अध्याय नौवा
Wikibooks कडून
तरि अवधान एकवेळें दीजे । मग सर्व सुखासि पात्र होईजे । हें प्रतिज्ञोत्तर माझें । उघड ऐका ॥ १ ॥
परि प्रौढी न बोलें हो जी । तुम्हां सर्वज्ञांचां समाजीं । देयावें अवधान हे माझी । विनवणी सलगीची ॥ २ ॥
कां जे लळेयांचे लळें सरती । मनोरथाचे मनौरे पुरती । जरी माहेरें श्रीमंतें होती । तुम्हा ऐसी ॥ ३ ॥
तुमचेया दिठिवेचिया वोले । सासिन्नले प्रसन्नतेचे मळे । ते साऊली देखोनि लोळें । श्रांतु जी मी ॥ ४ ॥
प्रभू तुम्ही सुखामृताचे डोहो । म्हणोनि आम्ही आपुलिया स्वेच्छा वोलावों लाहों । येथ जरी सलगी करू बिहों । तरी निवो कें पां ॥ ५ ॥
नातरी बालक बोबडां बोलीं । कां वाकुडां विचुकां पाऊलीं । तें चोज करूनि माऊली । रिझे जेवीं ॥ ६ ॥
तेवी तुम्हा संतांचा पढियावो । कैसेनि तरि आम्हांवरी हो । या बहुवा आळुकिया जी आहों । सलगी करीत ॥ ७ ॥
वांचूनि माझिये बोलतीये योग्यते । सर्वज्ञ भवादृश श्रोते । काय धड्यावरी सारस्वतें । पढों सिकिजे ॥ ८ ॥
अवधारां आवडे तेसणां धुंधुरु । परि महातेजीं न मिरवे काय करूं । अमृताच्या ताटी वोगरूं । ऐसी रससोय कैंची ॥ ९ ॥
अहो हिमकरासी विंजणे । की नादापुढे आइकवणे । लेणियासी लेणें । हें कहीं आथी ॥ १० ॥
सांगा परिमळें काय तुरंबावें । सागरें कवणे ठायीं नाहावें । हें गगनचि आडें आघवें । ऐसा पवाडु कैंचा ॥ ११ ॥
तैसें तुमचें अवधान धाये । आणि तुम्ही म्हणा हें होये । ऐसें वक्तृत्व कवणा आहे । जेणे रिझा तुम्ही ॥ १२ ॥
तरि विश्वप्रगटतिया गभस्ती । हातिवेनि न कीजे आरती । कां चुळोदकें अपांपती । अर्घ्यु नेदिजे ॥ १३ ॥
प्रभु तुम्ही महेशाचिया मूर्ती । आणि मी दुबळा अर्चितसे भक्ती । म्हणोनि बेल जऱ्ही गंगावती । तऱ्ही स्वीकाराल की ॥ १४ ॥
बाळक बापाचिये ताटीं रिगे । रिगौनि बापातेंच जेवऊं लागे । की तो संतोषलेनि वेगें । मुखचि वोडवी ॥ १५ ॥
तैसा मी तुम्हांप्रती । चावटी करितसे बाळमती । तरी तुम्हीं संतोषिजे ऐसी जाती । प्रेमाची या ॥ १६ ॥
आणि तेणे आपुलेपणाचेनि मोहें । तुम्ही संत घेतले असा बहुवे । म्हणोनि केलिये सलगीचा नोहे । आभारु तुम्हां ॥ १७ ॥
अहो तान्हेयाची लागता झटे । तरी अधिकचि पान्हा फुटे । रोषें प्रेम दुणवटे । पढियंतयाचेनि ॥ १८ ॥
म्हणऊनि मज लेंकुरवाचेनि बोलें । तुमचें कृपाळूपण निदैले । ते चेइलें हें जी जाणवलें । यालागीं बोलिलों मी ॥ १९ ॥
एऱ्हवीं चांदणे पिकविजत आहे चेपणी । कीं वारया धापत आहे वाहणी । हां हो गगनासी गंवसणी । घालिजे केवी ॥ २० ॥
आइकां पाणी वोथिजावे न लगे । नवनीतीं माथुला न रिगे । तेविं लाजिलें व्याख्यान न निगे । देखोनि जयांते ॥ २१ ॥
हें असो शब्दब्रह्म जिये बाजे । शब्द मावळलेया निवांतु निजे । तो गीतार्थु मऱ्हाटिया बोलिजे । हा पाडु काई ॥ २२ ॥
परि ऐसियाही मज धिंवसा । तो पुढतियाचि येकी आशा । जे धिटींवा करूनि भवादृश्यां । पढियंता होआवें ॥ २३ ॥
परि आतां चंद्रापासोनि निवविते । जें अमृताहूनि जीववितें । तेणें अवधान कीजो वाढतें । मनोरथा माझिया ॥ २४ ॥
कां जैं दिठिवा तुमचा वरुषे । तैं सकळार्थसिद्धि मती पिके । एऱ्हवी कोंभेला उन्मेषु सुके । जरी उदास तुम्ही ॥ २५ ॥
सहजें तरी अवधारा । वक्तृत्वा अवधानाचा होय चारा । तरी दोंदें पेलती अक्षरां । प्रमेयाचीं ॥ २६ ॥
अर्थ बोलाची वाट पाहे । तेथ अभिप्रावो अभिप्रायातें विये । भावाचा फुलौरा होत जाये । मतिवरी ॥ २७ ॥
म्हणूनि संवादाचा सुवावो ढळे । तरी हृदयाकाश सारस्वतें वोळे । आणि श्रोता दुश्चिता तरि वितुळे । मांडला रसु ॥ २८ ॥
अहो चंद्रकांतु द्रवता कीर होये । परि ते हातवटी चंद्री कीं आहे । म्हणऊनि वक्ता तो वक्ताचि नव्हे । श्रोतेनि वीण ॥ २९ ॥
परी आतां आमुतें गोड करावें । ऐसे तांदुळी कायसा विनवावे । साइखडियाने काइ प्रार्थावें । सूत्रधारातें ॥ ३० ॥
काय तो बाहुलियांचिया काजा नाचवी । कीं आपुलियें जाणिवेची कळा वाढवी । म्हणऊनि आम्हां या ठेवाठेवी । काय काज ॥ ३१ ॥
तंव गुरु म्हणती काइ जाहलें । हें समस्तही आम्हां पावलें । आतां सांगे जें निरोपिलें । नारायणें ॥ ३२ ॥
येथ संतोषोनि निवृत्तिदासें । जी जी म्हणऊनि उल्हासें । अवधारां श्रीकृष्ण ऐसे । बोलते जाहले ॥ ३३ ॥
श्री भगवानुवाचः इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ।
ज्ञानं विज्ञानसहितं यज्ज्ञात्वा मोक्षसेऽशुभात् ॥ १ ॥
नातरि अर्जुना हें बीज । पुढती सांगिजेल तुज । जें हें अंतःकरणींचे गुज । जीवचिये ॥ ३४ ॥
येणें मानें जीवाचें हियें फोडावें । मग तुज कां पां मज सांगावे । ऐसें काहीं स्वभावें । कल्पिशी जरी ॥ ३५ ॥
तरी परियेसीं प्राज्ञा । तूं आस्थेचीच संज्ञा । बोलिलिये गोष्टींची अवज्ञा । नेणसी करुं ॥ ३६ ॥
म्हणोनि गूढपण आपुलें मोडो । वरि न बोलावेंही बोलावें घडो । परि आमुचिचे जीवींचें पडो । तुझां जीवीं ॥ ३७ ॥
अगा थानीं कीर दूध गूढ । परि थानासीचि नव्हे कीं गोड । म्हणोनि सरो कां सेवितयाची चाड । जरी अनन्य मिळे ॥ ३८ ॥
मुडाहूनि बीज काढिलें । मग निर्वाळलिये भूमी पेरिलें । तरी तें सांडीविखुरीं गेलें । म्हणों ये कायी ॥ ३९ ॥
यालागीं सुमनु आणि शुद्धमती । जो अनिंदकु अनन्यगती । पैं गा गौप्यही परि तयाप्रती । चावळिजें सुखें ॥ ४० ॥
तरि प्रस्तुत आतां गुणीं इहीं । तूं वांचूनि आणिक नाहीं । म्हणोनि गुज तरी तुझां ठायीं । लपवूं नये ॥ ४१ ॥
आतां किती नावानावा गुज । म्हणतां कानडें वाटेल तुज । तरि ज्ञान सांगेन सहज । विज्ञानेंसीं ॥ ४२ ॥
परि तेंचि ऐसेनि निवाडें । जैसें भेसळलें खरें कुडें । मग काढिजे फाडोवाडें । पारखूनियां ॥ ४३ ॥
कां चांचूचेनि सांडसें । खांडिजे पय पाणी राजहंसें । तुज ज्ञान विज्ञान तैसें । वांटूनि देऊं ॥ ४४ ॥
मग वारयाचियां धारसां । पडिला कोंडा कां नुरेचि जैसा । आणि अन्नकणाचा आपैसा । राशि जोडे ॥ ४५ ॥
तैसें जें जाणितलेयासाठीं । संसार संसाराचिये गांठी । लाऊनि बैसवी पाटीं । मोक्षश्रियेचां ॥ ४६ ॥
राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमम् ।
प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम् ॥ २ ॥
जें जाणणेयां आघवेयांचां गांवीं । गुरुत्वाची आचार्यपदवी । जें सकळ गुह्यांचा गोसावी । पवित्रां रावो ॥ ४७ ॥
आणि धर्माचें निजधाम । तेंविंचि उत्तमाचे उत्तम । पैं जया येतां नाहीं काम । जन्मांतराचें ॥ ४८ ॥
मोटकें गुरुमुखें उदैजत दिसे । आणि हृदयीं स्वयंभचि असे । प्रत्यक्ष फावो लागे तैसें । आपैसया ॥ ४९ ॥
तेविंचि पैं गा सुखाचां पाउटीं । चढतां येइजे जयाचिया भेटी । मग भेटल्या कीर मिठी । भोगणेयाहि पडे ॥ ५० ॥
परि भोगाचिया ऐलीकडिलिये मेरे । चित्त उभें ठेलेंचि सुखा भरे । ऐसें सुलभ आणि सोपारें । वरि परब्रह्म ॥ ५१ ॥
पैं गा आणिकही एक याचें । जें हाता आले तरी न वचे । आणि अनुभवितां कांहीं न वेचे । वरि विटेहि ना ॥ ५२ ॥
येथ जरी तूं तार्किका । ऐसी हन घेसी शंका । ना येवढी वस्तु हे लोकां । उरली केविं पां ॥ ५३ ॥
एकोत्तरेयाचिया वाढी । जे जळतिये आगीं घालिती उडी । ते अनायासें स्वगोडी । सांडिती केविं ॥ ५४ ॥
तरि पवित्र आणि रम्य । तेविंचि सुखोपायेंचि गम्य । आणि स्वसुख परि धर्म्य । वरि आपणपां जोडे ॥ ५५ ॥
ऐसा अवघाचि सुरवाडु आहे । तरी जनाहातीं केविं उरो लाहे । हा शंकेचा ठाव कीर होये । परि न धरावी तुवां ॥ ५६ ॥
अश्रद्दधाना: पुरुषा धर्मस्यास्य परंतप ।
अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्युसंसारवर्त्मनि ॥ ३ ॥
पाहें पां दूध पवित्र आणि गोड । पासीं त्वचेचिया पदराआड । परि तें अव्हेरुनि गोचिड । अशुद्ध काय नेघती ॥ ५७ ॥
कां कमलकंदा आणि दर्दुरीं । नांदणुक एकेचि घरीं । परि परागु सेविजे भ्रमरीं । जवळिलां चिखलुचि उरे ॥ ५८ ॥
नातरी निदैवाचां परिवरीं । लोह्या रुतलिया आहाति सहस्त्रवरीं । परि तेथ बैसोनि उपवासु करी । कां दरिद्रें जिये ॥ ५९ ॥
तैसा हृदयामध्यें मी रामु । असतां सर्वसुखाचा आरामु । कीं भ्रांतासी कामु । विषयावरी ॥ ६० ॥
बहु मृगजळ देखोनि डोळां । थुंकिजे अमृताचा गिळितां गळाळा । तोडिला परिसु बांधिला गळा । शुक्तिकालाभें ॥ ६१ ॥
तैसीं अहंममतेचिये लवडसवडी । मातें न पवतीचि बापुडीं । म्हणोनि जन्ममरणाची दुथडी । डहुळितें ठेलीं ॥ ६२ ॥
एऱ्हवीं मी तरी कैसा । मुखाप्रती भानु कां जैसा । कहीं नसे न दिसे ऐसा । वाणीचा नव्हें ॥ ६३ ॥
मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना ।
मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्ववस्थित: ॥ ४ ॥
माझेया विस्तारलेपणाचेनि नांवें । हे जगचि नोहे आघवें । जैसें दूध मुरालें स्वभावें । तरि तेंचि दहीं ॥ ६४ ॥
कां बीजचि जाहलें तरु । अथवा भांगारचि अळंकारु । तैसा मज एकाचा विस्तारु । तें हें जग ॥ ६५ ॥
हें अव्यक्तपणें थिजलें । तेंचि मग विश्वाकारें वोथिजलें । तैसें अमूर्तमूर्ति मियां विस्तारलें । त्रैलोक्य जाणें ॥ ६६ ॥
महदादि देहांतें । इयें अशेषेंही भूतें । परि माझां ठायीं बिंबते । जैसे जळीं फेण ॥ ६७ ॥
परि तया फेणांआंतु पाहतां । जेवीं जळ न दिसे पंडुसुता । नातरी स्वप्नींची अनेकता । चेइलिया नोहिजे ॥ ६८ ॥
तैसीं भूतें इयें माझां ठायीं । बिंबती तयांमाजी मी नाहीं । इया उपपत्ती तुज पाहीं । सांगितलिया मागां ॥ ६९ ॥
म्हणऊनि बोलिलिया बोलाचा आतिसो । न कीजे यालागीं हें असो । तरी मजाआंत पैसो । दिठि तुझी ॥ ७० ॥
आमचा प्रकृतीपैलीकडील भावो । जरी कल्पनेवीण लागसी पाहों । तरी मजमाजि भूतें हेंही वावो । जे मी सर्व म्हणऊनि ॥ ७१ ॥
एऱ्हवीं संकल्पाचिये सांजवेळे । नावेक तिमिरेजती बुद्धीचे डोळे । म्हणोनि अखंडित परि झांवळें । भूतभिन्न ऐसें देखें ॥ ७२ ॥
तेचि संकल्पाची सांज जैं लोपे । तैं अखंडितचि आहे स्वरुपें । जैसें शंका जातखेंवो लोपे । सापपण माळेचें ॥ ७३ ॥
एऱ्हवीं तरी भूमीआंतूनि स्वयंभ । काय घडेगाडगेयांचे निघती कोंभ । परि ते कुलालमतीचे गर्भ । उमटले कीं ॥ ७४ ॥
नातरी सागरींचां पाणीं । काय तंरगाचिया आहाती खाणी । ते अवांतर करणी । वारयाची नव्हे ॥ ७५ ॥
पाहें पां कापसाचां पोटीं । काय कापडाची होती पेटी । तो वेढितयाचिया दिठी । कापड जाहला ॥ ७६ ॥
जरी सोनें लेणें होऊनि घडे । तरी तयाचें सोनेपण न मोडे । येर अळंकार हे वरचिलीकडे । लेतयाचेनि भावें ॥ ७७ ॥
सांगें पडिसादाची प्रत्युत्तरें । कां आरिसां जें आविष्करे । तें आपलें कीं साचोकारें । तेथेंचि होतें ॥ ७८ ॥
तैसी इये निर्मळे माझां स्वरुपीं । जो भूतभावना आरोपी । तयासी तयाचां संकल्पीं । भूताभासु असे ॥ ७९ ॥
तेचि कल्पिती प्रकृती पुरे । आणि भूताभासु आधींच सरे । मग स्वरुप उरे एकसरें । निखळ माझें ॥ ८० ॥
हें असो आंगीं भरलिया भवंडी । जैशा भोंवत दिसती अरडीदरडी । तैशी आपुलिया कल्पना अखंडीं । गमती भूतें ॥ ८१ ॥
तेचि कल्पना सांडूनि पाहीं । तरि मी भूतीं भूतें माझिया ठायीं । हें स्वप्नींही परि नाहीं । कल्पावयाजोगें ॥ ८२ ॥
आतां मी एक भूतातें धर्ता । अथवा भूतामाजि मी असता । या संकल्पसन्निपाता । आंतुलिया बोलिया ॥ ८३ ॥
म्हणोनि परियेसीं गा प्रियोत्तमा । यापरी मी विश्वेंसीं विश्वात्मा । जो इया लटकिया भूतग्रामा । भाव्यु सदा ॥ ८४ ॥
रश्मीचेनि आधारें जैसें । नव्हतेंचि मृगजळ आभासे । माझां ठायीं भूतजात तैसें । आणि मातेंही भावीं ॥ ८५ ॥
मी ये परीचा भूतभावनु । परि सर्व भूतांसि अभिन्नु । जैसी प्रभा आणि भानु । एकचि ते ॥ ८६ ॥
हा आमचा ऐश्वर्ययोगु । तुंवा देखिला कीं चांगु । आतां सांगें कांहीं एथ लागु । भूतभेदाचा असे ॥ ८७ ॥
यालागीं मजपासूनि भूतें । आनें नव्हती हें निरुतें । आणि भूतावेगळिया मातें । कहींच न मनीं हो । ८८ ॥
यथाकाशस्थितो नित्यं वायुः सर्वत्रगो महान् ।
तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानीत्युपधारय ॥ ६ ॥
पैं गगन जेवढें जैसें । पवनु गगनीं तेवढाचि असे । सहजें हालविलिया वेगळा दिसे । एऱ्हवीं गगन तेंचि ते ॥ ८९ ॥
तैसें भूतजात माझां ठायीं । कल्पिजे तरी आभासें कांहीं । निर्विकल्पीं तरि नाहीं । तेथ मीच मी आघवे ॥ ९० ॥
म्हणऊनि नाहीं आणि असे । हें कल्पनेचेनि सौरसें । जे कल्पनालोपें भ्रंशें । आणि कल्पनेसवें होय ।। ९१ ॥
तेंचि कल्पितें मुदल जाये । तैं असें नाहीं हें कें आहे । म्हणऊनि पुढती तूं पाहें । हा ऐश्वर्ययोगु ॥ ९२ ॥
ऐसिया प्रतीतिबोधसागरीं । तूं आपणपेयातें कल्लोळु एक करीं । मग जंव पाहासी चराचरीं । तंव तूचि आहासी ॥ ९३ ॥
या जाणणेयाचा चेवो । तुज आला ना म्हणती देवो । तरी आतां द्वैतस्वप्न वावो । जालें कीं ना ॥ ९४ ॥
तरी पुढती जरी विपायें । बुद्धीसि कल्पनेची झोंप ये । तरी अभेदबोधु जाये । जैं स्वप्नीं पडिजे ॥ ९५ ॥
म्हणोनि ये निद्रेची वाट मोडे । निखळ उद्बोधाचेंचि आपणपें घडे । ऐसें वर्म जें आहे फुडें । तें दावो आतां ॥ ९६ ॥
तरी धनुर्धरा धैर्या । निकें अवधान देईं बा धनंजया । पैं सर्व भूतांतें माया । करि हरि गा ॥ ९७ ॥
सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकाम् ।
कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम् ॥ ७ ॥
जिये नांव गा प्रकृती । जे द्विविध सांगितली तुजप्रती । एकी अष्टधा भेदव्यक्ती । दुजी जीवरुपा ।। ९८ ॥
हा प्रकृतीविखो आघवा । तुंवा मागां परिसिलासे पांडवा । म्हणोनि असो काइ सांगावा । पुढतपुढती ॥ ९९ ॥
तरी ये माझिये प्रकृती । महाकल्पाचां अंती । सर्व भूतें अव्यक्तीं । ऐक्यासी येती ।। १०० ॥
ग्रीष्माचां अतिरसीं । सबीजे तृणें जैसीं । मागुती भूमीसी । सुलीनें होती ॥ १०१ ॥
कां वार्षिये ढेंढें फिटे । जेव्हां शारदीयेचा अनुघडु फुटे । तेव्हां घनजात आटे । गगनींचें गगनीं ॥ १०२ ॥
नातरी आकाशाचिये खोंपे । वायु निवांतुचि लोपे । कां तरंगता हारपे । जळीं जेवीं ॥ १०३ ॥
अथवा जागिनलिये वेळे । स्वप्न मनींचें मनीं मावळे । तैसें प्राकृत प्रकृती मिळे । कल्पक्षयीं ॥ १०४ ॥
मग कल्पादीं पुढती । मीचि सृजीं ऐसी वदंती । तरी इयेविषयीं निरुती । उपपत्ती आइक ॥ १०५ ॥
प्रकृतिं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः ।
भूतग्राममिमं कृत्स्नमवशं प्रकृतेर्वशात् ॥ ८ ॥
तरी हेचि प्रकृति किरिटी । मी स्वकीया सहजें अधिष्ठीं । तेथ तंतुसमवायपटीं । जेविं विणावणी दिसे ॥ १०६ ॥
मग तिये विणावणीचेनि आधारें । लहानां चौकडियां पटत्व भरे । तैसी पंचात्मके आकारें । प्रकृतिचि होये ॥ १०७ ॥
जैसें विरजणियाचेनि संगें । दूधचि आटेजों लागे । तैशी प्रकृति आंगा रिगे । सृष्टिपणाचिया ॥ १०८ ॥
बीज जळाचि जवळीक लाहे । आणि तेंचि शाखोपशाखीं होये । तैसें मज करणें आहे । भूतांचे हें ॥ १०९ ॥
अगा नगर हें रायें केलें । या म्हणणया साचपण कीर आलें । परि निरुतें पाहतां काय शिणले । रायाचे हात ॥ ११० ॥
आणि मी प्रकृति अधिष्ठीं तें कैसें । जैसा स्वप्नीं जो असे । मग तोचि प्रवेशे । जागृतावस्थे ॥ १११ ॥
तरि स्वप्नौनि जागृती येतां । काय पाय दुखती पंडुसुता । कीं स्वप्नामाजीं असतां । प्रवासु होय ॥ ११२ ॥
या आघवियाचा अभिप्रावो कायी । जे हें भूतसृष्टीचें कांहीं । मज एकही करणें नाहीं । ऐसाचि अर्थु ॥ ११३ ॥
जैशी रायें अधिष्ठिली प्रजा । व्यापारे आपुलालिया काजा । तैसा प्रकृतिसंगु माझा । येर करणें तें इयेचें ॥ ११४ ॥
पाहें पां पूर्णचंद्राचिये भेटी । समुद्र भरतें अपार दाटी । तेथ चंद्रासि काय किरीटी । उपखा पडे ॥ ११५ ॥
जड परि जवळिका । लोह चळे तरि चळो कां । कवणु शीणु भ्रामका । सन्निधानाचा ॥ ११६ ॥
किंबहुना यापरी । मी निजप्रकृति अंगीकारीं । आणि भूतसृष्टी एकसरी । प्रसवोंचि लागे ॥ ११७ ॥
जो हा भूतग्रामु आघवा । असे प्रकृतिआधीन पांडवा । जैसी बीजाचिया वेलपालवा । समर्थ भूमि ॥ ११८ ॥
नातरि बाळादिकां वयसां । गोसावी देहसंगु जैसा । अथवा घनावळी आकाशा । वार्षियें जेवीं ॥ ११९ ॥
कां स्वप्नासि कारण निद्रा । तैसी प्रकृति हे नरेंद्रा । या अशेषाहि भूतसमुद्रा । गोसाविणी गा ॥ १२० ॥
स्थावरा आणि जंगमा । स्थूळा अथवा सूक्ष्मा । हे असो भूतग्रामा । प्रकृतिचि मूळ ॥ १२१ ॥
म्हणोनि भूतें हन सृजावीं । कां सृजिलीं प्रतिपाळावीं । इयें करणीं न येती आघवीं । आमुचिया आंगा ॥ १२२ ॥
जळीं चंद्रिकेचिया पसरती वेली । ते वाढी चंद्रे नाहीं वाढविली । तेवि मातें पावोनि ठेलीं । दुरी कर्में ॥ १२३ ॥
न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनंजय ।
उदासीनवदासीनमसक्तं तेषु कर्मसु ॥ ९ ॥
आणि सुटलिया सिंधुजळाचा लोटु । न शके धरुं सैंधवाचा घाटु । तेवि सकळ कर्मा मीच शेवटु । ती काइ बांधती मातें ॥ १२४ ॥
धूम्ररजांची पिंजरी । वाजतिया वायुतें जरी होकारी । कां सूर्यबिंबामाझारीं । आंधारे रिगे ॥ १२५ ॥
हें असो पर्वताचिये हृदयींचें । जेविं पर्जन्यधारास्तव न खोंचे । तेविं कर्मजात प्रकृतीचें । न लगे मज ॥ १२६ ॥
एऱ्हवीं इये प्राकृतीं विकारीं । एकु मीचि आहे अवधारीं । परि उदासीनाचिया परि । करीं ना करवी ॥ १२७ ॥
दीपु ठेविला परिवरीं । कवणातें नियमी ना निवारी । आणि कवण कवणिये व्यापारीं । राहाटे तेंहि नेणे ॥ १२८ ॥
तो जैसा का साक्षिभूतु । गृहव्यापारप्रवृत्तिहेतु । तैसा भूतकर्मीं अनासक्तु । मी भूतीं असें ॥ १२९ ॥
हा एकचि अभिप्रावो पुढतपुढती । काय सांगो बहुतां उपपत्तीं । येथ एकवेळां सुभद्रापती । येतुलें जाण पां ॥ १३० ॥
मयाध्यक्षेण प्रकृति: सूयते सचराचरम् ।
हेतुनानेन कौन्तेय जगद्विपरिवर्तते ॥ १० ॥
जे लोकचेष्टां समस्तां । जैसा निमित्तमात्र कां सविता । तैसा जगत्प्रभवीं पंडुसुता । हेतु मी जाणें ॥ १३१ ॥
कां जें मियां अधिष्ठिलिया प्रकृती । होती चराचराचिया संभूती । म्हणोनि मी हेतु हें उपपत्ती । घडे यया ॥ १३२ ॥
आतां येणें उजिवडें निरुतें । न्याहाळीं पां ऐश्वर्ययोगातें । जे माझां ठायीं भूतें । परी भूतीं मी नसें ॥ १३३ ॥
अथवा भूतें ना माझां ठायीं । आणि भूतांमाजि मी नाहीं । या खुणा तुं कही । चुकों नको ॥ १३४ ॥
हें सर्वस्व आमुचें गूढ । परि दाविलें तुज उघड । आतां इंद्रियां देऊनि कवाड । हृदयीं भोगीं ॥ १३५ ॥
हा दंशु जंव नये हातां । तंव माझें साचोकारेपण पार्था । न संपडे गा सर्वथा । जेविं भुसीं कणु ॥ १३६ ॥
एऱ्हवीं अनुमानाचेनि पैसें । आवडे कीर कळलें ऐसें । परि मृगजळाचेनि वोलांशें । काय भूमि तिमे ॥ १३७ ॥
जें जाळ जळीं पांगिलें । तेथ चंद्रबिंब दिसे आंतुडलें । परि थडिये काढूनि झाडिलें । तेव्हां बिंब कें सांगे ॥ १३८ ॥
तैसें बोलवरि वाचाबळें । वायांचि झकविजती प्रतीतीचे डोळे । मग साचोकारें बोधावेळे । आथि ना होईजे ॥ १३९ ॥
अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम् ।
परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम् ॥ ११ ॥
किंबहुना भवा बिहा या । आणि साचें चाड आथि जरी मियां । तरि तुम्हीं गा उपपत्ती इया । जतन कीजे ॥ १४० ॥
एऱ्हवीं वेधली दिठी कवळें । ते चांदणियाते म्हणे पिंवळें । तेविं माझां स्वरुपीं निर्मळे । देखाल दोष ॥ १४१ ॥
नातरी ज्वरें विटाळले मुख । ते दुधातें म्हणे कडू विख । तेविं अमानुषा मानुष । मानाल मातें ॥ १४२ ॥
म्हणऊनि पुढती तूं धनंजया । झणें विसंबसी या अभिप्राया । जे इया स्थूलदृष्टी वायां । जाइजेल गा ॥ १४३ ॥
पैं स्थूलदृष्टी देखती मातें । तेंचि न देखणें जाण निरुतें । जैसें स्वप्नींचेनि अमृतें । अमरा नोहिजे ॥ १४४ ॥
एऱ्हवीं स्थूलदृष्टी मूढ । मातें जाणती कीर दृढ । परि तें जाणणेंचि जाणणेया आड । रिगोनि ठाके ॥ १४५ ॥
जैसा नक्षत्राचिया आभासा- । साठीं घातु झाला तया हंसा । माजीं रत्नबुद्धीचिया आशा । रिगोनियां ॥ १४६ ॥
सांगे गंगा या बुद्धी मृगजळ । ठाकोनि आलियाचें कवण फळ । काय सुरतरु म्हणोनि बाबुळ । सेविली करी ॥ १४७ ॥
हा निळयाचा दुसरा । या बुद्धी हातु घातला विखारा । कां रत्ने म्हणोनि गारा । वेंची जेविं ॥ १४८ ॥
अथवा निधान हें प्रगटलें । म्हणोनि खदिरांगार खोळे भरिले । कां साउली नेणतां घातलें । कुहां सिंहें ॥ १४९ ॥
तेविं मी म्हणोनि प्रपंचीं । जिहीं बुडी दिधली कृतनिश्चयाची । तिहीं चंद्रासाठीं जेविं जळींची । प्रतिमा धरिली ॥ १५० ॥