अहिराणी भाषेतील जात्यावरल्या ओव्या
Jump to navigation
Jump to search
पुर्वीच्या काळी मुला-मुलींची लहानपणीच लग्नं होतं. जावा-जावा/ नणंद भावजयी दोघींनाही पहाटे उठुन जात्यावर ४-४ शेराचं (म्हणजे ८ किलो/पायलीभर) दळण करावं लागे.आधी घट्याची/ जात्याची हळद-कुंकु वाहुन पुजा करण्यात येइ. एवढं दळण दळतांना गाण्यात येणा-या ओव्यांमधे काही परंपरागत तर काही लगेच सुचलेल्या ओव्यांचा समावेश असे. मग त्यात नणंद-भावजयींचे खटके असो, त्या त्या काळातली परिस्थिती असो, माहेरासारखा जिव्हाळ्याचा विषय असो कि अध्यात्म सगळ्यांचच प्रतिबिंब दिसतं.
- सकाये उठुनी रामाच नाव घेऊ
मंग धरतीमातेवर पाय देवा ठेऊ'
- सकाये उठीसन झाडु वट्याची पायरी
- माले गं सापडनी लड मोत्याची गुह्यरी
- अंगणात खेळे बाळ कोणाचा लह्यरे
- त्याच्या गं कमरेत साखळी दुह्यरे'
- शेजी घाले सडा, मन्हा सड्याला भिडूनी
- नादान हरी मन्हा, आला रांगोळी मोडोनी'
- पह्यले गाऊ ओवी गं रामराया सजनाला
- गाडीवर जाती, घुंगरु त्याच्या इंजनाला
- '
- पारोळ झालं जुनं, नाशिक जमाबंदी
- कोनी हौसानं बांधिली, आरधी मुंबै पान्यामंदी'
- काय पुण्य केलं तुम्ही नाशिकच्या बाया
- गंगेची आंघोळ, दर्शनाला रामराया'
- काय पुण्य केल तुमी, नाशिकचे लोक
- गंगेची आंघोळ, दर्शनाला गायमुख'
- रामकुंडावरी ढवळ्या धोतराची जोडी
- आंघोळीला येती रामलक्ष्मणाची जोडी'
- रामकुंडावरी ओल्या धोतराचा पिळा
- आंघोळीला येती साधुसंताचा मेळा
- आरध्या रात्री कोण चालला एवढ्या राती
- महादेव पार्वती हा कंदील डाव्या हाती'
- देवा रे महादेवा, काय बसला डोया लाई
- पृथमी ( पृथ्वी) ढुंढल्यानी जोडी मारुतीला न्हाई'
- भोळा रे शंकर, भोळं तुझं घेण देण
- तुझ्या बेलामधे मला सापडल सोनं'
- राम-लक्ष्मण नि ही तिसरी सिताबाई
- पृथमीमधे जोडा मारुतिला न्हाई'
- सिता सांगे कथा तिन्ह्या करमनी (कर्माची)
- राम सांगे कथा देवधरमनी (देवधर्माची)
- शितेला सासरवास रामाच्या मावशीचा
- असा वाळुन गेला हिरवा बाग तुळशीचा'
- सितेला सासुरवास रामाला कसा कळे
- रामाचे रामफळे रुमाले रस गळे'
- सितेला सासरवास, सासू कैकयीने केला
- रामासारखा भरतार हिने भोगु नाही दिला'
- गरीब दुबळा (कसा ही असो) बंधु गं असावा
- दिवाळी दसरा एका रातीचा इसावा'
- भाऊ बहिणीचं भांडण तिथ कशाचा रागरोस
- भाऊला ओवाळायला, भाऊबिजेचा एक दिस'
- शिंपीच्या दुकानी उच्च खणले मारु खडा
- शिंपी भाऊ मोठा येडा, भाऊ बहिणीना सौदा मोडा'
- पापी रे मानसा, हा बसला बाजारात
- लोकाची लेक बाया याने घेतली नजरात
- माझ्या घरी गं पाहुणे करु आताचा दहीभात
- भाऊ गं पाहुणा, बुंदी छाटु सारी रात'
- झाली संध्याकाळ, संध्याकाळले मान देऊ
- स्वर्गी गेले माझे पिता, दिवा लावुन पाणी पिऊ
- आली सही सांज, आला वांझोटीचा फेरा
- सांगते सुनबाई, पदराखाली झाक हिरा'
- माझा भाऊ आला आज, माझा भाचा आला
- लई गं दिस झाले, आत्या माहेराला चाल काल'
- उन्हाळ्याचं उन्ह, ऊन लागे कपाळाला
- नादान बंधु माझा, छत्री साजे गोपाळाला'
- सासु आत्याबाई, तुमच्या पदराला ववा(ओवा)
- जाते माहेराला, माझ्या पतीला जीव लावा
- शिता भावजाई, तुझा गं मला राग येतो
- चतुर भाऊ माझा हाताने पाणी घेतो'
- वडील माझा लेक देर जेठच्या बरोबरी
- पुसती जन लोक कुठे गेले हो कारभारी
- गावातल्या गावात भाऊ बहिणीशी बोलेना
- आस्तोरी(बायको)च्या पुढे त्याचा विलाज चालेना'
- गावातल्या गावात साला बहिणोईचं नातं
- भाऊ कसा म्हणे नित्य होतो रामराम'
- भाऊ गं आपला, भावजाई गं लोकाची
- तिच्या गं पोटची, भाची गं आपल्या गोताची'
- सांगस भाऊ तुले भेटी जाय उन्हाळ्यात
- पानीपाऊसना माले, चार महिना धाक'
- मामा गं भाच्याची झुंज लागली खिंडीत
- पुसती जनलोक मायलेकीचा पंडीत'
- नणंद भावजाया आम्ही एका चालणीच्या
- बाहेर गं निघाल्या सुना कोण मालणीच्या'
- देराण्या जेठाण्या आपण काळ्या साड्या नेसु
- बाहेर गं निघु सुना वकीलाच्या दिसु
- दिवाळीच्या दिवशी माझ्या ताटातले गहू
- असे ओवाळीले पाची पांडव माझे भाऊ'
- दिवाळीच्या दिवशी माझ्या ताटामधे मिरे
- असे ओवाळीले मायबाई तुझे हिरे
- माय माय करु , माय तांबानी परात
- मायवाचुनि चित्त लागेना घरात
- मायेने दिल्या घुट्या जायफळ-एखंडाच्या
- काम करी करी माझ्या दंड-बाह्या लोखंडाच्या
- काम करती नारी, तुले काम करी जाऊ
- माऊलीनं दूध, मी हारले ना जाऊ
- भाऊ करु याही, बाप म्हने नको बाई
- आताना भावजाया मान ठेवणार नाही
- जाउ माहेराले, उभी राहु एकीकडे
- भाचाले लेऊ कडे, भावजाई पाया पडे'
- भाऊ करी याही, माले भाचीसून सोभे
- तोडा पैंजनानं मन्ह तळघर वाजे'
- भाऊ करु याही माले पैसानी जोखम
- भाची करु सून पोरी चांदीनी रकम
- गाडीमागे गाडी, एक गाडी आरशाची
- भाऊले झाया लेक, चिठ्ठी आली बारशाची'
- नादान मनू मन्ही, तुन्हा परकराले मोती
- धुळ्यात नांदती, मामा तुझे लखोपती'
- देव रे मारुति, हा पानीना सगरले
- कशी पडु पाय, दोन्ही हात घागरले
- राम-लक्ष्मण ही तिसरी सितामाई
- रामाच्या पुढे चाले हा मारुति ब्रम्हचारी
- गायनं गोमतीर माझ्या अंगणी बाह्यरेला
- दूर नि ओळखला माझ्या भाऊचा हिरवा शेला
- भाऊ जाते बहिणीच्या गाई, घोडा बांधतो जाळीला
- पह्यले भेट पाव्हण्याला, मग भेटजो बहिणीला
- लिंबाच्या लिंबोळ्या लिंबाखाली पसरल्या
- पोटी आल्या लेकी, बहिणी भाची इसरल्या'
- कोण्या गाई(गावी) गेला, माझ्या पाठीचा रंगेला
- असा सुना लागे, तुन्हा बैठकी बंगला'
- सोनाराच्या मुला, नको जाऊ देशोदेशी
- हाती घेतली सांडशी, आता होतील गणपती'
- सईबहीना जोडु, माझ्या सारखी रंगिली
- सगळ्यात चमकली, हुभ्या खांबाची बिजली'
- सईबहिना जोडु, मुसलमाननी सारजा
- कपाळना कुंकू तिन्हा रामनी वरजा
- पंढरीच्या वाटे, कोणी लावली सुपारी
- खरेदी करे हा पंढरीचा बेपारी(व्यापारी)
- सरीले दळण, माझी सरती स्वस्तकी
- तलवारीचा मार, हेल्याच्या मस्तकी
- हेला: रेडा.
दळण संपत आले, आता माझी शेवटची ओवी ऐका! आज अशा एकावर एक इतक्या सुंदर ओव्या सुचल्या की जणु काय माझ्या संगतीला संत नामदेवांच्या घरच्या बायका होत्या.
- अहिराणी पारंपारिक मौखिक लोकगीतातून साभार