ज्ञानेश्वरी/अध्याय पहिला

Wikibooks कडून

[ श्रीज्ञानेश्वर महाराजांचा हा ग्रंथ sanskritdocuments.org वरून उद्धृत केला गेला आहे ह्याची नोंद येथे असणे आवश्यक आहे ]


ॐ नमोजी आद्या | वेद प्रतिपाद्या | जय जय स्वसंवेद्या | आत्मरुपा ||१||

देवा तूंचि गणेशु | सकलमति प्रकाशु | म्हणे निवृत्ति दासु | अवधारिजो जी ||२||

हें शब्दब्रह्म अशेष | तेचि मूर्ति सुवेष | तेथ वर्णवपु निर्दोष | मिरवत असे ||३||

स्मृति तेचि अवयव | देखा अंगिकभाव | तेथ लावण्याची ठेव | अर्थशोभा ||४||

अष्टादश पुराणे | तीचि मणिभूषणे | पदपद्धती खेवणे | प्रमेयरत्नांची ||५||

पदबंध नागर | तेचि रंगाथिले अंबर | जेथ साहित्यवाणे | सपूर उजाळाचे ||६||

देखा काव्यनाटका | जे निर्धारिता सकौतुका | त्याचि रुणझुणती क्षुद्रघंटिका | अर्थध्वनी || ७||

नाना प्रमेयांचि परी | निपुणपणे पाहता कुसरी | दिसती उचित पदे माझारी | रत्नें भली || ८||

तेथ व्यासादिकांच्या मति | तेचि मेखळा मिरवती | चोखाळपणे झळकती | पल्लवसडका || ९||

देखा षड्दर्शने म्हणिपती | तेचि भुजांची आकृती || म्हणऊनि विसंवादे धरिती | आयुधे हाती || १०||


तरी तर्क तोचि परशु | नीतिभेदु अंकुशु | वेदांतु तो महारसु | मोदकाचा || ११ ||

एके हाति दंतु | जो स्वभावता खंडितु | तो बौद्धमत संकेतु | वार्तिकांचा || १२ ||

मग सहजे सत्कारवादु | तो पद्मकरु वरदु | धर्मप्रतिष्ठा तो सिद्धु | अभयहस्तु || १३ ||

देखा विवेकमंतु सुविमळु | तोचि शुंडादंडु सरळु | जेथ परमानंदु केवळु | महासुखाचा || १४ ||

तरी संवादु तोचि दशनु | जो समताशुभ्रवर्णु | देवो उन्मेषसुक्ष्मेक्षणु | विघ्नराजु || १५ ||

मज अवगमलिया दोनी | मीमांसा श्रवणस्थानी | बोधमदामृत मुनी | अलि सेविती || १६ ||

प्रमेयप्रवाल सुप्रभ | द्वैताद्वैत तेचि निकुंभ | सरिसे एकवटत | इभ मस्तकावरी || १७ ||

उपरि दशोपनिषदे | जिये उदारे ज्ञानमकरंदे | तिये कुसुमे मुगुटी सुगंधे | शोभती भली || १८ ||

अकार चरणयुगुल | उकार उदर विशाल | मकार महामंडल | मस्तकाकारे || १९ ||

हे तिन्ही एकवटले | तेथ शब्दब्रह्म कवळले | ते मियां गुरूकृपा नमिले | आदिबीज || २० ||


आतां अभिनव वाग्विलासिनी | जे चातुर्यार्थकला कामिनी | ते शारदा विश्वमोहिनी | नमिली मियां || २१ ||

मज हृदयी सद्गुरू | तेणे तारिलो हा संसारपूरु | म्हणऊनि विशेष अत्यादरू | विवेकावरी || २२ ||

जैसे डोळ्यां अंजन भेटे | मग दृष्टीसी फांटा फुटे | मग वास पाहे तेथ प्रकटे | महानिधी || २३ ||

का चिंतामणी जालया हाती | सदा विजयवृत्ति मनोरथी | तैसा मी पूर्णकाम निवृत्ती | ज्ञानदेवो म्हणे || २४ ||

म्हणोन जाणतेनो गुरू कीजे | तेणे कृतकार्य होईजे | जैसे मूळसिंचने सहजे | शाखापल्लव संतोषती || २५ ||

का तीर्थे जिये भुवनी | तिये घडती समुद्रावगहनी | ना तरी अमृतरसास्वादनीं | रस सकळ || २६ ||

तैसा पुढतपुढती तोची | मियां अभिवंदिला श्रीगुरूचि | जे अभिलषित मनोरुची | पुरविता तो || २७ ||

आता अवधारा कथा गहन | जे सकळां कौतुका जन्मस्थान | की अभिनव उद्यान | विवेकतरूचे || २८ ||

ना तरी सर्व सुखांची आदि | जे प्रमेयमहानिधी | नाना नवरससुधाब्धि | परिपूर्ण हे || २९ ||

की परमधाम प्रकट | सर्व विद्यांचे मूळपीठ | शास्त्रजाता वसिष्ठ | अशेषांचे || ३० ||


ना तरी सकळ धर्मांचे माहेर । सज्जनांचे जिव्हार । लावण्यरत्नभांडार । शारदियेचे ॥ ३१॥

नाना कथारूपे भारती । प्रकटली असे त्रिजगती । आविष्करोनी महामती । व्यासाचिये ॥ ३२॥

म्हणोनी हा काव्यां रावो । ग्रंथ गुरुवतीचा ठावो । एथुनि रसां आला आवो । रसाळपणाचा ॥ ३३॥

तेवींचि आइका आणिक एक । एथुनि शब्दश्री सच्छास्त्रिक । आणि महाबोधि कोवळीक । दुणावली ॥ ३४॥

एथ चातुर्य शहाणे झाले । प्रमेय रुचीस आले । आणि सौभाग्य पोखले । सुखाचे एथ ॥ ३५॥

माधुर्यी मधुरता । शृंगारी सुरेखता । रूढपण उचितां । दिसे भले ॥ ३६॥

एथ कळाविदपण कळा । पुण्यासी प्रतापु आगळा । म्हणऊनि जनमेजयाचे अवलीळा । दोष हरले ॥ ३७॥

आणि पाहता नावेक । रंगी सुरंगतेची आगळीक । गुणां सगुणतेचे बिक । बहुवस एथ ॥ ३८॥

भानुचेनि तेजें धवळले । जैसे त्रैलोक्य दिसे उजळले । तैसे व्यासमती कवळले । अवघे विश्व ॥ ३९॥

कां सुक्षेत्रीं बीज घातले । ते आपुलेयापरी विस्तारले । तैसे भारतीं सुरवाडले । अर्थजात ॥ ४०॥

ना तरी नगरांतरी वसिजे । तरी नागराचि होइजे । तैसे व्यासोक्तितेजे । धवळित सकळ ॥ ४१॥

कीं प्रथमवयसाकाळीं । लावण्याची नव्हाळी । प्रकटे जैसी आगळी । अंगनाअंगी ॥ ४२॥

ना तरी उद्यानी माधवी घडे । तेथ वनशोभेचि खाणी उघडे । आदिलापासोनि अपाडे । जियापरी ॥ ४३॥

नाना घनीभूत सुवर्ण । जैसे न्याहाळितां साधारण । मग अलंकाती बरवेपण । निवाडु दावी ॥ ४४॥

तैसे व्यासोक्ती अळंकारिले । आवडे ते बरवेपण पातले । ते जाणोनि काय आश्रयिले । इतिहासी ॥ ४५॥

नाना पुरतिये प्रतिष्ठेलागीं । सानीव धरुनी आंगी । पुराणे आख्यानरूपे जगीं । भारता आली ॥ ४६॥

म्हणऊनि महाभारतीं जे नाही । ते नोहेचि लोकी तिहीं । येणे कारणे म्हणिपे पाहीं । व्यासोच्छिष्ट जगत्रय ॥ ४७॥

ऐसी सुरस जगीं कथा । जे जन्मभूमि परमार्था । मुनि सांगे नृपनाथा । जनमेजया ॥ ४८॥

जे अद्वितीय उत्तम । पवित्रैक निरुपम । परम मंगलधाम । अवधारिजो ॥ ४९॥

आता भारतीं कमळपरागु । गीताख्यु प्रसंगु । जो संवादिला श्रीरंगु । अर्जुनेसी ॥ ५०॥


ना तरी शब्दब्रह्माब्धि। मथिलेया व्यासबुद्धि । निवडिले निरवधि । नवनीत हे ।। ५१॥

मग ज्ञानाग्निसंपर्के । कडसिलें विवेके । पद आले परिपाकें । आमोदासी ॥ ५२॥

जे अपेक्षिजे विरक्ति । सदा अनुभविजे संतीं । सोहंभावे पारंगती । रमिजे जेथ ॥ ५३॥

जे आकर्णिजे भक्ती । जें आदिवंद्य त्रिजगतीं । ते भीष्मपर्वीं संगती । सांगीजैल ॥ ५४॥

जें भगवद्गीता म्हणीजे । जें ब्रह्मेशांनीं प्रशंसिजे। जे सनकादिकीं सेविजे । आदरेसीं ॥ ५५॥

जैसे शारदियेचे चंद्रकळे- । माजीं अमृतकण कोंवळे । तें वेंचती मवाळें । चकोरतलगें ॥ ५६॥

तियापरी श्रोतां । अनुभवावी हे कथा । अति हळुवारपणे चित्ता । आणूनियां ॥ ५७॥

हे शब्देविण संवादिजे । इंद्रियां नेणता भोगिजे । बोलाआधि झोंबिजे । प्रमेयासी ॥ ५८॥

जैसे भ्रमर परागु नेती । परी कमळदळे नेणती । तैसी परी आहे सेविती । ग्रंथी इये ॥ ५९॥

का आपुला ठावो न सांडिता । आलिंगिजे चंद्रु प्रकटता । हा अनुरागु भोगितां । कुमुदिनी जाणे ॥ ६०॥

ऐसेनि गंभीरपणे । स्थिरावलेनि अंत:करणे । आथिला तोचि जाणे । मानूं इये ॥ ६१॥

अहो अर्जुनाचिये पांती । जे परिसणया योग्य होती । तिहीं कृपा करून संतीं । अवधान द्यावे ॥ ६२॥

हे सलगीं म्यां म्हणितले । चरणां लागोनि विनविलें । प्रभू सखोल हृदय आपुलें । म्हणऊनियां ॥ ६३॥

जैसा स्वभावो मायबापांचा । अपत्य बोले जरी बोबडी वाचा । तरी अधिकचि तयाचा । संतोष आथी ॥ ६४॥

तैसा तुम्हीं मी अंगीकारिलां । सज्जनीं आपुला म्हणितला । तरी सहज उणें उपसाहला । प्रार्थूं कायी ॥ ६५॥

परी अपराधु तो आणिक आहे । जें मी गीतार्थ कवळुं पाहें । ते अवधारा विनवूं लाहें । म्हणऊनियां ॥ ६६॥

हे अनावर न विचारितां । वायांचि धिंवसा उपनला चित्ता । येर्‍हवीं भानुतेजीं काय खद्योता । शोभा आथी ॥ ६७॥

का टिटिभू चांचूवरी । माप सूये सागरी । मी नेणतु त्यापरी । प्रवर्तें येथ ॥ ६८॥

आइका आकाश गिंवसावे । तरी त्याहूनि थोर होआवें । म्हणऊनि अपाडु हें आघवें । निर्धारिता ॥ ६९॥

या गीतार्थाची थोरी । स्वयें शंभू विवरी । जेथ भवानी प्रश्नु करी । चमत्कारोनी ॥ ७०॥


तेथ हरू म्हणे नेणिजे । देवी जैसें का स्वरूप तुझें । तैसें नित्यनूतन देखिजे । गीतातत्व ॥ ७१॥

हा वेदार्थसागरू । जया निद्रिताचा घोरू । तो स्वयें सर्वेश्वरू । प्रत्यक्ष अनुवादला ॥ ७२॥

ऐसें जें अगाध । जेथ वेडावती वेद । तेथ अल्प मी मतिमंद । काय होय ॥ ७३॥

हें अपार कैसेनि कवळावे । महातेज कवणें धवळावे । गगन मुठीं सुवावे । मशके केवीं ॥ ७४॥

परी एथ असे एक आधारु । तेणेचि बोलें मी सधरु । जे सानुकूळ श्रीगुरु । ज्ञानदेवो म्हणे ॥ ७५॥

येर्‍हवीं तरी मी मुर्खू । जरी जाहला अविवेकु । तरी संतकृपादीपु । सोज्वळु असे ॥ ७६॥

लोहाचे कनक होये । हे सामर्थ्य परिसींच आहे । की मृतही जीवित लाहे । अमृतसिद्धी ॥ ७७ ॥

जरी प्रकटे सिद्धसरस्वती । तरी मुकया आथी भारती । एथ वस्तुसामर्थ्यशक्ति । नवल कायी ॥ ७८॥

जयातें कामधेनू माये । तयासी अप्राप्य काही आहे । म्हणऊनि मी प्रवर्तों लाहे । ग्रंथी इये ॥ ७९॥

तरी न्यून ते पुरतें । अधिक ते सरते । करून घ्यावे हें तुमते । विनवीतु असे ॥ ८०॥

आता देईजो अवधान । तुम्हीं बोलविल्या मी बोलेन । जैसे चेष्टे सूत्राधीन । दारुयंत्र ॥ ८१॥

तैसा मी अनुग्रहीतु । साधूंचा निरोपितु । ते आपुला अलंकारितु । भलतयापरी ॥ ८२॥

तंव श्रीगुरू म्हणती राहीं । हे तुज बोलावे न लगे कांही । आता ग्रंथा चित्त देईं । झडकरी वेगा ॥ ८३॥

या बोला निवृत्तिदासु । पावूनि परम उल्हासु । म्हणे परियेसा मना अवकाशु । देऊनियां ॥ ८४॥

       "धृतराष्ट्र उवाच |
      धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः |
      मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय || १||"

तरी पुत्रस्नेहे मोहितु । धृतराष्ट्र असे पुसतु ॥ म्हणे संजया सांगे मातु । कुरुक्षेत्रींची ॥ ८५॥

जें धर्मालय म्हणिजे । तेथ पांडव आणि माझे । गेले असती व्याजें । झुंजाचेनि ॥ ८६॥

तरी तिहीं येतुला अवसरीं । काय किजत असे येरयेरीं । तें झडकरी कथन करी । मजप्रती ॥ ८७॥

      "संजय उवाच |
     दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा |
     आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत् || २||"

तिये वेळी तो संजय बोले । म्हणे पांडवसैन्य उचलले । जैसें महाप्रळयीं पसरले । कृतांतमुख ॥ ८८॥

तैसे तें घनदाट । उठावले एकवाट । जैसें उसळले कालकूट । धरीं कणव ॥ ८९॥

ना तरी वडवानलु सादुकला । प्रलयवाते पोखला । सागर शोषूनि उधवला । अंबरासी ॥ ९०॥

तैसे दळ दुर्धर । नाना व्यूहीं परिकर । अवगमले भयासुर । तिये काळीं ॥ ९१॥

तें देखिलेयां दुर्योधनें । अव्हेरिले कवणे माने । जैसें न गणिजे पंचाननें । गजवटांते ॥ ९२ ॥

    "पश्यैतां पाण्डुपुत्राणामाचार्य महतीं चमूम् |
   व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता || ३||"

मग द्रोणापासी आला । तयाते म्हणे हा देखिला । कैसा दळभारु उचलला । पांडवांचा ॥ ९३॥

गिरिदुर्ग जैसे चालते । तैसे विविध व्यूह संभवते । हे रचिले आथि बुद्धिमंते । द्रुपद्कुमरें ॥ ९४॥

जो का तुम्हीं शिक्षापिला । विद्या देऊनी कुरुठा केला । तेणे हा पाखरिला । देखदेख ॥ ९५॥

       "अत्र शूरा महेष्वासा भीमार्जुनसमा युधि ।
       युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथ: ॥ ४॥"

आणिकही असाधारण । जे शस्त्रास्त्रीं प्रवीण । जे क्षात्रधर्मीं निपुण । वीर आहाती ॥ ९६॥

जे बळें प्रौढी पौरुषें । भीमार्जुनांसारिखे । ते सांगेन कौतुकें । प्रसंगेचि ॥ ९७॥

एथ युयुधानु सुभटु । आला असे विराटु । महारथी श्रेष्ठु । द्रुपद वीरु ॥ ९८ ॥

       धृष्टकेतुश्चेकितान: काशिराजेश्च वीर्यवान ।
       पुरुजित् कुंतिभोजश्च शैब्यश्च नरपुंगव: ॥ ५॥
      युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान् ।
      सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथ: ॥ ६॥

चेकितान धृष्टकेतु । काशिश्वरु विक्रांतु । उत्तमौज नृपनाथु । शैब्य देख ॥ ९९ ॥

हा कुंतिभोजु पाहे । एथ युधामन्यु आला आहे । आणि पुरुजितादि राय हे । सकळ देखे ॥ १००॥

हा सुभद्रहृदयनंदनु । जो अपरु नवा अर्जुनु । तो अभिमन्यु म्हणे दुर्योधनु । देखे द्रोणा ॥ १०१॥

आणिकही द्रौपदीकुमर । के सकळही महारथी वीर । मिती नेणिजे अपार । मीनले आथि ॥ १०२ ॥

       अस्माकं तु विशिष्टा ये तान् निबोध द्विजोत्तम ।
       नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते ॥ ७॥
       भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समिंतिंजय: ।
       अश्वत्थामा विकर्णश्च सोमदत्तिस्थैव च ॥ ८॥

आतां आमुचां दळीं नायक । जे रूढ वीर सैनिक । ते प्रसंगे आइक । सांगिजती ॥ १०३॥

उद्देशें एक दोनी । जायिजती बोलोनी । तुम्हीआदिकरूनि । मुख्य जे जे ॥ १०४॥

हा भीष्मु गंगानंदनु । जो प्रतापतेजस्वी भानू । रिपुगजपंचाननु । कर्ण वीरु ॥ १०५ ॥

या एकेकाचेनि मनोव्यापारें । हे विश्व होय संहरे । हा कृपाचार्य न पुरे । एकलाचि ॥ १०६॥

एथ विकर्ण वीरु आहे । हा अश्वत्थामा पैल पाहें । याचा अडदरु सदा वाहे । कृतांतु मनीं ॥ १०७॥

समितिंजयो सोमदत्ति । ऐसे आणिकही बहुत आहाती ॥ जयाचिया बळा मिती । धाताही नेणे ॥ १०८॥

      अन्ये च बहव: शूरा मदर्थे त्यक्तजीविता: ।
      नानाशस्त्रप्रहरण: सर्वे युद्धविशरद: ॥ ९॥

जे शस्त्रविद्यापारंगत । मंत्रावतार मूर्त । हो कां जे अस्त्रजात । एथूनि रूढ ।। १०९॥

हे अप्रतिमल्ल जगीं । पुरता प्रतापु अंगी । परी सर्व प्राणें मजचिलागी । आराइले असती ॥ ११०॥


पतिव्रतेचे हृदय जैसे । पतीवांचूनि न स्पर्शे । मी सर्वस्व या तैसे । सुभटांसी ॥ १११॥

आमुचिया काजाचेनि पाडें । देखती आपुलें जीवित थोकडें । ऐसे निरवधि चोखडे । स्वामिभक्त ॥ ११२॥

झुंजती कुळकणी जाणती । कळे कीर्तीसी जिती । हे बहु असो क्षात्रनीती । एथोनियां ॥ ११३॥

ऐसें सर्वापरी पुरते । वीर दळी आमुतें । आतां काय गणूं यांतें । अपार हे ॥ ११४॥

        अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम् ।
        पर्याप्तं त्विदमेषां बलं भीमाभिरक्षितम् ॥ १०॥

वरी क्षत्रीयांमाजि श्रेष्ठु । जो जगजेठी गा सुभटु । तया दळवैपणाचा पाटु । भीष्मासी पैं ॥ ११५॥

आतां याचेनि बळें गवसलें । हें दुर्ग जैसे पन्नासीलें । येणे पाडे थेंकुले । लोकत्रय ॥ ११६॥

आधींच समुद्र पाहीं । तेथ दुवाडपणा कवणा नाहीं ॥ मग वडवानळु तैसेयाही । विरजा जैसा ॥ ११७॥

ना तरी प्रलयवह्नि महावातु । या दोघां जैसा सांघातु । तैसा हा गंगासुतु । सेनापति ॥ ११८॥

आतां येणेंसि कवण भिडे । हे पांडव सैन्य कीर थोडें । ओइचलेनि पाडे । दिसत असे ॥ ११९॥

वरी भीमसेन बेथु । तो जाहला असे सेनानाथु । ऐसें बोलोनि हे मातु । सांडिली असे ॥ १२०॥

        अयनेषु च सर्वेषु यथाभागमवस्थिताः ।
        भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि ॥ ११॥

मग पुनरपि काय बोले । सकळ सैनिकांते म्हणितलें । आता दळभार आपुलाले । सरसे करा ॥ १२१॥

जिया जिया अक्षौहिणी । तिये तिये आरणी । वरगण कवणकवणी । महारथिया ॥ १२२॥

तेणे तिया आवरिजे । भीष्मातळीं राहिजे । द्रोणाते म्हणिजे । तुम्हीं सकळ ॥ १२३॥

हाचि एकु रक्षावा । मी तैसा हा देखावा । येणें दळभारु आघवा । साचु आमुचा॥ १२४॥

      तस्य स‍नयन् हर्षं कुरुवृद्धः पितामहः ।
      सिंहनादं विनद्योच्चैः शंखं दध्मौ प्रतापवान् ॥ १२॥

या राजाचिया बोला । सेनापति संतोषला। मग तेणे केला । सिंहनादु ॥ १२५॥

तो गाजत असे अद्भुतु । दोन्ही सैन्यांआंतु । प्रतिध्वनि न समातु । उपजत असे ॥ १२६॥

तयाचि तुलगासवे । वीरवृत्तिचेनि थावें । दिव्य शंख भीष्मदेवें । आस्फुरिला ॥ १२७॥

ते दोन्ही नाद मिनले । तेथ त्रैलोक्य बधिरभूत जाहलें । जैसें आकाश कां पडिलें । तुटोनियां ॥ १२८॥

घडघडीत अंबर । उचंबळत सागर । क्षोभलें चराचर । कांपत असे ॥ १२९॥

तेणें महाघोषगजरें । दुमदुमताती गिरिकंदरें । तंव दलामाजि रणतुरें । आस्फारिलीं ॥१३०॥

       ततः शंखाश्च भैर्यश्च पणवानकगोमुखः ।
       सहसैवाभ्यहन्यन्त स शब्दस्तुमुलोऽभवत् ॥१३॥

उदंड सैंघ वाजतें । भयानकें खाखाते । महाप्रळयो जेथें । धाकडांसी ॥ १३१ ॥

भेरी निशाण मांदळ । शंख काहळा भोंगळ । आणि भयासुर रणकोल्हाळ । सुभटांचे ॥ १३२॥

आवेशें भुजा त्राहाटिती । विसणैले हांका देती । जेथ महामद भद्रजाती । आवरती ना ॥ १३३॥

तेथ भेडांची कवण मातु । कांचया केर फिटतु । जेणें दचकला कृतांतु । आंग नेघे ॥ १३४॥

एकां उभयतांचे प्राण गेले । चांगांचे दांत बैसले । बिरुदांचे दादुले । हिंवताती ॥ १३५॥

ऐसा अद्भुत तूरबंबाळु । ऐकोनि ब्रह्मा व्याकुळु । देव म्हणती प्रळयकाळु । ओढवला आजि ॥ १३६॥

ऐसी स्वर्गीं मातु । देखोनि तो आकांतु । तंव पांडवदळा आंतु । वर्तलें कायी ॥ १३७॥

हो कां निजसार विजयाचे । कीं ते भांडार महातेजाचे । जेथ गरुडाचिचे जावळिये । कांतले चार्‍ही ॥ १३८॥

       ततः श्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ ।
       माधवः पांडवश्चैव दिव्यौ शंखौ प्रदध्मतुः ॥ १४॥

की पाखांचा मेरु जैसा । रहंवरु मिरवितसे तैसा । तेजें कोंदटलिया दिशा जयाचेनि ॥१३९॥

जेथ अश्ववाहकु आपण । वैकुंठीचा राणा जाण । तया रथाचे गुण । काय वर्णूं ॥ १४०॥

ध्वजस्तंभावरी वानरु । तो मूर्तिमंत शंकरु । सारथी शारङधरु । अर्जुनेसीं ॥ १४१॥

देखा नवल तया प्रभूचें । प्रेम अद्भुत भक्तांचे । जे सारथ्य पार्थाचें । करीतु असे ॥ १४२॥

पाईकु पाठीसीं घातला । आपण पुढां राहिला । तेणें पांचजन्यु आस्फुरिला । अवलीळाचि ।। १४३॥

       पांचजन्यं हृषीकेशो देवदत्तं धनंजयः ।
       पौंड्रं दध्मौ महाशंखं भीमकर्मा वृकोदरः ॥ १५॥

परी तो महाघोषु थोरु । गाजत असे गंहिरु । जैसा उदैला लोपि दिनकरु । नक्षत्रांते ॥ १४४॥

तैसें तुरबंबाळु भंवते । कौरवदळी गाजत होते । ते हारपोनि नेणों केऊते । गेले तेथ ॥ १४५॥

तैसाचि देखे येरें । निनादें अति गंहिरे । देवदत्त धनुर्धरे । आस्फुरिला ॥ १४६॥

ते दोनी शब्द अचाट । मिनले एकवट । तेथ ब्रह्मकटाह शतकूट । हों पाहत असे ॥ १४७॥

तंव भीमसेनु विसणैला । जैसा महाकाळु खवळला । तेणें पौंड्र आस्फुरिला । महाशंखु ॥ १४८॥

        अनंतविजयं राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिरः ।
        नकुलः सहदेवश्चं सुघोष्मणिपुष्पकौ ॥ १६॥

तो महाप्रलयजलधरु । जैसा घडघडिला गंहिरु । तंव अनंतविजयो युधिष्ठिरु । आस्फुरित असे ॥ १४९॥

नकुळें सुघोषु । सहदेवे मणिपुष्पकु । जेणें नादें अतंकु । गजबजला असे ॥ १५०॥

       काश्यश्च परमेश्वासः शिखंडी च  महारथः ।
       दृष्टद्युम्नो विराटश्च सातकिश्चापराजितः ॥ १७॥
       द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वेशः पृथिवीपते ।
       सौभद्रश्च महाबाहुः शंखान् दध्मुः पृथक् पृथक् ॥ १८॥

तेथ भूपती होते अनेक । द्रुपद द्रौपदेयादिक । हा काशीपती देख । महाबाहु ॥ १५१॥

तेथ अर्जुनाचा सुतु । सात्यकि अपराजितु । दृष्टद्युम्नु नृपनाथु । शिखंडी हन ॥ १५२॥

विराटादि नृपवर । जे सैनिक मुख्य वीर । तिहीं नाना शंख निरंतर । आस्फुरिले ॥ १५३॥

तेणें महाघोषनिर्घातें । शेषकूर्म अवचिते । गजबजोनि भूभारातें । सांडूं पाहती ॥ १५४॥

तेथ तिन्हीं लोक डंडळित । मेरु मांदार आंदोळित । समुद्रजळ उसळत । कैलासवेरी ॥ १५५॥

        स घोषो धार्त्रराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् ।
        नभश्च पृथिवींश्चैव तुमुलो व्यनुनादयन् ॥ १९॥

पृथ्वीतळ उलथों पाहत । आकाश असे आसुडत । तेथ सडा होत । नक्षत्रांचा ।। १५६॥

सृष्टि गेली रे गेली ॥ देवां मोकळवादी जाहली । ऐशी एक टाळी पिटिली । सत्यलोकीं । १५७ ॥

दिहाचि दिन थोकला । जैसा प्रलयकाळ मांडला । तैसा हाहाकारु उठिला । तिन्हीं लोकीं ॥ १५८॥

तंव आदिपुरुषु विस्मितु । म्हणे झणें होय पां अंतु । मग लोपला अद्भुतु । संभ्रमु तो ॥ १५९॥

म्हणोनि विश्व सांवरले । एर्‍हवीं युगांत होतें वोडवले । जै महाशंख आस्फुरिले । कृष्णादिकीं ॥ १६०॥

तो घोष तरी उपसंहरला । परी पडिसाद होता राहिला ॥ तेणें दळभार विध्वंसिला । कौरवांचा ॥ १६१॥

तो जैसा गजघटाआंतु । सिंह लीला विदारितु । तैसा हृदयातें भेदितु । कौरवांचिया ॥ १६२॥

तो गाजत जंव आइकती । तंव उभेचि हिये घालिती । एकमेकांते म्हणती । सावध रे सावध ॥ १६३॥

        अथ व्यवस्थितान् दृष्टवा धार्तराष्ट्रानं कपिध्वजः ।
        प्रवृत्ते शस्त्रसंपाते धनुरुद्यम्य पांडवः ॥ २०॥

तेथ बळें प्रौढीपुरते । जे महारथी वीर होते । तिहीं पुनरपि दळातें । आवरिलें ॥ १६४॥

मग सरिसपणें उठावले । दुणावटोनि उचलले । तया दंडी क्षोभलें । लोकत्रय ॥ १६५॥

तेथ बाणवरी धनुर्धर । वर्षताती निरंतर । जैसे प्रलयांत जलधर । अनिवार का ॥ १६६॥

तें देखलिया अर्जुनें । संतोष घेऊनि मने । मग संभ्रमे दिठी सेने । घालितसे ॥ १६७॥

तंव संग्रामीं सज्ज जाहले । सकळ कौरव देखिले । मग लीला धनुष्य उचलिले । पंडुकुमरें ॥ १६८॥

         हृषीकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते ।
         अर्जुन उवाच - सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेऽच्युत ॥ २१।

ते वेळीं अर्जुन म्हणतसे देवा । आतां झडकरी रथु पेलावा । नेऊनि मध्यें घालावा । दोहीं दळां ॥ १६९॥

        यावदेतान् निरिक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् ।
        कैर्मया सह योद्धव्यस्मिन् रणसमुद्यमे ॥ २२॥
        योत्स्यमानानवेक्षेऽहं य एतेऽत्र समागतः ।
        धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकिर्षवः ॥ २३॥

जंव मी नावेक । हे सकळ वीर सैनिक । न्याहळीन अशेख । झुंजते जे ॥ १७०॥

एथ आले असती आघवे । परी कवणेंसी म्यां झुंजावे । हे रणीं लागे पहावें । म्हणऊनियां ॥ १७१॥

बहुतकरुनि कौरव । हे आतुर दुःस्वभाव । वाटिवांवीण हांव । बांधिती झुंजीं ॥ १७२॥

झुंजाची आवडी धरती । परी संग्रामी वीर नव्हती । हे सांगेन रायाप्रती । काय संजयो म्हणे । १७३॥

               संजय उवाच: एवमुक्तो हृषीकेशो गुडाकेशेन भारत ।
               सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम् ॥ २४॥

आइका अर्जुन इतुकें बोलिला । तंव कृष्णें रथु पेलिला । दोहीं सैन्यामाजि केला । उभा तेणें ॥ १७४॥


       भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम् ।
       उवाच पार्थ पश्यैतान् समवेतान् कुरुनिति ॥ २५॥
       तत्रापश्यत् स्थितान् पार्थः पितृनथ पितामहान् ।
       आचार्यान् मातुलान् भ्रातृन् पुत्रान् पौत्रान् सखींस्थता ॥ २६॥
       श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि ।
       तान् समीक्ष स कौंतेयः सर्वान् बन्धूनवस्थितान् ॥ २७॥

जेथ भीष्माद्रोणादिक । जवळिकेचि सन्मुख । पृथिविपति आणिक । बहुत आहाति ॥ १७५॥

तेथ स्थिर करूनि रथु । अर्जुन असे पाहतु । तो दळभार समस्तु । संभ्रमेसी ॥ १७६॥

मग देवा म्हणे देख देख । हे गोत्रगुरु अशेख । तंव कृष्णा मनीं नावेक । विस्मो जाहला ॥ १७७॥

तो आपणयां आपण म्हणे । एथ कायि कवण जाणे । हें मनीं धरिले येणें । परि कांही आश्चर्य असे ॥ १७८॥

ऐसी पुढील से घेतु । तो सहजें जाणे हृदयस्थु । परि उगा असे निवांतु । तिये वेळीं ॥ १७९॥

तंव तेथ पार्थु सकळ । पितृपितामह केवळ । गुरू बंधु मातुळ । देखता जाहला ॥ १८०॥

इष्टमित्र आपुले । कुमरजन देखिले । हे सकळ असती आले । तयांमाजि ॥ १८१॥

सुहृज्जन सासरे । आणिकही सखे सोईरे । कुमर पौत्र धनुर्धरें । देखिले तेथ ॥ १८२॥

जयां उपकार होते केले । कां आपदीं जे राखिले । हे असो वडील धाकुले - । आदिकरुनि ॥ १८३॥

ऐसे गोत्रचि दोहीं दळीं । उदित जालें असे कळीं । हें अर्जुने तिये वेळीं । अवलोकिलें ॥ १८४॥

       कृपया परयाऽऽविष्टो विषीदन्नमब्रवीत ।

तेथ मनीं गजबज जाहली । आणि आपैसी कृपा आली । तेणें अपमानें निघाली । वीरवृत्ति ॥ १८५ ॥

जिया उत्तम कुळींचिया होती । आणि गुणलावण्य आथी । तिया आणिकींते न साहति । सुतेजपणें ॥ १८६॥

नविये आवडीचेनि भरें । कामुक निजवनिता विसरे । मग पाडेंविण अनुसरें । भ्रमला जैसा ॥ १८७॥

कीं तपोबळें ऋद्धी । पातलिया भ्रंशे बुद्धी । मग तया विरक्ततासिद्धी । आठवेना॥ १८८॥

तैसें अर्जुना तेथ जाहले । असतें पुरुषत्व गेले । जें अंतःकरण दिधले । कारुण्यासी ॥ १८९॥

देखा मंत्रज्ञु बरळु जाये । मग तेथ कां जैसा संचारु होये । तैसा तो धनुर्धर महामोहें । आकळिला ॥ १९०॥

म्हणऊनि असता धीरु गेला । हृदया द्रावो आला । जैसा चंद्रकळीं सिंपिला । सोमकांतु ॥ १९१॥

तयापरी पार्थु । अतिस्नेहें मोहितु । मग सखेद असे बोलतु । अच्युतेसी ॥ १९२॥

       दृष्ट्वेनं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थिताम् ।।२८॥
       सीदन्ती मम गात्राणि मुखं च परिशुष्यति ।
       वेपथुश्च शरीरे मे रोमाहर्षश्च जायते ॥ २९॥
       गांडीवम् स्त्रंसते हस्तात् त्वक् चैव परिदह्यते ।
       न च शक्नोम्यवस्थातुं  भ्रमतीव च मे मनः ॥ ३०॥

तो म्हणे अवधारी देवा । म्यां पाहिला हा मेळावा । तंव गोत्रवर्गु आघवा । देखिला एथ ॥ १९३॥

हे संग्रामीं अति उद्यत । जाहाले असती कीर समस्त । पण आपणपेयां उचित । केवीं होय ॥ १९४॥

येणें नांवेंचिं नेणों कायी । मज आपणपें सर्वथा नाहीं । मन बुद्धी ठायीं । स्थिर नोहे ॥ १९५ ॥

देखें देह कांपत । तोंड असे कोरडें होत । विकळता उपजत । गात्रांसी ॥ १९६ ॥

सर्वांगा कांटाळा आला । अति संतापु उपनला । तेथ बेंबळे हातु गेला । गांडीवाचा ॥ १९७ ॥

तें न धरताचि निष्टलें । परि नेणेंचि हातोनि पडिले । ऐसे हृदय असे व्यापिलें । मोहें येणें ॥ १९८ ॥

जें वज्रापासोनि कठिण । दुर्धर अतिदारुण । तयाहून असाधारण । हें स्नेह नवल ॥ १९९ ॥

जेणे संग्रामी हरू जिंतिला । निवातकवचांचा ठावो फेडिला । तो अर्जुन मोहें कवळिला । क्षणामाजि ॥ २०० ॥

जैसा भ्रमर भेदी कोडें । भलतैसें काष्ठ कोरडें । परि कळिकेमाजीं सापडें । कोवळियें ॥ २०१ ॥

तेथ उत्तीर्ण होईल प्राणें । परीं ते कमळदळु चिरूं नेणे । तैसे कठीण कोवळेंपणे । स्नेह देखा ॥ २०२ ॥

हे आदिपुरुषाची माया । ब्रह्मेयाहि नयेचि आया । म्हणऊनी भुलविला ऐकें राया । संजयो म्हणे ॥ २०३ ॥

अवधारीं मग तो अर्जुनु ।देखोनि सकळ स्वजनु । विसरला अभिमानु । संग्रामींचा ॥ २०४ ॥

कैसी नेणों सदयता । उपनली येथे चित्ता । मग म्हणे कृष्णा आता । नसिजे एथ ॥ २०५ ॥

माझें अतिशय मन व्याकुळ । होतसे वाचा बरळ । जे वधावे हे सकळ । येणें नांवे ॥ २०६ ॥

        निमितानि च पश्यामि विपरीतानि केशव ।
        न च श्रेयोऽनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे ॥ ३१ ॥

या कौरवां जरी वधावें । तरी युधिष्ठिरादिक कां न वधावे । हे येर येर आघवे । गोत्रज आमुचे ॥ २०७ ॥

म्हणोनि जळो हें झुंज । प्रत्यया न ये मज । एणें काय काज । महापापें ॥ २०८ ॥

देवा बहुतं परीं पाहता । एथ वोखटें होईल झुंजतां । वर काहीं चुकवितां । लाभु आथी ॥ २०९ ॥

        न काङक्षे विजयं कृष्ण न च राज्य सुखानि च ।
        किं नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा ॥ ३२ ॥
        येषामर्थे काङक्षितं नो राज्यं भोगाः सुखानि च ।
        ते इमेऽवस्थिता युद्धे प्राणांस्त्यक्त्वा धनानि च ॥ ३३ ॥

तया विजयवृत्ती कांही । मज सर्वथा काज नाहीं । एथ राज्य तरी कायी । हें पाहुनियां ॥ २१० ॥

यां सकळांते वधावे । मग जे भोग भोगावे । ते जळोत आघवे । पार्थु म्हणे ॥ २११ ॥

तेणें सुखेविण होईल । तै भलतेही साहिजेल । वरि जीवितही वेंचिजेल । याचिलागीं ॥ २१२ ॥

परीं यासी घातु कीजे । मग आपण राज्य भोगिजे । हे स्वप्नींही मन माझे । करूं न शके ॥ २१३ ॥

तरी आम्ही का जन्मावें । कवणालागीं जियावें । जें वडिलां यां चिंतावें । विरुद्ध मनें ॥ २१४ ॥

पुत्रातें इप्सी कुळ । तयाचें कायि हेंचि फळ । जे निर्दाळिजे केवळ । गोत्र आपुले ॥ २१५ ॥

हें मनींचि केवि धरिजे । आपण वज्राचेयां बोलिजे । वरी घडे तरी कीजे । भले एयां ॥ २१६ ॥

आम्हीं जें जें जोडावें । तें समस्तीं इहीं भोगावें । हे जीवितही उपकारावें । काजीं यांचां ॥ २१७ ॥

आम्ही दिगंतीचे भूपाळ । विभांडूनि सकळ । मग संतोषविजे कुळ । आपुलें जें ॥ २१८ ॥

तेचि हे समस्त । परी कैसें कर्म विपरीत । जे जाहले असती उद्यत । झुंजावया ॥ २१९ ॥

अंतौरिया कुमरें । सांडोनियां भांडारें । शस्त्राग्रीं जिव्हारें । आरोपुनी ॥ २२० ॥

ऐसियांते कैसेनि मारुं । कवणावरी शस्त्र धरूं । निज हृदया करूं । घातु केवीं ॥ २२१ ॥

         आचार्याः पितरः पुत्रास्तथैव च पितामहः ।
         मातुलः श्वशुराः पौत्राः श्यालाः संबंधिनस्तथा ॥ ३४॥

हे नेणसी तूं कवण । परी पैल भीष्म द्रोण । जयांचे उपकार असाधारण । आम्हां बहुत ॥ २२२ ॥

एथ शालक सासरे मातुळ । आणी बंधु कीं हें सकळ । पुत्र नातू केवळ । इष्टही असती ॥ २२३ ॥

अवधारीं अति जवळिकेचे । हे सकळही सोयरे आमुचे । म्हणोनि दोष आथि वाचे । बोलतांचि ॥ २२४ ॥

        एतान्न हन्तुमिछामि घ्नतोऽपि मघुसूदन ।
        अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किं न महीकृते ॥ ३५ ॥

हे वरी भलतें करितु । आंताचि एथें मारितु । परि आपण मनें घातु । न चिंतावा ॥ २२५ ॥

त्रैलोक्यींचे अनकळित । जरी राज्य होईल एथ । तरी हें अनुचित । नाचरें मी ॥ २२६ ॥

जरी आज एथ ऐसें कीजे । तरी कवणांचा मनीं उरिजे । सांग मुख केवीं पाहिजे । तुझे कृष्णा ॥ २२७ ॥

         निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्याज्जनार्दन ।
         पापनेवाश्रयेदस्मान्हत्वैतानाततायिनः ॥ ३६ ॥

जरी वधु करूनी गोत्रजांचा । तरी वसौटा होऊन दोषांचा । मज जोडलासि तूं हातींचा । दूरी होसी ॥ २२८ ॥

कुळहरणीं पातकें । तिये आंगीं जडती अशेखें । तयें वेळी तूं कवण कें । देखावासी ॥ २२९ ॥

जैसा उद्यानामाजीं अनळु । संचरला देखोनि प्रबळु । मग क्षणभरी कोकिळु । स्थिर नोहे ॥ २३० ॥

सकर्दम सरोवरु । अवलोकूनि चकोरु । न सेवितु अव्हेरु । करूनि निघे ॥ २३१ ॥

तयापरी तूं देवा । मज झकों न येसी मावा । जरी पुण्याचा वोलावा । नाशिजेल ॥ २३२ ॥

         तस्मान्नार्हा वयं हन्तुम् धार्तराष्ट्रान्स्वबांधवान् ।
         स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव ॥ ३७ ॥

म्हणोनि मी हें न करीं । इये संग्रामीं शस्त्र न धरीं । हें किडाळ बहुतीं । परीं दिसतसे ॥ २३३ ॥

तुझा अंतराय होईल । मग सांगें आमचें काय उरेल । तेणें दुःखे हियें फुटेल । तुजवीण कृष्णा ॥ २३४ ॥

म्हणावूनि कौरव हे वधिजती । मग आम्हीं भोग भोगिजती । हे असो मात अघडती । अर्जुन म्हणे ॥ २३५ ॥

         यद्यप्यते न पश्यंति लोभोपहृतचेतसः ।
         कुलक्षयकृतंदोषं मित्रद्रोहे च पातकम् ॥ ३८ ॥
         कथं ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुम् ।
         कुलक्षयकृतम् दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन ॥ ३९ ॥

हे अभिमानपदे भुलले । जरी पां संग्रामा आले । तर्‍ही आम्हीं हित आपुलें । जाणावें लागे ॥ २३६ ॥

हें ऐसें कैसें करावें । जे आपुले आपण मारावे । जाणत जाणतांचि सेवावें । कालकूट ॥ २३७ ॥

हां जी मार्गीं चालतां । पुढां सिंह जाहला अवचितां । तो तंव चुकवितां । लाभु आथी ॥ २३८ ॥

असता प्रकाशु सांडावा । मग अंधकूप आश्रावा । तरी तेथ कवणु देवा । लाभु सांगे ॥ २३९ ॥

का समोर अग्नि देखोनी । जरी न वचिजे वोसंडोनी । तरी क्षणा एका कवळूनि । जांळू सके ॥ २४०॥

तैसे दोष हे मूर्त । अंगी वाजों असती पहात । हें जाणतांही केवीं एथ । प्रवर्तावें ॥ २४१ ॥

ऐसें पार्थ तिये अवसरीं । म्हणे देवा अवधारीं । या कल्मषाची थोरी । सांगेन तुज ॥ २४२ ॥

          कुलक्षये प्रणश्यंति कुलधर्माः सनातनः ।
          धर्मे नष्टे कुलं कृत्सनमधर्मोऽभिभवत्युत ॥ ४० ॥

जैसें काष्ठें काष्ठ मथिजे । येथ वन्हि एक उपजे । तेणें काष्ठजात जाळिजे । प्रज्वळलेनि ॥ २४३ ॥

तैसा गोत्रींची परस्परें । जरी वधु घडे मत्सरें । तरी तेणें महादोषें घोरें । कुळचि नाशे ॥ २४४॥

म्हणवूनि येणें पापें । वंशजधर्मु लोपे । मग अधर्मुचि आरोपे । कुळामाजि ॥ २४५ ॥

            अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुष्यंति कुलस्त्रियः ।
            स्त्रीसु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः ॥ ४१ ॥

एथ सारासार विचारावें । कवणे काय आचरावें । आणि विधिनिषेध अघवे । पारुषति ॥ २४६ ॥

असता दीपु दवडीजे । मग अंधकारीं राहाटिजे । जे उजूंचि का आडळिजे । जयापरी ॥ २४७ ॥

तैसा कुळीं कुळक्षयो होय । तये वेळी तो आद्य धर्मु जाय । मग आन कांहीं आहे । पापांवाचुनि ॥ २४८ ॥

जैं यमनियम ठाकती । तेथ इंद्रियें सैरा विचरती । म्हणवूनि व्यभिचार घडती । कुळस्त्रियांसी ॥ २४९ ॥

उत्तम अधमीं संचरती । ऐसे वर्णावर्ण मिसळती । तेथ समूळ उपडती । जातिधर्म ॥ २५० ॥

जैसी चोहटाचिया बळी । पाविजे सैरा काऊळीं । तैसीं महापापें कुळीं प्रवेशती ॥ २५१ ॥

          संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च ।
          पतंति पितरि ह्येषां लुप्तपिंडिदकक्रियाः ॥ ४१॥

मग कुळा देखा अशेखा । आंणि कुळघातका । येरयेरा नरक । जाणें आथी ॥ २५२ ॥

देखें वंशवृद्धि समस्त । यापरी होय पतित । मग मग वोवांडिती स्वर्गस्थ । पूर्वपुरुष ॥ २५३ ॥

जेथ नित्यादि क्रिया ठाके । आणि नैमित्तिक पारुखे । तेथ कवणा तिळोदकें । कवण अर्पी ॥ २५४ ॥

तरी पितर काय करिती । कैसेनि स्वर्गीं बसती । म्हणोनि तेही येती । कुळापासी ॥ २५५ ॥

जैसा नखाग्रीं व्याळु लागे । तो शिखांत व्यापी वेगें । तेवी आब्रह्म कुळ अवघें । आप्लविजे ॥ २५६ ॥

         दोषैरेतैः कुलघ्नानां वर्णसंकरकारकैः ।
         उत्साद्यंते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वतः ॥ ४३ ॥
         उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन ।
         नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम ॥ ४४ ॥
         अहो वत महत् पापं कर्तुं व्यवसिता वयमं ।
         यद् राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः ॥ ४५ ॥

देवा अवधारी आणिक एक । एथ घडे महापातक । जै संगदोषें हा लौकिक । भ्रंशु पावे ॥ २५७ ॥

जैसा घरीं आपुला । वानिवसे वन्ही लागला। तो आणिकांही प्रज्वळिला । जाळुनि घाली ॥ २५८ ॥

तैसिया तया कुळसंगती । जे जे लोक वर्तती । तेही बाधु पावती । निमित्तें येणें ॥ २५९ ॥

तैसें नाना दोषें सकळ । अर्जुन म्हणे तें कुळ । मग महाघोर केवळ । निरय भोगी ॥ २६० ॥

पडिलिया तिये ठायीं । मग कल्पांतीही उगंडु नाही । येसणें पतन कुळक्षयीं । अर्जुन म्हणे ॥ २६१ ॥

देवा हें विविध कानीं ऐकिजे । परि अझुनिवरी त्रासु नुपजे । हृदय वज्राचें हें काय कीजे । अवधारी पां ॥ २६२ ॥

अपेक्षिजे राज्यसुख । जयालागीं तें तंव क्षणिक । ऐसे जाणतांही दोख । अव्हेरू ना ॥ २६३ ॥

हे वडिल सकळ आपुले । वधावया दिठी सूदले । सांग पां काय थेकुलें । घडले आम्हा ॥ २६४ ॥


    यदि मामप्रतीकारमशस्त्रतं शस्त्रपाणयः ।
    धार्तराष्ट्रा रणे हन्युस्तनं मे क्षेमतरं भवेत् ॥ ४६ ॥

आतां यावरी जें जियावें । तयापासूनि हें बरवे । जे शस्त्र सांडूनि साहावे । बाण त्यांचे ॥ २६५ ॥

तयावरी होय जितुकें । तें मरणही वरी निकें । परी येणें कल्मषें । चाड नाहीं ॥ २६६ ॥

ऐसें देखोनि सकळ । अर्जुनें आपुलें कुळ । मग म्हणे राज्य तें केवळ । निरयभोगु ॥ २६७ ॥

    संजय उवाचः एवमुक्तवार्जुन: संख्ये रथोपस्य उपाविशत् ।
    विसृज्य सशरं चापं शोकसंविग्नमानसः ॥  ४७ ॥

ऐसें तिये अवसरीं । अर्जुन बोलिला समरीं । संजयो म्हणे अवधारी । धृतराष्ट्रातें ॥ २६८ ॥

मग अत्यंत उद्वेगला । न धरत गहिंवरू आला । तेथ उडी घातली खालां । रथौनियां ॥ २६९ ॥

जैसा राजकुमरु पदच्युतु । सर्वथा होय उपहृतु । कां रवि राहुग्रस्तु । प्रभाहीनु ॥ २७० ॥

ना तरी महासिद्धीसंभ्रमें । जिंतला त्रासु भ्रमे । मग आकळुनि कामें । दीनु कीजे ॥ २७१ ॥

तैसा तो धनुर्धरु । अत्यंत दुःखें जर्जरु । दिसे जेथ रहंवरु । त्यजिला तेणें ॥ २७२ ॥

मग धनुष्यबाण सांडिले । न धरत अश्रुपात आले । ऐसें ऐके राया तेथ वर्तलें । संजयो म्हणे ॥ २७३ ॥

आता यावरी तो वैकुंठ्नाथु । देखोनि सखेद पार्थु । कवणेपरी परमार्थु । निरुपील ॥ २७४ ॥

ते सविस्तर पुढारी कथा । अति सकौतुक ऐकतां । ज्ञानदेव म्हणे आतां निवृत्तिदासु ॥ २७५ ॥

प्रथम अध्याय समाप्त

वैयक्‍तिक साधने