ज्ञानेश्वरी/अध्याय सातवा

Wikibooks कडून

< ज्ञानेश्वरी(अध्याय सातवा पासून पुनर्निर्देशित)
    श्रीभगवानुवाचः-
    मय्यासक्तमनाः पार्थ योगं युञ्जन् मदाश्रयः ।
    असंशयं समग्रं मां ज्ञानस्यि तच्छृणु ॥१॥
    ज्ञानं तेऽहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषतः ।
    यज्ज्ञात्वा नेह भूयोऽन्यत्ज्ञातव्यमवशिष्यते ॥ २ ॥

आइकां मग तो अनंतु । पार्थातें असे म्हणतु । पै गा तुं योगयुक्तु । जालासि आतां ॥ १ ॥

मज समग्रातें जाणसी ऐसें । आपुलिया तळहातीचें रत्न जैंसें । तुज ज्ञान सांगेन तैसें । विज्ञानेंसीं ॥ २ ॥

एथ विज्ञानें काय करावें । ऐसें घेसी जरी मनोभावें । तरी पैं आधी जाणावें । तेचि लागे ।। ३ ॥

मग ज्ञानाचिये वेळे । झांकती जाणिवेचे डोळे । जैसी तीरीं नाव न ढळे । टेकली सांती ॥ ४ ॥

तैसे जाणीव जेथ न रिघे । विचार मागुतां पाउली निघे । तर्कु आयणी नेघे । आंगी जयाचां ॥ ५ ॥

अर्जुना तया नांव ज्ञान । येर प्रपंचु हें विज्ञान । तेथ सत्यबुद्धि तें अज्ञान । हेंही जाण ॥ ६ ॥

आतां अज्ञान अवघें हरपे । विज्ञान निःशेष करपे । आणि ज्ञान तें स्वरुपें । होऊनि जाइजे ॥ ७ ॥

ऐसें वर्म जें गूढ । तें कीजेल वाक्यारुढ । जेणें थोडेन पुरे कोड । बहुत मनींचें ॥ ८ ॥

जेंणें सांगतयाचें बोलणें खुंटे । ऐकतयाचें व्यसन तुटे । हें जाणणें सानें मोठें । उरो नेदी ॥ ९ ॥

    मनुष्याणां सहस्त्रेषु कश्चिद्यतति सिद्धये।
    यततामपि सिद्धानां कश्चिन् मां वेत्ति तत्वतः ॥ ३ ॥

पैं गा मनुष्याचिया सहस्त्रशां- । माजि विपाइलेयाची येथ धिंवसा । तैसेयां धिंवसेकरां बहुवसा- । माजि विरळा जाणे ॥ १० ॥

जैसा भरलेया त्रिभुवना । आंतु एकएकु चांगु अर्जुना । निवडुनि कीजे सेना । लक्षवरी ॥ ११ ॥

कीं तयाही पाठीं । जे वेळीं लोह मांसाते घांटी । ते वेळीं विजयश्रियेचां पाटीं । एकुचि बैसे ॥ १२ ॥

तैसें आस्थेच्या महापुरीं । रिघताती कोटिवरी । परि प्राप्तीचां पैलतीरीं । विपाइला निगे ॥ १३ ॥

म्हणऊनि सामान्य गा नोहे । हें सांगता वडिल गोठी गा आहे । परि तें बोलों येईल पाहें । आता प्रस्तुत ऐकें ।। १४ ॥

    भुमिरापोऽनलो वायुः खं मनो बुद्धीरेव च ।
    अंहकार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा ॥ ४ ॥

तरि अवधारीं गा धनंजया । हे महदादिक माझी माया । जैसी प्रतिबिंबे छाया । निजांगाची ॥ १५ ॥

आणि इयेतें प्रकृति म्हणिजे । जे अष्टधा भिन्न जाणिजे । लोकत्रय निपजे । इयेस्तव ॥ १६ ॥

हे अष्टधा भिन्न कैसी । ऐसा ध्वनि धरिसीं जरी मानसीं । तरि तेचि गा आतां परियेसीं । विवंचना ॥ १७ ॥

आप तेज गगन । मही मारुत मन । बुध्दि अंहकारु हे भिन्न । आठै भाग ॥ १८ ॥

    अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे पराम् ।
    जीवभूतां महाबाहो ययेदं  धार्यते जगत् ॥ ५ ॥

या आठांची जे साम्यावस्था । ते माझी परम प्रकृति पार्था । तिये नाम व्यवस्था । जीवु ऐसी ॥ १९ ॥

जे जडातें जीववी । चेतनेतें चेतवी । मनाकरवीं मानवी । शोक मोहो ॥ २० ॥

पै बुद्धीचां अंगी जाणणें । तें जिये जवळिकेचें करणें । जिया अंहकाराचेनि विंदाणे । जगचि धरिजे ॥ २१ ॥

    एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय ।
    अहं कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा ॥ ६ ॥

ते सूक्ष्म प्रकृति कोडें । जैं स्थूळाचिया आंगा घडे । तैं भूतसृष्टीची पडे । टांकसाळ ॥ २२ ॥

चतुर्विध ठसा । उमटों लागे आपैसा । मोला तरी सरिसा । परी थरचि आनान ॥ २३ ॥

होती चौंऱ्यांशीं लक्ष थरा । येरा मिती नेणिजे भांडारा । भरे आदिशून्याचा गाभारा । नाणेयांसी ॥ २४ ॥

ऐसें एकतुकें पांचभौतिक । पडती बहुवस टांक । मग तिये समृद्धीचे लेख । प्रकृतीचि धरी ॥ २५ ॥

जे आंखूनि नाणें विस्तारी । पाठी तयांची आटणी करी । माजी कर्माकर्माचिया व्यवहारीं । प्रवर्तु दावी ॥ २६ ॥

हें रुपक परी असो । सांगों उघड जैसें परियेसों । तरी नामरुपाचा अतिसो । प्रकृतीच कीजे ॥ २७ ॥

आणि प्रकृति तंव माझां ठायीं । बिंबे येथ आन नाहीं । म्हणौनि आदि मध्य अवसान पाहीं । जगासि मी ॥ २८ ॥

    मत्तः परतरं नान्यत् किंचिदस्ति धनंजय ।
    मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव ॥ ७ ॥

हें रोहिणीचे जळ । तयाचें पाहतां येईजे मूळ । तैं रश्मि नव्हती केवळ । होय तें भानु ॥ २९ ॥

तयाचिपरी किरीटी । इया प्रकृती जालिये सृष्टी । जैं उपसंहरुनि कीजेल ठी । तैं मीचि आहे ॥ ३० ॥

ऐसे होय दिसे न दिसे । हें मजचि माजिवडे असे । मियां विश्व धरिजे जैसें । सूत्रें मणि ॥ ३१ ॥

सुवर्णाचे मणी केले । ते सोनियाचे सुतीं वोविले । तैसें म्यां जग धरिलें । सबाह्याभ्यंतरीं ॥ ३२ ॥

    रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः ।
    प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषं नृषु ॥ ८ ॥
    पुण्यो गन्धः पृथिव्यां च तेजश्चास्मि विभावसौ ।
    जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु ॥ ९ ॥

म्हणोनि उदकीं रसु । कां पवनीं जो स्पर्शु । शशिसूर्यीं जो प्रकाशु । तो मीचि जाण ॥ ३३ ॥

तैसाचि नैसर्गिकु शुद्धु । मी पृथ्वीचां ठायीं गंधु । गगनीं मी शब्दु । वेदीं प्रणवु ॥ ३४ ॥

नराच्या ठायीं नरत्व । जें अंहभाविये सत्व । तें पौरुष मी हें तत्व । बोलिजत असे ॥ ३५ ॥

अग्नि ऐसें आहाच । तेज नामाचें आहे कवच । तें परौंते केलिया साच । निजतेज तें मी ॥ ३६ ॥

आणि नानाविध योनी । जन्मोनि भूतें त्रिभुवनीं । वर्तत आहात जीवनीं । आपुलालां ॥ ३७ ॥

एकें पवनेंचि पिती । एकें तृणास्तव जिती । एकें अन्नाधारे राहती । जळें एकें ॥ ३८ ॥

ऐसें भूताप्रति आनान । जें प्रकृतिवशे दिसे जीवन । तें आघवाठायीं अभिन्न । मिची एक ॥ ३९ ॥

    बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम् ।
    बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम् ॥ १० ॥
    बलं बलवंता चाहं कामरागविवर्जितम् ।
    धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ ॥ ११ ॥ 

पैं आदिचेनि अवसरें । विरुढे गगनाचेनि अंकुरें । जे अंती गिळी अक्षरे । प्रणवपटींची ॥ ४० ॥

जंव हा विश्वाकार असे । तंव जें विश्वाचिसारिखें दिसे । मग महाप्रळयदशे । कैसेहीं नव्हे ॥ ४१ ॥

ऐसें अनादि जें सहज । तें मी गा विश्वबीज । हें हातातळीं तुज । देइजत असे ॥ ४२ ॥

मग उघड करुनि पांडवा । जैं आणिसील सांख्याचिया गांवा । तैं तयाचा उपेगु बरवा । देखशील ॥ ४३ ॥

परि हे अप्रासंगिक आलाप । आतां असतु न बोलों संक्षेप । जाण तपियांचां ठायी तप । तें स्वरुप माझें ॥ ४४ ॥

बळियांमाजीं बळ । तें मी जाणें अढळ । बुद्धिमंतीं केवळ । बुद्धी ते मी ॥ ४५ ॥

भूतांच्या ठायीं कामु । तो मी म्हणे आत्मारामु । जेणें अर्थास्तव धर्मु । थोरु होय ॥ ४६ ॥

एऱ्हवीं विकाराचेनि पैसें । करी कीर इंद्रियाचेयाचि ऐसें । परि धर्मासि वेखासें । जावों नेदी ॥ ४७ ॥

जे अप्रवृत्तीचा अव्हांटा । सांडुनि विधीचिया निघे वाटा । तेवींचि नियमाचा दिवटा । सवें चाले ॥ ४८ ॥

कामु ऐसिया वोजा प्रवर्ते । म्हणोनि धर्मासि होय पुरतें । मोक्षतीर्थींचे मुक्तें । संसार भोगी ॥ ४९ ॥

जो श्रुतिगौरवाचां मांडवीं । काम सृष्टीचा वेलु वाढवी । जंव कर्मफळेंसि पालवी । अपवर्गीं टेके ॥ ५० ॥

ऐसा नियतु कां कंर्दपु । जो भूतां या बीजरुपु । तो मी म्हणे बापु । योगियांचा ॥ ५१ ॥

हें एकैक किती सांगावे । आतां वस्तुजातचि आघवें । मजपासूनि जाणावें । विकरलें असे ।। ५२ ॥

    ये चैव सात्त्विका  भावा राजसास्तामसाश्च ये ।
    मत्त एवेति तान् विद्धि न त्वहं तेषु ते मयि ॥ १२ ॥

जे सात्विक हन भाव । कां रजतमादि सर्व । ते ममरुपसंभव । वोळखे तू ॥ ५३ ॥

हे जाले तरी माझां ठायीं । परि ययामाजीं मी नाहीं । जैसी स्वप्नीचां डोहीं । जागृति न बुडे ॥ ५४ ॥

नातरी रसाचीच सुघट । बीजकणिका घनवट । परि तियेस्तव होय काष्ठ । अंकुरद्वारें ॥ ५५ ॥

मग तया काष्ठाचां ठायीं । सांग पां बीजपण असे काई । तैसा मी विकारीं नाहीं । जरि विकारला दिसे ॥ ५६ ॥

पैं गगनी उपजे आभाळ । परि तेथ गगन नाहीं केवळ । अथवा आभाळीं होय सलिल । तेथ अभ्र नाहीं ॥ ५७ ॥

मग त्या उदकाचेनि आवेशे । प्रगटलें तेज जें लखलखीत दिसे । तिये विजूमाजी असे । सलिल कायी ॥ ५८ ॥

सांगे अग्नीस्तव धूम होये । तिये धूमीं काय अग्नि आहे । तैसा विकारु हा मी नोहें । जरि विकारला असे ॥ ५९ ॥

    त्रिभिर्गुणमयैर्भावैरेभिः सर्वमिदं जगत् ।
    मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम् ॥ १३ ॥

परि उदकीं झाली बाबुळी । तें उदकातें जैसी झांकोळी । कां वायांचि आभाळीं । आकाश लोपे ॥ ६० ॥

हां गा स्वप्न लटिकें म्हणों यें । वरि निद्रावशें बाणलें होये । तंव आठवु काय देत आहे । आपणपेयां ॥ ६१ ॥

हें असो डोळ्यांचे । डोळाचि पडळ रचे । तेणें देखणेंपण डोळ्यांचे । न गिळिजे कायी ॥ ६२ ॥

तैसी हे माझीच बिंबली । त्रिगुणात्मक साउली । कीं मजचि आड वोडवली । जवनिका जैसी ॥ ६३ ॥

म्हणऊनि भूतें मातें नेणती । माझींच परि मी नव्हती । जैसी जळींचि जळीं न विरती । मुक्ताफळे ॥ ६४ ॥

पै पृथ्वीयेचा घटु कीजे । सवेंचि पृथ्वीसि मिळे तरि मेळविजे । एऱ्हवीं तोचि अग्निसंगे असिजे । तरि वेगळा होय ॥ ६५ ॥

तैसें भूतजात सर्व । हे माझेचि कीर अवयव । परि मायायोगे जीव- । दशे आले ॥ ६६ ॥

म्हणोनि माझेचि मी नव्हती । माझेचि मज नोळखती । अंहममताभ्रांती । विषयांध जाले ॥ ६७ ॥

    दैवी ह्येषा गुणमयी मम माया  दुरत्यया ।
    मामेव  ये  प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते ॥ १४ ॥   

आतां महदादि हे माझी माया । उतरोनिया धनंजया । मी होइजे हें आया । कैसेनि ये ॥ ६८ ॥

जिये ब्रह्माचळाचां आधाडां । पहिलिया संकल्पाचा उभडा । सवेंचि महाभूतांचा बुडबुडा । साना आला ॥ ६९ ॥

जे सृष्टिविस्ताराचेनि वोघें । चढत काळकलनेचेनि वेगें । प्रवृत्तिनिवृत्तीचिं तुंगें । तटें सांडी ॥ ७० ॥

जे गुणघनाचेनि वृष्टिभरें । भरली मोहाचेनि महापूरें । घेऊनि जात नगरें । यमनियमांचीं ॥ ७१ ॥

जे द्वेषाचां आवर्तीं दाटत । मत्सराचे वळसे पडत । माजी प्रमादादि तळपत । महामीन ॥ ७२ ॥

जेथ प्रपंचाचीं वळणें । कर्माकर्मांचीं वोभाणें । वरी तरताती वोसाणें । सुखदुःखाचीं ॥ ७३ ॥

रतीचिया बेटा । आदळती कामाचिया लाटा । जेथ जीवफेन संघटा । सैंघ दिसे ॥ ७४ ॥

अहंकाराचिया चळिया । वरि मदत्रयाचिया उकळिया । जेथ विषयोर्मीच्या आकळिया । उल्लाळे घेती ॥ ७५ ॥

उदायास्ताचे लोंढे । पाडीत जन्ममृत्यूचे चोंढे । तेथ पांचभौतिक बुडबुडे । होत जाती ॥ ७६ ॥

संमोह विभ्रम मासे । गिळिताती धैर्याचीं आविसें । तेथ देव्हडे भोंवत वळसे । अज्ञानाचे ॥ ७७ ॥

भ्रांतीचेनि खडुळें । रेवले आस्थेचे अवगाळे । रजोगुणाचेनि खळाळें । स्वर्गु गाजे ॥ ७८ ॥

तमाचे धारसे वाड । सत्त्वाचें स्थिरपण जाड । किंबहुना हे दुवाड । मायानदी ॥ ७९ ॥

पैं पुनरावृत्तीचेनि उभडें । झळंबती सत्यलोकींचे हुडे । घायें गडबडती धोंडे । ब्रह्मगोळकाचे ॥ ८० ॥

तया पाणियाचेनि वहिलेपणें । अझुनि न धरिती वोभाणें । ऐसा मायापूर कवणें । तरिजेल गा ॥ ८१ ॥

येथ एक नवलाहो । जो जो कीजे तरणोपावो । तो तो अपावो । होय तें एक ॥ ८२ ॥

एक स्वयंबुद्धीचां बाहीं । रिगाले तयाची शुद्धीचि नाहीं । एक जाणिवेचां डोहीं । गर्वेंचि गिळिले ॥ ८३ ॥

एकीं वेदत्रयाचिया सांगडी । घेतलिया अंहभावाचिया धोंडी । ते मदमीनाच्या तोंडीं । सगळेचि गेले ॥ ८४ ॥

एकीं वयसेचें जाड बांधले । मग मन्मथाचिये कांसे लागले । ते विषयमगरीं सांडिले । चघळूनियां ॥ ८५ ॥

आतां वृध्दाप्याचिया तरंगा- । माजीं मतिभ्रंशाचा जरंगा । तेंणे कवळिजताती पैं गा । चहूंकडे ॥ ८६ ॥

आणि शोकाचा कडां उपडत । क्रोधाचां आवर्तीं दाटत । आपधागिंधी चुंबिजत । उधवला ठायीं ॥ ८७ ॥

मग दुःखाचेनि बरबटें बोंबले । पाठीं मरणाचिये रेवे रेवले । ऐसे कामाचिये कासे लागले । ते गेले वायां ॥ ८८ ॥

एकीं यजनक्रियेची पेटी । बांधोनि घातली पोटीं । ते स्वर्गसुखाचां कपाटीं । शिरकोनि ठेले ॥ ८९ ॥

एकीं मोक्षीं लागावयाचिया आशा । केला कर्मबाह्यांचा भंरवसा । परि ते पडिले वळसां । विधिनिषेधाचां ॥ ९० ॥

जेथ वैराग्याची नाव न रिगे । विवेकाचा तागा न लगे । वरि कांही तरों ये योगें । तरि विपायें तो ॥ ९१ ॥

ऐसें जीविचिये आंगवणें । इये मायानदीचे उतरणें । हें कासयासारिखें बोलणें । म्हणावें पां ॥ ९२ ॥

जरी अपथ्यशीळा व्याधी । कळे साधूसी दुर्जनाची बुद्धी । कीं रागी सांडी रिद्धी । आली सांती ॥ ९३ ॥

जरी चोरां सभा दाटे । अथवा मीनां गळु घोटे । नातरी भेडा उलटे । विवसी जरी ॥ ९४ ॥

पाडस वागुर करांडी । जरी मुंगी मेरु वोलांडी । तरी मायेची पैलथडी । देखती जीव ॥ ९५ ॥

म्हणऊन गा पंडुसुता । जैसी सकामा न जिणवेचि वनिता । तेवीं मायामय हे सरिता । न तरवे जीवां ॥ ९६ ॥

येथ एकचि लीला तरले । जे सर्वभावें मज भजले । तयां ऐलीच थडी सरलें । मायाजळ ॥ ९७ ॥

जयां सदगुरु तारुं फुडें । जे अनुभवाचे कांसे गाढे । जयां आत्मनिवेदन तरांडे । आकळलें ॥ ९८ ॥

जें अंहभावाचें वोझें साडुंनी । विकल्पाचिया झुळका चुकाउनी । अनुरागाचा निरु ताऊनी । पाणिढाळु ॥ ९९ ॥

जया ऐक्याचिया उतारा । बोधाचा जोडला तारा । मग निवृत्तीचिया पैल तीरा । झेंपावले जे ॥ १०० ॥

ते उपरतीचां वांवी सेलत । सोहंभावाचेनि थावें पेलत । मग निघाले अनकळित । निवृत्तितटीं ॥ १०१ ॥

येणें उपायें मज भजले । ते हे माझी माया तरले । परि ऐसे भक्त विपाइले । बहुवस नाहीं ॥ १०२ ॥

    न मां दुष्कृतिनो मूढाः प्रपद्यन्ते नराधमाः  ।
    माययापहृतज्ञाना आसुरं भावमाश्रिताः ॥ १५ ॥
    चतुर्विधा भजन्ते मां जनाः सुकृतिनोऽर्जुन ।
    आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतवर्ष ॥ १६ ॥

जे बहुतां एकां अवांतरु । अंहकाराचा भूतसंचारु । जाहला म्हणोनि विसरु । आत्मबोधाचा ॥ १०३ ॥

बहुतां एकां अवांतरु - वरील साधक सोडून इतरांना

ते वेळीं नियमाचें वस्त्र नाठवे । पुढीले अधोगतीची लाज नेणवे । आणि करिताति जें न करावें । वेदु म्हणे ॥ १०४ ॥

पाहें पां शरीराचिया गावां । जयालागीं आले पांडवा । तो कार्यार्थु आघवा । सांडूनियां ॥ १०५ ॥

इंद्रियग्रामीचां राजबिदीं । अंहममतेचिया जल्पवादीं । विकारांतरांची मांदीं । मेळविताती ॥ १०६ ॥

दुःखशोकांचां घाई । मारिलियाची सेचि नाहीं । हे सांगावया कारण काई । जे ग्रासिले माया ॥ १०७ ॥

म्हणोनि ते मातें चुकले । आइकां चतुर्विध मज भजले । जिहीं आत्महित केलें । वाढतें गा ॥ १०८ ॥

तो पहिला आर्तु म्हणिजे । दुसरा जिज्ञासु बोलिजे । तिजा अर्थार्थी जाणिजे । ज्ञानिया चौथा ॥१० ९ ॥

    तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते ।
    प्रियो हि ज्ञानिनोऽत्यर्थमहं स च मम प्रियः॥ १७ ॥ 

तेथ आर्तु तो आर्तीचेनि व्याजें । जिज्ञासु तो जाणावयाचिलागीं भजे । तिजेनि तेणें इच्छिजे । अर्थसिद्धी ॥ ११० ॥

मग चौथियाचां ठायीं । कांहींचि करणें नाहीं । म्हणोनि भक्तु एकु पाहीं । ज्ञानिया जो ॥ १११ ॥

जे तया ज्ञानाचेनि प्रकाशें । फिटलें भेदाभेदांचें कवडसें । मग मीचि जाहला समरसें । आणि भक्तुही तेवींचि ॥ ११२ ॥

परि आणिकांचिये दिठी नावेक । जैसा स्फटिकुचि आभासे उदक । तैसा ज्ञानी नव्हे कौतुक । सांगता तो ॥ ११३ ॥

जैसा वारा कां गगनीं विरे । मग वारेपण वेगळें नुरे । तेवीं भक्त हे पैज न सरे । जरी ऐक्या आला ॥ ११४ ॥

जरी पवनु हालवूनि पाहिजे । तरी गगनावेगळा देखिजे । एऱ्हवीं गगन तो सहजें । असे जैसें ॥ ११५ ॥

तैसें शरीरें हन कर्में । तो भक्तु ऐसा गमे । परी अंतर प्रतीतिधर्मे । मीचि जाहला ॥ ११६ ॥

आणि ज्ञानाचेनि उजिडलेपणें । मी आत्मा ऐसें तो जाणें । म्हणऊनि मीही तैसेंचि म्हणें । उचंबळला सांता ॥ ११७ ॥

हां गा जीवापैलीकडिलीये खुणे । जो पावोनि वावरोंही जाणे । तो देहाचेनि वेगळेपणें । काय वेगळा होय ॥ ११८ ॥

    उदाराः सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम् ।
    आस्थितः स हि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम् ॥ १८ ॥

म्हणोनि आपुलालिया हिताचेनि लोभें । मज आवडे तोहि भक्तु झोंबे । परि मीचि करी वालभें । ऐसा ज्ञानिया एकु ।। ११९ ॥

पाहे पां दुभतेचिया आशा । जगचि धेनूसि करीताहे फासां । परि दोरेंविण कैसा । वत्साचा बळी ॥ १२० ॥

कां जे तनुमनुप्राणें । तें आणिक कांहींचि नेणें । देखे तयातें म्हणे । हे मायाचि कीं माझी ॥ १२१ ॥

तें येणें मानें अनन्यगती । म्हणुनि धेनूही तैसीचि प्रीति । यालागीं लक्षीपती । बोलिले साच ॥ १२२ ॥

हें असो मग म्हणितलें । जे कां तुज सांगितलें । तेही भक्त भले । पढियंते आम्हां ॥ १२३ ॥

परि जाणोनिया मातें । जे पाहों विसरले मागौतें । जैसें सागरा येऊनि सरितें । मुरडावें ठेलें ॥ १२४ ॥

तैसी अंतःकरणकुहरीं उपजली । जयाची प्रतीतिगंगा मज मिनली । तो मी हे काय बोली । फार करुं ॥ १२५ ॥

एऱ्हवीं ज्ञानिया जो म्हणिजे । तो चैतन्यचि केवळ माझें । हें न म्हणावें परि काय कीजे । न बोलणे बोलों ॥ १२६ ॥

     बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान् मां प्रपद्यते ।
    वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः ॥ १९ ॥

जे तो विषयांची मोट झाडी- । माजीं कामक्रोधांचीं सांकडीं । चुकावूनि आला पाडी । सद्वासनेचिया ॥ १२७ ॥

मग साधुसंगें सुभटा । उजू सत्कर्माचिया वाटा । अप्रवृत्तीचा अव्हांटा । डावलूनि ॥ १२८ ॥

आणि जन्मशतांचा वाहतवणा । तेविंचि आस्थेचिया न लेचि वाहणा । तेथ फलहेतूचा उगाणा । कवणु चाळी ॥ १२९ ॥

ऐसा शरीरसंयोगाचिये राती- । माजीं धांवतां सडिया आयती । तंव कर्मक्षयाची पाहाती । पाहांट जाली ॥ १३० ॥

तैसी गुरुकृपाउखा उजळली । ज्ञानाची वोतपली पडली । तेथ साम्याची ऋद्धि उघडली । तयाचिये दिठी ॥ १३१ ॥

ते वेळीं जयाकडे वास पाहे । तेउता मीचि तया एक आहे । अथवा निवांत जरी राहे । तरी मीचि तया ॥ १३२ ॥

हें असो आणिक काहीं । तया सर्वत्र मीवांचूनि नाहीं । जैसें सबाह्य जळ डोहीं । बुडालिया घटा ॥ १३३ ॥

तैसा तो मजभीतरीं । मी तया आंतुबाहेरी । हें सांगिजेल बोलवरी । तैसें नव्हे ॥ १३४ ॥

म्हणोनि असो हें यापरी । तो देखे ज्ञानाची वाखारी । तेणें संसरलेनि करी । आपु विश्व ॥ १३५ ॥

हें समस्तही वासुदेवो । ऐसा प्रतीतिरसाचा वोतला भावो । म्हणोनि भक्तांमाजीं रावो । आणि ज्ञानिया तोचि ॥ १३६ ॥

जयाचिये प्रतीतीचां वाखौरां । पवाडु होय चराचरा । तो महात्मा धनुर्धरा । दुर्लभु आथी ॥ १३७ ॥

येर बहुत जोडती किरीटी । जयांचीं भजनें भोगासाठीं । जे आशातिमिरें दृष्टी- । मंद जाले ॥ १३८ ॥

    कामैस्तैस्तैर्हृतज्ञानाः प्रपद्यन्तेऽन्यदेवताः ।
    तं तं नियममास्थाय प्रकृत्या नियताः स्वया ॥ २० ॥

आणि फळाचिया हांवा । हृदयीं कामा जाला रिगावा । कीं तयाचिये घसणी दिवा । ज्ञानाचा गेला ॥ १३९ ॥

ऐसे उभयंता आंधारीं पडले । म्हणोनि पासींचि मातें चुकले । मग सर्वभावें अनुसरले । देवतांतरां ॥ १४० ॥

आधींच प्रकृतीचे पाइक । वरी भोगालागीं तव रंक । मग तेणें लोलुप्यें कौतुक । कैसे भजती ॥ १४१ ॥

कवणी तिया नियमबुद्धि । कैसिया हन उपचारसमृद्धि । कां अर्पण यथाविधी । विहित करणें ॥ १४२ ॥

    यो यो यां यां तनुं भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति ।
    तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम् ॥ २१ ॥

पै जो जिये देवतांतरीं । भजावयाची चाड करी । तयाची ते चाड पुरी । पुरविता मी ॥ १४३ ॥

देवोदेवी मीचि पाहीं । हाही निश्चयो त्यासी नाहीं । भाव ते ते ठायीं । वेगळाला धरिती ॥ १४४ ॥

    स तया श्रद्धया युक्तस्तस्या राधनमीहते ।
    लभते च ततः कामान् मयैव विहितान् हि तान् ॥ २२ ॥

मग श्रद्धायुक्त । तेथिंचें आराधन जें उचित । तें सिद्धिवरि समस्त । वर्तो लागे ॥ १४५ ॥

ऐसें जेणें जें भाविजे । तें फळ तेणें पाविजे । परी तेंही सकळ निपजे । मजचिस्तव ॥ १४६ ॥

    अन्तवत् तु फलं तेषां तद् भवत्यल्पमेधसाम् ।
    देवान् देवयजो यान्ति मद्भक्ता ॥ २३ ॥

परी ते भक्त मातें नेणती । जे कल्पनाबाहेरी न निघती । म्हणोनि कल्पित फळ पावती । अंतवंत ॥ १४७ ॥

किंबहुना ऐसें जें भजन । तें संसाराचेंनि साधन । येर फळभोग तो स्वप्न । नाववरी दिसे ॥ १४८ ॥

हें असो परौंते । मग हो कां आवडे तें । परी यजी जो देवतांतें । तो देवत्वासीचि ये ॥ १४९ ॥

येर तनुमनुप्राणीं । जे अनुसरले माझेयाचि वाहणीं । ते देहाचां निर्वाणीं । मीचि होती ॥ १५० ॥

    अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यते मामबुद्धयः ।
    परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम् ॥ २४ ॥

परी तैसें न करिती प्राणिये । वायां आपुलां हितीं वाणिये । जें पोंहताती पाणियें । तळहातींचेनि ॥ १५१ ॥

नाना अमृताचां सागरीं बुडिजे । मग तोंडा कां वज्रमिठी पाडिजे । आणि मनीं तरी आठविजे । थिल्लरोदकातें ॥ १५२ ॥

हें ऐसें काइसेया करावें । जे अमृतींही रिघोनि मरावें । तें सुखें अमृत होऊनि कां नसावें । अमृतामाजीं ॥ १५३ ॥

तैसा फळहेतुचा पांजरा । सांडुनियां धनुर्धरा । कां प्रतीतिपाखीं चिदबंरा । गोसाविया नोहावें ॥ १५४ ॥

जेथ उंचावतेनि पवाडें । सुखाचा पैसारु जोडे । आपुलेनि सुरवाडें । उडों ये ऐसा ॥ १५५ ॥

तया उमपा माप कां सुवावें । मज अव्यक्ता व्यक्त कां मानावें । सिद्ध असतां कां निमावें । साधनवरी ॥ १५६ ॥

परी हा बोल आघवा । जरी विचारीजतसे पांडवा । तरि विशेषें या जीवां । न चोजवे गा ॥ १५७ ॥

    नाहं प्रकाशः सर्वस्य योगमायासमावृत्तः ।
    मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम् ॥ २५ ॥

कां जे योगमायापडळें । हे जाले आहाति आधंळे । म्हणोनि प्रकाशाचेनि देहबळें । न देखती मातें ॥ १५८ ॥

एऱ्हवीं मी नसें ऐसें । कांही वस्तुजात असे । पाहें पा कवण जळ रसें- । रहित आहे ॥ १५९ ॥

पवन कवणातें न शिवेचि । आकाश कें न समायेचि । हें असो एक मीचि । विश्वीं असें ॥ १६० ॥

    वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन ।
    भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन ॥ २६ ॥

येथें भूतें जियें अतीतलीं । तियें मीचि होऊनि ठेलीं । आणि वर्तत आहाति जेतुलीं । तींही मीचि ॥ १६१ ॥

कां भविष्यमाणें जियें हीं । तींही मजवेगळीं नाहीं । हा बोलचि एऱ्हवीं कांहीं । होय ना जाय ॥ १६२ ॥

दोराचिया सापासी । डोंबा बडी ना गव्हाळा ऐसी । संख्या न करवे कोण्हासी । तेवीं भूतांसि मिथ्यत्वें ॥ १६३ ॥

ऐसा मी पंडुसुता । अनुस्यूत सदा असतां । या संसार जो भूतां । तो आनें बोलें ॥ १६४ ॥

आतां थोडी ऐसी । गोठी सांगिजेल परियेसीं । जै अहंकारतनूंसीं । वालभ पडिलें ॥ १६५ ॥

    इच्छाद्वेषसमुत्थेन द्वद्वमोहेन भारत ।
    सर्वभूतानि संमोहं सर्गे यान्ति परंतप ॥ २७ ॥

तै इच्छा कुमारी जाली । मग ते कामाचिया तारुण्या आली । तेथ द्वेषेंसीं मांडिली । वराडिक ॥ १६६ ॥

तया दोघांस्तव जन्मला । ऐसा द्वंद्वमोह जाला । मग तो आजेयानें वाढविला । अहंकारें ॥ १६७ ॥

जो धृतीसी सदां प्रतिकुळु । नियमाही नागवे सळु । आशारसें दोंदिलु । जाला सांता ॥ १६८ ॥

असंतुष्टीचिया मदिरा । मत्त होऊनि धनुर्धरा । विषयांचां वोवरां । विकृतीशीं असे ॥ १६९ ॥

तेणें भावशुद्धीचिया वाटे । विखुरले विकल्पाचे कांटे । मग चिरिले अव्हांटे । अप्रवृत्तीचे ॥ १७० ॥

तेणे भूतें भांबावलीं । म्हणोनि संसाराचिया आडवामाजीं पडिलीं । मग महादुःखाचां घेतलीं । दांडेवरी ॥ १७१ ॥

    येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणाम् ।
    ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः ॥ २८ ॥

ऐसे विकल्पाचे वांयाणे । कांटे देखोनि सणाणे । जे मतिभ्रमाचे पासवणें । घेतीचिना ॥ १७२ ॥

उजू एकनिष्ठतेचां पाउलीं । रगडूनि विकल्पाचिया भालीं । महापातकांची सांडिली । अटवीं जिहीं ॥ १७३ ॥

मग पुण्याचे धांवा घेतले । आणि माझी जवळीक पातले । किंबहुना ते चुकले । वाटवधेयां ॥ १७४ ॥

    जरामरणमोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये ।
    ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्नमध्यात्मं कर्म चाखिलम् ॥ २९ ॥

एऱ्हवीं तरी पार्था । जन्ममरणाची निमे कथा । ऐसिया प्रयत्नातें आस्था । विये जयांची ॥ १७५ ॥

तया तो प्रयत्नुचि एके वेळे । मग समग्रें परब्रह्में फळे । जया पिकलेया रसु गळे । पूर्णतेचा ॥ १७६ ॥

ते वेळीं कृतकृत्यता जग भरे । तेथ अध्यात्माचें नवलपण पुरे । कर्माचें काम सरे । विरमे मन ॥ १७७ ॥

ऐसा अध्यात्मलाभ तया । होय गा धनंजया । भांडवल जया । उद्यमीं मी ॥ १७८ ॥

तयातें साम्याचिये वाढी । ऐक्याची सांदे कुळवाडी । तेथ भेदाचिया दुबळवाडी । नेणिजे तो ॥ १७९ ॥

    साधिभूताधिदैवं मां साधियज्ञं च ये विदुः ।
    प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतसः ॥ ३० ॥

जिहीं साधिभूता मातें । प्रतीतिचेनि हातें । धरुनि अधिदैवातें । शिवतले गा ॥ १८० ॥

जया जाणिवेचेनि वेगें । मी अधियज्ञुही दृष्टी रिगें । ते तनूचेनि वियोगें । विरहे नव्हती ॥ १८१ ॥

एऱ्हवीं आयुष्यांचें सूत्र बिघडतां । भूतांची उमटे खडाडता । काय न मरतयाचियाहि चित्ता । युगांतु नोहे ॥ १८२ ॥

परि नेणों कैसें पैं गा । जे जडोनि गेले माझिया आंगा । ते प्रयाणींचिया लगबगा । न सांडितीच मातें ॥ १८३ ॥

एऱ्हवीं तरी जाण । ऐसे जे निपुण । तेचि अंतःकरण- । युक्त योगी ॥ १८४ ॥

तंव इये शब्दकुपिकेतळीं । नोडवेचि अवधानाची अंजुळी । जे नावेक अर्जुन तये वेळीं । मागांचि होता ॥ १८५ ॥

जेथ तद्ब्रह्मवाक्यफळें । जिये नानार्थरसें रसाळें । बहकाते आहाती परिमळें । भावाचेनि ॥ १८६ ॥

सहज कृपामंदानिळें । कृष्णद्रुमाचीं वचनफळें । अर्जुन श्रवणाचिये खोळें । अवचित पडिलीं ।। १८७ ॥

तियें प्रमेयाची हो कां वळलीं । कीं ब्रह्मरसाच्या सागरीं चुबुकळिलीं । मग तैसीच का घोळिलीं । परमानंदे ॥ १८८ ॥

तेणें बरवेपणें निर्मळें । अर्जुना उन्मेषाचे डोहळे । घेताति गळाळे । विस्मयामृताचे ॥ १८९ ॥

तिया सुखसंपत्ति जोडलिया । मग स्वर्गा वाती वांकुलिया । हृदयाचां जीवीं गुतकुलिया । होत आहाती ॥ १९० ॥

ऐसें वरचिलीचि बरवा । सुख जावों लागलें फावा । तंव रसस्वादाचिया हांवा । लाहो केला ॥ १९१ ॥

झाकरी अनुमानाचेनि करतळें । घेऊनि तिये वाक्यफळें । प्रतीतिमुखीं एके वेळे । घालूं पाहिलीं ॥ १९२ ॥

तंव विचाराचिया रसना न दाटती । परि हेतूचांहि दशनीं न फुटती । ऐसे जाणोनि सुभद्रापती । चुंबीचिना ॥ १९३ ॥

मग चमत्कारला म्हणे । इयें जळींचिं मा तारांगणें । कैसा झकविलों असलगपणें । अक्षरांचेनि ॥ १९४ ॥

इयें पदें नव्हती फुडिया । गगनाचियाचि घडिया । येथ आमुची मति बुडिया । थाव न निघे ॥ १९५ ॥

वांचूनी जाणावयाची के गोठी । ऐसें जीवीं कल्पूनि किरीटी । तिया पुनरपि केली दृष्टी । यादवेंद्रा ॥ १९६ ॥

मग विनविलें सुभटें । हां हो जी ये एकवाटे । सातही पदें अनुच्छिष्टे । नवलें आहाती ॥ १९७ ॥

एऱ्हवीं अवधानाचेनि वहिलेपणें । नाना प्रमेयांचें उगाणें । काय श्रवणाचेनि आंगणे । बोलों लाहाती ॥ १९८ ॥

परी तैसें हें नोहेचि देवा । देखिला अक्षरांचा मेळावा । आणि विस्मयाचिया जीवा । विस्मयो जाहला ॥ १९९ ॥

कानाचेनि गवाक्षद्वारें । बोलाचे रश्मी अभ्यंतरें । पाहेना तंव चमत्कारें । अवधान ठकलें ॥ २०० ॥

तेविंचि अर्था चाड मज आहे । तें सांगतांही वेळु न साहे । म्हणुनि निरुपण लवलाहें । कीजो देवा ॥ २०१ ॥

ऐसा मागील पडताळा घेऊनी । पुढां अभिप्रावो दृष्टी सूनी । तेंविचि माजीं शिरवुनि । आर्ती आपुली ॥ २०२ ॥

कैसी पुसती पाहें पां जाणिव । भिडेचि तरी लंघो नेदीं शिंव । एऱ्हवीं कृष्ण हृदयासि खेंव । देवों सरला ॥ २०३ ॥

अहो गुरुतें जैं पुसावें । तैं येणें मानें सावध होआवें । हें एकचि जाणें आघवें । सव्यसाची ॥ २०४ ॥

आतां तयाचें ते प्रश्न करणे । वरी सर्वज्ञ हरीचें बोलणें । हे संजयो आवडलेपणें । सागेंल कैसें ॥ २०५ ॥

तिये अवधान द्यावें गोठी । बोलिजेल नीट मऱ्हाठी । जैसी कानाचे आधीं दृष्टी । उपेगा जाय ॥ २०६ ॥

बुद्धीचिया जिभा । बोलाचा न चाखतां गाभा । अक्षरांचिया भांबा । इंद्रियें जिती ॥ २०७ ॥

पहा पां मालतीचे कळे । घ्राणासि कीर वाटले परिमळें । परि वरचिला बरवा काइ डोळे । सुखिये नव्हती ॥ २०८ ॥

तैसें देशियेचिया हवावा । इंद्रियें करिती राणिवा । मग प्रमेयाचिया गांवा । लेसा जाइजे ॥ २०९ ॥

ऐसेनि नागरपणें । बोलु निमे तें बोलणें । ऐका ज्ञानदेव म्हणे । निवृत्तीचा ॥ २१० ॥

॥ इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विज्ञानयोगो नाम सप्तमोऽध्यायः ॥

श्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु ।

वैयक्‍तिक साधने
मी गोळा केलेली पाने