गीताई (संपूर्ण)

Wikibooks कडून

(Full text on one page पासून पुनर्निर्देशित)

अध्याय पहिला

धृतराष्ट्र म्हणाला

त्या पवित्र कुरू-क्षेत्री पांडूचे आणि आमुचे । युध्दार्थ जमले तंव्हा वर्तले काय संजया ॥ १ ॥

संजय म्हणाला

पाहिली पांडवी सेना सज्ज दुर्योधने तिथे । मग गेला गुरूंपाशी त्यांस हे वाक्य बोलिला ॥ २॥

गुरूजी तुमचा शिष्य शाहणा द्रुपदात्मज । विशाळ रचिले त्याने पहा पंडव सैन्य हे ॥ ३ ॥

ह्यात शूर धनुर्धारी युद्धी भीमार्जुनासम । महारथी तो द्रुपद विराट-नृप सात्यकी ॥ ४ ॥

धृष्टकेतू तसा शूर काश्य तो चेकितान हि । पुरूजित कुंतीभोजीय आणि शैब्य नरोत्तम ॥ ५ ॥

उत्तमौजा हि तो वीर युधामन्यु हि विक्रमी । सौभद्र आणि ते पुत्र द्रौपदीचे महा-रथी ॥ ६॥

आता जे आमुच्यातील सैन्याचे मुख्य नायक । सांगतो जाणण्यासाठी घ्यावे लक्षात आपण ॥ ७ ॥

स्वतां आपण हे भीष्म यशस्वी कृप कर्ण तो । अश्वत्थामा सौमदत्ति जयद्रथ विकर्ण हि ॥ ८ ॥

अनेक दुसरे वीर माझ्यासाठी मरावया । सजले सर्व शस्त्रांनी झुंजणारे प्रवीण जे ॥ ९ ॥

अफाट आमुचे सैन्य भीष्मांनी रक्षिले असे । मोजके पांडवांचे हे भीमाने रक्षिले असे ॥ १० ॥

राहूनी आपुल्या स्थानी जेथे ज्यास नियोजिले । चहूंकडूनी भीष्मांस रक्षाल सगळेजण ॥ ११ ॥

हर्षवीत चि तो त्यास सिंह-नाद करूनिया । प्रतापी वृद्ध भीष्मांनी मोठ्याने शंख फुंकिला ॥ १२ ॥

तत्क्षणी शंखभैर्यादि रणवाद्ये विचित्र चि । एकत्र झडली तेंव्हा झाला शब्द भयंकर ॥ १३ ॥

इकडे शुभ्र घोड्यांच्या मोठ्या भव्य रथातुनी । माधवे अर्जुने दिव्य फुंकिले शंख आपुले ॥ १४ ॥

पांचजन्य हृषिकेशे देवदत्त धनंजये । पौंड्र तो फुंकिला भीमे महाशंख महाबळे ॥ १५ ॥

तेंव्हा अनंतविजय धर्मराजे युधिष्ठीरे । नकुले सहदेवे हि सुघोष मणि-पुष्पक ॥ १६ ॥

मग काश्य धनुर्धारी शिखंडी हि महा-रथी । विराट आणि सेनानी तसा अजित सात्यकी ॥ १७ ॥

राजा द्रुपद सौभद्र द्रौपदीचे हि पुत्र ते । सर्वांनी फुंकिले शंख आपुले वेगवेगळे ॥ १८ ॥

त्या घोषे कौरवांची तो हृदये चि विदारली । भरूनि भूमि आकाश गाजला तो भयंकर ॥ १९ ॥

मग नीट उभे सारे पुन्हा कौरव राहिले । चालणार पुढे शस्त्रे इतुक्यात कपिध्वज ॥ २० ॥

अर्जुन म्हणाला

हाती धनुष्य घेउनि बोले कृष्णास वाक्य हे । दोन्ही सैन्यामधे कृष्णा माझा रथ उभा करी ॥ २१ ॥

म्हणजे कोण पाहीन राखिती युद्धकामना । आज ह्या रणसंग्रामी कोणाशी झुंजणे मज ॥ २२ ॥

झुंजते वीर ते सारे घेतो पाहूनि येथ मी । युद्धी त्या हतबुद्धींचे ज करू पाहती प्रिय ॥ २३ ॥

संजय म्हणाला

अर्जुनाचे असे वाक्य कृष्णे ऐकुनि शीघ्र चि । दोन्ही सैन्यांमधे केला उभा उत्तम तो रथ ॥ २४ ॥

मग लक्षूनिया नीट भीष्म द्रोण नृपास तो । म्हणे हे जमले पार्था पहा कौरव सर्व तू ॥ २५ ॥

तेथ अर्जुन तो पाहे उभे सारे व्यवस्थित । आजे काके तसे मामे सासरे सोयरे सखे ॥ २६ ॥

गुरुबंधु मुले नातू दोन्ही सैन्यात सारखे । असे पाहूनि तो सारे सज्ज बांधव आपुले । अत्यंत करुणाग्रस्त विषादे वाक्य बोलिला ॥ २७ ॥

अर्जुन म्हणाला

कृष्णा स्व-जन हे सारे युद्धी उत्सुक पाहुनी । गात्रे चि गळती माझी होतसे तोंड कोरडॅ ॥ २८ ॥

शरीरी सुटतो कंप उभे रोमांच राहती । गांडीव न टिके हाती सगळी जळते त्वचा ॥ २९ ॥

न शके चि उभा राहू मन हे भ्रमले जसे ।। ३० ॥

कृष्णा मी पाहतो सारी विपरित चि लक्षणे । कल्याण न दिसे युद्धी स्व-जनांस वधूनिया ॥ ३१ ॥

नको जय नको राज्य नकोत मज ती सुखे । राज्य भोगे मिळे काय किंवा काय जगूनि हि ॥ ३२ ॥

ज्यांच्यासाठी अपेक्षावी राज्य भोग सुखे हि ती । सजले ते चि युद्धास धना-प्राणास सोडुनी ॥ ३३ ॥

आजे बाप मुले नातू आमुचे दिसती इथे । सासरे मेहुणे मामे संबंधी आणि हे गुरू ॥ ३४ ॥

न मारू इच्छितो ह्यांस मारितील जरी मज । विश्व साम्राज्य सोडीन पृथ्वीचा पाड तो किती ॥ ३५ ॥

ह्या कौरवांस मारूनि कायसे आमुचे प्रिय । अत्याचारी जरी झाले ह्यांस मारूनइ पाप चि ॥ ३६ ॥

म्हणूनि घात बंधूंचा आम्हा योग्य नव्हे चि तो । आम्ही स्व-जन मारूनि सुखी व्हावे कसे बरे ॥ ३७ ॥

लोभाने नासली बुद्धि त्यामुळे हे न पाहती । मित्र-द्रोही कसे पाप काय दोष कुल-क्षयी ॥ ३८ ॥

परी हे पाप टाळावे आम्हा का समजू नये । कुल-क्षयी महा-दोष कृष्णा उघड पाहता ॥ ३९ ॥

कुल-क्षये लया जाती कुलधर्म सनातन । धर्म-नाशे कुळी सर्व अधर्म पसरे मग ॥ ४०॥

अधर्म माजतो तेंव्हा भ्रष्ट होती कुल-स्त्रिया । स्त्रिया बिघडता कृष्णा घडतो वर्ण-संकर ॥ ४१ ॥

संकरे नरका जाय कुलघ्नांसह ते कुळ । पितरांचा अधःपात होतसे श्राद्ध लोपुनी ॥ ४२ ॥

ह्या दोषांनी कुलघ्नांच्या होऊनी वर्ण-संकर । जातींचे बुडती धर्म कुळाचे हि सनातन ॥ ४३ ॥

ज्यांनी बुडविले धर्म कुळाचे त्यांस निश्चित । नरकी राहणें लागे आलो ऐकत हे असे ॥ ४४ ॥

अरेरे केवढे पाप आम्ही आरंभिले असे । लोभे राज्य-सुखासाठी मारावे स्व-जनांस जे ॥ ४५ ॥

त्याहुनी शस्त्र सोडूनी उभा राहीन ते बरे । मारोत मग हे युद्धी शस्त्रांनी मज कौरव ॥ ४६ ॥

संजय म्हणाला

असे रणात बोलूनि शोकावेगात अर्जुन । धनुष्य-बाण टाकूनि रथी बैसूनि राहिला ॥ ४७ ॥

..... पहिला अध्याय समाप्त .....

अध्याय दुसरा

संजय म्हणाला

असा तो करुणा-ग्रस्त घाबरा अश्रु गाळित । करीत असता खेद त्यास हे कृष्ण बोलिला ॥ १ ॥

श्री भगवान म्हणाले

कोठूनी भलत्या वेळी सुचले पाप हे तुज । असे रुचे न थोरांस ह्याने दुष्कीर्ति दुर्गति ॥ २ ॥

निर्वीर्य तू नको होऊ न शोभे मुळी हे तुज । भिकार दुबळी वृत्ति सोडूनी ऊठ तू कसा ॥ ३ ॥

अर्जुन म्हणाला

कसा रणांगणी झुंजू भीष्म-द्रोणांविरुद्ध मी । ह्यांस बाण कसे मारू आम्हा हे पूजनीय की ॥ ४ ॥

न मारिता थोर गुरूंस येथे । भिक्षा हि मागूनि भले जगावे ॥ हितेच्छु हे ह्यांस वधून भोग । भोगू कसे भंगुर रक्त-मिश्र ॥ ५ ॥

ह्यांचा चि व्हावा जय आमुचा की । कशात कल्याण असे न जाणो ॥ मारूनि ज्यांते जगणे न इच्छू । झुंजावया ते चि उभे समोर ॥ ६ ॥

दैन्याने ती मारिली वृत्ति माझी । धर्माचे तो नाशिले ज्ञान मोहे ॥ कैसे माझे श्रेय होईल सांगा । पायांपाशी पातलो शिष्य-भावे ॥ ७ ॥

मिळेल निष्कंटक राज्य येथे । लाभेल इंद्रासन देव-लोकी ॥ शमेल त्याने न तथापि शोक । जो इंद्रियांते सुकवीत माझ्या ॥ ८ ॥

संजय म्हणाला

असे अर्जुन तो वीर हृषीकेशास बोलुनी । शेवटी मी न झुंजे चि ह्या शब्दे स्तब्ध राहिला ॥ ९ ॥

मग त्यास हृषीकेश जणू हसत बोलिला । करीत असता शोक दोन्ही सैन्यात तो तसा ॥ १०॥

श्री भगवान म्हणाले

करिसी भलता शोक वरी ज्ञान हि सांगसी । मेल्या-जित्यावीषी शोक ज्ञानवंत हि जाणती ॥ ११ ॥

मी तू आणिक हे राजे न मागे नव्हतो कधी । तसे चि सगळे आम्ही न पुढे हि नसू कधी ॥ १२ ॥

ह्या देही बाल्य तारूण्य जरा वा लाभते जशी । तसा लाभे नवा देह न डगे धीर तो तिथे ॥ १३ ॥

शीतोष्ण विषय-स्पर्श सुख-दुःखात घालिती । करी सहन तू सारे येती जाती अनित्य ते ॥ १४ ॥

ह्यांची मात्रा न चाले चि ज्या धीर पुरूषा वरी । सम देखे सुखे दुःखे मोक्ष-लाभास योग्य तो ॥ १५ ॥

नसे मिथ्यास अस्तित्व नसे सत्यास नाश हि । निवाडा देखिला संती ह्या दोहींचा अशापरी ॥ १६ ॥

ज्याने हे व्यापिले सर्व ते जाण अविनाश तू । नाश त्या नित्य-तत्त्वाचा कोणी हि न करू शके ॥ १७ ॥

विनाशी देह हे सारे बिलिले त्यात शाश्वत । नित्य निःस्सीम तो आत्मा अर्जुना झुंज ह्यास्तव ॥ १८ ॥

जो म्हणे मारितो आत्मा आणि जो मरतो म्हणे । दोघे न जाणती काही न मारी न मरे चि हा ॥ १९ ॥

न जन्म पावे न कदापि मृत्यू । होऊनी मागें न पुढें न होय ॥ आला न गेला स्थिर हा पुराण । मारोत देहास परी मरे ना ॥ २० ॥

निर्विकार चि हा नित्य जन्म मृत्यू हुनी पर । जाणे हे तत्त्व तो कैसा मारी वा मारवी कुणा ॥ २१ ॥

सांडूनिया जर्जर जीर्ण वस्त्रे । मनुष्य घेतो दुसरी नविन ॥ तशीचि टाकूनि जुनी शरिरे । आत्मा हि घेतो दुसरी निराळी ॥ २२ ॥

शस्त्रे न चिरिती ह्यास । ह्यास अग्नि न जाळितो ॥ पाणी न भिजवी ह्यास । ह्यास वारा न वाळवी ॥ २३ ॥

चिरवे जाळवे ना हा । भिजवे वाळवे हि ना ॥ स्थिर निश्चळ हा नित्य । सर्वव्यापी सनातन ॥ २४ ॥

न देखू ये न चिंतू ये । बोलिला निर्विकार हा ॥ जाणूनि ह्यापरी आत्मा । शोक योग्य नसे तुज ॥ २५ ॥

अथवा पाहसी तू हा । मरे जन्मे प्रतिक्षणी ॥ तरी तुज कुठे येथे । नसे शोकास कारण ॥ २६ ॥

जन्मता निश्चये मृत्यू । मरता जन्म निश्चये ॥ म्हणूनी न टळे त्याचा । व्यर्थ शोक करू नको ॥ २७ ॥

भूतांचे मूळ अव्यक्ती । मध्य तो व्यक्त भासतो ॥ पुन्हा शेवट अव्यक्ती । त्यामधे शोक कायसा ॥ २८ ॥

आश्चर्य जो साच चि ह्यास देखे । आश्चर्य जो देखत ह्यास वर्णी ॥ आश्चर्य जो वर्णन ते हि ऐके । ऐके तरी शून्य चि जाणण्याचे ॥ २९ ॥

वसे देहात सर्वांच्या आत्मा अमर नित्य हा । म्हणूनी भूतमात्री तू नको शोक करू कधी ॥ ३० ॥

स्वधर्म तो हि पाहूनी न योग्य शगणे तुज । धर्म-युद्धाहुनी काही क्षत्रियास नसे भले ॥ ३१ ॥

प्राप्त झाले अनायासे स्वर्गाचे द्वार मोकळे । क्षत्रियास महा-भाग्ये लाभते युद्ध हे असे ॥ ३२ ॥

हे धर्म-युद्ध टाळूनी पापात पडशील तू । स्वधर्मासह कीर्तीस दूर सारूनिया स्वये ॥ ३३ ॥

अखंड लोक गातील दुष्कीर्ति जगती तुझी । मानवंतास दुष्कीर्ति मरणाहूनि आगळी ॥ ३४ ॥


भिऊनि टाळिले युद्ध मानितील महा-रथी । असूनि मान्य तू ह्यास तुच्छता पावशील की ॥ ३५ ॥


बोलितील तुझे शत्रु भलते भलते बहु । निंदितील तुझे शौर्य काय त्याहूनि दुःखद ॥ ३६ ॥


मेल्याने भोगिसी स्वर्ग जिंकिल्याने मही-तळ । म्हणूनि अर्जुना उठ युद्धास दृढ-निश्चये ॥ ३७ ॥


हानि लाभ सुखे दुःखे हार जीत करी सम । मग युद्धास हो सिद्ध न लागे पाप ते तुज ॥ ३८ ॥


सांख्य-बुद्धि अशी जाण ऐक ती योग-बुद्धि तू । तोडिशील जिने सारी कर्माची बंधने जगी ॥ ३९ ॥


न बुडे येथ आरंभ न घडे विपरीत हि । जोडा स्वल्प हि हा धर्म तारी मोठ्या भयातुनी ॥ ४० ॥


ह्यात निश्चय लाभूनि बुद्धि एकाग्र राहते । निश्चयाविण बुद्धीचे फाटे ते संपती चि ना ॥ ४१ ॥


अविवेकी वृथा वाणी बोलती फुलवूनिया । वेदाचे घालिती वाद म्हणती दुसरे नसे ॥ ४२ ॥

जन्मूनिया करा कर्मे मिळवा भोग-वैभव । भोगा कर्म-फळे गोड सांगती स्वर्ग-कामुक ॥ ४३ ॥

त्यामुळे भुलली बुद्धि गुंतली भोग वैभवी । ती निश्चय न लाभूनि समाधीत नव्हे स्थिर ॥ ४४ ॥

तिन्ही गुण वदे वेद त्यात राहे अलिप्त तू । सत्त्व सोडू नको सोशी द्वंद्वे निश्चिंत सावध ॥ ४५ ॥

सर्वत्र भरले पाणी तेंव्हा आडात अर्थ जो । विज्ञानी ब्रम्ह-वेत्त्यास सर्व वेदात अर्थ तो ॥ ४६ ॥

कर्मात चि तुझा भाग तो फळात नसो कधी । नको कर्म-फळी हेतु अकर्मी वासना नको ॥ ४७ ॥

फळ लाभो न लाभो तू निःसंग सम होऊनी । योग-युक्त करी कर्मे योग सार समत्व चि ॥ ४८ ॥

समत्व-बुद्धि ही थोर कर्म तिहूनि हीन चि । बुद्धीचा आसरा घे तू मागती फळा दीन ते ॥ ४९ ॥

येथे समत्व-बुद्धीने टळे सुकृत-दुष्कृत । समत्व जोड ह्यासाठी ते चि कर्मात कौशल ॥ ५० ॥

ज्ञानी समत्व-बुद्धीने कर्माचे फळ सोडुनी । जन्माचे तोडिती बंध पावती पद अच्युत ॥ ५१ ॥

लंघूनि बुद्धि जाईल जेंव्हा हा मोह-कर्दम । आले येईल जे कानी तेंव्हा जिरविशील तू ॥ ५२ ॥

श्रवणे भ्रमली बुद्धि तुझी लाभूनि निश्चय । स्थिरावेल समाधीत तेंव्हा भेटेल योग तो ॥ ५३ ॥

अर्जुन म्हणाला

स्थिरावला समाधीत स्थित-प्रज्ञ कसा असे । कृष्णा सांग कसा बोले कसा राहे फिरे कसा ॥ ५४ ॥

श्री भगवान म्हणाले

कामना अंतरातील सर्व सोडूनि जो स्वये । आत्म्यात चि असे तुष्ट तो स्थित-प्रज्ञ बोलिला ॥ ५५ ॥

नसे दुःखात उद्वेग सुखाची लालसा नसे । नसे तृष्णा भय क्रोध तो स्थित-प्रज्ञ संयमी ॥ ५६ ॥

सर्वत्र जो अनासक्त बरे वाईट लाभता । न उल्लासे न संतापे त्याची प्रज्ञा स्थिरावली ॥ ५७ ॥

घेई ओढूनी संपूर्ण विषयातूनि इंद्रिये । जसा कासव तो अंगे तेंव्हा प्रज्ञा स्थिरावली ॥ ५८ ॥

निराहार-बळे बाह्य सोडी विषय साधक । आंतील न सुटे गोडी ती जळे आत्म-दर्शने ॥ ५९ ॥

करीत असता यत्न ज्ञात्याच्या हि मनास ही । नेती खेचूनी वेगाने इंद्रिये दांडगी चि की ॥ ६० ॥

त्यास रोधूनी युक्तीने रहावे मत्परायण । इंद्रिये जिंकिली ज्याने त्याची प्रज्ञा स्थिरावली ॥ ६१ ॥

विषयांचे करी ध्यन त्यास तो संग लागला । संगांतूनि फुटे काम क्रोध कामात ठेविला ॥ ६२ ॥

क्रोधातूनि जडे मोह मोहाने स्मृति लोपली । स्मृति लोपे बुद्धि-नाश म्हणजे आत्म-नाश चि ॥ ६३ ॥

राग-द्वेष परी जाता आली हातात इंद्रिये । स्वामित्वे विषयी वर्ते त्यास लाभे प्रसन्नता ॥ ६४ ॥

प्रसन्नतेपुढे सर्व दुःखे जाती झडूनिया । प्रसन्नतेने बुद्धीची स्थिरता शीघ्र होतसे ॥ ६५ ॥

अयुक्तास नसे बुद्धि त्यामुळे भावना नसे । म्हणूनी नमिळे शांति शांतीविण कसे सुख ॥ ६६ ॥

इंद्रिये वर्तता स्वैर त्यामागे मन जाय जे । त्याने प्रज्ञा जशी नौका वार्‍याने खेचली जळी ॥ ६७ ॥

म्हणूनि इंद्रिये ज्याने विषयातूनि सर्वथा । ओढूनि घेतली आंत त्याची प्रज्ञा स्थिरावली ॥ ६८ ॥

सर्व भूतास जी रात्र जागतो संयमी तिथे । सर्व भूते जिथे जागी ज्ञानी योग्यास रात्र ती ॥ ६९ ॥

न भंग पावे भरता हि नित्य । समुद्र घेतो जिरवूनि पाणी ॥ जाती तसे ज्यात जिरूनि भोग । तो पावला शांति न भोग-लुब्ध ॥ ७० ॥

सोडूनि कामना सर्व फिरे होऊनि निःस्पृह । अहंता ममता गेली झाला तो शांति-रूप चि ॥ ७१ ॥

अर्जुना स्थिती ही ब्राम्ही पावता न चळे पुन्हा । टिकूनि अंत-काळी हि ब्रम्ह-निर्वाण मेळवी ॥ ७२ ॥

..... दुसरा अध्याय समाप्त .....


अध्याय तिसरा

अर्जुन म्हणाला

बुद्धि कर्माहुनी थोर मानिसी तू जनार्दना । मग कर्मात का घोर घालिसी मज केशवा ॥ १ ॥

मिश्र बोलूनि बुद्धीस जणू मोहात टाकिसी । ज्याने मी श्रेय पावेन सांग ते एक निश्चित ॥ २ ॥

श्री भगवान् म्हणाले

दुहेरी ह्या जगी निष्ठा पूर्वी मी बोलिलो असे । ज्ञानाने सांख्य जी पावे योगी कर्म करूनिया ॥ ३ ॥

न कर्मारंभ टाळूनि लाभे नैष्कर्म्य ते कधी । संन्यास्याच्या क्रियेने चि कोणी सिद्धि न मेळवी ॥ ४ ॥

कर्माविण कधी कोणी न राहे क्षण-मात्र हि । प्रकृतीच्या गुणी सारे बांधिले करितात चि ॥ ५ ॥

इंद्रिये करिती कर्म मूढ त्यास चि रोधुनी । राहतो भोग चिंतूनि तो मिथ्याचार बोलिला ॥ ६ ॥

जो इंद्रिये मनाने ती नेमुनी त्यास राबवी । कर्म-योगात निःसंग तो विशेष चि मानिला ॥ ७ ॥

नेमिले तू करी कर्म करणे हे चि थोर की । तुझी शरीर-यात्रा ही कर्माविण घडॅ चि ना ॥ ८ ॥

यज्ञार्थ कर्म सोडूनि लोक हा बांधिला असे । यज्ञार्थ आचरी कर्म अर्जुना मुक्त-संग तू ॥ ९ ॥

पूर्वी प्रजेसवे ब्रम्हा यज्ञ निर्मूनि बोलिला । पावा उत्कर्ष यज्ञाने हा तुम्हा काम-धेनु चि ॥ १० ॥

रक्षा देवांस यज्ञाने तुम्हा रक्षोत देव ते । एकमेकास रक्षूनि पावा कल्याण सर्व हि ॥ ११ ॥

यज्ञ-तुष्ट तुम्हा देव भोग देतील वांछित । त्यांचे त्यांस न देता जो खाय तो ऐक चोर चि ॥ १२ ॥

यज्ञात उरले खाती संत ते दोष जाळिती । रांधिती आपुल्यासाठी पापी ते पाप भक्षिती ॥ १३ ॥

अन्नापासूनि ही भूते पर्जन्यातूनि अन्न ते । यज्ञे पर्जन्य तो होय यज्ञ कर्मामुळे घडे ॥ १४ ॥

प्रकृतीपासुनी कर्म ब्रम्ही प्रकृति राहिली । ऐसे व्यापक ते ब्रम्ह यज्ञात भरले सदा ॥ १५ ॥

प्रेरिले हे असे चक्र ह्या लोकी जो न चालवी । इंद्रियासक्त तो पापी व्यर्थ जीवन घालवी ॥ १६ ॥

परी आत्म्यात जो खेळे आत्मा भोगूनि तृप्त जो । आत्म्यामध्ये चि संतुष्ट त्याचे कर्तव्य संपले ॥ १७ ॥

केल्याने वा न केल्याने त्यास भावार्थ सारखा । कोणामधे कुठे त्याचा न काही लोभ गुंतला ॥ १८ ॥

म्हणूनि नित्य निःसंग करी कर्तव्य कर्म तू । निःसंग करिता कर्म कैवल्य-पद पावतो ॥ १९ ॥

कर्म-द्वारा चि सिद्धीस पावले जनकादिक । करी तू कर्म लक्षूनि लोक-संग्रह-धर्म हि ॥ २० ॥

जे जे आचरितो श्रेष्ठ ते ते चि दुसरे जन । तो मान्य करितो जे जे लोक चालवितात ते ॥ २१ ॥

करावे-मिळवावेसे नसे काही जरी मज । तिन्ही लोकी तरी पार्था कर्मी मी वागतो चि की ॥ २२ ॥

मी चि कर्मी न वागेन जरी आळस झाडुनी । सर्वथा लोक घेतील माझे वर्तन ते मग ॥ २३ ॥

सोडिन मी जरी कर्म नष्ट होतिल लोक हे । होईन संकर-द्वारा मी चि घातास कारण ॥ २४ ॥

गुंतूनि करिती अज्ञ ज्ञात्याचे मोकळेपणे । करावे कर्म तैसे चि इच्छुनी लोक-संग्रह ॥ २५ ॥

नेणत्या कर्म-निष्ठांचा बुद्धि-भेद करू नये । गोडी कर्मात लावावी समत्वे आचरूनि ती ॥ २६ ॥

कर्मे होतात ही सारी प्रकृतीच्या गुणामुळे । अहंकार-बळे मूढ कर्ता मी हे चि घेतसे ॥ २७ ॥

गुण हे आणि ही कर्मे ह्यांहुनी बेगळा चि मी । जाणे तत्त्व-ज्ञ गुंते ना गुणात गुण वागता ॥ २८ ॥

गुंतले गुण-कर्मी जे भुलले प्रकृती-गुणे । त्या अल्प जाणणारांस सर्व-ज्ञे चाळवू नये ॥ २९ ॥

मज अध्यात्म-वृत्तीने सर्व कर्मे समर्पुनी । फलाशा ममता सर्व सोडुनी झुंज तू सुखे ॥ ३० ॥

माझे शासन हे नित्य जे निर्मत्सर पाळिती । श्रद्धेने नेणते ते हि तोडिती कर्म-बंधने ॥ ३१ ॥

परी मत्सर-बुध्हीने जे हे शासन मोडिती । ज्ञान-शून्य चि ते मूढ पावले नाश जाण तू ॥ ३२ ॥

ज्ञानी हि वागतो त्याच्या स्वभावास धरूनिया । स्वभाव-वश ही भूते बलात्कार निरर्थक ॥ ३३ ॥

इंद्रियी सेविता अर्थ राग-द्वेष उभे तिथे । वश होऊ नये त्यांस ते मार्गातील चोर चि ॥ ३४ ॥

उणा हि आपुला धर्म पर-धर्माहुनी बरा । स्व-धर्मात भला मृत्यु पर-धर्म भयंकर ॥ ३५ ॥

अर्जुन म्हणाला

मनुष्य करितो पाप कोणाच्य प्रेरणेमुळे । आपुली नसता इच्छा वेठीस धरिला जसा ॥ ३६ ॥

श्री भगवान् म्हणाले

काम हा आणि हा क्रोध घडिला जो रजोगुणे । मोठा खादाड पापिष्ठ तो वैरी जाण तू इथे ॥ ३७ ॥

धुराने झाकिला अग्नि धुळीने आरसा जसा । वारेने वेष्टिला गर्भ कामाने ज्ञान हे तसे ॥ ३८ ॥

काम-रूप-महा-अग्नि नव्हे तृप्त कधी चि जो । जाणत्याचा सदा वैरी त्याने हे ज्ञान झाकिले ॥ ३९ ॥

घेऊनि आसर्‍यासाठी इंद्रिये मन बुद्धि तो । मोह पाडी मनुष्याते त्याच्या ज्ञानास गुंडुनी ॥ ४० ॥

म्हणूनि पहिला थारा इंद्रिये ती चि जिंकुनी । टाळी पाप्यास जो नाशी ज्ञान विज्ञान सर्व हि ॥ ४१ ॥

इंद्रिये बोलिली थोर मन त्याहूनि थोर ते । बुद्धि थोर मनाहूनि थोर तीहूनि तो प्रभु ॥ ४२ ॥

असा तो प्रहु जाणूनि आवरी आप आपणा । संहारी काम हा वैरी तू गाठूनि परोपरी ॥ ४३ ॥

... अध्याय चवथा ....

श्री भगवान् म्हणाले

योग हा अविनाशी मी स्वये सूर्यास बोलिलो । मनूस बोलिला सूर्य तो इक्ष्वाकूस त्यापरी ॥ १ ॥

अशा परंपरेतूनि हा राजर्षीस लाभला । पुढे काळ-बळाने तो ह्या लोकी योग लोपला ॥ २ ॥

तो चि हा बोलिलो आज तुज योग पुरातन । जीवीचे गूज हे थोर तू हि भक्त सखा तसा ॥ ३ ॥

अर्जुन म्हणाला

ह्या काळचा तुझा जन्म सूर्याचा तो पुरातन । तू बोलिलास आरंभी हे मी जाणू कसे बरे ॥ ४ ॥

श्री भगवान् म्हणाले

माझे अनेक ह्यापूर्वी झाले जन्म तसे तुझे । जाणतो सगळे मी ते अर्जुना तू न जाणसी ॥ ५ ॥

असूनि हि अजन्मा मी निर्विकार जगत्-प्रभु । माझी प्रकृति वेढूनि मायेने जन्मतो जणू ॥ ६ ॥

गळूनि जातसे धर्म ज्या ज्या वेळेस अर्जुना । अधर्म उठतो भारी तेंव्हा मी जन्म घेतसे ॥ ७ ॥

राखावया जगी संता दुष्टा दूर करावया । स्थापावया पुन्हा धर्म जन्मतो मी युगी युगी ॥ ८ ॥

जन्म-कर्मे अशी दिव्य जो माझी नीट ओळखे । देह गेल्या पुन्हा जन्म न पावे भेटुनी मज ॥ ९ ॥

नाही तृष्णा भय क्रोध माझ्या सेवेत तन्मय । झाले ज्ञान-तपे चोख अनेक मज पावले ॥ १० ॥

भजती मज जे जैसे भजे तैसा चि त्यास मी । माझ्या मार्गास हे येती लोक कोणीकडूनि हि ॥ ११ ॥

जे कर्म-सिद्धि वांछूनि यजिती येथ दैवते । मनुष्य-लोकी कर्माचे पावती फळ शीघ्र ते ॥ १२ ॥

निर्मिले वर्ण मी चारी गुण-कर्मे विभागुनी । करूनि सर्व हे जाण अकर्ता निर्विकार मी ॥ १३ ॥

कर्मे न बांधिती माते फळी इच्छा नसे मज । माझे स्वरूप हे जाणे तो कर्मात हि मोकळा ॥ १४ ॥

केली कर्मे मुमुक्षूंनी पूर्वी हे तत्त्व जाणुनी । तैसी तू हि करी कर्मे त्यांचा घेऊनि तो धडा ॥ १५ ॥

नेणती जाणते ते हि काय कर्म अकर्म हे । तुज ते सांगतो कर्म जाणूनि सुटशील जे ॥ १६ ॥

सामान्य कर्म जाणावे विकर्म हि विशेष जे । अकर्म ते हि जाणावे कर्माचे तत्त्व खोल हे ॥ १७ ॥

कर्मी अकर्म जो पाहे अकर्मी कर्म जो तसे । तो बुद्धिमंत लोकांत तो योगी कृत-कृत्य तो ॥ १८ ॥


उद्योग करितो सारे काम-संकल्प सोडुनी । ज्ञानाने जाळिली कर्मे म्हणती त्यास पंडित ॥ १९ ॥


नित्य-तृप्त निराधार न राखे फल-वासना । गेला गढूनि कर्मात तरी काही करी चि ना ॥ २० ॥


संयमी सोडुनी सर्व इच्छेसह परिग्रह । शरीरे चि करी कर्म दोष त्यास न लागतो ॥ २१ ॥


मिळे ते चि करी गोड न जाणे द्वंद्व मत्सर । फळो जळो जया एक करूनि हि न बांधिला ॥ २२ ॥


ज्ञनात बैसली वृत्ति संग सोडूनि मोकळा । यज्ञार्थ करितो कर्म जाय सर्व जिरूनि ते ॥ २३ ॥


ब्रम्हात होमिले ब्रम्ह ब्रम्हाने ब्रम्ह लक्षुनी । ब्रम्ही मिसळले कर्म तेंव्हा ब्रम्ह चि पावला ॥ २४ ॥


देवताराधने यज्ञ योगी कोणी अनुष्टिती । ब्रम्हाग्नित तसे कोणी यज्ञे यज्ञत्व जाळिती ॥ २५ ॥


श्रोत्रादी इंद्रिये कोणी संयमाग्नीत अर्पिती । कोणी विषय शब्दादि इंद्रियाग्नीत अर्पिती ॥ २६ ॥


प्राणेंद्रिय-क्रिया कोणी सर्व होमूनि टाकिती । चिंतनाने समाधीस अंतरी चेतवूनिया ॥ २७ ॥


द्रव्ये जपे तपे योगे चिंतने वा अशापरी । संयमी यजिती यज्ञ व्रते प्रखर राखुनी ॥ २८ ॥


होमिती एकमेकात कोणी प्राण-अपान ते । रोधूनि गति दोहोंची प्राणायामास साधिती ॥ २९ ॥


प्राणात होमिती प्राण कोणी आहार तोडुनी ।

यज्ञ-वेत्ते चि हे सारॆ यज्ञाने दोष जाळिती ॥ ३० ॥


यज्ञ-शेषमृते धाले पावले ब्रम्ह शाश्वत । न यज्ञाविण हा लोक कोठूनि पर-लोक तो ॥ ३१ ॥


विशेष बोलिले वेदे असे यज्ञ अनेक हे । कर्माने घडिले जाण जाणूनि सुटशील तू ॥ ३२ ॥


द्रव्य-यज्ञादिकांहूनि ज्ञान-यज्ञ चि थोर तो ।

पावती सगळी कर्मे अंती ज्ञानात पूर्णता ।। ३३ ॥


सेवा करूनि ते जाण नम्र-भावे पुसूनिया । ज्ञानोपदेश देतील ज्ञानी अनुभवी तुज ॥ ३४ ॥


ज्या ज्ञानाने असा मोह न पुन्हा पावशील तू । आत्म्यात आणि माझ्यात भूते निःशेष देखुनी ॥ ३५ ॥


जरी पाप्यांमधे पापी असशील शिरो-मणि । तरी ह्या ज्ञान-नौकेने पाप ते तरशील तू ॥ ३६ ॥


संपूर्ण पेटला अग्नि काष्ठे जाळूनि टाकितो । तसा ज्ञानाग्नि तो सर्व कर्मे जाळूनि टाकितो ॥ ३७ ॥


ज्ञानासम नसे काही पवित्र दुसरे जगी । योग-युक्त यथा-काळी ते पावे अंतरी स्वये ॥ ३८ ॥


श्रद्धेने मेळवी ज्ञान संयमी नित्य सावध । ज्ञानाने शीघ्र तो पावे शांति शेवटची मग ॥ ३९ ॥


नसे ज्ञान नसे श्रद्धा संशयी नासला पुरा । न हा लोक न तो लोक न पावे सुख संशयी ॥ ४० ॥


योगाने झाडिली कर्मे ज्ञाने संशय तोडिले । जो सावधान आत्म्यात कर्मे त्यास न बांधिती ॥ ४१ ॥


म्हणूनि अंतरातील अज्ञान-कृत संशय । तोडुनी ज्ञान-खडगाने ऊठ तू योग साधुनी ॥ ४२ ॥


….. अध्याय चवथा संपूर्ण …..

... अध्याय पाचवा ...


अर्जुन म्हणाला

कृष्णा संन्यास कर्माचा तसा योग हि सांगसी । दोहोत जे बरे एक सांग ते मज निश्चित ॥ १ ॥

श्री भगवान् म्हणाले

योग संन्यास हे दोन्ही मोक्ष-साधक सारखे । विशेष चि परी योग संन्यासाहूनि मानिला ॥ २ ॥

तो जाण नित्य-संन्यासी राग-द्वेष नसे जया । जो द्वंद्वावेगळा झाला सुखे बंधांतुनी सुटे ॥ ३ ॥

म्हणती सांख्य-योगाते भिन्न मूढ न जाणते । बाणो एक हि ती निष्ठा दोहींचे फळ देतसे ॥ ४ ॥

सांख्यास जे मिळे स्थान ते योग्यास हि लाभते । एक-रूप चि हे दोन्ही जो पाहे तो चि पाहतो ॥ ५ ।

योगावांचूनि संन्यास कधी साधे चि ना सुखे । संयमी योग जओडूनि ब्रम्ह शीघ्र चि गाठतो ॥ ६ ॥

अंतरी धुतला योगी जिंकूनि मन इंद्रिये । झाला जीव चि भूतांचा करूनि हि अलिप्त तो ॥ ७ ॥

न काही मी करी ऐसे योगी तत्त्व-ज्ञ जाणुनी । देखे ऐके शिवे हुंगे खाय जाय निजे श्वसे ॥ ८ ॥

बोले सोडी धरी किंवा पापणी हालवी जरी । इंद्रिये आपुल्या अर्थी वागती हे चि पाहतो ॥ ९ ॥

ब्रम्ही ठेऊनिया कर्मे संग सोडूनि जो करी । पापे न लिप्त तो होय पद्म-पत्र जसे जळे ॥ १० ॥

देहा-मनाने बुद्धीने इंद्रियांनी हि केवळ । आत्म-शुद्ध्यर्थ नि:संग योगी कर्म अनुष्ठिती ॥ ११ ॥

युक्त तो फळ सोडूनि शांति निश्चळ पावतो । अयुक्त स्वैर-वृत्तीने फळी आसक्त बांधिला ॥ १२ ॥

मनाने सगळी कर्मे सोडुनी संयमी सुखे । नव-द्वार-पुरी राहे करी ना करवी हि ना ॥ १३ ॥

न कर्तेपण लोकांचे न कर्मे निर्मितो प्रभु । न कर्मी फल-संयोग स्वभावे सर्व होतसे ॥ १४ ॥

न घे पाप हि कोणाचे न वा पुण्य हि तो विभु । अज्ञाने झाकिले ज्ञान त्यामुळे जीव मोहित ॥ १५ ॥

गेले अज्ञान ते ज्यांचे आत्म-ज्ञाने तयां मग । पर-ब्रम्ह दिसे स्वच्छ जणू सूर्ये प्रकाशिले ॥ १६ ॥

रंगले त्यात ओतूनि बुद्धि निश्चय जीवन । पुन्हा येती न माघारे ज्ञाने पाप धुऊनिया ॥ १७ ॥

विद्या-विनय-संपन्न द्विज गाय तसा गज । श्वान चांडाळ हे सारे तत्त्व-ज्ञ सम पाहती ॥ १८ ॥

इथे चि जिंकिला जन्म समत्वी मन रोवुनी । निर्दोष सम जे ब्रम्ह झाले तेथे चि ते स्थिर ॥ १९ ॥

प्रिय-लाभे नको हर्ष नको उद्वेग अप्रिये । बुद्धि निश्चळ निर्मोह ब्रम्ही ज्ञानी स्थिरावला ॥ २० ॥

विटला विषयी जाणे अंतरी सुख काय ते । ब्रम्ही मिसळला तेंव्हा भोगी ते सुख अक्षय ॥ २१ ॥

विषयातील जे भोग ते दु:खास चि कारण । येती जसे तसे जाती विवेकी न रमे तिथे ॥ २२ ॥

प्रयत्ने मरणापूर्वी ह्या देही जिरवू शके । काम-क्रोधातले वेग तो योगी तो खरा सुखी ॥ २३ ॥

प्रकाश स्थिरता सौख्य अंतरी लाभली जया । ब्रम्ह होऊनि तो योगी ब्रम्ह-निर्वाण मेळवी ॥ २४ ॥

फिटले दोष शंका हि मुठीत धरिले मन । पावले ब्रम्ह-निर्वाण ज्ञानी विश्व-हिती रत ॥ २५ ॥

काम-क्रोधास जिंकूनि यत्ने चित्तास बांधिती । देखती ब्रम्ह-निर्वाण आत्म-ज्ञानी चहूंकडे ॥ २६ ॥

विषयांचा बहिष्कार डोळा भ्रू-संगमी स्थिर । करूनि नासिका-स्थानी प्राणापान हि सारखे ॥ २७ ॥

आवरी मुनि मोक्षार्थी इंद्रिये मन बुद्धि जो । सोडी इच्छा भय-क्रोध सर्वदा सुटला चि तो ॥ २८ ॥

भोक्ता यज्ञ-तपांचा मी सोयरा विश्व-चालक । जाणूनि ह्यापरी माते शांतीस वरिला चि तो ॥ २९ ॥

.... अध्याय पाचवा संपूर्ण .....


अध्याय सहावा ...

श्री भगवान् म्हणाले

फळी आश्रय सोडूनि करी कर्तव्य कर्म जो । तो संन्यासी तसा योगी न जो निर्यज्ञ निष्क्रिय ॥ १ ॥

संन्यास म्हणती ज्यास योग तो जाण पांडवा । सोडिल्याविण संकल्प कोणी योगी न होतसे ॥ २ ॥

योगावरी चढू जाता कर्म साधन बोलिले । योगी आरूढ तो होता शम साधन बोलिले ॥ ३ ॥

कर्मात जो अनासक्त विरक्त विषयी असे । संकल्प सुटले तेंव्हा तो योगारूढ बोलिला ॥ ४ ॥

उद्धरावा स्वये आत्मा खचू देऊ नये कधी । आत्मा चि आपुला बंधु आत्मा चि रिपु आपुला ॥ ५ ॥

जिंकूनि घेतला आत्मा बंधु तो होय आपुला । सोडिला तो जरी स्वैर शत्रुत्व करितो स्वये ॥ ६ ॥

जितात्मा शांत जो झाला देखे ब्रम्ह चि एकले । मानापमानी शीतोष्णी सुख-दुःखी समावले ॥ ७ ॥

तोषला ज्ञान-विज्ञाने स्थिर जिंकूनि इंद्रिये । तो योगी सम जो देखे सोने पाषाण मृत्तिका ॥ ८ ॥

शत्रु मित्र उदासीन मध्यस्थ परका सखा । असो साधु असो पापी सम पाहे विशेष तो ॥ ९ ॥

साधके चित्त बांधूनि इच्छा संग्रह सोडुनी । आत्म्यास नित्य जोडावे एकांती एकलेपणे ॥ १० ॥

पवित्र स्थान पाहूनि घालावे स्थिर आसन । दर्भ चर्म वरी वस्त्र न घ्यावे उंच नीच ते ॥ ११ ॥

चित्तेंद्रियांचे व्यापार वारावे तेथ बैसुनी । आत्म-शुद्ध्यर्थ जोडावा योग एकाग्र मानसे ॥ १२ ॥

शरीर सम-रेखेत राखावे स्थिर निश्चळ । दृष्टि ठेवूनि नासाग्री न पहावे कुणीकडे ॥ १३ ॥

शांत निर्भय मच्चित्त ब्रम्हचर्य-व्रती स्थिर । मन रोधूनि युक्तीने रहावे मत्परायण ॥ १४ ॥

असे आत्म्यास जोडूनि योगी आवरिला मने । मोक्षास भिडली शांति माझ्या ठाई चि मेळवी ॥ १५ ॥

न योग फार खाऊनि किंवा खाणे चि सोडुनी । न फार झोप घेऊनि किंवा जागत बैसुनी ॥ १६ ॥

निजणे जागणे खाणे फिरणे आणि कार्य हि । मोजूनि करितो त्यास योग हा दुःख-नाशन ॥ १७ ॥

संपूर्ण नेमिले चित्त आत्म-रूपी चि रंगला । निमाली वासना तेंव्हा योगी तो युक्त बोलिला ॥ १८ ॥

निर्वाती ठेविला दीप तेवतो एकसारखा । तसे आत्मानुसंधानी योग्याचे चित्त वर्णिती ॥ १९ ॥

निरोधे जेथ चित्ताचा सर्व संचार संपला । जेथ भेटूनि आत्म्याते अंतरी तोषला स्वये ॥ २० ॥

भोगूनि इंद्रियातीत बुद्धि-गम्य महा-सुख । न ढळे चि कधी जेथ तत्त्वापासूनि लेश हि ॥ २१ ॥

जया लाभापुढे लाभ दुसरा तुच्छ लेखितो । न चळे जेथ राहूनि दुःख-भारे हि दाटला ॥ २२ ॥

तयास म्हणती योग दुःखाचा जो वियोग चि । जोडावा निश्चयाने तो योग उत्साह राखुनी ॥ २३ ॥

संकल्पी उठिले सारे काम निःशेष सोडुनी । इंद्रिये ही मनाने चि ओढुनि विषयातुनी ॥ २४ ॥

धरूनि धीर बुद्धीने निवर्तावे हळू हळू । आत्म्यात मन रोवूनि काही चिंतू नये स्वये ॥ २५ ॥

फुटेल जेथजेथूनि मन चंचळ अस्थिर । तेथतेथूनि बांधूनि लावावे आत्म-चिंतनी ॥ २६ ॥

विकारांसह ते ज्याचे शमले मन निर्मळ । झाला ब्रम्ह चि तो योगी पावला सुख उत्तम ॥ २७ ॥

आत्म्यास नित्य जोडूनि ह्यापरी दोष जाळुनी । सुखे चि भोगितो योगी ब्रम्हानंद अपार तो ॥ २८ ॥

भूतात भरला आत्मा भूते आत्म्यात राहिली । योगाने जोडिला देखे हे चि सर्वत्र दर्शन ॥ २९ ॥

मज सर्वात जो पाहे पाहे माझ्यात सर्व हि । त्याचा मी आणि तो माझा एकमेकास अक्षय ॥ ३० ॥

स्थिर होऊनि एकत्वी सर्व-भूती भजे मज । राहो कसा हि तो योगी माझ्यामध्ये चि राहतो ॥ ३१ ॥

जो आत्मौपम्य-बुद्धीने सर्वत्र सम पाहतो । जसे सुख तसे दुःख तो योगी थोर मानिला ॥ ३२ ॥

[२०]

अर्जुन म्हणाला

तू बोलिलास जो आता साम्य-योग जनार्दना । न देखे स्थिरता त्याची ह्या चंचळ मनामुळे ॥ ३३ ॥

मन चंचळ हे कृष्णा हट्टी छळितसे बळे । धावे वार्‍यावरी त्याचा दिसे निग्रह दुष्कर ॥ ३४ ॥

श्री भगवान् म्हणाले

अवश्य मन दुःसाध्य म्हणतोस तसे चि ते । परी अभ्यास-वैराग्ये त्याचा निग्रह होतसे ॥ ३५ ॥

संयमाविण हा योग न साधे मानितो चि मी । परी संयमवंतास उपाये साध्य होतसे ॥ ३६ ॥

अर्जुन म्हणाला

श्रद्धा आहे नव्हे यत्न योगातूनि चळूनि जो । मुकला योग-सिद्धीस जाय कोण्या गतीस तो ॥ ३७ ॥

काय तो उभय-भ्रष्ट ब्रम्ह-मार्गी भुलूनिया । नाश पावे निराधार फुटलेल्या ढगापरी ॥ ३८ ॥

माझा संशय हा कृष्णा तू चि फेडी मुळातुनी । फेडीलसा दुजा कोणी न दिसे चि तुझ्याविण ॥ ३९ ॥

श्री भगवान् म्हणाले

न ह्या लोकी न त्या लोकी नाश तो पावतो कधी । शुभकारी कुणी बापा दुर्गतीस न जातसे ॥ ४० ॥

पुण्य-लोकांत राहूनि तो योग-भ्रष्ट संतत । शुचि साधनवंतांच्या घरी जन्मास येतसे ॥ ४१ ॥

अथवा प्राज्ञ योग्यांच्या कुळी चि मग जन्मतो । अवश्य हा असा जन्म लोकी अत्यंत दुर्लभ ॥ ४२ ॥

तिथे तो पूर्व-जन्मीचा बुद्धि-संस्कार जोडुनी । मोक्षार्थ करितो यत्न पूर्वीहूनि पुढे पुन्हा ॥ ४३ ॥

पूर्वाभ्यास-बळाने तो खेचला पर-तंत्र चि । जिज्ञासेने हि योगाच्या जातो वेदांस लंघुनी ॥ ४४ ॥

योगी तत्पर राहूनि दोष जाळित जाळित । अनेक जन्मी संपूर्ण होउनी मोक्ष पावतो ॥ ४५ ॥

ज्ञानी तापस कर्मिष्ठ ह्या सर्वांहूनि आगळा । मानिला तो असे योगी योगी होई म्हणूनि तू ॥ ४६ ॥

सर्व योग्यांमधे योगी जीव माझ्यात ठेवुनी । श्रद्धेने भजतो माते तो थोर मज वाटतो ॥ ४७ ॥

अध्याय सहावा संपूर्ण

अध्याय सातवा ...


श्री भगवान् म्हणाले

प्रीतीने आसरा माझा घेउनी योग साधित । जाणशिल कसे ऐक समग्र मज निश्चित ॥ १ ॥

विज्ञानासह ते ज्ञान संपूर्ण तुज सांगतो । जे जाणूनि पुढे येथे जाणावेसे न राहते ॥ २ ॥

लक्षावधींत एखादा मोक्षार्थ झटतो कधी । झटणार्‍यांत एखादा तत्त्वता जाणतो मज ॥ ३॥

पृथ्वी आप तसे तेज वायु आकाश पाचवे । मन बुद्धि अहंकार अशी प्रकृति अष्ट-धा ॥ ४ ॥

ही झाली अपरा माझी दुसरी जाण ती परा । जीव-रूपे जिने सारे जग हे धरिले असे ॥ ५ ॥

ह्या दोहींपासुनी भूते सगळी जाण निर्मिली । सार्‍या जगास तद्-द्वारा मूळ मी आणि शेवट ॥ ६ ॥

दुसरे तत्त्व नाही चि काही माझ्या पलीकडे । ओविले सर्व माझ्यात जसे धग्यामधे मणि ॥ ७ ॥

पाण्यात रस मी झालो चंद्र-सूर्यी प्रकाश मी । ओं वेदी शब्द आकाशी पुरुषी पुरुषार्थ मी ॥ ८ ॥

मी पुण्य-गंध पृथ्वीत असे अग्नीत उष्णता । प्राणि-मात्रात आयुष्य तपो-वृद्धांत मी तप ॥ ९ ॥

सर्व भूतांत जे बीज ते मी जाण सनातन । बुद्धिमंतांत मी बुद्धि तेजस्व्यांत हि तेज मी ॥ १० ॥

वैराग्य-युक्त निष्काम बळवंतांत मी बळ । राहे धरूनि धर्मास ती मी भूतांत वासना ॥ ११ ॥

माझ्यातूनि तिन्ही झाले सात्त्विकादिक भाव ते । परी त्यांत न मी राहे ते चि माझ्यांत राहती ॥ १२ ॥

ह्या गुणात्मक भावांनी विश्व मोहूनि टाकिले । ज्यामुळे मी न जाणू ये गुणातीत सनातन ॥ १३ ॥

माझी ही त्रिगुणी दैवी माया न तरवे कुणा । कासेस लागले माझ्या ते चि जाती तरूनिया ॥ १४ ॥

हीन मूढ दुराचारी माझा आश्रय सोडिती । मायेने भ्रांत होऊनि आसुरी भाव जोडिती ॥ १५ ॥

भक्त चौघे सदाचारी भजती मज अर्जुना । ज्ञानी तसे चि जिज्ञासु हितार्थी आणि विव्हल ॥ १६ ॥

ज्ञानी वरिष्ठ सर्वात नित्य-युक्त अनन्य जो । अत्यंत गोड मी त्यास तो हि गोड तसा मज ॥ १७ ॥

उदार हे जरी सारे ज्ञानी तो मी चि की स्वये । जोडला स्थिर माझ्यात गति अंतिम पाहुनी ॥ १८ ॥

अनेक जन्म घेऊनि पावला शरणागति । विश्व देखे वासुदेव संत तो बहु दुर्लभ ॥ १९ ॥

भ्रमले कामना-ग्रस्त धुंडिती अन्य दैवते । स्वभाव-वश होऊनि तो तो नियम पाळिती ॥ २० ॥

श्रद्धेने ज्या स्वरुपास जे भजू इच्छिती जसे । त्यांची ती चि तशी श्रद्धा स्थिर मी करितो स्वये ॥ २१ ॥

त्या श्रद्धेच्या बळाने ते त्या स्वरुपास पूजिती । मग मागितले भोग पावती मी चि निर्मिले ॥ २२ ॥

अल्प बुद्धीमुळे त्यांस मिळे फळ अशाश्वत । देवांचे भक्त देवांस माझे ते मज पावती ॥ २३ ॥

व्यक्त मी हे चि ते घेती बुद्धि-हीन न जाणुनी । अव्यक्त थोर जे रूप माझे अंतिम शाश्वत ॥ २४ ॥

वेढिलो योग-मायेने अंधार चि जगास मी । अजन्मा नित्य मी कैसा मूढ कोणी न ओळखे ॥ २५ ॥

झाली जी जी हि होतिल भूते आहेत आज जी । सगळी जाणतो ती मी मज कोणी न जाणती ॥ २६ ॥

राग-द्वेषांमुळे चित्ती जडला द्वंद्व-मोह जो । संसारी सगळी भूते त्याने मोहूनि टाकिली ॥ २७ ॥

ज्यांनी झिजविले पाप पुण्य-कर्मे करूनिया । ते द्वंद्व-मोह तोडूनि भजती मज निश्चये ॥ २८ ॥

झटती आश्रये माझ्या जरा-मृत्यु गिळावया । ते ब्रम्ह जाणती पूर्ण तसे अध्यात्म कर्म हि ॥ २९ ॥

अधिभूताधिदैवांत अधियज्ञांत जे मज । देखती ते प्रयाणी हि जाणती मज सावध ॥ ३० ॥

अध्याय सातवा संपूर्ण

अध्याय आठवा

अर्जुन म्हणाला

ब्रह्म ते बोलिले काय काय अध्यात्म कर्म ते । अधि-भूत कसे सांग अधि-दैव हि ते तसे ॥ १ ॥

अधि-यज्ञ कसा कोण ह्या देही बोलिला असे । प्रयाणी हि कसे योगी निग्रही तुज जाणती ॥ २ ॥

श्री भगवान् म्हणाले

ब्रम्ह अक्षर ते थोर अध्यात्म निज-भाव जो । भूत-सृष्टि घडे सारी तो जो व्यापार कर्म ते ॥ ३ ॥

अधि-भूत विनाशी जे जीवत्व अधि-दैवत । अधि-यज्ञ असे मी चि ह्या देही यज्ञ-पूत जो ॥ ४ ॥

अंत-काळी हि माझे चि चित्ती स्मरण राखुनी । देह सोडूनि गेला तो मिळे मज न संशय ॥ ५ ॥

जो जो आठवुनी भाव शेवटी देह सोडितो । मिळे त्या त्या चि भावास सदा त्यांत चि रंगला ॥ ६ ॥

म्हणूनि सगळा काळ मज आठव झुंज तू । मन बुद्धि समर्पूनि मज निःशंक पावसी ॥ ७ ॥

अभ्यासी चित्त जोडूनि योगी अन्य न लक्षुनी । पुरुषास महा दिव्य पावे संतत चिंतुनी ॥ ८ ॥

सर्वज्ञ कर्ता गुरू जो पुराण । सूक्ष्माहुनी सूक्ष्म अचिंत्य-रूप ॥ गिळूनि अंधार उजेडला जो । तो चिंतुनीया प्रभु सूर्य-वर्ण ॥ ९ ॥

प्रयाण-काळी स्थिर चित्त राखे । प्रेमे तसा योग-बळे कसूनि ॥ भ्रू-संगमी प्राण जडूनि ठेवी । तेंव्हा मिळे त्या पुरुषास दिव्य ॥ १० ॥

जे घोकिती अक्षर वेद-वेत्ते । विरक्त यत्ने मिळती जयास ॥ जे ब्रह्मचर्ये पद इच्छिताती । ते सांगतो मी तुज तत्त्व-सार ॥ ११ ॥

लावूनि सगळी द्वारे कोंडूनि मन अंतरी । मस्तकी प्राण राखूनि चढला धारणेवरी ॥ १२ ॥

मुखे ॐ-ब्रह्म उच्चारी अंतरी मज आठवी । ह्यापरी देह ठेवूनि जाय थोर गतीस तो ॥ १३ ॥

अनन्य-चित्त जो नित्य स्मरे मज निरंतर । सदा मिसळला योगी तो सुखे मज पावतो ॥ १४ ॥

पावले मोक्ष-सिद्धीस महात्मे मज भेटुनी । दुःखाचे घर तो जन्म न घेती चि अशाश्वत ॥ १५ ॥

ब्रह्मादि लोक ते सारे माघारे घालिती पुन्हा । माझी भेट घडे तेंव्हा जन्मणे मग खुंटले ॥ १६ ॥

होतसे ब्रह्म-देवाचा सहस्र-युग तो दिन । तेवढी चि तशी रात्र कालोपासक जाणती ॥ १७ ॥

अव्यक्तापासुनी होती भूते व्यक्त दिनोदयी । रात्र होता लया जाती सगळी मग त्यात चि ॥ १८ ॥

ती चि ती चि पुन्हा भूते त्यांचे काही न चालता । दिनांती मरती सारी उदयी जन्म पावती ॥ १९ ॥

अव्यक्त दुसरे तत्त्व त्या अव्यक्तापलीकडे । नाशता सगळी भूते न नाशे जे सनातन ॥ २० ॥

त्यास अक्षर हे नाम ती चि शेवटची गति । माझे परम ते धाम जेथूनि परते चि ना ॥ २१ ॥

लाभे अनन्य-भक्तीने पार्था पुरुष थोर तो । ज्यात ही राहती भूते ज्याने विस्तारले जग ॥ २२ ॥

कोण्या काळी कसा देह ठेवुनी येथ साधक । संसारी पडतो किंवा पावतो सिद्धि ऐक ते ॥ २३ ॥

अग्नीने दिन शुक्लार्ध उत्तरायण जोडुनी । जाय तो गाठतो ब्रह्म शेवटी ब्रह्म जाणुनी ॥ २४ ॥

धूमाने रात्र कृष्णार्ध दक्षिणायन जोडुनी । जाय तो परते येथ चंद्र-लोकास पावुनी ॥ २५ ॥

उजेड आणि अंधार दोन्ही मार्ग अनादि हे । सुटका करितो एक-एक फेर्‍यात टाकितो ॥ २६ ॥

असे हे मार्ग जाणूनी योगी मोह न पावतो । म्हणूनि सर्वदा राहे योगाने जडिला चि तू ॥ २७ ॥

यज्ञात दानात तपात तैसे । जे बोलिले अध्ययनात पुण्य ॥ ते लंघितो सर्व चि जाणुनी हे । योगी चढे आद्य पदास थोर ॥ २८ ॥

अध्याय आठवा संपूर्ण

अध्याय नववा

श्री भगवान् म्हणाले

आता गुपित हे थोर सांगतो निर्मळा तुज । विज्ञाने कसिले ज्ञान अशुभांतूनि सोडवी ॥ १ ॥

राज-विद्या महा-गुह्य उत्तमोत्तम पावन । प्रत्यक्ष हे सुखे लाभे धर्म-सार सनातन ॥ २ ॥

लोक नास्तिक हा धर्म अश्रद्धेने न सेविती । मृत्यूची धरिती वाट संसारी मज सोडुनी ॥ ३ ॥

मी चि अव्यक्त-रूपाने जग हे व्यापिले असे । माझ्यात राहती भूते मी न भूतांत राहतो ॥ ४ ॥

न वा भूते हि माझ्यात माझा हा दिव्य योग की । करितो धरितो भूते परी त्यात नसे कुठे ॥ ५ ॥

आकाशात महा-वायु सदा सर्वत्र राहतो । माझ्यात सगळी भूते राहती जाण तू तशी ॥ ६ ॥

कल्पांती निजवी भूते मी माझ्या प्रकृतीमधे । कल्पारंभी पुन्हा सारी मी चि जागवितो स्वये ॥ ७ ॥

हाती प्रकृति घेऊनि जागवी मी पुन्हा पुन्हा । भूतांचा संघ हा सारा प्रकृतीच्या अधीन जो ॥ ८ ॥

परी ही सगळी कर्मे बांधू न शकती मज । उदासीनापरी राहे अनासक्त म्हणूनिया ॥ ९ ॥

साक्षी मी प्रकृति-द्वारा उभारी सचराचर । त्यामुळे सर्व सृष्टीची ही घडामोड होतसे ॥ १० ॥

मज मानव-रूपात तुच्छत्वे मूढ देखती । नेणूनि थोरले रूप जे माझे विश्व-चालक ॥ ११ ॥

ते आशा-वाद मूढांचे कर्मे ज्ञाने हि ती वृथा । संपत्ति जोडिली ज्यांनी आसुरी मोह-कारक ॥ १२ ॥


दैवी संपत्ति जोडूनि महात्मे भजती मज । अनन्य-भावे जाणूनि मी विश्वारंभ शाश्वत ॥ १३ ॥

अखंड कीर्तने माझ्या यत्न-शील दृढ-व्रती । भक्तीने मज वंदूनि भजती नित्य जोडिले ॥ १४ ॥

दुसरे ज्ञान-यज्ञाने भजती व्यापका मज । ब्रह्म-भावे विवेकाने अविरोधे चि देखुनी ॥ १५ ॥

मी चि संकल्प मी यज्ञ स्वावलंबन अन्न मी । मंत्र मी हव्य ते मी चि अग्नि मी मी चि अर्पण ॥ १६ ॥

मी ह्या जगास आधार माय बाप वडील मी । मी तिन्ही वेद ॐ कार जाणण्या योग्य पावन ॥ १७ ॥

साक्षी स्वामी सखा भर्ता निवास गति आसरा । करी हरी धरी मी चि ठेवा मी बीज अक्षय ॥ १८ ॥

तापतो सूर्य-रूपे मी सोडितो वृष्टि खेंचितो । मृत्यु मी आणि मी मोक्ष असे आणि नसे हि मी ॥ १९ ॥

वेदाभ्यासी सोम-पाने पुनीत । माझ्या यज्ञे इच्छिती स्वर्ग जोडू ॥ ते पुण्याने जाउनी इंद्र-लोकी । तेथींचे ते भोगिती दिव्य भोग ॥ २० ॥

त्या स्वर्गाते भोगुनी ते विशाळ । क्षीणे पुण्ये मृत्यु-लोकास येती ॥ ऐसे निष्ठा ठेवुनी वेद-धर्मी । येणे-जाणे जोडिती काम-मूढ ॥ २१ ॥

अनन्य-भावे चिंतूनि भजती भक्त जे मज । सदा मिसळले त्यांचा मी योग-क्षेम चालवी ॥ २२ ॥

श्रद्धा-पूर्वक जे कोणी यजिती अन्य दैवते । यजिती ते हि माते चि परी मार्गास सोडुनी ॥ २३ ॥

भोक्ता मी सर्व यज्ञांचा फल-दाता हि मी चि तो । नेणती तत्त्व हे माझे म्हणूनि पडती चि ते ॥ २४ ॥

देवांचे भक्त देवांस पितरांचे तयांस चि । भूतांचे भक्त भूतांस माझे हि मज पावती ॥ २५ ॥

पत्र वा पुष्प जो प्रेमे फळ वा जळ दे मज । ते त्या पवित्र भक्ताचे अर्पिले खाय मी सुखे ॥ २६ ॥

जे खासी होमिसी देसी जे जे आचरिसी तप । जे काही करिसी कर्म ते करी मज अर्पण ॥ २७ ॥

अशाने तोडुनी सर्व कर्म-बंध शुभाशुभ । योग-संन्यास सांधूनि मिळसी मज मोकळा ॥ २८ ॥

सम मी सर्व भूतांस प्रियाप्रिय नसे मज । परी प्रेम-बळे राहे भक्त माझ्यांत त्यांत मी ॥ २९ ॥

असो मोठा दुराचारी भजे मज अनन्य जो । मानावा तो जसा साधु त्याचा सुंदर निश्चय ॥ ३० ॥

शीघ्र तो होय धर्मात्मा शांति शाश्वत मेळवी । जाण निश्चित तू माझा भक्त नाश न पावतो ॥ ३१ ॥

धरूनि आसरा माझा भोळे स्त्री-वैश्य-शूद्र हि । की पाप-योनि जे जीव ते हि मोक्षास पावती ॥ ३२ ॥

तेथे ब्रह्मर्षी राजर्षी ह्यांची गोष्ट कशास ती । भज तू मज आलास लोकी दुःख-द नश्वर ॥ ३३ ॥

प्रेमाने ध्यास घेऊनि यजी मज नमी मज । असे जोडूनि आत्म्यास मिळसी मज मत्पर ॥ ३४ ॥

अध्याय नववा संपूर्ण


अध्याय दहावा

श्री भगवान म्हणाले

फिरूनि सांगतो ऐक वाक्य उत्तम मी तुज । राखसी श्रवणी गोडी तुझे मी हित इच्छितो ॥ १ ॥

न देव जाणती माझा प्रभाव न महर्षि हि । सर्वथा मी चि देवांचे महर्षींचे हि मूळ की ॥ २ ॥

ओळखे जो अ-जन्मा मी स्वयं-भू विश्व-चालक । निर्मोह तो मनुष्यांत सुटला पातकांतुनी ॥ ३ ॥

बुद्धि निर्मोहता ज्ञान सत्यता शम निग्रह । जन्म नाश सुखे दुःखे लाभालाभ भयाभय ॥ ४ ॥

तप दातृत्व संतोष अहिंसा समता क्षमा । माझ्या चि पासुनी भूतीं भाव हे वेगवेगळे ॥ ५ ॥

महर्षि सात पूर्वीचे चौघे मनु तसे चि ते । माझे संकल्पिले भाव ज्यांची लोकांत ही प्रजा ॥ ६ ॥

हा योग-युक्त विचार माझा जो नीट ओळखे । त्यास निष्कंप तो योग लाभे ह्यांत न संशय ॥ ७ ॥

सर्वांचे मूळ माझ्यात प्रेरणा मजपासुनी । हे ओळखूनि भक्तीने जाणते भजती मज ॥ ८ ॥

चित्ते प्राणे जसे मी चि एकमेकांस बोधिती । भरूनि कीर्तने माझ्या ते आनंदात खेळती ॥ ९ ॥

असे जे रंगले नित्य भजती प्रीती-पूर्वक । त्यांस मी भेटवी माते देउनी बुद्धि-योग तो ॥ १० ॥

करूनि करुणा त्यांची हृदयी राहुनी स्वये। तेजस्वी ज्ञान-दीपाने अज्ञान-तम घालवी ॥ ११ ॥

अर्जुन म्हणाला

पवित्र तू पर-ब्रह्म थोर ते मोक्ष-धाम तू । आत्मा नित्य अ-जन्मा तू विभु देवादि दिव्य तू ॥ १२ ॥

ऋषि एक-मुखे गाती तसे असित देवल । व्यास नारद देवर्षि तू हि आपण सांगसी ॥ १३ ॥

मानितो सत्य हे सारे स्वये जे सांगसी मज । देव दानव कोणी हि तुझे रूप न जाणती ॥ १४ ॥

जाणसी ते तुझे तू चि प्रत्यक्ष पुरुषोत्तमा । देव-देवा जगन्नाथा भूतेशा भूत-भावना ॥ १५ ॥

विभूति आपुल्या दिव्य मज निःशेष सांग तू । ज्यांनी हे विश्व तू सारे राहिलास भरूनिया ॥ १६ ॥

योगेश्वरा कसे जाणू चिंतनी चिंतनी तुज । कोण्या कोण्या स्वरूपात करावे ध्यान मी तुझे ॥ १७ ॥

त्या विभूती तसा योग आपुला तो सविस्तर । पुन्हा सांग नव्हे तृप्ति सेविता वचनामृत ॥ १८ ॥

श्री भगवान् म्हणाले

बरे मी सांगतो दिव्य मुख्य मुख्य चि त्या तुज । माझा विभूति-विस्तार न संपे चि कुठे कधी ॥ १९ ॥

राहतो आत्मरूपाने सर्वांच्या हृदयात मी । भूत-मात्रास मी मूळ मध्य मी मी चि शेवट ॥ २० ॥

आदित्यांत महा-विष्णु ज्यातिष्मंतांत सूर्य मी । मरीचि मुख्य वायूंत मी नक्षत्रांत चंद्रमा ॥ २१ ॥

मी साम-वेद वेदांत असे देवांत इंद्र मी । चेतना मी चि भूतांत मन ते इंद्रियांत मी ॥ २२ ॥

कुबेर यक्ष-रक्षांत मी रुद्रांत सदाशिव । वसूंत मी असे अग्नि असे उंचांत मेरू मी ॥ २३ ॥

पुरोहितांत तू जाण मुख्य तो मी बृहस्पति । सेनानींत तसा स्कंद जल-राशींत सागर ॥ २४ ॥

मी एकाक्षर वाणींत महर्षींत असे भृगु । जप मी सर्व यज्ञांत मी स्थिरांत हिमालय ॥ २५ ॥

सर्व वृक्षांत अश्वत्थ मी देवर्षींत नारद । मी चित्ररथ गंधर्वीं सिद्धि कपिल मी मुनि ॥ २६ ॥

अश्वीं उचैःश्रवा जो मी निघालो अमृतांतुनि । ऐरावत गजेंद्रांत मी नरांत नराधिप ॥ २७ ॥

मी काम-धेनु गाईंत आयुधीं वज्र मी असे । उत्पत्ति-हेतु मी काम मी सर्पोत्तम वासुकि ॥ २८ ॥

नागांत शेष मी थोर जळी वरुण-देवता । पितरीं अर्यमा तो मी ओढणारांत मी यम ॥ २९ ॥

असे दैत्यांत प्रल्हाद मोजणारांत काळ मी । श्वापदांत असे सिंह पक्षांत खग-राज मी ॥ ३० ॥

वेगवंतांत मी वायु शस्त्र-वीरांत राम मी । मत्स्यांत मी असे नक्र नदी गंगा नद्यांत मी ॥ ३१ ॥

सृष्टीचे मी असे मूळ मुख मी ओघ तो हि मी । विद्यांत आत्म-विद्या मी वक्तांचा तत्त्व-वाद मी ॥ ३२ ॥

समासांत असे द्वंद्व अक्षरांत अकार मी । मी चि अक्षय तो काळ विश्व-कर्ता विराट् स्वये ॥ ३३ ॥

सर्व-नाशक मी मृत्यु होणारा जन्म मी असे । वाणी श्री कीर्ति नारींत क्षमा मेधा धृति स्मृति ॥ ३४ ॥

सामांत मी बृहत्-साम गायत्री मंत्र-सार मी । मी मार्गशीर्ष मासांत ऋतूंत फुलला ऋतु ॥ ३५ ॥

द्यूत मी छळणारांचे तेजस्व्यांतील तेज मी । सत्त्व मी सात्त्विकांतील जय मी आणि निश्चय ॥ ३६ ॥

मी वासुदेव वृष्णींत पांडवांत धनंजय । मुनींत मुनि मी व्यास कवींत उशना कवि ॥ ३७ ॥

दंड मी दमवंतांचा विजयेच्छूंस धर्म मी । गूढांत मौन मी थोर ज्ञात्यांचे ज्ञान मी असे ॥ ३८ ॥

तसे चि सर्व भूतांचे बीज जे ते हि जाण मी ॥ ३९ ॥

माझ्या विण नसे काही लेश-मात्र चराचरी । माझ्या दिव्य विभूतींस नसे अंत कुठे चि तो ॥ ४० ॥ तरी विभूति-विस्तार हा मी थोड्यांत बोलिलो ।

विभूति-युक्त जी वस्तु लक्ष्मीवंत उदात्त वा । माझ्या चि किरणातूनि निघाली जाण ती असे ॥ ४१ ॥

अथवा काय हे फार जाणूनि करिशील तू । एकांशे विश्व हे सारे व्यापूनि उरलो चि मी ॥ ४२ ॥

अध्याय दहावा संपूर्ण


अध्याय अकरा ...

अर्जुन म्हणाला

करूनि करूणा माझी बोलिलास रहस्य जे । त्या थोर आत्म-विद्येने माझा हा मोह फेडिला ॥ १ ॥

उत्पत्ति-नाश भूतांचे ऐकिले मी सविस्तर । कळला तुजपासूनि अभंग महिमा तुझा ॥ २ ॥

तुझे ते ईश्वरी रूप मानितो सांगसी जसे । ते चि मी इच्छितो पाहू प्रत्यक्ष पुरूषोत्तमा ॥ ३ ॥

तू जरी मानिसी शक्य मज ते रूप पाहणे । तरी योगेश्वरा देवा दाखवी ते चि शाश्वत ॥ ४ ॥

श्री भगवान म्हणाले

पहा दिव्य तशी माझी रूपे शत-सहस्र तू । नाना प्रकार आकार वर्ण ज्यात विचित्र चि ॥ ५ ॥

वसु वायु पहा रुद्र तसे आदित्य अश्विनी । पहा अनेक आश्चर्ये कधी कोणी न पाहिली ॥ ६ ॥

इथे आज पहा सारे विश्व तू सचराचर । माझ्या देहांत एकत्र इच्छा-दर्शन हे तुज ॥ ७ ॥

परी तू चर्म-चक्षूने पाहू न शकसी मज । घे दिव्य दृष्टि ही माझा ईश्वरी योग तू पहा ॥ ८ ॥

संजय म्हणाला

महा-योगेश्वरे कृष्णे राया बोलूनी ह्यापरी । दाविले तेथ पार्थास थोरले रूप ईश्वरी ॥ ९ ॥

बहु डोळे मुखे ज्यांत दर्शने बहु अद्भुत । बहु दिव्य अलंकार सज्ज दिव्यायुधे बहु ॥ १० ॥

दिव्य वस्त्रे फुले गंध लेउनी सर्वतोपरी । आश्चर्ये भरला देव विश्व-व्यापी अनंत तो ॥ ११ ॥

प्रभा सहस्र-सूर्यांची नभी एकवटे जरी । तरी त्या थोर देवाच्या प्रभेशी न तुळे चि ती ॥ १२ ॥

सारे जगांतले भेद तेंव्हा कालवले जसे । देहांत देव-देवाच्या देखिले तेथ अर्जुने ॥ १३ ॥

मग विस्मित तो झाला अंगी रोमांच दाटले । प्रभूस हात जोडूनि बोलिला नत-मस्तक ॥ १४ ॥

अर्जुन म्हणाला

देखे प्रभो देव तुझ्या शरीरी । कोंदाटले सर्व चि भूत-संघ ॥ पद्मासनी ध्यान धरी विधाता । ऋषींसवे खेळत दिव्य सर्प ॥ १५ ॥

लेऊनि डोळे मुख हात पोट । जिथे तिथे तू चि अनंत-मूर्ते ॥ विश्वेश्वरा शेवट मध्य मूळ । तुझ्या न मी देखत विश्व-रूपी ॥ १६ ॥

प्रभो गदा-चक्र-किरीट-धारी । प्रकाश सर्वत्र तुझा प्रचंड ॥ डोळे न पाहू शकती अपार । ज्यांतूनि हे पेटत अग्नि-सूर्य ॥ १७ ॥

तू थोर ते अक्षर जाणण्याचे । तुझा चि आधार जगास अंती ॥ तू राखिसी शाश्वत-धर्म नित्य । मी मानितो तू परमात्म-तत्त्व ॥ १८ ॥

किती भुजा वीर्य किती पसारा । डोळे कसे उज्ज्वल चंद्र-सूर्य ॥ हा पेटला अग्नि तुझ्या मुखात । तू ताविसी सर्व चिआत्म-तेजे ॥ १९ ॥

दाही दिशा विस्तृत अंतराळ । व्यापूनि तू एक चि राहिलासी ॥ पाहूनि हे अद्भूत उग्र रूप । तिन्ही जगे व्याकुळली उदारा ॥ २० ॥

हे देव सारे रिघती तुझ्यांत । कोणी भये प्रार्थित बद्ध-हस्त ॥ मांगल्य-गीते तुज सिद्ध संत । परोपरी आळविती समस्त ॥ २१ ॥

आदित्य विश्वे वसु रुद्र साध्य । कुमार दोघे पितृ-देव वायु ॥ गंधर्व दैत्यांसह यक्ष सिद्ध । सारे कसे विस्मित पाहताती ॥ २२ ॥

अफाट हे रूप असंख्य डोळे । मुखे भुजा ऊरू असंख्य पाय ॥ असंख्य पोटे विकराळ दाढा । ह्या दर्शने व्याकुळ लोक मी हि ॥ २३ ॥

भेदूनि आकाश भरूनि रंगी । फाडूनि डोळे उघडूनि तोंडे ॥ तू पेटलासी बघ जीव माझा । भ्याला न देखे शम आणि धीर ॥ २४ ॥

कराळ दाढा विकराळ तोंडे । कल्पांत-अग्नीसम देखतां चि ॥ दिङ्-मूढ झालो सुख ते पळाले । प्रसन्न हो की जग हे तुझे चि ॥ २५ ॥

अहा कसे हे धृतराष्ट्र-पुत्र । घेऊनिया राज-समूह सारे ॥ हे भीष्म हे द्रोण तसा चि कर्ण । हे आमुचे वीर हि मुख्य मुख्य ॥ २६ ॥

जाती त्वरेने चि तुझ्या मुखांत । भयाण जी भ्यासुर ज्यांत दाढा ॥ दातांत काही शिरली शिरे जी । त्यांचे जसे पीठ चि पाहतो मी ॥ २७ ॥

जसे नद्यांचे सगळे प्रवाह । वेगे समुद्रांत चि धाव घेती ॥ तसे तुझ्या हे जळत्या मुखांत । धावूनि जाती नर-वीर सारे ॥ २८ ॥

भरूनिया वेग जसे पतंग । घेती उड्या अग्नि-मुखी मराया ॥ तसे चि हे लोक तुझ्या मुखांत । घेती उड्या वेग-भरे मराया ॥ २९ ॥

समस्त लोकांस गिळूनि ओठ । तू चाटितोसी जळत्या जिभांनी ॥ वेढूनि विश्वास समग्र तेजे । भाजे प्रभो उग्र तुझी प्रभा ही ॥ ३० ॥

सांगा असा कोण तुम्ही भयाण । नमूं तुम्हां देव-वरा न कोपा ॥ जाणावया उत्सुक आदि-देवा । ध्यानी न ये की करणी कशी ही ॥ ३१ ॥

श्री भगवान् म्हणाले

मी काळ लोकांतक वाढलेला । भक्षावया सिद्ध इथे जनांस ॥ हे नष्ट होतील तुझ्या विना हि । झाले उभे जे उभयत्र वीर ॥ ३२ ॥

म्हणूनि तू ऊठ मिळीव कीर्ति । जिंकूनि निष्कंटक राज्य भोगी ॥ मी मारिले हे सगळे चि आधी । निमित्त हो केवळ सव्य-साची ॥ ३३ ॥

द्रोणास भीष्मास जयद्रथास । कर्णादि वीरांस रणांगणात ॥ मी मारिलेल्यांस फिरूनि मारी । निःशंक झुंजे जय तो तुझा चि ॥ ३४ ॥

संजय म्हणाला

ऐकूनि हे अर्जुन कृष्ण-वाक्य । भ्याला जसा कापत हात जोडी ॥ कृष्णास वंदूनि पुनश्च बोले । लवूनिया तेथ गळा भरूनि ॥ ३५ ॥

अर्जुन म्हणाला

जगी तुझ्या युक्त चि कीर्तनाने । आनंद लोटे अनुराग दाटे ॥ भ्याले कसे राक्षस धाव घेती । हे वंदिती सिद्ध-समूह सारे ॥ ३६ ॥

प्रभो न का हे तुज वंदितील । कर्त्यास कर्ता गुरू तू गुरूस ॥ आधार तू अक्षर तू अनंता । आहेस नाहीस पलीकडे तू ॥ ३७ ॥

देवादि तू तू चि पुराण आत्मा । जगास ह्या अंतिम आसरा तू ॥ तू जाणतोसी तुज मोक्ष-धामा । विस्तारिसी विश्व अनंत-रूपा ॥ ३८ ॥

तू अग्नि तू वायु समस्त देव । प्रजापते तू चि पिता वडील ॥ असो नमस्कार सहस्र वार । पुन्हा पुन्हा आणि पुन्हा पुन्हा ॥ ३९ ॥

समोर मागे सगळीकडे चि । असो नमस्कार जिथे जिथे तू ॥ उत्साह सामर्थ्य तुझे अनंत । तू सर्व की सर्व तुझ्या चि पोटी ॥ ४० ॥

समान मानी अविनीत-भावे । कृष्णा गड्या हाक अशी चि मारी ॥ न जाणता हा महिमा तुझा मी । प्रेमे प्रमादे बहु बोल बोले ॥ ४१ ॥

खेळे निजे स्वैर चि खात बैसे । चेष्टा करी सर्व तुझ्या समोर ॥ जनी मनी वा तुज तुच्छ लेखे । क्षमा करी भान तुझे कुणास ॥ ४२ ॥

आहेस तू बाप चराचरास । आहेस मोठी गुरू-देवता तू ॥ तुझी न जोडी तुज कोण मोडी । तिन्ही जगी ह्या उपमा चि थोडी ॥ ४३ ॥

म्हणूनि लोटांगण घालितो मी । प्रसन्न होई स्तवनीय-मूर्ते ॥ क्षमा करी बा मज लेकराते । सखा सख्याते प्रिय तू प्रियाते ॥ ४४ ॥

अपूर्व पाहूनि अपार धालो । परी मनी व्याकुळता न जाय ॥ पुन्हा बघू दे मज ते चि रूप । प्रसन्न होई जगदीश्वरा तू ॥ ४५ ॥

घेई गदा चक्र किरीट घाली । तसे चि पाहू तुज इच्छितो मी ॥ अनंत बाहूंस गिळूनि पोटी । चहू भुजांचा नट विश्व-मूर्ते ॥ ४६ ॥

श्री भगवान् म्हणाले

प्रसन्न होऊनि रचूनि योग । हे दाविले मी तुज विश्व-रूप ॥ अनंत तेजोमय आद्य थोर । जे पाहिले आजवरी न कोणी ॥ ४७ ॥

घोकूनिया वेद करूनि कर्मे । यजूनि वा उग्र तपे तपूनि ॥ देऊनि दाने जगती न शक्य । तुझ्याविना दर्शन हे कुणास ॥ ४८ ॥

होऊ नको व्याकुळ मूढ-भावे । पाहूनि हे रूप भयाण माझे ॥ प्रसन्न-चित्ते भय सोडुनी तू । पहा पुन्हा ते प्रिय पूर्व-रूप ॥ ४९ ॥

संजय म्हणाला

बोलूनि ऐसे मग वासुदेवे । पार्थास ते दाखविले स्वरूप ॥ भ्याल्यास आश्वासन द्यावया तो । झाला पुन्हा सौम्य उदार देव ॥ ५० ॥

अर्जुन म्हणाला

पाहूनि हे तुझे सौम्य मानुषी रुप माधवा । झालो प्रसन्न मी आता आळो भानावरी पुन्हा ॥ ५१ ॥

श्री भगवान् म्हणाले

हे पाहिलेस तू माझे अति दुर्लभ दर्शन । आशा चि राखुनी ज्याची झुरती नित्य देव हि ॥ ५२ ॥

यज्ञ-दान-तपे केली वेदाभ्यास हि साधिला । तरी दर्शन हे माझे नलाभे लाभले तुज ॥ ५३ ॥

लाभे अनन्य-भक्तीने माझे हे ज्ञान-दर्शन । दर्शने होय माझ्यांत प्रवेश मग तत्त्वतां ॥ ५४ ॥

माझ्या कर्मांत जो मग्न भक्तीने भरला असे । जगी निःसंग निर्वैर मिळे तो मज मत्पर ॥ ५५ ॥

अध्याय अकरावा संपूर्ण


अध्याय बारावा

अर्जुन म्हणाला

असे मिसळले कोणी तुज भक्त उपासिती । कोणी अक्षर अव्यक्त योगी ते थोर कोणते ॥ १ ॥

श्री भगवान् म्हणाले

रोवूनि मन माझ्यात भजती नित्य जोडिले । श्रद्धेने भारले माझ्या ते योगी थोर मानितो ॥ २ ॥

परी अचिंत्य अव्यक्त सर्व-व्यापी खुणेविण । नित्य निश्चळ निर्लिप्त जे अक्षर उपासती ॥ ३ ॥

रोधिती इंद्रिये पूर्ण सर्वत्र सम जाणुनी । माझ्या कडे चि ते येती ज्ञानी विश्व-हिती रत ॥ ४ ॥

अव्यक्ती गोविती चित्त क्लेश त्यांस विशेष चि । देहवंतास अव्यक्ती सुखे बोध घडे चि ना ॥ ५ ॥

परी जे सगळी कर्मे मज अर्पूनि मत्पर । अनन्य भक्ति-योगाने भजती चिंतुनी मज ॥ ६ ॥

माझ्यात रोविती चित्त त्यास शीघ्र चि मी स्वये । संसार-सागरांतूनि काढितो मृत्यु मारुनी ॥ ७ ॥

मन माझ्यात तू ठेव बुद्धि माझ्यात राख तू । म्हणजे मग निःशंक मी चि होशील तू स्वये ॥ ८ ॥

जाईल जड माझ्यात चित्तास करणे स्थिर । तरी अभ्यास-योगाने इच्छूनि मज मेळवी ॥ ९ ॥

अभ्यास हि नव्हे साध्य तरी मत्कर्म आचरी । मिळेल तुज ती सिद्धि मत्कर्म हि करूनिया ॥ १० ॥

न घडे हे असे कर्म योग माझ्यात साधुनी । तरी सर्व चि कर्माचे प्रयत्ने फळ सोड तू ॥ ११ ॥

प्रयत्ने लाभते ज्ञान पुढे तन्मयता घडे । मग पूर्ण फल-त्याग शीघ्र जो शांति देतसे ॥ १२ ॥

कोणाचा न करी द्वेष दया मैत्री वसे मनी । मी माझे न म्हणे सोशी सुख-दुःखे क्षमा-बळे ॥ १३ ॥

सदा संतुष्ट जो योगी संयमी दृढ-निश्चयी । अर्पी मज मनो-बुद्धि भक्त तो आवडे मज ॥ १४ ॥

जो न लोकांस कंटाळे ज्यास कंटाळती न ते । हर्ष शोक भय क्रोध नेणे तो आवडे मज ॥ १५ ॥

नेणे व्यथा उदासीन दक्ष निर्मळ निःस्पृह । सोडी आरंभ जो सारे भक्त तो आवडे मज ॥ १६ ॥

न उल्लासे न संतापे न मागे न झुरे चि जो । बरे वाईट सोडूनि भजे तो आवडे मज॥ १७ ॥

सम देखे सखे वैरी तसे मानापमान हि । शीत उष्ण सुखे दुःखे करूनि सम मोकळा ॥ १८ ॥

निंदा स्तुति न घे मौनी मिळे ते गोड मानितो । स्थिर-बुद्धि निराधार भक्त तो आवडे मज ॥ १९ ॥

जे धर्म-सार हे नित्य श्रद्धेने मी चि लक्षुनी । सेविती ते तसे भक्त फार आवडती मज ॥ २० ॥

अध्याय बारावा संपूर्ण


अध्याय तेरावा

श्री भगवान् म्हणाले

अर्जुना ह्या शरीरास म्हणती क्षेत्र जाणते । जाणे हे क्षेत्र जो त्यास क्षेत्र-ज्ञ म्हणती तसे ॥ १ ॥

क्षेत्र-ज्ञ मी चि तो जाण क्षेत्रांत सगळ्या वसे । क्षेत्र-क्षेत्रज्ञ-भेदास जाणणे ज्ञान मी म्हणे ॥ २ ॥

क्षेत्र कोण कसे त्यात विकार कुठले कसे । क्षेत्र-ज्ञ तो कसा कोण एक थोड्यांत सांगतो ॥ ३ ॥

ऋशींनी भिन्न मंत्रांत गाईले हे परोपरी । वर्णिले ब्रह्म-वाक्यांत सप्रमाण सुनिश्चित ॥ ४ ॥

पंच भूते अहंकार बुद्धि अव्यक्त मूळ जे । इंद्रिये अकरा त्यांस खेचिते अर्थ-पंचक ॥ ५ ॥

इच्छा द्वेष सुखे दुःखे धृति संघात चेतना । विकार-युक्त हे क्षेत्र थोड्यांत तुज बोलिलो ॥ ६ ॥

नम्रता दंभ-शून्यत्व अहिंसा ऋजुता क्षमा । पावित्र्य गुरू-शुश्रूषा स्थिरता आत्म-संयम ॥ ७ ॥

निरहंकारता चित्ती विषयांत विरक्तता । जन्म-मृत्यु-जरा-रोग-दुःख-दोष-विचारणा ॥ ८ ॥

निःसंग-वृत्ति कर्मात पुत्रादींत अलिप्तता । प्रिय-अप्रिय लाभांत अखंड सम-चित्तता ॥ ९ ॥

माझ्या ठाई अनन्यत्वे भक्ति निष्काम निश्चळ । एकांताविषयी प्रीती जन-संगांत नावड ॥ १० ॥

आत्म-ज्ञानी स्थिर श्रद्धा तत्त्वता ज्ञेय-दर्शन । हे ज्ञान बोलिले सारे अज्ञान विपरीत जे ॥ ११ ॥

ज्ञेय ते सांगतो ज्याच्या ज्ञानाने अमृतत्व चि । अनादि जे पर-ब्रह्म आहे नाही न बोलवे ॥ १२ ॥

सर्वत्र दिसती ज्यास हात पाय शिरे मुखे । कान डोळे हि सर्वत्र सर्व झाकूनि जे उरे ॥ १३ ॥

असूनि इंद्रियांतीत त्यांचे व्यापार भासवी । न स्पर्शता धरी सर्व गुण भोगूनि निर्गुण ॥ १४ ॥

जे एक आंत-बाहेर जे एक चि चराचर । असूनि जवळी दूर सूक्ष्मत्वे नेणवे चि जे ॥ १५ ॥

भूत-मात्री न भेदूनि राहिले भेदल्यापरी । भूतांस जन्म दे पाळी गिळी जे शेवटी स्वये ॥ १६ ॥

जे अंधारास अंधार तेजाचे तेज बोलिले । ज्ञानाचे ज्ञान ते ज्ञेय सर्वांच्या हृदयी वसे ॥ १७ ॥

संक्षेपे वर्णिले क्षेत्र ज्ञान ज्ञेय तसे चि हे । जाणूनि भक्त जो माझा माझे सायुज्य मेळवी ॥ १८ ॥

प्रकृती-पुरूषाची ही जोडी जाण अनादि तू । प्रकृतीपासुनी होती विकार गुण सर्व हि ॥ १९ ॥

देहेंद्रियांचे कर्तृत्व बोलिले प्रकृतीकडे । दुःखा-सुखाचे भोक्तृत्व बोलिले पुरूषाकडे ॥ २० ॥

बांधिला प्रकृतीने तो तिचे ते गुण भोगितो । गुण-संगामुळे ह्यास घेणे जन्म शुभाशुभ ॥ २१ ॥

सर्व-साक्षी अनु-ज्ञाता भर्ता भोक्ता महेश्वर । म्हणती परमात्मा हि देही पुरूष तो पर ॥ २२ ॥

पुरूषाचे असे रूप प्रकृतीचे गुणात्मक । जाणे कसा हि तो राहो न पुन्हा जन्म पावतो ॥ २३ ॥

ध्यानाने पाहती कोणी स्वये आत्म्यास अंतरी । सांख्य-योगे तसे कोणी कर्म-योगे हि आणिक ॥ २४ ॥

स्वये नेणूनिया कोणी थोरांपासूनि ऐकिती । तरती ते हि मृत्यूस श्रद्धेने वर्तुनी तसे ॥ २५ ॥

उत्पन्न होतसे लोकी जे जे स्थावर-जंगम । क्षेत्र-क्षेत्रज्ञ-संयोगे घडिले जाण सर्व ते ॥ २६ ॥

समान सर्व भूतांत राहिला परमेश्वर । अनाशी नाशवंतांत जो पाहे तो चि पाहतो ॥ २७ ॥

जो पाहे प्रभु सर्वत्र भरला सम तो स्वये । आत्म्याची न करी हिंसा गति उत्तम मेळवी ॥ २८ ॥

प्रकृतीच्या चि तंत्राने कर्मे होतात सर्व हि । आत्मा तो न करी काही हे पाहे तो चि पाहतो ॥ २९ ॥

एकत्वी जोडिले पाहे भूतांचे वेगळेपण । त्यामधूनि चि विस्तार तेंव्हा ब्रह्मत्व लाभले ॥ ३० ॥

परमात्मा न वेचे चि की निर्गुण अनादि हा । राहे देही परी काही न करी न मळे चि तो ॥ ३१ ॥

सर्व व्यापूनि आकाश सूक्ष्मत्वे न मळे जसे । सर्वत्र भरला देही आत्मा तो न मळे तसा ॥ ३२ ॥

एकला चि जसा सूर्य उजळी भुवन-त्रय । तसा क्षेत्रज्ञ तो क्षेत्र संपूर्ण उजळीतसे ॥ ३३ ॥

पाहती ज्ञान-दृष्टीने क्षेत्र-क्षेत्रज्ञ-भेद हा । भूत-प्रकृति लंघूनि ते ब्रह्म-पद पावती ॥ ३४ ॥

अध्याय तेरावा संपूर्ण


अध्याय चौदावा

श्री भगवान् म्हणाले

सर्व ज्ञानामधे थोर ज्ञान ते सांगतो पुन्हा । जे जाणूनि इथे मोक्ष पावले सगळे मुनि ॥ १ ॥

ह्या ज्ञानाच्या बळाने ते झाले माझ्या चि सारखे । जगे येवोत जावोत ते अभंग जसे तसे ॥ २ ॥

माझे प्रकृति हे क्षेत्र तिथे मी बीज पेरितो । त्यांतूनि सर्व भूतांची उत्पत्ति मग होतसे ॥ ३ ॥

सर्व योनींमधे मूर्ति जितुक्या जन्म पावती । माता प्रकृति ही त्यांस पिता मी बीज पेरिता ॥ ४ ॥

प्रकृतीपासुनी होती गुण सत्त्व-रजस्-तम । ते निर्विकार आत्म्यास जणू देहांत जुंपिती ॥ ५ ॥

त्यांत निर्मळ ते सत्त्व ज्ञान आरोग्य वाढवी । मी सुखी आणि मी ज्ञानी शृंखला ही चि लेववी ॥ ६ ॥

रज ते वासना-रूप तृष्णा आसक्ति वाढवी । आत्म्यास कर्म-संगाने टाकिते जखडूनि ते ॥ ७ ॥

गुंगवी तम सर्वांस अज्ञान चि विरूढले । झोप आळस दुर्लक्ष ह्यांनी घेरूनि बांधिते ॥ ८ ॥

सुखात घालिते सत्त्व रज कर्मात घालिते । ज्ञान झाकूनि संपूर्ण दुर्लक्षी घालिते तम ॥ ९ ॥

अन्य दोघांस जिंकूनि तिसरे करिते बळ । असे चढे कधी सत्त्व कधी रज कधी तम ॥ १० ॥

प्रज्ञेचा इंद्रिय-द्वारा प्रकाश सगळीकडे । देहांत पसरे तेंव्हा जाणावे रज वाढले ॥ ११ ॥

प्रवृत्ति लालसा लोभ कर्मारंभ अशांतता । ही देही उठती तेंव्हा जाणावे रज वाढले ॥ १२ ॥

अंधार मोह दुर्लक्ष अपप्रवृत्ति चहूकडे । देहांत माजली तेंव्हा जाणावे तम वाढले ॥ १३ ॥

वाढले असता सत्त्व जाय जो देह सोडुनी । जन्मतो शुभ लोकांत तो ज्ञात्यांच्या समागमी ॥ १४ ॥

रजांत लीन झाला तो कर्मासक्तांत जन्मतो । तमी बुडूनि गेला तो मूढ-योनीत जन्मतो ॥ १५ ॥

फळ सात्त्विक कर्माचे पुण्य निर्मळ बोलिले । रजाचे फळ ते दुःख तमाचे ज्ञान-शून्यता ॥ १६ ॥

सत्त्वांतूनि निघे ज्ञान निघे लोभ रजांतुनी । अज्ञान मोह दुर्लक्ष निघती ही तमांतुनी ॥ १७ ॥

सत्त्व-स्थ चढती उंच मध्ये राजस राहती । हीन-वृत्तीत वागूनि जाती तामस खालती ॥ १८ ॥

गुणांविण नसे कर्ता आत्मा तो त्यांपलीकडे । देखणा ओळखे हे जो होय माझे चि रूप तो ॥ १९ ॥

देह-कारण हे तीन गुण जाय तरूनि जो । जन्म-मृत्यु-जरा-दुःखी सोडिला मोक्ष गांठतो ॥ २० ॥

अर्जुन म्हणाला

त्रिगुणातीत जो देवा त्याचे लक्षण काय ते । वागणूक कशी त्याची कसा तो गुण निस्तरे ॥ २१ ॥

श्री भगवान् म्हणाले

प्रकाश मोह उद्योग गुण-कार्ये निसर्गता । पावतां न करी खेद न धरी आस लोपतां ॥ २२ ॥

राहे जसा उदासीन गुणांनी जो न चाळवे । त्यांचा चि खेळ जाणूनि न डोले लेश-मात्र हि ॥ २३ ॥

आत्मत्वे सम जो पाहे सोने पाषाण मृत्तिका । धैर्यवंत सुखे दुःखे स्तुति-निंदा प्रियाप्रिय ॥ २४ ॥

मानापमान जो नेणे नेणे जो शत्रु-मित्र हि । आरंभ सोडिले ज्याने तो गुणातीत बोलिला ॥ २५ ॥

जो एक-निष्ठ भक्तीने अखंड मज सेवितो । तो ह्या गुणांस लंघूनि शके ब्रह्मत्व आकळू ॥ २६ ॥

ब्रह्मास मी चि आधार अवीट अमृतास मी । मी चि शाश्वत धर्मास आत्यंतिक सुखास मी ॥ २७ ॥

अध्याय चौदावा संपूर्ण


अध्याय पंधरावा

श्री भगवान् म्हणाले

खाली शाखा वरी मूळ नित्य अश्वत्थ बोलिला । ज्याच्या पानांमधे वेद जाणे तो वेद जाणतो ॥ १ ॥

वरी हि शाखा फुटल्या तयास । ही भोग-पाने गुण-पुष्ट जेथे ॥ खाली हि मूळे निघती नवीन । दृढावली कर्म-बळे नृ-लोकी ॥ २ ॥

ह्याचे तसे रूप दिसे न येथे । भासे न शेंडा बुडखा न खांदा ॥ घेऊनि वैराग्य अभंग शस्त्र । तोडूनिया हा दृढ-मूल वृक्ष ॥ ३ ॥

घ्यावा पुढे शोध तया पदाचा । जेथूनि मागे फिरणे नसे चि ॥ द्यावी बुडी त्या परमात्म-तत्त्वी । प्रवृत्ति जेथे स्पुरली अनादी ॥ ४ ॥

जो मान-मोहांस संग-दोष । जाळूनि निर्वासन आत्म-निष्ठ ॥ द्वंद्वे न घेती सुख-दुःख-मूळ । ते प्राज्ञ त्या नित्य पदी प्रविष्ट ॥ ५ ॥

न त्यास उजळी सूर्य कायसे अग्नि-चंद्र हे । जेथ गेला न परते माझे अंतिम धाम ते ॥ ६ ॥

माझा चि अंश संसारी झाला जीव सनातन । पंचेंद्रिये मनोयुक्त प्रकृतींतूनि खेचितो ॥ ७ ॥

पुष्पादिकांतुनी वारा गंध खेचूनि घेतसे । तशी घेऊनि ही सर्व देह सोडी धरी प्रभु ॥ ८ ॥

श्रोत्र जिह्वा त्वचा चक्षु घ्राण आणिक ते मन । ह्या सर्वांस अधिष्ठूनि ते ते विषय सेवितो ॥ ९ ॥

सोडितो धरितो देह भोगितो गुण-युक्त हा । परी न पाहती मूढ ज्ञानी डोळस पाहती ॥ १० ॥

योगी यत्न-बळे ह्यास पाहती हृदयी स्थित । चित्त-हीन अशुद्धात्मे प्रयत्ने हि न पाहती ॥ ११ ॥

सूर्यात जळते तेज जे विश्व उजळीतसे । तसे चंद्रात अग्नीत जाण माझे चि तेज ते ॥ १२ ॥

आकर्षण-बळे भूते धरा-रूपे धरीतसे । वनस्पतींस मी सोम पोषितो भरिला रसे ॥ १३ ॥

मी वैश्वानर-रूपाने प्राणि-देहांत राहुनी । अन्ने ती पचवी चारी प्राणापानांस फुंकुनी ॥ १४ ॥

सर्वांतरी मी करितो निवास । देतो स्मृति ज्ञान विवेक सर्वा ॥ समग्र वेदांस हि मी चि वेद्य । वेद-ज्ञ मी वेद-रहस्य-कर्ता ॥ १५ ॥

लोकी पुरूष ते दोन क्षर आणिक अक्षर । क्षर सर्व चि ही भूते स्थिर अक्षर बोलिला ॥ १६ ॥

म्हणती परमात्मा तो तिजा पुरूष उत्तम । विश्व-पोषक विश्वात्मा जो विश्वेश्वर अव्यय ॥ १७ ॥

मी क्षरा-अक्षराहूनि वेगळा आणि उत्तम । वेद लोक म्हणे माते म्हणूनि पुरूषोत्तम ॥ १८ ॥

मोह सारूनि जो दूर जाणे मी पुरूषोत्तम । सर्व-ज्ञ तो सर्व-भावे सर्व-रूपी भजे मज ॥ १९ ॥

अत्यंत गूढ हे शास्त्र निर्मळा तुज बोलिलो । हे जाणे तो बुद्धिमंत होईल कृत-कृत्य चि ॥ २०॥

अध्याय पंधरावा संपूर्ण


अध्याय सोळावा

श्री भगवान् म्हणाले

निर्भयत्व मनःशुद्धि योग-ज्ञानी सुनिश्चय । यज्ञ निग्रह दातृत्व स्वाध्याय ऋजुता तप ॥ १ ॥

अहिंसा शांति अक्रोध त्याग सौजन्य सत्यता । अ-लुब्धता दया भूती मर्यादा स्थैर्य मार्दव ॥ २ ॥

पवित्रता क्षमा तेज धैर्य अद्रोह नम्रता । हे त्याचे गुण जो आला दैवी संपत्ति घेउनी ॥ ३ ॥

दंभ मीपण अज्ञान क्रोध दर्प कठोरता । लाभती गुण हे त्यास ज्याची संपत्ति आसुरी ॥ ४ ॥

सुटका करिते दैवी आसुरी बंध घालिते । भिऊ नको चि आलास दैवी संपत्ति जोडुनी ॥ ५ ॥

भूत-सृष्टि जगी दोन दैवी आणिक आसुरी । विस्तारे वर्णिली दैवी आसुरी ऐक सांगतो ॥ ६ ॥

कृत्याकृत्य कसे काय नेणती आसुरी जन । न स्वच्छता न आचार जाणती ते न सत्य हि ॥ ७ ॥

म्हणती लटिके विश्व निराधार निरीश्वर । काम-मूलक हे सारे कोठले सह-कार्य ते ॥ ८ ॥

स्वीकारूनि अशी दृष्टि नष्टात्मे ज्ञान-हीन ते । जगताच्या क्षयासाठी निघाले रिपु हिंसक ॥ ९ ॥

काम दुर्भर सेवूनि मानी दांभिक माजले । दुराग्रह-बळे मूढ करिती पाप निश्चये ॥ १० ॥

अपार धरिती चिंता जी मेल्या हि सरे चि ना । गढले काम-भोगात जणू सर्वस्व मानुनी ॥ ११ ॥

आशेचे लेइले फांस काम-क्रोधांत तत्पर । भोगासाठी अधर्माने इच्छिती धन-संचय ॥ १२ ॥

हे आज लाभले आता तो जोडीन मनोरथ । हे आहे ते हि होईल माझे चि सगळे धन ॥ १३ ॥

मी मारिला चि तो शत्रु मारीन दुसरे हि जे । मी स्वामी आणि मी भोक्ता सुखी मी सिद्ध मी बळी ॥ १४ ॥

कुलीन मी चि संपन्न माझी जोडी कुठे असे । यज्ञ-दान-विलासी मी जल्पती अज्ञ मोहित ॥ १५ ॥

भ्रमले चित्त भेदूनि मोह-जालांत गुंतले । पडती विषयासक्त नरकांत अमंगळ ॥ १६ ॥

स्वयं-पूजित गर्विष्ठ धने माने मदांध ते । नावाचे करिती यज्ञ दंभाने अव्यवस्थित ॥ १७ ॥

अहंकारे बळे दर्पे काम-क्रोधे भरूनिया । माझा स्व-पर-देहांत करिती द्वेष मत्सरी ॥ १८ ॥

द्वेषी क्रूर असे पापी संसारी हीन जे जन । त्यांस मी टकितो नित्य तशा योनीत आसुरी ॥ १९ ॥

जोडूनि आसुरी योनि जन्मजन्मांतरी मग । माते न मिळता जाती उत्तरोत्तर खालती ॥ २० ॥

काम क्रोध तसा लोभ आत्म-नाशास कारण । तीन ही नरक-द्वारे टाळावी चि म्हणूनिया ॥ २१ ॥

तमाची ही तिन्ही द्वारे टाळूनि सुटला मग । कल्याण-मार्ग सेवूनि पावे उत्तम तो गति ॥ २२ ॥

जो शास्त्र-मार्ग सोडूनि करितो स्वैर वर्तन । न सिद्धि लाभते त्यास न वा सुख न सद्-गति ॥ २३ ॥

म्हणूनि आदरी शास्त्र कार्याकार्य कळावया । शास्त्राचे वाक्य जाणूनि इथे तू कर्म आचरी ॥ २४ ॥

अध्याय सोळावा संपूर्ण


अध्याय सतरावा

अर्जुन म्हणाला

जे शास्त्र-मार्ग सोडूनि श्रद्धा-पूर्वक पूजिती । त्यांची सात्त्विक ती निष्ठा किंवा राजस तामस ॥ १ ॥

श्री भगवान् म्हणाले

तिन्ही प्रकारची श्रद्धा स्वभावे जीव मेळवी । ऐक सात्त्विक ती होय तशी राजस तामस ॥ २ ॥

जसा स्वभाव तो ज्याचा श्रद्धा त्याची तशी असे । श्रद्धेचा घडिला जीव जशी श्रद्धा तसा चि तो ॥ ३ ॥

सत्त्व-स्थ पूजिती देव यक्ष-राक्षस राजस । प्रेते आणि भुते-खेते पूजिती लोक तामस ॥ ४ ॥

शास्त्रे निषेधिले घोर दंभे आचरिती तप । अभिमानास पेटूनि काम-रागे बळावले ॥ ५ ॥

देह-धातूंस शोषूनि मज आत्म्यास पीडिती । विवेक-हीन जे त्यांची निष्ठा ती जाण आसुरी ॥ ६ ॥

आहारांत हि सर्वांच्या तीन भेद यथा-रुचि । तसे यज्ञी तपी दानी सांगतो भेद ऐक ते ॥ ७ ॥

सत्त्व प्रीती सुख स्वास्थ्य आयुष्य बळ वाढवी । रसाळ मधुर स्निग्ध स्थिर आहार सात्त्विक ॥ ८ ॥

खारे रूक्ष कडू तीख अम्ल अतुष्ण दाहक । दुःख-शोक-द आहार रोग-वर्धक राजस ॥ ९ ॥

रस-हीन निवालेले शिळे दुर्गंध-युक्त जे । निषिद्ध आणि उष्टे हि तामस-प्रिय भोजन ॥ १० ॥

फलाभिलाष सोडूनि कर्तव्य चि म्हणूनिया । विधीने मन लावूनि होय तो यज्ञ सात्त्विक ॥ ११ ॥

फळाचे अनुसंधान राखुनी दंभ-पूर्वक । लोकांत यजिला जाय जाण तो यज्ञ राजस ॥ १२ ॥

नसे विधि नसे मंत्र अन्नोत्पत्ति नसे जिथे । नसे श्रद्धा नसे त्याग बोलिला यज्ञ तामस ॥ १३ ॥

गुरू-देवादिकी पूजा स्वच्छता वीर्य-संग्रह । अहिंसा ऋजुता अंगी देहाचे तप बोलिले ॥ १४ ॥

हितार्थ बोलणे सत्य प्रेमाने न खुपेलसे । स्वाध्याय करणे नित्य वाणीचे तप बोलिले ॥ १५ ॥

प्रसन्न-वृत्ति सौम्यत्व आत्म-चिंतन संयम । भावना राखणे शुद्ध मनाचे तप बोलिले ॥ १६ ॥

तिहेरी तप ते सारे श्रद्धा उत्कट जोडुनी । समत्वे फळ सोडूनि घडले जाण सात्त्विक ॥ १७ ॥

सत्कारादिक इच्छूनि केले जे दंभ राखुनी । ते चंचळ इथे जाण तप राजस अस्थिर ॥ १८ ॥

दुराग्रहे चि जे होय अंतरात्म्यास पीडुनी । किंवा जे पर-घातार्थ जाण तामस ते तप ॥ १९ ॥

देशी काळी तसे पात्री उपकार न इच्छिता । धर्म-भावे चि जे देणे जाण ते दान सात्त्विक ॥ २० ॥

उपकार अपेक्षूनि अथवा फळ वांछुनी । क्लेश-पूर्वक जे देणे जाण ते दान राजस ॥ २१ ॥

करूनि भावना तुच्छ देशादिक न पाहता । अनादरे चि जे देणे जाण ते दान तामस ॥ २२ ॥

ॐ-तत्-सत् ह्यापरी ब्रह्म तिहेरी स्मरले असे । त्यांतूनि निर्मिले पूर्वी वेद यज्ञ उपासक ॥ २३ ॥

म्हणूनि आधी ॐकार उच्चारूनि उपासक । यज्ञ-दान-तपे उक्त निरंतर अनुष्ठिती ॥ २४ ॥

तत्-कार-स्मरणे सर्व तोडूनि फल-वासना । नाना यज्ञ तपे दानेकरिती मोक्ष लक्षुनी ॥ २५ ॥

सत्-कार-स्मरणे लाभे सत्यता आणि साधुता । तशी सुंदरता कर्मी सत्-कारे बोलिली असे ॥ २६ ॥

यज्ञ-दान-तपे किंवा कर्मे जी त्यांस साधक । वागणे ह्यापरी त्यांत सत्-कार-फळ बोलिले ॥ २७ ॥

यज्ञ दाने तपे कर्मे अश्रद्धेने अनुष्ठिली । बोलिली सर्व ती मिथ्या दोन्ही लोकांत निष्फळ ॥ २८ ॥

अध्याय सतरावा संपूर्ण


अध्याय अठरावा

[५५]

अर्जुन म्हणाला

संन्यासाचे कसे तत्त्व त्यागाचे हि कसे असे । मी जाणू इच्छितो कृष्णा सांगावे वेगवेगळे ॥ १ ॥

श्री भगवान् म्हणाले

सोडणे काम्य कर्मे तो ज्ञाते संन्यास जाणती । फळ सर्व चि कर्माचे सोडणे त्याग बोलती ॥ २ ॥

दोष-रूप चि ही कर्मे सोडावी म्हणती कुणी । न सोडावी चि म्हणती यज्ञ-दान-तपे कुणी ॥ ३ ॥

तरी ह्याविषयी ऐक माझा निश्चित निर्णय । त्यग जो म्हणती तो हि तिहेरी भेदला असे ॥ ४ ॥

यज्ञ-दान-तपे नित्य करणीय अवश्यक । न सोडावी चि ती होती ज्ञानवंतास पावक ॥ ५ ॥

परी ही पुण्य-कर्मे हि ममत्व फळ सोडुनी । करणे योग्य हा माझा जाण उत्तम निर्णय ॥ ६ ॥

नेमिले कार्य जे त्याचा संन्यास नजुळे चि तो । केला तसा जरी मोहे त्याग तामस बोलिला ॥ ७ ॥

कष्टामुळे चि जे कर्म सोडणे आंग राखुनी । त्याग राजस तो वांझ न देखे आपुले फळ ॥ ८ ॥

करणे नेमिले कर्म कर्तव्य चि म्हणूनिया । ममत्व फळ सोडूनि त्याग तो मान्य सात्त्विक ॥ ९ ॥

कर्मी शुभाशुभी जेंव्हा राग-द्वेष न राखतो । सत्त्वांत मुरला त्यागी ज्ञने छेदूनि संशय ॥ १० ॥

अशक्य देहवंतास सर्वथा कर्म सोडणे । म्हणूनि जो फल-त्यागी तो त्यागी बोलिला असे ॥ ११ ॥

तिहेरी फळ कर्माचे बरे वाईट मिश्रित । त्याग-हीनास ते लाभे संन्यासी मुक्त त्यांतुनी ॥ १२ ॥

[५६]

ऐक तू मजपासूनि ज्ञात्यांचा कर्म-निर्णय । परभारे चि हे कर्म करिती पांच कारणे ॥ १३ ॥

अधिष्ठान अहंकार तशी विविध साधने । वेगळाल्या क्रिया नाना दैव ते येथ पांचवे ॥ १४ ॥

काया-वाचा-मने जे जे मनुष्य करितो जगी । धर्माचे वा अधर्माचे त्याची ही पांच कारणे ॥ १५ ॥

तेथ जो शुद्ध आत्म्यास कर्ता मानूनि बैसला । संस्कार-हीन तो मूढ तत्त्व नेणे चि दुर्मति ॥ १६ ॥

नसे ज्यास अहंभाव नसे बुद्धीत लिप्तता । मारी विश्व जरी सारे न मारी चि न बांधिला ॥ १७ ॥

[५७]

ज्ञाता ज्ञेय तसे ज्ञान तिहेरी कर्म-बीज हे । क्रिया करण कर्तृत्व कर्मांगे तीन त्यांतुनी ॥ १८ ॥

ज्ञाता-कर्मांत कर्त्यांत त्रिगुणी तीन भेद जे । रचिले ते कसे ऐक गुण-तत्त्वज्ञ वर्णिती ॥ १९ ॥

भूत-मात्रांत जे पाहे भाव एक सनातन । अभिन्न भेदलेल्यांत जाण ते ज्ञान सात्त्विक ॥ २० ॥

भेद-बुद्धीस पोषूनि सर्व भूतांत पाहते । वेगळे वेगळे भाव जाण ते ज्ञान राजस ॥ २१ ॥

एका देहांत सर्वस्व मानुनी गुंतले वृथा । भावार्थ-हीन जे क्षुद्र जाण ते ज्ञान तामस ॥ २२ ॥

नेमिले जे न गुंतूनि राग-द्वेष न राखता । केले निष्काम-वृत्तीने कर्म ते होय सात्त्विक ॥ २३ ॥

ध्रूनि कामना चित्ती जे अहंकार-पूर्वक । केले महा खटातोपे कर्म ते होय राजस ॥ २४ ॥

विनाश वेच निष्पत्ति सामर्थ्य हि न पाहता । आरंभिले चि जे मोहे कर्म ते होय तामस ॥ २५ ॥

निःसंग निरहंकार उत्साही धैर्य-मंडित । फळो जळॉ चळे ना तो कर्ता सात्त्विक बोलिला ॥ २६ ॥

फल-कामुक आसक्त लोभी अस्वच्छ हिंसक । मारिता हर्ष-शोके तो कर्ता राजस बोलिला ॥ २७ ॥

स्वच्छंदी क्षुद्र गर्विष्ठ घातकी शठ आळशी । दीर्घ-सूत्री सदा खिन्न कर्ता तामस बोलिला ॥ २८ ॥

बुद्धीचे भेद जे तीन धृतीचे हि तसे चि जे । गुणानुसार ते सारे सांगतो वेग्वेगळे ॥ २९ ॥

अकर्तव्ये बंध-भय कर्तव्ये मोक्ष निर्भय । जाणे सोडू धरू त्यांस बुद्धि सात्त्विक ओळख ॥ ३० ॥

कार्याकार्य कसे काय काय धर्म अधर्म तो । जी जाणू न शके चोख बुद्धि राजस ओळख ॥ ३१ ॥

धर्म मानी अधर्मास अंधारे भरली असे । अर्थ जी उलटा देखे बुद्धि तामस ओळख ॥ ३२ ॥

जी इंद्रिये मन प्राण ह्यांचे व्यापर चालवी । समत्वे स्थिर राहूनि धृति सात्त्विक जाण ती ॥ ३३ ॥

धर्मार्थकाम सारे चि चालवी सोय पाहुनी । बुडवी जी फलाशेत धृति राजस जाण ती ॥ ३४ ॥

निद्रा भय न जी सोडी शोक खेद तसा मद । घाली झांपड बुद्धीस धृति तामस जाण ती ॥ ३५ ॥

तिन्ही प्रकारचे आता सांगतो सुख ऐक ते ॥ ३६ ॥

अभ्यासे गोड जे होय दुःखाचा अंत दाखवी । जे कडू विख आरंभी अंती अमृत-तुल्य चि । आत्म्यांत शुद्ध बुद्धीस लाभले सुख सात्त्विक ॥ ३७ ॥

आरंभी गोडसे वाटे अंती मारक जे विख । भासे विषय-संयोगे इंद्रिया सुख राजस ॥ ३८ ॥

निद्रा आळस दुर्लक्ष ह्यांनी आत्म्यास घेरुनी । आरंभी परिणामी हि गुंगवी सुख तामस ॥ ३९ ॥

इथे पृथ्वीवरी किंवा स्वर्गी देवादिकांत हि । काही कुठे नसे मुक्त प्रकृतीच्या गुणांतुनी ॥ ४० ॥

[५८]

ब्राह्मणादिक वर्णांची कर्मे ती ती विभागिली । स्वभाव-सिद्ध जे ज्याचे गुण त्यास धरूनिया ॥ ४१ ॥

शांति क्षमा तप श्रद्धा ज्ञान विज्ञान निग्रह । ऋजुता आणि पावित्र्य ब्रह्म-कर्म स्वभावता ॥ ४२ ॥

शौर्य दैर्य प्रजा-रक्षा युद्धी हि अ-पलायन । दातृत्व दक्षता तेज क्षात्र-कर्म स्वभावता ॥ ४३॥

शेती व्यापार गो-रक्षा वैश्य-कर्म स्वभावता । करणे पडिली सेवा शूद्र-कर्म स्वभावता ॥ ४४ ॥

आपुल्या आपुल्या कर्मी दक्ष तो मोक्ष मेळवी । ऐक लाभे कसा मोक्ष स्व-कर्मी लक्ष लावुनी ॥ ४५ ॥

जो प्रेरी भूत-मात्रास ज्याचा विस्तार विश्व हे । स्व-कर्म-कुसुमी त्यास पूजिता मोक्ष लाभतो ॥ ४६ ॥

उणा हि अपुला धर्म पर-धर्माहुनी बरा । स्वभावे नेमिले कर्म करी तो दोष जाळितो ॥ ४७ ॥

सहज-प्राप्त ते कर्म न सोडावे सदोष हि । दोष सर्व चि कर्मांत राहे अग्नींत धूर तो ॥ ४८ ॥

राखे कुठे न आसक्ति जिंकूनि मन निःस्पृह । तो नैष्कर्म्य महा-सिद्धि पावे संन्यास साधुनी ॥ ४९ ॥

सिद्धीस लाभला ब्रह्म गांठी कोण्यापरी मग । ज्ञानाची थोर ती निष्ठा ऐक थोडांत सांगतो ॥ ५० ॥

बुद्धि सात्त्विक जोडूनि धृतीचा दोर खेचुनी । शब्दादि-स्पर्श टाळूनि राग-द्वेषांस जिंकुनी ॥ ५१ ॥

चित्त वाचा तनू नेमी एकांती अल्प सेवुनी । गढला ध्यान-योगात दृढ वैराग्य लेउनी ॥ ५२ ॥

बळ दर्प अहंकार काम क्रोध परिग्रह । ममत्वासह सोडूनि शांतीने ब्रह्म आकळी ॥ ५३ ॥

ब्रह्म झाला प्रसन्नत्वे न करी शोक कामना । पावे माझी परा भक्ति देखे सर्वत्र साम्य जी ॥ ५४ ॥

भक्तीने तत्त्वता जाणे कोण मी केवढा असे । ह्यापरी मज जाणूनि माझ्यात मिसळे मग ॥ ५५ ॥

करूनि हि सदा कर्मे सगळी मज सेवुनी । पावे माझ्या कृपेने तो अवीट पद शाश्वत ॥ ५६ ॥

मज मत्पर-वृत्तीने सर्व कर्मे समर्पुनी । समत्व न ढळू देता चित्त माझ्यात ठेव तू ॥ ५७ ॥

मग सर्व भये माझ्या कृपेने तरशील तू । मीपणे हे न मानूनि पावशील विनाश चि ॥ ५८ ॥

म्हणसी मी न झुंजे चि हे जे मीपण घेउनी । तो निश्चय तुझा व्यर्थ स्वभाव करवील चि ॥ ५९ ॥

स्वभाव-सिद्ध कर्माने आपुल्या बांधिलास तू । जे टाळू पाहसी मोहे अवश्य करिशील ते ॥ ६० ॥

राहिला सर्व भूतांच्या हृदयी परमेश्वर । मायेने चाळवी त्यास जणू यंत्रांत घालुनी ॥ ६१ ॥

त्याते चि सर्व-भावे तू जाई शरण पावसी । त्याच्या कृपा-बळे थोर शांतीचे स्थान शाश्वत ॥ ६२ ॥

असे गूढाहुनी गूढ बोलिलो ज्ञान मी तुज । ध्यानी घेऊनि ते सारे स्वेच्छेने योग्य ते करी ॥ ६३ ॥

सर्व गूढांतले गूढ पुन्हा उतम वाक्य हे । हितार्थ सांगतो ऐक फार आवडसी मज ॥ ६४ ॥

प्रेमाने ध्यास घेऊनि यजी मज नमी मज । प्रिय तूमिळसी माते प्रतिज्ञा जाण सत्य ही ॥ ६५ ॥

सगळे धर्म सोडुनि एका शरण ये मज । जाळीन सर्व मी पापे तुझी शोक करू न्को ॥ ६६ ॥

[६०]

न कथी हे कधी त्यास तपो-हीन अभक्त जो । श्रवणेच्छा नसे ज्यास माझा मत्सर जो करी ॥ ६७ ॥

सांगेल गुज हे थोर माझ्या भक्त-गणांत जो । तो त्या परम भक्तीने मिळेल मज निश्चित ॥ ६८ ॥

कोणी अधिक त्याहूनि माझे प्रिय करी चि ना । जगी आवडता कोणी न होय मज त्याहुनी ॥ ६९ ॥

हा धर्म-रूप संवाद जो अभ्यासील आमुचा । मी मानी मज तो पूजी ज्ञान-यज्ञ करूनिया ॥ ७० ॥

हे ऐकेल हि जो कोणी श्रद्धेने द्वेष सोडुनी । पावेल कर्म-पूतांची तो हि निर्वेध सद्-गति ॥ ७१ ॥

तू हे एकाग्र चित्ताने अर्जुना ऐकिलेस की । अज्ञान-रूप तो मोह गेला संपूर्ण की तुझा ॥ ७२ ॥

अर्जुन म्हणाला

मोह मेला चि तो देवा कृपेने स्मृति लाभली । झालो निःशंक मी आता करीन म्हणसी तसे ॥ ७३ ॥

संजय म्हणाला

असा कृष्णार्जुनांचा हा झाला संवाद अद्भुत । थोरांचा ऐकिला तो मी नाच्वी रोम रोम जो ॥ ७४ ॥

व्यास-देवे कृपा केली थोर योग-रहस्य हे । मी योगेश्वर कृष्णाच्या मुखे प्रत्यक्ष ऐकिले ॥ ७५ ॥

हा कृष्णार्जुन-संवाद राया अद्भुत पावन । आठवूनि मनी फार हर्षतो हर्षतो चि मी ॥ ७६ ॥

स्मरूनि बहु ते रूप हरीचे अति अद्भुत । राया विस्मित होऊनि नाच्तो नाच्तो चि मी ॥ ७७ ॥

जिथे योगेश्वर कृष्ण जिथे पार्थ धनुर्धर । तिथे मी पाहतो नित्य धर्म श्री जय वैभव ॥ ७८ ॥

गीताई संपूर्ण

वैयक्‍तिक साधने