निबंध लेखन कसे करावे ?

विकिबुक्स कडून
Jump to navigation Jump to searchनिबंध लेखनाचा प्रकार आहे. निबंधाच्या अनेकांनी अनेक व्याख्या केल्या आहेत. नि+बन्ध+ बांधणे असा अर्थ विचाराला बांधणे आणि बंधन या अर्थाने वापरला जातो. निबंधात साधक-बाधक चर्चा असते.[१]


निबंध म्हण्जे नियमांनी बद्ध असणारा लेख, मोठा लेख, नीटपणे मांडलेला विचार, वेगवेगळ्या परिच्छेदातून विविध बाजू निबंधात मांडलेल्या असतात. निबंध हा लिहिण्याचा प्रयत्न असतो तेव्हा व्यवस्थित सुरुवात प्रयत्नपूर्वक विषय मांडणे हाच निबंधाचा उद्देश असतो.[१]

परिक्षेसाठी निबंध लेखन[संपादन]

निबंधाचे दोन प्रकार १) माहितीवजा निबंध आणि २) प्रबोधनासाठी लिहिलेले निबंध. [१] पहिल्या प्रकारातील निबंध शालेय पातळीवरचा माहितीवजा निबंध असतो, तर दुस-या प्रकारचा निबंध हा शिक्षित व्यक्तींना बहुश्रुत करण्यासाठी लिहिला गेलेला निबंध असतो.[१]

निबंध या शब्दाचा अर्थ सांगतांना मो.रा. वाळंबे म्हणतात निबंध या शब्दाचा अर्थ बांधणे, गुंफणे, जुळविणे, असा आहे. निबंधात जी आपण जुळणी किंवा गुंफणी करतो ती आपल्याला सुचणार्‍या विचारांची. एखाद विषय निबंधलेखनाला दिला, की त्याच्याबद्दलचे अनेक विचार आपल्या मनात एकत्र गर्दी करतात, पण ते सारेच विचार दुसर्‍याला सांगण्यासारखे असतात असे नाही, शिवाय सुचणारे विचार खुप विस्कळीत असतात, हे असे सुचणारे विचार आपण एकत्रीत करतो.[१]

तंत्र[संपादन]

परीक्षा हे एक तंत्र आहे. तीन तासांत पंधरा गुणांसाठी एक निबंध अर्ध्या तासात लिहायचा असतो. विद्यार्थी दिलेल्या विषयावर विचार करत बसेल तर तो निबंध पूर्ण होणार नाही.[२]

काही संभाव्य विषयांची (१) अगोदर माहिती गोळा करून ठेवणे हाच पर्याय उरतो. नंतर ऐनवेळी विषयाचा रोख (२) पाहून त्याला मध्यवर्ती ठेवून आपल्याकडची माहिती सुसंगत (३) मांडत जायचे हे तंत्र आत्मसात करायचे. [२] प्रा.डॉ. दिलीप बिरुटे यांच्या मतानुसार, आकर्षक सुरुवात. व्यवस्थित मांडणी, भाषा, वाचकांना लावणारी उत्सुकता निबंधात असली पाहिजे, उत्तम सुरुवात, विषयाची मांडणी आणि योग्य समारोप तुमचा निबंध उत्तम ठरवतो. [१]

"सोनेरी अक्षरांची ओळ" या अनुदिनीत शिक्षीका प्राजक्ता, त्यांचा लेखन कार्यशाळेचा अनुभव नमूद करताना, लेखनाचे अगदी सोपे बेसीक तंत्र सांगतात. यात लेखन करणे चालू करू इच्छित असलेल्या व्यक्तीने तीन कागद, पेन्सील्स, क्रेयॉन/रंग, आणि पेन सोबत ठेवावा. पहिल्या कागदावर एका मिनीटात तुम्हाला आठव्णारे विषय (कोणतेही, विशीष्ट निबंधाचेच असे नाही) लिहावेत. त्यातील त्याक्षणी सर्वाधिक आठवतोय असे वाटणाऱ्या कोणत्याही विषयाचे दुसऱ्या कागदावर पाच मिनीटात जसे जमेल तसे चित्र किंवा नकाशा काढावा. सर्वच गोष्टी चित्र किंवा नकाशात दाखवून होणार नाहीत, ज्या गोष्टी चित्रकागदावर दर्शवणे जमले नाही किंवा वेळ पुरला नाही पण त्या वेळी आठवताहेत त्या सर्व गोष्टी तीसऱ्या कागदावर आठव्णींच्या स्वरूपात लेखनाचे संपूर्ण स्वातंत्र्य घेऊन लिहून काढाव्यात. अशा पद्धतीने लेखनाचा सराव करून, स्वत:च्या लेखनातील स्वत:ला सर्वाधिक आवडलेल्या ओळ वेगळ्या लिहूनही ठेवता येऊ लागतील. [३] ज्यांना लेखन अवघड वाटते त्या सर्वांसाठी ही एक चांगली पद्धत आहे.

आराखडा[संपादन]

निबंधाचा आराखडा ही एक लेखनाची सर्वमान्य पध्दत स्विकारलेली असते आणि त्याच क्रमाने विदयार्थ्याँनी जावे अशी परिक्षकांची अपेक्षा असते. [२]

 • (अ) सुरुवात अथवा विषयाची ओळख / परिचय परिच्छेद
 • (ब) गाभा अथवा विषयाला धरून माहिती लिहिणे.
 • (क) समारोप

सुरुवात : शीर्षक आणि प्रस्तावना.[संपादन]

यात सुरुवात अथवा मूळ विषयाकडे वाचकाला नेणे.[२]

तुमच्या निबंधात तुम्ही कोणते विचार मांडणार आहात त्याची एक झलक दिसेल असे शिर्षक असावे. ते एखादे वाक्य अथवा प्रश्नार्थकही देऊ शकता. फार लांबलचक नको.अगदी लगेच वरच्या ओळीत ते पेन्सलने लिहा. निबंध पूर्ण लिहिल्यावर एखादे अधिक चांगले शीर्षक सुचल्यास ते बदलता येईल.

प्रस्तावना: विषयाची तोंड ओळख अथवा परिचय[संपादन]

वाचकास पहिल्या परिच्छेदातून करून द्यायचा आहे. पर्यावरणासाठीचा विषय असेल तर पहिल्या वाक्यापासूनच आकडेवारी देणे योग्य ठरणार नाही.

रेल्वेतून प्रवासाला जात होतो. प्रवाशांनी चहाचे प्लास्टिकचे कप खिडकीतून बाहेर फेकलेले पाहिले आणि पर्यावरणाचे विचार सुचत गेले अशी सुरुवात करून पुढे निबंध वाढवता येईल.

खेळाचा विषय असेल तर अमुक दिवशी वर्गात शिक्षक शिकवत होते पण त्यांच्या बोलण्याकडे तुमचे लक्ष लागत नव्हते कारण संध्याकाळी टिव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या वल्डकपचीच उत्सुकता होती.असे निरनिराळे प्रसंग अथवा घटनांचे वर्णन करून तुम्ही वाचकांस निबंधाच्या मूळ विषयाकडे वळवू शकता.

मासिके,साप्ताहिके आणि शनिवार - रविवारच्या वर्तमानपत्रांच्या लेखांतून बरीच चांगली उदाहरणे मिळतील.

निबंधाचा गाभा[संपादन]

गाभा अथवा विषयाला धरून माहिती लिहिणे. कमीतकमी तीन मुद्दे असावेत. अगदी कालपरवाच्या एखाद्या घटनेचा उल्लेख करून जिवंतपणा आणावा आणि आपला चौकसपणा दाखवावा.[२]

इथे तुम्हाला चार परिच्छेदांत माहिती,वर्णन,मुद्दे मांडता येतात.निबंध कसा लिहावा आणि त्याहीपेक्षा कसा लिहू नये यासाठीच्या सर्वाधिक सूचना याच विभागासाठी असतात.

तुमच्या भाषाविषयक ज्ञानाची खरी कसोटी इथे लागते. पाठ करून निबंध लिहिला असेल तर तो चांगला लिहिला गेलेला असतो परंतू परिक्षकाला एक गोष्ट लगेच जाणवते ती म्हणजे तुमच्या इतर उत्तरांत आणि निबंधात भाषा वेगळी वाटू लागते.ती तुमची वाटत नाही.एकूण उत्तरे यथातथाच असतील तर अशा निबंधासही चांगले गुण देण्याचा कल राहतो.परंतू तुमचे गुण ८५ च्या वर जात असतीलतर परिक्षक नकारात्मक विचार करून बारा गुण द्यावेसे वाटत असले तरीही काही चुका काढून अकराच देईल. अशा काही चुका टाळायच्या आहेत.

लागोपाठच्या दोन वाक्यात एकाच शब्दाची पुनरावृत्ती होऊ न देता त्याच अर्थाचा दुसरा शब्द येऊ द्या.म्हणी आणि वाक् -प्रचारांचा अतिरेक नको. आक्षेपार्ह टीकाटिप्पणी नको.माहिती देतांना एकसूरीपणा टाळण्यासाठी उद्गारवाचक अथवा प्रश्नार्थक वाक्ये लिहा.इंग्रजी शब्दही टाळावेत अथवा संवादात वापरावेत. एखादा श्लोक,कवितेची ओळ उधृत करा.

समारोप[संपादन]

(क) समारोपात पुढील संभाव्य आणि आशावादी मत देऊन इतरांना आवाहन करता येईल.[२]

आपण मुख्य निबंधात तीन चार मुद्दे आणि एखाददुसरे विरोधी वैयक्तिक मत मांडून लिहिले आहे. वाचकास विषयाबद्दल आस्था उत्पन्न केली आहे. अजून काही घडणाऱ्या वाईट गोष्टींची खोच,खंत त्या दूर झाल्या तर बरे वाटेल ती इथे थोडा आशावादी दृष्टिकोन ठेवून व्यक्त करता येईल. क्रिकेटच्या खेळातले होणारे मैच-फिक्सिँग बंद होऊन त्यातला आनंद कसा वाढेल, फुटबॉलमधली मुख्य खेळाडूला होणारी धक्काबुक्की याविषयी लिहिता येईल.

आणखी एक मुद्दा इथे आवर्जून येऊ शकतो तो म्हणजे वाचकास महत्त्व देऊन केलेले आवाहन. मी इथे लिहिलेले अंतिम नसून तुमच्याकडेही बरेच काही असल्याचा विश्वास व्यक्त करायचा,त्याला सहभागी करून घ्यायचे. यातून आपण एक साखळीक्रिया सुरू करायला चालना देतो.पर्यावरण,पर्यटन,स्त्रियांची सुरक्षितता,सार्वजनिक स्वच्छता,संस्कृतिची जपणूक यांविषयी वाचकास काही करता येण्यासारख्या गोष्टी इथे लिहिता येतील.

निबंधलेखनाच्या दोनदिवसांतल्या घटनांची, उदाहरणार्थ एखाद्या अपघातातले मदतकार्य वगैरेची चर्चा करून तुम्ही तो ठोकळेबाज जड वाटणारा निबंधसुध्दा एका क्षणांत 'तुमचा' करू शकता आणि परिक्षकाला 'तुमचा'च निबंध हवा आहे.


शैली[संपादन]

शैली ही काही एका दिवसात येणारी लेखनकला नाही परंतू नाट्यमय मांडणी, विरोधाभास, उपरोधिक, उपहास, विनोदी, अलंकारिक, संवादात्मक विचार इत्यादी प्रकारांचा काही चांगला वापर करता आला तर करावा.[२]

लेखनसाहित्य आणि विस्तार[संपादन]

निबंध लिहिण्यासाठी काय हवे आहे त्या विषयी आता एकेक मुद्दा पाहू.[२]

पुस्तकांच्या दुकानांत निबंधांची वेगळी पुस्तके मिळतात काही निबंध 'गाइड'मध्येही असतात. मराठीचे लेखन आंतरजालावर वाढले आहे. तिथेही तयार साहित्य असणारच. खरोखर हे उपयोगाचे आहे का? चांगले लेखकच इथे (इंटरनेटवर) लिहितात असे समजू नये. ही माध्यमे ज्यांना जमली आहेत ते लिहितात असे म्हणता येईल. प्रसार माध्यमांत वर्तमानपत्रांचा क्रमांक वरचा आहे. इथेच सापडतील निबंधांचे संभाव्य विषय आणि माहिती.[४]वर्तमानपत्रांत रोज एकातरी विषयावर लेख येत असतो तो उपयोगी वाटल्यास कात्रण ठेवा. १५ ऑगस्ट,२६ जानेवारी,निवडणुकांच्या निकाला नंतर,मंगळयान मोहीम,खेळांच्या वल्ड कप, फिफा इत्यादी मोठ्या स्पर्धा झाल्यावर खूप लेख येतात. या दिवशींची वर्तमानपत्रे जमवावीत या सर्वाँतून भरपूर लेखनसाहित्य जमा होईल.बऱ्याच शहरांत मेट्रो येणार आहे त्याबद्दल तरुणांच्या प्रतिक्रिया आल्या त्याही हव्यात.प्रसिध्द सिध्दहस्त लेखकांच्या पुस्तकांतील घोटीव लिखाणापेक्षाही ही कात्रणेच अधिक उपयोगी पडतील.[५]

तुम्हाला क्रिकेटची आवड असली तरी थोडीफार फुटबॉल आणि प्रोकबड्डीचीही माहिती हाताशी ठेवावी लागेल. 'आजच्या खेळाचे बदलते स्वरूप' असा विषय आला तर फक्त क्रिकेटवर लिहिल्यास विषयाचा रोख समजला नाही असे वाटेल. निवडणुकांविषयी लेख जमा कराल त्याचवेळी 'मी पंतप्रधान झालो तर' असा काल्पनिक वळणाच्या विषयाला उचित असेही साहित्य तयार ठेवा.आंतरजालावर मंगळयानाची संपूर्ण माहिती मिळेल परंतू 'विज्ञानाच्या प्रगतीवर भारत' यासाठी गावातला तरूण कुठे आहे हेसुध्दा लिहावे लागेल. थोडक्यात माहिती गोळा करण्यात व्यापकता हवी.[५]


 • १)आजचे खेळाचे स्वरूप,
 • २)निवडणूका,
 • ३)लैंगिक शिक्षण असावे का?
 • ४)वाढता दहशतवाद,
 • ५)पर्यावरणाची जबाबदारी,
 • ६)प्रसारमाध्यमे आणि करमणूक,

हे विषय दहावीसाठी असले तरी आठवीपर्यँत त्यांचा रोख बदलेल. माझा आवडता खेळ,चित्रपट,सण ,विस्मरणिय सहल,आमचे शहर इत्यादी.[४]

सुसंगत मांडणी[संपादन]

आता आपल्याकडे विषयानुरूप सर्व लेखनसाहित्य आहे आणि ते निबंधाच्या आराखड्यात वेळेत लिहून पूर्ण करायचे आहे. ते कसे ते पाहू.पंधरा गुणांसाठी पंचेचाळीस ओळी लिखाण अपेक्षित असेल. सात आठ ओळींचा परिच्छेद धरल्यास सुरुवातीचा आणि समारोपाचा एकेक सोडून मुख्य विषयाच्या विस्ताराकरता चार परिच्छेद होतील.[६]

सरावासाठी प्रथम प्रत्येक परिच्छेदांत काय लिहायचे ते मांडून घ्या. एकदा लिहिण्यास सुरुवात केल्यावर खाडाखोड करता येत नाही आणि क्रम चुकल्यास सुसंगतपणा जातो. पाचसहा निबंधांचा अगोदर सराव करावा. परिक्षेच्यावेळी उत्तरपत्रिकेवरच एका ठिकाणी पेन्सलने क्रम लिहून घ्या.निबंध पूर्ण झाल्यावर खोडून टाका.एकूण सहा प्रश्नांपैकी निबंधाला दुसरे अथवा पाचवे स्थान देणे योग्य ठरेल असे वाटते. [६]

निबंधलेखनाचे जे वैचारिक, विश्लेषणात्मक, वर्णन, काल्पनिक, माहितीपर वगैरे पाच सहा प्रकार आहेत त्यापैकी एक आपला प्रत्येकाचा सोपा आणि आवडीचा असतो तर इतर अवघड वाटतील.कधी निबंधाचा विस्तार करणे तर कधी तो आटोक्यात ठेवणे कठीण वाटेल. दोन्हीँचे तंत्र साध्य करायचे आहे. [६]

हे लक्षात घ्या[संपादन]

विद्यार्थ्याचे वय आणि विचार त्याच्या लेखनात दिसायला हवेत. आत्मप्रौढी मात्र टाळावी. शुध्दलेखन हवेच. तयार निबंधातून ठोकळेवजा बोजड लिखाण लिहिले जाण्याची शक्यता जास्त. पेपरांतून युवा सदर असते त्यातून चांगली माहिती संकलित करावी. तयार निबंध कधीही पाठ करून लिहू नयेत.[४]

ए जी गार्डिनर या निबंधलेखकाच्या साचा पद्धतीने निबंध लेखन[संपादन]

समजा विषय "क्ष" असेल तर येणेप्रकारे परिच्छेद कल्पावे : [७]


 • "क्ष" विषय मनात यावा अशी रोजच्या व्यवहारातली घटना. या घटनेच्या संदर्भात "क्ष"विषयाबाबत काहीतरी प्रश्नचिन्ह असावे.
 • "क्ष" विषयाबाबत उलटसुलट मतप्रवाह अथवा वागणूक समाजात पुष्कळ ठिकाणी दिसते, अशी उदाहरणे. तसेच बराच काळ याबाबत उलटसुलट मतप्रवाह किंवा वागणूक दिसते, अशी उदाहरणे. येथे प्रसिद्ध व्यक्तींच्या वक्तव्यांची किंवा लेखनातली उद्धरणे देता यावी.
 • "क्ष" विषयाबाबत लेखकाचे अंतिम मत असणार आहे, त्याच्या विरुद्ध मतांचे हलक्या हाताने परिगणन. वस्तुतः "क्ष"विषयाबाबत "अमुक-तमुक" मुद्दे विचारात घेतले, तर लेखकाचा पटणारे मत उघड होते, ते मुद्दे ठसवणे. (१-२ परिच्छेद.)
 • "क्ष" विषयाबाबत मत लेखक म्हणतो तसे सार्वत्रिक झाले तर होणारे फायदे.
 • "क्ष" विषयाबाबत आता पटलेले मत सुरुवातीच्या घटनेला लागू करून त्या क्षुल्लक घटनेबाबतही द्विधा निस्तरावी. वाटल्यास शेवटचे वाक्य म्हणून पुन्हा सुटसुटीत वाक्यात निबंधातील "क्ष"विषयक मताचा सारांश द्यावा.

वरील चौकट जरी वादग्रस्त निबंधविषयांकरिता असली, तरी निर्विवाद विषयांकरिता सुद्धा चालेल. उदाहरणार्थ "सार्वजनिक स्वच्छता" हा विषय "निर्विवाद" आहे (अंतिम मत "सार्वजनिक स्वच्छता असावी"). परंतु विरुद्ध मत म्हणून "सोय, कचरापेट्यांची अनुपलब्धता" वगैरे विरोधी मुद्दे म्हणून सांगता येतात.

क्वचित वादविवादाकरिता नसलेले "वस्तुनिर्देश" निबंध असले तरी बारीकसारीक फेरफार करून वरील चौकट वापरता येते. "माझा गाव" विषय असेल तर "ग्रामीण विरुद्ध शहरी जीवन" असा विषय कल्पून वरील चौकट मांडावी, आणि माझा गाव माझ्या अंतिम मताचे ठळक उदाहरण आहे, अशा प्रकारे प्रत्येक परिच्छेद मांडावा.

साचे पद्धतीने निबंध लेखन, शंका आणि शंका निरसन[संपादन]

 • हे तंत्र म्हणून प्रचंड आवडलं. पण ह्याने एक साचा बनेल ना लिखाणाचा. उत्स्फूर्तता , वैविध्य कमी होणार नाही का ? [८]
धनंजय यांचे उत्तर:
साचा काहीसा आहे, पण कुठले मुद्दे आहेत, ते वाचकाला कितपत पटवून देतात, यावर निबंधाचा दर्जा खूप बदलतो.
वरील साचा थोडाफार या संगीत-साच्यासारखा आहे
आलाप (येथे तालवाद्य नाही. साधारणपणे खालच्या पट्टीतल्या स्वरापासून सुरू करून वरच्या पट्टीतले सूर रंगवत जावे.)
अस्ताई :
अन्तरा :
ताना, झाला :
हा साचा असला, तरी नावीन्यपूर्ण आणि भावणार्‍या रचनांकरिता प्रचंड वाव आहे.
निबंधाचा साचा संगीताच्या साच्यासारखाच सांधे साधलेला असावा. आलापातून अस्ताईकडे जाताना एकदम काहीतरी खाडदिशी थांबवून नवीनच काहीतरी सुरू केले असे वाटायला नको. त्याच प्रमाणे निबंधात एक परिच्छेद संपल्यावर दुसर्‍या परिच्छेदातला मुद्दा आपसूखच सुचला, असा तलम असला पाहिजे. गियर बदलताना गाडी गचकल्यासारखे भासायला नको. हे बहुतेक शाळकरी विद्यार्थ्यांना जमणार नाही : बहुतेक शिकाऊ गायकांना तरी संगीतात हे कुठे जमते? पण त्या शिकाऊ अवस्थेतही चौकट असल्याचा काही फायदा होतो, जेणेकरून ओबडधोबड का होईना, एक पूर्ण वस्तू वाचकासमोर ठेवता येते.
आणखी एक उपमा म्हणजे शिंपीकाम :
शर्टाला बाह्या, समोरचे दोन भाग, पाठ, खांद्याचा "योक" वगैरे तेच-ते भाग असतात. ही चौकट. (समांतर : निबंधाची चौकट)

तरी फॅशन-कलेकरिता भरपूर वाव असतो. (कलात्मक लेखन) फॅशन/नावीन्य नाही, पण ग्राहकाच्या वापरासाठी सुयोग्य असे शर्टही शिवणे बहुतेक शिंप्यांना शिकवले पाहिजे. (वर्तमानपत्रातले स्तंभलेखन. तांत्रिक रिपोर्टचा बिगर-तांत्रिक गोषवारा समजावून सांगणारा लेख.)

या उपमेने थोडेसे पटावे : नावीन्यासाठी वाव आहे, पण नावीन्य नसले तरीही उपयोगी निर्मिती होते, अशा चौकटीचे प्रशिक्षण हे शालेय अभ्यासक्रमाचे सुयोग्य ध्येय असू शकते.

उदाहरण १: माझा गाव (सांगाड्यावर विवक्षित मुद्दे चढवून)[संपादन]

उदाहरण : माझा गाव (सांगाड्यावर विवक्षित मुद्दे चढवून). जुळवलेली वाक्ये, पूर्ण बांधलेला निबंध मुद्दामून दिलेला नाही.विद्यार्थ्यांना निबंध सरावासाठी उदाहरण


(परिच्छेद १ : ) उन्हाळ्याच्या सुटीमध्ये गावी गेलो. जाताना तिथे असण्याची हुरहुर होती, परंतु एका महिन्यानंतर आपल्या शहराची फारफार ओढ लागली होती, ही गंमत. या परिच्छेदात गावाचे नाव, आणि जिल्हा/राज्य असा उल्लेख असावा. पुढच्या परिच्छेदाकरिता प्रसिद्ध उद्धरण नसले, तर तसे उद्धरण (बालगीत सुद्धा चालेल) येथे द्यावे.

(परिच्छेद २ : ) माझा गाव आणि माझे शहर यांच्यात मला वाटणारे भेद येथे सांगावेत. विषय "गाव" असल्यामुळे शहराबाबत मुद्दे थोडेच आणि मोघम असावेत. "शहरात हे नाही", हे अध्याहृतच असते, सांगण्याची गरज नाही. मात्र गावाबाबत मुद्दे मोघम नसावेत, वस्तुनिष्ठ असावेत. ("गावांमध्ये शेते असतात" असे नव्हे, तर "माझ्या गावात मामाच्या परसामागे काळ्याशार मातीची शेते पार क्षितिजापर्यंत जातात.") गावाचा इतिहास सांगावा.

(परिच्छेद ३/४ : ) गावामध्ये असलेल्या काही गैरसोयी सांगाव्या. बरीच मुले शाळेत जात नाहीत. विजेचे काही खरे नाही. प्रत्येक मुद्द्यानंतर "हे नसले, तरी ते आहे" प्रकारे गावाचे समर्थन करावे. येथेसुद्धा मुद्दे मोघम नसून त्या गावाकरिता विवक्षित असले तर चांगले.

(परिच्छेद ५ : ) गावात आवडतील असे अधिक मुद्दे. परंतु हे मुद्दे फक्त एका गावाला नव्हेत तर खूप गावांना लागू असावेत असे. परंतु हे मुद्दे आपल्या विवक्षित गावाबाबत सुचले अशी वाक्य रचना असावी : "घाईगडबड नसल्यामुळे शांतपणे विचार करण्यास वेळ मिळतो. शेते, गुरे अगदी जवळून बघितल्यामुळे आपले अन्न-वस्त्र कुठून येते त्याबाबत जाणीव होते."

(परिच्छेद ६ : ) "सुटीमध्ये गावात जाऊन हे सर्व मिळवतो-अनुभवतो, ते वर्षभर शहरातल्या आयुष्यात पुरते." सारांश "असा माझा गाव - पुन्हा पुढच्या वर्षी हुरहुर वाटू लागेल, असे."

उदाहरण २ : सार्वजनिक स्वच्छता (सांगाड्यावर विवक्षित मुद्दे चढवून)[संपादन]

जुळवलेली वाक्ये, पूर्ण बांधलेला निबंध मुद्दामून दिलेला नाही. विद्यार्थ्यांना निबंध सरावासाठी उदाहरण


(परिच्छेद १ : ) स्वच्छतेबाबत विरोधाभासी घटना, उदाहरणार्थ घर स्वच्छ केलेला कचरा गच्चीमधून गल्लीत टाकल्याचे बघितले. त्यामुळे शाळेचे कपडे खराब झाले

(परिच्छेद २ : ) वैयक्तिक स्वच्छता पण सार्वजनिक घाण दिसते तशी वेगवेगळी ठिकाणे - बसगाड्या, रेल्वे स्टेशने, देवळे, वगैरे. मो. क. गांधी वा गाडगेबाबा वा प्रचलित म्हणी वगैरेंची उद्धरणे द्यावी - ही उद्धरणे "अमुक करा"पेक्षा "अमुक समाजात दिसते" अशा प्रकाचची असल्यास ठीक. "अमुक करा" असेच उद्धरण ठाऊक असेल, तर "तेव्हासुद्धा असे म्हणण्याचा प्रसंग होता, त्यामुळे हा मुद्दा सार्वकालिक आहे" असे सांगता येते.

(परिच्छेद ३/४ : ) सार्वजनिक स्वच्छता असण्याविरुद्धचे अडथळे. आजकालच्या धाकाधुकीच्या आयुष्यात वेळ नसतो. काही सुविधा सरकारने पुरवायच्या असतात, त्या उपलब्ध नसतात. मग सार्वजनिक स्वच्छता पाळण्याच्या दिशेने मुद्दे कळकळीने/अधिक जोरदारपणे मांडावेत. सार्वजनिक स्वच्छता पाळल्यामुळे सोयच होते, वेळ वाचतो. लोकशाही देशात सरकार म्हणजे आपणच असतो. आपण वागणूक करू आणि आपल्या सरकारचे धोरण बदलेल.

(परिच्छेद ५ : ) हे मुद्दे वरील परिच्छेदापेक्षा वेगळे असावेत. रोगराई पसरणार नाही. (त्या गावा/शहराकरिता योग्य असल्यास) ओला-सुका कचरा वेगळा करून नेटकेपणे टाकल्यामुळे होणारा पर्यावरणाला फायदा. परिसर स्वच्छ-सुंदर असल्यामुळे मन प्रसन्न राहील.

(परिच्छेद ६ : ) आज सकाळी कचरा गच्चीतून टाकण्याऐवजी कागदी पिशवीत भरून कोपर्‍याच्या कचरापेटीत टाकणे किती सोपे. "सार्वजनिक स्वच्छता म्हणजे समाजपुरुषाची वैयक्तिक स्वच्छता" असे काहीतरी सारांश वाक्य.

वर्णनात्मक निबंध[संपादन]

परीक्षेचा निकालाचा दिवस ..............

=कथनात्मक निबंध[संपादन]

गरीब मुलगा-मिठाईच्या दुकानातील वास घेतो -दुकानदार पैसे मागतो-एक हुशार वकील-सं भासहं ऐकतो-दुकान दाराजवळ जावून खिशातला नाण्यांचा खुलखुलाठ करतो-नाण्यांचा आवाज म्हणजे पैसे मिळाल्या सारखेच-गरीब मुलगा आभार मानतो

चिंतनात्मक निबंध[संपादन]

==कल्पनात्मक निबंध= तर आई मानव

चरित्रात्मक किंवा आत्मचरित्रात्मक निबंध[संपादन]

प्रबोधनासाठी लिहिलेले निबंध[संपादन]

 • योग आणि शिक्षण

महाविद्यालयीन स्तराचे निबंध लेखन[संपादन]

21 शतकातील भारत

राज्य सेवा परिक्षा स्तराचे निबंध लेखन[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]

विकिबुक्सवर निबंध लेखनासाठी विषय हवेत ?[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

निबंध उदाहरणे[संपादन]

संदर्भ[संपादन]

 1. १.० १.१ १.२ १.३ १.४ १.५ [प्रा.डॉ.दिलीप बिरुटे] (Mon, 06/10/2014 - 09:55). शालेय निबंध लेखन कसे करावे ? # निबंध लिहिणे एक कलाच आहे.. # निबंध लिहिणे एक कलाच आहे (प्रतिसाद). ६ रोजी पाहिले. ऑक्टोबर ६, २०१४ रोजी पाहिले. ऑक्टोबर २०१४ रोजी पाहिले. (मराठी मजकूर)
 2. २.० २.१ २.२ २.३ २.४ २.५ २.६ २.७ शालेय निबंध लेखन कसे करावे ?. आता मूळ विषयाकडे. (प्रतिसाद) (Sun, 05/10/2014 - 19:24). ५ रोजी पाहिले. ऑक्टोबर २०१४ रोजी पाहिले. (मराठी मजकूर)
 3. http://blumenkranz.blogspot.in/2008/03/blog-post.html
 4. ४.० ४.१ ४.२ शालेय निबंध लेखन कसे करावे ?. आता मूळ विषयाकडे. (प्रतिसाद) (Sun, 05/10/2014 - 19:24). ५ रोजी पाहिले. ऑक्टोबर २०१४ रोजी पाहिले. (मराठी मजकूर)
 5. ५.० ५.१ शालेय निबंध लेखन कसे करावे ?. आता मूळ विषयाकडे. (प्रतिसाद) (Sun, 05/10/2014 - 19:24). ५ रोजी पाहिले. ऑक्टोबर २०१४ रोजी पाहिले. (मराठी मजकूर)
 6. ६.० ६.१ ६.२ शालेय निबंध लेखन कसे करावे ?. सुसंगत मांडणी (प्रतिसाद) (Sun, 05/10/2014 - 19:24). ५ रोजी पाहिले. ऑक्टोबर २०१४ रोजी पाहिले. (मराठी मजकूर)
 7. http://www.aisiakshare.com/node/3304#comment-77337
 8. http://www.aisiakshare.com/node/3304#comment-77350