आंबुशी

विकिबुक्स कडून

आंबुशी किंवा आंबुटी (हीं. चंगेरी, चंपामेथी, अमरूल गु. आंबोलो क. हुळितिन्निचेगिड सं. अम्लिका, शुक्लिका इं. इंडियन सॉरेल, क्रीपिंग सॉरेल लॅ. ऑक्सॅलिस कॉर्निक्युलेटा कुल-ऑक्सॅलिडेसी). ही लहान, तीव्र वासाची व आंबट चवीची भुईसरपट वाढणारी तण वनस्पती आहे. तिचा प्रसार भारताच्या उष्ण भागात सर्वत्र असून हिमालयात २,७०० मी. उंचीपर्यंत व श्रीलंकेतही आहे. हिची पाने संयुक्त, हस्ताकृती, त्रिदली व बारीक पण लांब देठाची दले फार लहान देठाची, व्यस्त हृदयाकृती, फुले कक्षास्थ, अर्धवट चवरीसारख्या फुलोऱ्यात ऑक्टोबर-मेमध्ये येतात. पाकळ्या पाच, सुट्या, पिवळ्या व लांबट बोंड लांबट, पंचकोनी व टोकदार असून त्यात अनेक गोलसर, भुऱ्या व अध्यावरणयुक्त बिया असतात अध्यावरण बियांच्या कठीण सालीपासून अलग होताना बी बाहेर फेकले जाते.

पाककृती[संपादन]

  • कृती १
साहित्य - आंबुशीची पाने, कांदा, लसूण, गूळ, शेंगदाणा कूट, हिरवी मिरची, मीठ इ.
कृती - प्रथम भाजीची पाने स्वच्छ धुऊन आणि चिरून घ्यावीत. कढईत तेल तेल गरम करून त्यात कांदा परतून घ्यावा. मग त्यामध्ये लसूण, हिरवी मिरची चिरून घालणे. वरून आवश्यकतेनुसार मीठ घालावे. हिरवी मिरची ऐवजी लाल मिरचीपूड देखील घालू शकता. शेवटी त्यात किसलेला गूळ आणि शेंगदाणे कूट घालून भाजी शिजवणे.
  • कृती २
साहित्य - आंबुशीची पाने, तूरडाळ / मूगडाळ / मसूरडाळ, शेंगदाणे कूट, हिरव्या मिरच्या, तेल, डाळीचे पीठ, लसूण, मोहरी, हिंग, हळद, मीठ गूळ इ.
कृती - प्रथम भाजीची पाने स्वच्छ धुऊन आणि चिरून घ्यावीत. आंबुशीची भाजी व डाळ कुकरमध्ये शिजवणे. गॅस वरून खाली उतरवून घोटून त्यात डाळीचे पीठ मिसळणे. मग कढईत तेल गरम करून त्यात मोहरीची फोडणी देऊन लसणाचे तुकडे टाकणे. या फोडणीत घोटलेली भाजी, मिरची पेस्ट, हळद, मीठ, शेंगदाणेकूट व गूळ घालून थोडेसे शिजवणे.
  • कृती ३
साहित्य - आंबुशीची भाजी, डाळीचे पीठ, तेल, मोहरी, हिंग, हळद, गूळ, मीठ, काळा मसाला, लसूण, मिरचीपूड किंवा लाल मिरच्या इ.
कृती - प्रथम कढईत तेल घेऊन त्यात फोडणी करून भाजी परतून घेणे. मिरची पूड, मीठ आणि काळा मसाला टाकून वाफ येईपर्यंत शिजवणे. मग त्यात किसलेला गूळ घालावा. नंतर डाळीचे पीठ घालून ढवळून थोडे गरम पाणी देऊन शिजवणे. एका लहान कढईत तेलाची फोडणी करून त्यात लसणाच्या पाकळ्या आणि लाल मिरच्याचा तडका देऊ भाजीवर ओतावा.

संदर्भ[संपादन]