जग ब्रह्म परिपूर्ण ।
एका जनार्दनी भेटला । ब्रह्म-स्वरूप स्वयें झाला ।

भावार्थ:

नित्यकर्म, नैमित्तिक कर्मे, प्रायश्चित्त कर्मे व चौथी उपासनाकर्मे केल्याने चित्त शुध्द होऊन परब्रह्म प्राप्ती होते. चित्त स्थिर होऊन ज्ञानासाठी अधिकारी बनते. सद्गुरुंची भेट हीच ज्ञानप्राप्ती होय, आत्म-स्वरुपाशी पूर्णपणे एकरूप होणे हेच ब्रह्मज्ञान. एकनाथमहाराज जनार्दनस्वामींना भेटले आणि ब्रह्मज्ञान होउन ब्रह्म-स्वरूप झाले असे म्हणतात.


३ निष्काम कर्म-योग

१५

आधी घेई निरपेक्षता । त्याचे चरण वंदीन माथा ।
निरपेक्षाची आवडी । ब्रह्मज्ञान घाली उडी ।
निरपेक्षावाचून । नाही नाही रे साधन ।
एका जनार्दन शरण । निरपेक्ष पाविजे ज्ञान ।

भावार्थ:

निरपेक्ष भक्ती, निरपेक्ष कर्म हेच निरपेक्ष ज्ञान मिळवण्याचे एकमेव साधन आहे. निरपेक्षतेशिवाय अन्य कोणतेही साधन नाही. निरपेक्ष साधकाच्या प्रेमामुळे प्रत्यक्ष ब्रह्मज्ञान धाव घेते असे सांगून एकनाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी निरपेक्षपणे शरणागत झाल्याने ब्रह्मज्ञानाचा अधिकारी झाला.


१६

आशा-बध्द करिती वेदांचे पठण । तेणे नारायण तुष्ट नोहे ।
आशा-बध्द करिती जप तप हवन । तेणे नारायण तुष्ट नोहे ।
निराशी करिती देवाचे कीर्तन । एका जनार्दन तुष्ट होय ।

भावार्थ:

जेव्हा साधक काहितरी फळ मिळवण्यासाठी वेदांचा अभ्यास, पठण करतो. त्यामुळे नारायण प्रसन्न होत नाही. जप, तप, होम हवन ही नैमित्तिक कर्मे जेव्हा सत्ता, संपत्ती, संतती, लौकिक मिळवण्याच्या आशेने केली जातात, तेव्हाही नारायण संतुष्ट होत नाही. जेव्हा केवळ मनाच्या समाधानासाठी, चित्तशुध्दीसाठी जी कर्मे केली जातात, तेव्हा एकनाथांचे जनार्दनस्वामी आनंदित होतात.


१७

वेदयुक्त मंत्र जपता घडे पाप । मी मी म्हणोनि संकल्प उठतसे ।
यज्ञादिक कर्म घडता सांग । मी मी संसर्ग होता वाया ।
एका जनार्दनी मीपणा टाकून । करी कृष्णार्पण सर्व फळ ।

भावार्थ:

योग-याग, होम-हवन करतांना ज्या वेदमंत्रांचे पठण केले जाते ते मंत्र मुख्यतः कामनापूर्तीसाठी गायले जातात. त्यामुळे मनात नवनवे संकल्प उठतात. या संकल्पानुसार यज्ञादिक कर्मे यथासांग पार पाडली जातात. त्यामुळे मनाला मीपणाचा संसर्ग होतो. अहंकाराची बाधा होते. यासाठी एका जनार्दनी सांगतात, मीपणाचा त्याग करून केलेल्या सर्व कर्माची फळे श्रीकृष्ण नारायणाला श्रध्देने अर्पण करावी.


१८

कर्म करिसी तरी कर्मठचि होसी । परी निष्कर्म नेणसी कर्मामाजी ।
ब्रह्मालागी कर्म सांडणे हे कुडे । पाय खंडोनि पुढे चालु पाहसी ।
एका जनार्दनी सर्व कर्म पाही । सांडी मांडी नाही तये ठायी ।

भावार्थ:

कर्म करतांना निष्कर्म होणे हेच कर्माचे अंतिम साध्य आहे. फलाशा सोडून कर्म करणे म्हणजे कर्माचे फळ ईश्वराला समर्पित करणे होय. परंतु कर्म करत असताना आपण निष्कर्म न होता अधिकाधिक कर्मठ होत जातो. ब्रह्मज्ञान मिळवण्याचा प्रयत्नात आपली सर्व नित्य व नैमित्तिक कर्मे सोडून देणे म्हणजे पाय तोडून टाकून पुढे चालण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. कारण कर्म हेच ब्रह्मज्ञानाचे मुख्य साधन आहे असे सांगून एका जनार्दनी कोणतेही कर्म सोडू नये असे आग्रहाने सांगतात.


१९

धावू नको सैरा कर्माचिया पाठी । तेणे होय दृष्टि उफराटी ।
शुध्द-अशुध्दाच्या न पडे विवादा । वाचे म्हणे सदा नारायण ।
एका जनार्दनी ब्रह्मार्पण कर्म । तेणे अवघे धर्म जोडतील ।

भावार्थ:

योग्यायोग्यतेचा कोणताही विचार न करता साधक कर्माच्या पाठीमागे लागला तर तो निष्कर्मी बनण्याची ऐवजी कर्मठ बनतो, त्याची दृष्टी उफराटी बनते असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, कर्माची कोणती पध्दत शुद्ध व कोणती अशुध्द यांच्या वादात न पडता, वाचेने सतत नारायणाचे नाम घेत कर्म केले की ते ब्रह्मार्पण होते व सर्व धर्मांचे पालन केल्याचे श्रेय मिळते.


२०

प्रपंच परमार्थ एकरूप होत । आहे ज्याचा हेत रामनामी ।
परमार्थे साधे सहज संसार । येथे येरझार नाही जना ।
सहज संसारे घडे परमार्थ । लौकिक विपरीत अपवाद ।
एका जनार्दनी नाही तया भीड । लौकिकाची चाड कोण पुसे ।

भावार्थ:

रामनामाचा अखंडित जप करीत जो प्रपंच करतो त्याचा प्रपंच व परमार्थ एकरूप होतो, म्हणजे प्रपंच करीत असताना त्याला परमार्थ साधतो. रामनामस्मरणात संसार सहजपणे घडून येतो. याविपरीत उदाहरण हा अपवाद समजावा. येथे जन्म-मरणाची बंधने तुटून पडतात, असे एकनाथ महाराज सांगतात.


२१

जगाचिये नेत्री दिसे तो संसारी । परी तो अंतरी स्फटिक शुध्द ।
वायाचि हाव न धरी पोटी । वाउगी ती गोष्टी न करी जगा ।
स्त्री-पुत्र-धन नाही तेथे मन । इष्ट मित्र कारण नाही ज्याचे
एका जनार्दनी प्रपंच परमार्थ । सारिकाचा होत तयालागी ।

भावार्थ: रामनाम घेत संसार करणारा साधक जगाच्या दृष्टीने संसारी असला तरी तो अंतर्यामी स्फटिकासारखा शुध्द असतो. लौकिक, सत्ता, संपत्ती याविषयी त्याच्या मनात लालसा नसते. पत्नी, संतती याविषयी संसारात असूनही ममत्व नसते. असा भक्त सामान्यांना विपरीत वाटतील अशा गोष्टी करीत नाही. इष्ट मित्रांना खुष ठेवण्याचा प्रयत्न तो करीत नाही. असा भक्त संसारात राहून परमार्थ साधत असतो असे एका जनार्दनी म्हणतात.


२२

उत्तम पुरुषाचे उत्तम लक्षण । जेथे भेद शून्य मावळला ।
भेद शून्य झाला बोध स्थिरावला । विवेक प्रगटला ज्ञानोदय ।
जिकडे पाहे तिकडे उत्तम दर्शन । दया शांती पूर्ण क्षमा अंगी ।
एका जनार्दनी उत्तम हे प्राप्ती । जेथे मावळती द्वैताद्वैत ।

भावार्थ: ज्या पुरुषाच्या चित्तातील मी-तू पणाचा भेद, द्वैत-अद्वैत हा भेद पूर्णपणे लयास गेला आहे तो उत्तम पुरुष समजावा. सर्व प्रकारचे भेदाभेद नाहिसे होऊन चित्त शुद्ध झाले असता सद्गुरुने केलेला बोध चित्तात स्थिरावतो, विवेक प्रकट होऊन ब्रह्मज्ञान होते. जळी-स्थळी, काष्ठी-पाषाणी केवळ एकच आत्मतत्व भरून राहिले आहे असा प्रत्यय येतो. सर्वत्र परमेश्वराचे उदात्त दर्शन घडते. अशा साधकाचे मन दया, क्षमा, शांती यांनी भरून जाते. एका जनार्दनी म्हणतात, जेथे द्वैत संपून अद्वैताचा अनुभव आला तेथे ही उत्तम लक्षणे दिसून येत असल्याचे जाणवते.


२३

समुद्र क्षोभे वेळोवेळी । योगिया क्षोभेना कोणे काळी ।
समुद्रा भरते पर्व-संबंधे । योगी परिपूर्ण परमानंदे ।
समुद्र सर्वदा तो क्षार । तैसा नव्हे योगीश्वर ।
योगियाची योग-स्थिती । सदा परमार्थ भक्ति ।
एका जनार्दनी शरण । योगियांचे जे योगचिन्ह ।

भावार्थ:

येथे एकनाथमहाराज समुद्र व योगी यांची तुलना करीत आहेत. अनेकवेळा समुद्रात वादळे निर्माण होतात, वडवानल उठतात. योगी पुरुषांच्या अंत:करणातमात्र कधीच क्षोभ निर्माण होत नाही. पर्वकाळी अमावस्या, पौर्णिमेला समुद्राला भरती येते. योगीमात्र सदासर्वकाळ परमानंदाने प्रसन्नचित् असतो. समुद्राचे पाणी क्षारयुक्त असते, तर योगेश्वराचे चित्त माधुर्याने परिपूर्ण असते. सदा परमार्थभक्ति ही योगीजनांची कायमस्वरूपी योग-स्थिति असते. जनार्दनस्वामींच्या चरणी शरणागत असलेले संत एकनाथ योग्यांची योगचिन्हे सांगून योग्याचा महिमा वर्णन करतात.


मिथ्या साधनांच्या मागे लागु नका

२४

प्रतिमेचा देव केला । काय जाणे ती अबला ।
नवस करिती देवासी । म्हणती पुत्र देई वो मजसी ।
देव खोटा नवस खोटा । एका जनार्दनी रडती पोटा ।

भावार्थ

पाषाणाची, धातूची, देवाची मूर्ती तयार करून ती मंदिरात ठेवतात. मंदिरात देवदर्शनाला आलेल्या स्त्रिया भक्तिभावाने या प्रतिमेला पुत्रप्राप्तीसाठी नवस बोलतात. एका जनार्दनी म्हणतात, प्रतिमेचा खोटा देव खरा मानून केलेला नवस फळाला येणे शक्य नसते, फसगत होऊन केवळ दु:खच पदरी पडते.


२५

देव दगडाचा भक्त तो मेणाचा । आइका दोहींचा विचार कैसा ।
खरेपणा नाही देवाचे ते ठायी । भक्त अभाविक पाही दोन्ही एक ।
एका जनार्दन ऐसे देवभक्तपण । निलाजरे जाण उभयतां ।

भावार्थ:

दगडाचा देव आणि मेणाचा भक्त याविषयी एकनाथमहाराज आपले मत व्यक्त करतात. खरा देव दगडाच्या प्रतिमेत नसून तो भाविक भक्ताच्या अंतरात नांदतो. दगडाचा देव व अभाविक भक्त दोन्ही खोटे आहेत असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, खोट्या देवाची कामनापूर्तीसाठी पूजा करणारे दोन्ही दांभिक, निलाजरे होत.


२६

नीचाचेनि स्पर्शे देवो विटाळला । पाणिये प्रक्षाळूनी सोवळा केला ।
देवापरिस जळ सबळ केले । ज्ञान ते दुर्बळ होऊनि ठेले ।
एका जनार्दनी साच नाही भाव । संशयेचि देव नाही केला ।

भावार्थ:

नीच (दलीत) माणसाच्या स्पर्शाने देव विटाळला (अशुध्द) झाला म्हणून पाण्याने धुऊन शुध्द केला. जो परमेश्वर सजीव व निर्जीव सृष्टीतील सर्वांच्या अंतर्यामी वास करुन सर्वांना पावन करतो तो नीचाच्या स्पर्शाने अपवित्र कसा होऊ शकेल आणि पाण्याने धुऊन तो सोवळा केला असे मत व्यक्त करणे म्हणजे पाण्याला देवापेक्षा अधिक सबळ मानणे हे अज्ञानाचे लक्षण असून ते ज्ञानाला कमीपणा आणते असे सांगून एका जनार्दन म्हणतात, जेथे मनातील भक्तिभाव खरा नसेल, तेव्हा मनात संशय निर्माण होतो आणि देवाविषयी विपरित भावना व्यक्त केली जाते.


२७

केले तुंवा काय जाउनिया तीर्था । सर्वदा विषयार्था भुललासी ।
मनाची ती पापे नाही धोवियेली । वृत्ति हे लाविली संसारीच ।
तीर्थ-यात्रा-योगे कीर्ति ही पावली । बुद्धि शुध्द झाली नाही तेणे ।
एका जनार्दन सद्गुरू-पाय धरी । शांतीचे जिव्हारी पावशील ।

भावार्थ:

सदासर्वदा इंद्रियविषयांचा ध्यास असलेला सामान्य भक्त त्या विषयत भुलून जातो, त्याच्या सर्व वृत्ति संसारात गुंतलेल्या असतात. तीर्थयात्रेला जाऊन त्यांना काही गौरव, थोडी प्रतिष्ठा प्राप्त होते. पण त्याच्या मनाची पापे धुतली जात नाहीत किंवा बुध्दी शुध्द होत नाही, मनाची पापे आणि बुध्दीची मलिनता जाण्यासाठी सद्गुरुंना शरण जावे लागते. संतसंगतीत अंतरंगात शांतीचा उदय होतो, असे एका जनार्दनी सांगतात.


२८

हृदयस्थ असोनि का रे फिरसी वाया । दीप आणि छाया जयां परी ।
आत्मतीर्थी सुस्नात झालिया मन । आणिक साधन दुजे नाही ।
एका जनार्दनी मनासी आवरी । मग तु संसारी धन्य होसी ।

भावार्थ:

परमात्म्याचे अधिष्ठान आपला हृदयात असतांना, त्याला शोधण्याची धावपळ करणे व्यर्थ आहे. जिवा-शिवाची जोडी दीप-छाये सारखी आहे. आत्मस्वरुपाच्या पवित्र तीर्थात मन भिजून शुध्द होणे यासारखे दुसरे साधन नाही असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, मनाच्या सर्व वृत्ती आवरून वागल्यास संसारी धन्यता मिळते.


२९

देव देव म्हणूनि फिरताती वेडे । चित्त शुध्द नाही तरी देव केंवि जोडे ।
पाहे तिकडे देव आहे । दिशा व्यापुनी भरला राहे ।
एका जनार्दनी आर्तभूत । देव उभा असे तिष्ठत ।

भावार्थ:

देवाचा शोध घेत सामान्यजन वेड्यासारखी फिरतात. ज्याचे चित्त शुध्द नाही, त्याला देवाचा साक्षात्कार घडणे शक्य नाही. खरा भक्तीभाव असलेल्या भाविकाला सर्व दिशा व्यापून देव सर्वत्र भरला आहे असा अनुभव येतो. सर्व सृष्टीत भरुन राहिलेली देवाची अनंत रूपे त्याला सतत दिसत असतात, असे एका जनार्दनी म्हणतात.


३०

जिवाचे जीवन जनी जनार्दन । नांदतो संपूर्ण सर्व देही ।
वाउगी का वाया शिणती बापुडी । काय तयार जोडी हाती लागे ।
एका जनार्दनी वाउगी ती तपे । मनाच्या संकल्पे हरि जोडे ।

भावार्थ:

सर्व प्रकारच्या जीवांचे प्राणतत्व असलेला जनार्दन सर्व प्राणिमात्रांच्या देहात वास करतो, हे जाणून न घेणारे अज्ञानी-जन देवाचा शोध घेत व्यर्थ श्रम करून काया झिजवतात. एका जनार्दनी म्हणतात, यज्ञ-याग-तप या साधनांनी देव प्रसन्न होत नाही तर मनाच्या संकल्पसिध्दीने हरि जोडला जातो.


३१

आपुली पूजा आपण करावी । ही जंव ठावी राहटी नाही ।
कासया ती पूजा जाणिवेचा शीण । त्याहुनी अज्ञान बरा दिसे ।
एका जनार्दनी ज्ञानाज्ञाने । पुजावे चरण विठोबाचे ।

भावार्थ:

आपण स्वत:च परमेशाचे रूप आहोत ही जाणीव ठेवून आत्मसन्मान हीच खरी देवपूजा आहे हे समजून न घेता देवपूजेचा व्यर्थ अट्टाहास करण्यापेक्षा अज्ञानी असणे अधिक बरे असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, जाणतेपणी किंवा अजाणतेपणी विठोबाला भक्तिभावाने शरण जाऊन त्याचे चरण पूजावे हेच योग्य होय.


सार-ग्राही श्रवण पाहिजे

३२

वेदांमाजी ओंकार सार । शास्त्र सार वेदांत ।
मंत्रांमाजी गायत्री सार । तीर्थ-सार गुरु-चरण ।
दानांमाजी अन्न-दान सार । कीर्तन सार कलियुगी ।
जिव्हा-उपस्थ जय सार । भोग-सार शांति-सुख ।
एका जनार्दनी एका सार । सर्व-सार आत्म-ज्ञान ।

भावार्थ:

ओंकार हे वेदांचे सार तर शास्त्र हे वेदांताचे सार आहे. सर्व मंत्रामध्ये गायत्रीमंत्र प्रमुख, तर गुरुचरणांचे तीर्थ सर्व तीर्थात पवित्र मानले जाते. दानामध्ये दान अन्नदान, नवविधा भक्तीत कीर्तन-भक्ती कलियुगात श्रेष्ठ मानली जाते. वाणी, रुची (जिव्हा) व कामवासना यांचा संयम हा सर्वश्रेष्ठ संयम असून शांति-सुख हे भोगाचे सार आहे असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, आत्म-ज्ञान (मी देह नसून आत्मा आहे, अमृताचा पुत्र आहे) हे ज्ञान सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे.


३३

पिंपळावरुनी मार्ग आहे । ऐकोनि वृक्षा वेधो जाय ।
ऐसे अभागी पामर । न कळे तयांसी विचार ।
म्हणोनी शरण जनार्दनी । एका जनार्दनी एकपणी ।

भावार्थ:

गीतेच्या पंधराव्या अध्यायांत भगवंताने अश्वस्थ (पिंपळ) वृक्षाला संसारवृक्षाची उपमा दिली आहे, हे लक्षात घेऊन एखादा भाविक संसार बंधनातून सुटण्यासाठी पिंपळाला फेरे घालत असेल तर तो अभागी पामर आहे असे समजावे कारण त्याला भगवंताचे विचार समजले नाहीत.पारमार्थिक विचार समजण्यासाठी सद्गुरूला शरण जाऊन ज्ञान ग्रहण करणे जरुरीचे आहे असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, आपण जनार्दनस्वामींना एकनिष्ठपणे शरणागत आहोत.


३४

वेद-वाणी देवे केली । येर काय चोरापासूनि झाली ।
सकळ वाचा वदवी देव । का वाढवा अहंभाव ।
ज्या ज्या वाणी स्तुति केली । ती ती देवासी पावली ।
एका जनार्दनी मातु । वाचा वाचक जगन्नाथु ।

भावार्थ:

संस्कृत भाषेचे अभिमानी लोक गर्विष्ठपणे सांगतात की, संस्कृत (वेदांची भाषा) वाणी देवांनी निर्माण केली आहे. संत एकनाथ मराठी प्राकृत भाषेचे अभिमानी असल्याने ते विचारतात, संस्कृतशिवाय बाकी भाषा चोरापासून आल्या आहेत असे नसून सर्व वाचा वदवणारा देवच आहे. कोणत्याही वाणीतून भगवंताची स्तुति केली तरी ती देवाला पावते. एका जनार्दनी म्हणतात, वाणी निर्माण करणारा आणि वदवणारा केवळ जगन्नाथच आहे.


३५

शतावर्ती श्रवण अधिक पै झाले । तेणे अंगा आले जाणपणव ।
श्रवण तो लौकिक मनी नाही विवेक । बुध्दीसि परिपाक कैसेनि होय ।
एका जनार्दनी साच न रिघे मन । तंववरी समाधान केवी होय ।

भावार्थ:

शंभरापेक्षा अधिक ग्रंथांचे श्रवण (वाचन) केल्याने अनेक गोष्टींचे ज्ञान झाले. परंतु मनात विवेक निर्माण झाला नाही, तर बुध्दी परिपक्व होऊ शकणार नाही आणि मनामध्ये खऱ्या ज्ञानाचा उदय झाल्याशिवाय निर्भेळ समाधान लाभणार नाही असे एका जनार्दन म्हणतात.


३६

करिता हरिकथा श्रवण । स्वेद रोमांच न ये दारुण ।
रुका वेचिता प्राण । जाऊ पाहे ।
द्रव्य-दारा-लोभ अंतरी । हरि-कथा वरी वरी ।
बीज अग्नी माझारी । विरूढे कैसे ।
एका जनार्दनी । काम-क्रोध-लोभ तीन्ही ।
द्रव्य दारा त्यजुनी । नित्य तो मुक्त ।

भावार्थ:

हरिकथा ऐकतांना सामान्य माणसाचे अष्टसात्विक भाव दाटून येत नाहीत. देहावर रोमांच उभे रहात नाहीत किंवा स्वेद (घाम) येत नाही. परंतु पैसा खर्च करतांना मात्र प्राणांतिक वेदना होतात कारण धन, पत्नी, संतती यांचा मनाला लोभ वाटतो. या लोभरुपी अग्नीत भक्तीभावाचे बीज रुजत नाही, जसे अग्नीमध्ये कोणत्याही वनस्पतीचे बीज रुजत नाही. असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, काम, क्रोध, लोभ, पत्नी आणि धन यांचा जो त्याग करु शकतो तो नित्य मुक्त समजावा. तोच हरिकथा श्रवणात भक्तभावाने रममाण होऊ शकेल.


३७

आरशा अंगी लागता मळ। मुख न दिसेचि निर्मळ ।
मळ तो झाडूनि पाहता । मुख दिसे निर्मळता ।
पाहता शुध्द भाव रिती । परमार्थ हाचि चित्ती ।
एका जनार्दनी हा विचार । आरशासारखा प्रकार ।

भावार्थ:

चित्तामध्ये काम, क्रोध,मोह,लोभ या विकारांची पुटं चढलेली असतील तर या मलिन चित्तात परमार्थाचे निर्मळ रूप दिसणार नाही. जसे आरशावर धुळीची पुटं चढली की, निर्मळ मुख-दर्शन होणार नाही हा विचार एका जनार्दनी स्पष्ट करून सांगतात.


अहिंसा-सत्यादी व्रते निष्ठेने पाळावी

३८

श्रुती सांगती परमार्था । हिंसा न करावी सर्वथा ।
संकल्प नाशी तो संन्यासी । तेथे कल्पना कायसी ।
वेद बोले सर्वा ठायी । एकावाचुनी दुजे नाही ।
एका जनार्दनी बोधु । नाही तंव न कळे वेदु ।

भावार्थ:

श्रुतींचे वचन आहे परमार्थ साधु इच्छिणार्यांनी हिंसा करू नये. वेदांच्या वचनाप्रमाणे अहिंसा आणि सत्यवचन निष्ठेने पाळावे. शस्त्राचा आघात करून शरिराला घायाळ करणे आणि खोटे बोलून, अविश्वास दाखवून मन दुखावणे या दोन्ही गोष्टी परस्परावलंबी किंवा समान आहेत. एका जनार्दनी सांगतात की श्रुतींचा किंवा वेदांचा जोपर्यंत खरा बोध होत नाही, तोवर त्यातील रहस्य कळणार नाही.


३९

ब्रह्मांडाची दोरी । हालवी जो एक्या करी ।
भूतीं परस्परे मैत्री । ती एके ठायी असती बरी ।
पंचप्राणांचे जे स्थान । तये कमळी अधिष्ठान ।
एका जनार्दनी सूत्रधारी । बाहुली नाचवी नाना परी ।

भावार्थ:

ब्रह्मांडरूपी पाळण्याची दोरी भगवंताच्या हातात असून तो एका कराने तो हालवित आहे. पंचप्राण हृदयांत स्थित असून कमळ हे त्याचे अधिष्ठान आहे. कठपुतळ्यांचा खेळ करून दाखवणारा हातामधील दोरीने बाहुली नाचवून नाना प्रकारचे नाच करून दाखवतो. एका जनार्दनी म्हणतात, तो ब्रह्मांडनायक सूत्रधारी असून सर्व प्राणिमात्रांकडून अनेक प्रकारच्या क्रिडा करवून घेतो. सर्व प्राणिमात्रांमध्ये परस्परांविषयी मैत्रीची भावना असावी.


४०

असत्याचा शब्द नको माझे वाचे ।
आणिक हो का ओझे भलतैसे ।
अणुमात्र रज डोळां न साहे ।
कैसा खुपताहे जन-दृष्टी ।
एका जनार्दन असत्याची वाणी ।
तोचि पाप-खाणी दुष्ट-बुध्दि ।

भावार्थ

ज्याप्रमाणे धुळीचा अगदी बारीक कण डोळ्यात गेला तरी तो डोळ्यात खुपतो, तसेच असत्य भाषण लोकांच्या डोळ्यांत सलत राहते. दुसऱ्या कोणत्याही पापाच्या ओझ्यापेक्षा असत्य वाणी हे मोठे पाप आहे. असत्य वाणी ही दुष्ट बुध्दी असून अनेक पापांची खाणी आहे. म्हणून एका जनार्दनी परमेश्वराला प्रार्थना करतात की, असत्य शब्द वाचेवाटे कधीही बोलले जाऊ नयेत.


४१

अर्थ नाही जयापाशी । असत्य स्पर्शेना तयासी ।
अर्थापाशी असत्य जाण । अर्थापाशी दंभ पूर्ण ।
अर्थापोटी नाही परमार्थ । अर्थापोटी स्वार्थ घडतसे ।
अर्थ नको माझे मनी । म्हणे एका जनार्दनी ।

भावार्थ:

या भजनात संत एकनाथ अर्थाने कसे अनर्थ घडतात याचे वर्णन करीत आहेत. पैसा मिळवण्यासाठी लबाडी, खोटेपणा यांचा आश्रय घेतला जातो. पैसा मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी दांभिकता व स्वार्थीपणाचा अवलंब करावा लागतो. अर्थामुळे साधक परमार्थाला पारखा होतो. आपल्या मनात पैशाविषयी विचार कधीही येऊ नयेत असे एका जनार्दनी म्हणतात.


४२

विषयाचे अभिलाषे सकळ भेद भासे ।
विषय-लेश तेथे मुक्ति केवि वसे ।
विषय तृष्णा सांडी मग तु साधन मांडी ।
वैराग्याची गोडी गुरूसी पुसे ।
स्त्री-पुरुष भावना भेद भासे ।
तेथें ब्रह्म-ज्ञाना गमन कैचें ।
कणुभरित जो डोळा शरीरासी दे दु:ख ।
अणुमात्र विषय तो संसार-दायक ।
एका जनार्दनी निज-ज्ञान शक्ति ।
निर्विषय मन ते अभेद भक्ति ।

भावार्थ:

संसारातील सर्व भेदाभेद केवळ इंद्रियांच्या विषय-तृष्णेने भासतात. जेथे विषयांची प्रिती आहे, तेथे मुक्ती राहू शकत नाही. जेथे मनात स्त्री-पुरुष हा भेद निर्माण होतो, तेथे ब्रह्मज्ञान प्रवेश करु शकत नाही. धुळीच्या एका कणाने भरलेला डोळा शरीराला दु:ख देतो, तसाच विषयाचा अत्यल्प संसर्गसुध्दा संसारबंधनास कारणीभूत ठरतो. यासाठी साधकाने विषयतृष्णेचा सर्वस्वी त्याग करून नंतरच साधनेला सुरवात करावी. या विवेकानंतरच वैराग्य येते हे ज्ञान गुरूंकडून प्राप्त होते. सद्गुरुंकडून मिळालेली ज्ञानशक्ति, विषयवासनांपासून मुक्त झालेले मन हेच अभेद भक्तिचे मुख्य लक्षण आहे असे एका जनार्दनी म्हणतात.


४३

हीचि दोनी पै साधने । साधके निरंतर साधणे ।
पर-द्रव्य पर-नारी । यांचा विटाळ मने धरी ।
नको आणिक उपाय । सेवी सद्गुरूचे पाय ।
म्हणे एका जनार्दनी । न लगे आन ते साधन ।

भावार्थ:

परक्याचे धन आणि परस्त्री या दोन गोष्टींचा मोह टाळण्याचा सतत अभ्यास व सद्गुरूंची निरंतर सेवा याशिवाय अन्य कोणत्याही साधनाची गरज नसल्याचे संत एकनाथमहाराज आवर्जून सांगतात.


४४

कनक कांता न ये चित्ता । तोचि परमार्थीं पुरता ।
हेचि एक सत्य सार । वाया व्युत्पत्तीचा भार ।
वाचा सत्यत्वे सोवळी । येर कविता ओवळी ।
जन तेचि जनार्दन । एका जनार्दनी भजन ।

भावार्थ:

परमार्थ हा शब्द कोणत्या मूळ धातूपासून निर्माण झाला, त्याचा अर्थ काय यांचा व्यर्थ उहापोह करण्यापेक्षा परमार्थी कसा ओळखावा हे जाणून घेणे अधिक उद्बोधक आहे. कनक (धनसंपत्ती) व कांता (स्त्री-सौख्य) याविषयी ज्याच्या चित्तात मोह निर्माण होत नाही तो परमार्थी समजावा असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, सत्य हेच केवळ सार असून वाचेने सत्यवचन बोलणे हेच शुध्दपणाचे लक्षण असून जन हेच जनार्दनाचे रुप आहे, जनसेवा हीच ईश्वरसेवा होय.


४५

रस सेविण्यासाठी । भोगवी जन्माचिया कोटी ।
रसनेअधीन सर्वथा । रसनाद्वारे रस घेता ।
जव रसना नाही जिंकिली । तंव वाउगीच बोली ।
एका जनार्दनी शरण । रस रसना जनार्दन ।

भावार्थ:

जिवात्मा रसनेच्या अधीन राहून जिव्हेद्वारा सर्व रसांचा आस्वाद घेतो. या रसमयतेचे सेवन करण्यासाठी तो अनेकदा जन्म-मरणाच्या बंधनात अडकतो. ज्याचे जिभेवर बंधन नाही (बोलण्यात) त्याचे बोल पोकळ आहेत असे समजावे. जनार्दनस्वामी शरणागत संत एकनाथ म्हणतात, रस व रसना दोन्ही जनार्दनाचे रुप आहे.


४६

पक्षी अंगणी उतरती । ते का गुंतोनि राहती ।
तैसे असावे संसारी । जोवरी प्राचीनाची दोरी ।
वस्तीकर वस्ती आला । प्रात:काळी उठोनि गेला ।
शरण एका जनार्दन । ऐसे असतां भय कवण ।

भावार्थ:
दाणे टिपण्यासाठी पक्षी अंगणांत येतात, पण ते तेथे गुंतून राहात नाहित. संसारिकांनी संसारात असे राहावे जसा वाटसरू एका रात्रीच्या निवाऱ्यासाठी धर्मशाळेत उतरतो आणि सकाळी निघून जातो. जनार्दनस्वामींना शरणागत असलेले संत एकनाथ म्हणतात, अशा प्रकारे निष्काम वृत्तिने जन्ममरणाचे भय संपते.


टाकावयाच्या गोष्टी : अविश्वास, अभिमान ममत्व

४७

अविश्वासा घरी । विकल्प नांदे निरंतरी ।
भरला अंगी अविश्वास । परमार्थ तेथे भूस ।
सकळ दोषांचा राजा । अविश्वास तो सहजा ।
अविश्वास धरिला पोटी । एका जनार्दनी नाही भेटी ।

भावार्थ:

अविश्वास हा सर्व दोषांमधला सर्वात अपायकारक दोष समजला जातो. ज्याच्या मनात इतरांबद्दल अविश्वास असतो त्याचे मन अनेक प्रकारच्या संशयाने, विकल्पाने ग्रासलेले असते. तेथे आत्मविश्वासाचा अभाव असून सद्गुरूंविषयी श्रध्दा निर्माण होऊ शकत नाही. जेथे श्रध्दा नाही, तेथे परमार्थ सुदृढ होणे शक्य नाही; असे एका जनार्दनी म्हणतात.


४८

अविश्वासा पुढे । परमार्थ कायसें बापुडे ।
अविश्वासाची राशी । अभिमान येतसे भेटीसी ।
सदा पोटी जो अविश्वासी । तोचि देखे गुण-दोषांसी ।
सकळ दोषा मुकुटमणी । अविश्वास तोचि जनी ।
एका जनार्दनी विश्वास । नाही त्यास भय काही ।

भावार्थ:

मनातील अविश्वासामुळे अभिमान निर्माण होतो. अहंकाराने इतरांचे गुण-दोष पहाण्याची वृत्ती बळावते, त्यामुळे परमार्थाची हानी होण्याची भिती वाढते. एका जनार्दनी सांगतात की ज्याचा गुरुवचनावर पूर्ण विश्वास असतो, तो कोणत्याही भयापासून मुक्त होतो.


४९


एक नरदेह नेणोनि वाया गेले । एक न ठके म्हणोनि उपेक्षिले ।
एकांते गिळले । ज्ञान-गर्वे ।
एक ते साधनी ठकिले । एक ते करू करू म्हणतचि गेले ।
करणे राहिले । ते तैसें
ज्ञाने व्हावी ब्रह्म-प्राप्ति । ते ज्ञान वेंची विषयांसक्ती ।
भांडवल नाही हाती । मा मुक्ति कैची ।
स्वप्नींचेनि धने । जागृती नोहे धर्म ।
ब्रह्माहमस्मि समाधान । सोलीव भ्रम ।
अभिमानाचिया स्थिती ब्रह्मादिका पुनरावृत्ति ।
ऐसी वेद-श्रुति निश्चये बोले ।
एका जनार्दनी । एकपण अनादि ।
अहं आत्मा तेथे । समूळ उपाधी ।

भावार्थ:

काही साधक मानवी देहाचे महत्त्व समजून न घेतल्याने, काही ज्ञानाचा गर्व झाल्याने, तर काहीची उपेक्षा झाल्याने वाया गेले. काही अयोग्य पद्धतीने साधना केल्याने फसले, तर काही निश्चय दृढ नसल्याने किंवा आळस बळावल्याने साधनेत प्रगती करु शकले नाहीत. ब्रह्मप्राप्ति व्हावी यासाठी जे ज्ञान संपादन केले ते इंद्रियसुखाच्या शोधात खर्च करून ज्ञानरुपी भांडवल गमावून काही मुक्तिला पारखे झाले. मी ब्रह्मरुप आहे हे जाणून त्यातून समाधान मानणे, हा केवळ भ्रम आहे असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, अभिमानाने ब्रह्मादिक (ब्रह्मा, विष्णू, महेश आदि) देवांचेसुध्दा स्वर्गातून पतन होते असे वेद-श्रुती वचन आहे. मी देह नसून आत्मरुप आहे, हे अनादी तत्व जाणून उपाधीरहित होणे अधिक श्रेयस्कर आहे.


५०


लोखंडाची बेडी तोडी । आवडी सोनियाची घडी ।
मी ब्रह्म म्हणता अभिमान । तेथे शुध्द नोहे ब्रह्मज्ञान ।
जैसी देखिली जळ-गार । शेवटी जळचि निर्धार ।
मुक्तपणे मोला चढले । शेवटी सोनियाचे फांसा पडिले ।
एका जनार्दनी शरण । बध्द-मुक्तता ऐसा शीण ।

भावार्थ:

लोखंडाची बेडी तोडून आवड म्हणून सोन्याची बनवली, तरी ते शेवटी बंधनकारकच आहे. मी ब्रह्म आहे हे शुध्द ज्ञान नसून केवळ अभिमान आहे, जसे मेघातून पडलेल्या गारा हे पाण्याचेच घनरुप आहे. असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, मुक्तीसाठी साधना केल्याने लोकांकडून लौकिक मिळाला पण तो सोन्याच्या बंधनात सापडून वाया गेला. बंधन आणि मुक्तता हा केवळ जाणिवेचा शीण आहे.


५१

मी एक शुचि । जग हे अपवित्र । कर्मचि विचित्र । ओढवले ।
देखत देखत । घेत असे विख । अंती ते सुख । केवी होय ।
अल्पदोष ते । अवघेचि टाळी । मुखे म्हणे । सर्वोत्तम बळी ।
अभिमाने अशुचि । झालासे पोटी । एका जनार्दनी । नव्हेचि भेटी ।

भावार्थ:

विषाची परिक्षा घेऊनही जाणूनबुजून ते विष प्राशन करणे हे विचित्र कर्म आहे, त्यातून शेवटी कोणतेही सुख लाभणार नाही. अभिमानाची बाधा विषासारखी घातक असून मीच तेवढा पवित्र आणि बाकी सर्व जग अपवित्र असे समजून वागल्याने साधकाचे मन अशुध्द बनते आणि तो गुरु-उपदेशाला अपात्र ठरतो, असे एका जनार्दनी प्रतिपादन करतात.


५२
ममता ठेवुनी घरी-दारी । वाया का जाशी बाहेरी ।
आधी ममत्व सांडावे । पाठी अभिमाना खंडावे ।
ममता सांडी वाडे कोडे । मोक्ष-सुख सहजी घडे ।
एका जनार्दनी शरण । ममता टाकी निर्दाळून ।

भावार्थ:

साधक मोक्ष-मुक्तीसाठी प्रयत्न करीत असतांना मोह आणि ममता त्याला बंधनकारक होतात. सगे-सोयरे, नातेवाईक, पत्नी, पुत्र आणि कन्या यांच्या ममतेमध्ये तो मनाने गुंतून पडतो. तसेच घरदार, संपत्ती, सांसारिक सुख यांचा मोह असतो. एका जनार्दनी म्हणतात, हे ममत्व आधी सोडून नंतर अभिमानाचा त्याग केल्यास मोक्ष-सुख सहज साध्य होते.


५३


मोह ममता ही समूळ नाशावी । तेव्हाचि पावावी चित्तशुध्दी ।
चित्तशुध्दि झालिया । गुरुचरण-सेवा । तेणे ज्ञानठेवा । प्राप्त होय ।
एका जनार्दनी । प्राप्त झाल्या ज्ञान । ब्रह्म परिपूर्ण अनुभवेल ।

भावार्थ:

मोह-ममतेचे पूर्ण निरसन झाल्यानंतर साधकाचे चित्त शुद्ध होते. हे शुध्द झालेले चित्त गुरुसेवेत पूर्ण रममाण होते. त्यामुळे गुरुकृपा होऊन ज्ञानप्राप्ती होते. एका जनार्दनी सांगतात, गुरुकृपेने संपूर्ण ब्रह्मज्ञान होऊन ते प्रत्यक्ष अनुभवता येते.


जगात वागतांना घ्यावयाची काळजी

५४


मत्सर ज्ञानियाते न सोडी । मा इतर कायसी बापुडी ।
शिणताती मत्सर-वेधे । भोगिताती भोग विविधे ।
एका जनार्दनी मत्सर । तेणे परमार्थ पळे दूर ।

भावार्थ:

अत्यंत ज्ञानी साधकसुध्दा मनातील मत्सराला बळी पडतो. मत्सराने ज्याच्या मनाला वेधून टाकले आहे अशा ज्ञानी साधकाला अनेक भोग भोगावे लागतात, तर इतर सामान्य माणसाला किती यातना भोगाव्या लागत असतील याची कल्पनाच करता येत नाही. एका जनार्दनी म्हणतात, मत्सराने व्यापलेले मन परमार्थाचा विचार करु शकत नाही.


५५


लज्जा अभिमान टाकुनी परता । परमार्थ सरता करी का रे ।
वादक निंदक भेदक । ऐसे त्रिविध । यांचा टाकुनी भेद । भजन करी ।
एका जनार्दनी त्रिविधा परता । होउनी परमार्था हित करी ।

भावार्थ:
जगामध्यें वादक, निंदक (निंदा करणारे) व भेदक (मनात भेद निर्माण करणारे) असे त्रिविध प्रकारचे लोक असतात. ते भोळ्या भाविक भक्तांचा बुध्दीभेद करुन, निंदा करुन त्यांना भक्तीमार्गापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा विचार करुन भक्तांनी परमार्थ-मार्ग सोडू नये. लज्जा, अभिमान यांचा त्याग करुन भक्तिमार्गावर श्रध्दा ठेवावी व स्वत:चे हित साधावे, असा उपदेश एका जनार्दनी करतात.


५६


विवाद-वाद हे तो अधम लक्षण । भक्तीचे कारण न साधे येणे ।
मुख्य एक करी एकविधपण । सम-दरुशने देख जगी ।
नर अथवा नारी असो भलते याती । वंदावे विभूति म्हणोनिया ।
एका जनार्दनी बोध धरी मना । होऊनिया सान सानाहूनि ।

भावार्थ:
वाद-विवाद करणे हे नीचपणाचे (अधम) लक्षण आहे. त्यामुळे परमार्थ हे भक्तीचे मूळ साधन साध्य होणार नाही. मतभिन्नतेपेक्षा समदर्शत्व (सर्वत्र समभावाने पाहणे) अधिक श्रेयस्कर आहे, असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, स्त्री-पुरुष, जातिभेद न मानता सर्व एकाच परमेश्वराच्या विभूति आहेत असे समजून वंदनीय मानाव्यात. विनम्रता धरुन सर्वांना आपलेसे करावे हा बोध मनी धरावा.


५७


ब्रह्म एक परिपूर्ण । तेथे नाही दोष-गुण ।
पराचा देखती जे दोष । तेचि दोषी महा-दोष ।
गुण-दोष जे देखती । एका जनार्दनी नाडती ।

भावार्थ:

ब्रह्म हे परिपूर्ण असून ते गुणदोषरहित आहे. तेथे गुण-दोषांचा संपूर्ण अभाव असल्याने इतरांचे दोष पहाणे हा महादोष आहे व जे दुसऱ्यांचे दोष बघतात ते महादोषी आहेत असे समजावे, असे एका जनार्दनी सांगतात.


५८


देह-बुद्धि सांडी कल्पना दंडी । वासनेची शेंडी वाढवू नको ।
तु तेचि पाही तु तेचि पाही । पाहूनिया राही जेथीचा तेथे ।
तु ते तूचि पाही जेथे देहो नाही । मीपणे का वाया गुंतलासी ।
एका जनार्दनी मीपण तूपण । नाही नाही मज तुझीच आण ।
भावार्थ:

आपण आत्मरुप नसून देह-रुप आहोत ह्या देहबुध्दिचा त्याग करावा, कारण देहबुध्दिमुळे इंद्रियांच्या वासना निर्माण होतात व त्यातून जन्म-मृत्यूचे चक्र चालूच राहते. मीपणाने त्यात गुंतून पडतो. हे मी-तूपण द्वैत निर्माण करुन परमेश्वरी तत्वापासून साधकाला अलग करते. एका जनार्दनी सांगतात, आपणच आपल्याला ओळखावे.


५९


सर्वांभूती देव वसे । नीचाठायी काय नसे ।
नीच कोठुनी जन्मला । पंचभूतांवेगळा झाला ।
नीच म्हणोनि काय भुली । एका जनार्दनी देखिली ।

भावार्थ:

विश्वातिल सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी परमेश्वर अंशरुपाने व्यापून राहिला आहे असे पारमार्थिक सत्य सांगते. असे असतांना नीचयोनीत किंवा जातीत जन्माला येणाऱ्यांच्या ठिकाणी परमेश्वर वसत नाही असे समजणे म्हणजे फार मोठी चूक करणे आहे असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, सर्व प्राण्यांची निर्मिती आकाश, पृथ्वी, वायू, जल, अग्नी या पंचमहाभूतातून झाली आहे हे शास्त्र-वचन आहे, तर नीच यापासून वेगळा असू शकणार नाही.


६०


थोर तोचि म्हणावा । नेणे भूतांचा जो हेवा ।
लहान तोचि म्हणावा । काया वाचा भजे देवा ।
एका जनार्दनी म्हणे । देवावाचुनी काही नेणे ।

भावार्थ:
परमेश्वरीसृष्टीतील कोणत्याही प्रकारच्या श्रेष्ठ किंवा कनिष्ठ प्राण्यांचा जो हेवा करीत नाही, तो थोर (मोठ्या मनाचा) समजावा आणि जो देहाने, वाचेने, मनापासून देवाचे निरंतर भजन करतो त्याला विनम्र (लहान) म्हणावे; असे सांगून एका जनार्दन म्हणतात, देवावाचून कोणी काही जाणू शकत नाही.


६१


आम्ही ब्रह्मपुरीचे ब्राह्मण । जाती कुळ नाही लहान ।
आम्हा सोवळे ओवळे नाही । विटाळ न देखो कवणे ठायी ।
आम्हा सोयरे जे झाले । ते जाती-कुळा वेगळे केले ।
एका जनार्दनी बोधु । जाती-कुळाचा फिटला संबंधु ।

भावार्थ:

एका जनार्दनी येथे अभिमानाने सांगतात की आम्ही ब्रह्मपुरीचे ब्राह्मण आहोत, थोर कुळात जन्मलो आहोत. शुध्द विचारांमुळे सोवळ्या-ओवळ्याच्या संकुचित कल्पनांपासून दूर असल्यामुळे कोणाचाही विटाळ मानत नाही. जाती-कुळाच्या अनिष्ट रुढी ज्यांना मान्य नाहीत अशा सज्जनांशी सोयरिक असल्याने जाती-कुळाचा संबंधच फिटला आहे.


६२

काम क्रोध लोभ दंभ मद मत्सर ।
षड्वैरी तत्पर हेचि येथे ।
क्षुधा तृषा मोह शोक जरामरण ।
षड्ऊर्मि पूर्ण देही हेचि ।
आशा मनीषा कल्पना इच्छा तृष्णा वासना ।
हे अठरा गुण जाणा देहामाजी ।
एका जनार्दनी त्यजुनि अठरा ।
तोचि संसारामाजी शुध्द ।

भावार्थ:
अनिवार वासना, रागीटपणा, हावरटपणा, दांभिकपणा, गर्विष्टपणा, मत्सर हे माणसाचे सहा शत्रू असून ते माणसाचा विनाश करण्यासाठी अत्यंत तत्पर असतात. भूक, तहान, मोह, शोक, वार्धक्य या सहा माणसाच्या नैसर्गिक ऊर्मी आहेत. आशा (भविष्यकालीन इच्छा) मानसिक इच्छा, कल्पना, शारिरीक वासना, अनावर ओढ असे अठरा मानवी देहाचे गुण आहेत असे समजावे. या अठरा गुणांचा त्याग करणारा या जगात शुध्द, सात्विक समजला जातो, असे एका जनार्दनी या भजनात स्पष्ट करतात.


मनोजय

६३
बैसता निश्चळ । मन करी तळमळ ।
ध्यान-धारणा ते विधि । मने न पावेचि सिध्दि ।
ऐशिया मना काय करावे । कोठे निवांत बैसावे ।
एका जनार्दनी शरण । मन धावे सहजपणे ।

भावार्थ:

मन हे अत्यंत चंचळ असून ते सतत सहजपणे एका ठिकाणावरून दुसर्‍या ठिकाणी भरकटत असते, तळमळत असते. ध्यानधारणा यासारख्या विधिंमध्ये मन एकाग्र होत नाही, त्यामुळे ध्यानधारणेतून् सिध्दी प्राप्त होत नाही. अशा चंचळ मनाला कोणत्या उपायाने एकाग्र करावे हे समजत नाही. जेथे मनाला निवांतपणा लाभेल असे ठिकाण सापडत नाही. एका जनार्दनी म्हणतात, गुरुचरणांपाशी मात्र हे मन सहजपणे धाव घेऊन स्थिर होते.


६४
शत्रु असती दूर देशी । येता बहु दिवस लागती तयांसी ।
बाह्य शत्रुंचे अल्पं दु:ख । मन: शत्रुंचे वर्म अशेख ।
आसनी शयनी एकांती । जगी अथवा ध्यान-स्थिती ।
ऐशिया मना न जिंकिता । देवपण न ये हाता ।
देवपणाचे भुलले हावे । एका जनार्दनी नेणती देव ।

भावार्थ:

बाह्य शत्रू आपल्यापासून दूर असतात, त्यांना जवळपास येण्यास काही कालावधी लागतो, बाह्य शत्रुंचे भय काही प्रमाणात कमी वाटते. परंतु मनात असलेले अविवेक, अहंकार, संशय यासारख्या शत्रुंचे मूळ रहस्य समजत नाही. आसनावर बसलेले असतांना किंवा मंचकावर निद्रिस्त असतांना, एकांतात जप करीत असतांना किंवा ध्यानात असतांना या मनाला जिंकता न आल्यास देवपण येत नाही एका जनार्दनी म्हणतात. देवपणाचा हव्यास धरणारे देवालामात्र नीटपणे ओळखत नाहीत.


६५
वैर करूनि मन मारावे । मना-अधीन न व्हावे ।
मनामागे जाऊ नये । मन आकळूनि पाहे ।
मन म्हणे ते न करावे । मने मनासी बांधावे ।
मन म्हणेल ते सुख । परि पाहता अवघे दु:ख ।
एका जनार्दनी मन । दृढ ठेवावे आकळून ।

भावार्थ:

मनाचा शत्रू होऊन त्याचे दमन करावे, मनाच्या अधीन होऊ नये, मन सांगेल तसे आचरण करू नये. आपण मनामागे न जाता मनाला आपल्या बंधनात ठेवण्याचा प्रयत्न करावा. मनाला जे सुखाचे वाटते ते दु:खाचे कारण असू शकते. असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, मनाला निश्चयपूर्वक संयमाचे बांध घालावेत.


६६
माझ्या मनाचे ते मन । चरणी ठेवावे बांधून ।
मग ते जाऊ न शके कोठे । राहे तुमच्या नेहटे ।
मनासी ते बळ । देवा तुमचे सकळ ।
एका जनार्दनी देवा । मन दृढ पायी ठेवा ।

भावार्थ:

देवाने आपले मन त्याच्या चरणांशी दृढ करावे. त्यामुळे ते कोठेही जाऊ शकणार नाही, तर चरणकमळी गुंतून राहिल. मनाला एकाग्र करण्याची शक्ति केवळ एका परमेश्वराकडे आहे. देवाने कृपा करून मनोबल वाढवावे अशी प्रार्थना करतात.


६७
आम्ही अलकापुरचे जोशी । शकुन सांगू निश्चयेसी ।
तेणे चुकती चौऱ्यांशी । होरा ऐका दादांनो ।
नका जाऊ मनामागे । थोर-थोर झाले दगे ।
मी बोलत नाही वाउगे । सावध राहा दादांनो ।
वासना वाईट बा ही थोर । पुरविले लहान थोर ।
फिरती चौऱ्यांशी लक्ष घरे । पडाल फशी दादांनो ।
एका जनार्दनी जोशी । सांगेन शकून सर्वत्रांसी ।
राम-नाम वाचेसी । तेणे तरती विश्वासी दादांनो ।

भावार्थ:

एका जनार्दनी म्हणतात, आपण देवनगरीचे ज्योतिष असून या शास्त्रात निष्णात आहोत. ज्यामुळे चौऱ्यांशी लक्ष योनींचे फेरे चुकतिल असा होरा (भविष्यातील मार्ग) सुचवतो, चंचळ मनाच्या मागे गेल्याने फसवणूक होण्याची शक्यता असते. मनोवासना अतिशय वाईट असते असा अनुभव आहे. वाचेने सतत रामनामाचा जप केल्याने संसार सागरातून विश्वासाने तरून जाता येते, हा शकून सर्वांना कल्याणकारी आहे.


६८
सर्व भावे सुख असता घेई अनुताप । मग करी संकल्प भजनाचा ।
ऐसा अनुताप घडता मानसी । भजन ते मुखासी येत स्वभावे ।
एका जनार्दनी अनुतापेविण । भजन प्रमाण नोहे देवा ।

भावार्थ:
सर्व प्रकारची सुखे हात जोडून समोर असतांना परमेश्वरप्राप्तीसाठी जो कठोर साधना करतो, संसारातील दु:ख व क्लेष यांनी जो पोळला गेला आहे, ज्याला पश्चाताप झाला आहे तो साधक ईश्वरभजनाचा संकल्प करतो. त्याच्या वाणीतून सहजपणे भजन घडते. एका जनार्दनी म्हणतात, अनुतापाशिवाय घडलेले भजन देवाला मान्य होत नाही.


६९
अनुतापावाचूनि नाम न ये मुखा । वाउगाचि देखा शीण होय ।
मुख्य तो संकल्प अनुताप वाहे । मग चित्त होय शुध्द तेणे ।
अनुताप झालिया सहज समाधि । तुटेल उपाधी सहजचि ।
एका जनार्दनी अनुतापे पाहे । मग देव आहे जवळी तया ।

भावार्थ:

संसाराती तापाने होरपळलेला जीव पश्चातापदग्ध होतो, तेव्हा त्याच्या मुखातून हरीनामाचे भजन सहजपणे घडते. अनुतापातूनच भजनाचा संकल्प होतो, त्यामुळे चित्त शुध्द होते. अनुताप झाल्यावर ईश्वरभजनात मन तल्लीन होऊन सहज समाधि लागते आणि सर्व उपाधी (सर्व शीण, कष्ट) नाहिसे होतात, असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, अशा साधकाच्या जवळ देव सतत राहतो.


७०
देही वाढे जो जो शांति । तो तो विरक्ती अंगी बाणे ।
ऐसा आहे अनुभव । देही देव प्रकाशे ।
देही आत्मा परिपूर्ण । भरला संपूर्णची देही ।
एका जनार्दनी रिता ठाव । नाही वाव पाहता जगी ।

भावार्थ:
साधक सातत्याने साधना करीत असतांना मनाला शांतीचा अनुभव येऊ लागतो. या शांतीतून विरक्तिचा लाभ होतो आणि दैवीकृपेचा लाभ होवून देहातून दैवी गुण प्रकाशू लागतात असा अनुभव येतो. देहात आत्मतत्व संपूर्णपणे व्यापून राहिले आहे असा प्रत्यक्ष अनुभव येऊन विश्वातील प्रत्येक अणुरेणूत हे आत्मतत्त्व भरले असून कोठेही रिकामा ठाव नाही याची जाणिव होते, असे एका जनार्दनी म्हणतात.


७१
साधक सर्वदा पुसती । कोण बाधा चित्त-वृत्ती
एकचि गुण जे पुरता जोडे । ते एकविधा वृत्ति
एकचि न जोडे गुणावस्था । या लागी नोहे एकविधता
एका जनार्दनी पूर्ण । चित्त चैतन्य संपूर्ण

भावार्थ:

साधक नेहमीच असा प्रश्न विचारतात की, कोणत्या गुणांमुळे चित्तामध्ये बाधा निर्माण होऊन चित्त विचलित होते. या प्रश्नाला उत्तर देताना एका जनार्दनी सांगतात की एकच गुण पूर्णपणे आत्मसात करून एकविध वृत्ति वाढते. एकाच प्रकारची गुणावस्था जोडली गेली नाही, तर एकविधता साधली जात नाही. चित्त हे चैतन्याने पूर्णपणे भरलेले आहे.


७२
आंबेया पाडू लागला जाण । अंगी असे आंबटपण ।
सेजे मुरल्याची गोडी । द्वैताविण ते चोखडी ।
अग्नीपोटी निपजे अन्न । वाफ जिरता परमान्न ।
एका जनार्दनी गोडी । तोडा लिगाडाची बेडी ।

भावार्थ:

आंबा पाडाला लागला तरी त्याची चव आंबट असते. तो भट्टीत घालून पिकवला की गोड होतो. अग्नी देवून अन्न शिजवतात, पण वाफ जिरली की ते परमान्न होते. साधक साधनेत एकाग्र झाला, तेव्हाच परमेश्वराशी एकरूप होतो.

नाम-स्मरण आणि कीर्तन

नादमाधुर्य

७३

उदार धीर-निधि । श्रीविठ्ठल-नाम आधी ।
पतित-पावन सिध्दि । श्रीविठ्ठल-नाम आधी ।
सुख-सागर-निधि । श्रीविठ्ठल-नाम आधी ।
एका जनार्दनी बुध्दि । श्रीविठ्ठल-नाम आधी ।

भावार्थ:

जो औदार्य व धैर्य यांचा ठेवा आहे, अशा विठ्ठलाचे नामस्मरण आधी करावे. ज्याच्याकडे पतितांना पावन करणारी सिध्दि आहे, अशा विठ्ठलाला आधी स्मरावे. जो सुख देणारा सागरनिधी आहे, अशा विठ्ठलाचे नाम आधी जपावे. एका जनार्दनी म्हणतात, विठ्ठलनामस्मरण करण्याची बुद्धी सद्गुरूंकडे मागावी.


७४

आंबे केळी द्राक्ष-घडु । नामापुढे अवघे कडु ।
नाम गोड नाम गोड । हरि म्हणता पुरे कोड ।
गुळ साखर कायसी निकी । अमृताची चवी झाली फिकी ।
एका जनार्दनी पडली मिठी । चवी घेतली ती कधीच नुठी ।

भावार्थ:

विठ्ठलाच्या नामाची गोडी एकदा चाखली की त्यापुढे आंबे, केळी, द्राक्षे यांची गोडी अगदीच फिकी वाटते. नाम इतके गोड आहे की हरिउच्चारण करताच सर्व इच्छा पूर्ण होतात. गुळसाखरच काय, पण अमृताची चवसुध्दा हरिनामाच्या तुलनेत फिकी वाटते. एका जनार्दनी म्हणतात, हरिनामाच्या गाडीने जिभेला अशी मिठी पडते की एकदा चव घेता ती कधीच विसरत नाही.


७५

लौकिकापुरता नव्हे हा विभाग । साधले अव्यंग सुख-सार ।
अवीट विटेना बैसले वदनी । नाम संजीवनी ध्यानी-मनी ।
एका जनार्दनी भाग्य ते चांगले । म्हणोनि मुखा आले राम-नाम ।

भावार्थ:'

एका जनार्दनी म्हणतात, ज्याचे भाग्य चांगले असेल त्यालाच रामनामाचा छंद लागून मुखात सतत रामनामाचा जप असेल. रामनामाची अवीट गोडी निर्माण होईल. ध्यानी-मनी-स्वप्नी ही नामसंजीवनी वदनी वसेल. साधकाला निरंतर सुखाची प्राप्ती होईल, तो केवळ लौकिक व्यवहार उरणार नाही.


७६

गुंतला भ्रमर कमळिणी-कोशी । आदरे आमोदासी सेवितसे ।
तैसे राम-नामी लागता ध्यान । मन उन्मन होय जाण ।
एका जनार्दनी राम परिपूर्ण । प्रपंच परमार्थ रामचि जाण ।

भावार्थ:

मध सेवन करण्यासाठी गेलेला भ्रमर कमळफुलात गुंतून पडतो आणि अत्यंत आनंदाने आदरपूर्वक मधाचा आस्वाद घेतो. तसेच साधकाचे रामनामी ध्यान लागून मन उच्च पातळीवर स्थिर होते. मन रामनामात एकाग्र होऊन मनाची चंचलता नाहिसी होऊन त्याचे उन्मन होते. एका जनार्दनी म्हणतात, राम परिपूर्ण असून तोच प्रपंच व परमार्थ साधण्याचे साधन आहे.


७७

भुक्ती-मुक्तीचे कारण । नाही नाही आम्हा जाण ।
एक गाऊ तुमचे नाम । तेणे होय सर्व काम ।
धरिलिया मूळ । सहज हाती लागे फळ ।
बीजाची आवडी । एका जनार्दनी गोडी ।

भावार्थ:

रामनामात रंगलेला साधक नामसाधनेने भुक्ती, मुक्ती मिळेल किंवा नाही हे जाणत नाही. कारण साध्यापेक्षा त्याचे साधनेत मन गुंतलेले आहे. रामाचे नामस्मरण आणि किर्तन या साधनेतच त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. राममंत्र हे बीज असून त्याने मूळ धरले की फळ मिळणारच. एका जनार्दनी म्हणतात, फळापेक्षा बीजमंत्राची गोडी अवीट आहे.

नाम-सोलभ्य

७८

सेवेचे कारण मुख्य तो सद्भाव ।
इतर ते वाव इंद्रिय-बाधा ।
साधन हेचि साधी तोडी तू उपाधी ।
नको ऋध्दि-सिध्दि आणिक काही ।
नामाचा उच्चार मुख्य हेंचि भक्ति ।
एका जनार्दनी विरक्ती तेणे जोडे ।

भावार्थ:

मनातला भक्तिभाव हेच ईश्वरसेवेचे प्रमुख कारण आहे, बाकी सर्व केवळ उपाधी असून इंद्रियांना शीण देणाऱ्या आहेत. नामस्मरण हेच ईश्वरभक्तीचे खरे साधन असून ऋध्दि-सिध्दि यांपासून अलिप्त होऊन नामजपांत तल्लीन झाल्यानेच विरक्ती येईल असे एका जनार्दनी सांगतात.


७९

राम कृष्ण हरि । नित्य वदे जी वैखरी ।
तयापाशी नुरे पाप । नासे त्रिविध हा ताप ।
नाम तेचि पर-ब्रह्म। जप-यज्ञ तो परम ।
एका जनार्दन जपा । राम-कृष्ण मंत्र सोपा ।

भावार्थ:

राम कृष्ण हरि या नामाचा जो नित्य जप करतो तो खरा पुण्यवान समजावा, त्यांच्या मनात पापाचा लवलेशही राहात नाही. या साधकाचे आध्यात्मिक,आधिभौतिक,आधिदैविक असे तिनही ताप नाहिसे होतात.असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, नामजप श्रेष्ठ यज्ञ असून नाम हेच परब्रह्म आहे.राम-कृष्ण हा सोपा (सहज करण्यासारखा) मंत्र असून त्याचा नित्य जप करावा.


८०

कृतांताचे माथा देऊनिया पाय । वाचे नाम गाय अहर्निशी ।
उघडा रे मंत्र उघडा रे मंत्र । शिव जपे स्तोत्र राम-नाम ।
एका जनार्दनी न करी आळस । चौऱ्यांशीचा लेश नको भोगू ।

भावार्थ:

राम-नाम जप हा अतिशय सहज-सुलभ मंत्र आहे. समजण्यास सोपा व उच्चारण करण्यास सुलभ असून राम-नामाचा जपाचे स्तोत्र शिवशंकर सदैव गातात असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, रामनामाचा जप करण्यात साधकांनी आळस करु नये, कारण चौर्यांशी लक्ष जन्म-मरणाचे फेरे चुकवणारा हा अगाध मंत्र आहे. रात्रंदिवस वाचेने रामजप करणारा भक्त कळीकाळाला जिंकू शकतो.


८१

देवासी तो प्रिय एक नाम आहे । म्हणोनि तू गाये सदोदित ।
कळा हे कौशल्य अवघे विकळ । मंगळ मंगळ रामनाम ।
एका जनार्दनी नाम मुखीं गाता । मुक्ति सायुज्यता पाठी लागे ।

भावार्थ:

साधकाने देवाच्या नामाचा अखंड जप करावा. कारण देवाला एकच गोष्ट अत्यंत प्रिय आहे, ती म्हणजे त्याचे नाम. कोणतीही कला किंवा कौशल्य हे अपूर्ण आहे, रामनाममात्र मंगलदायी, पवित्र आहे. एका जनार्दनी म्हणतात, सायुज्य मुक्ती ही सर्वश्रष्ठ मुक्ती असून मुखाने नाम गाणाऱ्या साधकाला सायुज्यता प्राप्त होते.


८२

अबध्द पढता वेद बाधी निषिध्द ।
अबध्द नाम रडता प्राणी होती शुध्द ।
अबध्द मंत्र जपता जापक चळे ।
अबध्द नाम जपता जड मूढ उध्दरले ।
स्वधर्म कर्म करिता पडे व्यंग ।
विष्णु-स्मरणे ते समूळ होय सांग ।
एका जनार्दनी नाम निकटी ।
ब्रह्मानंदे भरली सृष्टी ।

भावार्थ:

न समजता अशुध्द उच्चारपध्दतीने वेदांचे वाचन निषिध्द, बाधक मानतात. परंतु नामजपाला शुध्दाशुध्देचे कोणतेही बंधन नाही, नामाने प्राणी शुध्द होतो. चुकीच्या पध्दतीने मंत्राचे पठण केले तर साधक बुध्दीभ्रष्ट होतो तर अजाणता नामजप केला तरी मूर्खच नव्हे तर जड (अचेतन) सुध्दा उध्दरुन जातात. स्वधर्माचे आचरण करतांना काही उणिवा राहून जातात, परंतु विष्णुस्मरणाने सर्व मुळापासून पवित्र होते असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, नामाच्या सान्निध्यात सर्व सृष्टी ब्रह्मानंदाने भरून जाते.

नाम-माहात्म्य

८३

सर्वांमाजी सार नाम विठोबाचे । सर्व साधनांचे घर जे का ।
शुकादिका नाम साधिलेसे दृढ । प्रपंच-काबाड निरसिले ।
एका जनार्दनी जनी ब्रह्म-नाम । तेणे नेम धर्म सर्व होय ।

भावार्थ:

विठोबाचे नाम हे सर्व साधनांचे सार आहे, सर्व साधना जेथे फलदायी होऊ शकतात असे धाम म्हणजे विठोबाचे नाम. शुक, सनकादिक ऋषी नामावर दृढ श्रध्दा ठेवून प्रपंचाच्या बंधनापासून मुक्त झाले. एका जनार्दनी म्हणतात, सामान्य जनांसाठी नाम हेच ब्रह्म असून नामाने सर्व धर्म साध्य होतात.


८४

संसार-सागरी बुडलिया प्राणी । करी सोडवणी कोण त्याची ।
अविद्यादी पंचक्लेश हे तरंग । बुडाले सर्वांग प्राणियांचे ।
एका जनार्दनी उच्चारील नाम । सुखाचा आराम प्राप्त होय ।

भावार्थ:

संसार-सागरात अविद्येसारखे पाच प्रकारांचे क्लेश-तरंग उसळत असतात. त्यांत प्राण्याला बुडण्याचे भय सतत भेडसावत असते. संसारसागरात बुडणाऱ्या प्राण्याला हात देवून सोडवणारे फक्त नामच आहे असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, जो परमेश्वराच्या नामाचा मनापासून वैखरीने जप करतो त्याला सुख-शांति प्राप्त होते.


८५

ओखद घेतलिया पाठी । जेवी होय रोग-तुटी ।
तैसे घेता राम-नाम । नुरे तेथे क्रोध-काम ।br> घडता अमृत-पान । होय जन्माचे खंडन ।
एका जनार्दनी जैसा भाव । तैसा भेटे तया देव ।

भावार्थ:

औषध घेतल्यानंतर ज्याप्रमाणे शारिरीक व्याधींचे निराकरण होते किंवा अमृत प्राशन करताच अमरपद प्राप्त होऊन जन्ममरणाच्या चक्रातून सुटका होते, त्याप्रमाणे राम-नाम हे अत्यंत प्रभावशाली औषध किंवा अमृत आहे असे समजावे. राम-नाम रुपी रसाने मनातिल काम क्रोधादि विकारांचा निचरा होतो असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, जशी ज्याची श्रध्दा तशी त्याच्यावर देवाची कृपा होते.


८६

आपुले कल्याण इच्छिणे जयासी । तेणे या नामासी विसंबू नये ।
करील परिपूर्ण मनाचे हेत । ठेवलिया चित्त नामापाशी ।
भक्ति आणि मुक्ति वोळंगती सिध्दि । होईल ही बुध्दि आत्मनिष्ठे ।
एका जनार्दनी जाता हे नाम । पुरवील काम जो जो हेतु ।

भावार्थ:

ज्या साधकाला आपले कल्याण साधायचे असेल त्याने हे नामाचा जप करण्याचा आळस करू नये. हे नाम चित्तात सतत धारण केल्याने मनातील सर्व हेतू पूर्ण होतील. भुक्ति आणि मुक्ति या सिध्दि पायाशी लोटांगण घालतील, बुध्दी देहनिष्ठा सोडून आत्मनिष्ठ बनेल. या नामाचा जप करणाऱ्या साधकाच्या सर्व कामना पूर्ण होतील असे एका जनार्दनी खात्रीपूर्वक सांगतात.


८७

नाही जया भाव पोटी । तया चावटी वाटे नाम ।
परी येता अनुभव । चुकवी हाव संसार ।
येरझारी पडे चिरा । नाही थारा जन्माचा ।
एका जनार्दनी खंडे कर्म । सोपे वर्म हाता लागे ।

भावार्थ:

ज्याची परमेश्वराच्या नामावर श्रध्दा नाही, मनात भक्तिभाव नाही त्याला नाम निरर्थक वाटते. परंतु अनुभवांती नामस्मरणात संसारातील ऐहिक इच्छा चुकवण्याचे सामर्थ्य आहे, जन्म-मरणाच्या वाटेवर धोंडा पडतो आणि जन्माचा थारा राहात नाही. एका जनार्दनी म्हणतात, जन्ममरणाचे मुळ कारण कर्म असून त्याचे खंडन नामस्मरणाने होते हे रहस्य जाणून घेतले पाहिजे.


८८

विठ्ठल म्हणता विठ्ठलचि होसी । संदेह ये विशी धरू नको ।
सागरी उठती नाना पै तरंग । सिंधु तो अभंग विठ्ठल एक ।
तैसे मन करी द्वैत न धरी । सर्व चराचरी विठ्ठल एक ।
एका जनार्दनी विठ्ठलावाचूनि । दुजा नेणो कोणी स्वप्नी आम्ही ।

भावार्थ:

सागरांत अनेक तरंग उमटतांना दिसतात. परंतु त्या तरंगांनी सिंधुचे एकत्व भंगत नाही, तो सागर अभंग असतो. तसा विठ्ठल नाना रुपांनी चराचरांत प्रतिबिंबीत होत असला; तरी तो एकमेवाद्वितीय, अभंग आहे असे सांगून एका जनार्दनी म्हणतात; मनांत द्वैतभाव न आणता एका विठ्ठलाशिवाय दुसरा कोणी आहे, अशी कल्पना स्वप्नातदेखिल करू नये. विठ्ठलाचे नाम घेता-घेता त्या चराचरांत व्यापून राहिलेल्या विठ्ठलाशी एकरुप होशील यात संदेह धरु नये.


८९

लोह परिसासी झगटे । मग काळिमा कैची भेटे ।
तैसे विनटो राम-नामा । पहिलेपण कैचे भेटे ।
गंगा मीनली सागरी । परतेना ती ब्रह्म-गिरी ।
एका जनार्दनी भेटी । चौ देहाची सुटे गाठी ।

भावार्थ:

लोखंड परिसाच्या सान्निध्यात आले की, त्याचा काळिमा लोपून त्याच्यात परिसाचे गुणधर्म येतात. गंगेचा प्रवाह सागराला जाउन मिळाला की, तो उगमस्थाकडे परत येत नाही. तसे मन एकदा रामनामी गुंतले की ते फिरुन संसारिक व्यापात गुंतत नाही. असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, परमेश्वरी कृपेने जेव्हा सद्गुरूंची भेट होते तेव्हा स्थूल, सूक्ष्म कारण, महाकारण या चारी देहाच्या गाठी सुटून देहबुध्दी लयास जाते.

नामावर विश्वास

९०

जनार्दने मज सांगितला मंत्र । रामनाम पवित्र जप करी ।
सोडवील राम संसार-साकडी । ना पडेचि बेडी अरिवर्गा ।
एका जनार्दनी टाकूनि संशय । नाम मुखी राहो प्रेम पोटी ।

भावार्थ:

जनार्दनस्वामींनी राममंत्र देवून रामनामाचा पवित्र जप करण्यास सांगितले. संसार-संकटापासून राम सुटका करतील आणि काम, क्रोध, मोह, लोभ, मत्सर या षड्रिपुंची बेडी तुटून पडेल. एका जनार्दनी म्हणतात, मनातील सर्व संशय टाकून हृदयात प्रेम व मुखी रामनामाचा जप असावा.


९१

असंख्य वचने असोनि नसती । कोण तया रीती चालतसे ।
हरि-नाम वचन एकचि प्रमाण । हे तो अप्रमाण करील कोण ।
जनार्दनाचे वचना द्यावे अनुमोदन । एका जनार्दन प्रमाण तेचि ।

भावार्थ:

भक्तिमार्गावरुन वाटचाल करतांना अनेकांची असंख्य उपदेशपर वचने ऐकावयास मिळतात. ती सर्वच आचरणात आणणे शक्य नसते असा अनुभव येतो. हरिनाम वचन हेच प्रमाण मानले जाते. ते कोणीही अमान्य करीत नाही. एका जनार्दनी म्हणतात, सद्गुरूवचनास प्रमाण मानून, त्यास अनुमोदन देऊन त्याचा स्वीकार करावा.


९२

जागृती स्वप्नं सुषुप्ती माझारी । जपे नाम हरि सर्व काळ ।
साधन आणिक न लगे सकळ । रामनाम निखळ जपे आधी ।
पापाचे पर्वत छेदी नाम-वज्र । हाचि निर्धार ऋषीश्वर ।
एका जनार्दनी नाम निज-धीर । पावन साचार राम-नाम ।

भावार्थ:

जागेपणी, स्वप्नी व गाढ झोपेत असताना सतत हरिनामाचा जप अखंडपणे सुरू ठेवावा. हेच परमेश्वर प्राप्तीचे एकमेव साधन आहे, याशिवाय वेगळ्या साधनाची गरज नाही. अनंत पापांचे पर्वत छेदून टाकण्याचे सामर्थ्य या नामरुपी वज्रात (अमोघ शस्त्र) आहे असे थोर ऋषी सांगतात. नाम हे आत्मधैर्य देणारे साधन असून ते मनाला पावन करते असे एका जनार्दनी सांगतात.


९३

चिंतातुर मन नसावे कदा काळी । हृदयी नामावळी जप करी ।
वारंवार चिंतावी देवाची पाउले । जेणे जन्म जाळे उकलेल ।
एका जनार्दनी आलासे प्रत्यय । सर्व भावे गाय नाम त्याचे ।


भावार्थ:

मनातील सर्व चिंता सोडून देऊन अंत:करणात नामाचा सतत जप करावा आणि वारंवार देवाच्या पावलांचे चिंतन करावे. अत्यंत भक्तिभावाने देवाला आळवावे असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, त्यामुळे जन्माचे जाळे उकलून त्यातून सुटका होईल याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन पहावा.

९४

चिंतने नासतसे चिंता । चिंतने सर्व कार्य ये हाता ।
चिंतने मोक्ष सायुज्यता । घर शोधितसे ।
ऐसें चिंतनाचे महिमान । तारिले अधम खल जन ।
चिंतने समाधान । प्राणिमात्रा होतसे ।
चिंतने तुटे आधि-व्याधि । चिंतने तुटतसे उपाधि ।
चिंतने होय सर्व सिध्दि । एका जनार्दनाचे चरणी ।

भावार्थ:

येथे एका जनार्दनी ईश्वरचिंतनाचे महत्त्व सांगत आहेत. चिंतनाने सर्व चिंताचा परिहार होतो. चित्त शुध्द होऊन सायुज्यता मुक्तीचा लाभ होतो व प्राणिमात्रांचे समाधान होते. चिंतनाने शरिराच्या व्याधी व मनाच्या व्यथांचा निरास होतो. चिंतनाने जीवनातील सर्व कटकटी मिटून जातात व सर्व कार्ये सिध्दीस जातात. अनेक दुष्ट व पापी लोकांचा उद्धार केवळ ईश्वरचिंतनाने होतो असा अनुभव आहे.

९५

घाली देवावरी भार । आणिक न करी विचार ।
योगक्षेम निर्धार । चालवील तुझा ।
वाचे नाम नामावळी । वासुदेवी वाहे टाळी ।
प्रेमाचे कल्लोळी । नित्यानंदे सर्वदा ।
सोस घेई का रे वाचे । राम-कृष्ण वदता साचे ।
धरणे उठते यमाचे । नि:संदेह ।
शरण एका जनर्दनी । करी राम-नाम-ध्वनि ।
कैवल्याचा दानी । रक्षिल तुज ।

भावार्थ:

साधकाने देवावर विश्वास ठेवून भविष्याचा विचार न करता परमेश्वराच्या भक्तीत तल्लीन व्हावे. देव सर्व योगक्षेम चालविल अशी खात्री बाळगावी. ईश्वरप्रेमात रंगून सतत भजनात दंग व्हावे. वाचेने राम-कृष्णाच्या नामाचे संकिर्तन करीत असताना यमयातना चुकतील. स्वामी जनार्दनांना शरणागत असलेले संत एकनाथ म्हणतात, श्रीराम कैवल्याचा दानी असून केवळ नामस्मरण केल्याने तो भक्तांचे रक्षण करतो.

९६

पशु आणि पक्षी तरले स्मरणे । तो तुम्हा कारणे उपेक्षीना ।
धरूनि विश्वास आळवावे नाम । सद्गद ते प्रेम असो द्यावे ।
सुख-दु:ख कोटी येती आणि जाती । नामाविण विश्रांती नाही ।
एका जनार्दनी नामाचा प्रताप । नुरेचि तेथे पाप ओखदासी ।

भावार्थ:

परमेश्वराच्या नामस्मरणाने पशु-पक्षीसुध्दा संसार-सागरातून तरून नेले जातात; तर नामावर विश्वास ठेवून प्रेमाने आळवल्यास देव उपेक्षा करणार नाही अशी खात्री धरावी. संसारात अनेक प्रकारची सुख-दु:खे येतात आणि जातात, परंतु नामाशिवाय विश्रांती मिळवण्याचा दुसरा साधना-मार्ग नाही. एका जनार्दनी म्हणतात, नाम इतके प्रत्ययकारी आहे की पाप तेथे औषधालासुध्दा उरत नाही.


९७

कोणी काहीतरी म्हणो। आम्ही न जाणो तया बोला ।
गाऊ मुखे नामावळी । सुख-कल्लोळी सर्वदा ।
नाचु संत-मेळा सदा । कीर्तनी गोविंदा रंजवू ।
एका जनार्दन हाचि धंदा । वाया शब्दा न लागु ।

भावार्थ:

एका जनार्दनी म्हणतात, आम्ही संतजन मुखाने गोविंदाची नामावळी गात, त्याच्या कीर्तनात रंगून जाऊन भक्तीसुखात गोविंदाला रंजवु. कोणी काही बोलले तरी त्यांच्या बोलण्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करु. हाच आमचा एकमेव धंदा आहे.

नाम-स्मरणाचे पथ्य

९८

जग राम-नाम म्हणे । तयां का न येती विमाने ।
नवल स्मरणाची ठेव । नामी नाही अनुभव ।
नष्ट गणिका राम म्हणे । तिसी वैकुंठीचे पेणे ।
एका जनार्दनी ध्यात । राम पाहे ध्याना आत ।

भावार्थ:

सामान्य माणसे रामनामाचा जप करतात. पण त्यांच्यावर राम-कृपा होऊन मुक्ती मिळत नाही, नामाचा अनुभव येत नाही. कारण त्यांचा जप वरवरचा असतो, ती स्मरणातील ठेव नसते. एका जनार्दनी म्हणतात, रामानामाचा ध्यानी-मनी-स्वप्नी ध्यास लागला तरच गणिकेवर झाली तशी रामकृपा होईल.

९९

नाम घेता हे वैखरी । चित्त धावे विषयावरी ।
कैसे होता हे स्मरण । स्मरणामाजी विस्मरण ।
नाम-रूपा नव्हता मेळ । नुसता वाचेचा गोंधळ ।
एका जनार्दनी छंद । बोला माजी परमानंद ।

भावार्थ:

केवळ मुखाने रामनामाचा जप सुरू आहे पण चित्त मात्र इंद्रिय-विषयांचे चिंतन करीत असेल, तर ते राम-स्मरण नव्हे विस्मरण आहे. नामस्मरण करतांना रामरुप ध्यानी नसेल, तर तो केवळ वाचेचा गोंधळ समजावा असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, रामनामात परमानंद असून तो मनाला लागलेला छंद आहे.


१००

भव रोगासी ओखद । राम-हेचि शुध्द ।<।br> येणे तुटे रोग-व्यथा । भक्ति मुक्ति वंदिती माथा ।
न लगे आणिकांचे काम । वाचे वदे राम-नाम ।
पथ्य एक शुध्द क्रिया । एका जनार्दनी लागे पाया ।

भावार्थ:

राम-नाम हेच भव-रोगावरचे शुध्द औषध आहे. त्यामुळे सर्व रोग, आधि-व्याधी समूळ नाहिशा होतील. रामनामाशिवाय वेगळ्या उपायांची गरज नाही. वाचेने राम-नाम घेणे ही एक प्रकारची शुध्दी-क्रिया असून ते भव-रोगावरचे पथ्य आहे ते पाळणे आवश्यक आहे असे एका जनार्दनी आग्रहाने सांगतात.


१०१

हरिनाम स्मरतो म्हणोनि आचरसी दोष ।
श्रवण स्मरण भक्ति तेणे पडली ओस ।
हरिनामाचेनि बळे करिसी अधर्म ।
देवाचेनि तमुचे शुध्द नोहे कर्म ।
सत्यव्रती धर्म सद्-यज्ञ-निष्ठ ।
असत्य-वचनी त्याचा पडला अंगुष्ठ ।
एका जनार्दनी संत-सोयीने चाले ।
सद्गुरू-वचन सबाह्य शुध्द झाले।

भावार्थ:

हरिनाम घेऊन भक्ति करणारा साधक दोषपूर्ण आचरण करीत असेल त्याचे नामस्मरण आणि भक्ति व्यर्थ आहे असे समजावे. हरिनामाच्या बळावर केलेला अधर्म हे अशुध्द कर्म होय. सत्याचे व्रत घेऊन आचरलेला धर्म हा सद्-यज्ञ आहे. असत्यवचनाने तो यज्ञ फलद्रुप होणार नाही असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, हे सद्गुरूवचन असून अंतर्बाह्य शुध्द आहे. संतजन त्याप्रमाणे आचरण करतात.


१०२

व्यापक विठ्ठलनाम तेव्हाचि होईल । जेव्हा जाईल मी-तूपण
आपुले ते नाम जेव्हा ओळखील । व्यापक साधेल विठ्ठल तेणे ।
आपुले ओळखी आपण सापडे । सर्वत्र हि जोडे विठ्ठलनाम ।
नामाविण जन पशूच्या समान । एका जनार्दनी जाण नाम-जप ।

भावार्थ:

जेव्हा साधकाच्या मनातील मी-तूपण (द्वैतभाव) समूळ नाहीसा होईल, हे सर्व विश्व एकाच आत्मरूप चैतन्याने भरलेले आहे याचा साक्षात्कार होईल तेव्हाच विठ्ठलनामाची व्यापकता समजून येईल आणि स्वत:ची खरी ओळख पटेल. तेव्हा मनाचे उन्मन होईल. एका जनार्दनी म्हणतात, नाम-जपाने माणुस पशूचा माणुस बनेल.


एकनाथांचा परिपाठ

१०३

हरीचिया दासा हरि दाही दिशा । भावे जैसा तैसा हरि एक ।
हरि मुखी गाता हरपली चिंता । त्या नाही मागुता जन्म घेणे ।
जन्म घेणे लागे वासनेच्या संगे । तेचि झाली अंगे हरिरुप ।
हरिरुप ध्यानी हरिरुप मनी । एका जनार्दनी हरि बोला ।

भावार्थ

हरिदासाला उत्कट भावभक्तिमुळे सर्वत्र दाही दिशांना हरिरुप दिसते. हरीनामाचा सतत जप करीत असल्याने हरिदासाच्या सर्व चिंता मिटून जातात, त्याला परत जन्म घ्यावा लागत नाही, कारण त्याच्या सर्व वासना हरिरुप झालेल्या असतात. एका जनार्दनी म्हणतात, हरिरुप ध्यानी-मनी धरुन केवळ हरिनामाचा जप करावा.


१०४

हरि हरि बोला नाही तरी अबोला । व्यर्थ गलबला करू नका ।
नको नको मान सांडी आभिमान । सोडी मी-तूपण तोचि सुखी ।
सुखी जेणे व्हावे जग निववावे । अज्ञानी लावावे सन्मार्गासी ।
मार्ग जया कळे भाव-भक्ति बळे । जगाचिये मेळे न दिसती ।
दिसती जनी वनी प्रत्यक्ष लोचनी । एका जनार्दनी ओळखिले ।


भावार्थ:

जो कोणी मानापमानाच्या कल्पनांचा त्याग करुन अभिमान, आपपर भाव सोडून इतरांशी मित्रत्वाचे नाते जोडतो तो जीवनात सुखी होतो. ईश्वरावरील अतूट भक्तिभावामुळे जगाचे बाजारी स्वरुप दिसत नाही अशा भक्ताला जनी-वनी केवळ जनार्दनच भरला आहे हे ओळखता येते असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, अज्ञानी लोकांना सन्मार्ग दाखवून त्यांचे दु:ख दूर करावे. मुखाने केवळ हरिनामाचा जप करावा किंवा मौन धरावे व्यर्थ गलबला करु नये.


१०५

ओळखिला हरि धन्य तो संसारी । मोक्ष त्याचे घरी सिध्दी सहित ।
सिध्दि लावी पिसे कोण तया पुसे । नेले राजहंसे पाणी काई ।
काय ते करावे संदेही निर्गुण । ज्ञानाने सगुण ओस केले ।
केले कर्म झाले तेचि भोगा आले । उपजले मेले ऐसे किती ।
एका जनार्दनी नाही यातायात । सुखाची विश्रांती हरी संगे ।

भावार्थ:

ज्याने परमेश्वरी तत्व जाणून घेतले त्याला सिध्दीसहित मोक्ष प्राप्त होतो. परंतु सिध्दी साधकाच्या मनाला वेड लावतात. त्यामुळे साधक देवाच्या भक्तिला पारखा होतो. राजहंसाला दूधापासून पाणी वेगळे करण्याची सिध्दी प्राप्त झालेली असते. पण त्या सिध्दीला फारसे महत्त्व नसते. परमेश्वरी तत्व सगुण की निर्गुण या संदेहात पडलेले मन ज्ञानमार्गाने जावे की भक्तिमार्ग आचरावा याविषयी साशंक बनते. कर्ममार्ग अनुसरला तरी कर्माची फळे भोगावी लागतात. असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, यापैकी कोणतीही यातायात न करता हरिस्मरणात सुखाची विश्रांती मिळते.


१०६

जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप । पूजा ध्यान जप त्यासी नाही ।
वैकुंठ-कैलासी तीर्थक्षेत्री देव । तयाविण ठाव रिता कोठे ।
वैष्णवांचे गुह्य मोक्षाचा एकांत । अनंतासी अंत पाहता नाही ।
आदि-मध्य-अंती अवघा हरि एक । एकचि अनेक एक हरि ।
एकाकार झाले जीव-शिव दोन्ही । एका जनार्दनी ऐसे केले ।

भावार्थ:

जे जे डोळ्यांना दिसते ते ते सर्व हरिरुप आहे, सर्वत्र चैतन्य रुपाने हरि व्यापून राहिला असून कोठेही रिकामी जागा नाही सृष्टीची उत्पत्ती, स्थिती, लय या तिन्ही अवस्थांमध्ये हरि हेच अविनाशी तत्व अस्तित्वात आहे आणि हे तत्व अनंत असून त्याला अंत नाही. एकच हरिरुप सृष्टीतिल अनंत रुपानें नटले आहे.जीव व शिव एकरुप होतो तेव्हा सर्वत्र हरिदर्शन विनासायास घडते. वैकुंठात, कैलास पर्वतावर आणि तीर्थक्षेत्री भक्तांसाठी देव तिष्ठत उभा आहे. एका जनार्दनी म्हणतात, पूजा, ध्यान, तप यांची गरज नाही. सद्गुरुकृपेने वैष्णवांचे हे रहस्य समजून येते.


१०७

सत्पद ते ब्रह्म चित्पद ते माया । आनंद-पद जया म्हणती हरि ।
सत्पद निर्गुण चित्पद सगुण । सगुण-निर्गुण हरी-पायी ।
तत्सदिति ऐसे पैल वस्तूवरी । गीतेमाजी हरि बोलियेले ।
हरिपद-प्राप्ति भोळ्या भाविकांसी । अभिमानियासी गर्भवास ।
अस्ति भाति प्रिय ऐशी पदे तिन्ही । एका जनार्दनी तेची झाले ।

भावार्थ:

सच्चिदानंद या परमेश्वरी नामाची फोड करून सांगतांना एका जनार्दनी म्हणतात, ब्रह्म हे सत्पद (सत्य), माया हे चित्पद (सनातन) आणि हरि हे आनंद-पद आहे. ब्रह्म हे निर्गुण, माया ही सगुण तर हरि हा सगुण, निर्गुण असून आनंदमय आहे. ब्रह्म आणि माया ह्या पैलवस्तु डोळ्याला अगोचर आहेत असे गीतेमध्ये भगवान सांगतात. भोळ्या भाविकांना हरिपदाची प्राप्ति होऊन मोक्षाचा मार्ग सुलभ होतो, तर ज्ञानामुळे अहंकार निर्माण होऊन जन्ममरणाच्या बंधनात पडावे लागते.


१०८

हरि बोला देता हरि बोला घेता । हांसता खेळता हरि बोला ।
हरि बोला गाता हरि बोला खांता । सर्व कार्य करिता हरि बोला ।
हरि बोला एकांती हरि बोला लोकांती । देह-त्याग अंती हरि बोला ।
हरि बोला भांडता हरि बोला कांडता । उठता बैसता हरि बोला ।
हरि बोला जनी हरि बोला विजनी । एका जनार्दन हरि बोला ।

भावार्थ:

कोणतीही वस्तू देतांना, घेतांना, खातांना तसेच गातांना हरिचे नाम घ्यावे. हसून खेळून आनंदात असतांना, कष्टाची कामे करतांना किंवा रागाने भांडतांनासुध्दा हरिनाम स्मरण करावे. एकांतामध्ये चिंतन करतांना किंवा चारचौघांत हास्य विनोद करतांना, जनी-विजनी हरीच्या नामाचा वाचेने सतत जप करावा.


१०९

आवडीने भावे हरि-नाम घेसी । तुझी चिंता त्यासी सर्व आहे ।
नको खेद धरू कोणत्या गोष्टीचा । पति तो लक्ष्मीचा जाणतसे ।
सकळ जीवांचा करिता सांभाळ । तुज मोकलील ऐसे नाही ।
जैसी स्थिति आहे तैशापरि राहे । कौतुक तु पाहे संचिताचे ।
एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा । हरिकृपे त्याचा नाश झाला ।

भावार्थ:
लक्ष्मीचा पती सर्व जीवांचे पालन-पोषण, सांभाळ करणारा व सर्वांची चिंता करणारा आहे, सर्व कांही जाणणारा आहे. या परमेश्वरी शक्तिवर विश्वास ठेवून ज्या परिस्थितीत आहे तिचा स्विकार करावा व भविष्यात जे घडेल त्याचा संचित म्हणून अंगिकार करावा. या घटना आपल्या प्रारब्धाचा भोग आहेत असे मानावे. कोणत्याही गोष्टीचा खेद न करता मनापासून हरिचे नामस्मरण करावे. त्यामुळे हरिकृपा होऊन प्रारब्धातील दु:खांचा नाश होईल असे एका जनार्दन सांगतात.

कीर्तन देवास प्रिय, कीर्तनाने सामाजिक चित्त-शुध्दि


११०

आवडी करिता हरि-कीर्तन । हृदयी प्रगटे जनार्दन ।
थोर कीर्तनाचे सुख । स्वये तिष्ठे आपण देख ।
घात आलिया नावाची । चक्र गदा घेउनी करी ।
कीर्तनी होऊनी सादर । एका जनार्दनी तत्पर ।

भावार्थ:

आवडीने हरिचे कीर्तन करतांना मनाला जे सुख मिळते त्याची तुलना दुसऱ्या कोणत्याही सुखाची होऊ शकत नाही. हे सुख अप्रतिम असते कारण त्या वेळी प्रत्यक्ष जनार्दन हृदयात प्रगट होतात. काही संकट आल्यास चक्र, गदा हाती घेऊन येतात व त्या संकटाचे निवारण करतात म्हणुनच एका जनार्दनी कीर्तनभक्ती सर्वांत श्रेष्ठ भक्ती आहे असे मानतात.


१११

कीर्तनाची आवडी देवा । वैकुंठाहुनी घाली धावा
नवल वैकुंठीच नसे । तो कीर्तनी नाचतसे ।
भोळ्या भावासाठी । धावे त्याच्या पाठोपाठी ।
आपुले सुख तया द्यावे । दु:ख आपण भोगावे ।
दीन-नाथ पतित-पावन । एका जनार्दनी वचन ।

भावार्थ:

दीनांचा नाथ, पतित-पावन अशा देवाला कीर्तनाची इतकी आवड आहे की तो कीर्तनासाठी वैकुंठाहून धावत येतो आणि नवल असे की, तो संताच्या मेळ्यात, कीर्तनाच्या रंगात रंगून नाचतो. भोळ्या भाविकांच्या भावासाठी देव त्यांच्यापाठोपाठ धावत येतो. त्यांचे दु:ख आपण भोगतो आणि त्यांच्या सुखाचा भागीदार बनतो. हे एका जनार्दनीचे वचन सार्थ आहे.


११२


नवल रोग पडिपाडु । गोड परमार्थ झाला कडु ।
विषय व्याधीचा उफाडा । हरि-कथेचा घेई काढा ।
ऐसा रोग देखोनि गाढा । एका जनार्दनी धावे पुढा ।

भावार्थ:

अंगामध्ये ताप असला की, जिभेची चव जाते आणि गोड पदार्थ कडु लागतात. तसेच इंद्रियविषयांचा मोहरुपी रोग जडला की, परमार्थ कडु वाटतो. हा रोग बळावला असता हरिकथेचा काढा घ्यावा आणि रोग विकोपाला गेला तर गुरुचरणांना शरण जावे असे एका जनार्दनी म्हणतात.


११३

हरि-कीर्तने चित्त शुध्द । जाय भेद निरसूनि ।
काम-क्रोध पळती दुरी । होत बोहरी महापापा ।
गजरे हरीचे कीर्तन । पशुपक्षी होती पावन ।
एका जनार्दनी उपाय । तरावया भव-नदीसी ।


भावार्थ:

हरिकीर्तनाने चित्त शुध्द होते. मी-तूपणाचा द्वैतभाव लयास जातो. काम-क्रोधरुपी शत्रु परागंदा होतात. महापापांची होळी होते. हरिकीर्तनाच्या गजराने पशुपक्षीसुध्दा पावन होतात. एका जनार्दनी म्हणतात, संसारसरिता तरून जाण्याचा हरिकीर्तन हा एकच उपाय आहे.


११४

करिता कीर्तन श्रवण । अंतर्मळाचे होत क्षालन ।
तुमचे कीर्तन पवित्र कथा । पावन होत श्रोता वक्ता ।
तुमचे कीर्तनी आनंद । गाता तरले ध्रुव प्रल्हाद ।
एका जनार्दनी कीर्तन । तिन्ही देव वंदिती रण ।

भावार्थ:

परमेश्वराचे कीर्तन म्हणजे त्याच्या पवित्र कथांचे श्रवण. या श्रवणभक्तीने अंत:करणातील वाईट भावनांचे निर्मूलन होते, कीर्तन करणारा आणि ऐकणारा दोघेही पावन होतात. भक्त प्रल्हाद आणि ध्रुव दोघेही कीर्तनभक्तीने मोक्षाप्रत गेले. एका जनार्दनी म्हणतात, ब्रह्माविष्णुमहेश हे तिन्ही देव कीर्तनकारांना वंदन करतात.


११५

तुमचे वर्णिता पोवाडे । कळिकाळ पाया पडे ।
तुमची वर्णिता बाळलीळा । ते तुज आवडे गोपाळा ।
तुमचें वर्णील हास्य-मुख । त्याचे छेदिसी संसार-दु:ख ।
तुमचे दृष्टीचे दर्शन । एका जनार्दनी ते ध्यान ।

भावार्थ:

देवाच्या कीर्तीचे गुणगान कळीकाळालासुध्दा वंदनीय आहे. आपल्या बाळलीळांचे वर्णन गोपाळकृष्णाला ऐकायला आवडते. देवाच्या हास्यमुखाचे वर्णन करणाऱ्या भक्तांचे संसारदु:ख देव नाहीसे करतो. एका जनार्दनी म्हणतात, देवाच्या कृपादृष्टीचे मनाला ध्यान लागते.


११६

मागणे ते आम्ही मागु देवा । देई हेवा कीर्तनी ।
दुजा हेत नाही मनी । कीर्तनावाचूनि तुमचिया ।
प्रेमे हरिदास नाचत । कीर्तन होत गजरी ।
एका जनार्दनी कीर्तन । पावन होती चराचर जाण ।


भावार्थ:

हरिकीर्तनाच्या गजरात हरिदास जेव्हा आनंदाने नाचतात, तेव्हा सर्व चराचर सृष्टी पावन होते. या कीर्तनसुखाची मागणी एका जनार्दनी देवाकडे करतात. याशिवाय दुसरी कोणतीही मागणी नाही असे ते देवाला सांगतात.

कीर्तनभक्तीचा आदर्श

११७

नवल भजनाचा भावो । स्वत: भक्तचि होय देवो ।
वाचे करिता हरिकीर्तन । उन्मनी मन निशीदिनी ।
नाही प्रपंचाचे भान । वाचे सदा नारायण ।
एका जनार्दनी मुक्त । सबाह्य अभ्यंतरी पुनीत ।

भावार्थ:

कीर्तन \भक्तीचा महिमा एवढा आश्चर्यकारक आहे की, कीर्तनात रंगलेला भक्त स्वत:च देव बनतो. मन एका उच्च पातळीवर पोचून तेथेच स्थिर होते. ह्या उन्मनी अवस्थेत मन रात्रंदिवस गुंतुन राहते. वाचेने सतत हरिनामाचा जप अखंडपणे सुरू असतो. प्रपंचाचे भान हरपून जाते. आंतरबाह्य शुध्द झालेले मन देहबंधनापासून मुक्त होते असा अनुभव एका जनार्दनी येथे व्यक्त करतात.


११८

आजी नवल झाले वो माझे । पाहण्या पाहणे दृष्टि धाये ।
ऐसा लाघवी सुखकर मूर्ति । संतसंगे झाली मज विश्रांति ।
योगीश्वर जया चिंतिती । सनकादिक जया ध्याती ।
योग-साधन नातुडे जो माये । एका जनार्दनी कीर्तनी नाचतु आहे ।

भावार्थ:

योगी-मुनीजन ज्याचे सतत चिंतन करतात आणि सनकादिक श्रेष्ठ मुनी ज्याच्यावर निरंतर ध्यान लावतात, अशा पांडुरंगाचे दर्शन योगसाधनेने मिळत नाही. हरिची लाघवी, सुंदर मूर्ती पाहून डोळ्यात साठवण्यासाठी दृष्टी धावत असताना नवल घडले आणि संतकृपेने मिळालेल्या दर्शनसुखाने मन अपार भरून विश्रांत झाले. आनंदाने एका जनार्दनी कीर्तनरंगी रंगून गेले.


११९

जे पदी निरुपण तेचि हृदयी ध्यान । तेथे सहजी स्थिर राहे मन ।
कीर्तनासी तोषोनि कळिकाळ । तुष्टला समाधीसी समाधान रे ।
कीर्तनी सद्भाव अखंड अहर्निशी । पाप न रिघे त्याच्या देशी ।
निज-नामे निष्पाप अंतर देखोनि । देव तिष्ठे तयापाशी रे ।
हरि-नाम-कीर्तने अभिमान सरे । आणिक श्रेष्ठ आहे काज ।
सद्भावे कीर्तनी गाता पै नाचता । लोकेषणा सांडी लाज रे ।
व्रता तपा तीर्था भेटे जो न पाहता । तो कीर्तनी सापडे देवो ।
तनु मनु प्राणे कीर्तनी विनटले । भावा विकिला वासुदेवो रे ।
एका जनार्दनी कीर्तन भावे । श्रोता वक्ता ऐसे लाहावे ।
गर्जत नामे निशाण लागुनी । सकळिका वैकुंठासी जावे रे ।

भावार्थ:

कीर्तनातील पदात ईश्वरीतत्वांचे जे निरुपण केले असेल त्याचे हृदयात ध्यान करीत असतांना तेथे मन सहजपणे स्थिर राहते. कीर्तनात रंगलेला कळिकाळसुध्दा आनंदी होवून समाधानाने समाधिस्त होतो. अत्यंत सात्विक भावाने जो अखंडपणे दिवस-रात्र कीर्तनात रंगतो त्याच्याकडे पाप प्रवेश करीत नाही. नामजपाने निष्पाप बनलेले अंत:करण पाहून देव त्या ठिकाणी उभा राहतो. हरि-नाम-कीर्तनात रंगून गातांना, नाचतांना भक्त लौकिकाची, लाज-लज्जेची चाड विसरून जातो. अभिमान, मीपणा पिकलेल्या फळाप्रमाणे गळून पडतो. जो परमेश्वर अनेक प्रकारच्या व्रतांनी, खडतर तपाने, तीर्थक्षेत्री भेटत नाही तो कीर्तनात हमखास सापडतो. कीर्तन भक्तीभावाला वासुदेव हरि विकला गेला आहे. एका जनार्दनी म्हणतात, कीर्तनभक्तीत श्रोता, वक्ता हाती हरिनामाचा झेंडा घेऊन हरिचा नामघोष करित वैकुंठाची वाटचाल करतात.

१२०

नित्य नवा कीर्तनी कैसा ओढावला रंग ।
श्रोता आणि वक्ता स्वये झाला श्रीरंग ।
आल्हादे वैष्णव करिती नामाचा घोष ।
हरि-नाम गर्जता गगनी न माये हरुष ।
पदोपदी कीर्तनी निवताहे जग मन ।
आवडी भुकेली तिने गिळिले गगन ।
एका जनार्दनी गाता हरीचे नाम ।
निमाली इंद्रिये विषय विसरली काम ।

भावार्थ:

कीर्तनभक्तीत रंगून गेलेले श्रोते आणि वक्ते श्रीरंगात तल्लीन होऊन स्वत: श्रीरंगमय होतात. जेव्हा वैष्णव हरिनामाचा जयघोष करतात, तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. भक्तांच्या प्रत्येक पदागणिक श्रोत्यांचे मन निवत जाते, विश्रांती पावते. एका जनार्दनी म्हणतात, हरिचे नाम गातांना इंद्रिये विषयवासना विसरून जातात, मन निष्काम बनते; हा एक अलौकिक पारमार्थिक अनुभव आहे.


१२१

कीर्तनाची मर्यादा कैसी । देव सांगे उध्दवासी ।
गावे नाचावे साबडे । न घालावे कोडे त्या काही ।
मिळेल तरी खावे अन्न । अथवा पर्णे ती भक्षून ।
जाईल तरी जावो प्राण । परी न संडावे कीर्तन ।
किरकीर आणू नये । बोलू नये भलती गोष्टी ।
स्वये उभा राहून । तेथे करी मी कीर्तन ।
घात आलिया निवारी। माता जैसी बाळावरी ।
बोले उध्दवासी गूज । एका जनार्दनी बीज ।

भावार्थ:

या भजनात श्रीहरी उध्दवाला कीर्तनभक्तीच्या मर्यादा विशद करुन सांगत आहेत. हरिभजनात गावे, नाचावे. मिळाले तर अन्न खावे नाहीतर झाडाची पाने खाऊन भुक भागवावी. प्राण गेला तरी कीर्तन सोडू नये. कीर्तनात कोणतीही तक्रार करु नये किंवा अजाणतेपणी भलत्याच गोष्टींची चर्चा करु नये. कीर्तनकाराच्या ठिकाणी आपण स्वत: उभा असून कोणतेही संकट निवारण्यास सज्ज असतो, जशी माता आपल्या बाळाचे संकट निवारण करते. एका जनार्दनी म्हणतात, कीर्तन-भक्तीचे हे रहस्य देव भक्त उध्दवाला सांगतात.

१२२

सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी ।
सज्जन-वृंदे मनोभावे आधी वंदावी ।
संत-संगे अंतरंगे नाम बोलावे ।
कीर्तन-रंगी । देवा-संनिध सुखे डोलावे ।
भक्तिज्ञानविरहित गोष्टी इतरा न कराव्या ।
प्रेमभरे । वैराग्याच्या युक्ति विवराव्या ।
जेणे करुनी मूर्ति ठसावे । अंतरी श्रीहरिची ।
ऐशी कीर्तन-मर्यादा हे संताचे घरची ।
अद्वय-भजने अखंड-स्मरणे । वाजवी कर-टाळी ।
एका जनार्दनी मुक्त होय तत्काळी ।

भावार्थ:

सज्जनांच्या समुदायाला मनोभावे वंदन करुन परमेश्वराची अत्यंत पवित्र अशी सगुण-चरित्रे कीर्तनात वर्णन करावी. संतजनांबरोबर मनापासून ईश्वर नामाचा जयघोष करावा. प्रेमाने, विवेकाने वैराग्य कसे मिळवता येईल याचे विवरण करावे. श्रोत्यांच्या अंतकरणात श्रीहरिची स्पष्ट प्रतिमा स्थापन करावी. ही संतांची कीर्तनभक्तीची पध्दत आहे असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, श्रीहरीच्या अखंड नाम स्मरणाने अद्वैत निर्माण होऊन भक्त ईश्वराशी एकरुप होऊन तात्काळ भव-बंधनातून मुक्त होतो.

१२३

धन्य तोचि जगी एक हरि-रंगी नाचे ।
राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे ।
सुख दु:ख समान सकळ जीवांचा कृपाळ ।
ज्ञानाचा उद्बोध भक्ति-प्रेमाचा कल्लोळ ।
विषयी विरक्त जया नाही आप-पर ।
संतुष्ट सर्वदा स्वये व्यापक निर्धार ।
जाणीव शाहणीव ओझे सांडूनिया दूरी ।
आपण वस्तीकर वर्ततसे संसारी ।
एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन ।
आसनी शयनी नित्य हरीचे चिंतन ।
एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन ।
आसनी शयनी नित्य हरीची चिंता ।

भावार्थ:

राम कृष्ण वासुदेव या नामाने स्मरण करुन हरिकीर्तनात दंग होऊन नाचतो तो धन्य होय. या हरिभक्ताच्या दृष्टीने सुखदु:खे समान असतात. तो सुखाने हरखून जात नाही आणि दु:खाने खचून जात नाही. तो सृष्टीतील सर्व जीवांवर प्रेम करतो. त्याच्या अंतरात भक्ती-प्रेम उसळून येते व बुद्धीत विवेकाचा संचार होतो. विवेकातून वैराग्याचा उगम होतो, मी-तूपणा, आपपर भाव लयास जातो. तो सदा संतुष्ट, समाधानी असतो. ज्ञानाचे ओझे दूर फेकून तो एखाद्या वाटसरूसारखा विरक्तपणे संसारात राहतो. आसनावर बसून किंवा मंचावर शयन करतांना तो सतत हरीकीर्तनात, चिंतनात मग्न असतो. त्याचा हरिभक्तीचा निर्धार पक्का असतो. असा भक्त धन्य होय असे एका जनार्दनी म्हणतात.

सत्संगती आणि गुरुभक्ती

१२४

वैष्णवा घरी देव सुखावला । बाहीर न वजे दवडो निघातला ।
देव म्हणे माझे पुरतसे कोड । संगत या गोड वैष्णवांची ।
जरी देव नेउनी घातला दूरी । परतोनि पाहे तंव घराभीतरी ।
कीर्तनाची देवा आवडी मोठी। एका जनार्दनी पडली मिठी ।

भावार्थ:

वैष्णवांच्या गोड संगतीत देव सुखावला, कारण देवाला कीर्तन-भक्ती अतिशय प्रिय आहे. वैष्णव देवाच्या सर्व इच्छा पुरवतात. वैष्णवांची संगत देवाला आवडते. वैष्णव देवाला दूर करतात, पण देवाला वैष्णवांचा दुरावा सहन होत नाही. एका जनार्दनी म्हणतात, देव आनंदाने कीर्तन-भजनात भक्तांशी एकरुप होतो.

१२५

संता-अंकी देव वसे । देवा-अंकी संत बैसे ।
ऐसी परस्परे मिळणी । समुद्रतरंग तैसे दोन्ही ।
हेम-अलंकारवत । तसे देव-भक्त भासत ।
पुष्पी तो परिमळ असे । एका जनार्दनी देव दिसे ।

भावार्थ:

देव व संत यांचा निकटचा संबंध वर्णन करतांना एका जनार्दनी म्हणतात, सागराच्या पृष्ठभागावर जसे लाटांचे तरंग उमटतात तसे देव व संत एकरुप असतात. सोने आणि सुवर्णाचे अलंकार भिन्न-रुप भासतात, परंतु ते एकरुप असतात. सुमन आणि सुगंध जसे वेगळे करता येत नाहीत तशी संत व देवाची संगत असते.

१२६

संत आधी देव मग । हाचि उमग आणा मना ।
देव निर्गुण संत सगुण । म्हणोनी महिमान देवासी ।
मुळी अलक्ष लक्षा नये । संती सोय दाविली ।
एका जनार्दनी संत थोर । देव निर्धार धाकुला ।

भावार्थ:

संताची थोरवी वर्णन करतांना एका जनार्दनी सांगतात, भक्तिमार्गावर साधकाला संत आधी भेटतात. संताच्या मार्गदर्शनाने देव ओळखता येतो. संत सगुण असून देव निर्गुण आहे. संत आपल्या विवेकाने, विचारांनी, वाणीने, कृतीने देवाला निर्गुणातून सगुणात आणतात. दृष्टीला जो अगोचर असतो तो प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभा करतात. संत वाल्मिकींनी निर्गुण विष्णुरूप रामरुपाने सगुणात आणले. त्यामुळे देवाचा महिमा वाढला. संत हे देवापेक्षा थोर आहेत हे समजून घ्यावे.

१२७

संताचा महिमा देवचि जाणे । देवाची गोडी संतासी पुसणे ।
ऐसी आवडी एकमेका । परस्परे नोहे सुटिका ।
बहुत रंग उदक एक । या परी देव संत दोन्ही देख ।
मागे पुढे नव्हे कोणी । शरण एका जनार्दनी ।

भावार्थ:

देवाच्या नवविधा-भक्तीची गोडी चाखण्यासाठी संतांच्या सहवासात राहावे आणि संतांचा महिमा देवच जाणतो. देव आणि संत एकमेकांपासून वेगळे करता येत नाही. जसे पाण्याचे रंग वेगवेगळे दिसतातम् पण उदक एकच असते. एका जनार्दनी म्हणतात, देव आणि संत दोन्ही सारखेच प्रत्ययकारी असतात. दोघांना समदृष्टीने बघावे.

अभंग १२८

अभक्ता देव कंटाळलो । परी सरते करिती संत त्या ।
म्हणोनी महिमा त्यांचा अंगी । वागविती अंगी सामर्थ्य ।
मंत्र-तंत्रा नोहे बळ । भक्ति प्रेमळ पाहिजे ।
आगम-निगमाचा पसारा । उगाचि भारा चिंध्यांचा ।
वेद-शास्त्रांची घोकणी । ती तो कहाणी जुनाट ।
एका जनार्दनी सोपा मार्ग । संत-संग चोखडा ।

भावार्थ:

अभक्तांना देव कंटाळतो, परंतु संतकृपेने तो भवसागर तरुन जातो. असे सामर्थ्य संताच्या अंगी असते. प्रेमळ भक्तीचे बळ मंत्र-तंत्रापेक्षा अधिक असते. वेद-शास्त्रांचे पाठांतर ही जुनाट पध्दत असून वेद, उपनिषदे हे केवळ कालबाह्य, जीर्ण भांडार आहे असे सांगून एका जनार्दन म्हणतात, संतांचा सहवास हा सर्वात सोपा व अचूक मार्ग आहे.

अभंग १२९

संतासी जो नांदी देवासी जो वंदी । तो नर आपदी आपदा पावे ।
देवासी जो निंदी संतांसी जो वंदी । तो नर गोविंदी सरता होय ।
कृष्णा कंस द्वेषी नारदा सन्मानी । सायुज्य-सदनी पदवी पावे ।
एका जनार्दनी गूज सांगे कानी । रहा अनुदिनी संत-संगे ।

भावार्थ:

संतांची निंदा करून जो भक्त देवाला वंदन करतो, तो परमेश्वरी कृपेला पात्र होत नाही. पण संतांना आदरभावाने वंदन करतो आणि देवाची निंदा करतो. असा भक्त मात्र गोविंदाला आपलासा वाटतो हे पटवून देण्यासाठी एका जनार्दनी कंसाचे उदाहरण देतात. कंस सतत कृष्णाचा द्वेष करतोम् पण नारदांचा सन्मान करत असतो. त्याला सायुज्य मुक्तीचा लाभ होतो. सतत संतांच्या सहवासात रममाण व्हावे असे एकनाथ महाराज सांगतात.

संतांचे अवतार-कार्य

अभंग १३०

मेघापरिस उदार संत । मनोरथ पुरवितो ।
आलिया शरण मनें वाचा । चालविती त्याचा भार सर्व ।
लिगाड उपाधि तोडिती । सरते करिती आपणामाजी ।
शरण एका जनार्दनी । तारिले जनी मूढ सर्व ।

भावार्थ:

संत हे मेघाप्रमाणे उदार असून मनातील सर्व इच्छा पूर्ण करतात. काया-वाचा-मनाने शरण आलेल्या भक्ताचा सर्व प्रकारे भार हलका करतात. भक्तांच्या सर्व उपाधी, संकटे दूर करतात. भक्ताला आपल्यासारखे बनवतात. अज्ञानीजनांना मार्गदर्शन करून तारुन नेणाऱ्या गुरूचरणांना एका जनार्दनी शरणागत होतात.

अभंग १३१

जया जैसा हेत । तैसा संत पुरविती ।
उदारपणे सम देणे । नाही उणे कोणासी ।
भलतिया भावे संत-सेवा । करिता देवा माने ते ।
एका जनार्दनी त्याचा दास । पूर्ण वोरस कृपेचा ।

भावार्थ:

प्रत्येक साधकाच्या मनातील हेतु समजून संत तो हेतु पूर्ण करतात. उदारपणे सर्वांना समप्रमाणात, कोणताही दुजाभाव न ठेवता दान देतात. कोणत्याही भावनेने संत-सेवा केली तरी परमेश्वराला ती मान्य असते. एकनाथमहाराज जनार्दनस्वामींचे दास असून ते आपल्यावर पूर्ण कृपेचा वर्षाव करतात असे एका जनार्दनी म्हणतात.

अभंग 131

संतांचे ठायी नाही द्वैतभाव । रंक आणि राव सारिखाचि ।
संतांचे देणे अरि-मित्रा सम । कैवल्याचे धाम उघडे ते ।
संतांची थोरवी वैभव गौरव । न कळे अभिप्राव देवासी तो ।
एका जनार्दनी करी संत-सेवा । परब्रह्म ठेवा प्राप्त झाला ।


भावार्थ:

संतांच्या मनात कोणताही दुजाभाव नाही, त्यांना धनवान आणि निर्धन सारखेच असतात. त्यांना शत्रू आणि मित्र समानच वाटतात. संत म्हणजे मोक्षाचे उघडे द्वार ! संतांचा गौरव हेच त्यांचे वैभव असून तेच त्यांचा थोरपणा, त्याचा ठाव देवांना सुध्दा लागत नाही. एका जनार्दनी म्हणतात, संतसेवेमुळेच त्यांना परब्रह्मज्ञानाचे भांडार प्राप्त झाले.

अभंग 132

संत माय-बाप म्हणता । लाज वाटे बहु चित्ता ।
माय बाप जन्म देती । संत चुकविती जन्म-पंक्ति ।
माय बापा परिस थोर । वेद-शास्त्री हा निर्धार ।
शरण एका जनार्दनी । संत शोभती मुकुट-मणी ।

भावार्थ:

संतांना जेव्हा आपण माय-बाप म्हणतो, तेव्हा मनापासून लाज वाटते. कारण माय-बाप जन्म देतात तर संत जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका करतात. वेद-शास्त्र जाणणारे संत मायबापापेक्षा खात्रीपूर्वक श्रेष्ठ आहेत. संत सर्वात मुकुटमण्याप्रमाणे शोभून दिसतात असे एका जनार्दनी म्हणतात.


अभंग १३३


जयाचेनि चरणे तीर्था तीर्थपण । तो ह्रदयी केला साठवण ।
नवल महिमा हरिदासंतसाची । तीर्थे उपजती त्याचे कुशी ।
काशी-मरणे होय मुक्ति । येथे वचने न मरता मुक्ति ।
एका जनार्दनाचे भेटी । सकळ तीर्थे वोळंगती दिठी ।

भावार्थ:

ज्यांच्या चरणस्पर्शाने तीर्थाला पावित्रपणा येतो त्या संतांची ह्रदयात साठवण केली. संतांचा महिमा इतका मोठा आहे की त्यांच्या कुशीतून तीर्थे उगम पावतात. काशी या तीर्थक्षेत्री मरण आल्यास मुक्ति मिळते असे सांगितले जाते, पण संतांच्या गावी न मरताच मुक्तिचा लाभ होतो. एका जनार्दन जेव्हा गुरूंना भेटतात तेव्हा सर्व तीर्थे पायाशी लोळण घेतात असे एका जनार्दनी अभिमानाने सांगतात.

अभंग 134

सर्वांगी सुवास परि तो उगला न राहे ।
सभोवते तरु चंदन करीतचि जाये ।
वैरागर मणि पूर्ण तेजाचा होये ।
सभोवते हरळ हिरे करितचि जाये ।
एका जनार्दनी पूर्ण झालासे निज ।
आपणा सारिखे परी ते करितसे दुजे ।

भावार्थ:

चंदनाचे झाड़ सर्वांगात सुवासाने भरलेले असते. परंतु ते वेगळे न राहता आपल्या सभोवतालच्या वृक्षांना सुगंधित करते. पूर्ण तेजस्वी असा वैरागर मणि जवळपासच्या पाषाणांचे मौल्यवान हिरे बनवतो. एका जनार्दनी म्हणतात आध्यात्मिक ज्ञानाने परिपूर्ण असलेले संत आपल्या संगतीने सामान्यांना उन्नत करतात.

अभंग १३५

निवृत्ति शोभे मुकुटाकार । ज्ञान सोपान वटेश्वर ।
विटु पंढरीचे राणे । ल्याले भक्तांची भूषणे ।
गळा शोभे वैजयंती । तिसी मुक्ताई म्हणती ।
अखंड शोभे माझ्या बापा । पदकी तो नामा शिंपा ।
कासे कसिला पीतांबर । तो हा जाणावा कबीर ।
चरणी वीट निर्मळ । तो हा झाला चोखामेळ ।
चरणा तळील ऊर्ध्वरेखा । झाला जनार्दन एका ।

भावार्थ

पंढरीचा विठुराणा आपल्या भक्तांची भूषणे लेऊन विटेवर उभे आहेत अशी सुंदर कल्पना एकनाथमहाराज या अभंगात करतात. विठुरायाच्या मस्तकावर निवृत्ती रूपी मुकट शोभून दिसते आहे आणि गळ्यात मुक्ताई नावाची वैजयंतीमाळ विराजमान झाली आहे. या वैजयंतीमाळेतील मोहक पदक म्हणजे संत नामदेव ! पंढरीरायाने कमरेला बांधलेला रेशमी पीतांबर हेच संत कबीर, विठोबा ज्या विटेवर उभा आहे ती वीट झाली आहे संत चोखामेळा तर चरण तळीची वर जाणारी रेषा म्हणजे संत एकनाथ असे एका जनार्दनी म्हणतात.

अभंग १३६

धर्माची वाट मोडे । अधर्माची शीग चढे ।
तै आम्हा येणे घडे । संसार-स्थिती ।
आम्हा का संसारा येणे । हरिभक्ति नामस्मरणे ।
जड जीव उध्दरणे । नाम-स्मरणे करुनि ।
सर्व कर्म ब्रह्मस्थिति । प्रतिपादाच्या वेदोक्ति ।
हेचि एक निश्चिती । करणे आम्हा ।
नाना मते पाखंड । कर्मठता अति बंड ।
तयाचे ठेंचणे तोंड । हरि-भजने ।
विश्वरूप सृष्टी । अर्जुना दाविली दृष्टी ।
भिन्न भेदाची गोष्टी । बोलू नये ।
एका जनार्दनी । धरिता भेद मनी ।
दुर्हावले येथुनी । निंदक जाण ।

भावार्थ:

जेव्हा धर्माची अवनती होते आणि अधर्माचे प्राबल्य वाढते, तेव्हा संतांना पृथ्वीवर जन्म घ्यावा लागतो. हरिभक्ति व नामस्मरण या साधनांनी जड जीवांचा उध्दार करणे व वेद वाणीचे प्रतिपादन करून कर्म योगाचे महत्त्व वाढवणे या दोन गोष्टी संताना कराव्या लागतात. नास्तिकता वाढवणारी पाखंडी मते व कर्मठता यांचा हरिभजनाने निरास करण्याचा प्रयत्न करावा लागतो. अर्जुनासारख्या भक्तांना विश्वरुप दाखवण्यासाठी नविन दृष्टी देवून भगवंतानी त्याच्या मनातील सर्व संशय, भेदाभेद नाहिसे केले. असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, मनातले सर्व भेद नाहिसे झाले तर चित्त परमेश्वरी शक्तीशी एकरूप होते आणि निंदक दुरावतात.

21 संतांची लक्षणें

अभंग 137

जे जे बोले तैसा चाले । तोचि वहिले निवांत ।
अंगी असोनि जाणपण । सदा सर्वदा तो लीन ।
निंदा अथवा वंदा । नाही विषम ती बाधा ।
शांतीचा मांदूस । भरला असे सदोदित ।
एका जनार्दनी धन्य । त्याचे दर्शन जग-मान्य ।

भावार्थ:

जो जे बोलतो तसेच वागतो, ज्याच्या मनात कोणतीही चलबिचल नसते त्याचे मन निवांत असते. तो अत्यंत जाणता असूनही विनम्र असतो.कोणाच्या निंदेने अगर स्तुतीने तो विचलित होत नाही. तो शांतीचा मांदूस (पेटी)असतो, ही लक्षणे असलेला संत धन्य असून त्याचे दर्शन सर्वांना प्रिय असते असे एका जनार्दनी म्हणतात.

अभंग 138

असोनी संसारी आपदा । वाचे वदे विठ्ठल सदा ।
नाहीं मानसी तळमळ । सदा शांत गंगाजळ ।
असोनिया अकिंचन । ज्याची वृत्ती समाधान ।
एका जनार्दनी ऐसे थोडे । लक्षामधे एक निवडे ।

भावार्थ:

प्रपंचात अनेक प्रकारची कमतरता असूनही सतत देवाच्या नामस्मरणात रममाण असलेला संत गंगाजळाप्रमाणे शांत असतो. त्याच्या अंतरंगात कोणत्याही गोष्टीची तळमळ नसते. निर्धन (गरीब) असूनही तो समाधानी असतो. एका जनार्दनी म्हणतात, असे भक्त क्वचितच पहावयास मिळतात, लाखामधे एखादाच !

139

मज कोणी न देखावे । मज कोणी नोळखावे ।
मान देखोनिया दृष्टी । पळे देह-उपेक्षा पोटी ।
मी एक लौकिकी आहे । ऐसे कवणा ठावे नोहे ।
ऐसा निरपेक्ष सज्ञानी । एका शरण जनार्दनी ।

भावार्थ:

आपणास कोणी ओळखु नये यासाठी लोकांच्या नजरा चुकवून अलिप्तपणे साधना करणारे काही भक्त असतात. त्यांना मान-सन्मान, आत्म-स्तुती यांची अपेक्षा नसते. आपण सर्व सामान्यांपैकी एक आहोत असे ते मानतात. एका जनार्दनी म्हणतात असे भक्त सज्ञानी असून अत्यंत निरपेक्ष असतात.

अभंग १४०

छळिता न येती रागावरी ।तदाकारी वृत्ति मुराली ।
आप-पर नाही येथे । भेद तेथे नसेचि ।
याती असो भलते परी । एक सरी जगासी ।
एका जनार्दनी भाव अवघिया ठाव एकचि ।

भावार्थ:

काही साधक असे असतात की, त्यांच्या अखंड साधनेमुळे ते परमात्मशक्तीसी एकरुप झालेले असतात. त्यांच्या मनातील सर्व संशय मिटतात आणि भेदाभेद संपून जातात. कोणताही आपपर भाव नसतो. जाती-पातिचा भेद न मानता सर्वांसी समभाव ठेवून वागतात असे एका जनार्दनी म्हणतात.

अभंग १४१

आपुलीच दारा जरी टेके व्यभिचारा ।
क्रोधाचा थारा अंतरी न ये ।
आपुलेच धन तस्करे नेता जाण ।
जयाचे मन उद्विग्न नव्हे ।
आपुलाचि पुत्र वधोनी जाय शत्रु ।
परी मोहाचा पाझर नेत्री न ये
आपुले शरीर गांजितां पर-नरे ।
परी शांतीचे घर चळो नेदी ।
एका जनार्दनी जया पूर्ण बोधु ।
तोचि एक साधु जगामाजी ।

भावार्थ:

आपली पत्नी व्यभिचारी आहे हे जाणूनही ज्याच्या अंतरात क्रोध निर्माण होत नाही, आपले धन चोराने चोरुन नेले आहे हे लक्षात येऊनही ज्याचे मन विचलित होत नाही, शत्रुने आपल्या मुलाचा वध केला आहे हे समजूनही जो मोहाने शोकाकुल होऊन रडत नाही, परक्या माणसाने आपल्या शरीराला वेदना दिल्या तरी ज्याची मन:शांती ढळत नाही, अशा साधुपुरुषाला पूर्ण बोध झाला असून असा साधु जगामधे एखादाच सापडतो असे एका जनार्दनी म्हणतात.

अभंग १४२

मुखी नाही निंदा-स्तुती । साधु वर्ते जो आत्म-स्थिती ।
राग-द्वेष समूळ गेले । द्वैताद्वैत हारपले ।
घेणे देणे हा पसारा । नाही जयासी दुसरा ।
एका जनार्दनी संत । ज्याचे हृदयी भगवंत ।

भावार्थ:

मुखाने जो कुणाचीही निंदा किंवा स्तुती करत नाही जो स्वत:च्या आत्मस्वरुपात रममाण असतो, ज्याच्या मनातील सर्व राग-द्वेष विलयास गेले आहेत, देण्याघेण्याच्या व्यवहारातून जो अलिप्त झाला आहे. अशा साधुसारखा दुसरा कोणी नाही. एका जनार्दनी म्हणतात, अशा संताच्या हृदयात भगवंताचा निवास असतो.

अभंग १४३

देही असोनि विदेही । चाले बोले सदा पाही ।
असे अखंड समाधी । नसे काही आधि-व्याधी ।
उपाधीचे तोडोनि लाग । देही देहपणे भरले जग ।
एका जनार्दनी संग । सदा समाधान सर्वांग ।

भावार्थ:

जो साधक देहाने या जगात वावरत असला तरी मनाने तो देहातीत असतो आपण देह नसून आत्मतत्व आहोत असा आत्मबोध झालेला असतो. ध्यानयोगाच्या अखंड साधनेमुळे तो सतत समाधी अवस्थेत असतो. त्याला कोणतीही मानसिक अथवा शारिरीक आधि-व्याधी नसते. तो जगातील सामान्य व्यवहारापासून मुक्त असतो तो मनाने संपूर्ण समाधानी असतो असे एका जनार्दनी या अभंगात म्हणतात.

अभंग १४४

जो वस्तु झाला केवळ । त्याचे अंतर कोमळ ।
भूतमात्री दयाळ । सर्वांपरी भजन ।
जेथे रज तम वसती । तेथे द्वेष लोभ नांदती ।
त्याचे संगे ज्ञान-ज्योती । विझोनि जाय ।
एका जनार्दनी शरण । जेथे शुध्द तत्वाचे प्राधान्य ।
तो वस्तुसी जाय मिळोन । सहजी सहज ।

भावार्थ:

जो भक्त परमेश्वर चिंतनाने ब्रह्मरुप झाला आहे. त्याच्या मनात संपूर्ण प्राणिमात्रांविषयी दयाभाव निर्माण झालेला असतो. त्याचे अंतकरण कोमल भावनेने भरलेले असते. रज, तम गुणांचे उच्चाटन होऊन केवळ सत्वगुणांची वस्ती असते, तेथे द्वेष लोभ यांना थारा नसतो. तेथे केवळ ज्ञानज्योती प्रकाशत असते. या शुध्द ब्रह्मज्ञानामुळे तो ब्रह्मरुपाशी सहज एकरुप होतो असे एका जनार्दनी म्हणतात.

अभंग 145

ब्रह्म सर्वगत सदा सम । जेथे आन नाही विषम ।
ऐसे जाणती ते अति दुर्गम । तयाची भेटी झालिया भाग्य परम ।
एसे कैसियाने भेटती ते साधु । ज्याचा अतर्क्य तर्कवेना बोधू ।
ज्यांसी निजानंदी आनंदु । ज्यांचा परमानंदी उद्बोधु ।
पवना पालवेल पालाण । पायी चढवेल गगन ।
भूतभविष्य कळो येईल वर्तमान । परी त्या साधुचे न कळे महिमान ।
चंद्रामृत सुखे सेववेल । रवि अस्ता जाता धरवेल ।
बाह्या हेळा सागर तरवेल । परी त्या साधूंची भेटी नव्हेल ।
जप, तप करवेल अनुष्ठान । ध्येय ध्याता धरवेल ध्यान ।
ज्ञेय ज्ञाता-विवर्जित ज्ञान । ज्ञाना-ध्यानाचे मूळ हे साधूजन ।
निजवृत्तीचा करवेल निरोधु । जीव-शिवाचा भोगवेल आनंदु ।
एका जनार्दनी निज-साधु । त्यांच्या दर्शने तुटे भव-बंधु ।

भावार्थ:

ब्रह्म हे सर्वत्र सलगपणे समप्रमाणात व्यापून राहिलेले आहे. जेथे कोठेहि विषमता नाही हे समजण्यास अत्यंत कठीण असलेले शुध्द तत्व जे जाणतात अशा ब्रह्मज्ञानी साधुंची भेट होणे हे अतिशय भाग्याचे लक्षण आहे. ज्यांचा उपदेश तर्काने जाणतां येत नाही.असे साधू आत्मानंदात निमग्न असतात त्यांचा उपदेश परम आनंद देणारा असतो. या साधुंचा महिमा समजून घेणेसुध्दा सामान्य माणसाच्या कुवती बाहेरचे आहे. कदाचित वाऱ्याला पदरात बांधणे शक्य होईल, पायाने आकाश चढून जाणे शक्य होईल, वर्तमान काळात राहून भूत आणि भविष्याचा वेध घेता येईल, पण या साधुंचा महिमा वर्णन करतात येणार नाही. एखादे वेळी मावळत्या सूर्याला रोकता येईल चंद्राचे शीतल चांदणे सुखाने सेवन करता येईल केवळ दोन्ही हातांनी सागर तरून जाता येईल परंतु या साधुंची भेट होणे संभवत नाही. ध्यानस्थ, ध्यान आणि ध्येय ही त्रिपुटी संपून ध्याता ध्येयाशी समरस होईल. ज्ञाता ज्ञेयाशी एकरूप होऊन ब्रह्मज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करीत असतांना समजून येईल की हे साधुजन ज्ञान आणि ध्यानाचे मूळस्थान आहेत. असे साधू स्वाभाविक वृतींचा नरोध करून जीवा-शिवाचे ऐक्य घडवून आनंद देणारे आहेत, त्यांच्या केवळ दर्शनाने संसाराची बंधने गळून पडतात असे एका जनार्दनी म्हणतात.

संतांची सेवा हे सर्वोत्तम साधन

अभंग १४६

संताचिये द्वारीं होईन द्वारपाळ ।
न सांगता सकळ करी काम
तेणें माझ्या जीवा होईल समाधान।<br. या परते साधन आणिक नाहीं
शेष उष्टावळी काढीन पत्रावळी ।
पूर्व कर्मा होळी सहज होईल
एका जनार्दनी हे चि मागत ।
नाही दुजा हेत सेवेविण


भावार्थ:

या अभंगात संत एकनाथ संतसेवेचे महत्त्व सांगत आहेत. संतांच्या घराचा द्वारपाळ होऊन त्यांची सर्व कामे केल्याने मनाला समाधान मिळेल. संतांच्या घरच्या उषट्या पत्रावळी काढल्याने पूर्वीच्या संचितकर्माची होळी होईल. एका जनार्दनी म्हणतात, हाताने संतसेवा घडावी एवढीच मागणी आहे. संतसेवेशिवाय अन्य कोणताही हेतू नाही.

अभंग १४७

संताचिये परिवारी । लोळेन मी निर्धारी ।
जीवा होईल महालाभ । ऐसा घडता उद्योग ।
सांडोनिया थोरपण । शिव घाली लोटांगण ।
आपुले महत्त्व । तेथे मिरवु नये सत्य ।
शरण एका जनार्दनी । ओवाळावा जीव चरणी ।

भावार्थ:

संताच्या परिवाराचा सुखेनैव सहवास घडल्याने जीवाला मोठा लाभ होईल. यामुळे शिवशंकर आपला थोरपणा सोडून पायाशी लोळण घेईल. एका जनार्दनी म्हणतात, संतपरिवारात आपला थोरपणा विसरून संतांच्या चरणी जीव ओवाळून टाकावा.

अभंग १४८

संत जाती हरि-कीर्तना । त्यांच्या वाहीन मोचे वहाणा ।
हेचि भवसिंधुचे तारु । तेणे उतरू पैल पार ।
जन्मोजन्मींचे भेषज । ते हे संत-चरण-रज ।
संत-चरणीच्या पादुका । झाला जनार्दन एका ।

भावार्थ:

संत हे संसारसागर तारून नेणारी होडी (तारू) असून त्यांच्या मदतीने भवसिंधु पार करणे सहज शक्य होते. संतांची पायधूळ हे जन्मोजन्मींची दु:खे दूर करणारे औषध आहे. संत जेव्हा हरिकीर्तनाला जातील तेव्हा त्यांच्या चरणांच्या पादुका होईन असे एका जनार्दनी म्हणतात.

अभंग १४९

संतांचिये घरी होईन श्वान-याती ।
उच्छिष्ट ते प्रीती मिळेल मज ।
तेणे या देहाची होईल शुध्दता ।
भ्रम मोह ममता निवारेल ।
आशा-पाश सर्व जातील तुटोनी ।
जीव हा बंधनी मुक्त होय ।
एका जनार्दनी भाकीन करुणा ।
श्री संत-चरणा वारंवार ।

भावार्थ:

संताच्या घरचा कुत्रा बनून राहिल्याने संतानी प्रेमपूर्वक दिलेले उष्टे अन्न खाण्यास मिळेल त्यामुळे देह-शुध्दी होईल. मोह, ममता यांचे निवारण होऊन सर्व प्रकारचा भ्रमनिरास होईल. आशा-पाश तुटून जीव बंधनातून मोकळा होईल. एका जनार्दनी म्हणतात, संतचरणांना वंदन करून त्यांच्या करुणेची वारंवार याचना करावी.

अभंग १५०

संत भलत याती असो । परी विठ्ठल मनी वसो ।
तया घालीन लोळणी । घेईन मी पायवणी ।
भलते ज्ञातीचा । विठ्ठल उच्चारी वाचा ।
तेथे पावन देह चारी । एका जनार्दनी निर्धारी ।

भावार्थ:

ज्याच्या मनात विठ्ठलभक्ती आहे असा संत कोणत्याही जातीचा असला तरी तो वंदनीयच आहे. विठ्ठलाचे नामस्मरण करणारा संत कोणत्याही जातीचा असला तरी त्याचे स्थूल, सुक्ष्म, कारण, महाकारण हे चारी देह नामजपाने पावन झालेले असतात. त्यांच्या पायाशी लोळण घ्यावी असे एका जनार्दनी खात्रीपूर्वक सांगतात.

अभंग १५१

तुम्ही संत जन । माझे ऐका हो वचन ।
कृपा करा मजवरी । एकदा दाखवा तो हरि ।
आहे तुमचे हाती । म्हणोनि येतो काकुळती ।
एका जनार्दनी म्हणे थारा । संती द्यावा मज पामरा ।

भावार्थ:

या अभंगात संत एकनाथ संतांना विनंती करीत आहेत की संतांनी कृपा करून एकदा तरी हरिदर्शन घडवावे. कारण ते त्यांना सहज शक्य आहे. हरी संतांच्या भक्तीचा भुकेला आहे. एका जनार्दनी म्हणतात, संतानी आपल्या पायाशी आसरा द्यावा अशी काकुळतीची याचना आहे.

==== संतसंगतीचा एकनाथांस आलेला अनुभव ====

अभंग १५२

संत-संगतीने झालें माझें काज । अंतरी ते निज प्रगटले ।
बरवा झाला समागम । अवघा निवारिला श्रम ।
दैन्य दरिद्र्य दूर गेले । संत-पाउले देखता ।
एका जनार्दनी सेवा । करीन मी आपुल्या भावा ।

भावार्थ:

संतकृपेने अंतरंगात हरिचे रूप प्रगट झाले. मनीचा हेत पूर्ण झाला. ही जिवा-शिवाची भेट फारच सुखदायक झाली. सर्व परिश्रमाचे निवारण झाले. संतांच्या चरण-दर्शनाने अवघे दैन्य, दारिद्र्य लयास गेले. एका जनार्दनी म्हणतात, अत्यंत भक्तिभावाने संताची सेवा करावी.

१५३

कैवल्य-निधान तुम्ही संत जन । काया वाचा मन जडले पायी ।
सर्व भावे दास अंकित अंकिला । पूर्णपणे झाला बोध देही ।
जे जे दृष्टी दिसे ते ते ब्रह्मरूप । एका जनार्दनी दीप प्रज्वळला ।

भावार्थ:

संतजन मोक्षप्राप्तीचे सर्वोतम साधन आहे, ते कैवल्य-निधान म्हणून ओळखले जातात. देहाने मनाने व वाचेने साधक संतांशी जोडले जातात. जे जे दृष्टीला दिसते ते ते सर्व ब्रह्मरूप आहे असा संपूर्ण बोध होऊन अंतरात ज्ञानदीप प्रकाशित होतो. या अपूर्व लाभाने साधक संताचा कायमचा दास बनतो.

अभंग १५४

धन्य दिवस झाला । संत समुदाय भेटला ।
कोडे फिटले जन्माचे । सार्थक झाले पै साचे ।
आजि दिवाळी दसरा । संत-पाय आले घरा ।
एका जनार्दनी झाला । धन्य दिवस तो माझा ।

भावार्थ:

संतांचा समुदाय भेटल्याने मनातले सर्व संशय विलयास गेले. मनुष्य देहाचे सार्थक झाले. आजचा दिवस धन्य झाला कारण संतांचे पाय घराला लागले. जनार्दनस्वामींनी एकनाथांचा शिष्य म्हणून स्विकार केला.घरात दिवाळी, दसरा साजरा झाला असे एका जनार्दनी म्हणतात.

155

केला संती उपकार । दिधले घर दावूनी ।
न ये ध्यानी मनी लक्षी । तो प्रत्यक्षी दाविला ।
संकल्पाचे तोडिले मूळ। आले समूळ प्रत्यया ।
एका जनार्दनी कृपावंत । होती संत सारखे ।

भावार्थ:

ज्या परमेश्वराचे रुप ध्यानाने, मनाने, बुध्दीने प्रयत्न करूनही दिसत नाही त्या विठ्ठलाचे घर दाखवून तो प्रत्यक्ष डोळ्यांना दाखवला हे संतांचे फार मोठे उपकार आहेत. मनातला संकल्प फळास आला. एका जनार्दनी म्हणतात, सर्व संत सारखेच कृपावंत असतात.

अभंग १५६

मोकळे ते मन ठेविले बांधूनि । जनार्दन-चरणी सर्व भावे ।
स्थिर मती झाली वार्ता तेहि गेली । द्वैताची फिटली सर्व सत्ता ।
एका जनार्दनी धन्य संतसेवा । उगविला गोवा गुंतत सर्व ।

भावार्थ:

मोकाट भटकणारे मोकळे मन सद्गुरू जनार्दनस्वामींच्या चरणाशी बांधून ठेवले. सर्वभावे त्यांना शरण गेल्याने बुध्दी गुरुचरणांशी स्थिर झाली. मनातील द्वैतभाव विलयास गेला. मनातील संशयाचा गोंधळ निमाला. एका जनार्दनी म्हणतात, संतसेवेमुळेच हे सर्व घडून आले. संतसेवा धन्य होय.


अभंग 157

संत-द्वारी कुतरा झालो । प्रेम-रसासी सोकलो ।
भुंकत भुंकत द्वारा आलों। ज्ञान-थारोळ्या बैसलो ।
कुतरा भुंकत आला हिता । संती हात ठेविला माथा ।
कुत्रा गळ्याची साखळी । केली संतांनी मोकळी ।
एका जनार्दनी कुतरा । दात पाडुनी केला बोचरा ।

भावार्थ:

संत एकनाथ सांगतात, कुत्रा होऊन भुंकत भुंकत संताच्या दाराशी आलो. संताच्या ज्ञानरुपी थारोळ्यात (डबक्यात) बसून प्रेमरसाचे प्राशन केले. आपल्या हितासाठी याचना करीत असतांना संतानी कृपा करुन मस्तकावर हात ठेवला आणि गळ्याची साखळी मोकळी केली. याचना करणारे तोंड दात पाडून बोचरे केले. येथे एका जनार्दनी आपली गुरुनिष्ठा व विनयशीलता प्रकर्षाने प्रकट करीत आहेत.

गुरु-भक्ति

अभंग 158

मनोभाव जाणोनि माझा । सगुण रुप धरिलें वोजा
पाहुणा सद्गुरू-राजा। आला वो मायें
प्रथम अंत:करण लाभ । चित्त शुध्द आणि मन
चोखाळोनि आसन। स्वामींनी केलें
अनन्य आवडीचे जळ । प्रक्षाळिलें चरण-कमळ
वासना समूळ । चंदन लावी
अहं जाळियेला धूप। सद्भाव उजळिला दीप
पंच प्राण हे अमूप । नैवेद्य केला
एका जनार्दनी पूजा । देव भक्त नाहीं दुजा
अवघा चि सद्गुरु-राजा होवोनी ठेला

भावार्थ:

शिष्याचे मनोगत सद्गुरूंनी जाणून घेतले आणि सगुण रुपाने साकार झालें. सद्गुरु-राजा पाहुणा होऊन घरासी आला असून त्यांच्या कृपेनें अंत:करण म्हणजे चित्त व मन शुध्द झाले.या निर्मळ अंतकरणांत स्वामींनी आपले आसन स्थिर केलें गंगाजला सारख्या पवित्र जलानें सद्गुरुंचे चरण धुतले. वासना रुपी चंदनाचे खोड उगाळून त्याना चंदनाचा टिळा लावला.अहंकार रुपी धूप व सद्भावनेचा दीप प्रज्वलित केला.प्राण,आपान, व्यान उदान,समान या पंच-प्राणांचा नैवेद्य केला.अशा प्रकारे सद्गुरुंची षोडपोचारे पूजा केली,असे सांगून एका जनार्दनी म्हणतात,देव व भक्त यांमध्ये द्वैत नसून सद्गुरू हेच देवता रुप आहेत यांत संशय नाही.

अभंग १५९

श्रीगुरुंचे नाम-मात्र । तेचि आमुचे वेदशास्त्र |
श्रीगुरुंचे चरण-रज । तेणे आमुचे झाले काज |
श्रीगुरुंची ध्यान-मुद्रा । तेचि आमुची योग-निद्रा |
एका जनार्दनी मन । श्रीगुरु-चरणी केले लीन |

भावार्थ:

श्रीगुरुंचे नाम हेच शिष्यांचे वेदशास्त्र असून सद्गुरुंच्या चरणाची धूळ मस्तकी धारण केल्याने शिष्याचे सर्व मनोरथ पूर्ण होतात. श्रीगुरुंच्या प्रतिमेवर ध्यान लावून उपासना करणे हीच शिष्याची योग-निद्रा होय असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, सद्गुरुंच्या चरणी मनाला सर्वार्थाने लीन केल्याने योग-निद्रेचा अपूर्व अनुभव मिळाला.

अभंग १६०

गुरु परमात्मा परेशु । ऐसा ज्याचा दृढ विश्वासु |
देव तयाचा अंकिला । स्वये संचला त्याचे घरा |
एका जनार्दनी गुरु देव । येथे नाही बा संशय |

भावार्थ:

गुरु हाच प्रत्यक्ष परमेश्वर आहे असा ज्याचा दृढ विश्वास असतो त्याच्यावर परमेश्वराचा विश्वास असतो. देव त्याचा अंकित असतो. देव स्वत: हा त्याच्या घरच्या पाहुणा म्हणून येतो. सद्गुरू जनार्दनस्वामी परमेश्वराचे रूप आहेत याबाबत कोणताही संशय नाही असे एका जनार्दनी नि:संशयपणे सांगतात.


अभंग १६१

सेवेची आवडी । आराम नाही अर्ध घडी |
नित्य करिता गुरु-सेवा । प्रेम पडिभर होत जीवा |
आळस येवोचि सरला । आराणुकेचा ठावो गेला |
तहान विसरली जीवन । भूक विसरली मिष्टान्न |
ऐसे सेवे गुंतले मन । एका जनार्दनी शरण |

भावार्थ:

गुरुसेवेची मनात आवड निर्माण झाली की अर्धा ताससुध्दा आराम करावा असे वाटत नाही. सतत गुरुसेवेत गुंतलेल्या मनात गुरुविषयीचा प्रेमभाव वाढत असून आळस कायमचा पसार होतो. आराम करण्याची इच्छाच होत नाही, तहान, भूकेची जाणिवच होत नाही. गुरुसेवेत अशारितीने मन एकाग्र होते, असे एका जनार्दनी म्हणतात.

अभंग १६२

येवढे जया कृपेचे करणे । रंक राजेपणे मिरवती |
तो हा कल्पतरु गुरु जनार्दन । छेदी देहाभिमानु भव कंदु |
कृपेचे गोरसे धावे कामधेनु । तैसा माझा मनु देखलासि |
एका जनार्दनी तया वाचुनि कही । दुजे पाहणे नाही मनामाजी |

भावार्थ:

सद्गुरू जनार्दनस्वामी इच्छिलेले फळ देणारे कल्पतरु असून त्यांनी देहाभिमान समूळ नाहीसा करुन भव-बंधने छेदून टाकावित. संतकृपेने रंकाचा राजा बनतो. सद्गुरू जनार्दनस्वामी हे कामधेनु असून त्यांच्या कृपारुपी गोरसासाठी मनाला वेध लागला आहे. स्वामींच्या कृपाप्रसादाशिवाय कोणत्याही इतर वासना मनात नाही असे एका जनार्दनी म्हणतात.

अभंग १६३

साधावया परमार्था । साह्य नव्हेती माता-पिता |
साह्य नव्हेती व्याही जावुई । आपणा आपण साह्य पाही |
साह्य सद्गुरू समर्थ । तेचि करिती स्व:हित |
एका जनार्दनी शरण । नोहे एकपणा वाचून |

भावार्थ

परमार्थ साधण्यासाठी आई-वडील, व्याही, जावई यापैकी कुणाचेही साह्य होत नाही. आपणच आपले साह्यकारी असतो. परमार्थात सद्गुरूच समर्थपणे मदत करु शकतात. तेच आपले हित करु शकतात. एका जनार्दनी म्हणतात, सद्गुरूचरणी एकनिष्ठपणे शरणागत होण्यानेच परमार्थ साधणे शक्य आहे.

अभंग १६४

दासा दु:ख झाले फार । वेगी करा प्रतिकार |
पुण्य-स्थान मी पावलो । गुरु-चरणी विश्रामलो |
कर जोडूनिया सिर । ठेवियेले पायांवर |
जन्म-नाम जनार्दन । मुखी गुरु-अभिमान |

भावार्थ:

संत एकनाथ म्हणतात, सद्गुरू जनार्दनस्वामींच्या पुण्यपावन नगरात येऊन गुरुचरणांचा आश्रय घेतला, दोन्ही कर जोडून चरणांवर मस्तक ठेवले. स्वामींवर पूर्णपणे विसंबून दासाच्या दु:खाचा प्रतिकार करण्याची काकुळतीने विनंती केली.

अभंग १६५

जन्मोजन्मीचे संचित । गुरु-पायी जडले चित्त |
ते तो सोडिल्या न सुटे । प्रेम-तंतू तो न तुटे |
दु:खे आदळली वरपडा । पाय न सोडा हा धडा |
एका जनार्दनी निर्धार । तेथे प्रगटे विश्वंभर |

भावार्थ:

अनेक जन्मांचे साचलेले पुण्य-कर्म फळास आले आणि गुरु-चरणांशी चित्त (मन) जडले. प्रयत्न करुनही आता ते गुरुचरणांपासून अलग होणार नाही, हा प्रेमाचा धागा तुटणार नाही. कितीही दु:खे कोसळली तरी गुरु-चरण सोडणार नाही असा मनाचा निश्चय असून गुरुचरणीच विश्वंभर प्रगट होईल असा विश्वास एका जनार्दनी प्रगट करतात.

अभंग १६६

जय जय वो जनार्दने विश्वव्यापक संपूर्ण वो |
सगुण अगुण विगुण पूर्ण पूर्णानंदघन वो |
ब्रह्मा विष्णु रुद्र निर्माण तुजपासोनी वो |
गुण-त्रय उभय-पंचक तूचि अंत:करणी वो |
जागृति स्वप्न सुषुप्ति तुर्या उन्मनी हे स्थान वो |
विश्व तेजस प्राज्ञ प्रत्यगात्मा तू संपूर्ण वो |
त्वंपद तत्पद आणिक असिपद ते तू एक वो |
नसोनि एकपणी एका एकी जनार्दन वो |

भावार्थ:

सद्गुरू जनार्दनस्वामी प्रत्यक्ष परमेश्वराचे रूप असून ते संपूर्ण विश्वव्यापक आहेत. ते सगुण, निर्गुण या दोन्ही विशेष रुपाने अस्तित्वात असून आनंदमय आहेत. ब्रह्मा, विष्णु, महेश ही सद्गुरुंची वेगवेगळी रूपं आहेत. सत्व, रज, तम, पाच ज्ञानेंद्रिये व पाच कर्मेंद्रिये या सर्वांच्या अंतर्यामी सद्गुरूरुपच अवस्थित आहे. सावधानता, स्वप्नावस्था, गाढ झोप, साक्षात्कारी व मनाची उदात्तता या सर्व अवस्थांचा सद्गुरू साक्षीदार आहे. सद्गुरू विश्वरूप, स्वयंप्रकाशी, सर्वज्ञानी असून चैतन्यरुपाने सर्वात्मक आहेत.अहम्, त्वम् व तत्पदाने सद्गुरू सर्वांच्या चित्तात विराजमान आहेत. सद्गुरू जनार्दन व एका जनार्दनी देहाने वेगळे दिसले तरी आत्मरुपाने ते एकरुपच आहेत असे एका जनार्दनी म्हणतात.

१६७'

रामाईवो । सीतेकारणे रामे रावण वधिलियो |
देवगण सोडून सुखी केलीयो |
कृष्णाईवो देवकी बंदीशाळे त्याकारणे धावलीयो |
धरुन लीला कंसमामासी मारलीयो |
बोधाईवो | भक्तिभाव देखुनी तिष्ठत भीमातीरीयो |
पुंडलीकाकारणे सकळ जग उधादरिलीयो |
एका जनार्दनी देखिलीयो | आई वैदीण प्रसन्न झालीयो | सकळ सुख देखलियो |

भावार्थ

या भजनात संत एकनाथ राम-कृष्ण लीलांचे वर्णन करतात. सीतेसाठी श्रीरामांनी रावणाचा वध करून सर्व देवांची रावणाच्या बंदीवासातून सुटका केली. श्रीकृष्णाने आपल्या देवकीमातेची कंसाच्या बंदीशाळेतून सुटका करण्यासाठी कंसमामाचा वध केला. पुंडलिकाचा भक्तिभाव पाहून त्याच्यासाठी भीमा नदीच्या तीरावर अठ्ठावीस युगे तिष्ठत उभा राहून सकळ जगाचा उध्दार केला. एका जनार्दनी म्हणतात, आई जगदंबा प्रसन्न झाल्याने सर्व सुख प्राप्त झाले.

भक्ति-योग

परमेश्वर-स्तवन

१६८

सुंदर ते ध्यान मांडिये घेउनी | कौसल्या जननी गीती गाये |
सुंदर ते ध्यान नंदाचे अंगणी । गोपाळ गौळणी खेळताती |
सुंदर ते ध्यान चंद्रभागे तटी । पुंडलिका पाठी, उभे असे |
सुंदर ते ध्यान एका जनार्दनी । जनी वनी मनी भरलासे |


भावार्थ

अत्यंत मोहक अशा रामाला मांडीवर घेऊन कौसल्यामाता गीत गाते. मनमोहन बालकृष्ण नंद राजाच्या अंगणात गोपाळ, गोपिकांबरोबर खेळ खेळतो. सर्वांगी सुंदर असा श्रीकृष्णभक्त पुंडलिकासाठी चंद्रभागेच्या तटावर उभा राहिला आहे. एका जनार्दनी म्हणतात, हाच परमेश्वर विश्वातील सकळ लोकात, सर्व वनस्पतींमध्ये आणि प्रत्येक व्यक्तीच्या मनात भरून राहिला आहे.

'१६९

वेद जया लागलं नित्य वाखाणिती । तो हा वेदमूर्ति पांडुरंग |
रवि-शशी दीप्ति जेणे प्रकाशती । तो हा तेजोमूर्ति पांडुरंग |
पांचा भूतांची जो करितो झाडणी । तो ज्ञान-खाणी पांडुरंग |
राजा त्रैलोक्याचा गुरुराज स्वामी । वसे अंतर्यामी पांडुरंग |
प्रभा हे जयाची पसरली जनी । चि ची खाणी पांडुरंग |
परोपकारी लागी अवतार केला । आनंदाचा झेला पांडुरंग |
नेई भक्तांसी जो आपल्या समीप । तो हा मायबाप पांडुरंग |
इतिकर्तव्यता हेचि दास लागी । सेवावा हा जगी पांडुरंग |
एका जनार्दनी देह हरपला । होउनी राहिला पांडुरंग |

भावार्थ

सामवेदासह चारही वेद ज्याचे नित्य स्तवन करतात असा हा पांडुरंग वेदमूर्ती म्हणुन पुजला जातो. सूर्य,चंद्र या ज्योती प्रकाशित करणारा पांडुरंग तेजोमूर्ती म्हणुन ओळखला जातो. पृथ्वी,आकाश,जल,अग्नी,वायु या पाचही महाभूतांवर ज्याची सत्ता आहे असा पांडुरंग ज्ञानाची खाण असून तो स्वर्ग, पृथ्वी, पाताळ या तिन्ही लोकांचा गुरुराज स्वामी आहे. असा हा पांडुरंग सर्वांच्या अंतरंगी वसत असल्याने त्याची प्रभा सर्वत्र व्यापून राहिली आहे आणि जगत्-जन याच पांडुरंगाच्या रुपाने नटले आहे. सामान्य लोकांच्या उध्दारासाठी पांडुरंग अनेक अवतार धारण करतो. एकनिष्ठ भक्तांना वैकुंठात स्थान देवून चिरंजीव करतो. असा हा पांडुरंग प्रेमळ भक्तांचा मायबाप बनून त्यांना आनंदी करतो, अशा पांडुरंगाचे दास होऊन सेवा करण्यातच जीवनाची सार्थकता आहे असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, अनन्य भक्त पांडुरंगाशी एकरुप होऊन पांडुरंगच होतो.

१७०

विश्व पाळिताहे हरि | दासा केवी तो अव्हेरी |
नव मास गर्भवास | नाही भागला आम्हांस |
बाळपणी वाचविले | स्तनी दुग्ध ते निर्मिले |
कीटक-पाषाणात असे | त्याचे मुखी चारा असे |
धरा धरा हा विश्वास | एका जनार्दनी त्याचा दास |

भावार्थ

जो पांडुरंग विश्वाचे पालन करतो, तो आपल्या भक्तांकडे दुर्लक्ष करणार नाही. नऊ महिन्यांच्या गर्भवासात सांभाळ करतो, बाळपणी पोषण करण्यासाठी दुधाची सोय करतो. पाषाणात वसत असलेल्या बेडकीसाठी जो चारा पुरवतो, त्या परमेश्वरावर विश्वास ठेवा असे एका जनार्दनी सांगतात.

१७१

चरणांची थोरी । जाणे गौतम-सुंदरी |
हृदयाची थोरी । भक्त जाणती परोपरीने |
करांची ती थोरी । जाणे सुदामा निर्धारी |
सम-चरणींची शोभा । एका जनार्दन उभा |

भावार्थ

श्री रामाच्या चरणांची थोरवी गौतम ऋषीची पत्नी पतिव्रता अहिल्याच जाणू शकते.ऋषींच्या शापाने पाषाण बनलेली अहिल्या रामाच्या केवळ पद-स्पर्शाने शाप-मुक्त होते. परमेश्वराच्या हृदयाची थोरवी भक्त प्रल्हाद, ध्रुव, पुंडलिक या सारखे प्रेमळ भक्तच समजू शकतात.मित्र सुदाम्याची नगरी सुवर्णाची करणाऱ्या श्री हरिच्या हातांची थोरवी केवळ सुदामा च जाणू शकतो.विटेवर उभ्या असलेल्या विठ्ठलाच्या सम-चरणांची शोभा केवळ एका जनार्दनच अनुभवू शकतात.

172

चरण वंदिती कां निंदिती । ते हि हरिपदा जाती
चरण वंदितां तरली शिळा। निंदिता तारिलें शिशुपाळा
ऐसे चरणांचे महिमान । एका जनार्दनी शरण

'भावार्थ

परमेश्वराच्या चरणांना वंदन करणारे एकनिष्ठ भक्त जसे परमेश्वराच्या समीप राहाण्याचा मान मिळवतात तसेच देवाची निंदा करणारे सुध्दां सलोकांत जातात. श्रीरामाच्या चरणांना भक्तिभावाने वंदन करणारी अहिल्या राघवाने शाप -मुक्त केली. शिशुपाळ सतत श्री कृष्णाचा द्वेष करीत असे ,पांडवांच्या राजसूय यज्ञ-प्रसंगी गवळ्याचा पोर असे संबोधून श्री कृष्णाला भर-सभेंत अपमानित केले. अखेर शंभर अपराधा नंतर श्री कृष्णाने शिशुपालाचा सुदर्शन चक्राने वध केला परंतू शिशुपाल ही मुक्ती चा अधिकारी झाला.एका जनार्दनी परमेश्वराच्या चरणांचे महिमान वर्णंन करतात.

173

बहुतांची मतांतरे तीं टाकुनी । विठ्ठल-चरणी बुडी दे का
नव्हे तुज बाधा काळाची आपदा। ध्याई तूं गोविंदा प्रेम-भरित
जनार्दनाचा एका लिहून चरणी। बोलतसे वाणी करुणा-भरित

भावार्थ

जगांत अनेक भिन्न भिन्न स्वभावाचे लोक असतात त्यांची मते, विचार भिन्न असणे स्वाभाविक आहे.या मत -भिन्नतेकडे दुर्लक्ष करून विठ्ठल भक्तिंत दंग होऊन राहिल्यास कोणतिही संकटे ,काळाची बाधा भेडसवणार नाहीत असे सांगून एका जनार्दनी म्हणतात,भक्ती-प्रेमाने गोविंदाचे ध्यानांत मग्न व्हावे.

174

निवांत श्रीमुख पहावें डोळे भरी ।
तेथें नुरे अंतरी इच्छा कांही
चरणीं ते मिठी घालावें दंडवत।
तेणें पुरे आर्त सर्व मनीचे
हृदय-कमळीं पहावा तैसा ध्यावा।
एका जनार्दनी विसांवा सहज चि

भावार्थ

निवांतपणे बसून श्री हरीचे मुख डोळे भरून पहावें या दर्शनाने मनातील सर्व वासना लोप पावतात.श्री हरीला दंडवत घालून चरणांना मिठी घातली की, मनातील सर्व कामना पूर्ण होतात.अंतरंगात दडलेल्या श्री मुर्तीचे ध्यान करतांना मनाला सहजपणे विसावा प्राप्त होईल असे एका जनार्दनी सांगतात.

175

राम हें माझ्या जीवींचे जीवन । पाहतां मन हें झालें उन्मन
साधन काही नणें मी अबला । श्याम हें बीज बैसलेंसे डोळां
लोपली चंद्र सूर्याची कळा। तो माझा राम जीवींचा जिव्हाळा
प्रकाश दाटला दाही दिशा। पुढें हो मार्ग न दिसे आकाशा
खुंटली गति श्वासा -उच्छवासा। तो राम माझा भेटेल कैसा
यांसी हो साच परिसा कारण। एका जनार्दनी शरण तरी च साधन

भावार्थ

सावळ्या श्री रामाची मूर्ती पाहातांना ती डोळ्यांत रुतून बसली.राम-मुर्तीच्या प्रभेने चंद्र सूर्याचा प्रकाश लोपून गेला.राम-मुर्तीची प्रभा दाही दिशांत व्यापून राहिली.आकाशातिल पुढील मार्ग दिसेनासा झाला.श्वासाची गती खुंटली. श्री राम हा साधकांच्या जीविचा विसावा असून त्याच्या दर्शनानें मनाचे उन्मन होते.मन व्यवहारिक पातळीवरुन पारमार्थिक पातळीवर स्थिर होते. राम-भेटीची आस लागते.एका जनार्दनी म्हणतात,राम-चरणी संपूर्ण शरणागती हे च एकमेव साधन आहे.त्यां मुळे मनाची तळमळ शांत होईल.


176

कृष्णा धांव रे लवकरी । संकट पडलें भारी
हरि तूं आमुचा कैवारी । आलें विघ्न निवारी
आजि कां निष्ठुर झालासी होईल बा गति कैसी
अनाथ मी देवा परदेशी । पांव तूं वेगेसीं
आतां न लावी उशीर । अनर्थ करील फार
एवढा करीं उपकार । दे दर्शन सत्वर
कंठ शोषला अनंता । प्राण जाईल आतां
पदर पसरितें अच्युता । पाव रुक्मिणी -कांता
ऐकुनी बहिणीची करुणा । आला यादव -राणा
द्रौपदी लोळत हरि-चरणा । एका जनार्दना

भावार्थ

येथे एका जनार्दनी द्रौपदी वस्त्र हरणाच्य प्रसंगाचे वर्णन करतात.या प्रसंगी द्रौपदीने केलेला कृष्णाचा धांवा करूण-रसाने भरला आहे.आपण भयंकर मोठ्या संकटांत सापडलो असून हे विघ्न निवारण करण्यासाठी श्री हरीने सत्वर धावून यावे कारण हरि आपला कैवारी असून अनाथ एकाकी पडलेल्या बहिणीसाठी त्यानें वेगाने धाव घ्यावी अशी कळकळीची विनंती द्रौपदी करीत आहे.कंठ शोषला असून प्राण जाईल अशी व्याकूळ अवस्था झाली आहे.आता उशीर केल्यास फार मोठा अनर्थ घडून येईल,या प्रसंगी निष्ठुर न होतां,अच्युताने त्वरेने येऊन उपकार करावा अशी पदर पसरून विनंती केली आहे.बहिणीची करुणा येऊन दयाघन यादव-राणा धावत आला आणि द्रौपदीने हरि-चरणाशी लोळण घेतली.

177

तें मन निष्ठुर कां केलें । जें पूर्ण दयेनें भरलें
गजेंद्राचे हाके सरिसे । धांवुनियां आलें
प्रल्हादाच्या भावार्थासी । स्तंभी गुरगुरलें
पांचाळीच्या करुणा-वचने । कळवळूनी आलें
एका जनार्दनी पूर्ण कृपेनें ।निशिदिनी पदीं रमले

भावार्थ

परमेश्वराचे मन कृपेने,कारुण्याने पूर्णपणे भरलेलें आहे,याची अनेक वेळां प्रचीती आली आहे.जेव्हां गजेंद्राचा पाय मगरीने पकडून त्याला पाण्यांत ओढून नेवू लागली तेंव्हा प्राणांतिक वेदनेनें संकटात सापडलेल्या गजेंद्राने श्री हरिची प्रार्थना केली असतां श्री कृष्णाने धावत येऊन गजेंद्राची सुटका केली.प्रल्हादाचा भक्तिभाव जाणून नरसिंह रुपाने खांबातून प्रगट होऊन हिरण्यकश्यपू नावाच्या दैत्याचा वध केला.द्रौपदी वस्त्र हरणाच्या प्रसंगी पांचाळीचा करुणेचा धांवा ऐकून कळवळले आणि मदतीसाठी धावून आले.एका जनार्दनी म्हणतात,सद्गुरू जनार्दन स्वामींच्या पूर्ण कृपेने मन प्रेम-भक्तिने रात्रं-दिवस प्रभू-चरणीं रममाण झाले.

178

भजन नाहीं मी अकर्मी वायां।अभिनव अवगति झाली देवराया
नीचा नीच मीचि एक। मजवरी उपरी वर्ते सकळ लोक
अंधा अंध अधोगत पाहीं । मजहूनि अंध कोणी नाहीं
एका जनार्दनी नीच हा गेला। मुंगियेचे पायी सगळा सामावला।

भावार्थ

जो मनुष्य जन्माला येऊन परमेश्वराचे भजन करीत नाही तो कर्म न करणारा कर्म-करंटा समजला जातो.ही माणसाची अधोगती आहे. तो सर्वांत नीच पातळीवर असतो.त्याच्यापेक्षा सर्व लोक उच्च पातळीवर असतात.अज्ञानी व्यक्ती इतरांना अज्ञानी समजते.परंतू त्याच्या पेक्षा अज्ञानी कोणी नाही हे त्याच्या लक्षात येत नाही.एका जनार्दनी विनयाने आपली गणना अशा अज्ञानी लोकांमध्यें करतात.

179

आनंदाचा भोग घालीन आसनी। वैकुंठ-वासिनी तुझे नांवे
येई वो विठ्ठल अनाथांचे नाथें । पंढरी -दैवते कुळ-देवी
आपुलें म्हणावे सनाथ करावें।एका जनार्दनी वंदावें संत-जना ।

भावार्थ

या भजनांत संत एकनाथ आपण अनाथ असून वैकुंठवासी विठ्ठलाने आपणास साथ करावें अशी प्रार्थना करीत आहेत. पंढरीच्या या कुल-देवीने या भक्तास आपलेसे केल्यास ही पंढरी आनंदाने भरुन टाकीन असे एका जनार्दनी म्हणतात.

180

मागणें हें चि माझें देवा । दुजेपण दुरी ठेवा
मी-तूं ऐसी नको उरी । जनार्दना कृपा करीं
रंक मी एक दीन । माझें करावें स्मरण
नीच सेवा मज द्यावी । एका जनार्दनी आस परवावी

भावार्थ

या भजनांत एका जनार्दनी देवाला प्रार्थना करतात कीं,देव व भक्त यां मध्ये दुजेपणा,मी-तू पणा असा द्वैतभाव नसावा.गुरु-कृपेनेच परमेश्वराशी अद्वैत साधणे शक्य होईल अशी श्रद्धा असल्याने संत एकनाथ सद्गुरू कडे याचना करतात,आपण अत्यंत दीन-दुबळे असून स्वामींनी कोणत्याही प्रकारची नीच सेवा देऊन उपकृत करावे.आपली आठवण ठेवून मनाची आस पुरवावी.

181

जेथे जेथें मन जाईल वासना। फिरवावें नारायणा हें चि देई
वारंवार द्यावा नामाचा आठव। कुबुध्दीचा ठाव पुसा सर्व
भेदाची भावना तोडावी कल्पना। छेदावी वास-समूळ कंद
एका जनार्दनी नको दुजा छंद । राम कृष्ण गोविंद आठवावा

भावार्थ

ज्या ज्या ठिकाणी मनाची वासना जाईल तेथून ती परत फिरवावी एव्हढी एकच मागणी एका जनार्दनी नारायणाकडे करीत आहेत. वारंवार नामाची आठवण द्यावी, भेदाची भावना तोडून वाईट वासना समूळ नाष्ट करावी राम कृष्ण गोविंदा शिवाय मनाला दुसरा कोणताही छंद नसावा आशी ईच्छा एका जनार्दनी येथें व्यक्त करतात.

182

सर्वा भूतीं तुझे रूप। हृदयी सिध्द चि स्वरूप
इतुलें देई अधोक्षजा । नाही तरी घोट भरीन तुझा
सकळांहूनी करी सान। सकळिका सम समान
नि:शेष दवडोनिया स्वार्थ । अवघा करी परमार्थ
एका जनार्दनी मागे। नाही तरी घाला घालीन अंगे

भावार्थ

सर्व प्राणिमात्रांच्या अंतरंगी परमात्म्याचे रुप विराजमान आहे याची जाणीव सतत हृदयांत जागृत राहू द्यावी अशी अपेक्षा संत एकनाथ येथे व्यक्त करतात.सर्वच सजींवांवर सारखीच कृपा-दृष्टी ठेवावी,मनातील स्वार्थीपणाची भावना नाहिशी करून सर्वांना परमार्थी करावें,अशी निर्वाणिची मागणी एका जनार्दनी श्री हरीच्या (अधोक्षज) चरणांशीं करीत आहेत.

183

तुज सगुण जरी ध्याऊं तरी तूं परिमाण होसी
तूज निर्गुण जरी ध्याऊं तरी तू लक्षा न येसी
सात चि वेद-पुरुषा न कळसी श्रृती -अभ्यासेंसीं
तो तूं नभाचा जो साक्षी शब्दीं केवीं आतुडसी
जय रामा रामा सच्चिदानंद रामा
भव-सिधु-तारक जय मेघ-श्यामा
अनंत-कोटी-ब्रह्मांडधीशा अनुपम्य महिमा
अहं सोनं ग्रासून हें तों मागतसे तुम्हां
अष्टांग योगे शरीर दंडुनी वायुसी झुंज घेऊं
तेथें बहुसाल अंतराय तयाचा येतसे भेऊ
कर्म चि जरीं आचरूं दृढ धरूनियां बाहो
तेथें विधि - निषेधाचा मोठा अंगीं वाजतसे धावो
जनीं जनार्दन प्रत्यक्ष डोळां कां न दिसे यासी
समताहंकृती योगी बुडविती साधन आश्रमासी
एका जनार्दनी सिध्द साधन कां न करिसी
सांडी मांडी न लगे मग तूं अवघा राम चि होसी

भावार्थ

परमेश्वराचे सगुण रुपांत ध्यान करावे तर तो विश्व-व्यापी परमेश्वर एकदेशी बनून स्थळ-काळानें मर्यादित होतो. निर्गुण रूपांत ध्यान करीत असतांना रुप डोळ्यांना अगोचर असल्याने ध्यानात येत नाही.याच कारणाने वेदांना आणि श्रुतींना परमेश्वराचे रूप अगम्य आहे.जो परमात्मा अनंत आकाशाचा साक्षी आहे त्याचे वर्णन शब्दांत करणे अशक्य आहे.अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायकाचा महिमा वर्णनातित आहे.अष्टांग योगाच्या अभ्यासाने किंवा कर्मयोगाचे नियमित आचरण करूनही या परम तत्वाचा वेध घेता येत नाही. एका जनार्दनी म्हणतात,या सर्व अवघड मार्गांनी जाण्यापेक्षा भक्ती-मार्गाचा अंगीकार करणे सुलभ आहे.राम-नामाचा जप करता करता भक्त देव बनतो.सत् चिदानंद ,भवतारक मेघश्याम रामाचे नाम च सिध्द-मंत्र आहे.


184

जय गोविंदा परमानंदा ऐक माझे बोल
निर्गुणरूपे असतां तुझें कांहीं च नव्हे मोल
मग तूं माया धरूनि अति झालिसी सबळ
नसतें देवपण अंगीं आणुनि चाळविसी केवळ
नसतां तुज मज भेद देवा लटिके जीवपण देसी
आपुलें ठाईं थोरपण आणुनी आमुची सेवा घेसी
नसती अविद्या पाठीं लावुनी संसारीं गोंविसी
नाना कर्मे केली म्हणुनि आम्हां कां दंडिसी
आपुली महिमा वाढो म्हणुनी आकस आरंभिलें
तुज मज देवा वैर ऐसे करितां नव्हे भले
ऐसें तुज मज वैर म्हणुनी गुरुसी शरण गेलों
देव-भक्तपण कोण्या कर्मे मग पुसों लागलं
सद्गुरु म्हणती सर्व हि मायिक निश्चयें वोलिलों
देव आणि भक्त एक चि गोष्टीसी पावलों
आतां सद्गुरु-वचनें तुझे गिळीन देवपण
तुझिया नेणों भक्तावरी घालीन पाषाण
जीव शिव दोन्ही मिळोनि मग मी सुखें राहीन
तुज मज रुप ना रेखा त्याते निर्धारीन
ऐसे भक्तबोल ऐकुनी देवा थोर उपजली चिंता
विवेक-बळें करुनी माझे देवपण उडवील आतां
या लागीं भिणें भक्त-जनांसी ऐक्य करुनी तत्वतः
एका जनार्दनी दर्शन द्यावें लागेल त्वरितां

भावार्थ

या भजनांत संत एकनाथ देवापुढे देवा विषयी तक्रार करीत आहे. परमानंद गोविंदाला आपले खडे बोल सुनावले आहेत. परमेशाने सगुण रुप धारण केले नसते तो केवळ निर्गुण निराकार रुपांत असतां तर भक्तांच्या दृष्टीने काहीं मोल नाही. हे भक्तांचे मनोगत जाणून देवाने मायेचा आधार घेऊन नसते देवपण स्विकारलें आणि भक्तांना खोटे जीवपण दिले. स्वता:कडे थोरपणा घेऊन भक्तांकडून सेवा घेऊ लागला. भक्तांची अविद्या, अज्ञान यांचा फायदा घेऊन त्यांना जन्म-मरणाच्या संसार-चक्रांत अडकवले. आपले महत्त्व वाढवण्यासाठी कर्मफल म्हणून शिक्षा देऊ लागलास. एका जनार्दनी म्हणतात. असा आकस धरून वैर करणे योग्य नाही. देव -भक्तांत असे वैर निर्माण झाल्याने भक्त गुरु-चरणाला शरण गेले. देवाला देवपण आणि भक्ताला भक्तपण कोणत्या कर्माचे फळ आहे असे विचारु लागले. ही सर्व माया (नश्वर) आहे असा सद्गुरुंनी निर्णय दिला. देव आणि भक्त एकरुप आहेत या सद्गुरू वचनाने देवाचे देवपण गळून पडले. जीव हे शिवाचे अंशरुप आहे, देव -भक्तांत अद्वैत आहे. या सिध्दाताने भक्त सुखी झाले असून देवाला चिंता लागली. भक्त विवेक बळाने आपले देवपण उडवील अशी चिंता लागून राहिल्याने देव च भक्त -जनांना घाबरू लागला. आता भक्तांसी ऐक्य करण्यासाठी देवाला दर्शन द्यावे च लागेल असे एका जनार्दनी म्हणतात.

भक्ताचा संकल्प

185
आम्हांसी तो पुरे विठ्ठ चि एक। वाउगा चि देख दुजा न मनीं
ध्यान धरुं विठ्ठल करुं त्याचे कीर्तन। आणिक चिंतन नाही न
ध्येय ध्याता ध्यान खुंटला पै शब्द। विठ्ठल उद्बोध सुख आ
एका जनार्दनी विठ्ठल भरला। रिता ठाव उरला कोठें सांगा

भावार्थ
भक्तांच्या मनांत एका विठ्ठला शिवाय दुसरी कोणतीही गोष्ट नाही.विठ्ठलाचे सतत ध्यान करावें त्याच्या कीर्तनात रमावें या शिवाय कशाचेही चिंतन एकनिष्ठ भक्त करीत नाही.ध्यानाची क्रिया,ध्यान करणारा आणि ज्याचे ध्यान करायचे तो विठ्ठल ही त्रिपुटी संपून भक्त देवाशी एकरूप होतो तेव्हां अणुरेणु सह सर्व विश्व एकाच परमात्मा तत्वाने व्यापले आहे, असा साक्षात्कार होऊन परमानंद होतो.असे एका जनार्दनी म्हणतात.

186
गाऊं तरी एक विठ्ठल चि गाऊन। ध्यान तरी विठ्ठल चि
पाहून तरी एक विठ्ठल चा पाहून। आणिक न गोवूं वासना ही
आठवून तो एक विठ्ठल आठवूं।आणिक न सांठवूं हृदयामाजी
एकाजनार्दनी जडला जिव्हारी। विठ्ठल चराचरी व्यापून ठेका

भावार्थ
एका जनार्दनी म्हणतात, एकाग्रतेने ध्यान लावून विठ्ठलाची च मूर्ति पहावी. किर्तनांत विठ्ठलाचे च गुण गावेत.मनांत विठ्ठला शिवाय कोणतिही वासना नसावी.विठ्ठलाचे अखंड स्मरण करावें, हृदयात विठ्ठलाची मूर्ती सांठवून ठेवावी.चराचराला व्यापून राहिलेला विठ्ठल जिव्हारी बसला आहे.

187

तुमचे नाम-संकीर्तन । हें चि माझें संध्या-स्नान
तुमच्या पायाचें वंदन । हें चि माझें अनुष्ठान
तुमच्या पायाचा साक्षेप । हा चि माझा काळ-क्षेप
तुमच्या प्रेमे आली निद्रा । ही च माझी ध्यान-मुद्रा
एका जनार्दनी सार । ब्रह्म-रुप हा संसार

भावार्थ
सद्गुरू जनार्दन स्वामींचे संकीर्तन हें च आपले संध्या-स्नान असून त्यांच्या चरणांचे वंदन हेच अनुष्ठान आहे.सद्गुरूंची चरण-सेवा हाच मनाचा विरंगुळा,स्वामींच्या नामस्मरणांत आलेली निद्रा हीच ध्यान-मुद्रा.हा सर्व संसार ब्रह्म-रुप आहे हे जाणून घेणे हे च परमार्थाचे सार आहे असे एका जनार्दनी सांगतात.

188

गातों एका ध्याती एका। अंतर्बाही पाहतों एका
अगुणी एका सगुणी एका । गुणातीत पाहतो एका
जनीं एका वनीं एका। निरंजनी देखो एका
संतजना पडिये एका । जनार्दनी कडिये एका

भावार्थ
एका जनार्दनी कीर्तनांत परमेश्वराचे गुण गातात,ध्यानमग्न होऊन अंतरंगांत आणि जन-वनांत परमात्म्याचे च दर्शन घेतात एका जनार्दनी देवाला सगुण,निर्गुण या दोन्ही स्वरुपात पाहतात तसेच सृष्टीतील गुणातित रुपही जाणतात. जनार्दन स्वामींच्या कृपा-प्रसादाने देवाचे निरंजन रूपांत एकाकार होतात.


189

चरणांची सेवा आवडी करीन। काया वाचा मन धरुनी जीवीं
या परते साधन न करीं तुझी आण। हा चि परिपूर्ण नेम माझा
एका जनार्दनी एकत्वें पाहीन। ह़दयीं ध्याईन जनार्दन

भावार्थ
देह,मन वाचा एकाग्र करून गुरु-चरणांची सेवा अत्यंत आवडीने करीन.याशिवाय कोणतिही वेगळी साधना करणार नाही हाच एकमेव नेम निष्ठेने करीन असे एका जनार्दनी शपथ घेऊन सांगतात.हृदयांत सद्गुरूंचे निरंतर ध्यान करीत असताना अद्वैत-भक्तीचे आचरण करावे असे मत व्यक्त करतात.

190

जगदात्मा श्रीहरि आनंदे पूजीन। अंतरी करीन महोत्सव
द्वैत विसरुनि करीन पाद-पूजा। तेणें गरुड-ध्वजा पंचामृत
शुध्दोदक स्नान घालीन मानसीं। ज्ञाने स्वरूपासी परिमार्जन
सत्व क्षीरोदक देवा नेसवीन। राजस प्रावरण पीतांबर
दिव्य अलंकार तोडर सोज्वळ।सहजस्थिति लेईलस्वामीमाझा
भक्ति नवविधा घालुनी सिंहासन। एका जनार्दन पूजा करी

भावार्थ

अंत:करणामध्यें जगताचा आत्मा जो श्री हरी त्याचे आनंदाने पूजन करुन भक्तिचा सोहळा साजरा करीन असे सांगून एका जनार्दनी म्हणतात,देव-भक्तातिल द्वैत विसरून एकात्मतेने चरणांची पूजा करीन ही अद्वैत भक्ती हे च ज्याचे वाहन गरूड आहे अशा श्री हरिच्या पूजेतिल पंचामृत होय. मनातील शुध्द भावना हे स्नानासाठी उदक तर ज्ञान रुपी चंदनाने श्री हरीला परिमार्जन करीन.सत्व गुणाचे धवल वस्त्र जगदिश्वराला नेसवून रजोगुणाचा पिवळा शेला पांघरायला देईन.सोज्वळ तोडर हा दिव्य अलंकार घालून नव-विधा भक्तीच्या सिंहासनावर श्री हरीची प्रतिस्थापना करुन षोडपचारे पूजा करीन असे एका जनार्दनी म्हणतात.

सगुण--साक्षात्कार

191

अवघें चि त्रैलोक्य आनंदाचें आतां।चरणीं जगन्नाथा चित्त ठेले
माय जगन्नाथ बाप जगन्नाथ। अनाथांचा नाथ जनार्दन
एका जनार्दनी एकपणें उभा । चैतन्याची शोभा शोभलीसे

भावार्थ

अनाथांचे नाथ अशा स्वामी जनार्दनांच्या कृपा-प्रसादानें माय-बाप जगन्नाथाच्या चरणीं चित्त एकाग्र झाले. एका जनार्दनी एकटाच जगन्नाथाच्या चैतन्याची शोभा अवलोकन करीत असताना तिन्ही लोक आनंदाने भरून गेले आहेत अशी अनुभूती त्यांना आली.

192

चंद्राहूनि शीतळ रवीहूनि सोज्वळ। तेणें मज केवळ वेधिलें बाई
अमृताहूनि स्वादु गगनाहूनी मृदु। रुपेविण आनंदु देखिला बाई
एका जनार्दनी आनंदु परिपूर्णं। काया वाचा मन वेधिलें बाई

भावार्थ

चंद्रापेक्षा शीतल,सूर्यापेक्षा निर्मळ, प्रकाशमान, अमृतापेक्षा रुचकर,आकाशापेक्षा मृदु अशा श्रीहरीनें चित्त वेधून घेतले. काया, वाचा मन पूर्णपणे एकरूप झाले. श्रीहरीचे रुप दिसेनासे झाले आणि केवळ परिपूर्ण आनंद सर्व विश्व व्यापून उरला आहे असा भास झाला.श्रीहरी-दर्शनाचे असे यथार्थ वर्णन एका जनार्दनी करतात.

193

आनंद अद्वय नित्य निरामय। सावळा भासतसे मज लागीं
वेधू तयाचा माझिया जीवा। काया वाचा मनोभावा लागलासे
वेधलेसें मन झालें उन्मन। देखतां चरण गोड वाटें
पाहतां पावतां पारुषला जीव। एका जनार्दनी देव कळों आला

भावार्थ

सावळा श्री हरी म्हणजे नित्य,निरामय,अतुलनीय आनंद आहे असे मनाला वाटते.काया,वाचा,मनाला या सावळ्या रुपाने जीवाला भुरळ घातली असून वेध लावला आहे.या रुपाकडे आकर्षित झालेल्या मनाचे उन्मन झालें असून ते उच्च पारमार्थिक पातळीवर स्थिर झाले असून देहभान विसरून केवळ चरण-कमळावर दृष्टी खिळून राहिली आहे असे सांगून एका जनार्दनी म्हणतात,या अनुभवातून देव सत् चिदानंद स्वरुप आहे याची प्रचिती आली.

194

जगाचें जीवन मनाचे मोहन। योगियांचे ध्यान विठ्ठल माझा
द्वैताद्वैताहूनि वेगळा विठ्ठल । कळां पौर्णिमेची
न कळे चि आगमा नेणवे चि दुर्गमा। एका जनार्दनी आम्हां सापडला

भावार्थ

विठ्ठल जगताचा आधार,भक्तांच्या मनाला मोह घालून भक्ती.-साधनेंत गुंतवून टाकणारे, योग्यांना ध्यान लावणारे असामान्य रुप असून हा विठ्ठल द्वैत व अद्वैत यापेक्षा वेगळा आहे.पौर्णिमेच्या चंद्र कलेप्रमाणे तो परिपूर्ण आहे. विठ्ठलाचे स्वरूप वेद,शास्त्र,श्रुती यांना सुध्दा समजण्यास कठीण आहे असे सांगून एका जनार्दनी म्हणतात,प्रेमळ भक्तांना मात्र हा विठ्ठल सहज सापडतो.

195

आजीचा सुदिनु आम्हां झाला आनंदु ।
सकळां स्वरूपीं स्वयें देखें गोविंदु
पाहिला गे मायें आतां सांगू मी कैसे।
जेथें पाहें तेथें गोविंद दिसे
पाहतां पाहणें तटस्थ ठेलें ।
सबाह्य अभ्यंतरी पुरुषोत्तमें कोंदलें
या परी पाहतां हरुष होतसे मना ।
एका जनार्दनी धणी न पुरे मना ।

भावार्थ

या अभंगात संत एकनाथ गोविंद-भेटीचा आनंद व्यक्त करीत आहेत. सर्वांच्या मनाला आणि देहाला व्यापून उरणारा गोविंद पाहिला पण तो अनुभव शब्दांत वर्णन करता येत नाही. जेथे पहावे तेथे गोविंद च दिसतो.गोविंदाला पहात असतांना दृष्टी त्याच्या ठिकाणी खिळून राहिली आणि मन तटस्थ झाले.या पुरुषोत्तमाने मन आतून बाहेरून व्यापून टाकले.मनाला एव्हढा आनंद झाला असूनही दर्शन सुखाने मनाचे समाधान होईना.असे एका जनार्दनी म्हणतात.

196

चतुर्भुज श्याम मूर्ति । शंख-चक्र ते शोभती
पीतांबर वैजयंती । रुळती गळां
देव देखिला देखिला । तेणें संसाराचा ठावो पुसिला
विदेही तो भेटला । भक्त तयातें
दोघां होतां चि मिळणी । नुरे देव-भक्तपणीं
फिटली आयणी सर्व कोड कठिण
छंद पाहिजे नामाचा । निश्चयो काया मनें वाचा
एका जनार्दनी त्याचा । देव होय अंकित

भावार्थ

चार भुजा असलेली, हातामध्ये शंख,चक्र परिधान केलेली, पीतांबर नेसलेली, गळ्यांत वैजयंती माळ शोभून दिसणारी सांवळी मूर्ती पाहिली आणि विश्वाचा पसारा दिसेनासा झाला.देहाचे भान हरपून गेले. हा विदेही भक्त जेव्हां देवाला भेटला तेव्हां देवाचे देवपण आणि भक्ति एकरुप झाली. भक्तीचे रहस्य उलगडले.या अनुभवाचे वर्णन करून एका जनार्दनी म्हणतात,काया,वाचे,मने नामाचा छंद जोपासल्याने देव भक्ताच्या अंकित होतो.

197

अवघा व्यापक दाविला । माझा संदेह फिटला
मन होते गुंडाळले । आपुले चरणीं पै ठेविलें
नाहीं पहावया दृष्टी । अवघा जनार्दन सृष्टि
दुजा हेत हारपला । एका जनार्दनी एकला

भावार्थ

सद्गुरु जनार्दन स्वामींच्या कृपेने विश्वव्यापक परमात्म्याचे दर्शन घडले आणि मनतील सर्व शंकांचे निरसन झाले. मनाच्या सर्व वृत्ती आवरून ते सद्गुरू चरणांशी एकाग्र केले. अवघी सृष्टी जनार्दन स्वामींच्या रूपाने नटली आहे,दृष्टी या रूपांत हरवून गेली,मनांत दुसरी कोणतीही ईच्छा उरली नाही असे एका जनार्दनी म्हणतात.


198

जन्म मरणाचे तुटलें सांकडें । कैवल्य रोकडें उभें असे
डोळियाचा डोळा उघड दाविला । संदेह फिटला उरी नुरे
एका जनार्दनी संशय चा नाहीं। जन्म-मरण देहीं पुन्हां नये

भावार्थ

कैवल्याचा दानी विटेवर उभा असलेला प्रत्यक्ष पाहिला, ज्ञानियाच्या राजा डोळ्यापुढे साकार उभा राहिला आणि मनातला संदेह फिटला. जन्म मरणाचे संकट कायमचे टळले. एका जनार्दनी या देहाला पुन्हा जन्म-मरण येणार नाही असे खात्रीपूर्वक सांगतात.

199

सायासाचें बळ । तें आजि झालें अनुकूल
धन्य झालें धन्य झालें । देवा देखिलें हृदयी
एका जनार्दनी संशय फिटला ।देव तो देखिला चतुर्भुज

भावार्थ

अंतकरणाच्या गाभाय्रांत देवाचे दर्शन झाले आणि धन्य झालो, जीवनात आतापर्यंत केलेले सायास (साधना) फळाला आली.शंख,चक्र,गदा,पद्म परिधान केलेल्या या चतुर्भुज देवाला पाहिलें आणि मनातले सारे संशय समूळ नाहिसे झाले असे एका जनार्दनी कृतार्थ भावनेनें सांगतात.

200

आजी देखिलीं पाउलें । तेणें डोळें धन्य झाले
मागील शीण भारु । पाहतां न दिसे निर्धारु
जन्माचें तें फळ । आजि झालें सुफळ
एका जनार्दनी डोळां । विठ्ठल देखिला सांवळा

भावार्थ

एका जनार्दनी म्हणतात, सावळ्या विठ्ठलाची चरण-कमल दृष्टीस पडली आणि या डोळ्यांचे पारणे फिटले.जन्मभर केलेल्या साधनेचे सुफळ पदरांत पडले. मागचा सारा शीण-भार उतरुन गेला,कुठल्या कुठे दिसेनासा झाला.

201

इच्छा केली तें पावलो । देखतां चि धन्य झालों
होतें सुकृत पदरीं । तुमचे चरण देखिले हरि
गेलें भय आणि चिंता । कृतकृत्य झालों आतां
आजि पुरला नवस । एका जनार्दनी झालों दास

भावार्थ

परमेश्वर दर्शनाची अंत्यंतिक इच्छा होती ती पूर्ण झाली. देव -दर्शन होतांच धन्यता पावलो.जन्मोजन्मीच्या सत्-कृत्याचे फळ पदरांत पडले,हरि-चरणांचे दर्शन झाले. आजवर केलेल्या तपस्येचे सार्थक झाले,मनातले सारे भय सगळ्या चिंता लयास गेल्या. एका जनार्दनी सांगतात, सद्गुरू जनार्दन स्वामींचा दास व्हावे असा नवस केला होता तो पुरवला गेला.

भक्तीचे स्वरूप आणि गौरव

202

भगवद्भावो सर्वां भूतीं । हें घि ज्ञान हें चि भक्ति
विवेक विरक्ति । या चि नांवें
हें सांडूनि विषय- ध्यान । तें चि मुख्यत्वें अज्ञान
जीवीं जीवा बंधन । येणें चि दृढ।
आठव तो परब्रह्म । नाठव तो भव-भ्रम
दोहींचे निज-धर्म । जाण बापा
आठव विसर चित्तीं । जेणें जाणिजेती
तेंचि एक निश्चिती । निजरूप
एका जनार्दनी । सहज निज-बोधनी
सबाह्य अभ्यंतरीं । पूर्ण परमानंदु

भावार्थ

सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी आत्मरुपाने (चैतन्य रुपाने) एकच भगवंत भरून राहिलेला आहे हा सर्वाभूती असणारा भगवत्-भाव हेच ज्ञान, हिच भक्ति! याच भगवत् -भावाला विवेक आणि विरक्ति। अशी ही नावें आहेत. या ज्ञान, भक्ति, विवेक, विरक्ती चा त्याग करून इंद्रिय विषयांचे चिंतन करणे हे च अज्ञान होय. त्यामुळेच जीवाला जन्म-मृत्युचे बंधन पडतें. परमात्म्याची सतत आठवण हें च परब्रह्म आणि परमात्म्याचा विसर हाच संसार-सुखाचा मोह.परब्रह्म हे अविनाशी, शाश्वत तर संसार विनाशी, अशाश्वत आहे. या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत हे जाणून घेणे जरूरी आहे. आठव आणि विसर यांची जाणिव करून देणारे आपले च निजरूप आहे असे सांगून एका जनार्दनी म्हणतात,एकदां हा बोध झाला कीं, चित्त आतून बाहेरून पूर्णानंदाने भरून जाते कारण सगळी कडे याच विश्वंभराची विविध रूपे दिसू लागतात.

203

भक्तीचे उदरीं जन्मले ज्ञान । भक्तीने ज्ञानाला दिधलें महिमान
भक्ति तें मूळ ज्ञान तें फळ। वैराग्य केवळ तेथींचे फूल
फूल फळ दोन्ही येत येरा पाठीं। ज्ञान वैराग्य तेवीं भक्तीचे पोटी
भक्तीविण ज्ञान गिवसती वेडे। मूळ नाही तेथे फळ केवीं जोडे
एका जनार्दनी शुध्द भक्ति-क्रिया। ब्रह्मज्ञान त्याच्या लागतसे पायां

भावार्थ

येथे संत एकनाथ भक्तीचे महत्त्व वर्णन करतात. भक्ती ही ज्ञानाचे उगमस्थान असून भक्तिमुळे च ज्ञानाला महत्त्व प्राप्त झाले आहे. भक्ती हे मूळ असून वैराग्य हे भक्तिच्या रोपट्यावर उमललेले सुंदर फूल असून ज्ञान हे फळ आहे. फूल व फळ एकमेकांच्या पाठोपाठ येतात तसे भक्तिच्या पोटी ज्ञान व वैराग्य! भक्ती शिवाय ज्ञान मिळवू पाहणे म्हणजे मुळा शिवाय फळाची अपेक्षा करण्या सारखे वेडसर पणाचे आहे. असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, भक्ती-साधना ही एव्हढी पवित्र गोष्ट आहे कीं, ब्रह्मज्ञान भक्तिच्या पायाशी लोळण घेते.

204

भक्ति-प्रेमाविण ज्ञान नको देवा।
अभिमान नित्य नवा तयामाजी
प्रेम-सुख देई प्रेम -सुख देई।
प्रेमे विण नाहीं समाधान
एका जनार्दनी प्रेम अति गोड ।
अनुभवी सुरवाड जाणतील

भावार्थ

भक्ति-प्रेमा शिवाय जे ज्ञान प्राप्त होते त्यां मुळे मनांत अहंकार निर्माण होऊन अभिमान वाढतो तो साधनेत बाधा निर्माण करतो असे सांगून एका जनार्दनी असे ज्ञान देऊ नये अशी विनंती देवाला करतात. देवाने आपल्याला प्रेमसुख द्यावे कारण प्रेम-भक्तिच्या समाधानाची गोडी अवीट असून अनुभवी लोक ती जाणतात,असे एका जनार्दनी म्हणतात.

205

भक्तीच्या पोटीं मुक्ति पै आली। भक्तीनें मुक्तीतें वाढविले
भक्ति ते माता मुक्ति ते दुहिता। जाणोनि तत्वतां भजन करीं
भक्ति सोडूनि मुक्ति वांछिती वेडी। गूळ सोडुनी कैसी ते गोडी
एका जनार्दनी एक भाव खरा।भक्ति मुक्ति वाटूनि आलिया घरा

भावार्थ
भक्ति-साधना करता करता साधकाला मुक्ती प्राप्त होते भक्ती ही माता असून मुक्ती ही तिची कन्या (दुहिता) आहे हे जाणून घेऊन परमेश्वराचे भजन करावें असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, भक्ती सोडून मुक्तिची ईच्छा करणे हे अज्ञानाचे लक्षण आहे, गूळ टाकून देऊन गोडी चाखण्याची ईच्छा करण्या सारखे अडाणी पणाचे आहे.भक्तिद्वारे सलोकता - मुक्ति मिळवून परमेश्वराच्या सन्निध जाणे हा च खरा भक्ति-भाव आहे.

206

अभेदा वांचून । न कळे भक्तीचे महिमान
साधितां साधन । विठ्ठल-रूप न कळे
मूळ पाहिजे विश्वास । दृढता आणि त्रास
मोक्षाचा सायास । येथे कांहीं नको चि
आशा मनीषा सांडा परते। काम क्रोध मारा लाते
तेणें चि सरते । तुम्ही व्हाल लोकी
दृढ धरा एक भाव। तेणें चरणीं असे ठाव
एका जनार्दनी भेव । नाहीं मग काळाचें

भावार्थ

ध्यान-योग, ज्ञान-योग, कर्म-योग या पैकी कोणत्याही मार्गाने विठ्ठलाचे रूप कळेलच असे नाही. भक्तिमार्गात देव व भक्त वेगळे राहत नाही, अभेदा शिवाय परमात्म तत्वाशी एकरूप झाल्यानंतर च भक्तीचे महत्त्व समजून येते. मोक्ष प्राप्तीसाठी करावे लागलेले सायास, साधना करतांना घेतलेला त्रास, चंचल मनाला वळवतांना करावा लागणारा निर्धार या पैकी काहिही भक्ती मार्गात अपेक्षित नाही. विठ्ठलावर असलेला अढळ विश्वास पुरेसा असतो. असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, मनातील सर्व ईच्छा, कामना, सोडून देऊन काम, क्रोधाला जिंकून विठ्ठलावर दृढ भक्तिभाव ठेवल्यास त्याच्या चरणी पूर्ण शरणागती पत्करल्याने कळीकाळाचे भय संपून जाईल यात शंका नाही.

207

अभाग्य न भजती भगवंती। त्यांस पृथ्वी असे जडत्व देती
जळें दिधली त्यां अधोगती। तेजे दिधली संताप-वृत्ति
वायूने दिधलें त्यां चंचलत्व। नभें दिधलें भाव-शुन्यत्व
महातत्वें हरिलें निज-सत्व । मायें दिधलें त्यां ममत्व
सभाग्य भावें भजती भगवंती।त्यास पृथ्वी देतसे निज शांती
जळें दिधली मधुररस-वृत्ति।तेजें दिधली निजतेज-प्रभादिप्ति
वायु उपरमे दे निश्चलत्व। नभें दिधलें त्यां अलिप्तता
महत्तत्वें दिधलें शोधित-तत्व। मायें दिधलें सद्विद्या परमतत्व
एका जनार्दनी निज-भक्ति । तै अलभ्य लाभ होय प्राप्ति
भूते महाभूतें प्रसन्न होती । तेणें न भंगे ब्रह्म-स्थिति

भावार्थ

अभागी लोक परमेश्वराचे भजन करीत नाहीत, पृथ्वी अशा लोकांना जडत्व देते कारण जडत्व हा पृथ्वीचा। गुण आहे. दुसरे महत्-तत्व जळ (पाणी), पाणी नेहमी उताराकडे वाहते, भाग्यहीन लोकांना हें तत्व अधोगती देते. तिसरे तत्व आहे तेज ,तेजाचा गुण आहे दाहकता, अभागी लोकांना तेज संताप-वृत्ति देते. वायुचा गुण चंचलपणा अभागी लोक मनाने वायुसारखे चंचल असतात परमेश्वराच्या भजनांत रंगून जाऊ शकत नाही. भावशुन्यता अलिप्तपणा हा आकाशाचा गुण आहे अभागी लोक भक्ति.-रसांत रममाण होऊ शकत नाही.या उलट भाग्यवंत भगवंताला भक्तिभावाने पुजतात, पृथ्वी त्यांना शांति देते. पाण्यापासून समरसता मिळते. तेजा पासून बुध्दीची तेजस्विता प्राप्त होते. वायूकडून निश्चलता आणि आकाशाकडून अलिप्तपणा प्रदान केला जातो. अशा प्रकारे पंच महाभूतांकडून भाग्यवान लोक अलौकिक सत्वे मिळवतात. एका जनार्दनी म्हणतात, या गुणांमुळे भाग्यवंत प्रेम-भक्तीत रंगून जातात, समाधान, शांति यांचा अलभ्य लाभ होतो. माते कडून सद्विद्या हे परम-तत्व मिळते. पंच-महाभूतें प्रसन्न होतात अशा भाग्यवंतांची ब्रह्मस्थिती कधी भंग पावत नाही.

२०८


देव प्रसन्न झाला माग म्हणे वहिला ।
भक्त घरोघरी विचार पुसो गेला ।
भाव की भ्रांति आळस की भक्ति ।
विचारुनि व्यक्ति ठायी ठेवा ।
अरे हे गुह्य कुडे करू नये उघडे ।
तरी द्वारोद्वार पुसो जाय वेडे ।
एका जनार्दनी शीतल भाव ।
आळसेचि देव दुरावला ।

भावार्थ

एका साधकावर देव प्रसन्न झाला आणि हवे ते माग असे म्हणाला. साधक प्रत्येक घरात जाऊन देवाकडे काय मागावें असे विचारू लागला. भक्ति मागावी की भ्रांति, आळस मागावा की भक्ति? एका जनार्दनी म्हणतात, हे भक्तीचे रहस्य असून ते जाणून घेणें आवश्यक आहे ते सद्गुरू च सांगू शकतात.आळसाने देव आणि भक्त यांच्यांत दुरावा निर्माण होतो.

209

मी वासुदेव नामे फोडिता नित्य टाहो ।
देखिले पाय आता मागतो दान द्या हो ।
सावळे रुप माझ्या मानसी नित्य राहो ।
पावन संत-वृंदे सादरे दृष्टि पाहो ।
सांडोनि सर्व चिंता संतपदी लक्ष लागो ।
मुक्त मी सर्व संगी सर्वदा वृत्ति जागो ।
भाविक प्रेमळांच्या संगतीं चित्त लागो ।
अद्वैत-वृत्ति चालो अक्षयी भक्ति-योग ।
स्वप्नी हि मानसाते नातळो द्वैत-संग ।
अद्वयानंद-वेधे नावडो अन्य भोग ।
अक्रियत्व चि वाहो सक्रियारूप बोध ।
पाहता विश्व माते निजरुप दाखवी ।
सत्कथा -श्रवण कर्णी पीयुष चाखवी ।
रसने नाममंत्र सर्वदा प्रेम देई ।
तोषला देवराणा म्हणे बा रे घेई
हे दान पावले सद्गुरू शांति-लिंगा ।
हें दान पावलें आत्मया पांडुरंगा ।
हें दान पावलें व्यापका अंतरंगा ।
हें दान पावलें एका जनार्दनी दोष जाती भंगा ।

भावार्थ

या भजनांत संत एकनाथ देवाकडे प्रार्थना करून काही मागणे मागत आहेत. ते वासुदेवाच्या नावाने व्याकुळतेने टाहो फोडून दान देण्यासाठी चरणांशी विनंती करतात. पांडुरंगाचे सावळें रुप मनांत सतत राहावें आणि संतजनां विषयीं आदरभावना असावी. सर्व चिंताचे निराकरण होऊन संत -चरणांचे ध्यान लागावें , जे भाविक प्रेमळ भक्त असतील त्यांच्या संगतींत चित्त रममाण व्हावें, ईंद्रियविषयांच्या मोहा पासून मन मुक्त व्हावें, अशी ईच्छा व्यक्त करून संत एकनाथ म्हणतात, मनातले द्वैत संपून अद्वैत भक्तियोगाचे अखंड आचरण घडावे, या भक्तीत मिळणाऱ्या आनंदात ईतर सर्व भोगांचा विसर पडावा.स्वप्नांत सुध्दा द्वैत भावनेचा स्पर्श ना घडावा. या सर्व चल आणि अचल सृष्टींत भरलेला परमात्मा डोळ्यांना दिसावा. परमेश्वराच्या सत्कथा रुपी अमृत कर्णांना चाखावयास मिळावे, रसनेला देवाच्या नामाचे प्रेम निर्माण व्हावे. एकनिष्ठ भक्ताची ही प्रार्थना ऐकून देवानें आनंदाने दान दिले. हे दान शांतीरुप सद्गुरूंना, आत्मरुप पांडुरंगाला, सर्वव्यापी सर्वेश्वराला पावलें असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, या दानाने आपले सर्व दोष नाहिसे झाले, आपण कृतार्थ झालो.

२१०

काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल । नांदतो केवळ पांडुरंग ।
भाव-भक्ति भीमा उदक त वाहे । बरवा शोभताहे पांडुरंग ।
दया क्षमा शांती हेचि वाळुवंट । मिळालासे थाट वैष्णवांचा ।
देखिली पंढरी देही जनी वनी । एका जनार्दनी वारी करी ।

भावार्थ
संत एकनाथांनी रचलेले आणि भीमसेन जोशींनी स्वरबद्ध केलेले हे भजन अतिशय लोकप्रिय झाले असून त्यात संत एकनाथांनी मनुष्यदेहाला पंढरीची उपमा देऊन विठ्ठल हा या देहातील आत्मा आहे असे सूचित केले आहे. पंढरपूर ज्या भीमानदीवर वसलेले आहे त्या नदीतून भाव-भक्ती चे उदक वाहत आहे अशी सुंदर कल्पना केली आहे. चंद्रभागेचे वाळवंट दया, क्षमा, शांतीरुपी वाळूने बनलेले आहे, या पंढरीत पांडुरंग शोभून दिसत आहे आणि वैष्णवजन पांडुरंगाच्या प्रेमरसात तल्लीन होऊन नाचत आहेत. एका जनार्दनी म्हणतात, या पंढरीचे दर्शन प्रत्येकाने आपल्या अंतरंगात, आपल्या सहवासातील जनमानसात आणि सभोवतालच्या सजीव सृष्टीत घ्यावे. ही पंढरीची वारी हा अत्यंत आनंददायक अनुभव आहे.

२११

नवविधा भक्ति नव आचरती । त्यांची नाम-कीर्ति सांगू आता ।
एक एक नाम घेता प्रात:काळी । पापा होय होळी क्षणमात्रे ।
श्रवण परीक्षिति तरला भूपती । साता दिवसात मुक्ति झाली तया ।
श्रीशुक आपण करूनि कीर्तन । उध्दरिला जाण परीक्षिति ।
हरिनाम-घोषे गर्जे तो प्रल्हाद । स्वानंदे प्रबोध झाला त्यासी ।
पायांचा महिमा स्वयें जाणे रमा । प्रिय पुरुषोत्तमा झाली तेणे ।
पृथुराया बाणले देवाचे अर्चन । तेणे समाधान पावला तो ।
गाईचिया मागे श्रीकृष्ण-पाउले । अक्रूरे घातले दंडवत ।
दास्यत्व मारुती अर्चे देह-स्थिती । सीता-शुध्द कीर्ति केली तेणे ।
सख्यत्व स्वजाति सोयरा श्रीपति । सर्व भावे प्रीति अर्जुनाची ।
आत्म-निवेदन करुनियां बळी । झाला वनमाळी द्वारपाल ।
नवविधा भक्ति नव जे केली । पूर्ण प्राप्ती झाली तया लागी ।
एका जनार्दनी आत्म-निवेदन । भक्ती दुजेपण उरले नाही ।

भावार्थ

या भजनात संत एकनाथ नवविधाभक्तीचे आचरण करणाऱ्या नऊ भक्तांची महती सांगत आहेत. प्रात:काळी या भक्तांचे नामस्मरण केल्यास काया, वाचा मनाने केलेल्या सर्व पापांची होळी होते. पांडवांचा वंशज परिक्षित राजाने सात दिवस भागवत ग्रंथाचे श्रवण केले आणि त्यांची संसार-बंधनातून सुटका होऊन मुक्ति मिळाली. श्रीशुकानी केलेले कृष्णलीलांचे किर्तन श्रवण करुन परिक्षिताचा उध्दार झाला. हरिनामाचा अखंड जप करुन प्रल्हादाला प्रभुकृपेचा लाभ झाला. पादसेवन भक्तीने लक्ष्मी पुरषोत्तम विष्णुला प्रिय झाली अर्चनभक्तीने पृथुराजाला निरंतर शांती-समाधानाचे वरदान मिळाले. कृष्ण-वधाचा हेतूने प्रेरित होऊन कंसाने अक्रुराला गोकुळात पाठवले तेथिल गोप-गोपिकांचे निष्काम प्रेम पाहून आणि गाईंच्या मागे फिरणारी श्रीकुष्णाची पाऊले पाहून वंदनभक्तीने अक्रुर तरुन गेला. दास्यत्वभक्तीने मारुतीने सीता-शुध्दी केली आणि श्रीरामाकडून चिरंजीवपद प्राप्त केले. सख्यभक्तीने अर्जुन श्रीहरीचा सखा, सोयरा बनला. आत्मनिवेदनभक्तीने बळीराजाने श्रीहरीला आपला द्वारपाळ बनवले. या नऊ अनन्य भक्तांना नवविधाभक्तीने परमेश्वराची प्राप्ती झाली. एका जनार्दनी म्हणतात, आत्मनिवेदनभक्तीने देव व भक्तात दुजेपण उरत नाही.


देव-भक्ताचे प्रेम (नाथांच्या मुखाने)

२१२

भजन भावाते निपजवी । भाव देवाते उपजवी ।
ऐसा भजने देव केला । भक्त वडील देव धाकुला ।
भक्ताकारणे संकल्प । भक्त देवाचाहि बाप ।
देव भक्ताचे पोटी । झाला म्हणोन आवड मोठी ।
एका जनार्दनी नवलावो । कैसा भक्तचि झाला देवो ।

भावार्थ

भक्त जेव्हा देवाच्या भजनात तल्लीन होतो तेव्हा भक्तिभाव निर्माण होतो आणि या भक्तिभावातून देव जागृत होतो. अशाप्रकारे साधकाच्या भजनातून देव जन्म घेतो. भक्ताच्या संकल्पातून देवाची निर्मिती होते. भक्त देवाचा बाप आहे, म्हणून भक्ताच्या मनात देवाविषयी स्वाभाविक प्रेम (आवड)आहे. एका जनार्दनी म्हणतात, ही मोठी नवलाची गोष्ट आहे की भक्त देवत्वाला पोचला आहे.

२१३

आधी देव पाठी भक्त । ऐसे मागे आले चालत ।
हे हि बोलणेचि वाव । मक्ता आधी कैचा देव ।
भक्त शिरोमणी भावाचा । देव लंपट झाला साचा ।
भक्तासाठी अवतार । ऐसा आहे निर्धार ।
वडील भक्त धाकुला देव । एका जनार्दनी नाही संदेह ।

भावार्थ

आधी देवाचा अवतार आणि नंतर भक्त असे मानण्याची पूर्वी पध्दत होती. परंतु हे बोलणे सत्य नाही. भक्त हा भावाचा शिरोमणी असून देव या भक्तीभावामुळे वेडा झाला असून तो भक्तांसाठी अवतार धारण करण्याचा निर्धार करतो. एका जनार्दनी म्हणतात, भक्त वडील असून देव धाकटा आहे, याविषयी मनामध्ये कोणताही संशय नाही.

२१४

भक्तपणा सान नव्हे रे भाई । भक्ताचे पाय देवाचे हृदयी ।
भक्त तोचि देव भक्त तोचि देव । जाणती हा भाव अनुभवी ।
दान-सर्वस्वे उदार बळी । त्याचे द्वार राखे सदा वनमाळी ।
एका जनार्दनी मिती नाही भावा । देवचि करितो भक्तांची सेवा ।

भावार्थ

भक्तांची भावभक्ती ही छोटी गोष्ट नाही, या भक्तिभावाने देव भक्ताचे पाय आपल्या हृदयात धारण करतो. भक्त हाच देव असून ते एकरुप आहेत, हे केवळ अनुभवी सद्गुरूच जाणतात. सर्वस्वाचे दान देणारा दैत्यराजा बळी याचा वनमाळी द्वारपाल झाला. एका जनार्दनी म्हणतात, भक्तिभावाची महती अमर्याद आहे, भक्तांसाठी देव तिष्ठत राहून त्यांची सेवा करतो.

२१५

भक्तालागी अणुमात्र व्यथा । ते न साहवे भगवंता ।
करूनि सर्वांगाचा ओढा । निवारीतसे भक्त-पीडा ।
होऊनी भक्तांचा अंकित । सारथीपण तो करीत ।
ऐसा अंकित चक्रपाणि । एका शरण जनार्दनी ।

भावार्थ

भक्ताला होत असलेले थोडेसेही दु:ख भगवंताला सहन होत नाही. आपले सर्वस्व पणाला लावून देव या भक्ताचे संकट निवारण करतो. भक्ताचा अंकित होऊन तो त्याचा सारथी होतो. एका जनार्दनी म्हणतात, देव हा भक्तिभावाचा भुकेला आहे.

२१६

साचपणे देवा शरण पै जाती । तया वैकुंठपति विसरेना ।
जैसी कन्या दूर देशी एकटी । रात्रंदिवस संकटी घोकी मायबाप ।
पतिव्रतेचे सर्व मन पति-पायी । तैसा देव ठायी तिष्ठतसे ।
एका जनार्दनी मज हा अनुभव । जनार्दनी देव दाखविला ।

भावार्थ

एकनिष्ठपणे देवाला जे शरण जातात त्यांना वैकुंठपती विप्णु कधीच विसरत नाही. जशी परक्या देशात सासरी गेलेली मुलगी आई-वडिलांची, माहेरची सारखी आठवण काढत असते, जसे पतिव्रतेचे मन सतत पतीभोवताली घोटाळत असते, तसा देव भक्ताच्या ठिकाणी गुंतून पडतो. एका जनार्दनी स्वानुभवाने सांगतात की जनार्दनस्वामींच्या कृपेने आपल्याला देव-भक्ताचे नाते समजले.

२१७

मिठी घालुनीया भक्ता । म्हणे शिणलेती आता ।
धावे चुरावया चरण । ऐसा लाघवी आपण ।
योगियासी भेटी नाही । तो आवडीने कवळी बाही ।
एका जनार्दनी भोळा । भक्ता आलिंगी सावळा ।

भावार्थ

एका जनार्दनी या भजनात परमेश्वराच्या भक्ताविषयी वाटणाऱ्या आत्मभावाचे वर्णन करीत आहे. थकला-भागलेला भक्त दिसताच देव त्याचा श्रमपरिहार करण्यासाठी धावतो. प्रेमाने आलिंगन देतो. योगीजनांची भेट घेण्यासाठी देव अत्यंत आतूर असतो. भोळ्या भाविकांना सावळा श्रीहरी प्रेमाने मिठी घालतो.

२१८

देव धावे मागे न करी आळस । सांडिता भवपाश माया-जाळ ।
सर्व भावे जे का शरण रिघती । तयांचे ओझे श्रीपती अंगे वाहे ।
नको भक्ति मुक्ति सदा नामी हेत । देव तो अंकित होय त्यांचा ।
एका जनार्दनी ऐसा ज्यांचा भाव । तया घरी देव पाणी वाहे ।

भावार्थ

संसाराची सर्व बंधने, सर्व मायापाश तोडून, पूर्ण शरणागत होऊन, भक्तिभावाने जे भक्त श्रीपतीला शरण जातात त्यांच्या संसाराचे ओझे श्रीपती स्वत: वाहतो. अनन्य भक्त भुक्ति-मुक्तिची अपेक्षा करीत नाही. सतत देवाचा नामजप करीत असतो, देव त्याचा अंकित असतो. एका जनार्दनी म्हणतात, अशा अनन्य भक्ताच्या घरी देव पाणी भरतो.

२१९

एका घरी द्वारपाळ । एका घरी होय बाळ ।
एका घरी करी चोरी । एका घरी होय भिकारी ।
एका घरी युध्द करी । एका घरी पुजा बरी ।
एका घरी खाय फळे। एका घरी लोणी बरे ।
एका एकपणे एकला । एका जनार्दनी प्रकाशला ।

भावार्थ

या भजनात एका जनार्दनी भगवंताच्या विविध लिलांचे वर्णन करतात. बळीराज्याच्या घरी भगवंत दारावरचा पहारेकरी होतो तर नंदाच्या घरी बालक बनतो आणि लोण्याची चोरी करतो, सुभद्रा आणि द्रौपदीघ्या घरी चिंधी मागणारा भिकारी होतो. दुर्योधनाच्या घरी युध्दाची भाषा करतो तर विदुराच्या घरी पूजा करुन घेतो. शबरीच्या घरी उष्टी बोरे खातो तर यशोदेच्या घरी लोणी चाखतो. या कृष्णलीलांचा आनंदात एका जनार्दनी रममाण होतो.

२२०

खुर्पु लागे सावत्यासी । न पाहे यातीसी कारण ।
घडी मडके कुंभाराचे । चोख्यामेळ्याची ढोरे ओढी ।
सजन कसायाचे विकी मांस । दामाजीचा दास स्वये होय ।
एका जनार्दनी जनीसंगे । दळू कांडू लागे आपण ।

भावार्थ

पंढरीचा पांडुरंग संताच्या भक्तिप्रेमाचा भुकेला असून तो त्यांच्यासाठी अनेक कामे करतो. सावता माळ्याबरोबर भगवंत मळ्याची खुरपणी करतो तर गोरा कुंभाराची मडकी घडवतो. चोखामेळ्यासाठी गुरे ओढतो. सजन कसायाचे घरी मांस विकायचे काम करतो. दामाजीचा दास बनून त्याची संकटातून सुटका करण्यासाठी निजरुप प्रकट करतो. जनाबाईबरोबर दळण, कांडण करुन तिला मदत करतो असे एका जनार्दनी सांगतात.

२२१

तुम्ही कृपाळु जी देवा । केली सेवा आवडी ।
करुनि सडा संमार्जन । पाळिले वचन प्रमाण ।
उगाळूनी गंध पुरविले । सोहळे केले दासाचे ।
ऐसा अपराधी पतित । एका जनार्दनी म्हणत ।

भावार्थ

एका जनार्दनी म्हणतात, आपण देवाचा अपराध केला आहे. देवाकडून सडासंमार्जन, पुजेसाठी चंदन उगाळून घेतले असून आपण अत्यंत पतित आहोत. परंतु देवाने भक्ताचे सर्व सोहळे पूर्ण केले आहेत, अत्यंत आवडीने सेवा केली आहे कारण देव कृपाळु आहे आणि दिलेले वचन पूर्ण करणारा आहे.

२२२

देव विसरे देवपण । अर्पी वासना भक्तांसी ।
भक्त देही सदा वसे । धर्म अर्थ अर्पीतसे ।
जे जे भक्तांची वासना । पुरवी त्याचि क्षणा ।
एका जनार्दनी अंकित । उभा तेथेचि तिष्ठत ।

भावार्थ

एका जनार्दनी म्हणतात, देव आपला देवपणा विसरून भक्ताच्या देही निरंतर वास करतो. धर्म आणि अर्थ अर्पण करतो. भक्तांच्या मनोकामना, वासना तत्परतेने पूर्ण करतो. तो भक्ताचा अंकित होतो, त्याच्या दाराशी तिष्ठत उभा राहतो.

२२३

अभेद भजनाचा हरिख । देव भक्त झाले एक ।
कोठे न दिसे भेद-वाणी । अवघी कहाणी बुडाली ।
हरपले देव-भक्तपण । जनी झाला जनार्दन ।
एका जनार्दनी देव । पुढे उभा स्वयमेव ।

भावार्थ

भजनाचा निर्भेळ आनंद लुटताना देव-भक्त एकरुप होतात. कोठेही भेदाभेदाचा लवलेश ऐकू येत नाही. सारा भूतकाळ या आनंदात बुडून जातो. देवाचे मोठेपण आणि भक्ताचे सानपण हरपून नाहिसे होते. जनार्दन भक्तीरंगात रंगून जातो. एका जनार्दनी म्हणतात, देव प्रत्यक्ष पुढे उभा राहतो.

२२४

देव म्हणे भक्तांसी आवडी । मी झालो तुमचा गडी ।
सांगाल ते करीन काम । मजवरी ठेवा तुमचे प्रेम ।
भाव मज द्यावा । आणिक मज नाही हेवा ।
आवडीने देव बोले । भक्तांमाजी स्वये खेळे ।
खेळता गोपाळी । एका जनार्दनी गोकुळी ।

भावार्थ

देव भक्तांना लडिवाळपणे म्हणतो, तो त्यांचा सेवक झाला आहे. भक्तांच्या प्रेमासाठी तो त्यांचे कोणतेही काम करण्यास तयार असून तो केवळ निरपेक्ष भावाचा भुकेला आहे. आणखी कोणतीही गोष्ट त्याला हवीशी वाटत नाही. मनापासून देव बोलतो आणि भक्तांबरोबर गोकुळात गोपाळांसह खेळ खेळतो असे एका जनार्दनी म्हणतात.

२२५

बहु बोलाचे नाही कारण । मी देह भक्त आत्मा जाण ।
माझा देह शरीर जाण । भक्त आत पंचप्राण ।
नांदे सहज भक्त आत । मी देह भक्त देहातीत ।
एका जनार्दनी भक्त । देवपणा मी भक्तांकित ।

भावार्थ

देव हा केवळ पंचभूतात्मक शरीर असून भक्त त्याचे पंचप्राण आहेत. देवाच्या शरिरात भक्त आत्मरुपाने नांदतो. देव देह असून भक्त त्या देहापलिकडील अविनाशी आत्मतत्व आहे. एका जनार्दनी म्हणतात, देवाचे देवपण भक्तांच्या अंकित आहे, देवावर भक्तांचे स्वामित्व आहे.

२२६

तुमचे अप्रमाण होता बोल । मग फोल जीवित्व माझे ।
कासया वागवू सुदर्शन । नाही कारण गदेचे ।
तुमचा बोल व्हावा निका । हेचि देवा मज प्रिय ।
मज याचे उणेपण । तुमचे थोरपण प्रकाशू द्या ।
एका जनार्दनी देव । स्वयमेव बोलती ।

भावार्थ

भक्तांचे देवाविषयीचे वचनांचा प्रत्यय येत नसेल तर देवाचे अस्तित्व सिद्ध होणार नाही, देवाचे जीवित्व व्यर्थ होईल आणि हातातील गदा, सुदर्शनचक्राला काही कारण उरणार नाही. भक्तांच्या श्रध्देला उणेपणा येऊ नये अशी देवाची इच्छा आहे. भक्तांचा थोरपणा प्रकाशित व्हावा असे देवाचे मनोगत आहे असे एका जनार्दन म्हणतात.

२२७

मज जे अनुसरले काया वाचा मने । त्यांचे चालवणे सर्व मज ।
ऋणविई त्यांचा अनंत जन्मांचा । जे गाती वाचा कीर्ति माझी ।
तयांचिया द्वारी लक्ष्मीसहित । उभा मी तिष्ठत याचकपणे ।
सर्व जड भारी जाणे योगक्षेम । एका जनार्दनी नेम जाण माझा ।

भावार्थ

जे भक्त देवाची काया, वाचा, मने करून भक्ति करतात, सतत भगवंताचे चिंतन करतात, परमेश्वराचे किर्तन करतात त्या भक्तांचा देव अनंत जन्माचा ऋणी असतो. त्यांच्या दारात श्रीहरी लक्ष्मीसह याचक रुपाने उभा असतो. या एकनिष्ठ भक्तांचा योगक्षेम चालवून त्यांचे ओझे हलके करतो. एका जनार्दनी म्हणतात, भक्तांची पाठराखण करणे हा देवाचा नेम आहे.

२२८

मजसी जेणे विकिले शरीर । जाणे मी निर्धार अंकित त्याचा ।
त्याचे सर्व काम करीन मी अंगे । पडो नेदी व्यंगे सहसा कोठे ।
एका जनार्दनी त्याचा मी अंकित । राहे पै तिष्ठत त्याचे दारी ।

भावार्थ

जे भक्त देवाच्या सेवेत देह झिजवतात, वाणीने देवाचे किर्तन करतात, मनाने देवाचे चिंतन करतात त्या भक्तांचा देव अंकित असतो. त्यांची सर्व कामे देव स्वत: करतो, त्यांचा कमीपणा कोठे दिसू देत नाही. या भक्तांची ताबेदारी स्विकारून देव त्यांच्या दारात तिष्ठत उभा राहतो असे एका जनार्दनी म्हणतात.

२२९

माझा शरणागत न दिसे केविलवाणा ।
ही तो लाज जाणा माझी मज
एकविध भावे आलिया शरण ।
कर्म धर्म जाण पूर्ण त्याचे
समर्थाचे मुला काय खावयाची चिंता ।
तैसे मी तत्वता न विसंबे
एका जनार्दनी हा माझा नेम ।
आणिक नाही वर्म भावेविण

भावार्थ

भगवंताला शरण गेलेला भक्त केविलवाणा दिसत असेल तर ती गोष्ट देवाला कमीपणा आणणारी आहे. समर्थाचा मुलगा अन्नावाचून उपाशी राहत असेल तर समर्थ या नावाला विरोध करणारी आहे. एका जनार्दनी म्हणतात, भगवंताला भाव-भक्तिने पूर्णपणे शरणागत झाल्याने भक्ताचे कर्म-धर्म विनासायास घडतात. भावपूर्ण भक्ति याशिवाय देवाला कसलिही अपेक्षा नाही.


२३०

सर्व कर्म मदर्पण । करिता मन होय शुध्द
न्यून ते चढते जाण । करी संपूर्ण मी एक
मन ठेवुनी माझ्या पायीन्। असो कोठे भलते ठायी
एका जनार्दनी मन । करा मजचि अर्पण

भावार्थ

आपल्याकडून घडणारी सर्व कर्मे भगवंताला अर्पण केल्यास मन शुध्द होते. ही कर्मे करीत असतांना काही उणिवा राहिल्यास भगवान ते पूर्णत्वास नेतात. भक्त देहाने कोठेही असला तरी मनाने तो देवाच्या सन्निध असावा. एका जनार्दनी म्हणतात, भक्ताने आपले मन देवाला अर्पण करावे, त्याने देव प्रसन्न होईल.

२३१

ऐके उध्दवा प्रेमळा । सांगतो जीवींचा जिव्हाळा
तू भक्त-राज निर्मळा । सुचित ऐके
मी बैसोनी आसनी । पूजा करितो निशिदिनी
ते पूज्य मूर्ति तुजलागुनी । नाही ठाउकी उध्दव

भावार्थ

उध्दव हा श्रीहरीचा प्रेमळ भक्त आहे. त्याला श्रीहरी आपले मनोगत व्यक्त करीत आहेत. देव उध्दवाला भक्तराज असे संबोधून आपल्या मनातील विचार ऐकावे अशी सूचना करतात. भगवंत स्थिरचित्ताने आसनावर बसून ज्या मूर्तीची रात्रंदिवस पूजा करतात ती मूर्ती कोणाची आहे हे त्यांच्या प्रिय भक्ताला (उध्दवाला) देखिल माहिती नाही. भगवंताचे हे कोडे उलगडण्याचा प्रयत्न उध्दवाने करावा अशी देवाची इच्छा आहे असे एका जनार्दनी सूचित करीत आहेत.

२३२

माझे आराध्य दैवत । ते कोण म्हणती सत्य ।
भक्त माझे जीवींचे हेत । जाणती ते ।
माझे विश्रांतीचे स्थान । माझे भक्त सूख-निधान ।
काया वाचा मन । मी विकिलो तयाची ।
ते हे भक्त परियेसी । उध्दवा सांगे हृषीकेशी ।
एका जनार्दनी सर्वांची । तेचि वदतसे ।

भावार्थ

भगवंत ज्याची आराधना करतात ते दैवत कोणते हे भगवंताचे भक्त जाणतात, कारण भगवंताच्या जीवनाचे हेत केवळ भक्तच जाणू शकतात. भक्त हे भगवंताच्या विश्रांतीचे स्थान, सुख मिळण्याचे ठिकाण असून या प्रेमळ भक्तांनी भगवंताला काया, वाचा, मनाने विकत घेतले आहे. या भक्तांची नावे हृषीकेशी (श्रीकृष्ण) उध्दवाला सांगतात. एका जनार्दनी सर्वांना त्याच भक्तांची नावे सांगतात.

== आत्म-दर्शन ==

भाव-दशा

२३३

एका देहा माजीं दोघे पै बसची। एकासी बंधन एका मुक्तगति
पहा हो समर्थ करी तैसे होय। कोण त्यासी पाहे वक्र -दृष्टि
पाप पुण्य दोन्ही भोगावी एका हातीं।ऐसी आहे गति अतर्क्य ते
एका जनार्दनी जनीं जनार्दन । तयासी नमन सर्वभावें

भावार्थ

एकाच देहामध्यें जिवात्मा आणि शिवात्मा दोन्हीं वसत असतात. जिवातम्याला जन्म,मृत्युचे बंधन असते तर शिवात्मा मुक्त आहे. त्याच्या कडे कोणी वाकड्या नजरेने पाहू शकत नाही. शिवात्मा सामर्थशाली असून तो करील तसेच घडते. पाप आणि पुण्य दोन्ही जिवाला भोगावी लागतात.कर्मगती माणसाच्या तर्क शक्तीच्या पलिकडे आहे. एका जनार्दनी म्हणतात, शिवशक्ती अतर्क्य आहे या शक्तीला सर्वभावे वंदन करावें.

234

सात्विका भरणे रोमांसी दाटणें। स्वेदाचे जीवन येऊन लागे
कांदे तो थरारी स्वरूप देखे नेत्रीं। अश्रु त्या भीतरीं वाहताती
आनंद होय पोटी स्तब्ध झाला कंठी।मौन वाक्-पुटीधरुनीराहे
टाकी श्वासोच्छ्वास अश्रुभाव देवा। जिरवून एका स्वरुप होय
एका जनार्दनी ऐसे अष्टभाव। उत्पन्न होतां देव कृपा करी

भावार्थ

अंगावर शहारे येणे, स्वाद (घाम फुटणे), शरिराला कंप सुटणे, डोळे अश्रुंनी डबडबणे, कंठ गद्गदणें, शब्द कुंठित होणे, श्वासोच्छ्वासाची गती वाढणे, स्वरुप दर्शनाने अंत:करण आनंदाने भरून जाणे हे अष्ट-सात्विक भाव आहेत असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, स्वरुपाशी एकरुप झाल्यावर या सात्विक भावांचा अनुभव येतो, तेव्हां देवाची कृपा होते.

235

सहज सहज ऐशा करिताती गोष्टी
परि सहजाची भेटी विरळा जाणे
सहजाची आवडी विद्या अविद्या तोडी
जाणीव-नेणीवेची राहूं नेदी बेडी
जाणीवा जाणपण नेणीवा नेणपण
दोहींच्या विंदानें सहजाचे दर्शन
एका जनार्दनी जाणीव ना नेणीव
सहज चैतन्यासी देउनि ठेला खेंव

भावार्थ

अध्यात्मिक अनुभवांत परमेश्वर भेटीच्या अनेक कथा सांगितल्या जातात परंतू ईश्वर भेटीचे रहस्य एखादाच जाणतो. परमेश्वर कृपेची ओढ निर्माण झालेल्या साधकाचे ज्ञान, अज्ञान, जाणीव, नेणीव यांच्या बेड्या आपोआपच तुटून पडतात. असा साधक जाणीव आणि नेणिवेच्या कक्षा ओलांडून पलीकडे जातो आणि प्रत्यक्ष चैतन्याला मिठी घालतो. हा अनुभव विरळा च असतो.

236

मीतू ऐसी परी । जैसे तरंग सागरीं
दोहीं माजी एक जाणा । कृष्ण द्वारकेचा राणा
तंतु वस्त्र दोन्ही एक । तैसें जयासी व्यापक
देव भक्त ऐसी बोली ।भ्रांती निरसेनासी झाली
एका जनार्दनी कृपा। भ्रांति कैसी जगीं पहा पां

भावार्थ

समुद्रावर लाटांचे तरंग उठतात तसेच चित्तात मी-तूं पणाचे तरंग उमटतात.सागरावरचे तरंग जसे पाण्याचे असतात तसेच मनावर उमटणारे तरंग एकाच श्रीकृष्ण रुपी परम तत्वा पासून निर्माण झाले आहेत.तंतू पासून विणलेलें वस्त्र आणि तंतु जसे एकरुप असतात तसेच विश्व आणि विश्वाला प्रकाशित करणारा परमात्मा एकच आहेत हे जाणून घ्यावे म्हणजे देव आणि भक्त भिन्न आहेत या भ्रांतिचे निरसन होईल.एका जनार्दनी म्हणतात, परमेश्वरी कृपेने च या भ्रांतिचे निरसन होते.

ब्रह्मनिष्ठांची लक्षणे

237

वर्म जाणे तो विरळा । त्याची लक्षणें पै सोळा
देही देव पाहे डोळा। तो चि ब्रह्म -ज्ञानी
जन निंदो अथवा वंदो । तया नाही भेदाभेद
विधि -निषेधाचे शब्द । अंगी न बाणती
कार्य कारण कर्तव्यता । हें पिसें नाहीं सर्वथा
उन्मनी समाधि अवस्था । न मोडे जयाची
कर्म - अकर्माचा ताठा । न बाणें चि अंगीं वोखटा
वाउग्या त्यां चेष्टा । करी ना कांहीं
शरण एका जनार्दनी । तो चि एक ब्रह्मज्ञानी
तयाचे दर्शनी । प्राणियासि उध्दार

भावार्थ

ब्रह्म-स्वरुपाचे रहस्य जाणणारा ब्रह्मनिष्ठ सोळा लक्षणांनी ओळखला जातो. जो आपल्या देहातच देव पाहतो तो खरा ब्रह्मज्ञानी समजावा. लोकांनी केलेली निंदा किंवा स्तुती तो समान भावानें स्विकारतो. कोणी स्विकार अगर धिक्कार करो ब्रह्मज्ञानी भेदाभेद मानत नाही. असा ब्रह्मज्ञानी कार्य व त्याची कारणे यांची चर्चा करीत नाही. त्याची उन्मनी व समाधी अवस्था कधी भंग पावत नाही. ब्रह्मज्ञानी आपण केलेल्या कामाचा किंवा न केलेल्या अयोग्य कामाचा कधी गर्व मानत नाही. निरुपयोगी प्रयत्नांचा हव्यास धरीत नाही. अशा ब्रह्मज्ञात्याला एका जनार्दनी शरण जातात, त्याच्या केवळ दर्शनाने अनेकांचा उध्दार होतो असे ते म्हणतात.

238

निरपेक्ष निरद्वंद्व तो चि ब्रह्म-ज्ञानी
नायके चि कानीं परापवाद
सर्वदा सबाह्य अंतरीं शुचित्व
न देखे न दावी महत्त्व जगीं वाया
एका जनार्दनी पूर्णपणें धाला
शेजेचा मुराला रसीं उतरून

भावार्थ

जो मनाने पूर्णपणे निरपेक्ष आहे, ज्याला कुणाकडूनही कांही मिळावे अशी अपेक्षा नाही तो ब्रह्मज्ञानी समजावा.तो सदोदित अंतर्बाह्य शुध्द, निर्मल असतो कारण तो इतरांची निंदा किंवा स्तुति कानाने ऐकण्याचे टाळतो. ब्रह्मज्ञानी इतरांचा मोठेपणा डोळ्यांनी बघत नाही आणि स्वता:चा मोठेपणा जगाला दाखवत नाही.एका जनार्दनी म्हणतात,हा ब्रह्मज्ञानी स्वता:च्या आत्मानंदांत रममाण असतो.परिपक्व झालेले फळ आढींत घातले असतां जसे मधुर आणि रसमय बनते तसा हा ब्रह्मज्ञानी समजावा.

239

जागा परीं निजला दिसे । कर्म करी स्फुरण नसे
सकळ शरीराचा गोळा । होय आळसाचा मोदळा
संकल्प विकल्पाची ख्याति । उपजे चि ना कदा चित्तीं
या परी जनी ं असोनि वेगळा। एका जनार्दनी पाहे डोळा

भावार्थ

ब्रह्मज्ञानी सदैव जागृत असुनही निश्चल, शांत असतो.सतत कर्मरत असूनही कर्माचे स्फुरण चढले आहे असे वाटत नाही. निवांत मनांत संकल्प, विकल्पाचे तरंग उठत नाही. अशा प्रकारे लोकांमध्ये वावरत असूनही सर्वांपेक्षा निराळा असतो असे एका जनार्दनी म्हणतात.


240

दृष्टी देखे पर-ब्रह्म । श्रवणीं ऐके पर-ब्रह्म
रसना सेवी ब्रह्मरस । सदा आनंद उल्हास
गुरु-कृपेचे हें वर्म ।जग देखे पर-ब्रह्म
एका जनार्दनी चराचर अवघें ज्यासी परात्पर

भावार्थ

ब्रह्मज्ञानी आपल्या डोळ्यांनी केवळ परब्रह्मच पहातो.कानांनी केवळ परब्रह्मच ऐकतो.जिव्हेनें केवळ ब्रह्मरसच सेवन करतो. चित्त सतत आनंद व उल्हासानें उचंबळत असते.सर्व जग हे ब्रह्मज्ञानीला षर-ब्रह्म च वाटते. अवघी सजीव निर्जीव सृष्टी परब्रह्माचेच प्रतिबिंब आहे असा अनुभव येणे हे गरु-कृपेचे रहस्य आहे असे एका जनार्दनी म्हणतात.

241

ब्रह्मस्थितीचे हें वर्म । तुज दावितों सुगम
सर्वां भूती भगवद्भाव । अभेदत्वें आपण चि देव
संसार ब्रह्म-स्मृति । सांडोनिया अहंकृति
शरण एका जनार्दन । कृपा पावला परिपूर्ण

भावार्थ

एका जनार्दन ब्रह्मस्थितीचे रहस्य वर्णन करुन सांगतात, सर्व चराचर हे भगवंताने अंशरुपाने व्यापले आहे असा भगवद्भाव मनांत निर्माण होऊन आपण परमेश्वराचे च अंशरुप आहोत , देव व भक्त यांत द्वैत नाही असा अद्वैताचा प्रत्यक्ष अनुभव येऊन अहंकार, मी-पणा गळून पडणे हे गुरु-कृपेचे लक्षण आहे असे एका जनार्दन सांगतात.

गुरु कृपेचा चमत्कार

242

जनार्दने मज केला उपकार । पाडिला विसर प्रपंचाचा
प्रपंच पारखा झाला दुराचारी । केलीसे बोहरी काम-क्रोधा
आशातृष्णा ह्यांचे तोडियेले जाळे ।कामनेचें काळें केलें तोंड
एका जनार्दनी तोडिलें लिगाड । परमार्थ गोड दाखविला

भावार्थ

जनार्दन स्वामींनी आपल्यावर फार मोठा उपकार केला आहे. त्यांच्या कृपेनें नश्वर प्रपंचाची बंधने तुटून पडली आणि प्रपंचाचा विसर पडला. ज्या प्रपंच्याच्या मोहाने अनेक दुराचार घडतात त्या प्रपंचा पासून सुटका झाली, काम व क्रोध चित्तातून हद्दपार झालें. आशातृष्णा जाळ्यांत अडकलेलें मन जाळे तोडून मुक्त झाले. कामनेचे पूर्ण उच्चाटन झाले, अत्यंत गोड फळे देणार्या परमार्थाची ओळख पटली. असे एका जनार्दनी म्हणतात.

243

सर्व भावें दास झालों मी उदास। तोडिला मायापाश जनार्दने
माझें मज दाविलें माझें मज दाविलें। उघडें अनुभवले परब्रह्म
रविबिंबा परी प्रकाश तो केला। अंधार पळविला काम क्रोध
एका जनार्दनी उघडा बोध दिला।तो चा टिकवला हृदया माजी

भावार्थ

जनार्दन स्वामींनी केलेल्या उपदेशाने ऐहिक गोष्टीं बाबत उदासीन वृत्ती निर्माण झाली. स्वामींचा एकनिष्ठ दास बनलो. स्वता:चे आत्मरुप बघावयास मिळाले, परब्रह्म स्पष्टपणें अनुभवास आले.आत्मबोधारुपी सूर्यप्रकाशाचा उदय झाला, काम क्रोधाचा अंधार नाहीसा झाला. सद्गुरू जनार्दन स्वामींचा उपदेश हृदयांत कायमचा ठसविला असे एका जनार्दनी सांगतात.

244

अभिनव गुरुने दाखविले। ओहं सोनं माझे गिळिलें प्रपंचाचे उगवोनि जाळे ।केलें षडवैरियांचे तोंड काळें उदो-अस्ताविण प्रकाश । स्वयें देही दाविला भास मीपण नाहीं उरले। एका जनार्दनी मन रमलें

भावार्थ

सद्गुरूघ्या कृपेने मी-तू पणाचे सर्व भेदाभेद नाहिसे झाले.प्रपंचाचे जाळें मोकळे झाले.काम, क्रोध, लोभ, मोह, दंभ,अहंकार या षड्ररिपूंनी तोंड काळें केले.सूर्योदय व सूर्यास्त या शिवाय निरंतर आत्मबोधाचा प्रकाश सर्व देही भरून राहिला.एका जनार्दनी म्हणतात सद्गुरू वचनात मन कायमचे गुंतून राहिले.

245

अभिनव सांगतां विस्मयो दाटला। देही च भासला देव माझ्या
नवल कृपेचे विंदान कसे। जनार्दनें सरसें केलें मज
साधनाची आटी न करितां गोष्टी। हृदय-संपुटी दाविला देव
एका जनार्दनी एकपणें शरण । न कळे महिमान कांहीं मज

भावार्थ

सद्गुरूंनी सांगितलेल्या अभिनव गोष्टींनी विस्मय वाटला. आपल्या देहातच देव सामावलेला आहे या सत्य वचनाची प्रचिती आली. कोणत्याही साधनेचा आटापिटा न करता अंत:करणांत वसत असलेला देव दाखवला. एका जनार्दनी म्हणतात, सद्गुरूंचा महिमा अपार असून त्याचे वर्णन करणे शक्य नाही. सद्गुरूंना अनन्यपणे शरण जाणे च योग्य आहे.

246

पीक पिकलें प्रेमाचे। साठवितां गगन टांचें
भूमि शोधोनि पेरिलें बीज। सद्गुरू -कृपें उगवले सहज कामक्रोधांच्या उपटोनी बेडी। कल्पनेच्या काथा काढी एका जनार्दनी निभाव। विश्वंभरित पिकला देव

भावार्थ

प्रेमाचे एव्हढे अमाप पीक पिकले कीं, ते साठवण्यासाठी गगन अपुरे पडले. सुयोग्य अशी भूमी शोधून तेथे बी पेरले आणि सद्गुरू कृपेने ते बीज सहज उगवले. काम क्रोधाचे तण काढून टाकले, कल्पनेचा समूळ नाश केला. एका जनार्दनी म्हणतात, भाव-भक्तिच्या योगानें विश्वंभर देव प्रसन्न झाला.

247

भक्ति आणि मुक्ति फुकाचें ठेवणे। गुरु जनार्दन तुच्छ केलें
साधन आष्टांग यज्ञ तप दान ।तीर्थे तीर्थाटण शीण वाया
एका जनार्दनी दाविला आरसा।शुध्द त्यां सरिसा सहज झालों

भावार्थ

सद्गुरू जनार्दन स्वामींनी भुक्ति आणि मुक्ति या गोष्टी निरुपयोगी ठरवल्या आहेत. स्वामी या गोष्टी तुच्छ मानतात. यज्ञ, तप, दान, तीर्थयात्रा ह्या अष्टांग साधनांचा निरर्थक शीण होतो. एका जनार्दनी म्हणतात सद्गुरूंनी परम तत्वाचा आरसा दाखवून निजरुप प्रत्ययास आणले.

248

गुरु-कृपांजन पायो मेरे भाई। राम बिना कछु जानत नाहीं
अंतर राम बिहार राम। जहूं देखो तहं राम ही राम
जागत राम सोवत राम। सपनेमें देखो राजा राम
एका जनार्दनी भाव ही नौका। जो देखो सो राम सरिखा

भावार्थ

गुरु-कृपा रुपी अंजन डोळ्यांत घातले की, सारे विश्व रामरुप दिसू लागते. देहाच्या अंतरांत आणि बाहेर सर्वत्र रामाचे दर्शन घडते. जिकडे पहावे तिकडे रामरुप भरून राहिले आहे याचा प्रत्यय येतो.जागेपणी आणि झोपेंत तसेच स्वप्नांत देखील केवळ राम च दिसतो. एका जनार्दनी म्हणतात, राम-चरणाशी असलेला भक्ति -भाव हा च प्रत्ययकारी असून या भक्तिभावाने भेटणारा प्रत्येक जण राम च आहे असे वाटते.

249

ओहं कोहं सोहं सर्व आटलें। दृश्य द्रष्टत्व सर्व फिटले ऐसी कृपेची साउली । माझी जनार्दन माउली द्वैत -अद्वैताचे जाळें । उगविलें कृपा-बळें शरण एका जनार्दनी । एकपणें भरला अवनी

भावार्थ

एका जनार्दनी म्हणतात मी-तूं पणाचे सर्व भेदाभेद नाहिसे झाले. दृष्टीस भासणारे सर्व विश्व निराभास झाले .द्रुष्य, द्रष्टा आणि दर्शन ही त्रिपुटी विलयास जाऊन द्वैत-अद्वैत यांचे मायाजाल विरुन भक्त आणि देव एकरुप झाले, हे सद्गुरू जनार्दन स्वामींच्या कृपा-प्रसादाने घडून आले.

250

वेणुनादाचिया किळा। पान्हा फुटला निराळा आर्तभूत जीव तिन्हीं । चातक निघाले जीवनीं स्वानुभवाचे सरिता। जेंवि जीवना दाटे भरते एका एक गर्जे घनीं । पूर आला जनार्दनी

भावार्थ

श्री हरीच्या बासरीचा स्वर कानी पडला आणि भक्तिभावना उचंबळून आल्या. आर्त, जिज्ञासू, आणि साधक हे तिन्हीं चातकरुपी जीव स्वानुभवरुपी सरितेच्या जीवनाने तृप्त झाले. एका जनार्दनी म्हणतात, जनार्दन स्वामींच्या कृपा प्रसादानें जीवनाचे सार्थक झाले.

आत्म-साक्षात्कार

251

चित्त चैतन्या पडली गांठी । न सुटे मिठी।
संचित कर्माची झाली आटी । उफराटी दृष्टि
कैचा आठव दृश्याचा खुंटली वाचा। उदय झाला सुखाचा
देह विदेह वाढले मीतूंपणे। एका जनार्दनी सहज एकपणें

भावार्थ

सद्गुरू कृपेने चित्त चैतन्य या अविनाशी तत्वाशी एकरुप झाले आतां त्यांची ताटातुट होणे शक्य नाही.पूर्विच्या संचित कर्मांची बंधने तुटून पडली.बाह्य विश्वाच्या दृश्यांवर जडलेलें मन उलटे फिरुन अंतर्यामी स्थिर झाले. अनिर्वचनिय सुखाचा उदय झाला, त्याचे वर्णन करण्यासाठी शब्द सापडेनासे झाले. देह बुध्दी लयास जावून मी तूं पणाच्या द्वैत भावनेचा निरास झाला.एका जनार्दनी म्हणतात, सद्गुरू कृपेने विदेही अवस्था सहज प्राप्त झाली.

252

जाणती हे कळा हारपोनि गेली ।वृत्ति मावळली तया माजीं
पाहतां पाहणें हारपोनि गेले। मी माझे सरलें तयामाजीं
अंतरी बाहेरीं पाहतां शेजारी। शून्याची वोवरी ग्रासियेली
ग्रासियेले तेणें चंद्र सूर्य दोन्ही। एका जनार्दनी आनंद झाला

भावार्थ

जाणिवेची कळा लोप पावली, मनाच्या सर्व वृत्ती मुळापासून मावळल्या, पाहतां पाहतां सर्व दृष्ये हारपून गेली. एका जनार्दनी म्हणतात, मनाचे मीपण त्या साक्षात्कारांत संपून गेलें. चित्ताच्या अंतरंगात,बाह्यविश्वांत सभोवतालच्या अवकाशात ते च आत्मरुप व्यापून राहिले. त्या आत्मरुपाने चंद्र, सूर्याला ग्रासून टाकलें.या आत्मरुपाच्या साक्षात्काराने अवर्णनीय आनंदाचा अनुभव आला.

253

सत्व रज तम गेले निरसोनि । दृश्याची लावणी कैसी झाली
गेल्या माघारीं पाहतां न दिसे । स्वतां तो प्रकाश सदोदित
अंतरीं बाहेरीं पाहतां शेजारी। प्रकाश अंतरीं लखलख
एका जनार्दनी प्रकाश संपूर्ण । सवे नारायण बिंबलासे

भावार्थ

एका जनार्दनी म्हणतात, या अविनाशी आत्मरुपांत त्रिगुणात्मक (सत्व,रज,तम)सृष्टी विरुन गेल्या सारखं वाटले.सारे विश्व मावळलें.मागे वळून पाहताना केवळ प्रकाशा शिवाय कांहीच दिसेनासे झाले.त्या लखलखीत प्रकाशाने सर्व विश्व अंतर्बाह्य व्यापून टाकले.सूर्यनारायण उदयास आले.

254

त्रिभुवनाचा दीप प्रकाश देखिला। हृदयनाथ पाहिला जनार्दन
दीपांची ती वाती वातीचा प्रकाश । कळिकामय दीप देहीं दिसे
चिन्मय प्रकाश स्वयं आत्मज्योति। एका जनार्दनी भ्रांति निरसली

भावार्थ

अंतरंगात वसत असलेल्या सद्गुरू जनार्दन स्वामींचे दर्शन झाले आणि त्रिभुवन उजळून टाकणाऱ्या दिपाच्या प्रकाशाचा भास झाला. सद्गुरू कृपेचा दीप व वातीचा प्रकाश दीप कलिके सारखा हृदयाच्या गाभार्यांत प्रकाशमान झाला असे एका जनार्दनी सांगतात.

255

काना वाटे मी नयनासी आलो। शेखीं नयनाचा नयन मी झालो
दृष्टि, द्वारा मी पाहें सृष्टि। सृष्टि हरपली माझें पोटी
ऐसें जनार्दनें मज केलें। माझें चित्ताचें जीवपण नेले
एका जनार्दनी जाणोनि भोळा । माझे सर्वांग झाला डोळा

भावार्थ

एका जनार्दनी म्हणतात सद्गुरू जनार्दन स्वामींच्या कृपेची किमया आपण कानांनी ऐकली आणि त्यांचे दर्शन घेण्यासाठी आतुर झालो, स्वामींचे दर्शन होतांच नयनांना नविन दृष्टी प्राप्त झाली. आत्म-स्वरुपाचे रहस्य समजून आले आणि बाह्य- सृष्टि लोप पावली. आत्मरुपाच्या साक्षात्काराने देहाचे मी पण , चित्ताचे जीवपण विलयास गेले. सर्वत्र चैतन्य रुप दिसू लागले. सर्वांग डोळा बनून या चैतन्य स्वरुपाचा विलक्षण अनुभव आला.

256

उपाधीच्या नांवे घालियेलें शून्य। आणिक दैन्यवाणें काय बोलू
टाकुनिया संग धरियेला देव। आतां तो उपाय दुजा नाहीं
सर्व वैभव सत्ता जयाचें पदरीं। झालों अधिकारीं आम्ही बळें
एका जनार्दनी तोडियेला संग।झालों आम्ही नि:संग हरिभजनें।

भावार्थ

एका जनार्दनी या भजनांत म्हणतात,सद्गुरू जनार्दन स्वामींच्या उपदेश प्रमाणे त्यांनी सर्व उपाधी सोडून दिल्या इंद्रियांचा संग सोडून देऊन केवळ देवाला आपलासा केला.हरिभजनाचा छंद लागला,या छंदाने मन नि:संग झाले. सर्व वैभव,सद्गुरूंचे असून ते च सर्व सत्ताधारी आहेत,त्यांच्या च कृपेनें अधिकारी बनलो.

257

माझें मीपण देहीं चि मुरालें । प्रत्यक्ष देखिलैं परब्रह्म
पर -ब्रह्म सुखाचा सोहळा । पाहिलास डोळा भरुनिया
ब्रह्म-ज्ञानाची तें उघडली पेटी। झालो असें पोटीं शीतळजाणा
एका जनार्दनी ज्ञानाचें तें ज्ञान। उघड समाधान झालें जीवा

भावार्थ

या भजनांत संत एकनाथ परब्रह्म स्वरुपाचा अनुभव वर्णन करीत आहेत.परब्रह्म सुखाचा अवर्णनीय सोहळा त्यांनी डोळे भरून पाहिला आणि त्यांचे मीपण लयास गेले.ब्रह्मज्ञानाचे रहस्य उलगडले,अंतःकरण शांत झाले. एका जनार्दनी म्हणतात परब्रह्म हे साक्षात ज्ञान त्या ज्ञानाचे रहस्य समजले.मन पूर्ण समाधान पावले.

258

मन रामीं रंगलें अवघे मन चि राम झालें
सबाह्य अभ्यंतरी अवघें रामरुप कोंदलें

चित्त चि हारपलें अवघें चैतन्य चि झालें
देखतां देखतां अवघे विश्व मावळलें

पाहतां पाहतां अवघें सर्वस्व ठकलें
आत्मा रामाचें ध्यान लागलें मज कैसे

क्रिया कर्म अवघे येणें चि प्रकाशें
सत्य मिथ्या प्रकृती पर राम चि अवघा भासे

भक्ति अथवा ज्ञान शांति आणिक योग - स्थिति
निर्धारितां न कळें राम-स्वरूपीं जडली प्रीति
एका जनार्दनी अवघा राम चि आदी अंती

भावार्थ

या भजनांत संत एकनाथ अपूर्व भक्ती-रसाच्या अनुभवाचे वर्णन करतात.मन राम-नामांत इतके रंगून गेले की मन रामरुपच झालें.अंतरांत आणि बाह्य विश्वांत सर्वत्र रामरुपच कोंदून राहिले आहे असे वाटले.चित्त या रामरुपी चैतन्यांत हारपून गेले आणि पाहतां पाहतां सारा विश्वाचा भास दिसेनासा झाला. मी पणाची जाणिवच संपून गेली.आत्मारामाच्या स्वरुपाचे अखंड ध्यान लागले. भासमान,मायावी प्रकृतीत केवळ रामच भरून राहिला.भक्ति, ज्ञान योग आणि शांति यांचे मनवरील पटलच दूर झाले आणि राम-स्वरूपावर प्रिति जडली.एका जनार्दनी म्हणतात, रामच केवळ विश्वाच्या आदी अंती आहे याचा साक्षात्कार झाला.

सर्वत्र देवदर्शन

259

जन देव जन विजन । देवीं जडले तन मन
देव घरीं देव दारीं । देव दिसे व्यवहारी।
देव मागे देव पुढें । दृष्टि चैतन्य उघडें
एका जनार्दनी देव । सहज चैतन्य स्वयमेव

भावार्थ

तन मन परमेश्वरी चरणांशी गुंतून राहिले कीं, जनांत आणि वनांत सगळीकडे देवाचे अस्तित्व जाणवते. चार भिंतिंच्या आंत घरांत आणि बाहेर व्यवहारात देव दिसू लागतो. मागे पुढे सभोताली दृष्टिपुढे चैतन्याचा अनुभव येतो. एका जनार्दनी म्हणतात, चैतन्य सहजपणे एकमेव पुढे उभे ठाकले आहे असे वाटते.

260

पाहो गेलो देवालागीं । देवरुप झालो अंगी।
आतां मी-तूंपणा ठाव । उरला नाहीं अवघा देव
सुवर्णाची झालीं लेणीं । देव झाला जगपणीं
घटीं मृत्तिका वर्तत । जगीं देव तैसा व्याप्त
एकानेक जनार्दन । एका जडला एकपणें

भावार्थ

देव-दर्शनासाठी दवालयांत गेलो आणि देवाशी एकरुपता पावून देवरुप झालो. देव व भक्त वेगळे उरलेच नाही, सारे द्वैत संपून गेले. सुवंर्णाचे अलंकार घडवले, रुप आणि आकार बदलला तसाच परमेश्वर सर्व सृष्टीत भरून राहिला आहे. मातीच्या घटांत आंतबाहेर जशी माती च असते तसा देव सर्व जग व्यापून उरणारा आहे. एका जनार्दनी म्हणतात , तसेच ह्या गुरुतत्वाशी आपण एकरुप झालो आहे.

261

देव झाला पाठीं पोटीं । तया नाहीं आटाआटी
जेथें जाय तेथें देव । नाहीं भेद सर्वथा
संसारासी मारुनि लाथा । केला तत्वतां देशोधडी
विषयाचे ठेचिलें तोंड । मोडिलें बंड पाचांचे
एका जनार्दनी एकपणा साठीं ।देव पाठी पोटी भक्ता मागें

भावार्थ

ज्या भक्ताला पुढे मागे देवाचे अस्तित्व जाणवू लागते त्याला साधनेचा आटापिटा करावा लागत नाहीं. स्थल-कालाचा भेद नाहिसा होऊन त्याला सर्वत्र देव दिसतो. पअसा एकनिष्ठ भक्त संसाराला लाथ मारून जगापासून अलिप्त होतो. इंद्रिय विषयांचा संग टाळून मुक्त होतो. पंचमहाभुतानी बनलेल्या देहाचे बंड मोडून टाकतो. एका जनार्दनी म्हणतात, या एकनिष्ठ भक्तांच्या भक्ति साठी देव त्यांच्या मागे पुढे वावरत असतो.

262

अष्ट हि दिशा पूर्ण भरला देव। मा पूर्व-पश्चिम भाव तेथें कैचा
पाहे तिकडे देव व्यापूनि भरला। रिता ठाव उरला कोठे नाही
समाधि समाधान मनाचे उन्मन। मा देवा भिन्नपण नाही नाही
एका जनार्दनी एकपणा साठीं। देव पाठीं पोटीं भक्ता मागे

भावार्थ

परमेश्वर आठही दिशा व्यापून भरून राहिला आहे.सर्वत्र देवाचे अस्तित्व जाणवत असल्याने पूर्व , पश्चिम असा भेद नाहिसा झाला. सर्व विश्वांत देव व्यापून राहिल्याने रिक्त जागा दिसेनासी झाली. बघता बघता मन समाधी अवस्थेत गेले. उच्च पातळीवर जाऊन स्थिर झाले आणि अपूर्व समाधान झाले.असा आत्म साक्षात्काराचा अनुभव वर्णन करुन एका जनार्दनी म्हणतात, भक्ताच्या प्रेमसुखाचा आनंद घेण्यासाठी देव भक्ताच्या सभोवती सतत नांदतो.

263

साकर दिसे परी गोडी न दिसे । ती काय त्या वेगळी असें
तैसा जनीं आहे जनार्दन। तयातें पहावया सांडीं अभिमान
कापुरा अंगीं परिमळू गाढा । पाहतां पाहतां केवीं दिसे
पाठ पोट जैसें नाही चि सुवर्णा। एका जनार्दनी यापरी जाणा

भावार्थ

साखर आणि साखरेची गोडी जशी एकजीव असूनही साखर डोळ्यांना दिसते पण गोडी वेगळी दिसत नाही.कापुराचा नाकाला जाणवणारा सुवास उघड्या डोळ्यांनी बघता येत नाही. सोन्याचे नाणे जसे अंतर्बाह्य सोन्याने भरलेलें असते तसे सृष्टीच्या अणुरेणूत भरलेले आत्मतत्व जाणावे, जनांत अंशरुपानें भरलेला जनार्दन प्रत्यक्षात दिसत नाही ,या दैवी शक्ती चा अनुभव घेण्यसाठी अहंकार दूर करावा. असे एका जनार्दनी म्हणतात .

264

मागें पुढे विठ्ठल भरला । रिता ठांव नाहीं उरला
जिकडे पाहावे तिकडे आहे। दिशा-द्रुम भरला आहे
एका जनार्दनी सर्व देशी । विठ्ठल व्यापक निश्चयेंसीं

भावार्थ

या भजनांत संत एकनाथ विठ्ठल तत्व किती व्यापक आहे हे सांगत आहेत . जिकडे पाहावे तिकडे , मागे, पुढे दाही दिशांत हे इश्वरी रुप भरुन राहिलें आहे. हा विठ्ठल एकदेशीय नसून सर्व चराचरात त्याचे अस्तित्व जाणवते हे नि:संशय सत्य आहे असे एका जनार्दनी म्हणतात.

265

पहा कैसा देवाचा नवलाव। पाहे तिकडे अवघा देव
पाहणें पातलें देवे नवल केलें। सर्व हि व्यापिलें काय पाहीं
पहाणेयाचा ठाव समूळ फिटला।अवघा देहीं दाटला देव माझ्या
एका जनार्दनी कैसे नवल झाले। दिशाद्रुम दाटले देहें सहजी

भावार्थ

परमेश्वरी शक्तीचा चमत्कार असा कीं, जिकडे पाहावे तिकडे देव च दिसतो. देव रुप च सर्व आसमंतात व्यापून राहिले आहे तर त्या इश्वरी रुपा शिवाय अन्य काही नजरेस पडत नाही आणि पहाणाराही त्या रुपाशी एकरुप होतो. हे दैवी-रुप देहाच्या अणुरेणूत व्यापून राहते. एका जनार्दनी म्हणतात, सारे विश्व या देहांत सामावले आहे ही अनुभूती विस्मयकारक आहे.


266

देवासी कांहीं नेसणें नसे । जेथे तेथें देव उघडा चि दिसे
देव निलाजरा देव निलाजरा । देव निलाजरा पहा तुम्ही
लाजेसीं जेथें नाही ठाव ।पांढरा डुकर झाला देव
एका जनार्दनी एकल्या काज । भक्ति तेणें चि नेली लाज

भावार्थ

देव भक्तिभावाचा एव्हढा भुकेला आहे कीं, त्याचा लज्जा भाव लोपून गेला आहे अशी एक वेगळी कल्पना या भजनांत वाचायला मिळते. देव भक्तांसाठी आपले अंतर्बाह्य स्वरुप उघड करुन दाखवतो , देव निलाजरा आहे असा संदैश एका जनार्दनी देतात.

267

एक धरलिया भाव । आपण चि होय देव
नको आणिक सायास । जाय तिकडें देव भास
ध्यानीं मनीं शयनीं । देव पाहे जनीं वनीं
अवलोकीं जिकडे । एका जनार्दनी देव तिकडे

भावार्थ

मनामध्ये भक्तिभाव दृढ असला म्हणजे परमेश्वर प्राप्तीसाठी आणखी काही वेगळे सायास करण्याची गरज नाही.असा एकनिष्ठ भक्त ध्यान करीत असताना, चिंतन करताना , एकांतवासांत अथवा जनसमुहांत कोठेही असला तरी तो देवाच्या अस्तित्वाचा अनुभव घेत असतो, असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, असा भक्त आपणच देव होतो.

268

मज करुं दिली नाहीं सेवा । दाविलें देवा देहीं च
जग व्यापक जनार्दन । सदा असे परिपूर्ण
भिन्न भिन्न नाहीं मनीं । भरलासे जनीं वनीं
अवलोकी जिकडे । एका जनार्दनी देव तिकडे

भावार्थ

सद्गुरु कृपेने आपणास या देही च परमेश्वरी शक्तिची प्रचिती आली कोणत्याही प्रकारची सेवा न घडतां हे फळ मिळाले असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, सर्व विश्व व्यापून असलेला हा जनार्दन सर्वज्ञानी, परिपूर्ण असून भेदातीत आहे.

269

पाहलें रे मना पाहलें रे। बुध्दी -बोधें इंद्रिया सम जालें रे
नयनी पाहतां न दिसे बिंब। अवघा प्रकाश स्वयंभ
एका जनार्दनी पहाट। जनीं वनीं अवनी लखलखाट

भावार्थ

बुध्दिला झालेल्या पारमार्थिक बोधाने इंद्रियांना समत्व प्राप्त झाले, डोळ्यांना सूर्य-बिंब दिसनासे झाले. ज्ञान-सूर्याचा उदय झाल्यानें अवघे विश्व स्वयंभू प्रकाशाने उजळून निघाले. एका जनार्दनी म्हणतात, नगर, वन, सारी पृथ्वी या स्वयंभू प्रकाशाने न्हावून निघाली, सगळीकडे लखलखाट झाला.

270

जळ स्पर्शो जातां स्नानीं । तंव चिन्मय भासे जीवनी
कैसी वाहताहे गंगा । स्नानें हरपलें अंग
अंगत्व मुकलें अंगा । स्नानीं सोवळीं झाली गंगा
एका जनार्दनी मज्जन । सकळ तीर्थे झाली पावन

भावार्थ

एका जनार्दनी म्हणतात, सद्गुरू गंगेच्या प्रवाहांत स्नानासाठी उतरले आणि त्या पवित्र जलाने देहाचे देहपण च हरपले, चिरंतन इश्वरी तत्वाचा जीवनाला स्पर्श झाला आहे असा भास झाला. गंगा-जलाची मलिनता लोप पावली. सकळ तीर्थे पावन झाली.

271

स्वयं प्रकाशामाजीं केले असे स्नान।
द्वैतार्थ त्यागून निर्मळ झालो
सुविद्येचे वस्त्र गुंडोनि बैसलो ।
भूतदया ल्यालों विभूति अंगीं

चोविसा परतें एक ओळखिलें ।
तें चि उच्चारिलें मूळारंभीं।
एका भावें नमन भूतां एकपणीं ।
एका जनार्दनी संध्या झाली

भावार्थ

या भजनांत संत एकनाथ पारमार्थिक संध्येचे वर्णन करीत आहेत. ज्ञान -सूर्याच्या स्वयं प्रकाशांत स्नान केल्याने चित्तातिल द्वैत-भावाची मलिनता लोप पावून चित्त निर्मळ झाले. सुविद्येचे वस्त्र नेसून भूतदयेची विभूति अंगाला लावली. चोविस तत्वाच्या पलिकडे असजलेल्या ॐ काराचा उच्चार मूळारंभी करून सर्व प्राणिमात्रांना नमन केले. अशा प्रकारे संध्या-पाठ संपूर्ण झाला.

272

झाली संध्या संदेह माझा गेला ।आत्माराम ह्रदयीं प्रगटला
गुरु-कृपा निर्मळ भागीरथी। शांति क्षमा यमुना सरस्वती
ऐसीं पदे एकत्र जेथें होती। स्वानुभव स्नान हे मुक्त-स्थिति
सद्बुद्धीचे घालुनि सुखासन। वरी गुरुची दया परिपूर्ण
शम-दम विभूति चर्चुनि जाण। वाचे उच्चारी केशव नारायण
सहज कर्मे झालीं तीं ब्रह्मार्पण। जन नोहे अवघा हा जनार्दन
आइकता निववी साधुजन। एका जनार्दनी बाणली निजखूण

भावार्थ

एका जनार्दनी या भजनांत सांगतात, संध्या झाली आणि मनातिल संदेह समूळ नाहिसा झाला. ह्रदयांत आत्माराम प्रगट झाला .गुरु-कृपेची भागीरथी, शांतिरुपी यमुना आणि क्षमा रुपी सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमांत स्वानुभवाचे स्नान करून मुक्त-स्थिती प्राप्त झाली. सद्बुद्धीचे सुखासन घालून शम-दमाची विभूति अंगाला लावली. वाचेने केशव नारायण या नामाचा जप सुरू केला. या पुण्याईने सारी कर्मे सहजपणे इश्वर-चरणी अर्पण केली. गुरु-कृपेने जनीं वनीं अंत:करणी एकच जनार्दन भरुन राहिला आहे असा साक्षात्कार झाला. ही श्रध्दा चित्तांत कायम स्वरुपी दृढ झाली.

273

बोधभानु तया नाहीं मध्याह्नु।
सायंप्रातर् नाही तेथें कैचा अस्तमानु
कर्म चि खुंटले करणें चि हारपलें।
अस्तमान गेलें अस्तमाना
जिकडे पाहे तिकडे उदयो चि दिसे।
पूर्व पश्चिम तेणें कैची भासे
एका जनार्दनी नित्य प्रकाश ।
कर्माकर्म झालें दिवसा चंद्र जैसा

भावार्थ

निरंतर प्रकाशणाय्रा ज्ञान -सूर्याला सकाळ, दुपार,संध्याकाळ या काळाचे बंधन नसते, उदय आणि अस्त या स्थितिच्या मर्यादा नसतात. तसेच पारमार्थिक बोध झालेल्या साधकाचे कर्म ,अकर्माचे बंधन गळून पडते.या साधकाच्या दृष्टीने जिकडे पाहावे तिकडे प्रकाशच असतो ,मावळणे ही क्रियाच अस्तित्वांत नसते. पूर्व, पश्चिम (उगवती आणि मावळती) या दिशांचे भान ही हरपून जाते. एका जनार्दनी म्हणतात, या आत्मज्ञानी साधकाचे कर्माकर्म दिवसा दिसणाऱ्या चंद्रा सारखे निस्तेज असते.

274

कृष्ण चंदन आणिलें । सकळ वेधिलें परिमळें
तेथें फुटती अंकुर । अंगी भावाचे तरुवर
खैर घामोडे चंदन । कृष्ण-वेधे वेधिलें मन
एकाएक हरिख मनीं । वसंत दाटे जनार्दनी

भावार्थ

या भजनांत संत एकनाथांनी कृष्ण भक्तीवर सुंदर रुपक योजले आहे. श्री कृष्णरुपी चंदनाच्या सुगंधाने सर्वांचे मन वेधून घेतले. सर्वांच्या देहावर भावभक्तीचे अंकुर फुटले. एका जनार्दनी म्हणतात, मनाच्या प्रांगणात वसंताचे आगमन झाले. आनंदाने मन भरून गेले.

275

आतां कैसेनि पुजूं देवा । माझी मज घडें सेवा
तोडू गेलो तुळसी-पान । तेथें पाहतां मधूसूदन
पत्र गंध धूप दीप । तें हि माझें चि स्वरुप
एका जनार्दनी पुजा । पूज्य पूजक नाही दुजा

भावार्थ

या। भजनांत संत एकनाथ देवपुजेच्या संदर्भांत एक नविनच कल्पना मांडतात. देवपुजेसाठी तुळशीचे पान तोडायला गेलो असतांना मधुसूदनाचे दर्शंन घडलें. पाने, फुले, गंध, धूप, दीप हे सर्व पूजा साहित्य स्वता:चीच रुपे आहेत असे वाटले. एका जनार्दनी म्हणतात, पूजा करणारा आणि पूजेचे आराध्य दैवत वेगळे नसून एकरुप च आहेत आतां देवाची पूजा कशी करता येईल.

276

मी चि देवो मी चि भक्त । पूजा उपचार मी समस्त
ही चि उपासना भक्ति । धर्म अर्थ सर्व पुरती
मी चि गंध मी चि अक्षता । मी चि आहे मी चि पुरता
मी चि धूप मी चा दीप । मी माझें देव स्वरूप
मी चि माझी करीं पूजा । एका जनार्दनी बोले वाचा

भावार्थ

या भजनांत संत एकनाथ देवपूजे विषयी एक वेगळाच दृष्टिकोन व्यक्त करतात. पूजा करणारा भक्त हाच पूजेचा उपचारही आहे,पूजे पासून मिळणारे फळ (धर्म, अर्थ, काम, मोक्ष) हे सुध्दा तो भक्त च आहे, पूजेला लागणारे सर्व साहित्य (गंध, धूप, दीप, अक्षता इ.) हे सुध्दा त्यां भक्ताचे च रुप आहे. ईतकेच नव्हे तर ज्याची पूजा केली जाते तो देव देखील भक्त च आहे. एका जनार्दनी म्हणतात, सतत केलेल्या उपासनेने देव भक्तातील द्वैत संपून भक्त आणि देव एकरुप होतात.

39 ज्ञोनोत्तर जीवन

277

मी तो स्वयें परब्रह्म । मी चि स्वयें आत्माराम
मी तो असे निरूपाधी । मज नाही आधि -व्याधि
मी तो एकट एकला । द्वैत-भाव मावळला
मज विण नाहीं कोणी । एका शरण जनार्दनी

भावार्थ
आत्मज्ञान झालेल्या साधकाचे मनोगत या अभंगांत संत एकनाथ व्यक्त करतात. आपणास कोणतिही आधि, व्याधी, उपाधी नाहीं. चित्तातील द्वैत भाव लयाला जाऊन परब्रह्म रुपाशी एकरूप झालो असून सद्गुरू चरणी सर्वभावे शरणागत आहे असे एका जनार्दनी म्हणतात.

278

घर सोडोनि जावें परदेशा । मज सवें देव सरिसां
कडे कपाटें सीवरी । जिकडे पाहे तिकडे हरि
आतां कोणीकडें जावें । जिकडें पाहे तिकडें देव
एका बैसला निरंजनी । न जाईजे जनीं वनीं

भावार्थ

घराचा त्याग करून परदेशी गेलो तरी देव सतत आपल्या समवेत आहे ही जाणीव असल्याने एकनिष्ठ भक्ताला जिकडे पाहावे तिकडे देवाचे अस्तित्व जाणवते. एका जनार्दनी म्हणतात, देव नाही असे ठिकाण च नसल्याने नगरांत किंवा अरण्यांत कोठेही न जातां एका ठिकाणी निवांत बसावे.

279

जिकडे जावें तिकडे देवचि सांगातें। ऐसे केले नाथें पंढरीच्या
शब्द तेथें झाला समूळ चि वाव। गेला देहभाव हारपोनि
अंतरी बाहेरीं एकमय झाले। अवघे कोंदाटलें परब्रह्म
एका जनार्दनी ऐसी झाली वृत्ती। वृत्तीची निवृत्ती चिदानंदीं

भावार्थ

एका जनार्दनी म्हणतात, पंढरीच्या विठ्ठलाने अशी जादू केली कीं, जिकडे जावे तेथे देव सन्निध आहे असे वाटते. बाहेरील विश्व आणि अंतरंग विठ्ठलमय झालें. देहाचे भान हरपून गेले. सृष्टीतील अणू, रेणू या परब्रह्म स्वरुपाने व्यापून टाकले.या चे वर्णन शब्दात करावें तर शब्द च पोकळ ठरले. या चिदानंद स्वरूपांत वृत्तीची निवृत्ती झाली.

280

येणें जाणें खुंटलें क्रिया -कर्म ठेले। मज माझें भेटले आत्मरुप
त्यागूं तें काय भोगूं ते काय। सर्व ब्रह्मरूप पाहे कोंदाटलें
क्रिया कर्म धर्म निखिल परब्रह्म। त्यागूं भोगूं तेथें केवळ भ्रम
एका जनार्दनी सहजीसहज एक। एकी एक पाहतां कैंचेअनेक

भावार्थ

साधकाच्या ज्ञानोत्तर जीवनात कोठे येणे जाणें, क्रिया कर्म संपून जाते.आत्मज्ञान झाल्यानंतर कांही मिळवायचे बाकी राहत नाही.काही भोग किंवा कशाचा त्याग करण्याची ईच्छा च उरत नाही. त्याग, भोग या केवळ भ्रामक कल्पना आहेत असे वाटते.सर्व क्रिया, कर्म, धर्म एका परब्रह्मांत विलीन होतात. एका जनार्दनी म्हणतात, सर्वत्र व्यापून राहिलेल्या परब्रह्माचा एक अंश बनल्यावर दुजेपणाची वार्ता संपून जाते.

281

सकळ गोडिये जें गोड आहे । तें रसना चि झाली स्वये
आतां चाखावें तें कायें। जिव्हा अमृता वाकुल्या दिये
तया गोडपणाच्या लोभा । कैशा सर्वांगीं निघती जिभा
एका जनार्दनी गोडी । तया क्षण एक रसना न सोडी

भावार्थ

एका जनार्दनी म्हणतात, सद्गुरूंच्या मुखातून बाहेर पडलेल्या उपदेशामृताची गोडी रसनेने चाखली आणि सर्व गोड पदार्थापेक्षा मधुर रुप रसनेनें धारण केले. रसनेलाच एव्हढी गोडी प्राप्त झाली कीं त्यापुढे अमृताची गोडी फिकी पडली. रसनेचे हे माधुर्य चाखण्यासाठी सर्वांगाला जिभा फुटल्या. गुरु- मुखांतून आलेल्या उपदेशाच्या अमृताची गोडी एक क्षणभरही सोडण्यास रसना तयार नाही.

एकनाथांचे अभंग

मंगलाचरण

1

ॐ नमो सद्गुरूनिर्गुणा। पार नाही तंव गुणा। बसोनि माझिया रसना। हरिगुणा वर्णवी ।।1।।
हरिगुण विशाल पावन। वदवीं तूं कृपा करून । मी मूढमती दीन। म्हणोनि कींव भाकितसें।। 2।।
तुमचा प्रसाद जाहलिया पूर्ण । हरिगुण वर्णीन मी जाण । एका वंदितसें चरण। सद्गुरू आदरें।। 3।।

भावार्थ

मंगलाचरणाच्या आरंभी संत एकनाथ आपले सद्गुरू जनार्दन स्वामी जे अपरंपार गुणांनी युक्त असून निर्गुण(सत्व,रज,तम) या गुणांच्या अतीत आहेत त्यांची करुणा भाकित आहेत. आपण मूढमती असून श्रीहरिचे अगणित, पावन गुण वर्णन करण्यास असमर्थ आहोत असे विनयाने सांगून सद्गुरूंच्या चरणांना वंदन करून त्यांचा कृपा प्रसाद मागत आहेत.सद्गुरूंची कृपा प्राप्त झाली की हरिगुण वर्णन करणे शक्य होईल असा विश्वास ते प्रकट करतात.

2

नमो व्यासादिक कवी हे पावन । जे परिपूर्ण धन भांडाराचे।। 1।।
करुनी उपदेश तारिलें बहुतां । उपदेश तत्वतां चालतसे ।।2।।
एका जनार्दनी तुमचा मी दास। येवढी ही आस पुरवावी ।।3।।

भावार्थ

सद्गुरू चरणांचे दास असलेले एका जनार्दनी आपली मागणी सद्गुरूंनी पूर्ण करावी अशी विनंती करतात आणि व्यासादिक कवी जे पारमार्थिक धनाचे भांडार असून ज्यांच्या उपदेशाने अनेक साधक तरून गेले आहेत अशा ज्ञान वंतांनी आपणास उपदेश करून उपकृत करावें अशी ईच्छा व्यक्त करतात.

3

परा पश्यंती मध्यमा वैखरी। नमियेली खरी आदिमाया।।1।।
वसोनिया जिव्हे वदावें कवित्व।हरिनामीं चित्त निरंतर ।।2।।
आणि संकल्प नाहीं माझे मनीं। एकाजनार्दनी वंदितसे।।3।।

भावार्थ

परा पश्यंती,मध्यमा,वैखरी या चारी वाणींची देवता आदिशक्ती आदिमाया असून तिला वंदन करुन एका जनार्दनी या आदिमायेने आपल्या जिव्हाग्री वसून कवित्व वदवावे अशी प्रार्थना करतात. हरिनामाशी आपलें चित्त निरंतर जडून राहावे या शिवाय वेगळा कोणताही संकल्प आपल्या मनांत नाही अशी मागणी एका जनार्दनी आपल्या सद्गुरूकडे करतात.

4

श्रीगुरुराया पार नाहीं तव गुणी। म्हणोनि विनवणी करीतसों ।।1।।
मांडिला व्यवहार हरिनामीं आदर । सादरा सादर वदवावें ।।2।।
न कळेचि महिमा उंच नीचपणें। कृपेचे पोसणें तुमचे जाहलो ।।3।।
एका जनार्दनी करुनी स्तवन। घातिलें दुकान मोलेंविण ।।4।।

भावार्थ

सद्गुरूंचे अगणित गुण आठवून त्या गुणांचे स्तवन करुन विनवणी करतांना एका जनार्दनी म्हणतात, हरिनामाचा आदर करुन आपण हरिचे गुण काव्यात रचण्याचा संकल्प केला असून सादरी करणासाठी सद्गुरुंची कृपा प्राप्त व्हावी अशी मनोमन प्रार्थना करीत आहेत.यासाठी लागणारी काव्यप्रतिभा अंगी नसतांना हा (मालाविण दुकान घालण्याचा उद्योग) काव्य-रचनेचा घाट घातला आहे.आतां कृपावंत होऊन सद्गुरूंनी सहाय्य करावें.

5

असतां बंदीशाळे। देवकी डोहळे। गर्भ घननिळे आथियेला।।1।।
गुज पुसे भ्रतारा। आनु नेणें दुसरा आवडी अवधारा । जिवा होय ।।2।।
मेळवुनि लेंकुरें । खेळ खेळावा साकार। गोकुळीं अवतार। गौळिया घरी।। 3।।
वर्षता शिळाधारीं। उचलला महागिरीं। वेणु पावे करीं। वाजवीत ।। 4।।
जळीं रिघ करावा । भवसर्प नाथावा। वरि बैसो बरवा। भाव माझा।। 5।।
कंसादिक वीर। त्यांचा करावा संहार । कीजे राज्यधर। उग्रसेना ।।6।।
एका यश द्यावे। त्रैलोक्य जिंकावें । कनकपूर वसवावें। सिंधूमाजीं ।।7।।
एका जनार्दनी । डोहाळे संपूर्ण । पुरवी नारायण। वासनेचे ।।8।।

भावार्थ

कंसाच्या बंदीशाळेंत असलेली देवकी आपले डोहाळे वासुदेवाला सांगत आहे. गोकुळांत गवळ्या-घरी अवतार घेऊन सवंगडी जमवून खेळ खेळणारा, हातांत वेणू घेऊन पावा वाजवणारा, शिळंधार पावसांत गोवर्धन पर्वत करांगुली वर उचलून धरणारा, यमुनेच्या जळांत शिरून कालिया सर्पाला घालवून लोकांना भय-मुक्त करणारा,कंसा सारख्या दुष्टांचा संहार करणारा, उग्रसेनाला राजपद मिळवून देणारा, त्रैलोक्य जिंकून समुद्रात सोन्याची द्वारका वसवणारा, असा घननीळ जन्माला यावा असे वाटते. हे आपल्या मनीचे डोहाळे नारायणाने पूर्ण करावेत असे देवकी आपल्या पतीदेवाला कारागृहांत सांगत आहे.


6


देवकी  निज उदरीं। गर्भाची  पाहे थोरी। तंव सबाह्य  अभ्यंतरीं। व्यापक श्रीकृष्ण ।।1।।

अगे  हा स्वत: सिध्द हरी।  स्वयंप्रकाश  करीं । मीपणा  माझारीं। गर्भ वाढे।। 2।।

आतां  नवल कैसे  परी। आठवा गर्भ धरी। त्याहि  गर्भा माझारीं।  मज मी देखे।। 3।।

दाहीं  ईद्रिया माझारीं। गर्भाची वाढे  थोडी। कर्म तदाकारी । इंद्रिय वृत्ति  ।।4।।

चितप्रकाशासी डोहळे। सद्रूप सोहळे। आनंदकल्लोळे  गर्भ वाढे।। 5।।

तेथें  स्वस्वरूपस्थिती ।सुखरुप  प्रसुती। आनंद त्रिजगतीं  परिपूर्ण।।6।।

एकाजनार्दनी । ज्ञानगर्भु  सार । चिद्रूप  चराचर। निखळ नांदू।। 7।।


भावार्थ


आपल्या  उदरांत वाढणाऱ्या  गर्भाचे देवकी माता कौतुकाने निरिक्षण  करीत असतांना  देहाच्या आंतबाहेर  व्यापकपणे  श्रीकृष्ण  रुप भरुन राहिले आहे,  हे रुप स्वयंसिद्ध असून स्वयंप्रकाशी  आहे असा अनुभव  येऊ लागला. विशेष नवलाची  गोष्ट अशी कीं,  या आठव्या गर्भाच्या  अंतरी देवकी  मातेला आपले  रुप दिसत आहे, पांच कर्मेंद्रिये  आणि पांच ज्ञानेंद्रियें यांच्या  सर्व वृत्ति हरिरुपाशी तदाकार झाल्या  आहेत असा  अनोखा अनुभव येऊ लागला. सद्चिदानंद स्वरुपांत देवकी तल्लीन झाली. स्वस्वरुपस्थिची  अखंड जाणीव चित्त व्यापून राहिली , त्रैलोक्य निरामय  आनंदाने पूर्ण भरून गेले. सारी चराचर सृष्टी श्रीकृष्ण  रुपाशी एकरुप झाली. निखळ आनंदात सुखरुप  प्रसुती झाली. असे  एका जनार्दनी म्हणतात.देवकी करी चिंता । केवी आठवा वाचे आता । ऐसी \ भावना भाविता । जिवी तळमळ ।।१।।

तंव न दुखताच पोट । वेण न लगता उध्दट । कृष्ण झाला प्रगट । स्वयें अयोनिया ।।२।।

हरि सुनीळ सांवळे । बाळ निजतेजे तेजाळे । देखोनि वेल्हाळ । स्वयें विस्मीत ।।३।।

ऐसे देखोनि श्रीकृष्णासी । मोहे आच्छादु जाय त्यासी । तंव प्रकाशु तियेसी कैसा वरेना ।।४।।

वेगी वासुदेवाते म्हणे । तुम्ही गोकुळासी न्या तान्हे । एका जनार्दने कृपा केली ।।५।।


भावार्थ


देवकीच्या मन हे आठवे अपत्य कसे वाचेल या भयाने चिंताग्रस्त  झाले, या भावनेने जीव तळमळु लागला. बाळाचे आकाशासारखे निळेसावळे रुप स्वतेजाने झळाळत होते, ते पाहून ती विस्मयचकित झाली. प्रसुतिच्या कोणत्याही कळा (वेदना) न येता कृष्ण प्रगट झाला. त्या कृष्णरुपाने देवकीला मोहिनी घातली. हे अवर्णनीय कृष्णरुप कोणाला दिसु नये म्हणून ती त्याला पांघरूणाने झाकण्याचा प्रयत्न करु लागली. परंतु ते झळाळणारे स्वयंतेज देवकीला आवरणे शक्य नव्हते. एका जनार्दनी म्हणतात, देवकी आवेगाने वसुदेवाला सांगते की बाळाला त्वरेने गोकुळाला घेऊन जावे.देवकी म्हणे वासुदेवासी । वेगी बाळक न्यावे गोकुळासी । घवघवीत तेजोराशी । देखे श्रीकृष्ण ।।१।।

पूर्ण प्रकाश निजतेजे । पाहता न दिसे दुजे । तेथ कैचे माझे तुझे । लपणे छपणे ।।२।।

सरसर अरजे दुरी । परब्रह्म आम्हा करी । अहं कंसाचे भय भारी । बाधी कवणा ।।३।।

सर्वेचि पाहे लीळा । मुगुट कुंडले वनमाळा । कंठी कौस्तुभ तेजाळा । कटी तटी सूत्र ।।४।।

क्षुद्र घंटिका किंकणी । बाहु भूषणे भूषणी । चिद्रत्ने महामणी । वीर कंकणे ।।५।।

कमलवदन हरी । कमल नेत्रधारी । लीला कमळे करी । झेलीतसे ।।६।।

करकमळी कमळा । सेवी चरणकमळा । ऐशी वसुदेव देखे डोळा । दिव्य मूर्ति ।।७।।

लक्ष्मी डावलुनिया जाण । हृदयी श्रीवत्सलांछन । द्वीजपदाचे महिमान । देखे दक्षिणभागी ।।८।।

शंख चक्रादि आयुधे चारी । पीतांबर धारी । सगुण निर्गुण हरि । समसाम्य ।।९।।

ऐसे सगुण निर्गुण भाका । पहात पहात देखा। भिन्न भेदाची न रिघे रेखा । कृष्णपर्णीं ।।१०।।

एका जनार्दन खरे । निजरूप निर्धारे । अहं कंसाचे वावरे । मिथ्या भय ।।११।।


भावार्थ


घवघवीत तेजोराशीसारखा दिसणाऱ्या या बाल्काला वेगाने गोकुळात न्यावे असे देवकी वासुदेवाला सांगते. श्रीकृष्णाच्या स्वयं तेजासमोर दुसरे  काही दिसेनासे झाले असता तेथे तुझेमाझ ही द्वैतभावनाच लोपून जाते, लपणे छपणे संभवत नाही. प्रत्यक्ष परब्रह्म जवळ असतांना कंसाचे भय बाधू शकत नाही असे सांगून वासुदेव कृष्णरुपाचे वर्णन करतात. कमलासारखे वदन असलेल्या श्रीहरीचे नेत्र कमलदलासारखे आहेत. हातामध्ये धारण केलेले कमळ हरीच्या चरण-कमळाला स्पर्श करीतआहे मस्तकावर मुकुट, कानांत कुंडले, गळ्यात वनमाळा, कंठाशी तेजस्वी कौस्तुभमणी, हातामध्ये छोटया घंट्या असलेली बाहुभुषणे, रत्नजडित मणी असलेली वीर-कंकणे अशी दिव्यमूर्ति वासुदेवानी डोळ्यांनी अवलोकन केली. छातीवर उजव्या बाजूला द्विज-पदाचे चिन्ह धारण करणार्या चतुर्भुज श्रीहरीने हातात शंख, चक्र ही आयुधे धारण करून पीतांबर परिधान केलेला दिसत होता. निर्गुण परब्रह्ममाचे हे सगुण साकार रुप निरखित असतांना वसुदेवाला मनातील कंसाचे भय मिथ्या आहे याची खात्री पटली, असे एका जनार्दनी सांगतात.देवकी  वसुदेवाकडे  पाहे। तंव तो  स्वानंदे गर्जताहे। येरी धावून  धरी पाये। उगे  रहा।। 1।।

जळो जळो  ही तुमची  बुध्दी  । सरली संसारशुध्दी। कृष्ण  लपवा त्रिशुध्दी। जग प्रगट न  करावा ।।2।।

आतां मी करूं कैसे। भ्रतारा  लागलें पिसे। मज मायेच्या ऐसें। पुरुष ममता न  धरी।।3।।

मज मायेची  बुध्दी ऐसी।  म्यां आच्छादिलें  श्रीकृष्णासी। वेगें  होईन तुमची दासी। अति  वेगेंशीं बाळ न्यावें ।।4।।

येरु म्हणे  नवल जालें  । तुज कृष्णे  प्रकाशिलें । त्वां  केवीं  आच्छादिलें  कृष्णरुप ।।5।।

सरसर  अरजे मूढें। कृष्णरुप वाडें  कोडें । माया  कैंची ।।6।।

येरी  म्हणे सांडा चावटी । कोरड्या  काय सांगू  गोष्टी गोकुळासी  उठाउठी बाळ न्यावें  माझें ।।7।।

अवो  कृष्णीं चिंतिसी जन्ममरण  ।हेंचि तुझें  मूर्खपण  कृष्णनामे  जन्ममरण । समूळ  निर्दळिलें ।।8।।

सरो  बहू बोलाचा  बडिवारु । परि  निर्धारु न धरवे  धीरु। या  लागीं  लेंकरूं  । गोकुळा न्यावें  ।।9।।

तुम्हीं न माना माझिया बोला  । वेणेंवीण उपजला। नाहीं  योनिद्वारां आला । कृष्णनाथु  ।।10।।

आतां  मी काय करूं  वो। वसुदेव म्हणे  नवलावो। तुझ्या  बोलाचा अभिप्रावो। तुझा तुजची न कळे।।11।।

चोज कैसेविण । ज्या नाहीं जन्ममरण। त्यासी  मारील  कवण। समूळ  वावो ।।12।।

जेणें  मीपण आभासे । तेणें  माझें मूर्खपणें  तुम्हां दिसे । हें  अंगीचें निजरुप पिसें । न  कळे तुम्हां  ।।13।।

कृष्ण निजबोधु  सुंदरा। यासी जीवें जतन  करा । जाणिवेच्या अहंकारा। गुंता  झणीं।। 14।।

आतां  काय मी बोलूं  शब्दू। ऐसा करितां अनुवादू  । बोले  खुंटला  शब्दू । प्रगटला  कृष्ण ।।15।।

प्रकृति  पुरुष दोन्ही। मीनली  एकपणीं । एका  जनार्दनी बंदी मोक्ष  ।।16।।


भावार्थ


श्री  कृष्ण दर्शनाने  हर्षभरित होऊन गर्जना करणाऱ्या  वसुदेवाला पाहून देवकी हतबुद्ध होते. स्त्री  सुलभ ममतेने  तिने  कृष्णाला  अच्छादिलें  पण पुरुष स्नेहाच्या  बंधनांत बांधला  जात नाही  असे असतांना  बाळाच्या संरक्षणाचा विचार  न करतां  वसुदेव मोहबंधनात  अडकत आहे हे पाहून  त्याला शांत करून , वेगाने  बाळाला गोकुळी न्यावें अशी  विनंती  करते. श्री  कृष्ण स्वयंप्रकाशी  असून त्यानेच हे विश्व  प्रकाशित केले आहे, त्याला अच्छादिलें  असे म्हणणे मूर्खपणा आहे, ज्याच्या केवळ  नामस्मरणाने जन्म मरणाचे  बंधन तुटून पडते, जो  जन्म मरणाच्या अतित आहे  त्याला कोणी मारील असे म्हणणे  अज्ञानाचे लक्षण आहे असे तत्वज्ञान  सांगणाऱ्या वसुदेवाला सावध करण्यासाठी श्रीकृष्ण  स्वयंमसिध्द असूनही तो बाळरुपांत असल्याने  प्राण पणाला  लावून त्याचे कंसापासून  रक्षण करा असे कळकळीने सांगून  देवकी स्तब्ध होते. देवकीचा भावार्थ  लक्षांत येताच  पती-पत्नीच्या विचारांचे  मीलन होऊन संकटापासून मोक्ष (सुटका)  मिळतो. असे एका जनार्दनी सांगतात.

10


श्रीकृष्ण  न्यावा गोकुळा  । पायीं स्नेहाच्या  शृंखळा। कायाकपटीं  अर्गळा । मोह   ममतेच्या ।। 1।।

कृष्णीं  धरितां आवडी  । स्वये  विराली स्नेहाची  बेडी । मुक्तद्वार परवडी  । नाही  अर्गळा  शृंखळा।।  2।।

कृष्ण जंव  नये हातां । तंवचि बंधनकथा  । पावलिया  कृष्णनाथा। बंदी  मोक्ष।। 3।।

ते संधि  रक्षणाईते। विसरली रक्षणातें।  टकमकीत पहाते। स्वयें कृष्ण नेतां ।।4।।

श्रीकृष्ण  अंगशोभा। नभत्व लोपलें नभा।  दिशेची  मोडली प्रभा  । राखते कवण।। 5।।

अंधारामाजी  सूर्य जातू । श्रीकृष्णासी असे  नेतु । सत्व स्वभावे असे सांगतु । कृष्ण  कडिये पडियेला ।।6।।

अंध ते बंधन गेले। राखतो  राखणे ठेलें । एका जनार्दनी केलें। नित्य  मुक्त ।।7।।


भावार्थ 


श्री  कृष्णाला  गोकुणाला न्यावे  पण पायांत स्नेहाच्या  साखळ्या , देहाच्या तिजोरीला  ममतेची कडी आणि मोहाचे बंधन! कृष्णाचा  ध्यास लागताच स्नेह-ममतेची बेडी आपोआप गळून  पडते, मोक्षाची पर्वणी येते, जो पर्यंत कृष्ण सखा  आपलासा होत नाही तोपर्यंत सर्व बंधन बांधून ठेवतात. कृष्ण-कृपा  होताच मोक्षच बंदी बनतो. बाळाचे रक्षण करु पाहणारी देवकी, रक्षण  करण्याचे विसरून दूर जाणाऱ्या कृष्णाकडे एकटक बघत राहते. कृष्णाच्या  निळसर, सावळ्या अंगकांतीघ्या शोभेत  आकाशाची निळसर शोभा लोपून जाते. दिशांची  प्रभा निस्तेज बनते. मावळता सूर्य अंधारांत  अलगद बुडत जातो तसा मोह-बंधनाचे, अज्ञानाचे  पटल दूर सारून  वसुदेव  कृष्णाला  घेऊन यमुनेच्या  दिशेने निघतो, वसुदेव नित्यमुक्त  होतो असे एका  जनार्दनी म्हणतात.


11


तीरा  आणिला श्रीकृष्ण  । हरिखे यमुना झाली  पूर्ण । चढे स्वानंद  जीवन । चरण  वंदनार्थ।।1।।

वसुदेव म्हणे कटकटा यमुना  रोधिली वाटा।  कृष्ण असतां निकटा। मोहे  मार्ग न दिसे।। 2।।

कृष्ण  असतां हातीं। मोहें  पडली भ्रांती। मोहाचिये  जाती। देव नाठवे बा।। 3।।

मेळी  मुकी वेताळ।मारको  मेसको वेताळ। आजी  कृष्ण राखा सकळ। तुम्ही  कुळदेवतांनो ।।4।।

अगा वनींच्या  वाघोबा। पावटेकीच्या  नागोबा  । तुम्ही  माझिया कान्होबा। जीवें  जतन करा।। 5।।

हातीचा  कृष्ण विसरुन। देव  देवता होतों दीन। मोहममतेचे महिमान। देवा  ऐसें आहे।। 6।।

मोहे  कृष्माची आवडी ।तेथें न  पडे  शोक सांकडीं।  एका जनार्दनी पावले  परथडी। यमुनेच्या  ।।7।।


भावार्थ


वसुदेव  श्री कृष्णासह  यमुनेच्या तीरावर  पोचलें. हर्षभरित  झालेल्या  यमुनेला स्वानंदाचा  पूर आला. श्री हरिच्या  चरण-वंदना साठी यमुनेच्या  पाण्याला भरती आलेली पाहून  वसुदेव संभ्रमात पडलें, परमात्मा  श्रीकृष्ण जवळ  असूनही  मार्ग दिसेनासा  झाला.मोहानें चित्त  भ्रांत झाले. काकुळतीला  येऊन कुळदेवतेची,  वन्य प्राणी वाघोबा, नागोबा  यांना कान्होबाचे रक्षण करण्यासाठी  विनवू लागले. मोह ममतेची झापड आल्याने हाती  असलेले कृष्ण रुपी भाग्य विसरून देव-देवतांपुढे  दीन झालें. परंतू जेथें  कृष्ण प्रेमाची  आवड तेथील दु:ख, संकटे  आपोआप दूर पळतात असे सांगून  एका जनार्दनी म्हणतात, वसुदेव कृष्णासह  यमुनेच्या पैलतीरावर  सुखरूप पोचले.


12


गोकुळीं  ठेवितां श्रीकृष्णनाथ  । वसुदेवास माया प्राप्त। तेणें पावला  त्वरित । देह  बंदीशाळे।। 1।।

तंव  तुटली जडली बेडी ।कपाटा  पडली कडी। भव भयाच्या काडी।  अहं कंस पावे ।।2।।

श्रीकृष्ण  सांडिला मागें । पंचमहाभूत पाठी  लागे । मिथ्या बंधन वाउगें । उठी  मरण भये ।।3।।

कंस  पुसे लवलाह्या।  काय प्रसवली तुझी  जाया। म्हणोनी आणिली  योगमाया  । वसुदेवें  ।।4।।

वेगें देवकी  म्हणे । कंस पुसेल जेव्हां  तान्हें। तेव्हां तुवां देणें  । हे तया  हातीं  ।।5।।

ते  देतां देवकीजवळी  । गर्जे ब्रह्मांड किंकाळी। टाहो  फुटली आरोळी  । दैत्यनिधीची ।।6।।

तेणें  दचकलें दुर्धर  । कामक्रोधादि  असुर । कंस पावला  सत्वर । .धरावयासी ।।7।।

वेगीं  आठवा आणवी। तंव हातां आली आठवी  । कंस दचकला दुर्धर जीवीं । नोहें  जालेंचि  विपरीत  ।।8।।

आठवा  न दिसे डोळां  । आठवी पडली गळां  । कर्म न सोडी कपाळा।  आलें मरण मज ।।9।।

परासि  मारितां  जाण । मारिल्या  मारी मरण । कंस भीतसे आपण  । कृष्ण  भय करी ।।10।।

आठवी  उपडितां तांतडी। तंव  तें ब्रह्मांड  कडाडी। हातांतून  निष्टली हडबडी। कंस भयाभीतु  ।।11।।

तंव  ती गर्जलीं अंबरी  । पैल गोकुळी  वाढे  हरी। तुज  सकट बोहरी । करील  दैत्यकुळाची।।12।।

वधितां  देवकीची बाळें।  माझे पाप मज फळलें। माझे  निजकर्म  बळें। आलें  मरण मज ।।13।।

भय  संचलें गाढे। तेणें  पाऊल न  चले पुढें।  पाहतां गोकुळाकडे  । मूर्चिछित कंस  बा ।।14।।

आसनीं  भोजनीं शयनीं। भये  कृष्ण देखे  नयनीं।  थोर भेदरा  मनीं । जनीं  वनीं हरी देखे  ।।15।।

कृष्ण  भयाचे मथित  । कंसपणा विसरे  चित्त। एका जनार्दनी भक्त  । भयें  जीवन्मुक्त  ।।16।।


भावार्थ


कृष्णरुपी   परमात्मा गोकुळीं  पोचतांच वसुदेवानें   कृष्णाला  यशोदेच्या  पुढे ठेवले  आणि यशोदेने प्रसवलेली  योगमाया घेऊन  वेगानें  मथुरेला पोचले. कंस  येतांच त्याच्या हातीं  ही योगमाया द्यावी असे सांगून  योगमायेला देवकीच्या स्वाधीन केली.  मरण भयाने गांजलेला, कामक्रोधाने पेटलेला  कंस त्वरेने देवकीच्या काराग्रुही आला असतां आठव्या  कृष्णा ऐवजी  आठवी माया त्याच्या  गळ्यांत पडली. दुष्कर्माची  फळे कपाळावरील कर्म रेषांना  पुसता येत नाही म्हणून पश्चातापाने पोळलेला  कंस योगमायेला हतांत  घेऊन शिळेवर  आपटणार तोच हातांतून  निसटून कडाडत  वरचेवर आकाशाकडे  झेपावतांना गरजली ,संपूर्ण दैत्यकुळाचा  विनाश करणारा  श्रीहरी गोकुळांत  नांदत आहे , असे सांगून  एका जनार्दनी म्हणतात, देवकीच्या बाळांचा  वध करणारा  कंस आपल्याच  पाप कर्माचे फळ काळरुपाने  समोर उभे राहिले  असे पाहून मृत्यु भयाने मूर्चिछित  झाला. कृष्ण भयाने  कंसाचे चित्त व्यापून  टाकले.आसनी,  भोजनीं,  शयनीं ( आसनावर  बसला असता, जेवण  घेत असतांना, झोपला  असतांना ) नगरात किंवा वनांत  सर्वत्र कंसाला मृत्यु-रूपांत  कृष्ण दिसू लागला .कृष्ण-भयाने  कंस आपला कंसपणा  (दुष्टपणा) विसरून गेला. एका  जनार्दनी म्हणतात,  कृष्ण भयाने कंस जीवनमुक्त  झाला.

13

गोकुळीं  आनंद जाहला । रामकृष्ण  घरा आला ।नंदाच्या दैवाला  । दैव आले  अकस्मात।। 1।।

श्रावण  वद्य अष्टमीसी। रोहिणी  नक्षत्र ते दिवशीं। बुधवार  परियेसी । कृष्णमूर्ति  प्रगटली ।।2।।

आनंद  न समाये त्रिभुवनीं । धांवताती  त्या गौळणी । वाण भरुनी  नंदराणी। सदनाप्रती।।3।।

एका  जनार्दनी अकळ । न कळे ज्याचें  लाघव  सकळ । तया  म्हणती बाळ जो  म्हणती बाळ। हालविती।। 4।।


भावार्थ


श्रावण वद्य अष्टमीला  रोहिणी नक्षत्रावर  बुधवारी नंदाच्या घरीं  बलराम व  श्रीकृष्णमूर्ति  प्रगट झाली. नंदाचे  भाग्य उजळले. गोकुळीचा आनंद त्रिभुवनांत  मावेनासा झाला. बाळासाठी वाण घेऊन गौळणी  नंदाराणीच्या सदनाकडे झेपावू  लागल्या.ज्याचे  लिलालाघव अगम्य आहे अशा सर्वसाक्षी परब्रह्माला जो जो बाळा म्हणून पाळणा हलवणार्या गोपींच्या भावना अकलना पलिकडच्या आहेत असे  एका जनार्दनी  म्हणतात.  


14


एक  धांवूनी  सांगती । अहो  नंदराया म्हणती। पुत्रसुख  प्राप्ती । मूख पहा चला ।।1।।

सवें  घेऊनि ब्राह्मणा । पहावया  पुत्रवदन। धांवूनियां  सर्वजण । पहावया येती।। 2।।

बाळ  सुंदर  राजीवनयन । सुहास्यवदन  घनश्यामवर्ण । पाहूनियां  धालें मन सकळिकांचे तटस्थ  ।।3।।

पाहूनि परब्रह्म सांवळा  । वेधलें मन तमालनीळा। एका जनार्दनी पाहतां  डोळा। वेधें  वेधिलें सकळ ।।4।।


भावार्थ


पुत्रप्राप्तीची  आनंददायक बातमी कुणीतरी  घाईघाईने नंद  रायाला  सांगते आणि  पुत्रमुख पहावयास  चला असे  सुचवतो. ब्राह्मणाला  बरोबर घेऊन सर्वजण उत्सुकतेने  पुत्रवदन  पहाण्यासाठीं  निघतात. कमलनयन,  मेघश्याम, हसतमुख, सुंदर   कृष्णवदन पाहून सगळे  कौतुकाने स्तब्ध होतात. निळेसावळे  परब्रह्मरुप सर्वांचे  मन वेधून घेते. मनाला  कृष्णरुपाचे  वेध लागतात असे  एका जनार्दनी म्हणतात.


15


वेधल्या  गोपिका सकळ । गोवळ  आणि गोपाळ। गायी म्हशी  सकळ । तया कृष्णाचे ध्यान  ।। 1।।

नाठवे दुजें मनीं कांहीं।  कृष्णावांचुनी आन नाहीं। पदार्थमात्र सर्वही। कृष्णाते  देखती ।।2।।

करितां  संसाराचा धंदा । आठविती त्या  गोविंदा । वेधें  वेधल्या कृष्णछंदा। रात्रंदिवस  समजेना  ।।3।।

एका जनार्दनी  छंद । हृदयीं तया गोविंद  । नाही  विधि आणि  निषेध। कृष्णावांचुनी  दुसरा ।।4।।


भावार्थ 


सर्व  गोप, गोपिका  आणि गुराखी तसेच  गाई म्हशी सारखे मुके  प्राणी यांना  श्रीहरिचे ध्यान  लागलें. कृष्णावांचून  दुसरे कांहीं  सुचेनासे  झाले. सर्व  वस्तुमात्रांत  कृष्णरुप दिसू लागले.  गोपिका संसाराची कामे  करतांना गोविंदाला आठवूं लागल्या. मनाला    कृष्णाचा छंद जडला. काळाचे भान , बाह्य जगाचे  नियम आणि बंधने विसरून गोविंदाशी एकरुप झाल्या .

16

गोकुळीच्या  जनां ध्यान । वाचे  म्हणती कृष्ण कृष्ण। जेवितां बैसतां  ध्यान । कृष्णमय  सर्व।। 1।।

ध्यानीं  ध्यातीं कृष्ण।आणिक  नाहीं दुजी तृष्णा  । विसरल्या विषयध्याना  । सर्व देखती  कृष्ण ।।2।।

घेतां  देतां वदनीं कृष्ण। आन  नाहीं कांहीं मन। वाच्य  वाच्य वाचक कृष्ण । जीवेभावे सर्वदा  ।।3।।

कृष्णरुपी  वेधली वृत्ती । नाही  देहाची पालट स्थिती  । एका जनार्दनी देखती  । जागृति स्वप्नीं कृष्णाते  ।।4।।


भावार्थ


गोकुळीच्या  लोकांना कृष्णाचे  ध्यान लागले. त्यांना  सर्व जग कृष्णमय दिसू  लागले. जेवताना, उठतां बसतां  ते कृष्णाचे  नामस्मरण करु लागले. इंद्रिय विषयांचे  ध्यान विसरून , सर्व ईच्छा आकांक्षांचा  त्याग करून , मन कृष्णाला अर्पण करून त्या  सर्व गोप-गोपिका जीवे -भावे कृष्ण चरणी लीन  झाल्या. गाढ झोपेत,स्वप्नावस्थेंत, जागृत असतांना, त्यांच्या   सर्व वृत्ती कृष्णरुपानें  वेधून घेतल्या. काया, वाचा  मनाने ते कृष्णरुप  झाले, आपल्या देहाचा विसर पडला. असे  एका जनार्दनी या अभंगात म्हणतात.

गर्गाचार्याचे जातक

17

व्रजांत कोणे एक वेळेशी। आले गर्गाचार्य ऋषी। त्यासी दाखवितां कृष्णासी । चिन्हें बोलतां झाला.।। 1।।

यशोदाबाई ऐक पुत्राची लक्षणें ।।ध्रु0।। मध्यें मुख्य यशोदा बाळा । सन्मुख रोहिणी वेल्हाळा।

भोंवता गोपिकांचा पाळा । त्या गोपाळा दाखविती ।।2।।

करील दह्या दुधाची चोरी। भोगिल गौळियांच्या पोरी। सकळ सिंदळांत चौधरी। निवडेल निलाजरा।। 3।।

चोरूनी नेईल त्यांची लुगडीं। त्यांचे संगे घेईल फुगडी। मेळवुनी गोवळ गडी । सुगडी फोडी शिंकींचीं । ।।4।।

पांडव राजियांचे वेळी । काडील उष्टया पत्रावळी । ढोरें तुमच्या घरची वळी । निवडेल निलाजरा ।।।5।।

यावरी कलवंडतील झाडें ।लत्ता खळाळ हाणील घोडे । महा हत्ती धरील सोंडें। परी ती विघ्ने मावळतीं ।।6।।

यावरी गाडा एक पडावा ।अथवा डोहामाजीं बुडावा। वावटुळीनें उडुनी जावा ।सांपडावा वैरीयाला ।।7।।

कारण सच्चिनंदाचें । बीज नोहे हें नंदाचें । जन्मांतर गोविंदाचे नव्हे कथिल्या मथिल्यांचें ।।8।।

हृदयीं श्रीवत्सलांछन । ब्राह्मणलत्तेचें भूषण ।हा होईल ब्राह्मण जन । एका जनार्दनीं घरींचा ।।9।।


भावार्थ


एकदां व्रजभूमीत गर्गाचार्य ऋषी आले ,त्यांनी कृष्णाची बाल-लक्षणे अवलोकन करून यशोदेला भविष्यात घडून येणार्‍या कृष्ण -लीलां वर्णन करुन सांगितल्या. मध्यें यशोदेचा कृष्ण, त्याच्या समोर रोहिणीचा बलराम, भोवती गोपाळांचा मेळा भरला असतांना ऋषी श्रीकृष्णाचे जातक सांगतात. हा कृष्ण गोकुळांत दह्यादुधाची चोरी करील,गौळणींची लुगडी चोरून नेऊन त्यांच्या खोड्या काढील गोपाळ-गडी जमवून गवळ्यांच्या घरांत शिरून शिंक्यावरची दह्यादुधाची भांडी फोडील. गोप-गोपिकांना जमवून रासक्रीडा, फुगडी असे खेळ करील नंद-यशोदेच्या घरच्या गाई राखिल. बालपणी कृष्णावर अनेक संकटे येतील. बालकृष्णावर झाडे कोसळतील, घोड्यांच्या टापांचे प्रहार होतील, बलाढ्य हत्ती सोंडेत पकडतील , या शिवाय गाडा अंगावर पडणे, डोहांत पडणे, वावटळीने उडून जाऊन वैर्याच्या हाती सापडणे अशा अनेक दुर्घटना घडून येतील परंतू ही सर्व विघ्ने मावळतील. पांडवांच्या शराजसूय यज्ञाच्या वेळी श्रीकृष्ण उष्टया पत्रावळी काढील. कारण नंदाचे बीज नसून सच्चिदानंदाचा अवतार आहे. त्याने गोविंद रुपाने जन्म घेतला असून हृदयावर ब्राह्मणाने मारलेल्या लाथेचा प्रहाराने झालेल्या जखमा भूषण म्हणून धारण करील. श्रीकृष्णाचे ऋषींनी सांगितलेले जातक एका जनार्दनी या अभंगात वर्णन करुन सांगतात.

नंदास विश्वरुप दर्शन

अभंग 18


एके दिनी नवल जालें। ऐकावें भावें वहिलें।। 1।।

घरीं असतां श्रीकृष्ण । योगियांचे निजध्यान।।2।।

नंद पुजेसी बैसला। देव जवळी बोलाविला।। 3।।

शाळीग्राम देखोनि । मुखांत घाली चक्रपाणी।। 4।।

नंद पाहे भोंवतालें। एका जनार्दनी बोले।। 5।।


भावार्थ


एका जनार्दनी एक दिवस घडलेली नवलाची गोष्ट या अभंगात कथन करीत आहेत.योग्यांच्या निजध्यानाचा विषय असलेला श्रीकृष्ण तेव्हां घरात असतांना नंदराजा पुजेला बसले होते.त्यांनी श्रीकृष्णाला जवळ बोलावून घेतले. पुजेच्या देवामधील शाळीग्राम पाहून कृष्णाने तो तोंडात घातला. नंदराजा भोवताली शाळीग्राम शोधू लागले.


19

म्हणे कृष्णराया शाळीग्राम देई । येरे लवलाही वदन पसरी।। 1।।

चवदा भुवनें सम ती पाताळें ।देखियेलीं तात्काळें मुखामाजी ।।2।।

स्वर्गीचे देव मुखामाजी दिसती । भुलला चित्तवृति नंदराव ।।3।।

एका जनार्दनी नाठवे भावना। नंद आपणा विसरला।। 4।।


भावार्थ

नंदरायाने कृष्णा कडे शाळीग्राम मागितला असतां श्रीकृष्णाने लगेच मुख पसरून दाखविले,तेव्हां नंदरायाला वदनामध्ये चौदा भुवने सप्त पाताळांचे दर्शन घडलें तसेच स्वर्गीय देवांचे दर्शंन घडले. हा चमत्कार बघून नंदाच्या चित्तवृत्ती लोप पावल्या, नंदराया स्वता:चे अस्तित्व विसरून गेले. एका जनार्दनी म्हणतात, नंदराया सर्व ऐहिक भावना विसरून गेले.


20


घालुनी माया म्हणे नंदराया । भजे यादव राया कायावाचा ।।1।।

संसारसुख भोगाल चिरकाल । परब्रह्म निर्मळ तया भजे ।।2।।

नंद म्हणे देव दूर आहे बापा। आम्हांसी तो, सोपा कैसा होय।। 3।।

ऐकतांचि वचन काय करी नारायण । प्रगटरूप जाण दाखविलें ।।4।।

शंख चक्र गदा पद्म तें हस्तकीं मुगुट मस्तकीं शोभायमान ।।5।।

ऐसा पाहतां हरी आनंद पै झाला। एका जनार्दनी भेटला जीवेंभावें ।। 6।।


भावार्थ

मायेचे हे नवल बघून नंदराया काया, वाचा, मनानें यादव रायाचे भजन करु लागला, तेव्हां निर्मळ परब्रह्माचे सतत भजन केल्यास चिरकाल संसारसुख भोगतां येईल परंतु देव भक्तापासून खूप दूर असल्याने भक्तांना तो सहजसुलभ कसा होईल हे नंदरायाचे वचन ऐकतांच नारायणानें शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेले, मस्तकावर सुंदर मुगुट असलेले आपले शोभायमान रूप प्रगट केले. हरीचे हे मनोहर रुप पाहून नंदरायास अवर्णनीय आनंद झाला. एका जनार्दनी म्हणतात, नंदाला श्रीहरी जीवेभावे भेटला.

श्रीकृष्ण भगवानाचें चौर्यकर्म

21

सांवळें सानुलें म्हणती तान्हुलें। खेळें तें वहिलें वृन्दावनी।। 1 ।।

नागर गोमटें शोभे गोपवेषें। नाचत सौरसें गोपाळासीं।। 2।।

एका जनार्दनी रुपासी वेगळें। अहं सोहमा न कळे रूपगुण ।।3।।


भावार्थ


सावळ्या रंगाचा बालकृष्ण वृंदावनात क्रिडा करतो गोपवेष घालून गोपाळांसवे नृत्य करणाऱ्या बालकृष्णाचे नागर रूप अतिशय विलोभनीय दिसते. एका जनार्दनी म्हणतात, ह्या आगळ्या-वेगळ्या रुपाचे रहस्य वेदशास्त्रांनादेखिल उलगडत नाही.


२२


वेदादिक श्रमले न कळे जया पार । शास्त्रसी निर्धार न कळेची ।।१।।

तो हा श्रीहरी नंदाचिया घरी । क्रीडे नानापरी गोपिकासी ।।२।।

चोरावया निघे गोपिकांचे लोणी । सौंगडे मिळोनी एकसरे ।।३।।

एका जनार्दनी खेळतसे खेळ । न कळे अकळ आगमानिगमा ।।४।।


भावार्थ


नंदाघरी नांदणाऱ्या श्रीहरीच्या अवतार लीलेचे रहस्य जाणून घेण्याच्या प्रयत्नात असताना वेद थकून गेले आणि शास्त्रांना त्याचा निर्णय करणे अशक्य झाले. सवंगडी मिळवून गोपिकांच्या घरातील लोणी चोरून नेणे, गोपिका जमवून त्यांच्यासवे रासक्रीडा करणे, नाना प्रकारचे खेळ खेळणे यांची कारणे समजून घेणे वेदशास्त्रांना कळेनासे झाले, असे एका जनार्दनी म्हणतात.


२३


मेळवोनि मुले करावी हे चोरी । पूर्ण अवतारी रामकृष्ण ।।१।।

पाळती पाहती एका जाणविती । सर्वे जाऊनी खाती दहीदूधा ।।२।।

सांडिती फोडिती भाजन ताकाचे । कवळ नवनीताचे झेलिताती ।।३।।

एका जनार्दनी नाटकी तो खेळ । न कळे अकळ वेदशास्त्रा ।।४।।


भावार्थ


बलराम आणि श्रीकृष्ण अवतारी पुरुष असतांना मुले गोळा करून, पाळत ठेवून, एकमेकांना बोलावून, सर्व मिळून गोपिकांच्या घरचे दहीदूध खातात, ताकाचे मडके फोडतात, लोण्याचे गोळे झेलतात. एका जनार्दनी म्हणतात, या नाटकी खेळांचा अर्थ वेदशास्त्रांना आकलन होत नाही.


२४


पाळतोनि जाती घरासी तात्काळ । खेळ तो अकळ सर्व त्याचा ।।१।।

गोपाळ सवंगडे मेळवोनि मेळा । मध्ये तो सावळा लोणी खाये ।।२।।

निजलियाच्या मुखा माखिती नवनीत । नवल विपरीत खेळताती ।।३।।

न कळे लाघव करी ऐशी चोरी । एका जनार्दनी हरी गोकुळात ।।४।।


भावार्थ


गोपाळ सवंगडी जमवून त्यांच्यामधे बसून सावळा श्रीहरी लोणी खातो, झोपेत असलेल्या गोप-गोपिकांच्या मुखास लोणी माखतो असे नवलाईचे विपरीत खेळ खेळतो. चोरी करताना अशा सहजपणे करतो की त्याचे लाघव कळतच नाही असे एका जनार्दनी या अभंगात म्हणतात.


२५


मेळवोनि मेळा गोपाळांचा हरी । निघे करावया चोरी गोरसाची ।।१।।

धाकुले सवंगडी घेऊनि आपण । चालती रामकृष्ण चोरावया ।।2।।

ठेवियेलें लोणी काढिती बाहेरी ।खाती निरंतरीं सवंगडी ।।3।।

एका जनार्दनी तयाचें कौतुक । न पडे ठाऊके ब्रह्मादिका ।।4।।


भावार्थ


बाल सवंगड्यांना सवे घेऊन राम-कृष्ण गोरसाची चोरी करायला निघतात. गोपिकांनी ठेवलेले लोणी बाहेर काढून सवंगडी ते नेहमी च खाऊन फस्त करतात. एका जनार्दनी म्हणतात, श्रीहरीच्या या लीलांचे कौतुक ब्रह्मदेवांना सुध्दा कळत नाही.


विचार

26


मिळती गौळणी दारवटां बैसती । धरूं आतां निश्चिती घरामध्ये ।।1।।

येतो जातो हे न कळे त्याची माव । वाउगीच हांव थरिताती ।।2।।

पांच सात बारा होऊनिया गोळा बैसती सकळां टकमक ।।3।।

एका जनार्दनी न सांपडेचि तयां । योगी ध्याती जया अहर्निशी ।।4।।


भावार्थ

पाच, सात, बारा असे गट करून गौळणी श्री हरीला पकडण्यासाठीं दाराआड लपून बसतात. एकटक नजरेने सगळीकडे बघत असतात. श्री हरीला पकडण्याची निरर्थक खटपट करु पाहतात पण श्रीहरी त्यांना चकवा देऊन येतो आणि निघून जातो. एका जनार्दनी म्हणतात, रात्रंदिवस ध्यान धारणा करूनही योग्यांना श्रीहरी सापडत नाही.


27

अहर्निशी योगी साधिती साधन । तयांसी महिमान न कळेची ।।1।।

तो हा श्रीहरी बाळवेषे गोकुळीं । खेळे वनमाळी गोवळियांसी ।।2।।

एका जनार्दनी न कळे महिमान । तटस्थ तें ध्यान मुनीजनीं।। 3।।


भावार्थ

एका जनार्दनी म्हणतात, रात्रंदिवस ध्यान योगाची साधना करुनही योगी जनांना ज्या श्रीहरीचा अवतार महिमा कळत नाही तो वनमाळी बाळवेष धारण करून गवळ्यांच्या सवे खेळ खेळतो.


28

न सांपडे हाती वाउगी तळमळ । म्हणोनि विव्हळ गोपी होती ।।1।।

बैसती समस्ता धरू म्हणोनि धावे। तंव तो नेणवें हातालागीं ।।2।।

समस्ता मिळोनी बैसती त्या द्वारें। नेणवेचि खरे येतो जातो।। 3।।

एका जनार्दनी न सांपडेचि तयां । बोभाट तो वांयां वाउगाची।। 4।।


भावार्थ

श्रीहरीला पकडण्यासाठी दारामागे लपून बसलेल्या गोपी श्रीहरी हाती लागत नसल्याने निराश झाल्या,त्यांना वेगळ्याच प्रकारची तळमळ लागून राहिली. एका जनार्दनी म्हणतात, गोपींना श्रीहरी केव्हां येतो आणि जातो हे समजत नाही त्यांचा हा खटाटोप व्यर्थ आहे.


29

वाउगे ते बोल बोलती अबळा । कवळ ते गोपाळा धरूं शके ।। 1।।

प्रेमावीण कोण्हा न सांपडे हरी । वाउगी येरझारी घरामध्यें ।।2।।

एका जनार्दनी गोपीकांसी शीण। म्हणोनि विंदान करीतसे।। 3।।


भावार्थ

एका जनार्दनी या अभंगात म्हणतात, गोपींचे बोलणे वाउगे (अयोग्य) असून श्रीहरी प्रेम भक्ती शिवाय कोणालाही आपलासा करता येऊ शकत नाही. गोपिकांना यामुळे शीण होत असून त्या घे ते हम मी हे व्यर्थ गोंधळ घालीत आहे.

30

नवल ती कळा दावी गोपिकांसी। लोणी चोरायासी जातो घरा ।।1।।

धाकुले सवंगडे ठेवुनि बाहेरी । प्रवेशे भीतरीं आपणची ।।2।।

द्वार झाकोनियां बैसती गोपिका । देखियेला सखा गोपाळांचा ।।3।।

एका जनार्दनी धांवुनि धरिती । नवल ते रीती करीतसे ।।4।।


भा हे ते मऊ मऊवार्थ

लोणी चोरायला घरांत जातांना श्रीहरी बाळ सवंगड्यांना बाहेरच ठेवून आपण एकटाच घरांत प्रवेश करतो. दार बंद करून बसलेल्या गोपिकांना गोपाळांचा सखा हरी दिसतो .एका जनार्दनी म्हणतात, गोपी धावत जाऊन हरीला पकडण्याचा खटाटोप करतात. गोपिका हरीच्या मागे धावून त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात, एका जनार्दनी म्हणतात, हरी अशा प्रकारे नवलाचे खेळ खेळतो.


31

गोपी धावुनिया धरिती तयातें । उगा पाहे बहतें न बोले कांही ।।1।।

करीती गलबला मिळती सकळां । बोलती अबला वाईट तें ।

कां रे चोरा आतां कैसा सांपडलासी। म्हणोनी हातासी धरियेलें।।3।।

वोडोनियां नेती यशोदे जवळी। आहे वनमाळी कडेवरी ।।4।।

एका जनार्दनी यशोदेच्या करी । उभा श्रीहरी लोणी मागें ।।5।।


भावार्थ


गोपी धांवून वनमाळीला पकडतात तो कांही न बोलतां त्यांच्याकडे बघतो.गोपी एकच गलबला करुन श्रीहरीची वाईट शब्दांनी कानउघाडणी करतात.चोर बरा सांपडला असे बोलून हाताला धरुन ओढत यशोदेकडे घेऊन जातात.एका जनार्दनी म्हणतात, नवल असे कीं,यशोदेच्या कडेवर बसून श्रीहरी लोणी मागत असतो.


32


घरोघरीं कृष्ण धरिला बोभाटा । घेऊनि येती धीटा राजद्वारीं ।।1।।

पाहती तो उभा यशोदे जवळी । वाउगी ती कळी दिसताती ।।2।।

गोपिका धांवती घेऊनिया कृष्ण । न कळे विंदान कांही केल्या ।।3।।

घेऊनिया येती तटस्थ पाहती। विस्मित त्या होती आपुलें मनीं ।।4।।

एका जनार्दनी दावीत लाघव । न कळेंचि माव ब्रह्मादिका।।5।।


भावार्थ


गोपींनी कृष्णाला पकडलें ही बातमी घरोघरी पोचली.या धिटुकल्या हरीला राजद्वारी आणले, आणि पाहतात तर बालकृष्ण यशोदे जवळ उभा आहे. हा वेगळाच चमत्कार गोपी तटस्थपणे बघत राहिल्या. विस्मयचकित झाल्या.एका जनार्दनी म्हणतात, श्रीहरीचे लाघव,अवतार लीला ब्रह्मादी देवांना सुध्दा उमजत नव्हत्या.


33


मिळाल्या गोपिका यशोदे जवळा। तटस्थ सकळां पाहताती।। 1।।

यशोमती म्हणे आलेती कासया । वाऊगें तें वांयां बोलताती ।।2।।

एका जनार्दनी बोलण्याची मात। खुंटली निवांत राहिल्या त्या।। 3।।


भावार्थ


सगळ्या गोपिका एकत्र जमून यशोदेकडे गेल्या.त्यांच्याकडे आश्चर्याने बघत यशोमती माता म्हणते,येथे येऊन निरर्थक कागाळ्या करीत आहात.एका जनार्दनी म्हणतात,यापुढे बोलण्याची सोय न राहिल्याने गोपी अवाक् होऊन निवांत राहिल्या.


34


आपुलिया घरा जाती मुकवत । नाहीं दुजा हेत चित्ती कांहीं ।।1।।

परस्परें बोल बोलती अबला । कैसी नवल कळा देखियेली ।।2।।

धरुनिया करी जाती तेथवरी । उभा असे हरी जवळीच ।।3।।

एका जनार्दनी न कळे लाघव । तटस्थ गोपी सर्व मनामाजी ।।4।।


भावार्थ


दुसरा कोणताही हेतू मनांत न ठवता,नि:शब्द होऊन गोपी यशोदे कडून निघाल्या. एक-दुसरीला दोष देत,मनांत आश्चर्य व्यक्त करीत त्या मूकपणे घरी परतल्या. एका जनार्दनी म्हणतात, ही विस्मयकारक लीला बघून गोपी मनामध्ये कांही सुचेनासे होऊन तटस्थ झाल्या.


35


आपुल्या मनासी करिती विचारले । न धरवे साचार कृष्ण ज्अभाविक करीं ।।1।।

योगियांचे ध्यानीं न संपडे कांहीं । तया गोपिकाही धरुं म्हणती ।।2।।

धरितां न धरणे तळमळ । वाऊगा कोल्हाळ करिती वांयां ।।3।।

एका जनार्दनी शुध्द भक्तिविण । न पवे। नारायण कवणा हातीं ।।4।।


भावार्थ


कृष्णाला हातात पकडणे अशक्य आहे, हे नि:संशयपणे सत्य आहे. अथक प्रयत्नांनंतर सुध्दां जो ध्यानांत देखील योग्यांना सापडत नाही, त्याला हातांत पकडू असे गोपी म्हणतात, त्यासाठी मनांत तळमळतात, अकारण गोंधळ करतात. एका जनार्दनी म्हणतात,नि:ष्काम भक्ती शिवाय नारायण कोणाच्याही हातीं सापडणार नाही.


36

अभाविकांसी तो जवळीचा दुरीं । दुरीचा जवळी हरी भाविकांसी ।। 1।।

म्हणोनि अभावें ठकती गोपिका । त्या यदुनायका न धरती।। 2।।

वावुगे ते कष्ट मनींचा तो सोस । सायासे सायास शिणताती ।।3।।

एका जनार्दनी शीण गोपिकांसी । तेणें हृषीकेशी हांसतसे ।। 4।।

भावार्थ

अभाविक लोकांना हरी जवळ अजूनही प्रेमभक्ती नसल्याने दुरावलेला असतो तर निष्काम भाविकांना तो दूर असूनही अगदी सहजसाध्य असतो.अंत:करणांत प्रेमभक्ती नसल्याने गोपिकांची फसगत होते, त्या श्रीहरीला आपलासा करु शकत नाही. मनाच्या हव्यासामुळे त्यांना कष्ट सोसावे लागतात, एका जनार्दनी म्हणतात, गोपिकांचा हा व्यर्थ शीण पाहून हृषीकेश मनांत हसत असतो.


37

भाविका त्या गोपी येती काकुळती । तुमचेनी विश्रांती मजलागी ।।1।।

मज निराकारा आकारासी येणें । तुमचे ते ऋण फेडावया ।।2।।

दावितो लाघव भोळ्या भाविकांसी । शहाणे तयासी न संपडे ।।3।।

एका जनार्दनी भाविकांवाचून । प्राप्त नोहे जाण देव तया ।।4।।

भावार्थ

एका जनार्दनी या अभंगात सांगतात,भावनाप्रधान गोपी कृष्णासाठी काकुळतीला येतात. निराकार परमेश्वराला भाविक भक्तांसाठी अवतार धारण करावे लागतात. भाविकांच्या प्रेमभक्तीचे कर्ज फेडण्यासाठी निरनिराळ्या लीला दाखवाव्या लागतात.भाविकांशिवाय देवाला देवपण येत नाही.


38

भोळे ते सावडे गोपिका ते भावें । चुंबन बरवें देती तया ।।1।।

यज्ञमुखी तोंड करी जो वाकुडें। तो गोपिकांचें रोकडे लोणी खाये।। 2।।

घरां नेऊनियां घालिती भोजन । पंचामृत जाण जेवविती ।।3।।

एका जनार्दनी व्यापक तो हरी । गोकुळा माझारीं खेळ खेळे।। 4।।

भावार्थ

भक्तांसाठी वेडा झालेला परमात्मा गोपिकांना सापडतो.त्या श्रीहरीचे कोडकौतुक पुरवतात.यज्ञातील हविर्भागाकडे पाठ फिरवणारा श्रीहरी गोपिकांच्या घरचे लोणी आवडीने खातो.गोपिकांनी घरी नेऊन घातलेले भोजन श्रीहरी पंचामृत समजून आवडीने खातो.एका जनार्दनी म्हणतात, विश्वाला व्यापून उरणारा परमात्मा गोकुळांत खेळ खेळतो.


39

खेळतसे खेळ सवंगडियांसहित । गोपिकांचे हेत पुरवितसे।। 1।।

जयाचिये चित्तीं जे कांहीं वासना । तेचि नारायणा पुरविणें ।।2।।

जया जैसा हेत पुरवी तयांचा । विकला काया वाचा भाविकांचा ।।3।।

एका जनार्दनी भाविकांच्या पाठीं । धावें जगजेठी वनोवनीं ।4।।

भावार्थ

एका जनार्दनी या अभंगात म्हणतात, भक्तांच्या मनातील सर्व ईच्छा नरायण पुरवतो. श्रीहरी सवंगड्यां बरोबर खेळ खेळतो, गोपिकांच्या मनातील भावना जाणून त्यांचे हेतु पूर्ण करतो. काया, वाचा, मनाने नरायण भक्तांचा अंकित असून भक्तांच्या प्रेमामुळे तो भक्तांसाठी वनोवनी धावतो.


वेणी-दाढीची ग्रंथी

40

गोकुळामाजीं कृष्णें नवल केलें । स्री आणि भ्रतारा विंदान दाविलें ।।1।।

खेळ मांडिला हो खेळ मांडिला। न कळे ब्रह्मादिका अगम्य त्याची लीळा वो ।।2।।

एके दिनीं गृहा गेले। चक्रपाणी बैसोनी ओसरी पाहे पाळतोनी लोणी ।।3।।

गौळणी आली घरां म्हणे शारंगपाणी । चोरीचे विंदान पाळती पाहसी मनीं ।।4।।

चोरी करावया जरी येसी सदनी । कृष्णा धरुनी तुझी शेंडी बांधीन खांबालागुनी ।।5।।

एका जनार्दनी ऐसें बोले व्रजबाळी। दाविलें लाघव ब्रह्मादिकां न कळे ते काळी ।। 6।।

भावार्थ

एके दिवशी कृष्ण गौळणीच्या घरी जावून ओसरीत बसले तेथून लोण्याचे मडके कोठे बांधले आहे याचा अंदाज घेतला. गौळणीने शारंगपाणीच्या मनातिल हेतू जाणून हरीला ताकीद दिली कीं, चोरी करण्यासाठी घरांत आल्यास शेंडी खांबाला बांधली जाईल.एका जनार्दनी म्हणतात, त्या वेळी हरीने अशी लीला दाखवली कीं, ब्रह्मादी देवांना सुध्दां त्यातील रहस्य जाणतां आले नाही.


41

उठोनि मध्यरात्रीं तेथें आला सांवळा । सुखसेजे पहुडली देखे गोपी बाळा ।।1।।

पती आणि गौळणी एके सेजे पहुडली। बैसोनियां सेजे विपरीत करणी केली ।।2।।

धरूनी गोपी वेणी दाढी पतीची बांधली। न सुटे ब्रह्मादिका ऐशी गांठ दिधली ।।3।।

करुनी कारण आले आपुले मंदिरा । यशोदे म्हणे कृष्णा काय केलें सुंदरा ।।4।।

जाहला प्रात:काळ लगबग उठे कामिनी । वोढतसे दाढी जागा झाला ते क्षणीं ।।5।।

कां गे मातलीस दिली वेणी गांठी । एका जनार्दनी आण वाहे गोरटी ।।6।।

भावार्थ

मध्यरात्री पती सह गौळणी सुखसेजेवर झोपली असताना सावळा हरी तेथे आला. गोपीची वेणी, पतीची दाढी एकत्र बांधून ब्रह्मदिक देवांना सुध्दां सोडवता येणार नाही अशी गांठ दिली. हे काम करून श्रीहरी आपल्या मंदिरी परतले.प्रात:काळ होताच गोपी लगबगीने उठली,दाढी ओढली गेल्याने पतीदेव जागे झाले आणि संतापले.श्रीहरीच्या या विपरीत करणीचे वर्णन करून एका जनार्दनी सांगतात कीं, गौळणीने ही गोष्ट शपथेवर नाकारली.


42

उभयतां बैसोनि क्रोधे बोलती । कैशी जाहली करणी एकमेक रडती ।।1।।

गोदोहन राहिलें दिवस आला दुपारी । धाउनी शेजारी येती पहाती नवलपरी ।।2।।

शस्रे घेऊनिया ग्रंथी बळें कापिती । कापिताचि शस्रे न कांपे कल्पांतीं ।। 3।।

घेऊनिया अग्नि लाविताती दाढी वेणी । न। जळेची वन्ही ऐशी केली कृष्णे करणी ।।4।।

ऐसा अनुभव लक्षावधि मिळाला । बोल बोलती बोला भलतेंचि बरळा ।।5।।

धांवुनिया नंदरायातें सांगती । एका जनार्दनीं नवल विपरित गती ।।6।।

भावार्थ

गौळण पतिसह संतापाने रुदन करीत असतां दुपार झाली.गाईंचे दूध काढायचे राहिले,शेजारी धावून आले, त्यांनी दाढी वेणीच्या गांठीचे नवल पाहिले.शस्रे घेऊन गांठ कापणे त्यांना जमेना,अग्नि लावून गांठ जाळण्याचा प्रयत्न केला पण ते ही जमेना,अग्नीच विझून गेला.अनेक लोकांनी हा चमत्कार बघितला.लोक तोंडाला येईल ते बोलू लागले.एका जनार्दनी म्हणतात,या विपरित करणीचे नवल नंदरायाला सांगण्यासाठी लोक राजमंदीराकडे धांवले.


43

नंदें आणविलें उभयतां राजबिंदी । गोवळे आणि गोवळी भोवतीं जनांची मांदी ।।1।।

येवोनि चावडीये उभयतां रडती । म्हणे नंदराव कैशी कामांची गती ।।2।।

अंकावरी बैसोनि सांवळा गदगदां हांसे । विंदान दाविलें तुज बांधिलें असे ।।3।।

आमुची तूं शेंडी काल बांधीन म्हणसी । न कळे देवाची माव देवें बांधिलें तुजसी ।।4।।

आतां माझी गती कैशी हरी ते सांगां । करुणाभरीत देखोनि गेलें लाघव वेगा ।।5।।

एका जनार्दनी रुणाकर मोक्षदानी । सहज दृष्टि पाहतां सुटली ग्रंथी दोनी ।।6।।

भावार्थ

नंदरायाच्या सेवकांनी गवळ्यासह गवळणीला चावडींत आणलें. ते दोघेही रडून आकांत करत असताना भोवतीं घरलोकांची गर्दी जमली.नंदरायाच्या मांडीवर बसून गदगदां हास्य करणारा सावळा हरी या विपरित करणीचे कारण व देवाचा न्याय स्पष्ट करतो.गौळण,गवळ्याचे दु:खित चेहरे बघून श्रीहरीचे मन दयेने भरले,त्याने लाघव करुन दोघांना मुक्त केले.एका जनार्दनी म्हणतात, करुणाकर, मोक्षदानी श्रीहरीने सहज दृष्टीने बघतांच वेणी दाढीची गांठ सुटली.


44

आल्हादयुक्त गोपिका आली आपुलें सदनीं । नंदासहित मोक्षदानी प्रवेशले भुवनी ।।1।।

म्हणे यशोदा बा कृष्णा न करी तूं खोडी । बोलती गोपिका वाईट त्या जगझोडी ।।2।।

एका जनार्दनी माझा अपराध नाहीं। जया जैसा भाव तया तोचि देहीं ।।3।।

भावार्थ

या प्रसंगानंतर गोपिका आपल्या घरीं आणि नंदासह श्री हरी राजभुवनी परतले तेव्हां कुष्णाने अशा खोड्या करु नयेत त्यामुळे गोपिका वाईट बोलतात असे यशोदेने स्पष्ट केले.एका जनार्दनी म्हणतात,यांत मोक्षदानी श्री हरीचा दोष नाही, ज्याच्या मनांत जसा भाव असेल त्याप्रमाणेच त्याला देव दिसतो.


45

घरोघरीं चोरी करितो हृषीकशी । गाऱ्हाणें सांगती येऊनी यशोदेसी ।।1।।

भली केली गोविंदा भली केली गोविंदा । निजभक्तांलागी दाखविसी लीला ।।2।।

कवाड उघडोनि शिंकें वो तोडिलें । दही दूध भक्षूनि ताक उलंडिलें ।।3।।

अंतर बाहेर मज व्यापियलें माया । एका जनार्दनी म्हणे न सोडी पाया ।। 4।।

भावार्थ

गोपींच्या घरी जाऊन हृषीकेशी चोरी करतो,दार उघडून शिंके तोडून दही दूध खातो,ताकाचे भांडे लवंडून टाकतो.असे गाऱ्हाणे गोपी येऊन यशोदेला सांगतात. गोविंदाची ही करणी भक्तांना लीला दाखवण्यासाठी आहे असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, भक्तांचे मन अंतर्बाह्य व्यापून टाकणाऱ्या श्रीहरीचे चरण कधी सोडणार नाही.


46

एकमेक गौळणी करिती विचार । चोरी करी कान्हा नंदाचा कुमर ।।1।।

नायके वो बाई करुं गत काई । धरूं जातां पळून जातो न सांपडेचि बाई ।।2।।

दही दूध लोणी चोरी करूनियां खायें । पाहें जातां कवाड जैसें तैसें आहे ।।3।।

एका जनार्दनी न कळें लाघव तयाचें । न कळेचि ब्रह्मादिकां वेडावलें साचे ।। 4।।

भावार्थ

गौळणी एकमेकींना भेटून विचार करतात नंदाचा कान्हा चोरी करून पळून जातो,धरायला गेलो तर सांपडत नाही.दही दूध लोणी चोरी करून खातो,नवल असे कीं,घराचे दार जसेच्या तसे बंद असते.एका जनार्दनी म्हणतात, श्रीहरीची ही लीला कुणालाच समजत नाही.ब्रह्मदिक देवांना सुध्दां ही माया कळत नाही.


47

मार्गी जातां विस्मय करीं । कैसे विंदान केलें नवल परीं ।

आम्ही अबला घालितो चोरी। श्रीहरी परापश्यंती वेगळा ।।1।।

नवल जाहलें काय सांगू माये । चोरी करितां धरिला पाहे ।

घरां घेऊनि जातां उभा आहे । न कळे विंदान सखे काय सांगू ।।2।।

एका जनार्दनी परिपूर्ण व्यापक सर्वांठायीं संपूर्ण ।

जनींवनीं जनार्दन । पाहतां महिमान न कळे ।। 3।।

भावार्थ

श्रीहरीला चोरी करतांना धरले आणि यशोदेच्या घरी जाऊन पाहतां यशोदे जवळ कान्हा उभा आहे असे दिसले.ही काय जादू आहे हे गोपींना कळत नाही. हा काहीतरी चमत्कार आहे असे त्यांना वाटते.एका जनार्दनी म्हणतात, अबलांच्या घरी चोरी करणारा श्रीहरी परा आणि पश्यंती या वाणींच्या पलिकडे आहे परमेशाने हा अवतार धारण केला असून तो विश्वव्यापक, सर्वांठायी जनींवनीं पूर्णात्वाने भरून राहिला आहे.


48

यशोदेसी गौळणी सांगती गाऱ्हाणें । नट नाटक कपटी

सांभाळ आपुलें तान्हें । किती खोडीं याच्या सांगूं तुजकारणें ।।1।।

सहस्रमुख लाजला । निवांतचि ठेला ।

वेद परतला । गाती अनुछंदे ।

वेध लाविला गोविंदें । परमानंदें आनंदकंदें ।। ध्रु0।।

एके दिवशीं मी गेले यमुनातट जीवना । गाई गोप सांगाते घेऊनि आला कान्हा ।

करीं धरीं पदरा न सोडी तो जाणा । एकांत घातलीं मिठी ।

न सुटे गांठीं पाहिला दृष्टी । नित्य आनंदु । वेध लाविला ।।3।।

किती खोडी याच्या सांगु तुज साजणी । गुण यांचे लिहितां न पुरे मेदिनी ।

रूप सुंदर पाहतां न पुरे नयनीं । एका जनार्दनी देखिला ।

ध्यानीं धरिला । मनीं बैसला । सच्चिदानंद । वेध लाविला.

भावार्थ

श्रीहरी अतिशय नाटकी, कपटी असून तो नाना प्रकारे खोड्या काढतो, हजारमुखे असलेला शेष सुध्दां श्रीहरीचा महिमा वर्णन करुं शकला नाही, वेदवाणीही मुक झाली.परमानंद आनंदकंद गोविंदाने मनाला वेध लावले आहे.यमुना किनारी पाणी भरण्यासाठी गेले असतां गोपांसंगे गाई घेऊन कान्हा तेथें येवून एकांतात पदर धरुन घट्ट मिठी घालतो, जी सोडवतां येत नाही. केवळ दृष्टीने आनंदाचा वर्षाव करतो असे सांगून गोपी म्हणते, श्रीहरीच्या गुणांचे वर्णन करायचे ठरवले तर संपूर्ण पृथ्वी देखील अपुरी पडेल.हरीचे सुंदर रुप डोळ्यांत साठवून ठेवण्यासाठी नयन अपुरे पडतात, एका जनार्दनी म्हणतात, हा सच्चिदानंद श्री हरी डोळ्यांनी पाहिला, मनामध्ये रूतून बसला, ध्यानी,मनी वेध लागला.


49

हासोनिया राधा बोले यशोदेसी । पहा वो हा चोर बोले विश्वासी ।।1।।

आण वाहतसे लाटकीची मामिसें । याचिया वचनीं सर्वास विश्वासे ।।2।।

खोडी न करी ऐशी वाहे तूं आण । गोरसांवांचुनि न करीं तुझी आण ।। 3।।

एका जनार्दनी बोले विनोद वाणी । यशोदेसह हांसती गौळणी।। 4।।

भावार्थ

कान्हा नांवाचा चोर अत्यंत विश्वासाने बोलतो, कांहीतरी सबबी सांगून खोट्या शपथा घेतो असे असुनही याच्या शब्दावर सर्वांचा विश्वास बसतो.खोडी करणार नाही अशी शपथ घ्यायला सांगतांच गोरसाशिवाय शपथ घेणार नाही (गोरसाशिवाय दुसरी चोरी करणार नाही)असे म्हणतो असे राधा यशोदेला सांगून हसते.एका जनार्दनी म्हणतात, कान्हाच्या या गर्भितार्थी विनोद वाणीवर यशोदेसह सर्व गौळणी हांसतात.


50

मिळोनि अबला बैसली परसद्वारीं । येरेयेरे कृष्णा म्हणोनि वाहाती व्रजनारी ।। 1।।

ऐशा लांचावल्या नंदनंदना । घरींच बैसती लक्ष लावीत कान्हा ।।2।।

वेदश्रृतीसी । न कळे जयांची शुध्दी । तो नवनीत खावया लाहे। लाहे घरामधीं ।।3।।

एका जनार्दनी ब्रह्म परिपूर्ण । तेणे वेधें वेधिलें आमुचे मनाचें मन ।। 4।।

भावार्थ

गोकुळातील सगळ्या गोपिका मिळून परसद्वारीं बसतात आणि कृष्णाला बोलावतात, कृष्णाच्या (नंदनंदन) भेटीच्या लालसेने घरीच बसून असतांना त्यांचे सारे लक्ष कृष्णाकडे लागलेलें असते.वेदश्रुतींना देखील ज्याचा ठाव लागत नाही तो कान्हा लोणी खाण्यासाठी घरांत शिरतो. एका जनार्दनी म्हणतात, परिपूर्ण ब्रह्मरुपाने अवतरलेल्या श्री कृष्णाने सर्वांच्या अंतरंगाला वेध लावले आहेत.


51

मार्गी जातां विस्मय करी । कैसें विंदान केले नवल परी।

आम्हीं अबला घालितो चोरी । श्रीहरी परापश्यंती वेगळा ।।1।।

नवल जाहलें काय सांगू माये । चोरी करितां धरिला पाहे ।

घरां घेऊनि जातां उभा आहे। न कळे विंदान सये काय सांगू ।।2।।

एका जनार्दनी परिपूर्ण व्यापक सर्वांठायीं संपूर्ण । जनींवनीं जनार्दन ।

पाहतां महिमान न कळे ।। 3।।

भावार्थ

रस्त्याने जातांना विस्मयचकित झालेल्या गोपी श्रीहरीने दाखवलेल्या चमत्कारा विषयी विचार करतात, चोरी करताना पकडलेल्या कान्हाला यशोदेकडे नेले तव्हां तो यशोदा जवळ उभा असलेला दिसतो.श्री हरीच्या लीलांचे रहस्य अगम्य असून तो परापश्यंती वाणीच्या पलिकडे आहे.एका जनार्दनी म्हणतात, परब्रह्मरुपी परमात्मा सर्वांच्या अंत:करणांत वसत असून व्यापक असून परिपूर्ण आहे.जनींवनीं दिसणार्या या जनार्दनाचा महिमा बुध्दीला आकलन होत नाही.

५२

आम्ही असता माजघरी । रात्र झाली दोन प्रहरी ।

मी असता पतिशेजारी । अवचित हरी तुझा आला ।।१।।

काय सांगू सखये बाई । वेदशास्त्रा अगम्य पाही ।

आगमानिगमा न कळे कांही । मन पवन पांगुळले गे बाई ।।२।।

आम्ही असतां निदसुरी । मुंगुस घेऊनी आपुले करी ।

सोडियेले दोघा माझारी । तंव ते बोचकरी आम्हांते ।।३।।

आम्ही भ्यालो उभयतां । चीर फिटलें बाई तत्वता ।

नग्नचि जाहले मी सर्वथा । भूतभूत म्हणोनि भ्याले ।।४।।

ऐसे करूनि आपण पळाला । जाउनि माये आड लपला ।

एका जनार्दनी म्हणे भला । आता सापडता न सोडी त्याला ।।५।।

भावार्थ

गोकुळीची एक गोपी तिचे गाऱ्हाणे सखीला सांगतांना म्हणते, रात्रीच्या दोन प्रहरी माजघरात पतीसह शयन केले असतांना वेदशास्त्रांना अगम्य असणारा श्रीहरी हातात मुंगुस घेऊन घरात शिरला आणि दोघांमध्ये मुंगुस सोडले. त्या मुंगसाने बोचकारून हैराण केले, अंगावरची वस्त्रे फाडली. दोघे भयाने गर्भगळीत झाले. ही खोडी काढून कान्हा घरी जाऊन आईमागे लपला. एका जनार्दनी म्हणतात, हे सावळे परब्रह्म हाती सापडल्यास मोकळे सोडणार नाही.


५३

गौळणी बारा सोळा । होउनी येके ठायी मेळा ।

म्हणती गे कृष्णाला । धरु आजी ।।५३।।

कवाड लाउनी । बैसल्या सकळजणी ।

रात्र होतांचि माध्यानीं । आला कृष्ण ।।2।।

दहीं दूध तूप लोणी । यांची भाजनें आणुनी ।

रितीं केलीं तत्क्षणीं । परी तयां न कळे ।।3।।

थोर लाघव दाविलें । सकळां निद्रेनें व्यापिलें ।

द्वार तें नाहीं उघडिलें । जैसें तैसेंचि ।।4।।

खाउनी सकळ । मुखा लाविलें कवळ ।

आपण तात्काळ । पळे बाहेरी ।।5।।

एका जनार्दनी । ऐशी करूनी करणी ।

यशोदे जवळी येउनी । वोसंगा बैसे ।।6।।

भावार्थ

बारा ते सोळा गौळणी एकत्र जमून कृष्णाला चोरी करतांना पकडण्याचा विचार करतात.दार बंद करून दबा धरून बसतात.मध्य रात्रीं श्री कृष्ण आपले लाघव दाखवतो,दार न उघडता घरांत शिरतो, चमत्कार करून सर्वांना निद्राधीन करतो.दही, दूध तूप,लोणी यांची मडकी आणून सर्व काही खाऊन फस्त करतो. कुणालाही न कळत मडकी रिकामी करून पळ काढतो.यशोदे जवळ साळसूदपणे येऊन बसतो, असे एका जनार्दनी या अभंगात कथन करतात.

यशोदा राधा संवाद

54

नानापरी समजाविलें न परी राहे श्रीहरी । दहीभात कालवोनी दिला वेगीं झडकरीं ।

कडेवरी घेऊनिया फिरलें मी द्वारोद्वारी।।1।।

राधे राधे राधे राधे घेई श्यामसुंदरा । नेई आतां झडकरीं आपुलिया मंदिरा ।।ध्रु0 ।।

क्षणभरी घरी असतां करी खोडी शारंगपाणी । खेळावया बाहेरी जातां आळ घेती गौळणी ।

थापटोनि निजवितां पळोनि जातो राजद्वारा ।।2।।

राधा घेऊनि हरिला त्वरें जात मंदिरीं । हृदयमंचकी पहुडविला श्रीहरी ।

एका जनार्दनी हरीला भगी राधा सुंदरा ।।3।।

भावार्थ

यशोदा राधेला सांगते, श्रीहरीला दही भात कालवून दिला, कडेवर घेऊन दारोदारीं फिरले.अनेक प्रकारे त्याला समजावले.घरांत क्षणभर सुध्दां खोड्या केल्याशिवाय राहात नाही.खेळायला बाहेर गेला कीं, गौळणी गाऱ्हाणी घेऊन येतात.थापटून झोपवण्याचा प्रयत्न केला तर राजद्वारीं पळून जातो. राधा हरीला घेऊन घाईघाईने घरी येते.अत्यंत प्रेमाने त्याला मंचकावर झोपवतें.एका जनार्दनी म्हणतात, प्रेमरुप भक्तिभावाने राधिका श्रीहरीला आपलेसे करते.


55

करूं देईना मज दूध तूप बाई । मथितां दधि तो धरीं रवी ठायीं ठायीं ।

हट्टे हा कदापि नुमजे समजाविल्यास काई । समजावुनी यातें तुझ्या घरांत नेई नेई ।।1।।

राधे हा मुकुंद कडिये उचलोनि घेई घेई । रडतांना राहिना करुं यांस गत काई काई ।।ध्रु0।।

हरिसी आनंदे राधा मृदु मृदु बोलविते । पाळण्यांत तुला कृष्णा निजवोनी हालवितें ।

गृहा नेऊनियां दहीं भात कालवितें । यशोदेसी सोडी कान्हा माझ्याजवळी येई येई ।। 2।।

हट्ट मोठा घेतो मला छळितो गे राधे पाहाणें । असाच हा नित्य राधे हरिघरा नेत जाणें ।

उगाचि हा निश्चळ कैसा राहे त्वां समजावल्याने । तुझी धरितें हनुवटी यासी गृहा नेई नेई ।।3।।

गोविंदा गोपाळा कृष्णा मुकुंदा शेषशाई । जगज्जीवना गोकुळभुषणा गोपी भुलवणा बाई ।

उगा नको रडूं कृष्णा यशोदेसी सोडीं तूंही । एका जनार्दनी शरण राधे घेऊनी यासी जाई जाई ।।4।।

भावार्थ'

दही घुसळत असतांना कान्हा परत परत रवी धरुन ठेवतो, कितिही समजावले तरी त्याला समजत नाही.या कान्हाला कडेवर उचलून घरी घेऊन जाण्यास यशोदा राधेला सांगते.राधा आनंदाने हरीला हळुवार पणे बोलवतें, पाळण्यांत निजवून झोके देण्याचे,दही भात कालवून देण्याचे, अमिष दाखवते.यशोदेला सोडून येण्यासाठी कान्हाची विनवणी करते. तेव्हां हरि निश्चळ होतो.एका जनार्दनी म्हणतात, शेषशाई भगवान गोकुळाचे भुषण बनून गोविंद, गोपाळ, कृष्ण, मुकुंद ही नावे धारण करून गोकुळीच्या गवळणींना भुलवतो.


56

एके दिवशीं शारंगपाणीं । खेळत असतां राजभुवनीं ।

तेव्हां देखिलीं नयनीं । गौळणी ते राधिका ।।1।।

मीस करुनी पाणीयाचें । राधा आली तेथें साचें ।

मुख पहावया कृष्णाचें । आवड मोठी ।।2।।

देव उचलोनि घेतला । चुंबन देउनि आलंगिला ।

सुख संतोष जाहला । राधेलागीं ।।3।।

यशोदा म्हणे राधिकेसी । क्षणभरी नेई गे कृष्णासी ।

कडे घेउनी वेगेसीं आणिला घरा ।।4।।

हृदयमंचकी बैसविला । एकांत समय देखिला ।

हळूच म्हणे कृष्णाला । लहान असशी ।।5।।

कृष्ण म्हणे राधिकेसी । मंत्र आहे मजपाशीं ।

थोर होतों निश्चयेंसी । पाहें या आतां ।।6।।

वैकुंठीचा मनमोहन । सर्व जगाचे जीवन ।

एका जनार्दनी विंदान । लाघव दावीं ।। 7।।

भावार्थ

एके दिवशी श्रीकृष्ण (शारंगपाणी) राजवाड्यांत खेळत असतांना गौळण राधिकेने पाहिला.कृष्णाला बघण्यासाठी पाणी आणण्याचे निमित्त करून राधा गौळण तेथें गेली.कृष्णाला उचलून घेऊन आलिंगन देऊन चुंबन घेतले आणि सुख-संतोष पावली.यशोदेने राधिकेला कृष्णाला तिच्या घरी घेऊन जाण्यास सांगितले आणि राधा कान्हाला घेऊन घरी आली. एकांतात लहान आहेस असे राधिकेने कृष्णाला सांगताच आपल्याकडे थोर होण्याचा मंत्र आहे असे कृष्णाने स्पष्ट केले. एका जनार्दनी म्हणतात, मनमोहन,जगत् जीवन, वैकुंठीचा राणा आपले लिला लाघव जगाला दाखवत आहे.


57

हर्ष न माये अंबरीं । येऊनियां झडकरी ।

द्वार उघडी निर्भरी । आनंदमय ।।1।।

वृध्दा येऊनियां पाहें । उचलोनि लवलाहे ।

मुख चुंबिलें तें पाहे । कृष्णाचें देखा ।।2।।

मोहिलें वृध्देचें मन । नाठवे आपपर जाण ।

लाघवी तो नारायण । करूनियां अकर्ता ।।3।।

दोहीं करें उचलिला । राधिकेजवळीं तो दिला ।

म्हणे राधेसी ते वेळां । यासी नित्य आणी ।।4।।

तुज न गमे एकटी । आणित जाई जगजेठी ।

एका जनार्दनीचे भेटी । रे कांहीं विकल्प ।।5।।

भावार्थ

राधा गौळण हरीला घेऊन घरी येतांच वृध्देने दार उघडून बघितले आणि कृष्ण दर्शनाने झालेला आनंद गगनांत मावेनासा झाला, घाईघाईने कृष्णाला उचलून तिने त्याचे चुंबन घेतांच तिचे मन मोहरलें, मनातला आपपर भाव क्षणांत मावळला.कान्हाला राधेकडे देवून तिने सांगितले एकटेपणा घालवण्यासाठी याला नेहमी घरी आणावे.एका जनार्दनी म्हणतात, हा जगजेठी श्री कृष्ण अत्यंत मायावी, लाघवी असून सर्व कांही करूनही अकर्ता आहे,मनातले सगळे विकल्प नाहीसे करणारा आहे.


58

निमासुर वदन । शंखचक्रांकित भूषण ।

शोभतसे राजीवनयन । राधेजवळी ।।1।।

नवल मांडिलें विंदान । वेदां न कळे महिमान ।

वेडावली दरुशनें । न कळे तयां ।।2।।

रत्नजडित पर्यंकी। पहुडले हर्ष सुखे ।

नवल जाहलें तें ऐकीं । सासू आली घरा ।। 3।।

वृद्धा म्हणे राधेसीं । दार उघड वेगेंशीं ।

गुह्य गोष्टी बोलसी । कवणाशीं आंत ।।4।।

राधा म्हणे मामिसे । गृहामध्यें कृष्ण असे ।

मज गमावया सरिसें ।आणिला घरीं ।।5।।

क्षणभरीं स्थिर रहा । भाले पायीं आंत न या ।

भोजन जाहलिया । उघडिलें द्वार ।।6।।

म्हणे कृष्णा आतां कैसें । द्वारी वृध्दा बैसलिसे।

लज्जा जात अनायासें उभयतांसी ।।7।।

कृष्ण म्हणे राधेसी । मंत्र नाठवें मजसी ।

काय उपाय गोष्टीसी । सांगे तूं मज ।।8।।

नेणो कैसी पडली भुलीं । मंत्र चळला यां वेळीं ।

ऐकोनी राधा घाबरली । दीनवदन ।।9।।

करुणा वचनें बोले राधा । विनोद नोहे हा गोविंदा ।

माझी होईल आपदा । जगामाजी।। 10।।

भक्त वत्सल मनमोहन । शरण एका जनार्दन ।

ऐकोनी राधेचें वचन । सान जाहला।। 11।।

भावार्थ

कमला सारखे नयन, सुंदर मुखचंद्रमा, हातामध्यें शंख,चक्र धारण केलेला श्रीहरी राधे समीप रत्नजडित मंचकावर आनंदांत सुखाने पहुडला असतांना विस्मयकारक गोष्ट घडली. राधेची सासु घरी येऊन दार उघडायला सांगते.घरांत कृष्ण असून भोजनाला बसला आहे तेव्हां थोडा वेळ थांबा, बाहेरच्या पावलांनी आंत येऊं नका असे राधा सासुला विनविते. दारांत वृध्द सासु बसली असून दोघांना ही गोष्ट लज्जास्पद आहे असे ती कृष्णाला सांगते.आतां आपण मंत्र विसरलो असून कसा विसर पडला हे सांगता येत नाही असे कृष्णाने सांगताच राधा अतिशय घाबरली. लोकांत आपली निंदा नालस्ती होईल या विचाराने दीन वदनाने ती कृष्णाची करुणा भाकते. एका जनार्दन म्हणतात,शरणागत झालेल्या राधेची शोकमग्न अवस्था पाहून भक्तवत्सल श्रीहरी परत सानरुप धारण करतो.


59

मथुरेसी गोरस विकूं जातां नितंबिनी । तयामाजीं देखिली राधिका गौळणी ।

जवळीं जाऊनियां धरिली तिची वेणी ।।1।।

सोडीं सोडीं कान्हा शारंगपाणी । माझीया संसारा घातिलें पाणी ।

नांव रूप माझे बुडविलें जनीं । राधा म्हणे येथुनियां बहु चाट होसी ।

घरीं चोरीबकरूनिया वाट आडविसी । ओढोनिया नेते आतां तुज मातेपाशीं ।।3।।

धरिलीं पदरीं राधा न सोडीच निरी । दान दे आमुचे म्हणे मुरारी ।

भोवतालीं हांसती व्रज सुंदरीं ।।4।।

भक्तीचियां पोटीं राधा समरस जाली । कृष्णरुप पाहूनियां देहभावा विसरली ।

एका जनार्दनी राधा शेजें पहुडली ।।5।।

भावार्थ

गोकुळीच्या गौळणी दूध विकण्यसाठी मथुरेला जाण्यासाठी निघाल्या असतां कान्हाने राधिकेला पाहिले.जवळ जाऊन तिची वेणी धरली.घरांत चोरी करून वाट आडवणार्या लोकांमध्ये नाव रुपाला काळिमा लावणाऱ्या शारंगपाणीला ओढून यशोदा कडे नेते अशी धमकी राधेने दिली असतां कान्हा साडीचा पदर पकडून आपले गोरसाचे दान मागू लागला. हे पाहून बाकीच्या गौळणी हसू लागल्या. एका जनार्दनीं म्हणतात, भक्तीप्रेमाने राधा देहभान विसरून श्रीहरीशी समरस झाली.


60

फणस जंबीर कर्दळी दाटा । हातीं घेऊनी नारंगी फाटा।।1।।

वारियानें कुंडल हाले । डोळे मोडीत राधा चाले ।। 2।।

राधा पाहून भरले हरी । बैल दुभे नंदाघरीं ।।3।।

हरी पाहुनि भुलली चित्ता । राधा घुसळी डेरा रिता ।।4।।

मन मिनलेसें मना । एका भुलला जनार्दना ।।5।।

भावार्थ

फणस, डाळिंब कर्दळी यांचा लाकुडफांटा घैऊन मार्गीं चाललेल्या राधेच्या कानातील कुंडल वाऱ्याने हालत आहेत आणि कावरी बावरी नजर कान्हाला शोधत आहे असे वर्णन करून या अभंगात एका जनार्दनी म्हणतात,राधेला पाहून भुललेले श्रीहरी नंदाघरी बैलाचे दूध काढतात तर हरीला पाहून भुललेली राधा रिकामा डेरा घुसळते.भक्तीरसांत मने समरस होतात.


61

आल्या पांच गौळणी पांच रंगाचे शृंगार करूनी ।।ध्रु0 ।।

पहिली गौळण रंग सफेद । जशी चंद्राची ज्योत ।

गगनीं चांदणी लखलखित । ऐका तिची मात ।

मंथन करीत होती दारांत । धरून कृष्णाचा हात ।

ऐशा आल्या पांच गौळणी ।।1।।

दुसरी गौळण साधीभोळी । रंग हळदीहुनि पिवळी ।

पिवळा पितांबर नेसून आली । अंगी बुटेदार चोळी ।

एक लहान तनु उमर कवळी । जशी चांफ्यांची कळी ।

ऐशा आल्या पांच गवळणी ।।2।।

तिसरी गौळणी रंग काळा । नेसून चंद्रकळा ।

काळे काजळ लेऊन डोळा । रंग तिचा सांवळा ।

काळीं गरसोळी लेऊन गळां । आली राजस बाळा ।

ऐशा आल्या पांच गौळणी ।।3।।

चवथी गौळण रंग लाल । लाल लालही लाल ।

कपाळीं कुंकुम चिरी लाल । भांगीं भरून गुलाल ।

मुखी विडा रंग लाल । जसे डाळिंबांचे फूल ।

ऐशा आल्या पांच गौळणी ।।4।।

पांचवी गौळण हिरवा रंग । अवघ्या झाल्या दंग ।

हिरव्या कांकणांचा पहा रंग । जसे आरशीत जडलें भिंग ।

फुगडी खेळतां कृष्णासंग । एकनाथ अभंग ।

ऐशा आल्या पांच गौळणी ।।5।।

भावार्थ

या अभंगांत संत एकनाथ पांच रंगाचा शृंगार करून आलेल्या पांच गवळणींचे प्रत्ययकारी वर्णन करतात. पहिली गौळण सफेद रंगाचा साज चढवून आली असून आकाशातील चमकदार चांदणी प्रमाणे शोभून दिसते.चंद्राच्या प्रकाशांत न्हाऊन निघाल्या सारखी ही गौळण दारात उभी राहून कृष्णाचा हात धरून दह्याचा डेरा घुसळीत आहे.दुसरी गौळण साधीभोळी असून हळदी सारखी पिवळ्या रंगाची असून पिवळा पितांबर नेसून आली असून अंगांत बुट्टेदार चोळी घातली आहे. तिसरी कोवळ्या वयातील सुबक, सुंदर लहान बांधा चाफेकळी सारखा चंद्रकळा नेसलेली ,सांवळ्या रंगाची असून तिने डोळ्यांत काजळ घातले असून गळ्यांत काळी गरसोळी शोभून दिसते आहे आहे. चवथी गौळण लाल शृंगार लेऊन आली आहे. भागामध्ये लाल गुलाल, कपाळावर लाल कुंकुम टिळा, तोंडात लाल विडा, डाळिंबाच्या फुलासारखी. पांचवी गौळण, हिरवा साज चढवला असून करांत हिरवी कांकण (बांगड्या) घालून कृष्णा बरोबर फुगडी खेळते.


62

देखे देखे गे जशोदा मायछे। तोरे छोरीयानें मुजें गारी देवछे ।।1।।

जमूनाके पानीयां मे जावछे । बीच मीलके घागरीया फोडछे ।।2।।

मैनें जाके हात पकरछे। देखे आपही रोवछे मायना ।।3।।

एका जनार्दन गुन गावछे । फेर जन्म नही आवछे मायना ।।4।।

भावार्थ

गोकुळातील एक गवळण यशोदेला कान्हाचे गाह्राणे सांगते. गौळण यमुनेवर पाणी आणण्यासाठी गेली असतां कान्हाने सवंगडी जमवून घागर फोडली. गौळणीने कान्हाचे हात पकडले.कांगावा करुन कान्हा आपणच रडू लागला.एका जनार्दन श्री हरीचे गुण वर्णन करतांना म्हणतात, श्रीहरी जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका करणारे परमात्मा आहेत.


63

माई मोरे घर आयो शामछे। गावढी छोडी मोरे मनछे ।।1।।

दधी दूध माखन चुरावें हमछे । छोकरीया खालावत देवछे।। 2।।

मारी सुसोवन लगाछे । बालन उनके पकड लीनछे।। 3।।

एका जनार्दन थारो छोडछे। वेड लगाये माई हमछे।। 4।।

भावार्थ

एक गौळण कान्हाची तक्रार करते कीं, संध्याकाळी श्यामने गोठ्यांत दावणीला बांधलेली गाय सोडून दिली.घरातील दही, दूध,लोणी चोरून नेऊन बालगोपाळांना खाऊं घातले. सुनेने प्रतिकार केला तेंव्हा तिचे केस पकडले. एका जनार्दन म्हणतात, यशोदेच्या कान्हाने सर्वांना वेड लावून सतावून सोडलं.


64

हो भलो तुम नंदन लालछे । गांवढी बतावछे ।।1।।

आगल पिछिल ध्यानमें आवछे । मंगल नाम तोरा मे गावछे ।।2।।

तारो सुंदर रूप मोरे मनछे। प्रीत लगी कान्हा हमसे।। 3।।

एका जनार्दनी तोरे नामछे गावत घ्यावत हृदयमेछे।। 4।।

भावार्थ

गोकुळीची गौळण सांगते, नंदलाल नंदाचा लाडला असून त्याचे मंगलमय नाम आणि सुंदर रूप मनामध्ये ठसले आहे,सर्वांना त्याने भक्तीप्रेमानें जिंकले आहे.वारंवार मनाला त्याचे ध्यान लागते. एका जनार्दन सतत श्री हरीचे नामस्मरण करतात, हृदयात ध्यान लावतात.


65

मारी गावडी चुकलीसे भाई । देखन देखन त्रिभुवनसे आई ।

उन शोधन लागछे भाई । अब कैसी गत करूछे आई ।।1।।

मथुरा लमानीन मारो नामछे । गावढी देखत आई गांवछे।

दृष्टी देखन नहीं मनछे। कैसे भुलाय कन्हयानछे ।।2।।

भूली भूली जाई मानछे । कहीं मिलन मोरे ध्यानछे।

एका जनार्दनसे पगछे। अखंड चित्त जडो गावढीसे।। 3।।

भावार्थ

लमानी नावाची मथुरेची गौळण वाट चुकलेल्या आपल्या गाईला त्रिभुवनांत शोधून आली असून कन्हैयाला पाहून भुलून गेली.आपले मनच हरवून बसली.कन्हैया ने आपल्याला ध्यांनात दर्शन द्यावे अशी ती प्रार्थना करते. एका जनार्दनी म्हणतात,कन्हैयाच्या चरणकमलाशी अखंड चित्त जडावें.


66

दिसे सगुण परि निर्गुण। आगमां निगमां न कळे महिमान ।

परा पश्यंती खुंटलीया जाण । त्याचें न कळे शिवासी महिमान ।।1।।

पहा हो सांवळा नंदाघरीं । नवनीताची करीतसे चोरी ।

गौळणी गाह्राणी सांगती नानापरी । त्याचें महिमान न कळे श्रमले सहाचारी ।।2।।

कोणी म्हणती यासी शिक लावूं । कोणी म्हणती आला बाऊ ।

दाखवी लाघव नवलाऊ । अगम्य खेळ ज्याचा कवणा न कळे कांहीं ।।3।।

चोरी करितां बांधिती उखळी दावें । येतो काकुळती माते मज सोडावें।

एका जनार्दनी दावीं सोंग बरवें ।ज्याची कीर्ति ऐकतां अघ नासे सर्वे।। 4।।


भावार्थ

नंदाघरी सावळा श्रीहरी नवनीताची चोरी करतो. गोकुळीच्या गौळणी नाना प्रकारे कन्हैयाच्या तक्रारी यशोदेकडे करतात. कोणी म्हणतात याला चांगली अद्दल घडवून आणली पाहिजे. श्रीहरी आश्चर्य वाटतील अशा अनेक लीला करतो. हरीचे हे खेळ कुणालाही न कळणारे अगम्य वाटतात.चोरी करताना पकडून त्याला दोरीने उखळाला बांधतात तेव्हां हा त्रिभुवनपती काकुळतीला येऊन सुटकेसाठी यशोदा मातेची विनवणी करतो.एका जनार्दनी म्हणतात, सगुणरूपात दिसणारा हा परमात्मा निर्गुण आहे, त्याचा महिमा वेद आणि श्रुतींना देखील अगम्य वाटतो. त्याचे वर्णन वैखरी, मध्यमाच नव्हे तर परा आणि पश्यंती या वाणी सुध्दा करु शकत नाहीत. निरनिराळी सोंग घेऊन मती गुंग करतो कीं, शिव शंकराला सुध्दां त्याचे रहस्य उलगडून दाखवतां येत नाही. या परमेशाची कीर्ती केवळ श्रवणाने सर्व पापांचा नाश करते.


67

आवरी आवरी आपुला हरी। दुर्बळ्याची केली चोरी ।

घरा जावयाची उरी ।कृष्णे ठेविली नाहीं ।।1।।

गोळणी उतावेळी। आली यशोदेजवळी।

आवरी आपुला वनमाळी। प्रळय आम्हां दिधला।। 2।।

कवाड भ्रांतीचें उघडिलें। कुलूप मायेचे मोडिलें शिंके अविद्येचे तोडिलें।

बाई तुझिया कृष्णें ।।3।।

होती क्रोधाची कर्गळा। हळूचि काढिलेसे बळां।

होती अज्ञानाची खिळा तीहि निर्मूळ केली।। 4।।

डेरा फोडिला दंभाचा। त्रिगुण तिवईस ठाव कैसा ।

प्रपंच सडा हा ताकाचा। केला तुझिया कृ जे जे मी मीष्णे।।5।।

अहंकार होता ठोंबा। उपडिला धुसळखांबा ।

तोही टाकिला स्वयंभू। बाई तुझिया कृष्णें ।।6।।

संचित हे शिळें लोणी । याचि केली धुळधाणीं।

संकल्प विकल्प दुधाणीं । तींही फोडिलीं कृष्णें ।।7।।

प्रारब्ध हें शिळें दहीं । माझें खादलें गे बाई।

क्रियमाण दूध साई । तींही मुखीं वोतिली ।।8।।

द्वेष रांजण सगळे । स्पर्शे होती हात काळे ।

होतें कामाचें तें पाळें। तेंहि फोडिलें कृष्णें ।।9।।

सुचित दुश्चित घृत घागरी । लोभें भरल्या होत्या घरीं ।

त्याहीं टाकिल्या बाहेरी। तुझिया कृष्णें।। 10।।

कल्पनेची उतरंडी। याची केली फोडाफोडी ।

होती आयुष्याची दुरडी। तेंही मोडिली कृष्णें ।।11।।

पोर रे अचपळ आमुची। संगती धरली या कृष्णाची ।

मिळणी मिळाली तयांची। संसाराची शुध्द नाहीं ।। 12।।

ऐशीं वार्ता श्रवणीं पडे। मग मी धावोनि आलें पुढें।

होतें द्वैताचें लुगडें । तेंही फिटोनि गेलें।। 13।।

आपआपणा विसरलें। कृष्णस्वरूपीं मिळालें।

एका जनार्दनी केलें । बाई नवल चोज।। 14।।

भावार्थ

कन्हैयाच्या चमत्कारिक लिलांनी हैराण झालेली गवळण उताविळपणे यशोदेकडे येऊन आपली तक्रार दाखल करते, जो अतिशय दुर्बल आहे त्याच्या घरीं कृष्ण चोरी करतो, संसार मायेने भ्रांत(भयभीत) झालेल्या चित्ताची कवाडे उघडून श्रीहरी मायेचे कुलूप मोडून टाकतो. शिरावर असलेलें अविद्येचे शिंके (अज्ञान) फोडून गळ्यांत असलेली क्रोधाची शृंखला सहजपणें दूर करतो. अज्ञान समूळ नाहिसे करतो.सत्व,रज,तमोगुणाच्या तिवुईवर उभारलेला दंभाचा डेरा फोडून जीवाची प्रपंचातून सुटका करतो. अहंकार रूपी मजबूत खांब समूळ उपटून टाकतो. जन्मोजन्मीच्या पापपुण्याचा संचय म्हणजे शिळे लोणी, या संचिताची श्रीहरी धूळधाण करुन जीवाची मुक्तता करतो.संकल्प आणि विकल्प यांच्या पासून मन मुक्त करतो. प्रारब्ध रूपी शिळे दही खाऊन संपवतो.माणसाचे भलेबुरे कर्म म्हणजे दुधावरची साय! ह्या कर्मफलापासून सुटका करतो.मानवी मन म्हणजे द्वेषाने भरलेले रांजण, त्याला स्पर्श करताच हात काळे होतात,या द्वेषापासून श्रीहरी मनाची सुटका करतो. लोभीपणाने भरून ठेवलेल्या सुचित आणि दुश्चित रूपी तुपाच्या घागरी श्रीकृष्ण बाहेर काढतो, कल्पनांची उतरंडी फोडून आणि आयुष्याची दुरडी मोडून मुक्तीचा मार्ग मोकळा करतो. कृष्णरूपाशी एकरूप होतांच देहबुध्दी लयास जाऊन द्वैताचे बंधन फिटून जाते, आपपर भाव संपून चित्त कृष्णस्वरुपांत मिळून जाते असे एका जनार्दनी सांगतात.


गौळणीस श्रीकृष्णाचा वेध

68

चंद्रहुनी शीतळ रवीहुनी सोज्वळ। तेणे मज केवळ वेधियेलें ।।1।।

वेध कैसा मज लागला वो बाई ।।ध्रु0।।

अमृताहुनी स्वादू गगनाहुनी मृदु । रुपेविण आनंदु देखिला बाई ।।2।।

एका जनार्दनी आनंदु परिपूर्ण। काया वाचा मने वेधिलें वो बाई ।।3।।

भावार्थ

चंद्र किरणापेक्षा शीतळ, सूर्यनारायणाच्या तेजापेक्षा निर्मळ अशा श्रीहरीच्या रूपाने चित्त वेधले जाते, अमृतापेक्षा गोड, आकाशापेक्षा तरल, इंद्रियजन्य सुखाशिवाय निरागस आनंद अनुभवास आला असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, श्रीहरीचे दर्शन म्हणजे काया वाचा मनाला भरून टाकणारा परिपूर्ण आनंद!


69

गौळणींचा थाट निघाला मथुरेला हाटालागीं । तें दखोनि जगदीश धांवला गोप घेऊनी वेगीं ।।1।।

कान्हया सरसर परता नको आरुता येऊन। तुझा संग झालिया मग मी घरा कैसी जाऊं।। ध्रु0।।

सासुरवासिनी आम्ही गौळणी जाऊं दे रहे हरी । बहु वेळ लागतां सासु सासरे कोपतील घरी ।।2।।

आम्ही बहुजणी येकला तूं शारंगपाणी दिससी येथें । हृदयमंदिरीं ठेऊनी तूंतें जाऊं मथुरापंथें ।।3।।

एका जनार्दनी ब्रह्मवदिनी गोपिया वरवंटा । कृष्णपदीं त्या लीन झाल्या पूर्णपणें तन्निष्ठा ।।4।।

भावार्थ

सर्व मिळून गौळणी मथुरेच्या बाजारीं जाण्यासाठीं निघाल्या हे पाहून जगदीश श्रीकृष्ण आपले गोप सवंगड्यांना गोळा करून वेगानें निघाला. त्या सासुरवासिनी गौळणी कान्हाला परत मागे फिरण्याची ,वाट न अडविण्याची विनंती करतात. घरी सासुसासरे प्रतिक्षा करीत असून विलंब झाल्यास क्रोध करतील असे त्या गौळणी परोपरीने सांगतात. शारंगपाणीला हृदयमंदिरी ठेवून मथुरेची वाट चालू लागतात असे सांगून एका जनार्दनी म्हणतात,कृष्णपदी शरणागत झालेल्या त्या गोपिका एकनिष्ठपणे भक्तिभावाने समरस झाल्या आहेत.


70

ऐक ऐक सखये बाई नवल मी सांगून काई । त्रैलोक्याचा धनी तो हा यशोदेसी म्हणतो आई ।।1।।

देवकीनें वाईला यशोदेने पाळिला। पांडवांचा बंदीजन होऊनियां राहिला ।।2।।

ब्रह्मांडाची सांठवण योगीयाचें निजधन । चोरी केली म्हण्ऊनी उखळासी बंधन।।3।।

सकळ तीर्थें जया चरणीं सुलभ हा शूलपाणी ।राधिकेसी म्हणे तुझी करीन वेणीफणी ।।4।।

शरण एका जनार्दनी कैंवल्याचा मोक्षदानीं । गाई गोप गोपीबाळां मेळवीले आपुलेपणी।।5।।

भावार्थ

एक गौळण आपल्या सखीला नवलाची गोष्ट सांगते कीं,तिन्ही लोकांचा स्वामी श्रीहरी यशोदेला आई म्हणतो. देवकीने नऊ महिने गर्भांत जतन केला, यशोदेने गोकुळात पालनपोषण केले. पांडवांच्या प्रेमभक्ती बंधनांत बंदी बनून राहिला.तिन्ही ब्रह्मांड ज्याच्या रुपांत साठवलेली आहेत,जो योगीजनांचे परम भाग्य आहे अशा बाल कृष्णाला चोरीच्या निमित्ताने उखळाला बांधून ठेवलें.सगळी तीर्थे ज्याच्या चरण स्पर्शाने पावन होतात तो शूलपाणी आवडीनें राधिकेची वेणीफणी करतो.जनार्दन स्वामींच्या पायी शरणागत असलेले एका जनार्दनी म्हणतात, कैवल्याचे दान देवून जो जन्म बंधनातून मुक्त करतो तो श्रीहरी गोकुळातील गोप गोपिकांना आपलेपणाने हृदयाशी कवटाळतो.


71

कृष्णमूर्ती होय गे कळों आली सोय गे । प्राणाचाही प्राण पाहतां सुख सांगू काय गे ।।1।।

तुळशी माळ गळां गे कस्तुरीचा टिळा गे । अर्धांगी रुक्मिणी विंझणें वारित गोपी बाळा गे ।।2।।

पीतांबराची कास गे कसिली सावकाश गे। नारद तुंबर गायन करती पुढें निजदास गे ।।3।।

भक्त कृपेची माय गे वोळखिली विठाई गे । एका जनार्दनी विटे जोडियेले पाय गे।। 4।।

भावार्थ

एकनिष्ठ भक्तांना प्राणाहून प्रिय असलेली कृष्णाची मूर्ती पाहून जीवनाचे सार्थक झाले असे वाटते,सारे सुख दाटून येते. राणी रुक्मिणी सह विराजमान असलेल्या श्री कृष्णाच्या कपाळावर कस्तुरीचा टिळा आणि गळ्यांत तुळशीची माळ शोभून दिसते आहे .कमरेला पिवळा पीतांबर कसला आहे. गोपी पंख्याने वारा घालीत आहेत तर नारद तुंबर पुढे उभे असून गायन करीत आहेत. भक्तांवर कृपेची सावली धरणारी विठाई पाहून एका जनार्दनी विटेवरील कृष्णमूर्ती पुढे नतमस्तक होतात.


'72'

देखिला अवचिता डोळां सुखाचा सागरु । मन बुध्दी हारपली झाले एकाकारु ।

न दिसे काया माया कृष्णीं लागला मोहर।। 1।।

अद्वया आनंदा रे अद्वया आनंदा रे । वेधियेल्या कामिनी अद्वया आनंदा रे ।।2।।

खुंटलें येणे जाणें घर सासुर। नाठवे आपपर वेधियेलें सुंदर ।

आंत सबाह्य व्यापिलें कृष्ण परात्पर नागर वो ।।3।।

सावजी कळलें आतां लोधलें निर्गुणा।, एका जनार्दनी कृपा केली परिपूर्णा।

गगनीं गिळियेलें उणें उरी नुरेचि आपणा।। 4।।

भावार्थ

श्री कृष्णरुपाने सुखाचा सागर अचानक सामोरा आला.मन,बुध्दी हरपून केवळ एकाकार कृष्णरुप सगळीकडे भरून राहिले.देहाचे,संसाराचे भान विलयास गेले. कृष्ण रुप पाहून मन मोहरून आलें.अनुपमेय आनंदाने मन वेधले. आपपर भाव नाहीसा झाला, घर,संसाराचा विसर पडला.आंतबाहेर सर्व विश्व कृष्णरुप व्यापून राहिलें.सद्गुरू कृपेने निर्गुण स्वरुपाचा साक्षात्कार झाला. एका जनार्दनी या अनुभवाचे साक्षात दर्शन या अभंगात कथन करतात.


73

दिव्य तेज झळकती रत्नकीळा फांकती । अगणित लावण्य तेज प्रभा दिसती गे माये ।।1।।

कानडा वो सुंदर रुपडा गे। अंतरीं बाहेरीं पाहतां दिसे उघडा गे ।।2।।

आलिंगनालागीं मन उताविळ होय। क्षेम देतां माझें मीपण जाय।। 3।।

मागें पुढें चहूंकडे उघडें पाही । पाहावयासी गेलें मजला ठक पडले बाई।। 4।।

बाहेरी पाहूं जातां अंतरीं भासे । जे जें भासें तें तें येकींयेक समरसें ।।5।।

एका जनार्दनी जिवीचा जिव्हाळा। एकपणें पाहतां न दिसे दृष्टीवेगळा ।।6।।


भावार्थ

या अभंगात एका जनार्दनी कृष्ण रुपाचे वर्णन करतांना म्हणतात,कृष्ण मुखावर दिव्य तेज झळकत आहे ते अगणित रत्नांच्या तेजाप्रमाणे दैदिप्यमान आहे.त्याचा कानडा सुंदर रूपडा मन मोहून टाकतो आणि आलिंगन देण्यासाठी जीव उताविळ होतो.प्रेमभराने मिठी घालतांच माणसाचे मीपण संपून जाते.आंत बाहेर सगळीकडं ते च कृष्णरुप भरून राहिले आहे असे वाटते.बाहेर पाहू गेल्यास तो अंतरांत प्रगट झाल्याचा भास होतो,मन कोड्यांत पडते.मागे,पुढें चहूकडे ते रुप नजरेसमोर दिसते,मन तेथे समरस बनते.जीवाला वेड लावते.चित्त एकाग्र बनते.


84

गोकुळी लाघव दावितो चक्रपाणी । भोवत्यां वेष्टित बैसल्या गौळणी ।

मध्यें सुकुमार सावळा शारंगपाणी । चिमणा पितांबर पिवळा ।

गळां वैजयंती माळा। घवघवित घनसांवळा पाहे नंदाराणी ।।1।।

नाच रे कृष्णा मज पाहूं दे नयनी ।।ध्रु0।।

नाचतो सांवळा सुंदर निमासुर वदन । वाळे घोळ घागरियांचा झणत्कार पूर्ण ।

आकर्ण नयन सुहास्य वदन पाहुनी भुले मदन । हातीच्या मुद्रिका झळकती।

क्षुद्र किंकिणी सुस्वर गाती । वाकी नेपुरे ढाळ देती ।

पहाती गौळणी ।।2।।

सप्तही पाताळें नाचती हरिचिया छंदे । आकाश धरणी स्वर्गी देव नाचती आनंदे।

गण गंधर्व देव सर्व हरिपदें । वैकुंठ कैलास नाचती ।

चंद्र सूर्य रसनायक दीप्ती । ऋषीमंडळ धाक तोडिती ।

अद्भुत हरिकरणी ।।३।।

नाचती हरिपदें चतुर्दशलोकपाळ । शेष वासुकी नाचती सर्वही फणीपाळ ।

परिवारेसी नाचती पृथ्वीचे भूपाळ । मेरु पर्वत भोगी नायक ।

वनस्पति नाचती कौतुक । वेदशास्त्र पुराण पावक ।

नाचत शूळपाणी ।।४।।

नाचती गोपाळ गोपिका सुंदर मंदिरे । उखळे जाती मुसळे पाळी आणि देव्हारे ।

धातुमूर्ति नाचू लागल्या एकसरे । गौळणी अवघ्या विस्मित ।

देहभाव हरपला समस्त। यशोदेसी प्रेम लोटत ।

धरिला धांउनी ।।५।।

शिणलासी नाचता आता पुरे करी हरी । विश्वरूप पाहतां गोपी विस्मित अंतरी ।

यशोदेनें कृष्ण घेतला कडियेवरी । एका जनार्दनी भक्तिभाव अनन्य भक्ता दावी लाघव ।

निज भक्तांचे काज सर्व । करितां शिण न मानीं ।।६।।

भावार्थ

गोकुळामध्ये चक्रपाणी आपल्या अवतार लीला दाखवतो. सगळ्या गौळणी गोलाकार बसल्या असून मध्ये सुकुमार, सावळा शारंगपाणी शोभून दिसत आहे. मेघाप्रमाणे सावळ्या रंगाचा, पिवळ्या रंगाचा पितांबर नसलेला, गळ्यात वैजयंती माळ घातलेल्या घनश्याम हरीकडे नंदराणी कौतुकाने पाहत आहे. कृष्णाचा नाच पहाण्यासाठी यशोदा आतुर झाली आहे. पायातील वाळे, घोळ यांच्या घंटानादाच्या तालावर सावळा, सुंदर हरी नाचत आहे. श्रीहरीचे विशाल नयन, हसरा चेहरा पाहून मदनालासुध्दा भूल पडते. श्रीहरीच्या हातातील अंगठ्या, पायातील पैंजणे यांच्याकडे गौळणींचे मन वेधले गेले आहे. आकाश, धरणी, सप्तपाताळे हरीच्या छंदी नाचत आहेत. स्वर्ग, वैकुंठ, कैलासामधील देव, गण, गंधर्व हरिपदांच्या तालावर नृत्य करतात. सारे ऋषीमंडळ, चंद्र-सूर्य श्रीहरीच्या या अद्भुत नृत्यात रंगून गेले आहे. शेष, वासुकी यांसह सर्व नागदेवता, चौदा भुवनांचे लोकपाळ, पृथ्वीवरचे सर्व भूपाळ (सम्राट) कैलासपती शिवशंकर परिवारासह या नृत्यानंदात मग्न आहेत. गोपाळ, गोपिका सुंदर मंदिरात नाचत आहेत. त्यांच्याबरोबर सर्व वनस्पती, वृक्षवेली कौतुकाने हर्षभरित होऊन डुलत आहेत. सजीव सृष्टीसह जडसृष्टीसुध्दा उखळे, जाती, मुसळे, पाळी, देव्हारा, धातुमूर्ती या आनंदात सहभागी झाली आहे. आश्चर्यचकित झालेल्या गौळणी देहभान विसरून गेल्या आहेत. अलोट प्रेमाने धावत जाऊन यशोदा श्रीहरीला कडेवर उचलून घेते. हे विश्वरूप दर्शन घेऊन गोपी धन्य होतात असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, एकनिष्ठ, अनन्य भक्तांसाठी श्रीकृष्ण असे लाघव दाखवतो, आपल्या भक्तांसाठी काम करतांना तो कधी थकत नाही.


८५

प्रथममत्स्यावतारी तुमचे अगाध चरित्र । न कळे ब्रह्मादिका वैष्णव गाती पवित्र ।।1।।

उठोनि प्रात:काळीं गौळणी घुसळण घुसळिती । गाती कृष्णाचे पोवाडे हृदयीं परोपरीं ध्याती ।।2।।

द्वितीय अवतारीं आपण कच्छरूप झाला ।सृष्टि धरुनी पृष्ठीं शेवटीं सांभाळ केला ।।3।।

तृतीय अवतारीं आपण वराहरूप झाला । धरणी धरुनी दाढे हिरण्याक्ष वधिला ।।4 ।।

चतुर्थ अवतारीं आपण नरहरि रूप । रक्षुनि प्रल्हाद वधिला हिरण्यकश्यप ।।5।।

पांचवें अवतारीं आपण वामन झाला। बळी घालुनि पाताळीं शेखीं द्वारपाळ ठेला ।।6।।

सहावें अवतारीं आपण परशुराम झाला। धरुनी परशु हातीं सहस्रभुजा वध केला ।।7।।

सातवे अवतारीं आपण दाशरथी राम। वधोनी रावण कुंभकर्ण सुखी देव परम ।।8।।

आठवे अवतारी आपण वसुदेवाघरीं । वधोनि कंसादिक असूर मारिले भारी ।।9।।

नववे अवतारीं आपण बौध्दरूप झाला। धरूनियां मौन भक्ताघरीं राहिला ।।10।।

दहावे अवतारीं आपण झालासें वारूं । एका जनार्दनी वण्रिला त्याचा वडिवारूं ।।11।।

भावार्थ

या अभंगात एका जनार्दनी श्री विष्णूच्या दशावताराचा अगाध महिमा वर्णन करतात.पहिल्या मत्स्यावतारांत श्रीहरीने अगाध लीलाचरित्र दाखवले जे ब्रह्मादिक देवांनासुध्दां कळले नाही.प्रात:काळीं उठून गौळणी लोण्याचे डेरे घुसळतांना कृष्णाचे पोवाडे गातात. दुसर्‍या अवतारांत कासवरुप धारण करून पाठीवर पृथ्वी धारण करून तिचा सांभाळ केला.तिसऱ्या अवतारांत वराहरुप घेऊन दाढेवर धरणी धरून हिरण्याक्ष राक्षसाचा वध केला.चवथ्या अवतारांत नरहरी रूप घेऊन हिरण्यकश्यपुचा वध करून भक्त प्रल्हादाचे रक्षण केले.पाचव्या अवतारांत वामन झाला आणि बळीला पाताळात धाडून शेवटी बळीचा द्वारपाळ झाला. सहाव्या अवतारांत परशु हतांत धरलेला परशुराम बनून सहस्रभुजाचा वध केला.सातव्या अवतार दाशरथी रामाचा असून रावण,कुंभकर्णाचा वध करून देवांची मुक्तता केली,देवांना परम सुखी केलें. आठव्या अवतार वसुदेवाचे घरीं जन्म घेऊन कंस,चारुण जरासंघ या राक्षसांचा संहार केला.नवव्या अवतरांत बौध्दरुप घेऊन,मौनरुप धारण करून भक्ताघरी राहिला.दहाव्या अवतारीं अश्वरुप धारण केले. या दश्अवतारांचा महिमा एका जनार्दनी वर्णन करतात.


गौळणींची विरहावस्था

86

आजि वो कां हो कृष्ण नाहीं आला।
म्हणोनि खेद करी गोळणी बाळा।
काय हो ऐसा देहीं लागला चाळा।
का रे ना येसी बाळा नंदाचिया ।।1।।
कवण देवा नवसीं नवसूं।
कवणा गुरुतें मार्ग पुसून।
कैं भेटेल हा हृषिकेशु म्हणोनि।
मन जाहलें उदासू।। 2।।
आतां काय करुं यासी उपाय ।
एका जनार्दनी धरुं जाय पाय।
तेंच दरुशन होय आजीं याचें।। 3।।


भावार्थ

नंदाचा बाळ श्रीहरीची वाट पाहाणाऱ्या गोपिका खेद करीत आहेत. त्यांचे मन उदास झाले आहे. कोणत्या देवाला नवस करावा, कोणत्या गुरुचे मार्गदर्शन घ्यावे, कोणत्या उपायाने कृष्ण भेटेल याचा विचार करीत आहेत. एका जनार्दनी म्हणतात, संपूर्ण शरणागती पत्करून श्रीहरी चरणांशी लीन होणे हाच परमेश्वरप्राप्तीचा एकमेव मार्ग आहे.

८७
कोण्या वियोगे गुंतला कवणे हाती ।
परा पश्यंती मध्यमा जया ध्याती ।
श्रुति शास्त्र जया भांडती ।
तो का हा रुसला श्रीपती ।।१।।
येई येई कान्हा देई आलिंगन ।
भेटी देऊन पुरवी मनोरथ पूर्ण ।
विरह विरहा करी समाधान ।
दावी तू आपुले चरण ।।२।।
येथे अपराध आमुचा नाही ।
खेळ सर्व तुझा पाही ।
एका जनार्दनी नवल काई ।
एकदा येऊनी भेटी देई ।।३।।

भावार्थ

परा-पश्यंती-मध्यमा या वाणी निरंतर ज्याचे ध्यान करतात, श्रुति आणि सहा शास्त्रे ज्याच्यासाठी वादविवाद करतात असा श्रीपती कोणी अडवला, तो का रुसला असा प्रश्न विचारून गोपी कान्हाने भेट देऊन त्यांचे मनोरथ पूर्ण करावे अशी विनवणी करीत आहेत. यात आपला काही अपराध नसून हा सर्व श्रीहरीचा खेळ आहे हे सांगण्यास गोपी विसरत नाही. एका जनार्दनी म्हणतात, अनन्य भक्तांसाठी श्रीकृष्ण धावून येवून भेट देतात यात नवल नाही.


८८

नको नको रे दूर देशी । आम्हा ठेवी चरणापाशी ।
मग या विरहा कोण पुसी । ऐसी इच्छा देई आम्हांसी ।।१।।
पुरे पुरे संसार विरह छंद । तेणे तू अंतरसी गोविंद ।
द्वैताचा नसो देऊ बाध । ह्रदयी प्रगटोनी दावी बोध ।।२।।
विरह हरी सत्वर देवराया । परेपरता प्रगटोनी दावी पाया ।
दुजें मागणें आणिक नाहीं कान्हा । एका जनार्दनी शरण तुझिया पायां ।।3।।


भावार्थ

गोकुळीच्या गोपिका श्री कृष्णाला प्रार्थना करतात कीं, ह्या संसार छंदातून सुटका करावी कारण त्यामुळे गोविंद दुरावतो. श्रीहरीने अंतरांत प्रगट होऊन मनातिल द्वैत भावना दूर करावी.विरहव्यथा समूळ नाहिसी करून हरिचरणाशी ठाव द्यावा.एका जनार्दनी म्हणतात विरही गोपिकांप्रमाणे सर्व अनन्य भक्तांची हीच मागणी असते.

89

समचरणीं मन माझें वेधलें । तें वेगळें होतां विरह बोलें ।
हर्षामर्षा चित्त उन्मन ठेलें । म्हणोनि विरहिणी विरह बोले ।।1।।
सांवळिया कान्हया नको जाऊं दुरी । राहे परेपरता परतोनि हरी ।
पश्यंती मध्यमा मरुनी वैखरी । चारी वाचा तटस्थ जाहल्या हरी ।।2।।
तुझ्या वियोगाचा न व्हावा संग । अखंड नामीं असो अनुसंधान ।
शरण एका जनार्दन । काया वाचा मनें जाणोन ।।3।।

भावार्थ

या अभंगात एका जनार्दनी गोपिकांच्या विरहिणी च्या माध्यमातून आपली मनोव्यथा प्रगट करीत आहेत. विठ्ठलाच्या समचरणाशी एकाग्र झालेल्या मनाच्या हर्ष आणि विषाद या भावना विलयास जाऊन मनाचे उन्मन झाले. त्यां समचरणांचा विरह होतांच चित्त अस्वस्थ होते.वैखरी,मध्यमा, परा, पश्यंति या चारी वाणी तटस्थ होतात.श्रीहरिचा कधीहि वियोग होऊं नये, हरिनामाचे अखंड अनुसंधान राहावें ,अशी प्रार्थना काया,वाचा,मनाने सद्गुरु चरणांशी शरणागत झालेले एका जनार्दनी करतात.

90

जन्म जन्मांतरीं विरहिणी। होती दुश्चित अंत:करणी ।
दु:ख सोशिलें होतें मागें जन्मीं । ये खेपे निरसलें स्थळ कारणीं ।।1।।
येऊनी भेटी देही देहातील । तयाचा विरह मजलागीं होत।
मना समूळ मन पहात । तो भेटला गोपीनाथ ।।2।।
दु:ख फिटलें सुख जालें थोर। हर्षे आनंदें आनंद तुषार।
एका जनार्दनी भेटला परात्पर । तेणें संसार विरह गेला निर्धार ।।3।।

भावार्थ

श्रीहरीचा अनेक जन्मांचा विरह विरहिणीने सहन केल्यानें तिचे चित्त दुश्चित झाले. मागील जन्मीं सोसलेल्या सर्व दु:खाचे या खेपेस निर्मूलन होईल.देहातीत परमात्मा येऊन भेट देईल, ज्याचा विरह सहन करावा लागला तो गोपीनाथ मनोमनीं भेटला. एका जनार्दनी सांगतात, विरही मनाचे सारे दु:ख मावळलें.अपार सुख झाले.आनंदाच्या तुषारांत मन न्हाऊन निघाले.परात्पर परमेशाची भेंट होऊन संसार विरह संपला.

91

काम क्रोध वैरी हे खेळ । लोभ अहंकार आशा बरळ ।
कर्म बळीवंत लागलें सबळ। तेणें वेधिलें आमुतें निखळ।।1।।
नको नको वियोग हरी । येईं येईं तूं झडकरी ।
आम्हा भेटें नको धरूं दुरी । वियोग झाला तो आवरीं ।।2।।
तुझिया भेटीचें आर्त मनीं। याकारणें विरह बोलणें वाणी ।
एका शरण जनार्दनी वियोग गेला पाहतां समचरणीं ।।3।।

भावार्थ

श्रीहरीचा वियोग झालेल्या गोपी कृष्णाला विनवितात कीं,त्याने लवकर येऊन हा वियोग संपवावा,काम,क्रोध हे वैरी असून लोभ,अहंकार आशा हे निरर्थक आहेत.कर्म अत्यंत बलवान असून त्याने वेढून टाकले आहे.परमात्म भेटीची तळमळ लागून राहिली आहे. एका जनार्दनी म्हणतात, विटेवरील विठ्ठलाच्या समचरणांचे दर्शंन होताच वियोगव्यथा संपून जाते.

92

विषय विरह गुंतलें संसारीं । तया जन्म जन्मांतरी फेरीं।
कोणी न सोडवी निर्धारीं। यालागीं न गुंता संसारीं ।।1।।
मज सोडवा तुम्ही संतजन। या विषयविरहापासोन ।।ध्रु0।।
क्षणिक विषय संसार । भरला दिसे भवसागर।
यांतुनी उतरीं पैलपार । संतसंग मिळलिया ।।2।। यासी शरण गेलिया वांचुनी । संतसंग न जोडे त्रिभुवनीं ।
शरण एकाभावें जनार्दनीं । विरह गेला समूळ निरसोनी।। 3।।

भावार्थ

संसारातिल विषय विरहांत गुंतून पडलेला जीवाची जन्म मरणाच्या फेऱ्यातून जन्म जन्मांतरी सुटका होत नाही.या साठी या संसार पासून निर्धाराने दूर राहिलें पाहिजे.हा भवसागर क्षणभंगूर असून तो पैलपार होण्यासाठी संतसज्जनांची संगती जोडावी असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, सद्गुरू कृपेशिवाय हा संतसंग त्रिभुवन शोधून मिळणार नाही.अन्यनपणे सद्गुरू जनार्दन स्वमींना शरण गेल्यानंतर श्रीहरीपदाचा विरह संपूर्ण निरसून गेला.

93

ऐशीं निर्धारें विरहिणी करीं । परेपरता देखेन श्रीहरी ।
मन पवन साधन न करीं । संतसंग घडलिया धन्य संसारीं ।।1।।
धन्य धन्य संतमहिमा । विरह गेला पावलें सुखधामा ।।ध्रु0।।
नामविरहित विरह तो कोण । विषय विरह थुंकीन मी जाण ।
नामाविंचुनी नेणें साधन । तो विरह न व्हावा पूर्ण ।।2।।
एका जनार्दनी सत्य वचन । विरहाविरह गेला मुळींहून।
नाम जपतां स्थिर झालें मन। विरह गेला त्यागून ।।3।।

भावार्थ

मन पवनाचे कोणतीही साधना न करतां संत-संगतीनें परा वाणीच्या पलिकडे असलेल्या श्रीहरीचे दर्शन घेण्याचा निर्धार विरहिणी गोपी करते.श्रीहरिचे नामस्मरण हाच परमेश्वर प्राप्तीचा एकमेव मार्ग आहे,नामांत रंगलेल्या मनाला विरह जाणवत नाही. एका जनार्दनीचे हे सत्यवचन आहे,नामसाधना करतांना विरहिणीचा विरह समूळ नाश पावला.मन स्थिर झाले.

94

रात्रंदिवस मन रंजलें । हरिचरणी चित्त जडलें ।
विरहाचे दु:ख फिटलें । धन्य झालें संसारी ।।1।।
विरह गेला सुख झालें वो माय । पंढतोपुढती आनंद न समाये ।।ध्रु0।।
संतसंग घडला धन्य आजी । मोह ममता तुटली माझी ।
भ्रांती फिटोनि गेली सहजीं । विरह गेला सुख झालें सहजीं ।।2।।
धन्य धन्य संतसंगती । अवघी झाली विश्रांती ।
एका जनार्दनी चित्तीं । विरहभ्रांती निरसली।।3।।

भावार्थ

रात्रंदिवस मनाला श्रीहरीचा छंद जडला, हरिचरणांशी चित्त गुंतून गेलें.विरहाचे दु:ख सरून सुख झाले.संसार आनंदाने फुलला, संत-संगतीने मोह ममता विलयास गेली, चित्तावरील भ्रांतीचे पटल सहजपणे गळून पडले. विरहिणी गोपीचा संसार धन्य झाला.असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, संतांच्या संगतीने विरहभ्रांती निरसून चित्ताला पूर्ण विश्रांती मिळाली.असे संत धन्य होत.

95

युगायुगीं पीडिली विरहिणी । नाठवी ध्यानीं मनीं चक्रपाणी ।
म्हणोनि वियोगाची जाचणी । तो भेटला संतसंग साजणी ।। 1।।
विरह गेला सुख झालें अपार । जन्मोजन्मीची तुटे येरझारा वो ।।ध्रु0।।
घडतां संतसंग विश्रांती । तुटली माया पडळभ्रांति।
भव संसार याची झाली शांती । संतमहिमा वर्णावा किती।। 2।।
महिमा वर्णितां विरहा फिटलें । एका जनार्दनी तया भेटलें ।
सुख अनुभवें अंतरीं दाटलें । विरहाचे बीज भाजिलें वो ।।3।।

भावार्थ

अनेक युगामध्ये विरहिणीने वियोगाची जाचणी सहन केली कारण ध्यानी मनी गोपीला चक्रपाणी श्रीधराचा विसर पडला. संतकृपेने साजणीचा विरह संपून अपार सुख झाले.जन्ममृत्युचे चक्र थांबलें. मायेचा पडदा दूर होऊन भवसंसाराची शांती झाली. एका जनार्दनी म्हणतात संतांचा महिमा वर्णन करताना शब्द अपुरे पडतात.अंतरांत सुखाचा अनुभव दाटून येतो. विरहाचे बीज भाजून निघाल्याने त्याला कधीच अंकूर फुटून ते फोफावत नाही.

वनक्रीडा

96

उठोनि एके दिनीं म्हणे यशोदा कान्हया ।
गोधनें घेऊनियां जाई वनासी लवलाह्या ।।1।।
सवें मिळाले चिमणे सवंगडी ।
शिदोरी काठी कांबळी जाळी घेती आवडी।। 2।।
एका जनार्दनी गाई सोडिल्या सार्या।
रामकृष्ण सवंगडीया देव येती पहावया ।।3।।

भावार्थ

एके दिवशी यशोदा कन्हयाला गाई घेऊन वनाला जाण्यास सांगते.सर्व बाळगोपाळ आनंदानें काठी,कांबळी,जाळी आणि शिदोरी घेऊन कृष्णा बरोबर निघतात.एका जनार्दनी म्हणतात,रामकृष्ण सवंगड्यां सोबत गाईंना घेऊन निघाले तेव्हां कौतुकाने त्यांना बघण्यासाठी देवांनी आकाशांत दाटी केली.

97

सैराट गोधनें चालती वनां । तयामागें चाले वैकुंठीचा राणा ।।1।।
सावळे चतुर्भुज मेघ:श्याम वर्ण ।गाईगोपाळां समवेत खेळे मनमोहन ।।2।।
यमुनेचे पाबळीं मिळोनियां सकळीं । खेळें चेंडूफळी गडियांसम ।।3।।
एका जनार्दनी मदनपुतळा । देखियेला डोळां नंदरायाचा ।।4।।

भावार्थ

गोकुळीची गोधनें वनाकडे सैराट चालली असतांना वैकुंठीचा राणा श्रीकृष्ण त्यांच्यामागे निघाला.मेघाप्रमाणे सांवळ्या रंगाचा चार भुजा असलेला मनमोहन श्रीहरी गोपांसमवेत यमुनेच्या काठीं चेंडूफळीचा खेळ खेळतो. एका जनार्दनी म्हणतात, नंदराजाचा श्रीहरी मदना सारखा शोभून दिसत असलेला या डोळ्यांनी पाहिला.

98

विष्णुमूर्ती चतुर्भुज शंख चक्र हातीं । गदा पद्म वनमाळा शोभती ।।1।।
गाई गोपाळ सवंगडे वनां । घेऊनियां जाय खेळे नंदाचा कान्हा ।।2।।
विटी दांडू चेंडू लगोरी नानापरी । खेळ मांडियेला यमुनेचे तीरीं ।।3।।
एका जनार्दनी पाहतां तन्मय । वेधलें मन वृत्तिसहित माय।। 4।।

भावार्थ

गाई आणि गोपाळ सवंगड्यांना सोबत घेऊन नंदाचा कान्हा वनांत जातो.यमुनेच्या तीरावर विटी दांडू चेंडू लगोरी असे नाना प्रकारचे खेळ खेळतो. एका जनार्दनी म्हणतात, चित्त वृत्तीसह या रूपाकडे वेधले जाते, मन तन्मय होते.शंख,चक्र, गदा पद्म हातांत धारण केलेली चतुर्भुज विष्णुमूर्ती नयनांसमोर साकार होते.या मुर्तिच्या गळ्यांत वनमाळा शोभून दिसतात.

९९

जयाच्या दरुशने शिवादिका तृप्ती । योगी हृदयी सदा जया ध्याती ।
सहा चार अठरा जया वर्णिती । सहस्रमुखा न कळे जयाची गती ।।१।।
तो हा नंदनंदनु यशोदेचा तान्हा । सवंगडे गोपाळ म्हणती कान्हा ।
परा पश्यंती मध्यमा वैखरी नातुडे जाणा। वेडावले जया ठायी रिघाले साधना ।।२।।
अष्टांग साधन साधिता अटी । नोहे नोहे मुनिजना ज्याची भेटी ।
एका जनार्दनी हाती घेऊनि काठी । गोधने चारी आवडी जगजेठी ।।३।।

भावार्थ

नंदाचा नंदन, यशोदेचा तान्हा ज्याला त्याचे सवंगडी गोपाळ प्रेमाने कान्हा असे म्हणतात, त्याच्या दर्शनाने शिवशंकरासह स्वर्गीच्या देवांची तृप्ती होत नाही. सहा शास्त्रे, चारी वेद, अठरा पुराणे ज्याच्या रूप-गुणांचे वर्णन करतात, योगीजन सदासर्वकाळ हृदयात ज्याचे ध्यान लावतात, असे असताना हजार मुखे असलेला शेषनाग श्रीहरीचा महिमा वर्णन करु शकत नाही. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी त्याला पूर्णपणे जाणू शकत नाहीत, त्या श्रीकृष्णाच्या दिव्यरुपाचे ठायी वेडावलेलें मुनिजन अष्टांग साधन करतात पण त्यांना श्रीहरीची भेट घडत नाही. असे वर्णन करून एका जनार्दनी म्हणतात, हातात काठी घेऊन तो जगजेठी आवडीने गोपाळांसह नंदाघरच्या गाई चारतो.

१००

उठोनि प्रात:काळी म्हणे यशोदा मुरारी ।
गोपाळ वाट पाहती उभे तुझ्या द्वारी ।
शिदोरी घेऊन वेगी जाय रानी ।।१।।
यमुनेचे तीरी खेळ खेळतो कान्हा ।
नानापरी क्रीडा करी यादवांचा राणा ।।ध्रु0।।
मागे पुढे गोपाळ मध्ये चाले हरी ।
सांवळा सुकुमार वाजवी मुरली अधरी ।
पुच्छे वर करुनी गाई नाचती नाना ।।२।।
मुरलीचा नाद न समाय त्रिभुवनी ।
किती एक नादे भुलल्या गौळणी ।
देह गेह सांडोनि चालताती वनी ।।३।।
खग मृग गायी व्याघ्र नसे दुजा भाव ।
सकळी उच्चारण एक कृष्ण नाव ।
काया वाचा मने शरण एका जनार्दनी ।।४।।

भावार्थ

पहाट समयी उठून यशोदा माता कृष्णाला सांगते,गोपाळ दाराशी वाट पहात उभे आहेत,शिदोरी घेऊन रानांत जाण्याची वेळ झाली आहे.मागे, पुढे गोपाळ आणि मध्यें हरी असे सर्वजण वनांत जाण्यसाठी निघतात. यमुनेच्या तीरावर गोपाळांसह यादवांचा राणा नाना प्रकारच्या क्रिडा करतो.सावळ्या सुकुमार मुरारीच्या मुरलीचा नाद ऐकून आनंदित झालेल्या गाई नाचु लागतात,त्या नादाने वेड्या झालेल्या गौळणी देहभान विसरून घर सोडून वनाकडे निघतात.पक्षी, हरिणी, गाई, वाघ आपला वैरभाव विसरुन हरीनादांत दंग होतात असे वर्णन करुन एका जनार्दनी काया वाचा मनाने श्रीहरीच्या पायी शरणागत होतात.

मुरली

101

नंदनंदन मुरलीवाला । याच्या मुरलीचा वेध लागला।। 1।।
प्रपंच धंदा नाठवे कांहीं। मुरलीचा नाद भरला हृदयीं ।।2।।
पती सुताचा विसर पडिला । याच्या मुरलीचा छंद लागला ।।3।।
स्थावर जंगम विसरूनि गेले । भेदभाव हारपले ।।4।।
समाधि उन्मनी तुच्छ वाटती । मुरली नाद ऐकतां मना विश्रांती ।।5।।
एका जनार्दनी मुरलीचा नाद ऐकतां होती त्या सद्गद ।।6।।

भावार्थ

या अभंगात एका जनार्दनी श्रीहरीच्या मुरली-नादाचा गोकुळच्या गोपींना कसा वेध लागतो याचे वर्णन करतात.मुरलीचा नाद गोपींचे ह्रदय भरून टाकतो.मुरलीचा त्यांना छंद लागतो,प्रपंच, कामधंदा,पती,मुल या सगळ्याचा विसर पडतो. सभोवतालची चराचर सृष्टी,मनातले सारे भेदभाव विलयास जाऊन मन मुरली नादासी एकरूप होते.ध्यानधारणेतील समाधी, उन्मनी या अवस्था कवडीमोलाच्या वाटू लागतात.मुरलीनदाने गोपी सद्गतींत होतात.मनाला प्रगाढ विश्रांतीचा लाभ होतो.

102

तुझ्या मुरलीचा ध्वनी । अकल्पित पडला कानीं।
विव्हळ जालें अंत:करणी । मी घरधंदा विसरलें ।।1।।
अहा रे सांवळीया कैशी वाजविली मुरली ।।ध्रु0।।
मुरली नोहे केवळ बाण । तिनें हरीला माझा प्राण ।
संसार केला दाणादीन । येऊनि ह्रदयी संचरली ।।2।।
तुझ्या मुरलीचा सूर तान। मी विसरले देहभान ।
घर सोडून धरिलें रान ।मी वृंदावना गेले ।।3।।
एका जनार्दनी गोविंदा | पतितपावन परमानंदा ।
तुझ्या नामाचा मज धंदा । वृत्ति तंव पदीं निवर्तली ।।4।।

भावार्थ

मुरलीचा आवाज ऐकून वेडी झालेली गवळण आपली व्यथा व्यक्त करीत आहे.ही मुरली नसून केवळ बाण आहे, त्याने आपले प्राण हरण केले आहेत,आपल्या हृदयांत संचारली आहे.मुरलीच्या सूरांनी ती देहभान विसरून गेली आणि घरसंसार सोडून वनाचा रस्ता धरून ती वृंदावनात गेली.संसाराची दाणादाण झाली. गवळणीची ही अवस्था वर्णन करून एका जनार्दनी म्हणतात,गोविंद पतितपावन असून परम आनंद देणारा आहे. गोविंदाच्या नामाचा छंद लागला कीं,भक्तांच्या सर्व वृत्ती त्याच्या पायीं लीन होतात.

१०३

मुरली धरूनी अधरीं । वाजवी छंदे. नानापरी ।
भोवतें गोपाळ नाचती गुजरीं । यमुनातीरी आनंदें ।।१।।
तो हा नंदनंदन गे माये । त्याचा वेध लागला मज सये ।
कांही केलीया तो न राहणे। नाठवे गेह गे माय ।।२ ।।
स्थुल सूक्ष्म कारणांपरतां । चहु वाचा वेगळा तत्वतां ।
आगमां निगमांही वरतां। ज्याचा वेध शिवाचिया चित्ता गे माय।।३।।
अचोज वेदा चोजवेना । श्रुतीशास्त्रा नये अनुमाना ।
शरण एका जनार्दना । एकपणें जाणा सर्वा ठायीं । ।४।।

भावार्थ

एका जनार्दनी म्हणतात, यमुनेच्या तीरावर मधुर सुरांत मुरली वाजविणारा नंदाचा कान्हा स्थूल. सूक्ष्म, कारण या देहाच्या पलिकडील महाकारण देह साक्षात् परब्रम्ह असून तो वैखरी, मध्यमा, परा वाणीहून वेगळा आहे. या परब्रम्ह स्वरुपाचे.अनुमान चारी वेद आणि सहा शास्त्रे यांनाही आकलन होत नाही, शिवशंकरांच्या चित्ताला.ज्याचा वेध सतत लागलेला असतो तो हा परमात्मा. सर्व जीवांचे ठिकाणी एकपणे विलसत आहे.केवळ सदगुरू कृपेनेच हा परमात्मा जाणता येतो.

१०४

कशी जाऊं मी वृंदावना । मुरली वाजवी कान्हा ।।ध्रु०।।
पैलतीरीं हरी वाजवी मुरली । नदी भरली यमुना ।।१।।
कांसे पितांबर कस्तुरी टिळक । कुंडल शोभे काना ।।२।।
काय करूं बाई कोणाला सांगू । नामाची सांगड आणा।।३।।
नंदाच्या हरीने कौतुक केलें । जाणे अंतरीच्या खूणा।।४।।
एका जनार्दनी मनीं म्हणा । देव. माहात्म्य कळेना कोणा ।।५।।

भावार्थ

दुथडी भरून वाहाणार्या यमुनेच्या पैलतीरावर नंदाचा कान्हा मुरली वाजवतो आहे, कान्हाच्या कानांत कुंडल,कपाळीं कस्तुरी टिळा, कमरेला पितांबर शोभून दिसतो.कान्हाच्या मुरलीने घायाळ झालेली गोपी वृंदावनात जाण्यासाठी आतुर झाली असून भरलेल्या यमुनेतून पैलथडी कसे जावे, काय करावे असा प्रश्न पडला आहे.पाण्याने भरलेली यमुना नदी संसाराचे प्रतिक असून हरीनाम हे नावे सारखे संसार बंधनातून मुक्त करणारे साधन आहे (सांगड) आहे.असे सुचवून एका जनार्दनी म्हणतात, परमात्मा भक्तांच्या अंतरीचे भाव जाणून अवतार लीला करतो पण देवाचे महात्म्य भोळ्या भक्तांच्या लक्षात येत नाही.

१०५

यमुनेच्या तीरीं नवल परी वो । तेथें गोपाळ वत्सें स्वयें झाला हरी वो ।।१।।
नवल देखा ठक तिन्ही लोकां ।
भुली. ब्रह्मादिकां पार नाहीं सुखा ।।२ ।।
कृष्णवत्साची ध्वनी गाई. पान्हा. ।
तेथें वोळलें निराळे. विस्मयो गौळीजनां. ।।३।।
गोपाळांचे. वचनीं. सुखें सुखा. भेटी ।
तेथें. वोसंडला. आनंद माय कृष्णी भेटी. ।।४ ।।
ऐसा रचिला. आनंदु. देखोनि निवाडा ।
तेथें. सृष्टीकर्ता तोहि झाला वेडा ।।५ ।।
ऐसें अचोज. पैं. मना. नये अनुमाना ।
अचुंबीत. करणें एका जनार्दना ।।६ ।।

भावार्थ

नवलाची गोष्ट अशी कीं, यमुनेच्या तीरावर श्रीहरी स्वये गाईचे वासरू झाला आहे. स्वर्ग,पृथ्वी,पाताळ यां तिन्ही लोकांत तसेच सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाला देखील भूल पडली आहे.अपरंम्पार सुख दाटून आले आहे. कृष्णाच्या मुरलीचा स्वर ऐकून.गाईंना पान्हा फुटतो ,गौवळ्यांना हे पाहून विस्मय वाटतो.गोमाय आणि कान्हाची भेटीने गोकुळांत.आनंद ओसंडून वाहत आहे. सृष्ट कर्ता आश्चर्य चकित झाला असे कथन करून एका जनार्दनी म्हणतात, अचंबित झालेले देवाधिदेव सुध्दां याचे.अनुमान करु शकत नाही.

रासक्रीडा

१०६

वनामाजीं नेती. गोपिका तयांसी ।
रासक्रिडा खेळावयासी एकांती ।।१।।
जैसा जया चित्ती हेत आहे मनीं ।
तैसा चक्रपाणी खेळतसे ।।२।।
जया जैसा भाव तैसा पुरविणें ।
म्हणोनि नारायणें अवतार ।।३।।
एका जनार्दनी घेऊनी
अवतार भक्तांचें अंतर जैसें तैसें ।।४ ।।

भावार्थ

एकांतात रासक्रीडा खेळण्यासाठी गोपिका वनामध्ये जातात, ज्याच्या चित्तांत जसा भाव असेल तसा चक्रपाणी त्याच्याशी खेळतो. प्रत्येक व्यक्तिच्या मनातिल भाव पुरविण्यासाठीं नारायण अवतार धारण करतात असे एका जनार्दनी म्हणतात.

१०८

कृष्णरुपी भाळल्या गोपिका नारी । नित्यनवा कृष्ण जीवा आवडतो भारी ।
पवन वेगीं चालिल्या कालिंदीतीरीं । चिदानंद. भावें भोगावा श्रीहरी ।।१।।
वाजती गाजती अनुहत टिपरी । बारा सोळा मिळोनी गौळ्याच्या नारी ।
प्रात:काळीं जाती यमुनातीरीं | कृष्ण प्राप्तिलागीं पूजिती गौरी ।।२।।
एकमेकीतें खुणविती दृष्टी । हरिरुपीं आवड जीवा लागली मोठी ।
समयी एकांत होईल काय भेटी । मनींचे आर्त सांगू गुज गोष्टी ।।३।।
कृष्णरुपीं वेधल्या विसरल्या अन्नपान । माया विलास नेघे अंजन चंदन ।
रात्र आणि दिवस कृष्णाचे ध्यान । एका जनार्दनी चरणीं वेधिलें मन ।।४।।

भावार्थ

कृष्णाच्या रुपावर गोपिका नारी भाळल्या ,नेहमी नविन रुप धारण करणारा कृष्ण त्यांना विशेष आवडू लागला. सद्चीद् आनंदाचा नित्य अनुभव घेऊ लागल्या. बारा किंवा सोळा नारी मिळून सकाळीं. यमुनेच्या तीरावर जाऊन कृष्णासाठी गौरीपुजू लागल्या. श्रीहरीची एकांतात भेट घेऊन त्याच्याशी गुजगोष्टी कराव्या,मनीचे दु:ख सांगावे अशी आस लागली. कृष्णाचे वेध लागले, अन्नपाणी सुचेनासे झाले. माया,विलास विसरून हरीचरणाशी एकरुप झाल्या. असे वर्णन एका जनार्दनी. या अभंगात करतात.

१०९

खांद्यावरी. कांबळी हातामधीं काठी । चारितसे धेनु सांवळा जगजेठी । ।१।।
राधे राधे राधे. राधे. मुकुंद. मुरारी. । वाजवितो. धेणू. कान्हा श्रीहरी ।।२।।
एकएक गौळणी एक एक गोपाळा । हातीं धरूनि नाचती रासमंडळा ।।३।।
एका जनार्दनी रासमंडळ रचिलें । जिकडे पाहे तिकडे अवघें. ब्रह्म कोंदलें ।।४।।

भावार्थ

हातामध्ये काठी आणि खांद्यावरी घोंगडी घेऊन सांवळा श्रीहरी गोकुळांत गाई चारीत आहे आणि बासरी वाजवत आहे.गोकुळीच्या गौळणी आणि गोपाळ एकमेकांचे हात धरून नाचत आहेत. रासमंडळाचे. असे वर्णन करून एका जनार्दनी. म्हणतात, जिकडे पहावे तिकडे ब्रह्मानंद कोंदून राहिला आहे.

११०

रासक्रीडा खेळ खेळोनियां श्रीहरी । येती परोपरी गोकुळासी ।।१।।
न कळेची कवणा कैसें में विंदान । वेदांदिका मौन पडिलेंसें ।।२।।
तें काय कळें आणिकां जीवांसी । ऋषी मुनी तापसी धुंडिताती ।।३।।
एका जनार्दनीं ऐसा खेळे खेळां परब्रह्म पुतळा नंदाघरीं ।।४।।

भावार्थ

गोकुळांत श्रीहरी नाना प्रकारे रासक्रीडा खेळत आहे.या विस्मयकारी अवतार लीला बघून वेदांना देखिल मौन पडलें आहे, ते सामान्य जीवांनाच काय ऋषी,मुनी,तापसी यांना सुध्दां हे कोडे सोडवतां येत नाही. एका जनार्दनी म्हणतात,परब्रह्म नंदाघरी असे खेळ खेळत आहेत.

१११

रासक्रीडा करूनी आलिया कामिनी ।
कृष्णीं लांचावल्या आन न रिघे मनीं ।।१।।
जें जें. दृष्टी दिसे तें तें कृष्ण भासे ।
गोपिका समरसे नित्य बोधु ।।२।।
आसनीं नयनीं भोजनीं गमनागमनीं |
सर्व कर्मीं सदा. कृष्णमय कामिनीं ।।३।।
एका जनार्दनी. व्यभिचार. परवडी ।
गोपिका. तारिल्या. सप्रेम आवडीं ।।४।।

भावार्थ

गोकुळातील स्त्रिया रासक्रीडा खेळून परतल्या. कृष्ण भावनेने भारावून गेलेल्या त्यांच्या मनाला दुसरा विचार सुचत नव्हता. नजरेस पडणारी. प्रत्येक गोष्ट त्यांना कृष्णमय भासत होती. बसतां,उठतां, येतां जातां, खातां,पितां, झोपेत असताना सुध्दां त्या गोपी कृष्णरुपाशी समरस झाल्या .

काला

११२

ऐसे नित्यकाळ जाताती वना । गोपाळ. रामकृष्ण खेळती खेळ नाना ।।१।।
यमुनेचे तटीं कळंबा तळवटीं । मांळियला काला गोपाळांची. दाटी ।।२।।
आणिती. शिदोय्रा आपआपल्या । जया जैसा हेत तैशा. त्या चांगल्या. ।।३।।
शिळ्या विटक्या. भाकरी दही. भात. लोणी । मिळवोनी मेळा करी चक्रपाणी ।।४।।
एका जनार्दनीं अवघ्या करीतो कवळ । ठकविलें तेणे ब्रह्मादिक सकळ । ।५।।

भावार्थ

गोपाळ नित्यनेमाने वनांत जाऊन बलराम, कृष्णा बरोबर नाना प्रकारे खेळ खेळतात.यमुनातीरावर कदंब वृक्षाखाली श्रीहरीने काला मांडला. प्रत्येकाने आपापल्या आवडीप्रमाणे शिदोय्रा आणून गोपाळांनी एकच दाटी केली दही भात लोणी आणि शिळ्या भाकरी एकत्र करून काला केला.या काल्याचे कवळ श्रीहरी प्रत्येकाच्या मुखी भरवतो, हे लाघव पाहून ब्रह्मादिक देव अचंबित होतात,असे एका जनार्दनी म्हणतात.

११३

बैसोनि कळंबातळीं । गडी मिळाले सकळीं ।
मिळोनि गोपिळीं करती काला ।।१।।
नानापरीचीं पक्वान्नें ‌। वाढिताती उत्तम गुणें ।
सर्वा परिपूर्ण । मध्यें शोभे सांवळा ।।२।।
वडजा वांकुडा पेंदा । आणि. सवंगडी बहुधा ।
काल्याच्या. त्या मुदा । घेती आपुलें करीं ।।३।।
लोणचें तें नानापरी । वाढिताती कुसरीं ।
सर्व वाढिले निर्धारी । परिपूर्ण अवघीयां ।।४।।
एका जनार्दनी म्हणे । कृष्णा कवळ. तूं घेणें ।
गडियांसी देव म्हणे । तुम्हीं. घ्यावा आधीं ।।५।।

भावार्थ

कळंबातळीं बसून सकळ गोपाळांनी मिळून काला केला.नानापरींची उत्तम पक्वान्नें सर्वांना योग्यप्रकारे वाढली.मध्यभागीं सावळा. हरी शोभून दिसतो. बोबडे बोलणारा पेंदा आणि सवंगड्यांनी काल्याच्या मुदी आपल्या हातात घेतल्या आणि सर्वांना समान मिळतील अशा कौशल्याने वाढण्यांत आले. असे वर्णन करून. एका जनार्दनी म्हणतात, कृष्णाने पहिला कवळ मुखी घ्यावा अशी गोपाळांची ईच्छा पण कृष्णदेव सवंगड्यांनी प्रथम भोजनास सुरवात करावी असे सुचवतात.

११४

गडी म्हणती सकळ । कृष्णा तूं घेई कवळ ।
हरी म्हणे उतावीळ । घ्यावा तुम्ही ।।१।।
गडी नायकती सर्वथा । हरी म्हणे मी नेघें आतां ।
म्हणोनी रूसोनी तत्वतां ।चालिला कृष्ण ।। २।।
कृष्णा नको जाऊं जाण । तुझैं एकूं वचन ।
म्हणोनि संबोधून । आणिला कृष्ण ।।३।।
एका जनार्दनीं । लाघव दावी चक्रपाणी।
भक्ता वाढवुनी । ‌महिमा वदवी ।।४।।

भावार्थ

सगळे सवंगडी कृष्णाने कवळ घ्यावा म्हणुन आग्रह करतात. कृष्ण ते मान्य करत नाही, सवंगडी आपला. हट्ट. सोडत नाहीत. कृष्ण नाराज होऊन वृदांवन सोडून चालू लागतो, सवंगडी कृष्णाची आज्ञा. पाळण्याचे. वचन देऊन श्रीहरीला माघारी आणतात. एका जनार्दनीं म्हणतात, चक्रपाणी आपले लाघव दाखवून भक्तांची मने जिंकून भक्तिमहिमा वाढवतात.

११५

काळ्या कांबळ्याची घडी । घालिताती सवंगडी |
बैसवुनी हरी । कवळ. घेती ।।१ ।।
कृष्ण आपुलेनी हातें । कवळ घाली गडीयातें ।
त्यांची उच्छिष्ट शितें । घालितसे मुखीं ।।२।।
मुखामाजी कवळ । सवंगडे घालिती सकळ ।
वैकुंठीचा. पाळ ब्रह्मानंदें डुल्लत ।।३।।
तृप्त झाला जनार्दन । एका वंदितसे चरण ।
काया वाचा मन । खूण भक्त जाणती ।।४।।

भावार्थ

काळ्या. कांबळ्यवर सवंगडी हरीला बसवून मुखीं कवळ घालतात. कृष्ण आपल्या हाताने सवंगड्यांना घास भरवून त्यांची उष्टी शिते आनंदाने मुखीं घालतो ,ब्रह्मानंदांत मग्न होतो . एका जनार्दनीं म्हणतात, काया. वाचा मनाने भक्त देवाशी एकरूप होतात हीच एकाग्र भक्तिची खूण आहे.

११६

मिळोनि गोपाळ सकाळीं । यमुनेतटीं खेळे चेंडूफळी ।
गाई बैसविल्या. कदंबातळीं । जाहली दुपारीं खेळतां ।।१।।
काला मांडिला वो काला मांडिला । नवलक्ष. मिळोनी
काला मांडिला वो ।।ध्रु ०।।
नानापरींचें. शोभतीं दहीभात। पंक्ती बैसविल्या पेंदा बोबडा वाढीत ।
जो. जया संकल्प तें तया मिळत । अनधिकारिया तेथें कोणी न पुसत ।।२।।
पूर्वसंचित खाली पत्रावळी । वाढती भक्तिभावाची पुरणपोळी ।
नामस्मरणाची क्षुधा. पोटीं आगळीं । तेणें तृप्ती होय. सहजी सकाळीं ।।३।।
ऐसे. तृप्त जाहले परमानंदें । कवळ कवळाचे निजछंदें ।
एका जनार्दनी. अभेदें. । शुध्द समाधिबोधें मुख संवादें ।।४।।

भावार्थ

गाईंना कदंबातळी बसवून सर्व गोपाळ मिळून यमुनातटीं चेंडूफळीचा खेळ खेळू लागली. खेळतां. खेळतां दुपार झाली.नवलक्ष गोपाळांनी मिळून काला मांडिला. पंगती बसल्या. बोबडा पेंदा पंगतीला नानापरींचे भात,भक्तिभावाची पुरणपोळी वाढूं लागला.जयाला जे आवडते तें त्याला मिळू लागलें. नामस्मरणाची भूक लागली असल्यानें सहजपणे सर्वांची तृप्ती झाली,परमानंदाचा प्रसाद मिळाला. एका जनार्दनीं म्हणतात, कोणताही भेदभाव नसलेल्या शुध्द मनाला समाधी सुखाचा बोध झाला.

११७

नित्य तो सोहळा करिताती काला । तो पहावयाला देव येती ।।१।।
अंतरीं सुरवर विचार करिती । काला श्रीपती करीत स्वयें ।।२।।
उच्छिष्ट प्रसाद सेवूं धणीवरी । मत्स्यरूप निर्धारी घेती. सर्व ।।३।।
एका जनार्दनी जाणितसे खूण । म्हणोनी विंदान आरंभीं ।।४।।

भावार्थ

वृंदावनांत नित्य चालू असलेला कालासोहळा पाहण्यासाठीं देव आतुर झाले. श्रीपती स्वता: काला करीत आहे तर देव उच्छिष्ट प्रसाद सेवन करण्यासाठी मत्स्यरुप धारण करतात. एका जनार्दनी परब्रह्म स्वरुपाची खूण जाणून विस्मयकारी अवतार लीला समजून घेतात.

११८

गडियासी सांगे वैकुंठीचा राव । आजीं. आला भेंवों यमुनेंत ।।१।।
जीवनालागीं तेथें कोण्ही पै न जावें । डाऊन आला आहे तया ठायीं ।।२।।
तयाचे बोलणें लागे सर्वा गोड । म्हणोनि धरिती. चाड सवंगडे ।।३।।
एका जनार्दनी. ऐकोनि वचन । पुढती. वचन पेंदा बोले ।।४।।

भावार्थ

वैकुंठीचा राणा श्रीकृष्ण सवंगड्यांना सांगतो कीं, यमुनेवर पाण्यासाठी. कुणी जाऊं नये कारण तेथें बागुलबुवा आला आहे. कृष्णाचे मधुर बोल. सर्वांना आवडतात,सगळे त्याला संमती दर्शवतात असे सांगून. एका जनार्दनी म्हणतात, श्रीहरिचे वचन ऐकून पुढे पेंदा बोलतो.

११९

आजी कांहो कृष्णा वर्जिली यमुना। बाऊ तो जाणा कोठोनि आला ।।१।।
कैसा आहे बाऊ पाहिन तयातें । म्हणोनि त्वरित उठिलासे. ।।२।।
वारितां वारितां पेंदा. पैं गेला । पहातसे. उगला यमुनेंत ।।३।।
बाऊ तो न दिसे कोठें वाजत । पैंदा तया. म्हणत क्रोधयुक्त ।।४।।
म्हणतसे पेंदा यमुनेसी जाण। स्त्री. तूं. होऊन. हुंबरी. घेसी ।।५।।
मी कृष्णदास घेसी तूं हुंबरी. । तुज निर्धारी बळ बहु ।। ६।।
मी. काय निर्बळ घेसी तूं हुंबरी । आतांचि निर्धारी पाहे माझें ।।७।।
म्हणोनियां पेंदा तेथेंचि बैसला । हुंबरी तो तयाला. घालीतसे ।।८।।
पेंदा कां नये काय. जाहलें त्याला । कृष्णे पाठविला दुजा एक ।।९।।
तोही मीनला तयांसी तत्काळ । गडी तों सकळे आलें तेथें ।।१०।।
उरलेले दोघे कृष्ण आणि राम । गुंतले सकाम गडी तेथें ।।११ ।।
काय जाहलें म्हणोनि आले उभयतां।पाहुनी तत्वतां हासताती।।१२।।
सावध करितां न होती सावध । लागलासे छंद घुमरीचा ।।१३।।
एका जनार्दनीं कौतुकें कान्हया । आली असे दया भक्ताची ते ।।१४ ।।

भावार्थ

श्रीकृष्णाने यमुनेवर जाऊ नका असे कां सांगितले आणि तो बाऊ कोठून आला असे विचारून पेंदा तो बाऊ कसा आहे ते पाहतो असे बोलून त्वरित उठला आणि यमुना जळांत शिरला. यमुनेचे पाणी खळखळ आवाज करून वाहत होते पण बाऊ मात्र कोठे दिसेना तेंव्हां पेंदा रागाने आपण कृष्णाचे दास असून बलशाली आहे स्त्री असून कृष्णदासासी हुंबरी. घेणे योग्य नाही असे यमुनेला बोलून मनाचा निर्धार करून पेंदा तेथें बसला. पेंदाला शोधण्यासाठी क्रृष्णाने एका सवंगड्याला. पाठवले एकामागून एक असे सगळे यमुनेकांठी. गोळा झाले . रामकृष्ण दोघेही काय झाले हे समजून घेण्यसाठी यमुनेवर आले आणि घुमरीच्या छंदाने देहभान विसरून गेलेल्या गोपाळांना सावध केले. एका जनार्दनी म्हणतात, भोळ्या भक्तांची दया येऊन कान्हा त्यांच्या प्रेमानें.धावून येतो.

१२०

पाहूनियां हरी गोपिळाचें चोज । म्हणे तेणें तो निर्वाणीचें निज मांडियेलें ।।१।।
मेठा खुंटी येउनी हुंबरी घालिती। खर तोंडाप्रती येती जाहली ।।२।।
कळवळला देव जाहलासे घाबरा । मुरली अधरा. लावियेली ।।३।।
मुरलीस्वरें चराचरी. नाद तो भरला । तेणें स्थिर झाला पवनवेगीं ।।४।।
यमुनाही शांत झाली तेच क्षणीं । म्हणे चक्रपाणी सावध. व्हा. रे ।।५।।
पेंदीयाचे तो शब्द ऐकिला कानीं । एका. जनार्दनीं स्थिर. झाला. ।।६।।

भावार्थ

गोपाळांचे निर्वाणीचे प्रयत्न पाहून देव कळवळला, काळजीने घाबरला. गोपाळांना सावध करण्यासाठी कृष्णानें मुरलीचे सूर छेडलें, चराचर या नादानें भरून गेले. वायूचा वेग मंदावून स्थिर झाला. यमुनेचा खल्लाळ थांबला, ती शांत झाली. हा प्रसंग वर्णन करुन एका जनार्दनी म्हणतात, सावध व्हा रे हे श्रीहरीचे शब्द ऐकून पेंदा निश्चिंत झाला.

१२१

ऐकतां तो नाद मोहिलेंसे मन ।
न कळे विंदान तिहीं लोकां ।।१।।
सावध. होउनी. गडी ते पहाती ।।२।।
स्थिर पैं होती यमुना ते ।।३।।
एका जनार्दनीं. ऐसा दासाचा. कळवळा ।
म्हणोनी भक्त लळा पाळितसे ।।४।।
यैवोनि गोपाळ कृष्णासी. बोलती ।
यमुनेचा बाऊ पळाला वो श्रीपती ।।५।।
धन्य बळिया आम्हीं की वो त्रिभुवनी।
धन्य धन्य कृष्णा म्हणोनि नाचती|
अवनी आनंदे गोपाळ तयाशीं खेळे ।।६।।

भावार्थ

कृष्णाच्या मुरलीनादाने सर्व सृष्टी मोहून गेली. स्वर्ग, पृथ्वी, आणि पाताळ तिन्हीं लोक विस्मयचकीत झालें.सावध झालेले गोपाळ स्थिर झालेले यमुनाजळ पाहून कृष्णाला सांगतात यमुनेतला बाऊ त्यांचे धाडस पाहून पळाला. ते त्रिजगती धन्य झाले.कारण त्यांच्यावर श्रीपतीने कृपा केली. सर्वजण आनंदाने नाचू लागले, श्रीहरी त्यां आनंदात सहभागी झाले.

१२२

खेळतां खेळतां गडियासी म्हणे । खेळ तो पुरे गाई जमा करणें ।।१।।
आपुलाल्या आपण वळाव्या गाई । नवल तो तेणें खेळ मांडावया भाई ।।२।।
धांवती सवंगडी पाठोपाठ लवलाह्या । गुंतल्या त्या गाई. न येती वळाया ।।३।।
येवोनि दीन मुख करिती हरीपुढें । एका जनार्दनीं तया. पाहतां प्रेम चढे ।।४।।

भावार्थ

खेळत असतांना सावळा कृष्ण गोपगड्यांना खेळ थांबवून आपआपल्या गाई वळवावयास सांगतो'. सगळे जण एका पाठोपाठ वेगानें धावतात, गाई चारा खाण्यांत गुंतल्या असल्याने घराकडे वळत नाहीत. नाराज होऊन दीनवाणीने गोपाळ हरीपुढे उभे राहतात.एका जनार्दनौ म्हणतात, गोपगड्यांच्या दीन मुद्रा पाहून हरीच्या मनांत त्यांच्या विषयीं प्रेम दाटून येते.

१२३

काकुलती गोपाळ म्हणती रे. कान्हया ।
गाई न येती माघारी कोण. बळी कासया ।।१।।
आमुची. खुंटली गति आवरीं तूं हरी ।
तुजवाचूनी कोण सखा आमुचा कैवारी ।।२।।
नको येरझारा. पुरे आतां हरी ।
एका जनार्दनी ऐशी करूणा करी ।।३।।

भावार्थ

काकुळतीला येऊन गोपगडी हरीला विनंती करतात, गाई माघारी फिरत नाहीत, प्रयत्न. करून थकून मार्ग खुंटला आहे, असे बोलून ते कृष्णाला सांगतात, कृष्ण सख्यावाचून त्यांना मदत करणारा कैवारी कोणी नाही. एका जनार्दनी म्हणतात, संसाराच्या येरझर्यातून भक्तांची सुटका करणारे श्रीहरिशिवाय दुसरे कोणतेही साधन नाही.

१२४

गडियांचे उत्तर ऐकोनि सावळा । वेधियेलें मन तटस्थ सकळां ।।१।।
घेऊनी मोहरी गाई पाचारी सकळां। नवल तें जाहलैं गोपाळा सकळां ।।२।।
येउंनी गाई अवघ्या जमा होती। पाहूनियां कृष्णा त्या हुंबरती ।।३।।
एका जनार्दनीं विश्वाचा निवासी । गाई आणि गोपाळां वेधिलैं सर्वांसी ।।४।।

भावार्थ

गोपगड्यांचे हे उत्तर ऐकून श्रीकृष्णाने नवलाई केली.त्याने गोपाळांसह सर्व गाईंचे मन स्वस्वरुपाशी वेधून घेतले.सकळ गोपाळ आश्र्चर्यचकित झाले, सगळ्या गाई कृष्णा सभोवताली येऊन कृष्णाला पाहून हंबरु लागल्या.एका जनार्दनी म्हणतात, विश्वनायक गाई आणि गोपाळांचे मन वेधून घेतो.

१२५

काळे गोरे एकापुढे एक । धांवताती बिदो बिदी देख ।
अलक्ष लक्ष्या नये सम्यक । तो नंदनंदन त्रिभुवननायक गे माय ।।१।।
गाईवत्स नेताती वनां । गोपाळ म्हणती अरे कान्हा ।
जो नये वेदां अनुमाना । ज्यासी चतुरानन ध्यानीं ध्यातसे ।।२।।
योगीजनांचे ध्येय ध्यान । ज्याकारणें अष्टांग योगसाधन ।
तयांसि नोहे कधीं दृश्यमान। तो गोळ्यांचे उच्छिष्ट खाय जाण गे माय ।।३।।
एका जनार्दनीं व्यापक । सर्वां ठायीं समसमान देख ।
अरिमित्रां देणें. ज्याचें एक । तो हा नायक वैकुंठींचा।।४।।

भावार्थ

काळे सावळे गोपगडी एका पुढे एक वेगानें धावतात,सारे लक्ष त्यां नंदनंदन त्रिभुवननायक,जो अलक्ष्य लक्ष्य असल्याने सम्यक दर्शन घडत नाही. ज्याचे वेद सुध्दां सम्यक वर्णन करु शकत नाहीत. ध्यान लावूनही सृष्टीकर्ता ब्रह्मा देखील ज्याला जाणून घेऊ शकत नाही,ज्याच्या साठी योगीजन ध्यानधारणा,अष्टांग योगसाधना करतात त्यांना तो परमात्मा दृष्टीपथांत येत नाही तो गोकुळात गौळ्यांच्या सह गोपाळ काला करून त्यांचे उच्छिष्ट आवडीने खातो.एका जनार्दनी म्हणतात, हा जनार्दन सर्व सृष्टीत व्यापकरुपे भरून राहिला आहे. हा वैकुंठीचा नायक शत्रु आणि मित्र यांना समान दृष्टीने बघणारा असून चराचरावर प्रेम करणारा आहे.

१२६

जाहला अस्तमान आलें गोकुळां । वोवाळिती आरत्या गोपिका बाळा ।।१।।
जाती सवंगडी आपुलाले घरां । रामकृष्ण. दोघे आले. मंदिरां ।।२।।
नानापरींची पक्वान्ने वाढिती भोजना । यशोदा. रोहिणी राम आणि कृष्णा ।।३।।
एका जनार्दनीं पहुडले देव । गोकुळामाजीं दावी ऐसे लाघव ।।४।।

भावार्थ

सूर्य मावळला, सर्व गोपाळ आपल्या घरां परतलें, गोपिकांनी गोपबाळांना आरतीने ओवाळलें.रामकृष्ण दोघे राजमंदिरांत परतलें परतलें यशोदा रोहिणीने नाना प्रकारची पक्वान्ने रामकृष्णाला भोजनीं वाढलें. गोकुळांत आपली अवतार लीला दाखवणारे देव सुख शय्येवर पहुडलें असे एका जनार्दनी म्हणतात.

१२७

कृष्ण देखतांची गेलें ज्ञान । शेखीं बुडविलें महिमान।।१।।
भली नव्हे हे कृष्णगती । सखे पळविले सांगाती ।।२ ।।
मायेचा करविला बंदु । शमदमादि पळविले बंधु ।।३।।
द्रष्टा दृश्य दर्शन । तिन्ही सांडिले पुसून ।।४।।
ब्रह्माहमस्मि शुध्द जाण । तेथील शून्य केला अभिमान ।। ५।।
एका जनार्दनाची प्राप्ती । ज्ञान अज्ञान हारपती ।।६।।

भावार्थ

सखे सांगाती यांचे पाश तोडून टाकणारी, मायेच्या बंधनातून सोडवणारी, व्यक्तिमहात्म्य बुडविणारी शमदमादि साधनांचा खटाटोप संपवणारी ही कृष्णगती भली नव्हे असे स्पष्ट करून एका जनार्दनीं म्हणतात,कृष्ण स्वरुपाचे दर्शन होतांच दृश्य (देखावा) द्रष्टा,( पहाणारा ) आणि दर्शन क्रिया ही त्रिपुटी लयास जावून अज्ञाना सहित ज्ञानाचा निरास होतो. मी ब्रह्म आहे ही शुध्द जाणीव होऊन अभिमान शून्य होतो .हे सर्व गुरुकृपेने समजते.

१२८

करुनिया काला सर्व आले गोकुळीं । गोपाळांसहित गाईवत्स सकळीं ।।१।।
वोवाळिती श्रीमुख कुर्वंडी करिती । रामकृष्णातें सर्व वोवाळिती ।।२।।
जाहला. जयजयकार आनंद सकळां । एका जनार्दनीं धणी पाहतां डोळां ।।३।।

भावार्थ

काल्याचा सोहळा संपवून गाईवासरे, गोपाळ सर्वजण गोकुळांत परतलें. गोपिकांनी सर्व गोपगड्यांना ओवाळले. रामकृष्णाला ओवाळून आनंदाने जयजयकार केला. एका जनार्दनी म्हणतात, हा आनंद सोहळा पाहून मन समाधानाने भरून गेले.

१२९

अस्तमान जालिया ग्रामांत परतले । गोपाळ ते गेले घरोघरीं ।।१।।
आपुलिया गृही रामकृष्ण आले । यशोदेनें केले निंबलोण ।।२।।
षड्ररस पक्वान्नीं विस्तारिलें ताट. । जेविती वैकुंठ नंदासवें ।।३।।
नंदासवें जेवी वैकुंठीचा हरी । ब्रह्मादिक सरी न पावती ज्याची ।।४ ।।
एका जनार्दनीं ऐसी लीला. खेळे । परब्रह्म सांवळें कृष्णरुप ।।५।।

भावार्थ

सुर्यास्त होतांच गोकुळांत. परतलेलें गोपाळ घरोघरी गेले.रामकृष्ण घरीं. येतांच. यशोदेनें लिंबलोण केले. सहा रसांनी युक्त अशा पक्वानांनी ताट सजविली वैकुंठाचा हरी नंदासवे भोजनास बसलें.ज्याची गोडी ब्रह्मदेवांना देखील.चाखण्यास मिळाली नसेल. असे वर्णन एका जनार्दनी करतात.

श्रीकृष्णाचे मथुरेस प्रयाण गौळणींचा आकांत

१३०

गौळणी म्हणती यशोदेला । कोठें गे सांवळा ।
कां रथ शृंगारिला । सांगे वो मजला । अक्रूर उभा असे बाई गे साजणी ।।१।।
या नंदाच्या अंगणी । मिळाल्या गौळणी ।।ध्रु०।।
बोले नंदाची पट्टराणी । सद्गदीत होउनी ।
मथुरेसी चक्रपाणी । जातो गे साजणी ।।१।।
विव्हळ झाले मन वचन ऐकोनी ।।२।।
अक्रूरा चांडाळा । तुज कोणी धाडिला ।
कां घात करुं आलासी । बधिशी सकळां ।
अक्रूरा तुझें नाम तैशीच करणी ।।३।।
रथीं चढले वनमाळी । आकांत गोकुळीं ।
भूमि पडल्या व्रजबाळी । कोण त्या सांभाळी ।
नयनींच्या उदकानें भिजली धरणी ।।४।।
देव बोले अक्रूरासी । वेगें हांकी रथासी । या गोपींच्या शोकासी ।
न पहावें मजसी । एका जनार्दनीं रथ गेला निघोनी ।।५।।

भावार्थ

नंदाच्या अंगणात जमा झालेल्या गौळणी यशोदेला विचारतात की सावळा कोठे आहे ? हा रथ कशासाठी सजविला आहे ? तेव्हां भरल्या कंठाने यशोदा मैत्रिणींना सांगते की चक्रपाणी मथुरेला जात आहेत. शोकाकूल होऊन गौळणी अक्रूराला दूषण देऊन त्याची निंदा करतात की तो नावाप्रमाणेच क्रूर असून घात करण्यासाठीं गोकुळांत आलेला चांडाळ आहे. वनमाळी रथारूढ होतांच गोकुळांत एकच आकांत माजतो. व्रजकन्या भूमीवर कोसळून आकांत करु लागतात. त्यांच्या अश्रुंनी धरणी भिजून जाते. गोपींच्या शोकाने घायाळ झालेल्या श्रीहरीच्या विनंतीनुसार अक्रूर वेगाने रथ हाकतो. कृष्णासह रथ निघून गेला असे एका जनार्दनी खिन्नपणे वर्णन करतात.

गोपळांच्या शांतवनाची उध्दवास आज्ञा

१३१

उध्दवासी एकांतीं बोले गुज सांवळा ।
गोकुळासी जाऊनी बोधी सुंदरी गोपीबाळा ।
रथीं बैसोनी निघाला वेगीं पावला गोकुळां ।
तो उध्दव देखोनी दृष्टी गोपींनी वेढिला । ।१ ।।
उध्दवा जाय मथुरेला ।
आणी. लौकरी हरीला ।।ध्रू० ।।
मुख सुंदर शोभे कपाळीं टिळक रेखिला।
नवरत्नजडित मुद्रिका हार कंठीं घातिला. ।।२।।
झळकती कुंडलें कानीं शिरीं मुगूट शोभला ।
मुरली मोहिला भाळला तिच्या रुपासी ।
डोळे पिचके खुरडत जे चाले काय. |
वानूं मुखासी शुध्द भाव. देखोनी तिचा अनुसरला तियेसी ।।३।।
रासमंडळी नाचे मुरारी कधीं भेटेल तो न कळे ।
वेणू वाजवी सुस्वर सोज्वळ पदकमळें ।
धणी न पुरे तया पाहतां. मन आमुचे वेधिलें ।।४।।
हा अक्रूर कोठोन आला हरी गेला घेऊनी ।
तो वियोग जाळी न जाय जीव आमुचा अझुनी ।
घरदार सोडोनी जावें गोकुळ हे सोडोनी ।
उध्दवा कधीं भेटविसी हरीला आणुनी ।।५।।
घडी घडी घरां येतो चोरितो श्रीहरी ।
तो. झडकरी दाखवीं लौकरी ।
धन्य. प्रेम तयाचें सद्गदित अंतरीं ।
एका जनार्दनीं हरिरुपीं ।
वेधल्या नारी ।।६।।

भावार्थ

गोकुळांत जाऊन गोपींना उपदेश करून त्यांचे वियोगी मन शांत करावे असे श्रीकृष्ण उध्दवास सांगतो.वेगाने निघून उध्दव गोकुळांत येतांच गोपी त्याला मथुरेस जाऊन कृष्णाला घेऊन येण्यास विनवितात. श्रीहरीच्या रुपाचे सुंदर वर्ण़न करतात. कपाळीं कस्तुरी टिळक,गळ्यांत हार,बोटांत रत्नजडित अंगठी, कानांत कुंडलें,मस्तकी मुगुट ,अधरावर मुरली धारण करणारा श्री हरी गोकुळ सोडून मथुरेला जाऊन राहिला. खुरडत चालणार्या, पिचक्या डोळ्यांच्या कुब्जेच्या भोळ्या भावाला भुलून गोपिकांना विसरला. रासमंडळी नाचणारा,सुस्वर मुरली वाजवणारा, मनाला वेध लावणारा अशा श्रीहरीचा वियोग जीव जाळून टाकीत आहे.हे घरदार,गोकुळ यांचा त्याग करून हरिदर्शनाची आस पुरवावी असे व्याकूळ गोपी उध्दवाला सांगतात.असे कथन करून एका जनार्दनीं गोपी -कृष्णाचे हे अलौकिक,निर्व्याज प्रेम धन्य होय.असे म्हणतात.

श्रीकृष्णमाहात्म्य

सांवळा श्रीकृष्ण राखितो गाई वधियेलें मन आमुचे तें पायीं ।।१।।
नवल लाघव न कळे ब्रह्मादिका । वेदश्रुती शिणल्या ठक पडलें सकळिकां ।।२।।
साही दरूशनें गौळण जयासाठीं । खांदी घेउनी कांबळा गोधन राखी जगजेठी‌।।३।।
एका जनार्दनीं ब्रह्म गोकुळीं उघडें ।पाहतां. पाहतां चित्त तेथे वेधलें ।।४।।

भावार्थ

ज्याच्या पायीं मन गुंतून गेले आहे तो सांवळा हरी गोकुळांत गाई राखित आहे. भक्तीप्रेमाचे हे विस्मयकारी रुप ब्रह्मादिदेवांना सुध्दां अनाकलनीय आहे. हे जाणून घेण्यांच्या प्रयत्नांत वेदश्रुती थकल्या. साही दर्शने अचंबित झाली.खांद्यावर कांबळे घेऊन गाई राखणाय्रा जगजेठीला पाहून सगळे कोड्यांत पडलें.एका जनार्दनीं म्हणतात,गोकुळांत नांदणारे हे उघडे परब्रह्म पाहतांना मन तेथें गुंतून पडलें.

१३२

ब्रह्मादिकां न कळे तें रुप सुंदर। गोकुळीं परिकर नंदाघरीं ।।१।।
रांगणा रांगतु बाळलीले खेळतु । दुडदुडां धांवतु गायीपाठीं ।।२।।
गौळणींचे घरीं चोरूनि लोणी खाये। पिलंगता जाये हातीं न लगे ।।३ ।।
एका जनार्दनीं त्रैलोक्या व्यापक । गाई राखे कौतुक गोळियांसी ।।४।।

भावार्थ

नंदाच्या अंगणात रांगणारे, बाळलीला करणारे,गाईंच्या मागें दुडदुडा धावणारे,गौळणींच्या घरीं चोरून.लोणी खाणारे, पळून जातांना कधी हातीं न लागणारे, हे परब्रह्म रुप ब्रह्मादीदेवांना सुध्दां कोड्यांत टाकते . एका जनार्दनीं म्हणतात, स्वरुपाने जे त्रैलोक्य व्यापून टाकते ते परब्रह्म गवळ्यांच्या गाई राखते हे कौतुक केले.

१३३

ओंकारा परतें निर्गुणा आरुतें । भक्तांसी निरूंतें वसे ।।१।।
सांवळें सगुण चैतन्य परिपूर्ण । सवंगडियांसी क्रीडा करी।।२।।
आदि मध्य अंत न कळे ज्या रुपाचा । तोचि बाळ नंदाचा म्हणताती ।।३।।
एका जनार्दनीं वेगळाचि पाही । हृदयीं धरूनी राही सांवळियासी ।।४।।

भावार्थ

ओंकारा पेक्षां श्रेष्ठतम, निर्गुणा पेक्षां वेगळे,भक्तांना निकट असे परब्रह्म हे स्वरुप सांवळे, सगुण,चैतन्यपूर्ण असून सवंगड्यांसह.क्रीडा करीत आहे. या रुपाचा आरंभ,मध्य, अंत बुध्दीला आकलन होत नाहीं . सामान्य जन या परब्रह्माला नंदबाळ म्हणतात.असे कथन करून एका जनार्दनीं म्हणतात,या आगळ्या वेगळ्या सावळ्या रुपाला अंत:करणांत धारण करावें.

१३४

सांवळा श्रीकृष्ण. राखितो गाई ।
वेधियेलें मन आमुचे तें पायीं ।।१।।
नवल लाघव न कळे ब्रह्मादिका ।।१।।
वेदश्रुती शिणल्या ठक पडलें सकळिका ।।२।।
साही दरूशनें वेडावलीं जयासाठीं ।
खांदी घेऊनी कांबळा गोधन राखी जगजेठी ।।३।।
एका जनार्दनीं चित्त वेधलें ।।४।।

भावार्थ

खांद्यावर कांबळे घेऊन जगजेठी गोकुळांत गाई राखतो,या विस्मयकारक करणीचे मर्म ब्रह्मादिदेवांना देखील उलगडत नाही.वेद आणि श्रुती याची मिमांसा करतांना थकून गेल्या, साही दर्शने हतबुद्ध झाली. सगळेजण कोड्यांत पडलें.एका जनार्दनीं म्हणतात,या सांवळ्या श्रीकृष्णाने सर्वांचे चित्त वेधून घेतले.

१३५

जाणते नेणते होतु ब्रह्मज्ञानी । तयांचे तो ध्यानी नातुडेची।।१।।
सुलभ सोपारा गोकुळामाझारीं । घरोघरींचोरी खाय लोणी ।।२।।
न कळे ब्रह्मादिका करितां लाघव। योगियांची धांव खुंटे जेथें ।।३।।
एका जनार्दनीं चेंडूवाचे मिसें । उडी घालितसे डोहामाजीं ।।४।।

भावार्थ

ब्रह्मज्ञान जाणणारे योगीजन ज्याच्या रुपाची आस धरून निरंतर ध्यान लावून बसतात त्यांना देखील जो सापडत नाही. ब्रह्मादिदेव आणि जाणते योगीजन यांना जो अनाकलनीय आहे तो श्रीहरी गोपाळांना सहज प्राप्त होतो, घरोघरीं जाऊन चोरून लोणी खातो.एका जनार्दनींम्हणतात,चेंडू आणण्याच्या निमित्ताने श्रीहरी यमुनेच्या डोहांत उडी घालतो .

१३६

पाहुनी कृष्णासी आनंद मानसीं । प्रेमभरित अहर्निशीं कृष्णनामे।।१।।
आजीं. कां वो कृष्ण आलां. नाहीं घरां । करती येरझारा नंदगृहीं ।।२।।
भलतीया मिसें जातीं त्या घरासी । पाहतां कृष्णासी समाधान ।।३।।
एका जनार्दनीं वेधल्या गौळणी । तटस्थ त्या ध्यानीं कृष्णाचिया।।४।।

भावार्थ

प्रेमभराने कृष्णाच्या नामाचा जप करणार्या गौळणी कृष्ण दर्शनाने आनंदित होतात.कृष्ण भेटला नाहीतर त्या कांहीतरी.कारण.काढून नंदाघरीं येरझरा घालतात.कृष्ण भेटताच समाधान. पावतात. एका जनार्दनीं म्हणतात, गोपींचे चित्त श्रीहरीने हरण केले आहे.

१३७

वैधिल्या त्या गोपी नाठवे आपपर । कृष्णमय शरीर वृत्ति जाहली ।।१।।
नाठवे भावना देह गेह कांहीं । आपपर त्याही विसरल्या ।।२।।
एका जनार्दनीं व्यापला हृदयीं । बाहेर मिरवी दृष्टिभरित ।।३।।

भावार्थ

गोकुळीच्या गोपींच्या देहवृति आणि मनोवृत्ति कृष्णमय झाल्या.देह आणि घरा विषयींच्या ममत्वाच्या भावनांचा.पूर्ण निरास झाला.आपपर भाव लोपला. बाह्य सृष्टीत नजरेला दिसणाय्रा कृष्णरूपाने हृदय व्यापून टाकले. या शब्दांत गोपींच्या प्रेमभक्तीचे वर्णन एका जनार्दनीं करतात.

१३८

जगाचे जीवन ब्रह्म परिपूर्ण । जनीं जनार्दन व्यापक तो।।१।।
तो हरी गोकुळीं रांगणा नंदाघरीं । गौळणी त्या सुंदरी खेळविती ।।२।।
वेद गीतीं गाणी शास्त्रें विवादती । खुंटलीसे मति शेषादिकांची ।।३।।
एका जनार्दनीं चहूं वाचांपरता । उच्छिष्ट सर्वथा भक्षी सुखें ।।४।।

भावार्थ

परिपूर्ण ब्रह्म,विश्वाचे चैतन्य असा हा जनार्द़न अणुरेणुमध्यें भरून राहिला आहे. ज्याचा महिमा वेद, पुराणे गीतांमधून गातात, साही शास्त्रे वाद विवाद करतात.त्याचे यथार्थ वर्णन सहस्त्र मुखीं शेष सुध्दा करु शकत नाही. तो हरी नंदाघरी रांगतो,गौळणी त्याला खेळवतात.एका जनार्दनी म्हणतात,वैखरी,मध्यमा,पश्यंती,परा या चारी वाचा या रुपाचे वर्णन करण्यासाठी असमर्थ ठरतात.

१३९

चहूं वाचांपरता चहूं वेदां निरूता । न कळे तत्वतां चतुर्वक्त्रा ।।१।।
चौबारा खेळतु सौंगडी सांगातु । लोणी चोरुं जातु घरोघरीं ।।२।।
चौसष्टा वेगळा चौदांसी निराळा । अगम्य ज्याची लीळा सनकादिका ।।३।।
एका जनार्दनीं चहूं देहावेगळा । संपुष्टीं आगळा भरला देव ।।४ ।।

भावार्थ

वैखरी,मध्यमा,पश्यंती आणि परा या चारी वाचा ज्याचे यथार्थ वर्णन करु शकत नाही,चारी वेद ज्या परमात्म रुपाचे वर्णन करतांना नेती नेती म्हणून मूक होतात,चार मुखी ब्रह्मदेव ज्याला तत्वतां जाणू शकत नाही,जो चोसष्ट विद्या आणि चौदा कला यांच्याहून निराळा आहे.सनकादिक ऋषीं देखील या परमात्म्याच्या अगम्य लिळांचे वर्णन करु शकत.नाही. असे कथन.करून एका जनार्दनीं म्हणतात, स्थूल, सुक्ष्म,कारण आणि महाकारण या चारी देहावेगळा हा परमात्मा अंतरंग व्यापून टाकतो.

१४०

अबोलणें बोल कुंठीत पै जाहलें । तें निधान देखिलें नंदाघरीं ।।१।।
अधिष्ठान मूळ व्यापक सकळ । जगाचें तें कुळ कल्पद्रुम ।। २।।
एका जनार्दनीं. बिंबी बिंबाकार। सर्वत्र श्रीधर. परिपूर्ण. ।।३।।

भावार्थ

नंदाघरीं नांदत असलेलें विश्वाचे निधान पाहून शब्द कुंठीत होऊन वाचा अबोल झाली.सकळ विश्वाचे व्यापक अधिष्ठान, जगाला ईच्छिले फळ देणारा कल्पतरु श्रीधर सर्वत्र ओतप्रोत भरून राहिला आहे.असे वर्णन करून एका जनार्दनीं म्हणतात, परमात्म्याच्या प्रतिबिंब रूपी सृष्टितिल बिंब असुन सर्वसाक्षी आहे.

१४१

राखितो गोधनें मनचेनि मनें । न पुरे अवसरू धांवण्या धांवणें ।
कुंठित जाहली गति पवनाची तेणें । तो हा नंदाचा नंदन यशोदेचें तान्हैं ।।१।।
देखिला देखिला मंडित चतुर्भुज । वैकुंठीचा भूपती तेज:पुंज ।
पहातांचि तया नावडे कांहीं दुजें । ऐसें लाघव याचें सहज ।।२।।
चित्त चैतन्य पडिली मिठी । कामिनी मनमोहना जगजेठी।
तुझ्या वेधें ध्यानस्थ धूर्जटी । ऐसा गोवळु योगीयांसी नोहे भैटी।।३।।
एका जनार्दनीं शब्दांवेगळा। आगमांनिगमां कांहीं न कळे लीळा ।
सोहं कोहं शब्दांवेगळा। पहा पहा परब्रह्म पुतळा।।४।।

भावार्थ

नंद यशोदेचा नंदन मनोवेगाने धांवून गाई राखतो,त्या वेगापुढे वायुची गती कुंठित होते.शंख,चक्र,गदा,पद्म यांनी मंडित असलेला चतुर्भुज तेज:पुंज असा वैकुंठीचा राजा पाहतांच दुजें कांही पाहण्याची ईच्छाच उरत नाही. मनमोहन जगजेठी दृष्टीस पडतांच चित्ताला चैतन्याची मिठी पडतें.प्रत्यक्ष शिवशंकर ध्यानस्थ बसून या भेटीची अपेक्षा करतात.एका जनार्दनीं म्हणतात,वेदश्रुतींना या परब्रह्म्याच्या अवतार लीळांचे रहस्य कळत नाही.हा परब्रह्म पुतळा शब्दांनी वर्णन करण्या पलिकडील आहे.

१४२

चतुर्भुज शामसुंदर । गळां गुंजांचे हार |
निडळीं चंदन शोभे परिकर । मिरवे नंदरायाचा किशोर ।।१।।
हातीं काठी खांदां कांबळीं । गाई राखे यमुनेचे पाबळी ।
नाचती गोपाळ धुमाळी। पृष्टी जाळी दहीभात ।।२।।
जें निगमांचे ठेवणें । सनकसनंदाचे घोसुलें येणें ।
शंभूचे आराध्यदैवत केणें । तें चारित. गोधने नंदाचीं ।।३।।
ऐसा अकळ नाकळें हरी । वेणू वाजवी छंदे नानापरी ।
एका जनार्दनीं वाटी शिदोरी गोपाळा ।।४।।

भावार्थ

चारभुजाधारी शामसुंदर नंदरायाच्या किशोराचे रूप घेऊन यमुनेच्या तीरावर गाई राखतो निडळावर चंदनाचा रेखीव टिळा,गळ्यांत गुंजांचे हार,खांद्यावर कांबळी,हातामध्ये काठी घेऊन वेणू वाजवितो.सभोवती गोपाळ आनंदाने नाचतात.शिवशंकराचे आराध्यदैवत,सनकादिक ऋषींचे ध्याननिधान,वेदांचे उगमस्थान असा हा वैकुंठीचा हरी कळूनही पूर्ण समजल्या सारखा.वाटत नाही. असे कथन करून एका जनार्दनीं म्हणतात, हा गोपवेषातील श्रीहरी गोपाळांना शिदोरी वाटतो.

१४३

राखीत गोधनें भक्तांचिया काजा । उणीव सहजा येवो नेदी।।१।।
आपुलें थोरपण सारूनी परतें । भक्तांचे आरुतें काम करी ।।२।।
उच्छिष्ट काढणें सारथ्य करणें । उच्छिष्ट तें खाणें तयांसवें ।।३।।
चुकतां वळतीआपण वोळणें । एका जनार्दनीं पुण्य धन्य त्यांचे।।४।।

भावार्थ

वैकुंठीचा राणा गोकुळांत भक्तांसाठी गोधने राखतो.यांत कोणतिही उणीव जाणवूं देत नाही. आपला थोरपणा बाजूला सारून भक्तांचे काम पूर्ण करतो. रथाचे सारथ्य करतो, उष्ट्या पत्रावळी उचलतो,उच्छिष्ट खातो.चुका सुधारून घेतो.असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात,या गोकुळवासी जनांचे पुण्य थोर असल्याने त्यांना हे भाग्य प्राप्त झाले.

१४४

न देखतां कृष्णवदन । उन्मळती तयांचे नयन ।
न घेती अन्नजीवन । कृष्णमुख न पाहताना ।।१।।
कोठें गुंतला आमुचा कृष्ण । ऐशी जया आठवण।
गायी हुंबरती अधोवदन । कृष्णमुख न पाहताना ।।२।।
सवंगडे ठायीं ठायीं उभे । कृष्णीं द्रष्टी ठेवुनी लोभें ।
आजी कृष्ण कांहो नये । आम्हांशीं खेळावया ।।३।।
ऐशी जयांची आवडीं। तयां पडो नेदी सांकडी ।
एका. जनार्दनीं उडी। अंगें घाली आपण ।।४।।

भावार्थ

गोपगड्यांना कृष्णाचे दर्श़न न झाल्यास त्यांचे डोळे आसवांनी भरून वाहू लागतात.ते अन्नपाणी सोडून देतात.कृष्ण कोठे गुंतला असेल या विचाराने अस्वस्थ होतात, त्याच्या आठवणीने व्याकुळ होतात.गाई खाली माना घालून हंबरतात. सवंगडी ठिकठिकाणी उभे राहून कृष्ण केव्हां खेळायला येईल याची वाट पहातात गोपगड्यांच्या या प्रेमभक्तीने ते कृष्णसख्याला एक क्षणही विसंबत नाहीत असे एका जनार्दनीं म्हणतात.

१४५

ज्याचें उदारपण काय वानुं । उपमेसी नये कल्पतरु कामधेनु ।
वेधी वेधियेलें आमुचे मनु । तो हा देखिला सांवळा श्रीकृष्ण ।।१ ।।
मंजुळ मंजुळ. वाजवी वेणू । श्रुतीशाखां न कळे अनुमानु ।
जो हा परापश्यंती वेगळा वामनु । तया. गोवळ म्हणती कान्हू ।।२।।
रुप अरुपाशीं नाही ठाव. । आगमांनिगमां न कळे वैभव ।
वेदशास्त्रांची निमाली हाव । एका जनार्दनीं देखिला स्वयमेव ।।३।।

भावार्थ

ज्याच्या औदार्याला कल्पतरू आणि कामधेनुची उपमा अपुरी पडेल त्या सांवळ्या श्रीकृष्णाने चित्त वेधून घेतले आहे. हा वामन अवतार परा,पश्यंती वाणींच्या पलिकडे रेअसून त्याचे अनुमान वेदश्रुतींना सुध्दां अनाकलनीय वाटते,अशा परब्रह्माला गोकुळचे गोप कान्हा म्हणतात.प्रेमभक्तीचे असे वर्णन करून एका जनार्दनीं म्हणतात,ज्याच्या रुपाचे.आणि वैभवाचे आकलन आगमानिगमाला होत नाही असा श्रीपती स्वयमेव याच देहीं याच डोळां पहावयास मिळाला .

१४६

मागे पुढे उभा हाती घेउनी काठी वळत्या धावे पाठीं गाईमागें ।।१।।
गोपाळ बैसती आपण धांवे राणा । तयाच्या वासना पूर्ण करी।२।।
वासना ते देवें जया दिली जैशी । पुरवावी तैसी ब्रीद साच ।।३।‌।
ब्रीद तें साच करावें आपुलें । म्हणोनियां खेळे गोपाळांत ।।४ ।।
एका जनार्दनीं खेळतो कान्हया । ब्रह्मादिका माया न कळेची ।।५।।

भावार्थ

वैकुंठीचा राणा हातांत काठी घेऊन गाईंच्या मागे पुढे उभा राहतो आणि वळत्या गाईंच्या पाठीमागे धावतो.गोपाळांच्या वासना पूर्ण करण्यासाठी त्यांना विश्रांती देवून आपण गाईंच्या मागे धावतो.मनांत वासना निर्माण करणारा देव त्यां वासना पुरवतो हे ब्रीद खरे करतो.देव भक्तांचे कोड पुरविण्यासाठी गोपाळां समवेत खेळ खेळतो. एका जनार्दनीं म्हणतात कान्हाची ही माया ब्रह्मादिदेवांना आकळत नाही.

१४७

तिन्हीं त्रिभुवनी सत्ता जयाची । तो गोपाळांचे उच्छिष्ट खाय ।।१।।
खाउनी उच्छिष्ट तृप्तमय. होय । यज्ञाकडे न. पाहे वांकुडें तोंडें. ।।३।।
ऐसा तो लाघव गोपाळांसी दावी । एका जनार्दनीं कांहीं कळों नैदी ।।३।।

भावार्थ

स्वर्ग पृथ्वी पाताळ या तिन्ही भुवनांत ज्याची सत्ता चालते तो गोपाळांचे उच्छिष्ट खाऊन तृप्त होतो.यज्ञयागाकडे दुर्लक्ष करतो. एका जनार्दनीं म्हणतात, गोपाळांविषयी श्रीहरीला जो आपलेपणा. वाटतो ते अनाकलनीय आहे.

१४८

न कळे लाघव तया मागें. धावें । तयाचे ऐकावें वचन देवें ।।१।।
देव तो अंकित भक्तजनांचा । सदोदित साचा मागें धांवे ।।२।।
गोपाळ आवडीं म्हणती कान्हया । बैसे याची छाया सुखरूप ।।३।।
सुखरूप बैसे वैकुंठीचा राव ।भक्ताचा. मनोभाव जाणोनियां ।।४।।
जाणोनियां भाव पुरवी वासना । एका जनार्दना शरण जाऊं ।।५।।

भावार्थ

वैकुंठीचा राजा गोपाळांच्या मागे धावतो,त्यांचे वचन ऐकून त्यांचा अंकित होतो.गोपाळ देवाला प्रेमाने कान्हा म्हणतात आणि भक्तांच्या मनांतिल भाव जाणून कान्हा त्यांच्या सर्व ईच्छा पूर्ण करतो. एका जनार्दनीं सद्गुरू जनार्दन स्वामींच्या चरणीं शरणागत होतात.

१४९

भक्तांचा पुरवी लळा । तो सांवळा श्रीकृष्ण ।।१।।
उचलिला पर्वतगिरी । नाथिला. काळ्या यमुनेतीरीं ।।२।।
अगबग. केशिया असुर । मारिला तो कंसासुर ।।३।।
उग्रसेन मथुरापाळ । द्वारका बसविलीं सकळ ।।४।।
द्वारकेमाजीं आनंदघन । शरण एका जनार्दन ।।५।।

भावार्थ

सांवळा श्रीकृष्ण भक्तांचे मनोरथ पूर्ण करण्यासाठी करांगुलीवर गोवर्धन पर्वत उचलतो.यमुनेचे पाणी विषारी बनवणार्या कालिया सर्पाचे मर्दन करतो.कशिया असुराचा वध करतो. कंसासुराला मारून उग्रसेनेला मथुरेच्या सिंहासनावर बसवतो.द्वारका नगरी वसवून प्रजेला आनंद देतो या आनंदघन श्रीकृष्णाला एका जनार्दनीं सर्वभावें शरण जातात.

१५०

कमळगर्भीचा पुतळा ।
पाहतां दिसे पूर्ण कळा ।
शशी लोपलासे. निराळा रुपासही ।।१।।
वेधक वेधक नंदनंदनु ।
लाविला अंगीं चंदनु ।
पुराणपुरुष पंचाननु ।
सांवळां कृष्ण ।।२।।
उभे पुढें अक्रुर उद्धव ।
मिळाले सर्व भक्तराव ।
पहाती मुखकमळभाव ।
नाठवे द्वैत ।।३।।
रूप साजिरें गोजिरें ।
दृष्टी पाहतां मन न पुरे ।
एका जनार्दनीं झुरे ।
चित्त तेथें सर्वदा ।।४।।

भावार्थ

भक्त प्रल्हादा साठी नृसिंह रूपानें अवतार धारण करणारा श्रीकृष्ण ब्रह्मदेवाच्या नाभिकमळांतून जन्मला असे या पुराणपुरूषाचे वर्णन विष्णुपुराणांत आढळते.चंद्राचे तेज ज्याच्या तेजापुढे फिके पडते असे याचे रूप सोळा कलांनी परिपूर्ण भासते.सर्वांचे लक्ष वेधून घेणार्या या नंदनंदनाने चंदनाची उटी अंगाला लावली आहे.या सांवळ्या श्रीकृष्णापुढे अक्रूर,उध्दवा समवेत सर्व भक्त उभे राहून त्याचे साजिरे,गोजिरे रूप डोळ्यांत साठवित आहेत. श्रीकृष्णरूपाचे असे यथार्थ वर्णन करून एका जनार्दनीं म्हणतात,या रूपाच्या दर्शनाने मनाची आस कधीच पुरी होत नाही चित्त सतत झुरत राहते.

१५१

जगाचें जीवन भक्तांचे मोहन । सगुण निर्गुण ठाण शोभतसें ।।१।।
तें रुप गोकुळीं नंदाचिये घरीं । यशोदे मांडीवरी खेळतसे ।।२।।
ईंद्रादी शंकर ध्यान धरती ज्याचे । तो. लोणी. चोरी गौळ्याचे घरोघरीं ।।३।।
सर्वांवरी चाले जयाची तें सत्ता । त्यासी. बागुल आला म्हणतां उगा राहे ।।४।।
एकाचि पदें बळी. पाताळीं घातला । तो उखळीं बांधिला यशोदेनें ।।५।।
जयाचेनी तृप्त त्रिभुवन. सगळें तो लोणियाचे गोळे मागून खाय।।६।।
एका जनार्दनीं भरुनी उरला । तो असे संचला विटेवरी ।।७।।

भावार्थ

निर्गुणरुपे जो विश्वाचे अधिष्ठान असून सगुणरुपाने भक्तांचे मनमोहन रूप गोकुळांत नंदाघरीं यशोदेच्या मांडीवर खेळत आहे. शिवशंकरासह इंद्रादि देव ज्याच्यासाठी ध्यानधारणा करतात तो गवळ्यांचे घरी लोणी चोरुन खातो. सर्वांवर ज्याची सत्ता चालते तो बागुलबुवा आला म्हणतांच उगा राहतो. ज्याने एका-पदाने दैत्यराजा बळीला पाताळांत ढकललें त्याला यशोदेने उखळाला बांधले.जो त्रिभुवनाची भूक भागवून तृप्त करतो तो गोकुळांत लोण्याचे गोळे मागून खावून संतोष पावतो. एका जनार्दनीं म्हणतात,जो अखिल विश्व केवळ दशांगुळे व्यापून उरला तो प्रेमभक्तीसाठी पंढरींत एका विटेवर उभा ठाकला आहे.

१५२

अर्जुनाचे रथीं श्रमला जगजेठी । म्हणोनी कर ठैउनी कटी उभा येथें ।।१।।
धरुनी गोवर्धन उभा सप्तदीन । म्हणौनि कर जघन ठेऊनी उभा ।।२।।
कंसादी मल्ल मारी जरासंघ । ते चरणविंद उभे विटे।।३।।
धर्माघरीं उच्छिष्टपात्र काढी करे । म्हणौनि श्रमें निर्धारिं ठेविलें कटीं कर ।।४।।
पुंडलिक भक्त देखौनि तल्लीन जाला एका जनार्दनीं ठेविला कटीं कर ।।५।।

भावार्थ

अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करुन थकल्यामुळे जगजेठी श्रीकृष्ण कर कटीवर ठेवून उभा आहे. गोकुळजनांवर गोवर्धन पर्वताचे छायाछत्र धरुन सात दिवस उभा राहून थकल्याने हात कंबरेवर ठेवून उभा आहे. कंसाच्या मल्लांचा पराभव करून आणि जरासंघाचा वध करुन जगजेठीचे हे वंदनीय चरण विटेवर उभे ठाकले आहेत.धर्मराजाच्या राजसूय यज्ञात उष्टी पात्रे उचलून श्रमपरिहारा साठी भकतवत्सल श्रीहरी करकटीं ठेवून उभा राहतो. एका जनार्दनीं म्हणतात,भक्त पुंडलिकाला पाहून तल्लीन झालेला श्रीकृष्ण पंढरींत कटीकर ठेवून उभे आहे.


पंढरी महात्म्य

१५३

जेथें वाजविला वेणु शुध्द ।म्हणोनि म्हणतीं वेणुनाद ।।१।।
सकळिक देव आले । तें भांवतीं राहीले ।।२।।
जोडिलें जेथें समपद । तया म्हणती विष्णुपद ।।३।।
भोवताली पदे उमटती । तेथें गोपाळ नाचती ।।४।।
जेथें उभे गाईंचे भार । ते अद्यापि दिसत खूर।।५।।
गोपाळांचीं पदें समग्र । ठाईं शोभत सर्वत्र ।।६।।
एका जनार्दनीं हरी शोभलें । कर कटावरीं ठेऊनि भले ।।७।।

भावार्थ

श्रीहरी जेथे उभा राहून वेणु वाजवित असे त्या स्थळाला वेणुनाद असे म्हणता. जेथें गोपाळ समचरण ठेवून उभे राहिलें,तेथे सकळ देव येऊन सभोवतालीं उभे राहिलें त्याला विष्णुपद म्हणतात. जेथें गाईंचे कळप उभे असून सभोवती गोपाळ नाचतात तेथे अजुनही गाईंचे खूर उमटलेलें दिसतात अशी भक्तांची श्रध्दा आहे. एका जनार्दनीं म्हणतात,पंढरींत दोन्ही कर कटावर ठेवून उभा असलेला पांडुरंग शोभून दिसतो.

१५४

द्वारका समुद्रांत बुडविली। परी पंढरी रक्षिली अद्यापि।।१।।
द्वारकेहूनि बहुत सुख । पंढरिये अधिक एक आहे ।।२।।
भीमातीरीं दिगंबर । करूणाकर. विठ्ठल ।।३ ।।
भक्तांसाठीं निरंतर । एका जनार्दनीं कटीं धरिले कर।।४।।

भावार्थ

द्वापार युगाच्या अंती श्रीकृष्णाने यादव कुळाचा नाश करून द्वारका समुद्रांत बुडविली असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, द्वारकेपेक्षां पंढरीचे सुख अपार आहे म्हणून पंढरीचे रक्षण करून करूणाकर विठ्ठल भीमातीरीं भक्तांसाठी कटीवर कर ठेवून निरंतर उभा आहे.

१५५

जाश्वनीळ सदां ध्याये ध्यानौं । बैसोनि स्मशानीं निवांतपणे ।।१।।
तें हें उघडें रुप विठ्ठल साचार । निगमाचे माहेर पंढरी हे ।।२।।
न बुडे कल्पांती. आहे ते संचले । म्हणोनी म्हणती भले वैकुंठ ।।३।।
एका जनार्दनीं कल्पपचे. निर्धारी । निर्विकल्प पंढरी. उरतसे ।।४।।

भावार्थ

नीळकंठ शिवशंकर स्मशानांत निवांतपणे ध्यानस्थ बसून विठ्ठलाचे पंढरपूरांत उभे ठाकलेले सगुण रुपआठवतात. असे कथन करुन एका जनार्दनीं म्हणतात,पंढरी हे वेदांचे माहेरघर असल्याने ते चारी युगांचे अंती (कल्पांती) देखील बुडणार नाही.म्हणुनच पंढरी पृथ्वीवरील वैकुंठ म्हणून ओळखले जाते.

१५६

जो हा उद्गार प्रसवे ओंकार । तें रुप सुंदर विटेवरी।।२।।
ध्याता ध्यान ध्येय जेथें पैं खुंटलें। तें रुप प्रगटलें पंढरीये।।२।।
ज्ञेय ज्ञाता ज्ञान प्रेमाचे आथिलें । तें रुप सानुलें पंढरिये।।३।।
एका जनार्दनीं रुपाचे रुपस । वैकुंठनिवास पंढरिये ।।४।।

भावार्थ

ज्या परब्रह्म रुपातून ओंकाराचा उगम झाला ते सुंदर रुप पंढरीत प्रगटरुपाने कर कटीवर ठेवून उभे आहे असे वर्णन करून एका जनार्दनीं म्हणतात,त्यां रुपाचे दर्श़न घेत असताना भाविकांचे चित्त त्या रुपाशी एकरुप होऊन जाते आणि पांडुरंग,(ध्येय) ध्यान करणारा भाविक आणि ध्यानाची क्रिया ही त्रिपुटी लयास जाते आणि तो पंढरीनाथ सारी पंढरी व्यापून उभा आहे अशी प्रचिती येते. हे सानुले रुप ज्ञेय,ज्ञाता,ज्ञान हे द्वैत संपवून परमात्म्याच्या भक्तीप्रेमाचा अवीट आनंद देते.

१५७

जाश्वनीळ सदां ध्याये ध्यानीं मनीं । बैसोनि स्मशानीं निवांतपणें ।। १।।
तें हें उघडें रुप विठ्ठल साचार । निगमाचें माहेर पंढरी हे ।।२।।
न बुडे कल्पांती आहे ते संचले। म्हणोनी म्हणती भले. भूवैकुंठ ।।३।।
एका जनार्दनीं कल्पाचें निर्धारी । निर्विकल्प पंढरी उरतसे ।।४।।

भावार्थ

समुद्रमंथनातून निघालेले विष प्राशन केल्याने जे जाश्वनीळ या नावाने ओळखले जातात ते शिवशंकर निवांतपणे स्मशानांत ध्यानस्थ बसून विठ्ठलरुपाचे ध्यान लावतात,त्यां वेदरुपी पांडुरंगाचे पंढरी हे माहेरघर असल्याने ते कल्पांती देखील बुडणार नाही.असा विश्वास व्यक्त करून एका जनार्दनीं म्हणतात,पंढरी हे भुतलावरील वैकुंठ असून कल्पाचे अंती केवळ निर्विकल्प पंढरी उरणार आहे.

१५८

रमा रमेश मस्तकीं हर । पुढें तीर चंद्रभागा ।।१।।
मध्यभागीं पुंडलिक । सुख अलोलिक न वर्णवे ।।२।।
बहुता वैष्णवांचा मेळ । गदारोळ नामाचा ।। ३।।
वामभागीं रुक्मिणी राही । जनार्दन तेथे पाही ।।४।।

भावार्थ

चंद्रभागेच्या तीरावर लक्ष्मीसह विष्णु मध्यभागीं भक्त पुंडलिका समवेत उभे ठाकले आहेत.या पंढरीचे सुख असामान्य असून वर्णंन करणे शब्दातीत आहे.अगणित वैष्णवजन जमले असून नामाचा अखंड जयघोष सुरु आहे.विठ्ठलाच्या डाव्या बाजूला रुक्मिणी विराजित आहे.एका जनार्दनीं हे विलोभनीय दृष्य अवीट गोडीने अवलोकन करतात.

१५९

सारांचें सार गुह्याचें निजगुह्य । तें हें उभें आहे पंढरीये।।१।।
चहूं वाचांपरते वेदां जे आरुतें । तें उभे आहे सरते पंढरीये ।।२।।
शास्त्रांचें निज सार निगमा न. कळे पार । तोचि हा. परात्पर पंढरीये ।।३।।
एका जनार्दनीं भरूनि उरला । तोचि हा देखिला पंढरीये ।।४।।

भावार्थ

विश्र्वातील सर्व चिरंतन तत्वाचे जे आत्मतत्व,गुढरम्य तत्वातील गहन तत्व पांडुरंग रुपाने पंढरींत उभे असून वैखरी,मध्यमा,परा,पश्यंती या चारी वाणी या रुपाचे यथार्थ वर्णन करु शकत नाही.साही शास्त्रांचे सार असून जे वेदांना देखिल अनाकलनीय आहे.एका जनार्दनीं म्हणतात,सर्व विश्व व्यापून जो उरला त्या परात्पर विठ्ठलाचे दर्श़न पंढरींत घडते.

१६०

गाई गोपांसमवेत गोकुळींहून आला । पाहूनि भक्तीं भुलला वैष्णवाला ।।१।।
मुगुटमणी धन्य पुंडलिक निका । तयालागीं देखा उभा गे माय ।।२।।
युगें अठ्ठावीस झालीं परी न बैसे खालीं । मर्यादा धरली प्रेमाची गे माय ।। ३।।
ऐसा व्यापक जगाचा जीवन । एका जनार्दनीं शरण गे माय ।।४।।

भावार्थ

गाई आणि गोपाळांचे सवंगडी यांच्या समवेत गोकुळाहून श्रीहरी पंढरींत आले.भक्तशिरोमणी पुंडलिकाच्या भक्तीला भुलून त्याच्यासाठी विटेवरी कर कटीवर ठेवून निरंतर अठ्ठाविस युगे उभा आहे.एका जनार्दनीं म्हणतात, प्रेम भक्तीचा आदर करणार्या या विश्वव्यापी जगज्जीवन परब्रह्माला शरण जातो.

१६१

जयाकारणें श्रमले भांडती । वेदादिकां न कळे मती ।
वोळला सगुण मूर्ती । पुंडलिका कारणें ।।१।।
धन्य धन्य पावन देखे । पुण्यभूमि पावन सुरेख ।
तया गातां होतसै हर्ष । प्रेमानंदें डुल्लती ।।२ ।।
एका जनार्दनीं. शरण । पाहतां पाहतां वेधलें मन ।
मोक्ष मुक्ति कर जोडून । उभे तिष्ठती सर्वदा ।।३ ।।

भावार्थ

निर्गुण निराकार परमात्मा भक्त पुंडलिकालाच्या भावभक्तीला भुलून सगुण साकार रुप धारण करतो याचे रहस्य जाणून घेण्यासाठी साहीशास्त्रे वादविवाद करून थकून जातात,वेदांची मती कुंठित होते.तो भक्तराज पुंडलिक धन्य होय असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात,पंढरीची ही पुण्यपावन भूमी अतिशय सुंदर असून या भूमीचे वर्णन करतांना मन प्रेमानंदाने डोलू लागते. भाविकांना मोक्ष आणि मुक्ती प्रदान करण्यासाठी परमात्मा कर जोडून उभे ठाकले आहेत.

१६२

उदंड भक्त भाग्यवंत देखिले । परी निधान दाविलें पुंडलिकें ।।१।।
धन्य धन्य केला जगाचा उध्दार । नाहीं लहानथोर निवडिले.।।२।।
एका जनार्दनीं. दावियेला तारू। सुखाचा. आगरू. विठ्ठल देव ।।३।।

भावार्थ

भगवंताचे अनेक भाग्यवंत भक्त होवून गेले परंतु पुंडलिक सर्वश्रेष्ठ भक्त मानले जातात कारण पुंडलिकांनी लहान थोर असा भेदाभेद न करता,परब्रह्म परमात्म्याचे विठ्ठलाचे दर्शंन सर्व भक्तांना घडवून जगाचा उध्दार केला.संसार सागर पार करून मोक्षाची प्राप्ती करून देणारा तारु, केवळ सुखाचे आगर असा पांडुरंग नजरेसमोर आणून उभा केला या शब्दांत एका जनार्दनीं आपली कृतज्ञता आदरपूर्वक. व्यक्त करतात.


१६३

पंढरीचें सुख. पुंडलिक जाणें । येर सोय नेणें तेथील पैं ।।१।।
उत्तम हें स्थळ तीर्थ चंद्रभागा । स्नाने पावन. जगा करितसे ।।२।।
मध्यभागीं शोभे पुंडलीक मुनी । पैल ते जघनीं कटीं कर ।।३।।
एका जनार्दनीं विठ्ठल बाळरुप । दरूशनें ताप हरे जगा ।।४।।

भावार्थ

पंढरी हे उत्तम तीर्थक्षेत्र असून चंद्रभागेच्या पाण्याने स्नान करून भक्त पावन होतात. जगातील सर्व लहान थोरांची पापे धुतली जातात पंढरीचे सुख भक्तराज पुंडलिक पुर्णाशाने जाणू शकतो मध्यभागीं पुंडलिक मुनी उभे असून समोर विठ्ठल कमरेवर कर ठेवून सान रुपांत तिष्ठत उभे राहिले आहेत.केवळ दर्शनाने जगाचा संसार ताप हरण करीत आहेत असे एका जनार्दनीं सांगतात.

१६३

वैकुंठीचें वैभव पंढरीसी आलें । भक्तें सांठविलें पुंडलिके ।।१।।
बहुतांसी लाभ देतां घेतां जाहला । विसावा वोळला. पांडुरंग ।।२।।
योग याग साधनें करिती जयालागीं । तो उभाचि भक्तालागीं तिष्ठतसे ।।३।।
हीन दीन पापी होतुका भलते याती । पाहतां विठ्ठलमूर्ती मुक्त होती ।।४।।
एका जनार्दनीं सुखाचें माहेर । बरवें भीमातीर उत्तम तें ।।५।।

भावार्थ

वैकुंठाचे स्वामी भक्तीप्रेमाने पंढरींत आले आणि भक्तराज पुंडलिकासाठी अठ्ठविस युगे कर कटावर ठेवून विटेवर उभे आहेत असा भाविकांचा विश्वास आहे. पांडुरंग दर्शनाचा लाभ होऊन मोक्षाचा मार्ग सोपा होतो अशी भक्तांची श्रध्दा आहे.पाप,पुण्य, गरीब, श्रीमंत, उच्च-नीचता असा भेदाभेद न मानता सर्वसमावेशक असा हा भागवत धर्म सुखाचे माहेर आहे असे एका जनार्दनीं म्हणतात.

१६४

तीन अक्षरीं जप पंढरी म्हणे वाचा । कोटी या जन्माचा शीण जाय ।।१।।
युगायुगीं महात्म्य व्यासे कथियेलें । कलियुगींकेलें सोपें पुंडलिकें ।।२।।
महा पापराशी त्यांची होय होळी। विठ्ठलनामें टाळी वाजवितां ।।३।।
एका जनार्दनीं घेतां पै दर्शन । जड जीवा उध्दरण कलियुगीं ।।४।।

भावार्थ

पंढरी या तीन अक्षरी नामाचा जप केला असतां जन्म-मरणाच्या फेर्यातून सुटका होते असा पंढरीचा महिमा महाभारतकार महर्षी व्यासांनी सांगितला आहे.कलियुगांत भक्त पुंडलिकाच्या पुण्याईने हा मार्ग सोपा झाला आहे. विठ्ठल नामाचा टाळी वाजवत गजर केला असतां महा पापराशी लयास जातात असा पंढरीचा महिमा वर्णन करून एका जनार्दनीं म्हणतात, कलियुगांत पांडुरंगाच्या दर्शनाने जड जीवांचा उध्दार होतो.

१६५

अनुपम्य सप्तपुय्रा त्या असती । अनुपम्य त्या वरती पंढरीये ।।१।।
अनुपम्य तीर्थ सागरादि असती । अनुपम्य सरती पंढरिये ।।२।।
देव उदंडे असती । अनुपम्य विठ्ठलमूर्ति पंढररिये ।।३।।
अनुपम्य संत वैष्णवांचा. मेळ । अनुपम्य गदारोळ पंढरिये ।।४।।
अनुपम्य शरण एका जनार्दनीं। अनुपम्य चिंतनीं डुल्लतसे ।।५।।


भावार्थ

अयोध्या,मथुरा,माया,काशी,कांची,अवंतिका आणि द्वारका या सात नगरी मोक्षदायिका मानल्या जातात. तसेच कन्याकुमारी सारखी अनेक अनुपम तीर्थक्षेत्रे भारतात आहेत परंतु पंढरीचे तीर्थस्थान सर्वांत वरती आहे.या अध्यात्मिक देशांत अनेक देव देवतांची भव्य दिव्य मंदिरे आहेत पण पंढरीची विठ्ठलमुर्ती अनुपम आहे. आषाढी कार्तिकेला येथे भरणारा वैष्णवांचा मेळावा, हरीनामाचा गदारोळ,काळ- चिपळ्यांचा गजर यांना इतर कशाची उपमा देता येत नाही. असे वर्णन करुन एका जनार्दनीं म्हणतात, हरीचरणांशी शरणागत होऊन या नामगजरांत तल्लीन होऊन जाण्यासारखे दुसरे सुख नाही.

१६६

अनुपम्य वास पंढरीस ज्याचा । धन्य तो दैवाचा अनुपम्य ।।१।।
अनुपम्य घडे चंद्रभागे स्नान ।अनुपम्य दान नाम वाचे ।।२।।
अनुपम्य घडे क्षेत्र प्रदक्षिणा । अनुपम्य जाणा नारीनर ।।३।।
अनुपम्य सोहळा नित्य दिवाळी । अनुपम्य. वोवाळी विठोबासी ।।४।।
अनुपम्य शरण एका जनार्दनी । अनुपम्य ध्यानीं एक नाम ।।५।।

भावार्थ

पंढरीचा निवास आणि चंद्रभागेचे स्नान हे केवळ दैवयोगाने लाभणार्या गोष्टी आहेत. या तीर्थक्षेत्राची प्रदक्षिणा विठ्ठलाच्या नामघोषांत तल्लीन होऊन नाचण्यातला आनंद ज्या स्त्री- पुरुषांना मिळतो ते भाग्यवान समजले जातात.आषाढी कार्तिकी एकादशीचा सोहळा म्हणजे वारकर्यांसाठी नित्य आनंदाची दिवाळी असते.त्यांच्या ध्यानीमनीं विठ्ठल मुर्तीशिवाय आणि वाणींत विठ्ठल नामाशिवाय अन्य कांहीच नसते.विठ्ठल चरणांशी अनन्य भक्तीने शरणागत होतात.असे एका जनार्दनीं म्हणतात.

१६७

अनुपम्य पुराणें सांगती सर्वथा । अनुपम्य तत्वतां पंढरिये ।।१।।
अनुपम्य योग. अनुपम्य याग । अनुपम्य अनुराग पंढरिये ।।२।।
अनुपम्य ध्यान अनुपम्य धारणा ।अनुपम्य पंढरीराणा विटेवरी ।।३।।
अनुपम्य क्षेत्र तीर्थ तें पवित्र । अनुपम्य गोत्र उध्दरती ।।४।।
अनुपम्य शरण एका जनार्दनीं । अनुपम्य. भुवनीं नांदतसे ।।५।।

भावार्थ

पंढरीचे परब्रह्म तत्व केवळ अनुपम असे वर्णन पुराणे करतात. पंढरीत होणारे योग, याग, भक्ती रसातील अनुराग हे कल्पनातीत पुण्यफल देणारे आहेत.विटेवर उभे असलेल्या पांडुरंगाची ध्यान-धारणा अनुपम शांती प्रदान करणारी आहे.पंढरी हे भुतलावरील अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र भक्तांच्या संपूर्ण गोत्राचा उद्धार करणारे आहे.असे वर्णन करुन एका जनार्दनीं या पुण्यक्षेत्राला अनन्यभावें शरण जातात.

१६८

अनुपम्य ज्ञान अनुपम्य मतें । अनुपम्य सरतें पंढरिये ।।१।।
अनुपम्य वेद अनुपम्य शास्त्र। अनुपम्य पवित्र पंढरिये ।।२।।
अनुपम्य भक्ति अनुपम्य मुक्ति। अनुपम्य वेदोक्ती पंढरिये।।३।।
अनुपम्य कळा अनुपम्य सोहळा । अनुपम्य जिव्हाळा पंढरिये ।।४।।
अनुपम्य दया अनुपम्य शांती ।अनुपम्य विरक्ती एका जनार्दनीं ।।५।।

भावार्थ

चारी वेद आणि साही शास्त्रे यांच्यातून मिळणार्या प्रगाढ ज्ञानाच्या तुलनेत भेदाभैद न मानता सर्वांना आपुलकीने जवळ करणार्या भागवत धर्माचे ज्ञान अनुपमेय आहे. पंढरींत पहावयास मिळणारी भोळी भाबडी भक्ति,आपपर भाव न ठेवता एकमेकांविषयी वाटणारा जिव्हाळा, विठ्ठलभक्तिचा सोहळा अतुलनीय आनंद देणारा आहे. मनामध्यें दया, शांती, निर्माण करुन, चित्तशुध्दी करुन विरक्तीच्या मार्गाने मुक्ति मिळवून देणार्या पंढरीचा महिमा अनुपमेय असे एका जनार्दनीं या अभंगात म्हणतात.

१६९

पंचक्रोशीचें आंत । पावन तीर्थ हें समस्त ।।१।‌।
धन्य पंढरीचा महिमा । नाहीं द्यावया उपमा ।।२।।
तीर्थ क्षेत्र देव । ऐसा नाहीं कोठें ठाव ।। ३।।
नगर प्रदक्षिणा । शरण एका जनार्दनी ।।४।।

भावार्थ

गुरू पदाला शरणागत होऊन एका जनार्दनीं म्हणतात, पैठणच्या जवळपास वसलेले.पंढरपुर हे पावन तीर्थ आहे.वेदमूर्ती पांडुरंग, पुंडलिका सारखा श्रेष्ठ भक्तराज आणि चंद्राकृती भीमेचे पावन तीर्थ हे तिन्ही एका ठिकाणीं एकवटलेले असे हे एकमेव अद्वितीय तीर्थस्थान आहे.

१७०

प्रयागादि क्षेत्रें आहेत कल्पकोडी । तया आहे खोडी एक एक ।।१।।
मुंडन ती काया निराहार. राहणें। येथें न मुंडणें काया कांहीं ।।२।।
म्हणोंनी सर्व तीर्थामाजीं उत्तम ठाव ।एका जनार्दनीं जीव ठसावला ।।३।।

भावार्थ

प्रयाग,वाराणसी, हरिद्वार या सारखी कोट्यावधी तीर्थक्षेत्रे या भूतलावर आहेत.परंतु प्रत्येकांत कांहीतरी उणीव आहे. काशीला जाऊन डोक्यावरील केसांचे मुंडन करावे लागते असा रिवाज आहे तर दुसरीकडे केवळ गंगाजल प्राशन करून निराहार राहावे लागते.पण पंढरीला असे कोणतेही बंधन नाही.केवळ भक्तिप्रेमांत बुडून आनंदाने विठ्ठलाच्या नामघोषांत तल्लीन होऊन नाचणे हे च अपेक्षित असते.म्हणुन एका जनार्दनीं म्हणतात,पंढरी सर्व तीर्थात उत्तम स्थळ असून तेथे जीव अडकून पडतो. पंढरीच्या वारीचे वेध लागतात.

१७१

बहुत तीर्थ क्षेत्रें बहुतापरी। न पावती सरी पंढरीची।।१।।
वाहे दक्षिणभाग भीमा । पैल परमात्मा विटेवरी ।।२।।
मध्य स्थळीं पुंडलिक । दरूशनें देख उध्दार ।।३।।
वाहे तीर्थ चंद्रभागा ।देखतां भंग पातकां ।।४।।
एका जनार्दनीं सार । क्षराक्षर पंढरी हे ।।५।।

भावार्थ

अनेक देवस्थाने,अनेक तीर्थस्थाने आहेत पण त्यांना पंढरीची सर नाही.उजवीकडे अर्धचंद्राकृती भीमेचे पात्र आणि पलिकडे विटेवर उभा असलेला परमात्मा,मध्यभागीं भक्त पुंडलिक. यांच्या दर्शनाने सर्व पातके समूळ नाहीशी होतात. भाविकांचा उध्दार होतो असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात,पंढरी हे अविनाशी तीर्थक्षेत्र असून पांडुरंग दर्शन हे जीवनाचे सार आहे.

१७२

उदंड तीर्थे क्षेत्रें पाहतां दिठीं । नाही सृष्टीं तारक ।।१।।
स्नानें पावती मुक्ति जगा । ऐशी चंद्रभागा समर्थ ।।२।।
पुंडलिका नमस्कार । सकळ पूर्वजां ऊध्दार ।।३ ।।
पाहतां. राऊळाची. ध्वजा । मुक्ती सहजा. राबती ।।४।।
एका जनार्दनीं विठ्ठल भेटी । मग लाभा. नये तुटी ।।५ ।।

भावार्थ

अनेक तीर्थै आणि अनेक क्षेत्रांचे दर्शन घेतले पण पंढरीसारखे चराचर सृष्टीला तारक असे दुसरे क्षेत्र अनुभवास आले नाही. चंद्रभागेचे सामर्थ्य असे कीं, ती केवळ जल-स्नाने मुक्ति प्रदान करते. भक्त पुंडलिकाला साधा नमस्कार केला असतां सकळ पूर्वजांचा उध्दार होतो.पंढरीनाथाच्या मंदिरावरील ध्वजा भाविकांना संसार-तापातून मुक्त करते. असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, विठ्ठभेटी पासून केव्हढां लाभ होत असेल याची कल्पना च करतां येणे शक्य नाहीं.

१७३

सकळिक तीर्थे पाहतां डोळां। निवांत नोहे हृदयकमळा।।१।।
पाहतां तीर्थ चंद्रभागा । सकळ दोष गेले भंगा ।।२।।
पाहतां विठ्ठल सांवळा । परब्रह्म डोळां देखियेलें ।। ३।।
एका जनार्दनीं पाहोनि ध्यान । भुललें मन त्या ठायीं ।।४।।

भावार्थ

सकळ तीर्थे पाहून झाली पण अंत:करणाला निवांतपणा लाभला नाही. चंद्रभागा तीर्थ पहातांच सगळ्या दोषांचे निराकरण झाले. सावळ्या विठ्ठलाचे रूपाने प्रत्यक्ष परब्रह्म डोळयांना दिसलें. पांडुरंगाचे ध्यान लागले, मन तेथेच गुंतून गेले. असा दर्शन सुखाचा अनुभव एका जनार्दनीं या अभंगात वर्णन करतात.

१७४

अवघें परब्रह्म क्षेत्र । अवघें तेथें तें पवित्र ।।१।।
अवघा पर्वकाळ । अवघे दैवाचे सकळ ।२।।
अवघीयां दु:ख नाहीं। अवघें सुखचि. तया ठायीं ।।३।।
अवघें आनंदभरित । एका जनार्दनीं सदोदित ।।४।।

भावार्थ

पंढरी हे परब्रह्म क्षेत्र असून येथे सदैव पर्वकाळ पर्वणी असून पवित्र वातावरणाने परिसर भरून गेलेला असतो.सगळेच पंढरीवासी अत्यंत भाग्यवान असून येथे दु:खाचा लवलेश नसलेले निरामय सुख नांदते.पंढरीच्या आनंदभरित वातावरणाचे वर्ण़न एका जनार्दनीं या अभंगात करतात.

१७५
नाभीकमळीं जन्मला ब्रह्मा । तया न कळे महिमा ।।१।।
पंढरी क्षेत्र हें जुनाट । भूवैकुंठ साजिरीं ।।२।।
भोळे भाळे येती आधीं । तुटली उपाधी तयांची ।।३।।
एकपणे रिगतां शरण । एका जनार्दनी तुटे बंधन ।।४।।

भावार्थ

श्री भगवान विष्णूंच्या नाभीकमळातून ब्रह्मदेव उत्पन्न झाले परंतू त्यांना देखील या परब्रम्ह परमात्म्याचा महिमा आकलन होत नाही, असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, पंढरी क्षेत्र पुरातन असून अत्यंत पवित्र असे पृथ्वीवरील दुसरे वैकुंठच आहे. परमार्थाचे विशेष ज्ञान नसलेले पण भोळ्याभाबड्या भक्तीरसांत तल्लीन होऊन विठ्ठलनामाचा गजर करणार्या भाविकांच्या सगळ्या उपाधी तुटून जातात. पंढरीनाथाशी एकरुप होऊन शरणागत झाल्याने जन्म-मरणाची सारी बंधने लयास जातात.

१७६

बहुत काळाचे हें क्षेत्र । सकळ देवांचे माहेर ।
सकळ संतांचे निजमंदीर । तें हें पंढरपूर जाणावें ।।१।।
धन्य पंढरीचा महिमा । नाहीं आणिक. उपमा ।
जेथें वास पुरषोत्तमा । रुक्मिणी सहित सर्वदा ।।२।।
धन्य भक्त पुंडलिक । सकळ संतांचा नायक ।
एका जनार्दनीं देख। श्री विठ्ठल आवडी ।।३।।

भावार्थ

सर्व देवांचे माहेर (विश्रांतीचे स्थान )संतांच्या उपासनेचे मंदीर म्हणुन नावाजलेले पंढरपूर हे पुरातन तीर्थ क्षेत्र आहे. पुरषोत्तम भगवान श्रीकृष्ण येथे माता रुक्मिणी सहित सर्वदा निवास करुन आहेत. सर्व संतांचा शिरोमणी असा भक्त पुंडलिक धन्य आहे. पंढरीला केवळ पंढरीचीच उपमा शोभून दिसते ,अन्य नाही. असे एका जनार्दनीं म्हणतात.

१७७

ज्या सुखा कारणें योगाभ्यास । शरीर दंड काया क्लेश।
तें उभें आहे अपेस । भीमातीरीं वाळुवंटीं ।।१।।
न लगे दंडन मुंडनीं आंटी । योगायोगाची कसवटी ।
मोकळी राहाटी । कुंथाकुंथी नाही येथें ।। २।।
न लगे अष्टांग धूम्रपान । वायु आहार पंचाग्नि साधन ।
नग्न मौन एकांत स्थान आटाआटी न करणें ।।३ ।।
धरूनियां संतसंग। पाहें पाहें पांडुरंग ।
देईल सुख अव्यंग । एका जनार्दनीं निर्धारें ।।४।|

भावार्थ

परब्रह्म परमेशाच्या दर्शनसुखाचा लाभ होण्यासाठी योगी अष्टांग योगाची साधना करतात. देहाला क्लेश देवून उग्र तपश्चर्या करून देह झिजवतात. केवळ वायु भक्षण करुन निराहार पंचांग्नि साधन करतात.एकांत ठिकाणी केवळ वल्कले परिधान करून एका पायावर उभे राहून तप करतात. तो परमात्मा पुंडलिकाच्या प्रेमभक्तिसाठी वैकुठाचा त्याग करून भीमातीरीं वाळवंटी येऊन भक्तिसुखांत दंग होतो. येथे दंडमुंडन ,योग याग , यांचा अट्टाहास नाही. एका जनार्दनीं म्हणतात, केवळ संत- सहवासांत पांडुरंगाच्या दर्शंन सुखाचा लाभ हे च पंढरीचे अमाप वैभव आहे.मोकळे जीवन दर्शन आहे.

१७८

जप तपें तपतां कोटी । होती हिंपुटी भाग्यहीन ।।१।।
तया विश्रांतिसी स्थान । पंढरी जाण भूमंडळीं ।।२।।
योगायोग धूम्रपान करिती । नोहे प्राप्ति तयासी ।।३।।
तो उभा कटीं कर ठेवुनी । समचरणीं विटेवरी ।।४।।
एका जनार्दनीं पाहतां दिठीं । कंदर्प कोटी वोवाळिजे ।।५।।

भावार्थ

अनेक कोटींचा विठ्ठल नामाचा जप करुन, अष्टांग योगाची साधना करुन, यज्ञ, धुम्रपान अशी कडक तपश्चर्या करुनही कांहीं भाग्यहीनांना परमेश्वर प्राप्ति होत नाही.तो परमात्मा पुंडलिकाच्या भक्तीला भुलून विटेवरी कर कटी ठेवून निरंतर समचरणी उभा आहे. एका जनार्दनीं म्हणतात, केवळ एका दर्शनानेच भाविकांची कोटी जन्माची पातके समूळ नाहीशी होतात.

१७९

जें देवा दुर्लभ स्थान । मनुष्यासी तें सोपें जाण ।।१।।
या ब्रंह्मांडामाझारीं । सृष्टी जाणावी पंढरी ।।२।।
एक एक पाऊल तत्वतां । घडे अश्वमेध पुण्यता ।।३।।
एका जनार्दना साठी । विठ्ठल उभाचि सरसा ।।४।।

भावार्थ

एका जनार्दनीं म्हणतात, या ब्रह्मांडामध्यें जे स्थान देवांनाही मिळणे कठीण , ते सामान्य माणसाला अत्यंत सुलभ आहे असे तीर्थक्षेत्र म्हणजे पंढरी . पंढरीच्या वाटेवरील एक एक पाऊल वारकर्यांना अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य मिळवून देते यांत शंका नाहीं. संतासाठी आणि भक्तांसाठीं विठ्ठल निरंतर समचरणी उभा आहे.

१८०

व्यास वाल्मिक नारद मुनी । नित्य चिंतिति चिंतनीं ।
येती पंढरपुरभुवनीं । श्रीविठ्ठल दरुशना ।।१।।
मिळोनि सर्वांचा मेळ । गायी नाचती कल्लोळ ।
विठ्ठल स्नेहाळ। तयालागीं पहाती ।।२।।
करिती भिवरेचे स्नान।पुंडलिका अभिवंदन।
एका जनार्दनीं स्तवन । करिती विठ्ठलाचे।।३।।

भावार्थ

रामायणकर्ते ब्रह्मर्षी वाल्मिक,महाभारतकार व्यासमुनी, नारद मुनी आपल्या चिंतनांत पंढरपुर भुवनीं येऊन विठ्ठल दर्शनाची अभिलाषा करतात. पंढरीला जमलेले वैष्णव आणि गाईंचे कळप वाळवंटी नाचत हरिनामाचा गजर करतात , भक्तिप्रेमांत रंगलेल्या श्रीहरीचे दर्शन घेतात. भिमा नदीत स्नान करतात, भक्त पुंडलिकाला नमस्कार करतात, विठ्ठलाची स्तवने ,संतांचे अभंग गातात. पंढरीच्या वारीचे असे वर्णन संत एकनाथांनी या अभंगात केले आहे.

१८१

देखोनिया देवभक्त । सनकादिक आनंदात ।।१।।
म्हणती जावें पंढरपुरा । पाहूं दीनांचा सोयरा ।।२।।
आनंदें सनकादिक । पाहूं येती तेथें देख ।।३।।
विठ्ठलचरणीं शरण एका जनार्दनीं ।।४।।

भावार्थ

देवभक्तांचा आनंदमेळा अवलोकन करून सनकादिक मुनी हर्षभरित होतात. दीन-दुबळ्या भाविकांचा सखा श्रीहरीला पाहण्यासाठी पंढरीला येतात. पंढरीचा तो सोहळा पाहून विठृठलचरणीं लीन होतात. एका जनार्दनीं विठ्ठलचरणांशी शरणागत होतात.

१८२

देव भक्त एके ठायीं । संतमेळ तया गावीं ।।१।।
तें हें जाणा पंढरपूर । देव उभा विटेवर ।।२।।
भक्त येती लोटांगणीं । देव पुरवी मनोरथ मनीं ।।३।।
धांवे सामोरा तयासी । आलिंगून क्षेम पुसी ।।४।।
ऐशी आवडी मानी मोठी । एका जनार्दनीं घाली मिठी।।५।।

भावार्थ

देव,भक्त आणि संतांचा मेळावा जेथे एका ठिकाणी बघायला मिळतो असे एकमेव क्षेत्र म्हणजे पंढरी हे जाणून घ्यावे असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, विटेवर उभा असलेल्या देवापुढे नतमस्तक होण्यासाठी भाविक लोटांगणे घालित येतात. देव भक्तांना सामोरे जाऊन प्रेमभराने आलिंगन देतो, त्यांचे क्षेमकुशल विचारतो. भक्तांच्या मनोकामना जाणून त्या पूर्ण करतो. देव भक्तांचे हे प्रेम पाहून आनंदाने मिठी माराविशी वाटते.

१८३

उभारूनी बाह्या पाहतसे वाट। पीतांबर नीट सांवरूनी।।१।।
आलीयासी इच्छा मिळतसे दान । जया जें कारण पाहिजे तें।।२।।
भुक्ति मुक्ति तेथें लोळती अंगणीं । कोण तेथें मनीं वास नाहीं ।।३।।
कामधेनू कल्पतरू चिंतामणी । लोळती अंगणीं पंढरीये ।। ४।।
एका जनार्दनीं महालाभ आहे । जो नित्य न्हाये चंद्रभागे ।।५।।

भावार्थ

भाविकांच्या सर्व कामना पूर्ण करणारे कल्पतरू (सर्व ईच्छा पूर्ण करणारा वृक्ष),ईच्छिले फळ देणारा चिंतामणी , मनाच्या कामना पूर्ण करणारी कामधेनू ज्या पंढरीत सहजसुलभ आहेत तेथे प्रत्यक्ष पांडुरंग पीतांबर सावरून आणि बाहु उभारून ईच्छादान देण्यास उभा आहे. पंढरीस आलेल्या प्रत्येक भक्ताला ,त्याच्या मनाप्रमाणे दान देण्याचा भगवंतांच्या संकल्प आहे असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, चंद्रभागेच्या पात्रात नेहमी स्नान करणार्या भक्तांसाठी हा महालाभ आहे.

१८४

जो परात्पर परेपरता। आदि मध्य अंत नाही पाहतां ।
आगमानिगमां न कळे सर्वथा। तो पंढरिये उभा राहिला।।१।।
धन्य धन्य पांडुरंग । भोवतां शोभें संतसंग ।
धन्य भाग्याचे जे सभाग्य । तेचि पंढरी पाहती ।।२।।
निरा भिवरापुढे वाहे। मध्यें पुंडलिक उभा आहे।
समद्ष्टी चराचरी विठ्ठला पाहे । तेचि भाग्याचे नारीनर ।।३।।
नित्य दिवाळी दसरा । सदा आनंद पंढरपुरा ।
एका जनार्दनीं निर्धार । धन्य भाग्याचे नारीनर ।।४।।

भावार्थ

जो परात्पर परमात्मा वैखरी, मध्यमा, पश्यंती या सह परा वाणीच्या पलिकडे ब्रह्मलोकांत निवास करतो, ज्याचा आदि,मध्य आणि अंत वेदशास्त्रांना आकलन होत नाही तो भक्तिप्रेमाने पंढरींत उभा आहे. संतांच्या मेळाव्यात उभा असलेला पांडुरंग धन्य होय. ज्या भक्तांचे भाग्य थोर त्यांनाच पंढरीचे दर्शन घडते. असे वर्णन करुन एका जनार्दनीं म्हणतात, निरा आणि भीमा नदीच्या प्रवाहासमोर भक्तराज पुंडलिक उभा असून चराचर सृष्टींत भरुन राहिलेल्या विठ्ठलाचे समदृष्टीने अवलोकन करीत आहे. पंढरीत नित्यानंद देणारा दिवाळी दसरा साजरा होतो. येथील रहिवासी भाग्यवान आहेत.

१८५

तया ठायीं अभिमान नुरे । कोड अंतरीचें पुरे ।।१।।
तें हें जाणा पंढरपुर । उभा देव विटेवरी ।।२ ।।
आलिंगनें काया । होतसे तया ठाया ।।३।।
चंद्रभागे स्नान । तेणें पूर्वजा उध्दरण ।।४।।
एका जनार्दनीं शरण । पंढरी भूवैकुंठ जाण।।५।।

भावार्थ

जेथे देहबुध्दी, मनातिल अहंकार लयास जाऊन अंतरीच्या ईच्छा पूर्ण होतात असे तीर्थक्षेत्र म्हणजे पंढरी! येथे भक्त पुंडलिकासह सर्व भक्तांना आलिंगन देण्यासाठी देव विटेवरी उभा आहे. चंद्रभागेच्या स्नानाच्या पुण्याईने भक्तांच्या पूर्वजांचा उध्दार होतो. एका जनार्दनीं विठ्ठलचरणी शरणागत होतांना पंढरी हे भुतलावरील वैकुंठ आहे हे जाणून घ्यावे असे सुचवतात.

१८६

पंढरीये अन्नदान । तिळभरीं घडतां जाण ।।१।।
तेणें घडती अश्वमेध । पातकापासोंनी होती शुध्द ।।२।।
अठरा वर्ण याती । भेद नाहीं तेथें जाती ।।३।।
अवघे रंगले चिंतनीं। मुखीं नाम गाती कीर्तनीं ।।४।।
शुध्द अशुध्दाची बाधा ।एका जनार्दनीं नोहे कदा ।।५।।

भावार्थ

पंढरीच्या तीर्थक्षेत्रात तिळाभरा इतक्या अन्नदानाने अश्वमेधाचे पुण्य प्राप्त होते . भाविक पातकांपासून मुक्त होतात. अठरापगड जाती आणि कोणताही वर्णभेद न मानता सर्वजण विठ्ठल चिंतनांत मग्न होतात. मुखाने पांडुरंगाचे नाम घेत कीर्तनांत दंग होतात. एका जनार्दनीं म्हणतात, येथे मनाला शुध्द,अशुध्द, सोवळे,ओवळे या भ्रामक कल्पनांची बाधा होत नाही.

१८७

वसती सदा पंढरीसी । नित्य नेमें हरी दरूशनासी ।
तयां सारखे पुण्यराशी । त्रिभुवनीं दूजें नाहीत ।।१।।
धन्य क्षेत्र भीवरातीर । पुढें पुंडलिक समोर ।
तेथें स्नान करती नर । तया जन्म नाहीं सर्वथा ।। २।।
करती क्षेत्र प्रदक्षिणा । त्यांच्या पार नाहीं पुण्या ।
जगीं धन्य ते मान्य । एका जनार्दनीं म्हणतसे ।।३।।

भावार्थ

पंढरीचे निवासी नित्यनेमाने हरी दर्शन चा लाभ घेतात त्याच्या सारखे पुण्यवान लोक त्रिभुवनांत शोधून सापडणार नाहीत असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, भीमातीरावरील हे तीर्थक्षेत्र धन्य होय. चंद्रभागेच्या पुण्य जलांत स्नान करणार्या भाविकांची जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते,जे या क्षेत्राला प्रदक्षिणा घालतात त्यांचे पदरी अपार पुण्यराशी पडतात,ते भक्त धन्य होत.

१८८

नित्य घडे चंद्रभागे स्नान । श्रीविठ्ठल दरूशन ।।१।।
त्यांच्या पुण्या नोहे लेखा । पहा दृष्टी पुंडलिका ।।२।।
उजवें घेतां राउळासी । जळती पातकांच्या रासी ।।३।।
संतांसवें कीर्तंन करितां । आनंदे टाळी वाजवितां ।।४ ।।
मोक्ष जोडोनियां हात । तयाची तो वाट पहात ।।५।।
धन्य पंढरीचा संग एका जनार्दनीं अभंग ।।६ ।।

भावार्थ

ज्या भाविकांना नेहमी चंद्रभागाचे स्नान व विठ्ठलाचे दर्शन घडते , भक्त पुंडलिक डोळ्यांना दिसतो त्यांच्या पुण्याला गणती नाही. मंदिराला उजव्या बाजूने प्रदक्षणा घातल्यास पातकांच्या रासी जळून जातात. संतांच्या मेळाव्यात आनंदाने टाळी वाजवून किर्तन करीत असतांना मोक्ष हात जोडून पुढें उभा राहतो. एका जनार्दनीं म्हणतात, पंढरीचा हा सोहळा धन्य होय.

१८९

भागीरथी आणि भीमरथी वदतां । समान तत्वतां कलीमाजीं ।।१।।
प्रात:काळीं नामस्मरण जो गाय । तीर्थी सदा न्हाये पुण्य जोडे ।।२।।
वदतां वाचें नाम घडतां एक स्नान । पुनरपि आगमन मृत्यूलोकीं ।।३।।
एका जनार्दनीं भीमरथीं वदतां । प्रयागीं समता सरी न पवे ।।४।।

भावार्थ

‌‌एका जनार्दनीं म्हणतात,या कलीयुगांत भागीरथी (गंगा) आणि भिमा समान पुण्यदायी आहेत. प्रात:काळीं विठ्ठल नामाचा जप करीत तीर्थात स्नान केले असतां जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होऊन मृत्यूलोकांत आगमन होत नाही. गंगा, यमुना, सरस्वती यांच्या प्रयाग तीर्थांत स्नान केल्याने मिळणारे मोक्षफल प्राप्त होते.

१९०

चंद्र पौर्णमेचा दिसे पां सोज्वळ । तैसा श्रीविठ्ठल पंढरिये।।१।।
क्षीरसिंधुसम भीवरा ती वाहे । स्नान करितां जाय महापाप ।।२।।
सनकसनंदनसम पुंडलीक । शोभा अलोलिक वर्णूं काय ।।३।।
लक्ष्मी प्रत्यक्ष रखुमाई राही। एका जनार्दनीं पायीं लीन जाला ।।४।।

भावार्थ

पौर्णिमेच्या चंद्राची उपमा पंढरीच्या विठ्ठलाला देऊन एका जनार्दनीं भीमा नदीला क्षीरसिंधुची उपमा देतात. तर भक्त पुंडलिक सनकादिक ऋषीं प्रमाणे थोर आहे असे सांगतात विष्णूपत्नी लक्ष्मी रुक्मिणी च्या रूपांत विराजित आहे. पंढरीची शोभा अलौकिक असून एका जनार्दनीं विठ्ठलचरणीं लीन होतात.

१९१

जयां आहे मुक्ती चाड । तयांसी गोड पंढरी ।।१ ।।
देव तीर्थ क्षेत्र संत । चहूंचा होत मेळा जेथ ।।२।।
कृष्णरामादि नामगजर । करिती उच्चार अट्टाहासे ।।३।।
स्त्रिया आदि नर बाळें । कौतुकलीळे नाचती ।।४।।
एका जनार्दनीं तयासंगीं । विठ्ठलरंगी नाचतुसे ।।५।।

भावार्थ

ज्या भाविकांना मुक्तीची लालसा त्यांना पंढरीचे विशेष आकर्षण आहे कारण देव , भक्त , संत आणि तीर्थक्षेत्र यांचा अद्वितीय मेळ पहावयास मिळतो. स्त्री-पुरुष, लहान थोर नामगजरांत कौतुकाने नाचतात. एका जनार्दनीं या नामघोषांत तल्लीन होऊन नाचतात.

१९२

त्रिविधतापें तापले भारी । तया पंढरी विश्रांती ।।१।।
आणीक सुख नाहीं कोठें । पाहतां नेटें कोटि जन्म ।।२।।
काळाचेंहि न चले बळ । भूमंडळ पंढरिये ।।३।।
भूवैकुंठ पंढरी देखा । ऐसा लेखा वेदशास्त्री ।।४ ।।
एका जनार्दनीं धरुनि कास । पंढरीचा दास वारकरी ।‌।५।।

भावार्थ

आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक या तीन प्रकारच्या तापांनी पोळून निघालेल्या लोकांसाठी पंढरी हे विश्रामधाम असून पंढरीसारखे सुख अनेक जन्म घेऊनही लाभणार नाही. प्रत्यक्ष कळीकाळाचेही सामर्थ्य येथे चालत नाही. पंढरी भूतलावरील वैकुंठ आहे असे वेदशास्त्रात सांगितले आहे. एका जनार्दनीं म्हणतात, असा दृढ विश्वास. धरून वारकरी पंढरीची वारी करतात.

१९३

पतित पातकी खळ दुराचारी । पाहतां पंढरी मोक्ष तयां ।।१।।
स्वमुखें सांगतो आपण । नका अनुमान धरुं कोणी ।।२।।
चंद्रभागा दृष्टीं पाहतां नरनारी । मोक्ष त्यांचे घरीं मुक्तीसहित ।।३।।
चतुष्पाद पक्ष कीटकें अपार । वृक्ष पाषाण निर्धार उध्दरती ।।४।।
एका जनार्दनीं न घ्यावा संशय । दरुशनें जाय पापताप ।।५।।

भावार्थ

दुष्ट प्रवृत्तीने निरपराधी लोकांवर अन्याय करणारे, पाप करणारे पतित,दुष्ट या सर्वांसाठी पंढरी ही मोक्षभूमी आहे. हे आपण स्वमुखाने सांगत असून या विषयीं कोणी संशय घेऊं नये. वृक्ष पाषाण या सारखे अचरांपासून चार पायांचे प्राणी, पक्षी, कीटक यां सारखे चर प्राण्यांपर्यंत सर्वांचा उध्दार पंढरींत होतो. असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, विठुरायाच्या केवळ दर्शनाने सर्वांचे पापताप विलयास जातात. या विषयीं कोणी संशय धरुं नये.

१९४

राहुनी पंढरिये जाण । जो न घे विठ्ठलदरुशन ।।१।।
महापातकी चांडाळ । त्याचा न व्हावा विटाळ ।।२।।
जिताची भोगी नर्क जो विठ्ठला विन्मुख।।३।।
न करी स्नान चंद्रभागे तो कुष्ठी सर्वागें ।।४।।
नेघे पुंडलिकदरुशन । एका जनार्दनीं तया बंधन ।।५।।

भावार्थ

जो अभक्त पंढरीस राहून विठ्ठलाचे दर्शन घेत नाही तो महापातकी चांडाळ समजावा तो जिवंतपणी नरकयातना भोगतो. भाविक या पातक्याचे दर्शन अभद्र समजतात. जो चंद्रभागेंत स्नान करण्याचे टाळतो त्याच्या सर्वांगावर कोड (कुष्ठरोग) येते. जो पंढरींत भक्त पुंडलिकाचे दर्शन घेत नाही तो संसार बंधनांत अडकतो. असे एका जनार्दनीं म्हणतात.

१९५

पूर्व सुकृताची गांठोडी पदरीं। तरीच पंढरीं वास घडे ।।१।।
कोटी यज्ञफळ भीमरथी पाहतां । मोक्ष सायुज्यता तत्क्षणीं ।।२।।
पृर्थ्वीचें दान असंख्य गोदानें । पुंडलिक दरुशनें न तुळती ।।३।।
एका जनार्दनीं विठ्ठलाचे भेटी । वेरझारा तुटी जन्मोजन्मीं ।।४।।

भावार्थ

अनेक जन्म जन्मांतरीच्या सत्कृत्यांचे पुण्य पदरीं असेल तरच पंढरींत निवास घडतो. कोटी यज्ञांचे पुण्य-फळाने चंद्रभागेचे स्नान घडते, त्याच क्षणीं सायुज्यता मुक्ती लाभते. असंख्य गाईंचे दान किंवा भूदानाने मिळणार्या पुण्याची तुलना पुंडलिक दर्शनाने मिळणार्या पुण्यराशींशी होऊ शकत नाही. असे खात्रीपूर्वक सांगून एका जनार्दनीं म्हणतात, विठ्ठलाच्या भेटीने जन्ममृत्युच्या चक्रातून कायमची सुटका होते.

१९६

अविनाश क्षेत्र पंढरी सर्वथा । आणीक ती वार्ता न ये मना ।।१।।
सर्व तीर्थ मार्ग विधियुक्त आहे । येथें उभा पाहे पांडुरंग ।।२।।
आटणी दाटणी मुंडणी सर्वथा । नाहीं पै तत्वतां यया तीर्था ।।३।।
करावें तें स्नान पुंडलिके वंदन । देखावे चरण विठोबाचे ।।४।।
जनार्दनाचा एका पंढरी सांडुनी । न जाय अवनीं कवण तीर्थीं ।।५।।

भावार्थ

पंढरी हे भुतलावरील चिरंतन टिकणारे शाश्वत क्षेत्र असून अद्वितीय आहे. येथे पांडुरंग भक्तांची वाट पहात उभा आहे. इतर क्षेत्रीं विधी-निषेधांची बंधन आहेत. पंढरींत केवळ भोळ्या भाबड्या मनाचा भक्तिभाव पुरेसा आहे. तीर्थांत स्नान करून भक्त पुंडलिकाचे दर्शन घ्यावें आणि विठोबाच्या चरणी नतमस्तक व्हावे . एका जनार्दनीं म्हणतात, पंढरी सोडून पृथ्वीवरील कोणत्याही तीर्थक्षेत्रीं जाण्याची ओढ वाटत नाही.

१९७

भाविकांसी नित्य नवें हे सोपारें । पंढरी उच्चार करितां वाचें ।।१।।
हो कां अनामिक अथवा शुध्द वर्ण । ज्ञातीसी कारण नाहीं देवा ।।२।।
एका जनार्दनीं भलती ज्ञाती असो। परी पांडुरंग वसो हृदयामाजीं ।।३।।

भावार्थ

भाविकाचे नाव, गांव, जातपात,वर्ण कोणताही असो पवित्र तीर्थक्षेत्र पंढरी या नामाच्या वाचेने केलेला उच्चार देवाला पोचतो.असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, अंतकरणात वसत असलेला पांडुरंग आणि शुद्ध,सात्विक भक्तिभाव देवाला प्रिय आहे.

१९८

सप्तपुर्यांमाजीं पंढरी पावन । नामघोष जाण वैष्णव करिती ।।१।।
देव तो विठ्ठल देव तो विठ्ठल । आहे सोपा बोल वाचें म्हणतां ।।२।।
आणिक कांहीं नको यापरतें साधन । विठ्ठल निधान. टाकूनियां ।।३।।
एका जनार्दनीं विठ्ठलावांचुनी । आण नेणें दुजें कांहीं ।।४।।

भावार्थ

मथुरा, मायावती, वाराणसी ,कांची , अवंतिका, अयोध्या, आणि द्वारका या सात नगरी मोक्षदायिका मानल्या जातात. यापेक्षां पंढरी पावन नगरी आहे हे जाणून वैष्णव पंढरीचा नित्य नामघोष करतात. पंढरीचा विठ्ठल केवळ वाचेने नाम घेताच भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतो. या शिवाय वेगळी कांहीं साधना करावी लागत नाही. असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, विठ्ठलावाचुन अन्य दैवत नाही.

१९९

तयाचे संगतीं अपार । विश्रांती घर पंढरी ।।१।।
म्हणोनि वारकरी भावें । जाती हावे पंढरीसी ।।२।।
योगयागीं जो न संपडे । तो पुंडलिका पुढें उभा असें ।।३।।
शोभे चंद्रभागा उत्तम। धन्य जन्म जाती तेथें।।४।।
घेऊनि आवडी माळ बुका । वाहती फुका विठ्ठला ।।५।।
एका जनार्दनीं भावें। हेंचि मागणें मज द्यावें ।।६।।

भावार्थ

पंढरी हे तीर्थक्षेत्र संताचे माहेर मानले जाते. अनेक वारकरी संतांच्या संगतीने भक्तिभावाने पंढरीची वारी करतात. अष्टांगयोग आणि यज्ञयाग करुनही जो परमात्मा प्राप्त होत नाही तो पंढरीत भक्त पुंडलिका साठी उभा आहे. तेथील चंद्रभागेच्या प्रवाहाची शोभा रमणीय आहे. जे भाविक पंढरीस जातात त्यांचा जन्म धन्य होय.हे भक्त अत्यंत आनंदाने फुलांची माळ व बुका देवाला अर्पण करतात. असे वर्णन करून एका जनार्दनीं गुरुचरणीं विनंती करतात कीं,आपणास हे भाग्य लाभावे.

२००

घडती पुण्याचिया रासी । जे पंढरीसी जाती नेमें ।।१।।
घडतां चंद्रभागे स्नान । आणि दरूशन पुंडलिक ।।२।।
पाहतां विटेवरी जगदीश । पुराणपुरूष व्यापक ।।३।।
वारकरी गायी सदा । प्रेमे गौविंदा आळविती ।। ४ ।।
तया स्थळीं मज ठेवा. । आठवा जनीं जनार्दन ।।५।।
शरण एका जनार्दन । करा माझी आठवण ।।६।।

भावार्थ

जे भाविक नित्यनेमाने पंढरीची वारी करतात त्यांच्या पुण्याचा राशींनी संचय होतो . या भाविकांना चंद्रभागेचे स्नान घडते, भक्त पुंडलिकाचे दर्शन घडते. चराचरात व्यापलेल्या पुराणपुरुष जगदीशाचे ध्यान याच देही याचडोळां बघावयास मिळतें. वारकरी सतत विठुनामाचा घोष करुन देवाला आळवतात . त्यां पवित्र स्थळीं निवास लाभावा अशी इच्छा व्यक्त करुन एका जनार्दनीं सद्गुरु जनार्दन स्वामींना शरण जातात.

२०१

पंढरीस ज्याचा नेम । तो न करी अन्य कर्म ।।१।।
सांडूनियां विठ्ठल राजा । आणिक देव नाहीं दुजा ।।२।।
सांडूनियां चंद्रभागा । कोण जाय आणिके गंगा ।।३।।
सांडूनियां पुंडलिका । कोण आहे आणीक सखा ।।४।।
सांडोनियां वेणूनाद । कोण आहे थोर पद ।।५।।
एका जनार्दनीं भाव।अवघा विठ्ठलचि देव ।।६।।

भावार्थ

जो पंढरीची नेमाने वारी करतो त्या भक्ताला अन्य साधनेची गरज नसते. विठ्ठला सारखा परम देव दुसरा नाही. चंद्रभागे सारखी पवित्र गंगा नाही. पुंडलिका सारखा दुसरा सखा नाही. वेणूनादा सारखा अन्य नाद नाही. असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, मन भक्तिभावाने भरलेलें असेल तर सारे देव विठ्ठच आहेत.एकाच विठोबाची सारी रुपे आहेत.

२०२

देव वसे पंढरीसी ।येती सनकादिक ऋषीं ।
वंदोनी पुंडलिकासी । चरण वंदिती विठ्ठलाचे ।।१।।
करिती कीर्तन गजर । नाना वाद्यें परिकर ।
नाचती निर्धार । बाळें भोळे आवडी ।।२।।
दिंडी जागरण एकादशी । क्षीरापती द्वादशी करिताती आवडीसी ।
भक्त मिळोनी सकळ ।।३।।
मिळताना क्षीरापती शेष तेणें सुख सुरवरास ।
एका जनार्दनीं दास ।वैष्णवांचा निर्धारें ।। ४।।

भावार्थ

पांडुरंग पंढरीत वसत असल्याने सनकादिक ऋषीं पंढरीस येतात,भक्त पुंडलिकाला नमस्कार करून विठ्ठलाचे चरण- वंदन करून कीर्तनरंगी रंगून जातात. नाना वाद्यांच्या गजरांत आनंदाने नाचतात. एकादशीला दिंडी निघते. रात्रीचे जागरण करतात. द्वादशीला आवडीनें दुधाच्या खीरीचा नैवेद्य दाखवला जातो खीरीच्या शेष भागाने देवदेवताप्रसन्न होतात. एका जनार्दनीं म्हणतात, स्वर्गीच्या या देवदेवता वैष्णवांच्या दास बनतात.

२०३

पंढरीये पांडुरंग । भोवतां संग संतांचा।।१।।
चंद्रभागा वाळुवंट । आहे देव नीट उभा ।।२।।
पुंडलिक वेणुनाद । होतो आनंद अखंड ।।३।।
पद्मतळें गोपाळपूर । संत भार आहे तेथें ।।४।।
वैष्णवांचा गजर मोठा । आषाढी चोहटा नाचती ।।५।।
जाऊं तैथें लोटांगणी । फिटेल आयणी गर्भवास ।।६।।
भाळे भोळे येती भक्त । आनंदें नाचत वाळुवंटीं ।।७।।
लोटांगणीं. घालूं चरणीं । शरण एका जनार्दनीं ।।८।।

भावार्थ

पांडुरंग पंढरीत समचरणी उभा आहे. चंद्रभागेच्या वाळवंटात संतांचा मेळा वेणुनादांत तल्लीन होऊन नाचत आहेत. गोपाळपूर , पद्मतळे येथे संतासवे भक्तांची अपार गर्दी असून वैष्णव नामघोषाच्या मोठ्या गजरांत नाचतात.एकमेकांना आलिंगन देवून लोटांगणे घालतात. एका जनार्दनीं या सर्व भक्तांच्या आणि सतांच्या चरणीं शरणागत होतात.

२०४

हरीचे ते दास । ज्यांचा पंढरीसी वास ।।१।।
येती नेमें पंढरीसी । दरूशन घेती विठ्ठलासी ।।२।।
करिती चंद्रभागे स्नान । पूर्वजा उध्दरतीं जाण ।।३।।
करिती गोपाळकाला । गोपाळपुरी मिळोनि मेळा ।।४।।
ऐसा जया घडे नेम । एका जनार्दनीं निष्काम ।।५।।

भावार्थ

हरीचे दास पंढरीस नित्यनेमाने येऊन विठ्ठलाचे दर्श़न घेतात. चंद्रभागेचे स्नान करुन लाभलेल्या पुण्यफलाने पूर्वजांचा उध्दार होतो. गोपाळपुरीं एकत्र जमून गोपाळकाला करतात. असा नेम ज्यांना घडतो ते भक्त निष्काम कर्मयोगी आहेत असे एका जनार्दनीं म्हणतात.

२०५

तुम्ही पंढरिये जातां । तरी मी पायां लागेन आतां ।
चरणरजें जाली साम्यतां । तुमचे पाऊल माझे माथां ।।१।।
तेथें जेथें पाऊल बैसे । एका एकपणेंविण असे ।।ध्रृ०।।
पंढरीचे वाटे । पसरिलें ते मीं गोटे ।
पाया लागेन अवचटे । तें सुख आहे न मज मोठें ।।२।।
जेथें पाउलांचा माग । तेथें माझें अखंड अंग ।
चरणरज आम्हां भोग । काय करशील वैकुंठ चांग ।।३।।
संत भेटतील वाडेकोडें । तरी मी आहे पायांपुढें ।
हे हि आठवण. न घडे । तरी मी वाळवंटींचे खडे ।।४।।
यात्रा दाटेल घसणीं । लागेन अवचितां चरणीं।
एका जनार्दनीं कीर्तनीं । आठवा आसनी शयनीं ।।५।।

भावार्थ

या अभंगात एका जनार्दनीं पंढरीच्या वारकर्यांना विनंती करीत आहेत. विठ्ठलाच्या भक्तांच्या पायावर डोके टेकवून त्यांची चरणधूल मस्तकी धारण करतात. पंढरीच्या वाटेवरील गोटे बनून भक्तांच्या चरण-स्पर्शाचे सुख लाभावे अशी ईच्छा व्यक्त करुन एका जनार्दनी म्हणतात, भक्तांचे चरणरज हे आनंदाचे भोग असून वैकुंठीचे सुख सुध्दा त्यां पेक्षा कमी च आहे. संतांच्या भेटीसाठी चंद्रभागेच्या वाळवंटीचे खडे बनून संतांच्या चरणी लीन होण्याची कामना करतात. संताची बसतां ,उठतां कीर्तन करतांना, विश्रांती घेतांना नित्य आठवण करतात.

२०६

मूर्ति अनुपम्य विटेवरी साजिरी । पाऊलें गोजिरीं कोंवळी तीं ।।१।।
तेथें माझें मन वेडावलें भारी । परत माघारीं परतेना ।।२।।
वेधलासे जीव सुखा नाही पार । माहेरा माहेर पंढरी लेखा ।।३।।
एका जनार्दनीं सुखाची वसती । भाविका विश्रांति पंढरीराव ।।४।।

भावार्थ

पंढरीला विटेवरील अनुपम सुंदर मूर्ति, गोजिरे, कोमल समचरण पाहून वेडावलेंले मन माघारीं परतेना . मन वेधून घेणार्या ते दर्श़न सुख अपार आनंददायी अनुभव आहे असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, पंढरी ही सुखाचे, विश्रांतीचे वसतीस्थान आहे पंढरी हे संताचे माहेर असून भाविकांचे विश्रांती स्थान आहे म्हणजे वारकर्यांसाठी पंढरी माहेराचे माहेर आहे .

२०७

आशा धरूनी आलों येथवरीं । पाहतां पंढरी पावन झालों ।।१।।
आलीया जन्माचें सुफळ झालें काज । दृष्टी गरूडध्वज पाहतांचि ।।२।।
एका जनार्दनीं पावलों विश्रांती । पाहतां विठ्ठलमूर्ती भीमातटीं ।।३।।

भावार्थ

सर्व पापांचे परिमार्जन व्हावे या अपेक्षेने पंढरीस आलो आणि पावन झालो. मंदीरावरील गरूडध्वज पाहताच मानवी जन्माचे सार्थक झाले.भीमेच्या तीरावरील पांडुरंगाची मूर्ती पाहून सर्व श्रमाचा परिहार होऊन मन विश्रांत. झाले. असा पंढरीचा महिमा या अभंगात एका जनार्दनीं वर्णन करतात.

२०८

ऐसे संतभार ऐसें भीमातीर । ऐसा जयजयकार सांगा कोठें ।।१।।
समुद्रवलयांकित तीर्थे असतीं पावन ।परी ऐसें महिमान नाहीं कोठें ।।२।।
ऐसा नामघोष आनंद सोहळा । न देखे आणिके स्थळां माझे नेत्रीं ।।३।।
एका जनार्दनीं पंढरीवाचुनी । आनंद माझे मनीं नाही कोठें।।४।।

भावार्थ

सागरतीरावरील अनेक पवित्र तीर्थक्षेत्रे या भरत खंडांत आहेत. परंतू भीमातीरी जमणारा असा संतमेळावा, विठ्ठ नामाचा असा जयघोष, असा आनंदसोहळा इतर क्षेत्रीं पहावयास मिळत नाही. असा पंढरीचा. महिमा एका जनार्दनीं या अभंगात वर्णन करतात.

२०९

सारूनी दृष्य देखतां जालीसे ऐक्यता । पाहे कृष्णनाथा पंढरिये।।१।।
कर ठेउनी कटीं बुंथी वाळुवंटीं । वैजयंती कंठीं आती माझी ।।२।।
एका जनार्दनीं शरण त्याची कृपा पूर्ण । पाहतां पाहतां मन. हारपलें ।।३।।

भावार्थ

सभोवतालचे सारे दृष्य विश्र्व बाजूला सारून भीमेच्या वाळवंटी कर कटीवर ठेवून उभा असलेला, कंठी वैजयंती माळ परिधान केलेला कृष्णनाथ पाहिला आणि त्याच्याशी मन एकरुप झाले. मनाचे मनपण हरपून गेले. पूर्ण कृपा झाली. असा विलक्षण अनुभव या अभंगात एका जनार्दनीं सांगतात.

२१०

देव भक्त उभे दोन्ही एके ठायीं । चला जाऊं पायीं तया गावा ।।१।।
आवडीचा हेत पुरेल मनाचा । उच्चरितां वाचा विठ्ठल नाम ।।२।।
करूनियां स्नान पुंडलिकाची भेटी । नाचूं वाळवंटीं वाहूं टाळी ।।३।।
जाऊं महाद्वारीं पाहूं तो सांवळा । वोवाळूं गोपाळा निंबलोण ।।४।।
एका जनार्दनीं मनोरथ पुरे। वासना न नुरे मागे कांहीं ।।५।।

भावार्थ

देव आणि भक्त जेथें एके ठिकाणी उभे आहेत त्या पंढरीला पायीं चालत जावे, चंद्रभागेत स्नान करून भक्त पुंडलिकाचे दर्शन घ्यावें, महाद्वारी उभ्या असलेल्या सांवळ्या श्रीकृष्णाला निंबलोण उतरावे. विठ्ठल नामाचा गजर करुन वाळवंटी नाचावे. विठ्ठलाच्या नामाचा वाचेने उच्चार करतांच मनीचे सर्व हेतू पूर्ण होतील. एका जनार्दनीं म्हणतात, भक्तांचे सर्व मनोरथ पूर्ण होऊन कोणतिही वासना उरणार नाही.

२११

निंबलोण करूं पंढरीच्या सुखा । आणि पुंडलिका भक्तराया ।।१।।
परलोकींचे येती परतोनी मागुती । सर्व सुख येथें पहावया ।।२।।
अष्ट महासिध्दी जयाचिये द्वारीं । होऊनि कामारी वोळंगती ।।३।।
मुक्तिपद देतां न घे फुकासाठी । ते हिंडे वाळुवंटी दीनरूप ।।४।।
एका जनार्दनीं करी निंबलोण । विटेसहित चरण ओवाळावें ।।५।।

भावार्थ

पंढरीचे सुख,भक्तराज पुंडलिक यांना कुणाची नजर लागू नये म्हणून त्यांच्या वरुन लिंबू ओवाळून टाकावे. परलोकीचे देवदेवता हे सुख पहाण्यासाठीं पंढरीला येतात.अष्ट महासिध्दी पंढरीच्या महाद्वारीं लोळण घेतात.विठ्ठलभक्तांना पंढरीच्या सुखापुढे मुक्तीच्या वरदानाची चाड नाही. मोक्ष-मुक्ती चंद्रभागेच्या वाळवंटात दीनरुप होऊन हिंडतात.असे सांगून एका जनार्दनीं विठ्ठलाचे विटेसहित चरण ओवाळून लिंबलोण करतात.

२१२

दक्षिण द्वारका पंढरी । शोभतसे भीमातीरीं ।।१।।
चला जाऊं तयां ठायां । वंदूं संतांचिया पायां ।।२।।
नाचूं हरूषे वाळुवंटीं । पुंडलिक पाहुनी दृष्टीं ।।३।।
पद्मतळें पाहतां डोळां। सुखसोहळा आनंद ।।४।।
एका जनार्दनीं विठ्ठल भेटी । लाभे लाभ दुणावें पोटीं ।।५ ।।

भावार्थ

भीमातीरी वसलेली अत्यंत शोभायमान पंढरीं नगरी दक्षिण द्वारका म्हणून ओळखली जाते.तेथें जाऊन संतांचे चरण वंदावे, भक्त पुंडलिकाला पाहून आनंदाने नाचावे.अशी ईच्छा व्यक्त करुन एका जनार्दनीं म्हणतात,पद्मतळें पाहताना सूखसोहळा पाहिल्याचा आनंद मिळतो.विठ्ठल दर्शनाने हा आनंद द्विगुणित होऊन पोटांत मावेनासा होतो.

२१३

आम्ही मागतो फुकाचें । तुम्हां देतां काय वेंचे ।।१।।
संतसंग देई देवा । दुजा नको कांहीं गोवा ।।२।।
पंढरीसी ठाव द्यावा । हेंचि मागतसें देवा ।।३।।
एका जनार्दनीं मागत। तेवढा पुरवी मनींचा हेत ।।४।।

भावार्थ

या अभंगात एका जनार्दनीं संतसंग द्यावा आणि पंढरीत निवासासाठी ठिकाण द्यावे अशी मागणी पांडुरंगाच्या चरणी शरणागत भावाने करीत आहेत.ही मागणी अत्यंत अल्पमोलाची असून ती पुरवण्यात कांही मोल खर्च करावे लागणार नाही तरी विठुरायाने मनीचा हा हट्ट पुरवावा असे ते आर्ततेने सांगतात.

२१४

तुमचे देणे तुमचे देणें । नको वैकुंठ हें पेणे ।।१।।
नानामतें मतांतर । अंतर गोवूं नये तेथ ।।२।।
पेणें ठेवा पंढरीसी । अहर्निशीं नाम गाऊं ।।३।।
भाळे भोळे येती संत । बोलूं मात तयांसी ।।४।।
चरणवंदीन साचें । एका जनार्दनीं म्हणे त्यांचे ।।५।।

भावार्थ

श्रीहरीचे निवासस्थान वैकुंठ असून ते आवडत्या भक्तांना वैकुंठनिवास देवून सायुज्यमुक्ती प्रदान करतात.वैकुंठात नाना मते आणि मतभिन्नता आढळते.भोळ्या भाबड्या भक्तांची एकनिष्ठ भगवद् भक्ती वैकुंठात नाही, तेथे मन गुंतून पडत नाही.असे मत व्यक्त करुन एका जनार्दनीं म्हणतात,श्रीहरीने पंढरीस निवास केल्यास अखंड नामजप, संतांचे चरणवंदन आणि हितगुज होईल.

२१५

पाहतां विश्राम सुखवस्ती धाम । पंढरीं पुण्यग्राम भूमीवरी ।।१।।
जावया उद्वेग धरिला माझ्या मनें । उदंड शहाणें तये ठायीं ।।२।।
एका जनार्दनीं मानिला विश्वास। नाहीं दुजी आस पायांविण ।।३।।

भावार्थ

पंढरी ही सुखाची वस्ती असून मनाचे विश्रांती स्थान आहे.भुतलावरील पुण्यक्षेत्र असून अनेक शास्त्री, पंडित ,संत पंढरींत निवास करतात.या वचनांवर विश्वास ठेवून पंढरीस जाण्याचा हट्ट घेतला,असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, पांडुरंगाच्या चरणांशिवाय मनाला कोणतिही आस नाही.

२१६

येणें पुरतें सर्व काज । विश्वास हा जाहला मज ।
सांपडलें तें निज । बहुकाळाचें ठेवणें ।।१।।
केला पुंडलिकें उपकार । दाविला सोपा मार्ग निर्धार ।
जडजीवां उध्दार । नाममात्रे एकाची ।।२।।
तुटलीं बंधने । मागा पाहा अनुभवणें एका
जनार्दनीं म्हणे । धन्य वास पंढरिये ।।३।।

भावार्थ

भक्त पुंडलिकाने सर्व भक्तांना भगवंत भक्तिचा सोपा मार्ग दाखवला. विठ्ठलाच्या नामाचा जप करून जड जीवांचा उध्दार होतो, जन्म-मरणाची बंधने तुटून जातात. हे पटवून देऊन भाविकांवर मोठे उपकार केले आहेत.पंढरीत बहुकाळाचा ठेवा सापडला, जीवनाचे सार्थक झाले, असा विश्वास निर्माण झाला. पांडुरंगाचे दर्शन घ्यावें, मनातिल ईच्छा सांगावी आणि मनोकामना पूर्ण झाल्याचा अनुभव घ्यावा असे एका जनार्दनीं म्हणतात.

२१७

आशा धरुनि आलों येथवरी
पाहतां पंढरी पावन झालों।।१।।
आलीया जन्माचें सुफळ झालें काज ।
दृष्टी गरूडध्वज पहातांचि ।।२।।
एका जनार्दनीं पावलों विश्रांती।
पाहतां विठ्ठलमूर्ती भीमातटीं ।।३।।

भावार्थ

पंढरींत विठ्ठल मंदिरावरील गरूडध्वज पाहतांच आशा धरुन पंढरीला आल्याने पावन झालो, जन्म सुफळ झाल्याचे समाधान वाटले. भीमा तटावरील पांडुरंगाची मूर्ती पाहून मनाला अपूर्व शांतीचा अनुभव आला असे एका जनार्दनीं या अभंगात वर्णन करतात.

२१८

श्रीमुखाचें सुख पाहतां पाहतां ।
नयन तत्वतां वेधलें माझें ।।१।।
सांवळा सुंदर कटीं ठेवुनी कर ।
रूप तें नागर भीमातीरीं ।।२।।
नित्य परमानंद आनंद सोहळा ।
सनकादिक या स्थळां येती जाती ।।३।।
वैष्णवांचा थाट टाळ घोळ नाद ।
दिंड्या मकरंद हर्ष बहु ।।‌४।।
सन्मुख ती भीमा वाहे अमृतमय नीर ।
जडजीवां उध्दार स्नानमात्रें ।।५।।
एका जनार्दनीं मुक्तीचें माहेर ।
क्षेत्र तें साचार पंढरपूर ।।६।।

भावार्थ

पंढरपूर या धार्मिक क्षेत्राचे वर्णंन करतांना.एका जनार्दनीं म्हणतात,भीमा तटावरील सावळ्या सुंदर हरीचे श्रीमुख पाहतांना डोळे तेथे खिळून राहातात.परमानंदाचा अनुभव येतो. पंढरीचा नित्य आनंदाचा सोहळा पाहण्यासाठी सनकादिक ऋषी या क्षेत्रीं येतात.वैष्णवांचा मेळा टाळांच्या निनादांत विठ्ठलनामाचा जयघोष करतात.दिंड्या पताकांची शोभा रमणीय असते.भीमेच्या अमृतमय प्रवाहात स्नान करून जडजीवांचा उध्दार होतो.पंढरपूर हे मुक्तिचे माहेरघर आहे.

२१९

जन्मासी येऊनि पहा रे पंढरी ।
विठ्ठल भीमातीरीं उभा असे ।।१।।
ठेविले चरण दोन्ही विटेवरी ।
आलियांसी तारी दरूशनें औएका ।।२।।
पंचक्रोशी प्राणी पुनीत पैं सदा ।
ऐशी ही मर्यादा पंढरीची ।३।।
एका जनार्दनीं कीर्तनगजर ।
ऐकतां उध्दार सर्व जीवा ।।४।।

भावार्थ

भीमातीरावर सम चरण विटेवर ठेवून उभा असलेला परमात्मा पांडुरंग केवळ दर्शनाने भाविकांना संसार सागरातून तारुन नेतो. पंढरीच्या पंचक्रोशीचे सर्व भक्त पावन होतात असे या तीर्थक्षेत्राचे महात्म्य सांगितले आहे. एका जनार्दनीं म्हणतात,पंढरीतील कीर्तनाचा गजर श्रवण केला तरी जीवांचा उध्दार होतो.

२२०

निर्धारितां सुख पंढरीसी आहे ।
म्हणोनि उभारिती बाह्या वेदशास्त्रें ।।१।।
साधन पसारा न करी सैरावैरा ।
जाय तूं निर्धारा पंढरिये ।।२।।
एका जनार्दनीं धरुन विश्वास ।
विठोबाचा दास होय वेगें ।।३।।

भावार्थ

वेदशास्त्रे दोन्ही हात उभारून घोषणा करतात की, भावभक्ती आणि श्रध्देने मिळणारे अमाप सुख पंढरींत आहे.कोणत्याही वैदिक उपचारांचे स्तोम पंढरींत नाही.केवळ भागवत धर्मावर विश्वास ठेवून विठोबाचा अनन्य भक्त व्हावे असे एका जनार्दनीं या अभंगातून सुचवतात.

२२१

स्वहित हित विचारीं मानसीं । कां रे नागविसी देहासी या।।१।।
सावधान होई पाहे बा पंढरी । धरीं तूं अंतरीं संतसंग ।।२।।
नको पडूं फेरी चौर्यांयशी आवृत्ती । गाय तूं कीर्ती वैषणवांची ।।३।।
तरले बहुत तरती भरंवसा । विश्वास हा बापा धरीं ऐसा ।।४।।
सुगम सोपा चुकती तेणें खेपा । एका जनार्दनीं जपा विठ्ठलनाम ।।५।।

भावार्थ

मनांत स्वहिताचा विचार करुन देहाला क्लेश न देतां सावधान होऊन,संतसंगतीची ईच्छा चित्तात धारण करुन पंढरीची वाट धरावी. वैष्णवांचे गुणगान करुन त्यांची किर्ति वाढवावी.संतसंगतीने अनेक भक्त मोक्षपदास पोचले याचा विश्वास धरुन विठ्ठल भक्तीचा सोपा सुगम मार्ग स्विकारावा.असा उपदेश करून एका जनार्दनीं म्हणतात, विठ्ठलनामाच्या जपाने चौर्यांशी लक्ष योनीच्या फेर्यातून सुटका होते.

२२२

करा करा लागपाठ । धरा पंढरीची वाट ।
पुंडलिकाची पेठ । सोपी आहे सर्वांसी ।।१।।
नाहीं कोठें गोवा गुंती । दुजा नको रे सांगाती ।
एक चित्तवृत्ति । दृढ करी मानसीं ।।२।।
नको माझें आणि तुझें । टाकी परतें कीं रे वोझैं ।
संतचरण रज । सेवीं कां रे आदरें ।।३।।
तुटतीं भक्तीजाळ गुंती। सहज होतसे विरक्ति ।
एका जनार्दनीं प्रीती । धरा संतचरणीं ।।४।।

भावार्थ

पंढरी ही भक्त पुंडलिकाची पेठ सर्वांसाठीं अत्यंत सुगम,सोपी आहे.येथें जातांना कोणी सांगाती, सखासोबती यांची गरज नाहीं.मनाचा पूर्ण निश्चय करुन,सगळ्या चित्तवृत्ती दृढ करुन आणि मी तूं पणाचे ओझे बाजूला सारून संतचरणांची माती आदराने मस्तकीं धारण करावी. त्या मुळे संसारातिल गुंता सुटून सहज विरक्ती येते.असे एका जनार्दनीं म्हणतात.

२२३

श्री पांडुरंगाचें दरूशन । वास पंढरीसी जाण ।
कोटी यागांचे पुण्य । तया घडे नित्याची ।।१।।
हाचि माना रे विश्वास । धरा संतचरणीं निजध्यास ।
मोक्षाचा सायास । न लगे कांहीं अणुमात्र ।।२।।
न रिघा तयांचे हव्यासें । साधनाचे नको फांसे ।
कीर्तन सौरसें । प्रेमें नाचा रंगणीं ।।३।।
नका माझें आणि तुझें । टाका परतें उतरूनी वोझें ।
एका जनार्दनीं सहजे। विठ्ठलनामें मुक्त व्हां ।।४।।

भावार्थ

पंढरीचा निवास आणि पांडुरंगाचे दर्शन या मुळे कोटी यागांचे पुण्य लाभते असा विश्वास धरुन संतसहवासाचा ध्यास धरल्यास मोक्ष मिळवण्यासाठी वेगळे सायास करण्याची गरज नाही. मोक्षमुक्तीचा हव्यास धरुन योग याग तप यांच्या फासांत गुंतून जाण्यापेक्षां मी तूं पणाचे ओझे फेकून कीर्तनरंगी रंगून भक्तीप्रेमाने विठ्ठलनामाच्या गजरांत आनंदाने नाचावें आणि मुक्त व्हावे असे एका जनार्दनीं सांगतात.

२२४

देशविरहीत काळासी अतीत । ते देवभक्त पंढरिये ।१।।
जाऊनियां कोणी पहा । देवाधिदेवा विठोबासी ।।२।।
जन्ममरणाचे तुटतील फांसे। पाहतां उल्हासें देवभक्तां ।।३।।
एका जनार्दनीं विटेवरी निधान । लेवुनी अंजन उघडे पहा हो ।।४।।

भावार्थ

देश कालाच्या मर्यादा ज्यांना नाहीत असे देव-भक्त पंढरीत उभे आहेत.देवाधिदेव विठोबा कोणीही पाहूं शकतो.उल्हसित अंत;करणाने दर्श़न घेतल्यास जन्ममरणाची बंधने तुटून पडतात. प्रेमभक्तीचे अंजन घालून विटेवरील पांडुरंग रुपी निधान डोळ्यांत साठवावें असे एका जनार्दनीं या अभंगात सुचवतात.

२२५

भाव धरूनी शरण येती । तयां मोक्ष सायुज्यप्राप्ती ।
ऐसी वेद आणि श्रुती । गर्जतसे सादर ।।१।।
म्हणोनी न करा आळस । सुखे जा रे पंढरीस ।
प्रेम कीर्तनाचा रस । सुखें आदरें सेविजे ।।२।।
पाहतां नीरा भीवरा दृष्टीं । स्नानें वास त्यां वैकुंठीं ।
पूर्वजही कोटी । उध्दरती सर्वथा ।।३।।
एका जनार्दनीं सांगे । भाक दिधली पांडुरंगे ।
धन्य संचित जें भाग्य । तेंचि योग्य अधिकारी ।।४।।

भावार्थ

भक्तिभाव धरुन जे परमेश्वराला शरण येतात त्यां भाविकांना मोक्ष प्राप्त होऊन सायुज्यमुक्ती मिळते. पुनरपि जन्म घ्यावा लागत नाही.असे वेद,श्रुती आदराने गर्जून सांगतात.नीरा भीमेचा पावन संगमांत स्नान केल्याने वैकुंठ पदाची प्राप्ती होते,पूर्वजांचा उध्दार होतो.एका जनार्दनी म्हणतात,ज्या भाग्यवंताचे पुण्य संचित असेल ते पंढरीच्या सुखाचे अधिकारी होतात,ते धन्य होत असे प्रत्यक्ष पांडुरंगाचे वचन आहे तेव्हां आळस झटकून सुखाने पंढरीस जावे.

२२६

मार्ग ते बहुतां आहेत । सोपा पंथ पंढरीचा ।।१।।
येचि मार्गे सुखें जातां । हरे संसारिची चिंता ।।२।।
मार्गी नाही गोवा -गुंती। पाहतां निवृत्ती क्रोधकामां ।।३।।
एका जनार्दनीं सोपें वर्म । आहे ते सुधर्म सर्वांसीं ।।४।।

भावार्थ

परमात्म प्राप्तीचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत परंतू पंढरीचा भगवद्भक्तीचा पंथ सुगम असून या मार्गाने संसार चिंतेचे हरण होते, कामक्रोध पळून जातात. मनातिल संशयाचे जाळे नाहिसे होते.सर्वांसाठी भागवत धर्म आचरणास सहजसुलभ आहे असे एका जनार्दनीं प्रतिपादन करतात.

२२७

करूनी निर्धारा । जाय जाय पंढरपुरा।।१।।
उणें पडो नेदी कांहीं । धांवे देव लवलाहीं ।।२।।
संकट कांहीं व्यथा । होऊं नेदी सर्वथा ।।३।।
शंख चक्र घेऊनी करीं । एका जनार्दनीं घरटी करी ।।४।।

भावार्थ

भाविकांनी मनाचा निर्धार करुन पंढरीस जावें, तेथें कशाचीच कमतरतां नाही. भक्तांची संकटे, व्यथा दूर करण्यासाठी देव शंख,चक्र घेउन त्वरेने धावत येऊन रक्षण करतो असे एका जनार्दनीं सांगतात.

२२८

पुंडलीक म्हणतां वाचें । पाप जातें रे जन्माचं ।
जिहीं देखिलें पद याचें । धन्य भाग्याचे नर ते ।।१।।
जाती पंढरीसी आधी। तुटे तयांची उपाधी।
ऋध्दि सिध्दी मांदी । तिष्ठतसे सर्वदा ।।२।।
भुक्ति मुक्ति धांवती मागें । आम्हां अनुसरा वेगें।
ऐसे म्हणोनि वेगें । चरणीं मिठी घालिती ।।३।।
शरण एका जनार्दनीं । विटे उभा मोक्षदानीं ।
लागतां तयाचे चरणीं । पुनरावृत्ती न येतीं ।।४।।

भावार्थ

भक्त पुंडलिकाच्या नामाच्या उच्चाराने जन्माच्या पापाचे परिमार्जन होते,भाग्यवान भाविकांनाच पुंडलिकाचे चरणदर्शन घडते.जे भक्त पंढरीची नित्यनेमाने वारी करतात त्यांच्या सर्व समस्यांचे निराकरण होते ,त्यांना ऋध्दि सिध्दी प्राप्त होतात. भुक्ति मुक्ति चरण वंदन करुन त्यांचा अंगिकार करण्याची विनंती करतात असा पंढरीचा महिमा सांगून एका जनार्दनीं म्हणतात, मोक्ष देणारा परात्पर परमात्मा विटेवर उभा आहे ,त्याच्या चरण-स्पर्शाने पुनरपि जन्मास यावे लागत नाही.

२२९

विठ्ठल देवाधिदेवो । भक्तजनांचे निवारी बिहो ।
तो पंढरीचा रावो । विटे उभा ठाकला ।।१।।
मना लागो त्याचा छंद । निरसोनि भेदाभेद ।
अवघाचि गोविंद । ठसावें हदयीं ।।२।।
स्नान केल्या चंद्रभागे । पातकें नासतील वेगें ।
संकल्प विकल्प त्याग । दरुशन घेतांची।। ३।।
ऐसा घडतां हा नेम । तयापाशीं पुरुषोत्तम।
एका जनार्दनीं काम । देव करी स्वयें अंगें ।।४।।

भावार्थ

भक्तजनांचा निर्वाह चालविणारा देवाधिदेव विठुराणा पंढरींत विटेवर उभा आहे.मी तूं पणाचे,उच्च-नीचतेचे जाती-पातीचे सारे भेदाभेद विसरुन या गोविंदाला हदयांत धारण करावा,मनाला त्याचा छंद लागावा .चंद्रभागेच्या पाण्यांत स्नान करतांच सर्व पातके समूळ नाहीशी होतील.भक्त पुंडलिका सह पांडुरंगाचे दर्शन घेतांच मनातील सर्व संशय,संकल्प,विकल्प विलयास जातील.तीर्थस्नान व चरणदर्शन हा नित्यनेम केल्यास पुरुषोत्तम श्रीहरीचा निरंतर सहवास लाभेल,त्या भक्तांचे सर्व मनोरथ देव पूर्ण करील अशी ग्वाही एका जनार्दनीं या अभंगात देतात.

२३०

जाणत्या नेणत्या एकचि ठाव । तेणेंही भजावा पंढरीराव।।१।।
नका पडूं आणिका भरी । तणें फेरी चौय्रांशीची।।२।।
लागा पंढरीच्या वाटे। तेणे तुटे बंधन ।।३।।
अनुभवें अनुभव पाहां । येच देहीं प्रत्यक्ष।।४।।
एका जनार्दनीं प्रचीत । विठ्ठल नामें. मुक्त सत्य ।।५।।

भावार्थ

वेद शास्त्रे जाणणारे पंडित आणि भोळी भाबडी भक्ति करणारे भाविक यांनी एका पंढरीनाथाचे भजन कीर्तन करावे योग,याग,तप या सारख्या साधनांच्या भरीस पडू नये. पंढरीची वाट धरुन संसार बंधनातून मुक्त व्हावे. याच देहीं या भगवद्भक्तीचा प्रत्यक्ष अनुभव घेउन पहावा. विठ्ठल नामाच्या सत्यतेची प्रचिती घ्यावी.असे एका जनार्दनीं या अभंगातून सुचवतात.

२३१

रमेसह पंढरी आला । येऊनि भेटला पुंडलिका।।१।।
म्हणे उभारूनि हात । तरतील नामें महापतित ।।२।।
नका कांहीं आटाआटी । योग यागांची कसवटी ।।३।।
ब्रह्मज्ञान न साधे लोकां । मुखीं धोका विठ्ठला ।।४।।
शरण एका जनार्दनीं । सांगे वचनीं पुंडलिक ।।५।।

भावार्थ

लक्ष्मी सह विष्णु पंढरींत आले आणि भक्तराज पुंडलिकाला भेटलें.दोन्ही कर उभारून भक्तांना ईच्छादान दिले.योगयाग,दानधर्म, तप या साधनांचा खटाटोप न करता केवळ नामजपाने महापतित तरुन जातील.सामान्य जनांना ब्रह्मज्ञान साधत नाही. वेदांच्या ऋचा गाताना उच्चरांत चुकांमुळे धोका संभवतो.असे एका जनार्दनीं म्हणतात.

२३२

प्रेमळांसी विश्रांतिस्थान । महा मुक्ति कर जोडोन ।
ऋध्दी सिध्दी वोळंगण । तिष्ठती जाण पंढरिये ।।१।।
धन्य धन्य विठ्ठलराव । उभा देवांचा तो देव ।
दरूशनें निरसे भेव । यम काळ दूताचे ।।२।।
नाम न विटेचि रसना । सुलभ हा पंढरीराणा ।
एका शरण जनार्दना । सदा वाचे उच्चारी ।।३।।

भावार्थ

पंढरी ही प्रेमळ भाविकांचे विश्रांतिस्थान असून मोक्ष मुक्ति येथे दोन्ही कर जोडून उभ्या राहतात. ऋध्दी सिध्दी पंढरीच्या दारी लोटांगणी येतात.देवांचा देव विठ्ठल येथे यमदूतांपासून अभयदान देत उभा आहे. पंढरीच्या विठ्ठल नामरसाला भाविकांची रसना कधीच कंटाळत नाही एका जनार्दनीं म्हणतात,वाचेने नामजप करणार्या भाविकांना हा पंढरीराणा सहजसुलभ आहे.

श्रीविठ्ठलमहात्म्य


आवडीच्या सुखा सुखावला | वैकुंठ सांडोनीं पंढरिये आला ||१||
देखोनियां पुंडलिका उभा सम पाई देखा ||२||
न बैसे खालीं | युगे अठ्ठावीस जालीं ||३||
ऐशी भक्ताची माउली | उभी तिष्ठत राहिली ||४||
एका जनार्दनीं देव | उभा राहिला स्वयमेव ||५||

भावार्थ

भक्तिप्रेमाने सुखावलेला पांडुरंग वैकुंठ सोडून पंढरीला आला आणि भक्तराज पुंडलिकाला पाहून विटेवर समचरण ठेवून अठ्ठाविस युगांपासून तिष्ठत उभा आहे.एका जनार्दनीं म्हणतात,पांडुरंग रुपानें स्वयमेव परब्रह्म भक्तासाठी वाट पाहत आहे.


धन्य धन्य पुंडलिका तारिले लोका सकळां ||१||
तुझें भाकेगुंतुनी यथें | तारीन पतीत युगायुगीं ||३||
भाळे भोळे येतील जैसे | दरुशनें ते तैसे वैकुंठी ||३||
एका जनार्दनीं देऊनी वर | राहे विटेवर मग उभा ||४||

भावार्थ

धन्य धन्य पुंडलिक असे म्हणुन एका जनार्दनीं सांगतात,परब्रह्म सच्चिदानंद परमेश्वर भक्तांचे मनोगत जाणून भक्त पुंडलिकाला वरदान देतात कीं, दर्शनास येणार्या सर्वपतितांचा उध्दार करण्यासाठी वचनबध्द आहे. आपले वचन पूर्ण करण्यसाठी देव विटेवर उभे आहेत.


भक्तांदारी उभाचि तिष्ठे | न बोले न बसै खालुता ||१||
युगे जाहलीं अठ्ठावीस | धरुनी आस उभाची ||२||
जड मूढ हीन दीन | तारी दरुशनें एकाची ||३||
एका जनार्दनीं ऐसा वर | दिधला साचार भक्तांसी ||४||

भावार्थ

भक्ताला दिलेले वरदान खरे (साचार) करण्यासाठी परमात्मा अठ्ठाविस युगांपासून तिष्ठत उभा राहिला आहे.खाली न बसतां मुकपणे आस धरुन,जड,मूढ(अजाण) दीनदुबळे यांना दर्शन देऊन पतितांचा उध्दार करुन वचनपूर्ती करतो. असे एका जनार्दनीं या अभंगात म्हणतात.


घेऊनियां परिवारा | आला असे पंढरपुरा ||१||
भक्ता पुंडलिकासाठीं | उभा ठेवुनी कर कंटीं||२||
केशर कस्तुरी चंदन टिळा | कांसे शोभे सोनसळा||३||
वामांकीं शोभे रुक्मिणी | शरण एका जनार्दनीं ||४||

भावार्थ

वैकुंठीचा राणा भक्त पुंडलिकासाठी परिवारासह पंढरपुरा आला. केशर,कस्तुरी मिश्रीत चंदनाचा टिळा कपाळीं रेखून,पिवळा पितांबर लेवून,दोन्ही कर कटावर ठेवून विटेवर समचरणी उभा ठाकला आहे. डाविकडे रुक्मिणी शोभून दिसत आहे. एका जनार्दनीं विठ्ठल भेटीचे असै वर्णन या अभंगांत करतात.


एकरुप मन जालेंसें दोघांचे | देव आणि भक्तांचे रूप एका ||१||
पुंडलिका कारणें समुच्चय उभा | त्रैलोक्याची शोभा पांडुरंग ||२||
ध्यातां चित्त निवे पाहतां पहावें | एका जनार्दनीं साठवीं हृदयीं रुप ||३||

भावार्थ

देव आणि भक्तांचे मन एकरूप झाले.स्वर्ग, पृथ्वी, पाताळ या तिन्ही भुवनांत शोभून दिसणारे परब्रह्म पांडुरंग आणि भक्तीप्रैमाने कृतार्थ झालेला भक्तराज पुंडलिक यांच्या रुपाचे ध्यान लागले असतां चित्ताला विलक्षण शांतीसुखाचा लाभ होतो.एका जनार्दनीं म्हणतात, हे रुप हृदयांत सांठवावें.


ऐशी आवडी मीनली सुखा |देव उभा भक्तद्वारीं देखा ||१||
धन्य धन्य पुंडलिका | उभे केले वैकुंठनायका ||२||
युगे अठ्ठावीस नीट | उभा विटे कर ठेवुनियां कर ||३||
एका जनार्दनीं शरण जाऊं | काया वाचा मनें त्यासी ध्याऊं ||४||

भावार्थ

भक्ताच्या भक्तिप्रेमाने सुखावलेला पांडुरंग भक्ताच्या दारी अठ्ठाविस युगांपासून कर कटीवर ठेवून उभा आहे. वैकुंठनायकाला भक्तिरंगात रंगवून टाकणारा पुंडलिक धन्य होय असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, या देव भक्ताला शरण जावें, देहाने, वाचेने, मनाने त्यांचे सतत चिंतन करावे.


विठ्ठल रुक्मिणी राही सत्यभामा | एकरुपी परमात्मा पंढरीये ||१||
कैवल्य उघडें क्षीरसागर निवासी | तपे पुंडलिकासी वश्य जाहलें ||२||
अणुरेणुपासोनि भरूनि उरला | तो म्यां देखियेला पंढरिये ||३||
एका जनार्दनीं सांवळा श्रीकृष्ण | जनीं जनार्दन पूर्ण भरला ||४||

भावार्थ

क्षीरसागरांत निवास करणारा कैवल्यदानी परात्पर परमात्मा रुक्मिणी,सत्यभामेसह भक्त पुंडलिकाच्या तपाने प्रसन्न होऊन पंढरींत आले. जे परब्रह्म विश्र्वातील सर्व अणुरेणुंत भरून उरले ते पंढरींत पहायला मिळाले. एका जनार्दनीं म्हणतात, सावळ्या श्रीकृष्णाचे हे विश्वव्यापी रुप सर्व जन मानसांत प्रतिबिंबित झाले आहे.


कैसा पुंडलीका उभा केला | वैकुंठाहुनी भक्ती चाळविला ||१||
नेणें रे कैसे वोळलें | अधीन केलें आपुलिया ||२||
दर्श़नमात्रें प्राणिया उध्दार | ऐशी किर्ति चराचरा ||३||
एका जनार्दनीं म्हणे पुंडलिका | भक्त शिरोमणी तूंचि लेखा ||४||

भावार्थ

एकनिष्ठ भक्तीने पुंडलिकाने वैकुंठ नायकाला आपल्या अधीन केलें.हा चमत्कार कसा झाला हे समजणे कठीण आहे.केवळ दर्शनाने सर्व प्रकारच्या प्राण्यांचा उध्दार होईल अशी किर्ति चराचरांत पसरली. एका जनार्दनीं म्हणतात,पुंडलिक भक्त शिरोमणी म्हणून ओळखला जातो.


डोळियाची भूक हारपली | पाहतां श्रीविठ्ठल माउली ||१||
पुंडलिके बरवें केलें | परब्रह्म उभें केलें ||२||
अठ्ठावीस युगें जालीं | अद्यापि न बैसें खालीं ||३||
उभा राहिला तिष्ठत | आलियासीं क्षेम देत ||४||
ऐसा कृपाळु दीनाचा | एका जनार्दनीं साचा ||५||

भावार्थ

पुंडलिकाच्या अनन्य भक्तीने प्रत्यक्ष परात्पर परब्रह्म पंढरींत विटेवर उभे केले.अठ्ठावीस युगांपासून परमात्मा तिष्ठत उभा आहे.दर्शनास येत असलेल्या भक्तांना ईच्छादान देत आहे. दीनदुबळ्यांना कृपेची सावली देत उभा आहे. एका जनार्दनीं म्हणतात, भक्तराज पुंडलिकाचा सर्व भक्तांवर हा मोठा उपकार आहे. श्रीविठ्ठलाच्या दर्शनाने डोळ्यांचे पारणे फिटले.

१०

म्हणती दक्षिण द्वारका | पुण्यभूमी वैकुंठ लेखा |
पाहूनिया पुंडलिका | राहिलासे उभा विटेवरी ||१||
काय वर्णावा महिमा|न कळेचि आगम निगमा |
वेदादिक पावले उपरमा | जयासी पैं वर्णितां ||२||
तो आला आपुले पायीं | भक्त इच्छा धरूनी हृदयीं |
एका जनार्दनीं साची | सर्वांवरीं सारखी ||३||

भावार्थ

पंढरी दक्षिण द्वारका या नावाने ओळखली जाते.पंढरी वैकुंठा सारखी पुण्यनगरी आहे अशी भक्तांची श्रद्धा आहे.पुंडलिकाला पाहून विटेवर समचरणीं उभा राहिलेल्या विठ्ठलाचा महिमा वर्णन करणे अशक्य आहे. चार वेद आणि सहा शास्त्रे यांनाही हे परब्रह्म स्वरुप पूर्णपणे जाणता आले नाही. ज्याचे वर्णन करतांना वेद मूक झाले. असा पंढरीचा राणा स्वता:च्या पायाने पंढरींत आला.भक्त पुंडलिकाच्या भेटीसाठी तिष्ठत उभा राहिला आणि भक्ताचे मनोरथ पूर्ण करण्यासाठी वरदान दिले.या पांडुरंगाची सर्व भक्तांवर सारखीच माया आहे असे एका जनार्दनीं सांगतात.


११

उभा पुंडलिकापुढें |कटीं कर ठेउनी रुपडें ||१||
पाहतां वेडावलें मन| शिवा लागलेंसे ध्यान ||२||
सनकादिक वेडावले | तें पुंडलिकें भुलविले ||३||
भक्तां देखोनि भुलला |एका जनार्दनीं सांवळां ||४||

भावार्थ

कर कटीवर ठेवून विटेवर उभा असलेल्या सावळ्या सुंदर पांडुरंगाचे रुप मन वेडावून टाकते,सनकादिक ऋषीं या दर्शनासाठी आतुर होतात आणि शिवशंकराला या रुपाचे ध्यान लागते. एका जनार्दनीं म्हणतात, सावळा श्रीहरी भक्तराज पुंडलिकाची प्रेमभक्ती पाहून भुलला.

१२

आला पुंडलिकासाठीं | उभा सम पाय विटीं ||१||
विठु मदनाचा पुतळा | भुलावणा तो सकळां ||२||
अराध्य दैवत शिवाचें | कीर्तनी उघडाची नाचें ||३||
एका जनार्दनीं मन | वोवाळावें पायांवरून ||४||

भावार्थ

पंढरीचा विठुराया मदनाचा पुतळा असून सर्व भक्तांना भुलवाणारा आहे. शिवशंकराचे आराध्यदैवत असलेला परमात्मा कीर्तनाच्या रंगात देहभान विसरून नाचतो. विठ्ठलाचे असे वर्णन करुन एका जनार्दनीं म्हणतात, पुंडलिकाच्या भक्तीनें वेडा होऊन पंढरींत आलेला परमात्मा समचरणीं विटेवर उभा आहे. त्या भक्तवत्सल पांडुरंगाच्या चरणांवरुन मन ओवाळून टाकावें.

१३

सर्वांचे जे मूळ सर्वांचे जें स्थल | ते पदयुगल विटेवरी ||१||
साजिरें साजिरें कर दोन्हीं कटी| उभा असे तटी भीवरेच्या ||२|
नये ध्याना मना आगमाच्या खुणा | कैलासीचा राणा ध्यात जया ||३||
एका जनार्दनीं पुरे परता दुरी | पुंडलिकाचे द्वारीं उभा विटे ||४||

भावार्थ

सर्व चराचर सृष्टी जेथुन उत्पन्न झाली आणि ही सृष्टी जेथे विलीन होते ते परात्पर परब्रह्म भीवरेच्या तीरावर साजिरे गोजिरे कर कटीवर ठेवून विटेवर उभेठाकलेआहे.पराकाष्ठेची योगसाधना करुनही योगी जनांना ध्यानांत सापडत नाही,वेद,पुराणे ज्या स्वरुपाचे यथार्थ वर्णन करु शकत नाही,कैलासीचा राणा निरंतर ज्याचे ध्यान करतो.जे स्वरुप परावाणीच्या पलिकडे ब्रह्मलोकांत निवास करते ते परब्रह्म पुंडलिकाचे दारी विटेवर उभे आहे असे एका जनार्दनीं या अभंगात वर्णन करतात.

१४

ॐकार सह मकार आदि अंत नाहीं जया |
ते पुंडलिकें भुलवोनी आणिलें या ठायां ||१||
भुललें वो माय पुंडलिकाप्रीती|
उभाचि राहे परी खेद न करी चित्तीं ||२||
अठरा पुराणांसी वाढ शास्त्रे वेवादिती |
तो सांवळा श्रीकृष्ण उभा विटे पुंडलिकाचे भक्ती ||३||
वेद वेदांतरें मत मतांतरें न कळे श्रुती पैं वेवादती |
तो एका जनार्दनाचे हृदयीं सांवळा घेऊनि बुंथी ||४||

भावार्थ

ब्रह्मा, विष्णु, महेश ही तिन्ही ज्या स्वरुपांत एकवटलेली आहेत ,ज्याचा आरंभ आणि अंत वेदशास्त्रांना आकलन होत नाही असे परब्रह्म सच्चिदानंद स्वरुप पुंडलिकाने भक्ती रसाने भुलवून आणले. अठ्ठावीस युगांपासून चित्तांत खेद न करतां सावळा श्रीहरी विटेवर उभा राहिला आहे. वेदशास्त्रे, श्रुती या परब्रम्ह स्वरुपाविषयी विविध प्रकारची मते व्यक्त करुन वादविवाद करतात.असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात,चित्तांत या सावळ्या श्रीहरीला धारण करुन त्याचे ध्यान करावे.

१६

परात्पर परिपूर्ण सच्चिदानंदघन | सर्वा अधिष्ठान दैवताचें गे माय||१||
तें लाधलें लाभलें पुंडलिकाचे प्रीती | येत पंढरीप्रती अनायसें गे माय ||२||
जगदंबा पसारा लपवोनि सारा गे माय| धरियेला थारा पुंडलिकाचेनि प्रेमें गे माय ||३||
ओहं मा न कळे कांहीं सोहं देती ग्वाही गे माय | काहमाची तुटली बुंथी एका जनार्दनीं प्रीती गे माय ||४||

भावार्थ

सर्व चराचर सृष्टी ज्या देवतेच्या आधाराने निर्माण होते आणि लयास जाते असा चिरंतन,आनंदस्वरुप परिपूर्ण परमात्मा भक्त पुंडलिकाच्या भक्तीप्रेमाने सर्व भाविकांना लाभला.अनायसे पंढरींत अवतरला. मायेचा सारा पसारा बाजूला सारुन पुंडलिकाच्या प्रेमाचा आसरा घेतला. एका जनार्दनीं म्हणतात, परब्रह्म परमात्म्याच्या दर्शनाने मी कोण ?या संशयाचे निराकरण झाले आणि देव आणि भक्त यांच्या एकरुपतेचा प्रत्यय आला.

१७

वर्णितां वेदमती कुंठित पैं जाली | पुराणें भागलीं विवादितां ||१||
सोपारा सुगम पुंडलिकापाठीं | उभा जगजेठी विटेवरीं ||२||
लक्ष्मी ते स्वयें रुक्मिणी शोभत | विंझणैं वारीतसत्यभामा ||३||
सांडुनि रत्नकिळा गळां तुळसीमाळा | चंदनाचा टिळा कैशरयुक्त ||४||
गोपाळ गजरें आनंदे नाचती | मध्ये विठ्ठलमूर्ति प्रेमे रंगें ||५||
मनाचे मोहन योगाचे निजधन | एका जनार्दनीं शरण विटैवरीं ||६||

भावार्थ

ज्या स्वरुपाचे वर्ण़न करतांना वेदांची मती कुंठित झाली, ज्याचा स्वरुपाचा यथार्थ निर्णय करतांना अठरा पुराणे वाद-विवाद करुन थकून गेली. असा जगजेठी पुंडलिकाच्या अनन्य भक्तीने भाविकांना सहजसोपा झाला. विटंवर रुक्मिणी सह उभ्या असलेल्या श्रीहरीला सत्यभामा पंख्याने वारा घालीत आहे. मौल्यवान रत्नहाराचा त्याग करून श्रीहरीने तुळशीची माळ परिधान केली आहे.केशरयुक्त चंदनाचा टिळा कपाळावर शोभून दिसतो.विठ्ठलाचे सभोवती गोपाळ हरीनामाचा गजर करुन आनंदानै नाचत आहेत. सर्वांचे मन मोहून टाकणारा या योगेश्वर श्री कृष्णाला एका जनार्दनीं अनन्य भक्तीने शरण जातात.

१८

स्थूल ना सूक्ष्म कारण ना महाकारण | यापरतां वेगळाचि जाण आहे गे माय ||१||
पुंडलिकाचे प्रेमें मौनस्थ उभा | कोणा न बोले उगला उभा ठेला गे माय ||२||
निंद्य वंद्य जगीं याचे भेटीलागीं | दरुशनें उध्दार वेगीं तयां गे माय ||३||
ऐसा लाघवी खेळ खेळोनी निराळा | एका जनार्दनीं डोळां देखिला गे माय ||४||

भावार्थ

स्थूल, सूक्ष्म,कारण व महाकारण या चारही देहांपेक्षा वेगळा असलेला पांडुरंग पुंडलिकाच्या अनन्य भक्तीप्रेमाने मुकपणे विटेवर उभा आहे. एका शब्दानेही कोणाशी संभाषण न करता, वंदनीय तसेच निंदनीय असा भेदभाव न बाळगता दर्शनास येणार्या सर्व भाविकांचा उध्दार करीत आहे.अत्यंत आपुलकीने भक्तांशी खेळ खेळणारा हा परमात्मा अलिप्तपणे निराळा आहे.असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात,असा हा निर्विकल्प पंढरीचा राणा डोळ्यांनी प्रत्यक्ष पहावयास मिळाला.

१९

अभक्त सभक्त दोघांसी सारखा दिसे | लवणी जैसैं न दिसे दुजेपण गे माय ||१||
ऐसा परात्पर सोइरा पुंडलिकाचे पाठीं | मौन्य वाक्पुटीं धरूनी गे माय ||२||
पुण्य पाप सर्व देखतसे दृष्टीं | चालवी सर्व सृष्टी गे माय ||३||
ऐसा वेषधारी उभा भीवरेतीरीं एका जनार्दनीं | अंतरीं दृढ ठसावे गे माय ||४||

भावार्थ

अभक्त आणि सभक्त तसेच पाप पुण्य असा भेदाभेद न करता सर्वांना समदृष्टीने अवलोकन करणारा, ह्या चराचर सृष्टीतिल सर्व व्यवहार अलिप्तपणे चालवणारा,नाना वेषधारी,बहुरुपी परात्पर परमात्मा भीवरेच्या तीरावर भक्त पुंडलिकाचा सोइरा बनून त्याच्या पाठीशी मौन धरुन उभा राहिला आहे.परब्रह्म परमात्म्याचे हे रुप अंत:करणांत कायमचे दृढपणे धारण करावे अशी ईच्छा एका जनार्दनीं या अभंगात व्यक्त करतात.

२०

विठ्ठल सांवळा पंढरीये उभा | धन्य त्याची शोभा शोभतसे||१||
पुंडलिका मागें कर ठेवूनी कटीं | समपाय विटीं देखियेला ||२||
राही रखुमाई शोभती त्या बाहीं | वैष्णव दोही बाहीं गरूडपारी ||३||
एका जनार्दनीं पाहूनियां ध्यान | मनाचे उन्मन होत असे ||४||

भावार्थ

सांवळा श्रीहरी भक्तराज पुंडलिकाच्या मागे दोन्ही हात कमरेवर ठेवून, विटेवर समचरण ठेवून गरुडपारी उभा आहे. विठ्ठलाच्या बाजूला रुक्मिणी शोभून दिसत आहे. वैष्णवांचा मेळा सभोवताली जमला आहे. एका जनार्दनीं म्हणतात, विठोबाचे हे नयनरम्य रुप पाहून मन परमात्म्याच्या रुपाशी एकरुप होऊन उन्मनी (उच्चतर अवस्थेत ) स्थिर होते.

२१

अणुरेणुपासोनि सबाह्य भरला | भरुनी उरला संतांपुढे ||१||
उघडाचि दिसे सर्वां ठायीं वसे | मागणेचि नसे दुजें कांहीं ||२||
कर ठेवुनि कटीं तिष्ठत रहाणें | वाट ते पहाणें मागेल कांहीं ||३||
चंद्रभागा तीर पुंडलिकासमोर | एका जनार्दनीं हरिहर उभे राहाताती ||४||

भावार्थ

चराचर सृष्टीतिल अणुरेणुंमध्यें अंतरबाह्य व्यापून उरलेला हा परमात्मा उघडपणे संतासमवेत उभा ठाकला आहे.कर कटीवर ठेवून पुंडलिकासमोर तिष्ठत उभा आहे. चंद्रभागेच्या तीरावर मुकपणे उभ्या असलेल्या सांवळ्या श्रीकृष्णाच्या दर्श़नासाठी शिवशंकर विष्णुसह उभे आहेत असे एका जनार्दनीं म्हणतात.

२२

ध्वज वज्रांकुश शोभती चरणीं | तो उभा रंगणीं वैष्णवांचे ||१|
झळकतसे हातीं पद्म आणि गदा | पुंडलिक वरदा उभा विटे ||२||
चरणीं भागीरथी गंगा ती शोभली | भक्तांची क्षाळिली महत्पापें ||३||
एका जनार्दनीं सकळ तीर्थराव | उभा राहे प्रभव विटेवरी ||४||

भावार्थ

ध्वज,वज्र,अंकुश ज्याच्या चरणीं शोभून दिसतात, करांत कमळ आणि एका हातीं गदा घेऊन पुंडलिकाला वरदान देणारा श्रीहरी विटेवर उभा आहे.गंगा भागिरथी प्रमाणे चरण स्पर्शाने